1 Corinthians 1-5

करिंथकरांस पहिले पत्र

—–१ करिंथ १—–

देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्यास बोलावलेला पौल, आणि बंधू सोस्थेनेस ह्यांजकडून;
ख्रिस्त येशूत पवित्र केलेल्या, आणि जे प्रत्येक ठिकाणी आपला प्रभू, म्हणजे त्यांचा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने धावा करतात, अशा सर्वांबरोबर पवित्र जन होण्यास बोलावलेल्या, करिंथ येथील देवाच्या मंडळीसः
देव आपला पिता, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.

तुम्हाला ख्रिस्त येशूत पुरविलेल्या, देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो. ५-६कारण तुमच्यात ख्रिस्ताची साक्ष जशी दृढमूल झाली, तसे तुम्ही त्याच्या द्वारे सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात प्रत्येक प्रकारे संपन्न झाला आहात. त्यामुळे तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा करीत असता कोणत्याही कृपादानात कमी असू नये. आणि त्याचप्रमाणे तो तुम्हाला शेवटपर्यंत सुस्थिर करील, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे. देव विश्वासू आहे आणि त्याने तुम्हाला त्याचा पुत्र व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या भागीत बोलावले आहे.

१०आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हाला, बंधूंनो, विनंती करतो की, तुम्ही सर्व जण एकच बोला आणि तुमच्यात विभाग नसावेत. पण तुम्ही एकमेकांशी, एकमनाने व एकमताने पूर्णपणे जोडले जावे. ११कारण, माझ्या बंधूंनो, तुमच्यात कलह आहेत असे ख्लोवेच्या घराण्याकडून मला तुमच्याविषयी सांगण्यात आले आहे. १२माझे म्हणणे हे आहे की, तुमच्यातील प्रत्येक जण म्हणतो, मी पौलाचा आहे, मी अपुल्लोचा आहे, मी केफाचा आहे, आणि मी ख्रिस्ताचा आहे.
१३ख्रिस्ताचे विभाग झालेत काय? तुमच्यासाठी पौल वधस्तंभावर खिळला गेला काय? किवा पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला काय? १४मी तुमच्यातील क्रिस्पस व गायस ह्यांच्याशिवाय दुसर्‍या कोणाचाच बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी देवाचे उपकार मानतो. १५नाहीतर, कोणी असे म्हणेल की, मी माझ्याच नावाने बाप्तिस्मा केला. १६आणि मी स्तेफनाच्या घराण्याचाही बाप्तिस्मा केला; ह्यांच्याशिवाय मी आणखी कोणाचा बाप्तिस्मा केला काय, हे मला माहीत नाही. १७कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास पाठविले नाही, पण सुवार्ता सांगण्यास पाठविले आहे; पण शाब्दिक ज्ञानीपणाने नाही; नाहीतर, ख्रिस्ताचा वधस्तंभ निरर्थक केला जाईल.

१८कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाचा संदेश मूर्खपण आहे; पण ज्यांचे तारण होत आहे त्या आपल्यासाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
१९कारण असे लिहिले आहे की, मी ज्ञान्यांचे ज्ञानीपण नष्ट करीन, आणि बुद्धिवानांची बुद्धी नाहीशी करीन.२०ह्या युगातला ज्ञानी कुठे आहे, शास्त्री कुठे आहे, वादविवादी कुठे आहे? ह्या जगाचे ज्ञानीपण देवाने मूर्खपण ठरविले की नाही? २१कारण देवाच्या ज्ञानीपणात, जगाने देवाला ज्ञानीपणाने ओळखले नाही. म्हणून देवाला हे बरे वाटले की, घोषणा करण्याच्या मूर्खपणाद्वारे जे विश्वास ठेवतात त्यांचे तारण व्हावे.
२२कारण यहुदी चिन्ह मागतात व हेल्लेणी ज्ञानीपणाच्या मागे लागतात. २३पण, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. तो यहुद्यांना अडथळा व हेल्लेण्यांना मूर्खपण आहे; २४पण दोहोंतल्या बोलावलेल्यांस,  यहुद्यांस आणि हेल्लेण्यांस, ख्रिस्त देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञानीपण आहे; २५कारण देवाचे मूर्खपण मनुष्यांपेक्षा बुद्धिवान आहे; आणि देवाचे अशक्तपण मनुष्यांपेक्षा बलवान आहे.
२६कारण बंधूंनो, तुमचे पाचारण पहा; दैहिक दृष्ट्या तुमच्यात ज्ञानी पुष्कळ नाहीत, पराक्रमी पुष्कळ नाहीत, कुलवंत पुष्कळ नाहीत. २७पण ज्ञान्यांना लज्जित करण्यास देवाने जगातल्या मूर्ख गोष्टी निवडल्या, आणि बलिष्ठांना लज्जित करण्यास देवाने जगातल्या दुर्बळ गोष्टी निवडल्या;  २८आणि आहेत त्या गोष्टी निरुपयोगी करण्यास देवाने जगातल्या हलक्या गोष्टी, उपेक्षित गोष्टी आणि काहीच नाहीत अशा गोष्टी निवडल्या; २९म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान मिरवू नये.
३०त्याच्यामुळे तुम्ही ख्रिस्त येशूत आहा; आणि देवाकडून तो आपल्यासाठी ज्ञानीपण व नीतिमत्व, आणि पवित्रीकरण व मुक्ती असा केला गेला आहे. ३१म्हणजे शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, जो कोणी अभिमान मिरवतो त्याने प्रभूविषयी अभिमान मिरवावा.     

—–१ करिंथ २—–

आणि बंधूंनो, मी तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्हाला भाषेच्या किवा ज्ञानीपणाच्या श्रेष्ठतेने देवाच्या साक्षीची घोषणा करीत आलो नाही. कारण मी ठरवले होते की, मी तुमच्यात येशू ख्रिस्ताशिवाय, आणि वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताशिवाय दुसरे काहीही मानू नये.
आणि मी अशक्तपणात, भय धरून, फार कापत  कापत तुमच्यात आलो. पण माझे बोलणे व घोषणा करणे भुरळ घालणार्‍या ज्ञानीपणाच्या शब्दांत नव्हते, पण आत्म्याच्या व सामर्थ्याच्या निदर्शनात होते. म्हणजे तुमचा विश्वास मनुष्यांच्या ज्ञानीपणावर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला असावा.
तरी पण जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही ज्ञानीपण सांगतो. पण ते ह्या युगाचे ज्ञानीपण नाही, किवा ह्या युगाच्या नष्ट होणार्‍या अधिपतींचेही नाही, तर जे आपल्या गौरवासाठी देवाने युगांपूर्वी पूर्वनियोजित केले होते, त्या गुप्त रहस्यातील देवाचे ज्ञानीपण आम्ही सांगतो. ते ह्या युगाच्या अधिपतींमधील कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते, तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते.
पण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, देवाने त्याच्यावर प्रीती करणार्‍यांसाठी ज्या गोष्टी सिद्ध केल्या आहेत, त्या डोळ्याने बघितलेल्या नाहीत, किंवा कानाने ऐकलेल्या नाहीत, किंवा मनुष्यांच्या मनांत आलेल्या नाहीत; १०पण देवाने त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्या आपल्याला प्रकट केल्या आहेत. कारण आत्मा सर्व गोष्टी, हो, देवाच्या गूढ गोष्टीही, शोधून काढतो. ११कारण मनुष्यांत असा कोण आहे की, त्याच्यात राहणार्‍या मनुष्याच्या आत्म्याशिवाय तो एखाद्या मनुष्याच्या गोष्टी जाणतो? त्याचप्रमाणे देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्याशिवाय कोणाला माहीत नाहीत.
१२आता आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नसून देवाकडून आलेला आत्मा मिळाला आहे; म्हणजे देवाने आपल्याला ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या आपल्याला कळाव्यात. १३आणि आम्ही ह्या गोष्टी सांगतो, पण मनुष्याच्या ज्ञानीपणाने शिकविलेल्या शब्दांत नाही, तर पवित्र आत्म्याने शिकविलेल्या शब्दांत आत्मिक गोष्टींची आत्मिक गोष्टींशी तुलना करून सांगतो.
१४कारण जीवधारी मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपण आहेत; तो त्या ओळखू शकत नाही, कारण आत्मिक दृष्ट्या त्यांची पारख करता येते; १५पण जो आत्मिक आहे तो सर्व गोष्टींची पारख करतो, तरी कोणीही मनुष्याकडून त्याची पारख केली जात नाही; १६कारण, परमेश्वराचे मन कोणी ओळखले आहे की, त्याने त्याला काही सुचवावे?’ पण आपल्याला ख्रिस्ताचे मन आहे.     

—–१ करिंथ ३—–

आणि बंधूंनो, मी आत्मिक मनुष्यांशी जसे बोलावे तसे तुमच्याशी बोलू शकलो नाही, तर मी दैहिक मनुष्यांशी, ख्रिस्तामधील बालकांशी जसे बोलावे, तसे तुमच्याशी बोलू शकलो. मी तुम्हाला दूध दिले, जड अन्न नाही; कारण तुम्हाला आतापर्यंत शक्ती नव्हती, आणि तशीच, अजून तुम्हाला शक्ती नाही, पण तुम्ही अजून दैहिक आहा, कारण ज्याअर्थी तुमच्यात ईर्ष्या, कलह व फुटी आहेत त्याअर्थी तुम्ही अजून दैहिक आहा, आणि मनुष्यांसारखे चालत आहा असे नाही काय?
कारण एक म्हणतो, मी पौलाचा आहे आणि दुसरा म्हणतो, मी अपुल्लोचा आहे, तर तुम्ही दैहिक आहा असे नाही काय? मग अपुल्लो कोण आहे? आणि पौल कोण आहे? प्रत्येक जणाला प्रभूने दिल्याप्रमाणे,  ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवलात असे ते केवळ सेवक आहेत. मी लावले, अपुल्लोने पाणी घातले, पण देवाने वाढविले. तर मग, लावणारा काहीच नाही व पाणी घालणारा काहीच नाही, पण वाढविणारा देव आहे. आता लावणारा आणि पाणी घालणारा हे सारखेच आहेत आणि प्रत्येक जणाला, त्याच्या स्वतःच्या कामाप्रमाणे त्याचे स्वतःचे प्रतिफळ मिळेल.
कारण आम्ही देवाचे सहकारी आहो, तुम्ही देवाचे शेत आहा, तुम्ही देवाचे बांधकाम आहा, १०मला पुरविलेल्या देवाच्या कृपेच्या परिमाणानुसार मी सुज्ञ, प्रमुख बांधणार्‍याप्रमाणे पाया घातलेला आहे; आणि दुसरा त्यावर बांधीत आहे; तर आपण त्यावर कसे बांधीत आहो ह्याची प्रत्येक जणाने काळजी घ्यावी.

११कारण जो पाया घातलेला आहे, आणि तो ख्रिस्त येशू आहे,  त्याच्याशिवाय दुसरा पाया कोणीही मनुष्य घालू शकणार नाही. १२आता कोणी जर ह्या पायावर सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत किवा पेंढा घेऊन बांधील १३तर प्रत्येकाचे काम उघड होईल; कारण तो दिवस ते उघड करील, कारण ते अग्नीने प्रकट होईल, आणि प्रत्येक मनुष्याचे काम कसले आहे ते अग्नी पारखील. १४आणि जर कोणाचे त्यावर बांधलेले काम राहिले तर त्याला वेतन मिळेल. १५जर कोणाचे काम जळाले तर त्याची हानी होईल, मग जणू अग्नीतून वाचविल्याप्रमाणे तो स्वतः वाचविला जाईल.
१६तुम्ही देवाचे मंदिर आहा, आणि देवाचा आत्मा तुमच्यात वास करतो हे तुम्ही जाणत नाही काय? १७जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करील तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहा.
१८कोणी स्वतःला फसवू नये. आपण ह्या युगात ज्ञानी आहोत असे तुमच्यातील कोणाला वाटत असेल, तर त्याने ज्ञानी होण्यास मूर्ख व्हावे. १९कारण ह्या जगाचे ज्ञानीपण देवापुढे मूर्खपण आहे. कारण असे लिहिले आहे की, तो ज्ञान्यांना त्यांच्या धूर्तपणात धरतो. २०आणि पुन्हा, परमेश्वर ज्ञान्यांचे विचार जाणतो की, ते व्यर्थ आहेत.
२१म्हणून कोणीही मनुष्यांविषयी अभिमान मिरवू नये; कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत. २२पौल, किंवा अपुल्लो, किंवा केफा, किंवा जग, किंवा जीवन, किंवा मरण, आताच्या गोष्टी किंवा येणार्‍या गोष्टी, हे सर्व तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहा व ख्रिस्त देवाचा आहे.

—–१ करिंथ ४—–

कारण आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत,  असेच कोणीही आम्हाला गणले पाहिजे. शिवाय, मनुष्य विश्वासू आढळला पाहिजे हे कारभार्‍यांत आवश्यक आहे. पण तुमच्याकडून, किंवा मनुष्याच्या दिवशी माझी चौकशी केली जावी ही मला एक क्षुल्लक गोष्ट आहे; हो, मी माझी चौकशी करीत नाही, कारण माझ्याविरुद्ध मला काही माहीत नाही. तरी त्यामुळे मी दोषी ठरत नाही; पण माझी चौकशी करणारा प्रभू आहे.
म्हणून तुम्ही त्या काळापूर्वी, प्रभू येईपर्यंत कशाचा न्याय करू नका; तो अंधारातल्या गुप्त गोष्टी प्रकाशात आणील, आणि मनातले विचार प्रगट करील तेव्हा प्रत्येक मनुष्याची देवाकडून प्रशंसा होईल. आणि बंधूंनो, तुमच्याकरता मी ह्या गोष्टी मला आणि अपुल्लोला उपमेने लागू केल्या आहेत. म्हणजे तुम्ही आमच्यापासून शिकावे की, जे काही लिहिलेले आहे त्यापेक्षा मनुष्यांना अधिक मानू नये, म्हणजे तुमच्यात कोणीही एकाकरता दुसर्‍यावर फुगू नये. कारण तुला वेगळे कोणी केले? आणि तुला मिळाले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? मग तुला मिळाले असता, जणू तुला मिळाले नाही, असा अभिमान तू का मिरवतोस? तुम्ही इतक्यात तृप्त झालात? तुम्ही इतक्यात संपन्न झालात? तुम्ही आमच्याशिवाय राजे झालात? आणि तुम्ही राज्य चालवावे अशी, खरोखर, मी इच्छा करीन म्हणजे आम्हीही तुमच्याबरोबर राज्य चालवू.
कारण मला असे वाटते की, देवाने जणू आम्हा प्रेषितांना मरणासाठी नेमलेल्यांसारखे शेवटी पुढे आणले आहे. कारण आम्ही जगाला, देवदूतांना व मनुष्यांना, जणू तमाशा झालो आहो. १०आम्ही ख्रिस्ताकरता मूर्ख, पण तुम्ही ख्रिस्तात शहाणे आहात; आम्ही दुर्बळ, पण तुम्ही बलवान आहात; तुम्ही प्रतिष्ठित, पण आम्ही अवमानित झालो आहोत. ११आम्ही ह्या घटकेपर्यंत भुकेले आहोत, तान्हेले आहोत आणि उघडे आहोत. आम्हाला बुक्क्या मारल्या जात आहेत आणि आम्हाला आमचे ठिकाण नाही. १२आम्ही आमच्या हातांनी काम करून कष्ट करतो; आमची हेटाळणी होत असता आम्ही आशीर्वाद देतो; छळ होत असता सहन करतो; १३निंदा होत असता आम्ही विनंती करतो; आम्ही आतापर्यंत जगाची घाण व सगळ्या गोष्टींची खरवड झालो आहो.

१४मी तुम्हाला लाजवावे म्हणून हे लिहीत नाही, पण माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हाला बोध करावा म्हणून लिहितो. १५कारण जरी ख्रिस्तात तुम्हाला दहा हजार शिक्षक असले तरी पुष्कळ बाप नाहीत; कारण मी सुवार्तेद्वारे तुम्हाला ख्रिस्त येशूत जन्म दिला आहे. १६म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, माझे अनुकरण करणारे व्हा. १७म्हणून मी तिमथ्याला तुमच्याकडे धाडले आहे; तो प्रभूमध्ये माझा प्रिय आणि विश्वासू मुलगा आहे, आणि, ख्रिस्त येशूतील ज्या माझ्या पद्धती मी प्रत्येक ठिकाणी,  प्रत्येक मंडळीत शिकवीत असतो त्यांची तुम्हाला तो आठवण देईल.
१८मी जणू तुमच्याकडे येणार नसेन म्हणून कित्येक जण फुगलेत. १९पण प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन, आणि जे फुगलेत त्यांचे बोलणे नाही, पण त्यांचे सामर्थ्य मला कळेल. २०कारण देवाचे राज्य शब्दात नाही पण सामर्थ्यात आहे. २१तुमची काय इच्छा आहे? मी तुमच्याकडे काठी घेऊन येऊ, किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने येऊ?      

—–१ करिंथ ५—–

खरोखर, तुमच्यात जारकर्म आहे असे ऐकण्यात येत आहे. आणि कोणी आपल्या बापाची बायको घ्यावी, असे जारकर्म परजनांतदेखील आढळत नाही. पण तुम्ही फुगला आहात, आणि उलट ही गोष्ट करणारा आपल्यामधून काढला जावा म्हणून तुम्ही शोक केला नाही.
कारण मी शरिराने दूर असलो तरी आत्म्याने जवळ असल्यामुळे, मी जवळ असल्याप्रमाणे, अशी ही गोष्ट करणार्‍याचा, खरोखर, आधीच न्याय केला आहेः तुम्ही जेव्हा प्रभू येशू ह्याच्या नावाने एकत्र जमाल आणि माझा आत्मा तुमच्याबरोबर असेल तेव्हा आपला प्रभू येशू ह्याच्या सामर्थ्याने, तुम्ही अशा माणसाला देहाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे; म्हणजे, प्रभूच्या दिवशी आत्म्याचे तारण व्हावे.
तुमचा अभिमान चांगला नाही. थोडेसे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्ही जाणता ना? म्हणून तुम्ही जुने खमीर साफ काढा, म्हणजे तुम्ही बेखमीर आहात त्याप्रमाणे तुम्ही एक नवा गोळा व्हावे; कारण आपला वल्हांडणाचा बळी ख्रिस्त मारला गेला आहे. तर आपण जुन्या खमिराने, किवा कुवृत्तीच्या व कुकर्माच्या खमिराने नाही, पण शुद्ध भावाच्या व खरेपणाच्या बेखमीर भाकरीने सण पाळू  या.
मी तुम्हाला माझ्या पत्रात लिहिले होते की, जारकर्म्यांशी संबंध ठेवू नका. १०पण जगातले जारकर्मी, लोभी, लुबाडणारे किवा मूर्तिपूजक असे मुळीच नाही; कारण मग तुम्हाला जगातून बाहेर जावे लागेल. ११पण आता, मी तुम्हाला लिहिले आहे की, बंधू म्हटलेला कोणी मनुष्य जर जारकर्मी, लोभी, किवा मूर्तिपूजक, निंदक, पिणारा किवा लुबाडणारा असेल तर त्याच्याशी संबंध ठेवू नका; अशा माणसांबरोबर जेवूही नका. १२कारण बाहेरच्यांचा न्याय करण्याशी माझा काय संबंध? १३पण देव बाहेरच्यांचा न्याय करतो म्हणून तुम्ही आपल्यामधून त्या दुष्ट माणसाला बाहेर काढा.    

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s