1 Corinthians 6-10

करिंथकरांस पहिले पत्र

—–१ करिंथ ६—–

तुमच्यात कोणाची दुसर्‍या कोणाविरुद्ध काही बाब असेल, तर पवित्र जनांपुढे जाण्याऐवजी तो आपल्या न्यायनिवाड्यासाठी अनीतिमानांपुढे जाण्यास धजेल काय? पवित्र जन जगाचा न्याय करतील हे तुम्ही जाणत नाही काय? आणि जर तुमच्याकडून जगाचा न्याय होणार आहे, तर क्षुल्लक, लहान गोष्टींचा न्याय करण्यास तुम्ही अपात्र आहा काय? आपण देवदूतांचा न्याय करू, हे तुम्ही जाणत नाही काय? मग ऐहिक जीवनातल्या गोष्टींचा का नाही? मग ऐहिक जीवनाच्या गोष्टींविषयी तुमच्याजवळ खटले असल्यास जे मंडळीत काहीच न मानलेले आहेत त्यांना करायला कसे बसवता? तुम्हाला लाजवावे म्हणून मी बोलतो, ज्याला बांधवांत निवाडा करता येईल, असा एकही ज्ञानी मनुष्य तुमच्यात नाही, हे खरे आहे काय? पण बंधू बंधूला घेऊन न्यायनिवाड्यासाठी जातो, आणि जे विश्वास ठेवणारे नाहीत अशांच्यापुढे तो जातो. तुम्ही एकमेकांवर खटले चालवता, ह्यात तुमचीच सर्व प्रकारे हानी आहे; त्यापेक्षा तुम्ही आपल्यावर अन्याय का होऊ देत नाही?  त्यापेक्षा तुम्ही आपली फसवणूक का होऊ देत नाही? उलट तुम्ही स्वतः अन्याय करता आणि फसवता, आणि तेही बंधूंना.
अनीतिमानांस देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही जारकर्मी, मूर्तिपूजक किवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किवा विपरीत संभोग करणारे, १०चोर, लोभी किवा दारूबाज, निंदा करणारे किवा लुबाडणारे, देवाच्या राज्याचे वतन मिळवणार नाहीत. ११आणि तुम्ही कित्येक जण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहा, आणि, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरविले गेला आहा.

१२सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, पण सर्व गोष्टी हिताच्या नसतात; सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, पण मी कोणत्याच गोष्टीच्या अधीन होणार नाही. १३पोटाकरता खाद्ये आहेत आणि खाद्यांकरता पोट आहे; पण देव ते व तीही नष्ट करील. जारकर्मासाठी शरीर नाही, प्रभूसाठी आहे, आणि शरिरासाठी प्रभू आहे. १४देवाने प्रभूला उठविले आहे, आणि तो आपल्या सामर्थ्याने त्याचप्रमाणे आपल्याला उठवील. १५तुमची शरिरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हेही तुम्ही जाणत नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेश्येचे अवयव करू काय? तसे न होवो. १६किंवा तुम्ही हे जाणत नाही की, जो वेश्येशी जोडला जातो तो तिच्याशी शरिराने एक होतो? कारण तो म्हणतो की, दोघे एकदेह होतील. १७पण जो प्रभूशी जोडला जातो तो त्याच्याशी आत्म्याने एक होतो. १८जारकर्मापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरिराबाहेर होते, पण जारकर्म करणारा आपल्या स्वतःच्या शरिराविरुद्ध पाप करतो.
१९किंवा तुम्ही हे जाणत नाही की, तुमचे शरीर हे देवाकडून तुमच्यात आलेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे? आणि तुम्ही स्वतःचे राहिला नाही? २०कारण तुम्हाला मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरिराने देवाचे गौरव करा.

—–१ करिंथ ७—– 

आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयीः स्त्रीला न शिवणे हे पुरुषासाठी बरे आहे. तरीही जारकर्म चालते म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा; आणि त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला तिच्या स्वतःच्या शरिरावर हक्क नसतो, पण पतीला असतो; आणि त्याचप्रमाणे पतीलाही त्याच्या स्वतःच्या शरिरावर हक्क नसतो, पण पत्नीला असतो. आपण प्रार्थनेत काळ घालवावा म्हणून तुम्ही एकमेकांच्या संमतीने काही काळ घेतल्याशिवाय एकमेकांचा हक्क हिरावू नका. आणि पुन्हा एकत्र या. म्हणजे सैतानाने तुमच्या असंयमात तुमची परीक्षा करू नये.
पण मी हे संमती म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नाही. कारण माझी इच्छा आहे की, मी आहे तसे सर्वांनी व्हावे; पण देवाकडून प्रत्येक मनुष्याला, एकाला ह्या प्रकारे व दुसर्‍याला त्या प्रकारे, त्याचे विशिष्ट कृपादान मिळते. म्हणून मी सर्व अविवाहितांना, आणि विधवांना असे म्हणतो की, तुम्ही माझ्याप्रमाणे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे आहे. पण त्यांच्यात ते बळ नसेल तर त्यांनी लग्न करावे; कारण जळण्यापेक्षा लग्न करणे बरे.
१०आणि विवाहितांना मी आज्ञा देत आहे, मी नाही पण प्रभू देत आहे की, पत्नीने पतीला सोडू नये. ११पण, जर तिने सोडले, तर लग्न न करता तसेच रहावे, किवा आपल्या पतीबरोबर समेट करावा, आणि पतीने पत्नीला सोडू नये.
१२पण इतरांना हे प्रभू सांगत नाही, पण मी सांगतो की, जर एखाद्या बंधूची पत्नी विश्वास ठेवणारी झाली नसेल, आणि त्याच्याबरोबर राहण्यास तिची संमती असेल तर त्याने तिला सोडू नये. १३आणि एखाद्या स्त्रीचा पती विश्वास ठेवणारा झाला नसेल, आणि तिच्याबरोबर राहण्यास त्याची संमती असेल तर तिने त्याला सोडू नये. १४कारण, विश्वास न ठेवणारा पती पत्नीमुळे पवित्र होतो, आणि विश्वास न ठेवणारी पत्नी पतीमुळे पवित्र होते. नाहीतर, तुमची मुले अशुद्ध असती, पण ती आता पवित्र आहेत. १५पण स्वतः विश्वास ठेवीत नसल्यामुळे कोणी सोडून जात असेल तर जाऊ द्या; कारण, कोणी बंधू किवा भगिनी अशा बाबतीत बंधनात नाही. पण देवाने आपल्याला शांतीत बोलावले आहे. १६कारण, तू, पत्नी, हे कशावरून जाणतेस की, तू आपल्या पतीला तारशील की नाही? किंवा तू, पती, हे कशावरून जाणतोस की, तू आपल्या पत्नीला तारशील की नाही? १७तर जसे प्रभूने प्रत्येकाला वाटून दिले आहे, जसे देवाने प्रत्येकाला बोलावले आहे, तसे त्याने चालावे. आणि ह्याप्रमाणे, मी सर्व मंडळ्यांना आज्ञा देत आहे.
१८सुनत झालेला कोण बोलावला गेला आहे? त्याने बेसुनत होऊ नये. बेसुनत असलेला कोण बोलावला गेला आहे? त्याने सुनत करून घेऊ नये. १९कारण सुनत झालेला असणे काही नाही किवा बेसुनत असणे काही नाही; पण देवाच्या आज्ञांचे पालन करणे हे सर्व काही आहे. २०ज्या पाचारणात जो बोलावला गेला असेल त्यात त्याने रहावे.
२१तू दास असता बोलावला गेलास काय? त्याची पर्वा करू नकोस; पण तुला स्वतंत्र होता आले तर त्याचा उपयोग कर. २२कारण दास असता जो प्रभूत बोलावला गेला तो प्रभूचा स्वतंत्र मनुष्य आहे; त्याचप्रमाणे जो स्वतंत्र असता बोलावला गेला तो ख्रिस्ताचा दास आहे. २३तुम्हाला मोल देऊन विकत घेतले आहे; तुम्ही माणसाचे दास होऊ नका. २४बंधूंनो, जो ज्या स्थितीत बोलावला गेला आहे त्याने त्या स्थितीत देवाबरोबर रहावे.
२५आता कुमारिकांविषयी मला प्रभूकडून काही आज्ञा नाही; पण, विश्वासू राहता येण्यास ज्याच्यावर प्रभूने दया केली आहे असा मी एक असल्यामुळे मी माझे मत देतो. २६म्हणून मला वाटते की, आताच्या आपत्तीत हे चांगले आहे; म्हणजे जो ज्या स्थितीत असेल तसेच त्याने रहावे हे त्याच्यासाठी चांगले आहे. २७तू बायकोला बांधलेला आहेस? तू स्वतः सुटण्याचा प्रयत्न करू नकोस. तू बायकोपासून सोडविला गेलास? तू बायको मिळवू पाहू नकोस. २८पण तू जर लग्न केलेस तर तू पाप केले नाहीस; आणि कुमारिकेने लग्न केले तर तिने पाप केले नाही; पण अशांवर देहात संकट येईल, आणि मी तुम्हाला वाचवीत आहे. २९पण बंधूंनो, मी हे सांगतो की, हा काळ थोडका आहे. आता, ज्यांना बायका आहेत त्यांना बायका नसल्यासारखे त्यांनी रहावे; ३०जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे आणि जे विकत घेतात त्यांनी ते आपले स्वतःचे नसल्यासारखे रहावे.  ३१जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी दुरुपयोग न करणारे व्हावे; कारण ह्या जगाचे रूप सरत आहे.
३२पण तुम्ही निश्चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. जो अविवाहित आहे तो प्रभूच्या गोष्टींची, म्हणजे आपण प्रभूला कसे संतुष्ट करावे ह्याची काळजी करतो; ३३पण जो विवाहित आहे तो जगातल्या गोष्टींची, म्हणजे आपण पत्नीला कसे संतुष्ट करावे ह्याची काळजी करतो; आणि त्याचे मन द्विधा होते. ३४आणि पत्नी व कुमारिका ह्यांच्यातही फरक आहे; जी अविवाहित आहे ती आपण शरिराने व आत्म्याने पवित्र रहावे म्हणून प्रभूच्या गोष्टींची काळजी करते; पण जी विवाहित आहे ती जगातल्या गोष्टींची, म्हणजे आपण पतीला कसे संतुष्ट करावे ह्याची काळजी करते. ३५हे तुम्हाला हितकारक आहे म्हणून सांगतो, तुमच्यावर बंधन टाकावे म्हणून नाही; पण शोभून दिसणारे आहे ते, आणि तुम्ही विचलित न होता प्रभूची सेवा करावी म्हणून सांगतो.
३६पण आपण आपल्या कुमारिकेशी अनुचितपणे वागत आहो असे कोणाला वाटत असेल, जर तिचे वय झालेले असेल आणि तशी आवश्यकता असेल, तर त्याची इच्छा असेल तसे त्याने करावे. तो पाप करीत नाही; त्यांना लग्न करू द्यावे. ३७पण जो मनुष्य अंतर्यामी स्थिर आहे, ज्याला कशाची निकड नाही, पण ज्याची इच्छेवर सत्ता आहे, आणि आपण आपल्या कुमारिकेचे पालन करू असे ज्याने मनात ठरविले आहे तो चांगले करतो. ३८म्हणून जो लग्न करून देतो तो चांगले करतो; पण लग्न करून देत नाही तो अधिक चांगले करतो.
३९विवाहित स्त्रीचा पती जिवंत आहे तोवर ती नियमाने बांधलेली आहे, पण जर तिचा पती मेला तर, केवळ प्रभूमध्ये, तिची इच्छा असेल त्याच्याशी विवाहित होण्यास ती स्वतंत्र आहे. ४०पण ती जर तशी राहील तर, माझ्या मते, ती अधिक सुखी होईल. आणि मी मानतो की, माझ्यातही देवाचा आत्मा आहे.

—–१ करिंथ ८—–

आता, मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते. आपण एखादी गोष्ट जाणतो असे कोणाला वाटत असेल, तर ती जशी समजली पाहिजे तशी अजून तो जाणत नाही. पण कोणी देवावर प्रीती करीत असेल तर त्या मनुष्याला देव ओळखतो.
म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयीः आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही, आणि एकाशिवाय दुसरा देव नाही, कारण आकाशात आणि पृथ्वीवर देव म्हटलेले पुष्कळ असले, कारण तसे पुष्कळ देव आणि पुष्कळ प्रभू असतील, तरी आपल्याला, खरोखर, एक देव आहे; तो पिता आहे; त्याच्याकडून सर्व झाले आहे, आणि आपण त्याच्यात आहो; आणि ज्याच्यामुळे सर्व झाले तो एक प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आहे, आणि त्याच्यामुळे आपण आहो.

पण हे ज्ञान प्रत्येक मनुष्याला असणार नाही, कारण मूर्तींविषयी जे विवेक बाळगतात असे कित्येक जण, ह्या घटकेपर्यंत, ते मूर्तीला वाहिलेले म्हणून खात आहेत; आणि त्यांचा विवेक दुर्बळ असल्यामुळे दूषित होतो. पण अन्न आपल्याला देवासमोर नेणार नाही; आपण न खाण्याने कमी ठरत नाही, किंवा खाण्याने अधिक ठरत नाही.
पण तुमचे हे स्वातंत्र्य दुर्बळ असलेल्यांस, कोणत्याही प्रकारे, अडखळण होऊ नये म्हणून काळजी घ्या. १०कारण ज्ञान असलेल्या तुला जर मूर्तीच्या मंदिरात भोजनास बसलेले कोणी बघितले, तर तो दुर्बळ असल्यास त्याचा विवेक मूर्तींना वाहिलेले पदार्थ खाण्यास तयार होईल ना? ११आणि ज्याच्यासाठी ख्रिस्त मेला अशा दुर्बळ असलेल्या तुझ्या बंधूचा तुझ्या ज्ञानामुळे नाश होईल. १२पण तुम्ही जेव्हा अशा प्रकारे बंधूंविरुद्ध पाप करता आणि दुर्बळ असलेला त्यांचा विवेक तुम्ही दुखावता, तेव्हा तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. १३म्हणून, जर माझ्या बंधूला अन्नाने अडथळा होत असेल तर माझ्या बंधूला अडथळा होण्यास मी कारणीभूत होऊ नये म्हणून मी कधीच मांस खाणार नाही.

—–१ करिंथ ९—–

मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? मी आपल्या प्रभू येशूला पाहिले नाही काय? प्रभूच्या ठायी तुम्ही माझे काम आहा ना? मी इतरांकरता प्रेषित नसलो, तरी निःसंशय मी तुमच्याकरता आहे. कारण, तुम्ही प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहा.
माझी चौकशी करणार्‍यांना हे माझे प्रत्युत्तर आहे. आम्हाला खाण्यापिण्याचा हक्क नाही काय? इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ, किंवा केफा, हे करतात त्याप्रमाणे आम्हाला कोणी धर्मभगिनी, पत्नी करून घेऊन, बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा हक्क नाही काय?
कोण कधी स्वतःच्या खर्चाने शिपाईगिरी करतो काय? किंवा कोण द्राक्षमळा लावतो, आणि त्याचे फळ खात नाही? किंवा कोण कळप राखतो आणि कळपाच्या दुधातून खात नाही? मी ह्या गोष्टी लोकरीतीस अनुसरून सांगतो काय? नियमशास्त्र हेच सांगत नाही काय?
कारण, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की, मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको. देव बैलांची काळजी करतो काय? १०किंवा सर्वस्वी आपल्याकरता तो हे म्हणतो? हे निःसंशय आपल्याकरता लिहिले आहे. म्हणजे जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे, आणि जो मळणी करतो त्याने आपण वाटेकरी होऊ ह्या आशेने करावी. ११आम्ही तुमच्यात जर आत्मिक गोष्टी पेरल्या आहेत, तर तुमच्या दैहिक गोष्टींची कापणी केल्यास त्यात मोठे काय आहे? १२दुसरे तुमच्यावरील ह्या हक्कात जर वाटेकरी होतात, तर आम्ही विशेषेकरून का होऊ नये? आणि तरी आम्ही ह्या हक्काचा उपयोग केला नाही, पण ख्रिस्ताच्या सुवार्तेला आम्ही अडखळण करू नये म्हणून, आम्ही सर्व गोष्टी सहन करतो.
१३जे मंदिराची सेवा करतात ते मंदिरातील अन्न खातात आणि जे वेदीपुढे उभे राहतात ते वेदीचे भागीदार होतात, हे तुम्ही जाणत नाही काय? १४प्रभूने त्याचप्रमाणे आज्ञा दिली आहे की, जे सुवार्तेची घोषणा करतात त्यांचा सुवार्तेवर निर्वाह व्हावा, १५पण ह्यातील कोणत्याच गोष्टीचा मी कधी उपयोग केला नाही, किंवा माझ्यासाठी तसे करावे म्हणून मी ह्या गोष्टी लिहिल्या नाहीत. कारण हे माझे अभिमान मिरवणे कोणी निरर्थक करण्यापेक्षा मला मरणे बरे वाटेल.
१६कारण मी जरी सुवार्ता सांगतो, तरी अभिमान मिरवण्यास मला कारण नाही. कारण माझ्यावर निकड घातली गेली आहे; मी सुवार्ता सांगणार नाही, तर मला हळहळ होईल. १७कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुद्ध असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे. १८तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी सुवार्ता सांगतो, तेव्हा मी सुवार्ता फुकट पुरवावी आणि सुवार्तेविषयीच्या माझ्या हक्काचा मी दुरुपयोग करू नये.

१९कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक मिळवावेत म्हणून मी सर्वांचा दास झालो. २०मी यहुद्यांना मिळविण्यास, यहुद्यांना यहुद्यासारखा झालो; मी नियमशास्त्राधीन नसलो तरी मी नियमशास्त्राधीन असलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन असलेल्यांना नियमशास्त्राधीन असल्यासारखा झालो. २१(मी देवाच्या नियमाबाहेर नाही, पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे) मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो. २२आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्व काही करून मी काहींचे तारण करावे. २३आणि मी हे सुवार्तेकरता करतो, म्हणजे मीही तिच्यात सहयोगी व्हावे.

२४शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की, तुम्ही मिळवाल. २५स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत हार मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी हार मिळवण्यासाठी करतो.
२६म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्‍यासारखे नाही. २७पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाहीतर, दुसर्‍यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.   

—–१ करिंथ १०—–

शिवाय बंधूंनो, मी इच्छीत नाही की, तुम्ही ह्या गोष्टींविषयी अज्ञानी असावे; आमचे सगळे पूर्वज ढगाखाली होते आणि सगळे समुद्रातून पार गेले. आणि सगळ्यांचा मोशेच्या ठायी त्या ढगात आणि समुद्रात बाप्तिस्मा झाला. ते सगळे एकच आत्मिक अन्न खात होते, आणि सगळे एकच आत्मिक पाणी पीत होते. कारण ते त्यांच्या मागोमाग जाणार्‍या आत्मिक खडकातून पीत होते आणि तो खडक ख्रिस्त होता. तरी त्यांच्यातील बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, आणि ते रानात टाकले गेले.
आता, आपल्याला उदाहरणे म्हणून ह्या गोष्टी झाल्या, म्हणजे त्यांनी वाईट गोष्टींची इच्छा धरली तशी आपण वाईट गोष्टींची इच्छा धरू नये. त्यांच्यातले काही जण मूर्तिपूजक होते तसे तुम्ही मूर्तिपूजक होऊ नका. कारण असे लिहिले आहे की, ते लोक खायला प्यायला बसले आणि पुन्हा नाचायला उठले. त्यांच्यातल्या काहींनी जारकर्म केले आणि ते एका दिवसात तेवीस हजार पडले; तसे आपण जारकर्म करू नये. त्यांच्यातल्या काहींनी प्रभूची परीक्षा केली आणि ते सर्पाकडून नाश पावले; तशी आपण प्रभूची परीक्षा करू नये. १०त्यांच्यातल्या काहींनी कुरकुर केली आणि ते संहारकाकडून नाश पावले. तुम्ही त्यांच्याप्रमाणे कुरकुर करू नका.
११आता, ह्या सर्व गोष्टी त्यांच्यावर आल्या त्या उदाहरणे होण्यासाठी आल्या. आणि युगांचे शेवट ज्यांच्यावर आलेत असे जे आपण, त्या आपल्याकरता बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत. १२म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने आपण पडू नये म्हणून काळजी घ्यावी.
१३मनुष्यावर येणार्‍या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा तुमच्यावर निराळी आलेली नाही; पण देव विश्वासू आहे व तो तुमच्या शक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही, तर तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे, म्हणून तो परीक्षेबरोबर सुटकेचा मार्गही तयार करील.

१४ह्यासाठी, माझ्या प्रियांनो, मूर्तिपूजेपासून दूर पळा. १५शहाण्यांशी बोलावे तसे मी बोलतो; मी म्हणतो त्यावर तुम्ही सारासार विचार करा. १६ज्या आशीर्वादाच्या प्याल्यावर आपण आशीर्वाद मागतो तो ख्रिस्ताच्या रक्तात आपली सहभागिता आहे ना? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरिरात आपली सहभागिता आहे ना? १७आपण पुष्कळ जण आहोत तरी एक भाकर व एक शरीर असे आहोत; कारण आपण सर्व जण त्या एका भाकरीचे वाटेकरी आहो. १८जे दैहिक दृष्ट्या इस्राएल आहेत त्यांना पहा; जे लोक वेदीवरील अर्पणातून खातात ते वेदीचे भागीदार नाहीत काय?
१९मग मी काय म्हणतो? मूर्तीला वाहिलेले काही आहे काय? किंवा मूर्ती काही आहे काय? २०पण परजन जी अर्पणे करतात ती ते भुतांना अर्पित करतात, देवाला नाही; आणि तुम्ही भुतांचे भागीदार व्हावे अशी माझी इच्छा नाही. २१तुम्ही प्रभूचा प्याला व भुतांचा प्याला पिऊ शकणार नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भुतांच्या मेजाचे वाटेकरी होऊ शकणार नाही. २२आपण प्रभूला ईर्ष्येस आणणार काय? आपण त्याच्याहून प्रबळ आहोत काय?
२३मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, पण सर्व गोष्टी हिताच्या नसतात; मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, पण सर्व गोष्टी उभारीत नाहीत. २४कोणी आपले हित पाहू नये पण दुसर्‍यांचे हित पहावे. २५जे काही दुकानांत विकले जाते ते खा; आणि तुम्ही विवेकाखातर काही चौकशी करू नका. २६कारण पृथ्वी व तिच्यात भरलेले सर्व काही परमेश्वराचे आहे.
२७विश्वास न ठेवणार्‍या लोकांतील कोणी तुम्हाला आमंत्रण केले आणि तुम्हाला जावेसे वाटले, तर तुम्हाला वाढले असेल ते खा आणि विवेकाखातर काही चौकशी करू नका. २८पण हे मूर्तींना वाहिलेले आहे असे कोणी तुम्हाला म्हटल्यास ज्याने ते सांगितले त्याच्याखातर आणि विवेकाखातर ते खाऊ नका. २९मी तुझा स्वतःचा विवेक म्हणत नाही, पण त्या दुसर्‍याचा; कारण माझ्या स्वातंत्र्याला दुसर्‍याच्या विवेकाने दोष का द्यावा? ३०मी जर उपकार मानून वाटेकरी झालो, तर मी ज्याबद्दल उपकार मानतो त्याबद्दल माझी निंदा का व्हावी?
३१म्हणून तुम्ही खाता किंवा पिता, किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.
३२यहुद्यांना, हेल्लेण्यांना किवा देवाच्या मंडळीला अडखळण न करणारे व्हा. ३३जसा मी सर्वांना सर्व गोष्टींत संतोषवीत असतो, आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून माझ्या हिताचे होईल ते न पाहता, पुष्कळांच्या हिताचे होईल ते पाहतो तसे तुम्हीही करा.     

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s