Jude

यहुदाचे पत्र

—–यहुदा—–

येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून;
देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः
तुम्हास दया, शांती व प्रीती बहुगुणित मिळोत.

प्रियांनो, मी आपल्या समाईक तारणाविषयी तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करीत असता, मला ह्याचे अगत्य वाटले की, जो विश्वास पवित्र जनांना सर्वकाळसाठी एकदा दिला, तो राखण्याविषयी मी तुम्हाला लिहून उत्तेजन द्यावे. कारण, जे ह्या न्यायासाठी पूर्वीपासून नेमले गेले, असे कित्येक जण एकीकडून आत आले आहेत; हे भक्तिहीन लोक देवाच्या कृपेचा कामातुरपणात विपर्यास करतात, आणि ते आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.
म्हणून माझी इच्छा आहे की, तुम्ही एकदा हे जाणत होता तरी तुम्हाला आठवण द्यावी की, परमेश्वराने त्या लोकांना मिसर देशातून वाचवल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांना त्याने नंतर नष्ट केले; आणि ज्या देवदूतांनी आपले मूळपद न संभाळता आपले स्वतःचे वसतिस्थान सोडले त्यांना त्याने त्या महान दिवसाच्या न्यायासाठी सनातन बंधनात, गडद काळोखात ठेवले आहे; त्याचप्रमाणे सदोम व गमोरा आणि त्यांच्यामागे जारकर्मात लोळणारी व परदेहाच्या मागे लागणारी, त्यांच्या भोवतालची इतर नगरे, आपल्यापुढे उदाहरण म्हणून, सनातन अग्नीची शिक्षा भोगीत ठेवली आहेत.
तसेच हे, स्वप्न पाहणारे देहाला विटाळवतात, ते शासनाचा अवमान करतात व सत्तांविषयी वाईट बोलतात. आद्यदेवदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरिराकरता सैतानाशी वाद करून त्याला विरोध केला तेव्हा तोसुद्धा त्याच्यावर निदेने आरोप आणण्यास धजला नाही; पण प्रभू तुला धमकावो, असे म्हणाला.
१०पण हे ज्या गोष्टी जाणत नाहीत अशा गोष्टींविषयी वाईट बोलतात. पण त्यांना निर्बुद्ध प्राण्यांप्रमाणेनैसर्गिक रीत्या ज्या गोष्टी समजतात त्यायोगे ते स्वतःचाच नाश करतात.
११त्यांना हळहळ! कारण ते काइनाच्या मार्गात गेले आहेत; ते आपल्या लाभासाठी बलामाच्या संभ्रमात पडले आहेत, आणि कोरहाच्या बंडात ते नाश पावले आहेत.
१२ते तुमच्या प्रीतीभोजनात पाण्यात दडलेल्या खडकांप्रमाणे असतात व तुमच्याबरोबर भोजन करतात तेव्हा स्वतःचे मेंढपाळ होतात. ते वार्‍यांबरोबर निघून जाणारे निर्जळ ढग आहेत, ते पहिल्या पिकात निष्फळ झालेली, दोनदा मेलेली व उपटून टाकलेली झाडे आहेत, १३ते समुद्रावरच्या विक्राळ लाटांसारखे स्वतःच्या लाजेचा फेस वर आणतात. ज्यांच्याकरता, सर्वकाळसाठी अंधाराचा गडद काळोख राखलेला आहे असे त भटके तारे आहेत.
१४आणि आदामापासून सातवा, हनोख, ह्यानेही ह्यांच्याविषयी संदेश देऊन म्हटले आहे की, बघा, प्रभू आपले अयुतायुत पवित्र जन आपल्याबरोबर घेऊन येत आहे. १५तो सर्वांचा न्याय करण्यास व त्यांच्यातील सर्व भक्तिहीन लोकांना, त्यांनी भक्तिहीनपणे केलेल्या भक्तिहीन कृतींविषयी, आणि भक्तिहीन पाप्यांनात्याच्याविरुद्ध त्यांनी म्हटलेल्या सर्व कठोर गोष्टींविषयी दोषी ठरविण्यास येत आहे. १६ते कुरकुर करणारेआपल्या वाट्याला दोष लावणारे आपल्या वासनांप्रमाणे चालतात. त्यांचे तोंड मोठ्या फुगवलेल्या गोष्टी बोलते व ते आपल्या लाभासाठी मनुष्यांची वाहवा करतात.
१७पण प्रियांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेषितांनी भाकीत केलेल्या वचनांची तुम्ही आठवण करा; १८त्यांनी तुम्हाला म्हटले होते की, शेवटच्या काळात टवाळखोर उठतील व आपल्या भक्तिहीन वासनांप्रमाणे चालतील. १९हे भेद करणारे लोक जीवधारी स्वभावाचे, आत्मा नसलेले लोक आहेत.
२०पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली उभारणी करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करीत, २१तुम्ही सनातन जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा. २२जे संशय धरतात त्यांच्यावर तुम्ही दया करा; २३आणि काहींना अग्नीतून ओढून काढून वाचवा. काही जणांवर तुम्ही भीत भीत दया करा; पण हे करताना देहामुळे डागळलेल्या वस्त्रांचाही द्वेष करा.
२४आता, तुम्हाला अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे, २५असा जो एकच देव आपला तारणारा त्याला आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे गौरव,राजवैभव, सत्ता आणि अधिकार ही युगांच्या आधीपासून, आता आणि युगानुयुग असोत. आमेन.

Write Your Comment