1 Corinthians 11-16

करिंथकरांस पहिले पत्र

—–१ करिंथ ११—–

मी जसा ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.

आता, तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता, आणि मी तुम्हाला नेमून दिलेल्या प्रथा पाळता, म्हणून मी तुमची वाखाणणी करतो. पण माझी इच्छा आहे की, तुम्हाला हे समजले पाहिजेः प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. जो मस्तक आच्छादून प्रार्थना करतो, किंवा संदेश देतो तो प्रत्येक मनुष्य आपल्या मस्तकाचा अपमान करतो. पण जी मस्तकावर आच्छादन न घेता प्रार्थना करते, किंवा संदेश देते ती प्रत्येक स्त्री आपल्या मस्तकाचा अपमान करते; कारण ती मुंडण केल्याप्रमाणे होते. कारण स्त्री जर पूर्ण आच्छादन घेत नसेल तर तिने केसदेखील काढून टाकावेत; पण, केस काढून टाकणे किवा मुंडण करणे हे जर स्त्रीला लाजिरवाणे असेल तर तिने पूर्ण आच्छादन घ्यावे. कारण, पुरुषाने, खरोखर, मस्तक आच्छादू नये; कारण तो देवाचे प्रतिरूप आणि गौरव आहे; पण स्त्री पुरुषाचे गौरव आहे. कारण स्त्रीपासून पुरुष नाही; पण पुरुषापासून स्त्री आहे. त्याचप्रमाणे, पुरुष स्त्रीसाठी केला गेला नाही; पण पुरुषासाठी स्त्री केली गेली. १०म्हणून स्त्रीने देवदूतांकरता आपल्या मस्तकावर आपल्या हक्काचे चिन्ह ठेवावे.
११तरी प्रभूमध्ये स्त्रीशिवाय पुरुष नाही, आणि पुरुषाशिवाय स्त्री नाही; १२कारण जशी स्त्री पुरुषापासून आहे, तसाच पुरुषही स्त्रीपासून आहे, पण सर्व गोष्टी देवाकडून आहेत. १३तुम्हीच सारासार विचार करा. स्त्रीने मस्तकावर आच्छादन न घेता देवाची प्रार्थना करणे तिला शोभते काय? १४जर पुरुषाला लांब केस असतील तर ते त्याला लाजिरवाणे आहे, हे निसर्गही तुम्हाला शिकवीत नाही काय? १५पण स्त्रीला लांब केस असतील तर त्यात तिचे गौरव आहे, कारण तिला तिचे केस आच्छादन म्हणून दिलेले आहेत. १६पण, जर कोणी कलहप्रेमी दिसत असेल, तर आपल्यात तशी रीत नाही आणि देवाच्या मंडळ्यांतही नाही.

१७आता तुम्हाला आज्ञा देत असता मी तुमची वाखाणणी करीत नाही, कारण तुमचे एकत्र येणे हिताचे होत नसून हानीचे होत आहे. १८कारण, सर्वांत प्रथम हे की, तुम्ही मंडळीत एकत्र येता तेव्हा तुमच्यात विभाग असतात, असे मी ऐकतो आणि काही अंशी खरे मानतो. १९कारण तुमच्यात गटही असले पाहिजेत, म्हणजे तुमच्यात जे पारखलेले आहेत ते तुमच्यात प्रगट व्हावेत. २०म्हणून तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभूचे भोजन घ्यायला जमत नाही. २१कारण भोजन करतेवेळी प्रत्येक मनुष्य दुसर्‍याच्या अगोदर आपले स्वतःचे भोजन घेतो; आणि एक जण भुकेला असतो तर दुसरा प्यालेला असतो. २२काय? तुम्हाला खायला प्यायला घरे नाहीत काय? की, तुम्ही देवाच्या मंडळीचा अवमान करून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता? मी तुम्हाला काय म्हणू? ह्यात मी तुमची वाखाणणी करू काय? मी वाखाणणी करीत नाही.
२३कारण प्रभूकडून जे मला मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की, प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, २४आणि उपकार मानल्यावर ती मोडून म्हटले, ‘घ्या, खा, हे माझं शरीर आहे; हे तुमच्यासाठी मोडलं जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.’ २५त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर प्याला घेऊन म्हटले, ‘हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे; तुम्ही हा जितक्या वेळा पिता तितक्या वेळा माझ्या स्मरणार्थ करा.’
२६कारण तुम्ही जितक्या वेळा ही भाकर खाता, आणि हा प्याला पिता तितक्या वेळा, तुम्ही प्रभूच्या येण्यापर्यंत त्याच्या मरणाची घोषणा करता.
२७म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल, आणि प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूच्या शरिराविषयी व रक्ताविषयी दोषी होईल. २८पण माणसाने स्वतःची परीक्षा करावी आणि मग त्याने ह्या भाकरीतून खावे आणि प्याल्यातून प्यावे. २९कारण, ते शरीर न ओळखता जो खातो आणि पितो तो स्वतःसाठी शिक्षाच खातो आणि पितो.
३०ह्या कारणामुळे तुमच्यात पुष्कळ जण दुर्बळ व दुखणेकरी झाले आहेत, आणि पुष्कळ निजले आहेत. ३१पण आपण स्वतःची पारख केल्यास आपल्यावर दोष येऊ नये; ३२पण जेव्हा आपल्यावर दोष येतो तेव्हा प्रभू आपल्याला शिक्षा करतो, म्हणजे आपण जगाबरोबर दोषी ठरविले जाऊ नये.
३३म्हणून, माझ्या बंधूंनो, तुम्ही भोजन करण्यास एकत्र येता तेव्हा एकमेकांसाठी थांबा. ३४जर कोणी भुकेला असेल तर त्याने घरी खावे; म्हणजे तुम्ही स्वतःवर दोष आणण्यास एकत्र येऊ नये. आणि मी स्वतः येईन तेव्हा बाकीच्या गोष्टी व्यवस्थित करीन.     

—–१ करिंथ १२—–

आता आत्मिक दानांविषयी, बंधूंनो, मी इच्छीत नाही की, तुम्हाला अज्ञानी राहू द्यावे. तुम्ही जाणता की, जेव्हा तुम्ही परजन होता, तेव्हा जसे चालविले जात होता तसे तुम्ही ह्या मुक्या मूर्तींकडे नेले जात होता. म्हणून मी तुम्हाला विदित करतो की, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही मनुष्य येशूला शापित म्हणत नाही. आणि कोणीही मनुष्य पवित्र आत्म्याच्या प्रेरणेशिवाय ‘येशू प्रभू आहे’ असे म्हणू शकत नाही.
आता कृपादानांचे प्रकार आहेत पण आत्मा एकच आहे. तसेच सेवांचे प्रकार आहेत पण प्रभू एकच आहे. आणि कार्यांचे प्रकार आहेत, पण सर्वांत सर्व कार्य करतो तो देव एकच आहे. पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले जाते. कारण एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानीपणाचे बोलणे, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे ज्ञानाचे बोलणे दिले जाते. दुसर्‍याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे रोग काढण्याची कृपादाने, १०आणखी एकाला चमत्कार करणे, आणखी एकाला संदेश देणे, आणखी एकाला आत्मे ओळखणे, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा येणे, आणखी एकाला भाषांचा अर्थ सांगता येणे. ११पण ह्या सर्वांत तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला वाटून देतो.

१२कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात, आणि एका शरिराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असे असतात त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे. १३कारण आपण यहुदी किवा हेल्लेणी होतो, दास किवा स्वतंत्र होतो तरी आपला एका आत्म्याने एका शरिरात बाप्तिस्मा झाला आणि सर्वांना एकाच आत्म्याने प्यायला दिले. १४कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे. १५जर पाय म्हणेल, ‘मी हात नाही म्हणून शरिराचा नाही’, तर त्यावरून तो शरिराचा नाही असे नाही. १६आणि कान म्हणेल, ‘मी डोळा नाही म्हणून शरिराचा नाही’, तर त्यावरून तो शरिराचा नाही असे नाही. १७सर्व शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे असते? आणि सर्व ऐकणे असते तर वास घेणे कुठे असते?
१८पण, त्यांतले एकेक असे अवयव देवाला बरे वाटल्याप्रमाणे त्याने शरिरात ठेवले. १९ते सगळे मिळून एक अवयव असते, तर शरीर कुठे असते? २०पण, आता पुष्कळ अवयव आहेत तरी एक शरीर असे आहेत, २१आणि डोळा हाताला म्हणू शकणार नाही की, ‘मला तुझी गरज नाही’, तसेच डोके पायांना म्हणू शकणार नाही की, ‘मला तुमची गरज नाही’. २२तर उलट, शरिराचे जे अवयव अधिक अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत. २३आणि शरिराचे जे भाग आपण कमी मानाचे मानतो त्यांना पुष्कळ अधिक मानाचे आवरण घालतो, आणि आपल्या कुरूप भागांना पुष्कळ अधिक रूप लाभते. २४कारण आपल्या शोभून दिसणार्‍या अवयवांना गरज नाही; पण ज्या भागांना गरज आहे त्यांना पुष्कळ अधिक मान देऊन देवाने शरीर जुळविले आहे. २५म्हणजे शरिरात दुही नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी करावी.
२६आणि एक अवयव सोशीत असला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव सोसतात आणि एका अवयवाचा मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंद करतात.
२७आता, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहा, आणि व्यक्तिशः अवयव आहा. २८आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेतः प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहायक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा. २९सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच चमत्कार करणारे आहेत काय? ३०सगळ्यांनाच रोग काढण्याची कृपादाने मिळालीत काय? सगळेच अन्य भाषा बोलतात काय? सगळेच अर्थ सांगतात काय?
३१पण तुम्ही अधिक मोठी कृपादाने मिळवण्याची इच्छा बाळगा; आणि शिवाय, मी तुम्हाला एक अधिक चांगला मार्ग दाखवतो.     

—–१ करिंथ १३—–

मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषांत बोललो पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किवा झणझणणारी झांज झालो. आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले, आणि, मला डोंगर ढळवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काही नाही. आणि माझी सर्व मालमत्ता मी गरिबांना अन्नदान करण्यास दिली व माझे शरीर जाळण्यास दिले पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ होत नाही.
प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई करीत नाही, फुगत नाही. अनुचितपणे वागत नाही, स्वहित पहात नाही, चिडत नाही, अपकार गणीत नाही. अनीतीत आनंद करीत नाही, पण सत्याबरोबर आनंद करते. सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सोसते.
प्रीती कधीच ढळत नाही; संदेश असतील ते निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल; कारण आपण अंशतः जाणतो, आणि अंशतः संदेश देतो. १०पण जे पूर्ण आहे ते येईल, तेव्हा अपूर्ण आहे ते नाहीसे होईल.
११मी मूल होतो तेव्हा मुलाप्रमाणे बोलत असे, मुलाप्रमाणे समजत असे, मुलाप्रमाणे विचार करीत असे. पण मी आता प्रौढ झाल्यावर मुलाच्या गोष्टी सोडल्या आहेत. १२कारण आता, आपण आरशात अस्पष्ट पाहतो, पण तेव्हा तोंडोतोंड पाहू. आता मला अंशतः समजते, पण आता जसा मी ज्ञात आहे तसे तेव्हा मला ज्ञान होईल.
१३आता, विश्वास, आशा, आणि प्रीती ह्या तीन गोष्टी राहतात. पण ह्यांत प्रीती श्रेष्ठ आहे. 

—–१ करिंथ १४—–

तुम्ही प्रीतीच्या मागे लागा, आणि आत्मिक दानांची इच्छा बाळगा पण आपल्याला संदेश देता येतील ह्याची विशेष इच्छा बाळगा. कारण जो अज्ञात भाषेत बोलतो तो मनुष्यांशी नव्हे पण देवाशी बोलतो; कारण ते कोणाला समजत नाही, पण तो आत्म्यात गूढ गोष्टी बोलतो. पण जो संदेश देतो तो लोकांशी उभारणीसाठी, उत्तेजनासाठी व सांत्वनासाठी बोलतो. जो अज्ञात भाषेत बोलतो तो आपली स्वतःची उभारणी करतो पण जो संदेश देतो तो मंडळीची उभारणी करतो.
तुम्ही सर्वांनी अन्य भाषांत बोलावे, पण विशेषतः तुम्ही संदेश द्यावेत अशी माझी इच्छा आहे. कारण जो कोणी अन्य भाषांत बोलतो, पण मंडळीची उभारणी व्हावी म्हणून अर्थ सांगत नाही त्याच्यापेक्षा जो संदेश देतो तो मोठा आहे. आता बंधूंनो, मी जर तुमच्याकडे अन्य भाषांत बोलत आलो, तर मी तुमच्याशी प्रकटीकरणाद्वारे, ज्ञानाद्वारे, संदेशाद्वारे किवा शिक्षणाद्वारे बोलल्याशिवाय तुम्हाला मी काय लाभ घडवणार? आणि,  सनई किवा वीणा ह्यांसारख्या, आवाज देणार्‍या, निर्जीव वस्तूंनी वेगवेगळे आवाज दिले नाहीत तर सनई किवा वीणा वाजवून काय वाजविले ते कसे कळेल? आणि, जर कर्ण्याने अनिश्चित आवाज दिला तर लढाईसाठी कोण आपली तयारी करील?
तसेच तुम्हीही तुमच्या भाषेत जर सुबोध शब्द उच्चारले नाहीत, तर तुम्ही काय बोललात ते कसे कळल? कारण तुम्ही हवेत बोलाल. १०जगात भाषांचे अनेक प्रकार आहेत पण एकही अर्थाशिवाय नाही. ११म्हणून मला जर भाषेचा अर्थ समजत नसेल तर बोलणार्‍याला मी बर्बर वाटेन, आणि बोलणारा मला बर्बर वाटेल.
१२तसेच तुम्हीही आत्मिक दानांविषयी आवेशी आहात, तर मंडळीच्या उभारणीसाठी आपण अधिकाधिक पात्र व्हावे म्हणून प्रयत्न करा. १३म्हणून जो अज्ञात भाषेत बोलतो त्याला अर्थ सांगता यावा म्हणून त्याने प्रार्थना करावी. १४कारण, मी एखाद्या अज्ञात भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझी बुद्धी निष्फळ होते.
१५मग काय? मी आत्म्याने प्रार्थना करीन व बुद्धीनेही प्रार्थना करीन. मी आत्म्याने स्तुती गाईन व बुद्धीनेही स्तुती गाईन. १६नाहीतर, तू जर आत्म्याने धन्यवाद गाशील तर अशिक्षितांच्या जागेवर, तेथे बसलेला कोणी मनुष्य तुझे उपकारस्मरण झाल्यावर ‘आमेन’ कसा म्हणेल? कारण तू काय बोलतोस ते त्याला कळत नाही. १७कारण, खरोखर, तू उपकार मानतोस हे चांगले आहे पण दुसर्‍याची उभारणी होत नाही.
१८मी तुमच्यातील सर्वांपेक्षा अन्य भाषांत अधिक बोलतो म्हणून मी देवाचे उपकार मानतो. १९पण मी मंडळीत अज्ञात भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, दुसर्‍यांनाही शिकवावे म्हणून, मी माझ्या बुद्धीने पाच शब्द बोलावे हे मला बरे वाटते.
२०बंधूंनो, समंजस वृत्तीत मुले होऊ नका, पण कुवृत्तीत मुले व्हा आणि समंजस वृत्तीत प्रौढ व्हा. २१नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘मी परभाषा बोलणार्‍यांकडून आणि परक्यांच्या ओठांनी ह्या लोकांबरोबर बोलेन, पण ते, तेवढ्यानेही, माझे ऐकणार नाहीत, असे प्रभू म्हणतो.’
२२ह्याकरता अन्य भाषा ह्या विश्वास ठेवणार्‍यांना नाही, पण विश्वास न ठेवणार्‍यांना चिन्ह म्हणून आहेत. पण जे विश्वास ठेवणारे नाहीत त्यांच्यासाठी संदेश नसून विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे. २३म्हणून, जर सर्व मंडळी एकत्र जमली आणि सर्व जण अन्य भाषांत बोलू लागले,  आणि,  जर कोणी अशिक्षित किवा विश्वास न ठेवणारे आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय? २४पण जर सर्वांनी संदेश दिले व कोणी विश्वास न ठेवणारा किवा अशिक्षित मनुष्य आत आला, तर सर्वांकडून त्याचा दोष दाखविला जाऊन सर्वांकडून त्याची पारख केली जाते, २५आणि त्यायोगे त्याच्या मनातील गुप्त गोष्टी प्रगट होतात; आणि तो मनुष्य तोंडावर पालथा पडून देवाला नमन करील,  आणि,  खरोखर, तुमच्यात देव आहे हे तो सांगेल.
२६बंधूंनो, मग असे काय? तुम्ही जमता तेव्हा प्रत्येकाजवळ एक स्तोत्र असते, एक बोध असतो, एक प्रकटीकरण असते, एक अन्य भाषा असते, एक अर्थबोध असतो. सर्व गोष्टी उभारणीसाठी केल्या जाऊ द्या. २७कोणी अज्ञात भाषेत बोलणार असल्यास, दोघांनी किवा फार तर तिघांनी क्रम लावून बोलावे, आणि एकाने अर्थ सांगावा. २८पण अर्थ सांगणारा कोणी नसेल तर त्याने मंडळीत शांत रहावे; आणि स्वतःशी व देवाशी त्याने बोलावे; २९त्याचप्रमाणे संदेष्ट्यांतील दोघांनी किवा तिघांनी तेथे बोलावे, आणि दुसर्‍यांनी विवेचन करावे. ३०जर बसलेल्या दुसर्‍याला काही प्रकट झाले, तर पहिल्याने शांत रहावे. ३१कारण, सर्वांनी शिकावे म्हणून व सर्वांचे सांत्वन व्हावे म्हणून, तुम्ही सर्व जण एकामागून एक संदेश देऊ शकाल. ३२आणि संदेष्ट्यांचे आत्मे संदेष्ट्यांच्या अधीन राहतात. ३३कारण देव गोंधळाचा देव नाही, पण शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळ्यांत जसे आढळते त्याप्रमाणे, ३४स्त्रियांनी मंडळ्यांत शांत रहावे. त्यांना बोलण्याची परवानगी नाही, पण त्यांनी आज्ञांकित रहावे; नियमशास्त्रही तसेच सांगते. ३५आणि जर त्यांना काही शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी घरी आपल्या पतीला विचारावे; कारण स्त्रीने मंडळीत बोलणे लाजेचे आहे.
३६काय? देवाचे वचन तुमच्याकडून आले काय? किंवा ते केवळ तुमच्याकडे आले काय?
३७जर कोणी स्वतःला संदेष्टा मानीत असेल किवा आत्मिक मानीत असेल, तर, मी तुम्हाला लिहीत आहे ती प्रभूची आज्ञा आहे हे त्याने ओळखावे. ३८पण कोणी उपेक्षा केल्यास त्याची उपेक्षा केली जाईल. ३९म्हणून बंधूंनो, संदेश द्यायची इच्छा धरा, आणि अन्य भाषांत बोलणार्‍याला मना करू नका.
४०पण सर्व गोष्टी शोभतील अशा, आणि क्रम लावून करा.     

—–१ करिंथ १५—–

शिवाय, बंधूंनो, मी जी सुवार्ता तुम्हाला गाजविली, जी तुम्हीही स्वीकारली, आणि ज्या सुवार्तेत तुम्ही स्थिर आहा ती मी तुम्हाला विदित करतो. मी ज्या वचनांत ती तुम्हाला गाजविली ती तुम्ही बळकट धरली असल्यास तिच्या योगे तुमचे तारणही होत आहे; नसल्यास तुम्ही व्यर्थ विश्वास ठेवलात.
कारण जे मला मिळाले आणि मी तुम्हाला, सर्वांत प्रथम, जे सांगून दिले, ते हे आहे की, शास्त्रलेखांत लिहिल्याप्रमाणे आपल्या पापांकरता ख्रिस्त मेला, आणि त्याला पुरले व शास्त्रलेखांत लिहिल्याप्रमाणे तो तिसर्‍या दिवशी पुन्हा उठला. आणि तो केफाला दिसला, नंतर बारा जणांना दिसला; त्यानंतर, एकाच वेळी, पाचशेहून अधिक बंधूंना दिसला. त्यांच्यातले बहुतेक जण आतापर्यंत राहिले आहेत, पण काही निजले आहेत. त्यानंतर याकोबाला दिसला; नंतर सर्व प्रेषितांना दिसला. आणि, जणू अकाली जन्मलेल्या मलाही तो सर्वांच्या शेवटी दिसला.
कारण मी प्रेषितांत इतका कनिष्ठ आहे की, मी प्रेषित म्हटला जाण्यास योग्य नाही; कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. १०पण, मी आहे तो देवाच्या कृपेने आहे; आणि माझ्यावरची त्याची कृपा व्यर्थ झाली नाही. पण त्या सर्वांहून मी अधिक कष्ट केले; तरी मी नाही, पण माझ्याबरोबर रहात असलेली देवाची कृपा ते करीत होती. ११मग मी काय, आणि ते काय, आम्ही अशी घोषणा करतो, आणि तुम्ही असा विश्वास ठेवलात.
१२आता, ख्रिस्त मेलेल्यांतून उठला अशी जर घोषणा केली जात आहे तर तुमच्यातले काही कसे म्हणतात की, मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही? १३पण जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, तर ख्रिस्त उठला नाही. १४आणि जर ख्रिस्त उठला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.
१५आणि आम्ही देवाचे खोटे साक्षी ठरलो; कारण, देवाने ख्रिस्ताला उठवले अशी आम्ही त्याच्याविषयी साक्ष दिली. जर हे असे असेल की, मेलेले उठवले जात नाहीत तर त्याने त्याला उठवले नाही. १६कारण जर मेलेले उठत नाहीत तर ख्रिस्त उठवला गेला नाही. १७आणि, जर ख्रिस्त उठवला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तुम्ही अजून तुमच्या पापांत आहा. १८मग जे ख्रिस्तात निजले आहेत त्यांचाही नाश झाला आहे.
१९आपण जर केवळ ह्याच आयुष्यात ख्रिस्तात आशा करीत असलो तर आपण सर्व लोकांहून लाचार आहोत. २०पण आता, ख्रिस्त मेलेल्यांतून उठला आहे, आणि निजलेल्यांचे प्रथमफळ झाला आहे. २१कारण, ज्याप्रमाणे मनुष्याद्वारे मरण आले, त्याप्रमाणे मनुष्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान आले.
२२कारण जसे आदामात सर्व मरतात तसे ख्रिस्तात सर्व जिवंत केले जातात. २३पण प्रत्येक त्याच्या स्वतःच्या क्रमाने; प्रथमफळ ख्रिस्त,  त्यानंतर, जे ख्रिस्ताचे आहेत ते, त्याच्या येण्याच्या वेळी.
२४मग त्याने सर्व सत्ता, सर्व शक्ती व बळ ही नष्ट केल्यावर, तो देवपित्याला राज्य सोपवून देईल तेव्हा शेवट येईल. २५कारण, तो त्याचे वैरी त्याच्या पायांखाली ठेवील तोवर त्याला राज्य केले पाहिजे. २६जो शेवटचा वैरी नष्ट केला जाईल तो मृत्यू होय. २७कारण त्याने, त्याच्या पायांखाली, सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या आहेत. पण जेव्हा तो म्हणतो की, ‘सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या आहेत’, तेव्हा ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या, तो स्वतः बाहेर आहे हे उघड आहे. २८आणि, जेव्हा सर्व गोष्टी त्याला अंकित होतील तेव्हा पुत्र स्वतः त्या सर्व गोष्टी आपल्या अंकित करणार्‍याला अंकित होईल. म्हणजे देव हाच सर्वांत सर्व असावा.
२९नाहीतर, जे लोक मेलेल्यांतून बाप्तिस्मा घेतात ते काय साधतील? जर मेलेले उठविलेच जात नाहीत तर ते लोक त्यांच्याबद्दल बाप्तिस्मा का घेतात? ३०आणि प्रत्येक घटकेस आम्हीही धोक्यात का असतो? ३१बंधूंनो, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठायी, मला तुमच्याविषयी असलेल्या अभिमानाची शपथ घेऊन मी हे म्हणतो की, मी रोज मरतो. ३२जर, इफिसमध्ये मी इतरांप्रमाणे, पशूंबरोबर लढलो असेन, तर माझा लाभ काय? जर मेलेले उठत नाहीत, तर या, आपण खाऊ पिऊ, कारण आपण उद्या मरणार.  
३३फसू नका; वाईट संगती चांगल्या सवयी बिघडवतात. ३४नीतिमत्वासाठी पूर्ण सावध रहा; पाप करू नका. कारण कित्येक देवाविषयी अज्ञानात आहेत. मी हे तुम्हाला लाजवावे म्हणून बोलतो.
३५पण कोणी म्हणेल की, मेलेले कसे उठविले जातात? आणि ते कोणत्या शरिराने येतात? ३६अरे निर्बुद्धी, तू जे पेरतोस ते मेले नाही, तर जिवंत केले जात नाही. ३७आणि तू जे पेरतोस ते उद्भवणारे अंग पेरीत नाहीस, पण उघडा दाणा पेरतोस; तो गव्हाचा किवा दुसर्‍या कशाचा असेल. ३८पण देवाला बरे वाटल्याप्रमाणे तो त्याला अंग देतो; प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे अंग देतो.
३९सर्व देह एकाच प्रकारचे देह नाहीत; पण मनुष्यांचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा, तसाच माशांचाही निराळा. ४०तशीच स्वर्गीय शरिरे आहेत आणि पार्थिव शरिरेही आहेत; पण स्वर्गीयांचे तेज निराळे व पार्थिवांचे तेज निराळे. ४१सूर्याचे तेज निराळे आहे, चंद्राचे तेज निराळे आहे, आणि तार्‍यांचे तेज निराळे आहे. कारण प्रत्येक तारा आपल्या तेजाने दुसर्‍या तार्‍याहून निराळा असतो.
४२तसेच मृतांचे पुनरुत्थान आहे. नाशात पेरले जाते, अविनाशीपणात उठविले जाते. ४३अपमानात पेरले जाते, गौरवात उठविले जाते. अशक्तपणात पेरले जाते, सामर्थ्यात उठविले जाते. ४४जीवधारी शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते. जर जीवधारी शरीर आहे तर आत्मिक शरीरही आहे.
४५आणि, म्हणून असे लिहिले आहे की, ‘पहिला मनुष्य आदाम हा जगणारा जीव झाला’; शेवटला आदाम हा जिवंत करणारा आत्मा झाला. ४६तरी प्रथम आत्मिक नव्हे, तर जीवधारी; त्यानंतर आत्मिक. ४७पहिला मनुष्य पृथ्वीवरचा, मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातला आहे. ४८जो मातीचा तो जसा होता तसेच जे मातीचे तेही आहेत, आणि जो स्वर्गीय तो जसा आहे तसेच जे स्वर्गीय तेही आहेत. ४९आणि जो मातीचा होता त्याचे प्रतिरूप आपण धारण केले, त्याचप्रमाणे जो स्वर्गीय आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण करू. ५०आता बंधूंनो, मी हे सांगतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही.
५१-५२बघा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो; आपण सगळेच निजणार नाही, पण एका क्षणात, एका निमिषात, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा आपण सगळेच पालटून जाऊ. कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशी असे उठविले जातील व आपण सगळे पालटून जाऊ. ५३कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे; आणि हे जे मर्त्य आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे. ५४म्हणून जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि जे मर्त्य आहे त्याने अमरपण परिधान केले असे होईल, तेव्हा, ‘मृत्यू विजयात ग्रासला गेला’, असे जे वचन लिहिले आहे ते पूर्ण होईल. ५५‘अरे मृत्यू, तुझी नांगी कोठे’ अरे मृत्यू, तुझा विजय कोठे?’ ५६कारण मृत्यूची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे.
५७पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे जो देव आपल्याला विजय देतो त्याला धन्यवाद!
५८म्हणून, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही स्थिर, न ढळणारे व प्रभूच्या कामात सदा सधन असे व्हा; कारण प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही, हे तुम्ही जाणता.

—–१ करिंथ १६—–

आता, पवित्र जनांकरता वर्गणी गोळा करण्याविषयी, मी गलतियातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा.
तुमच्यामधील प्रत्येकाने, त्याला यश मिळेल त्या मानाने, दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी जमवून ठेवावे. म्हणजे, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत. आणि मी आल्यावर तुम्ही, पत्रे देऊन, ज्यांना पसंत कराल त्यांना मी तुमची देणगी यरुशलेमला घेऊन जायला पाठवीन; आणि मीही जावे हे उचित असल्यास ते माझ्याबरोबर जातील.

मी मासेदोनियामधून जाईन तेव्हा, मी आता, तुमच्याकडे येईन, कारण मी मासेदोनियामधून प्रवास करणार आहे. आणि शक्य झाल्यास मी तुमच्याबरोबर राहीन आणि हिवाळाही घालवीन, म्हणजे मी जाणार असेन तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. कारण आता ह्या प्रवासात तुम्हाला भेटावे अशी माझी इच्छा नाही; पण मी आशा करतो की, मला प्रभूने मोकळीक दिल्यास मी काही काळ तुमच्याबरोबर राहीन. पण पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसला राहीन. कारण माझ्याकरता एक मोठे व परिणामकारक दार उघडले गेले आहे, आणि विरोध करणारे पुष्कळ आहेत.
१०आता जर तिमथ्य आला, तर असे पहा की, त्याला तुमच्यात निर्भय होता येईल, कारण तो, माझ्याप्रमाणेच प्रभूचे काम करीत आहे. ११कोणी त्याचा उपहास करू नये; पण त्याला माझ्याकडे येता यावे म्हणून शांतीने वाटेस लावा. कारण मी येथील बांधवांबरोबर त्याची प्रतीक्षा करीत आहे. १२पण बंधू अपुल्लोविषयी असे आहे की, त्याने इतर बांधवांबरोबर तुमच्याकडे यावे, अशी मी त्याला फार विनंती केली; पण त्याची आता येण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण त्याला सोयीची संधी मिळेल तेव्हा तो येईल.
१३जागृत रहा, विश्वासात स्थिर रहा; पुरुषासारखे रहा, बलवान व्हा. १४तुमचे सर्व काही प्रीतीने केले जावे.
१५आता बंधूंनो, स्तेफनाच्या घराण्याविषयी तुम्हाला चांगली माहिती आहे. ते अखयातील प्रथमफळ आहे;आणि पवित्र जनांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहिले आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, १६तुम्ही अशांच्या आणि आमच्याबरोबर सहकार्य करणार्‍या व श्रम करणार्‍या प्रत्येकाच्या अधीन रहा. १७स्तेफना, फर्तुनात व अखाईक, ह्यांच्या येण्यामुळे मला आनंद झाला आहे. तुमच्याकडून जे कमी झाले ते त्यांनी पुरे केले आहे. १८कारण त्यांनी माझ्या आत्म्याला व तुमच्याही आत्म्याला स्वास्थ्य दिले आहे. म्हणून तुम्ही अशांची जाणीव ठेवा.
१९आसियामधील मंडळ्या तुम्हाला सलाम देतात. अक्विला आणि प्रिस्का व त्यांच्या घरात जमणारी मंडळी तुम्हाला प्रभूमध्ये फार सलाम कळवतात. २०सर्व बंधू तुम्हाला सलाम देतात. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. २१माझा पौलाचा स्वहस्ते सलाम. २२कोणी प्रीती करीत नसेल तर तो शापित असो. माराना था.
२३आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हाबरोबर असो. २४ख्रिस्त येशूत माझी प्रीती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s