1 John

योहानाचे पहिले पत्र

 —–१ योहान १—–

जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले, जे आम्ही न्याहाळले, आणि आमच्या हातांनी चाचपले त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. कारण ते जीवन प्रगट झाले, आणि आम्ही पाहिले; आणि आम्ही साक्ष देतो. जे सनातन जीवन पित्याजवळ होते व आम्हाला प्रगट केले गेले,त्याची तुम्हाला घोषणा करतो; आम्ही जे पाहिले आणि ऐकले आहे, त्याची तुम्हाला घोषणा करतो, म्हणजे,आमच्याबरोबर तुमची भागी असावी, आणि आपली भागी पित्याबरोबर आणि त्याच्या पुत्राबरोबर म्हणजे येशू ख्रिस्ताबरोबर आहे. आणि तुम्हाला ह्या गोष्टी ह्यासाठी लिहितो की, तुमचा आनंद पूर्ण व्हावा.

आता, आम्ही त्याच्याकडून जो संदेश ऐकला आणि तुम्हाला सांगतो, तो हा आहे की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. आपण अंधारात चालत असता, जर आपण म्हटले की, त्याच्याबरोबर आपली भागी आहे, तर आपण खोटे बोलतो आणि सत्य आचरीत नाही. पण तो जसा प्रकाशात आहे तसे आपण प्रकाशात चाललो तर आपली आपल्यात, एकमेकांबरोबर भागी आहे; आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. जर आपण म्हटले की, आपल्यात पाप नाही, तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यात सत्य नाही. जर आपण आपली पापे पतकरली तर तो विश्वासू व नीतिमान असल्यामुळे आपल्या पापांची क्षमा करील आणि सर्व अनीतीपासून आपल्याला शुद्ध करील. १०जर आपण म्हटले की, आपण पाप केले नाही तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्यात नाही.

—–१ योहान २—–

माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी हे तुम्हाला लिहिले आहे; आणि कोणी पाप केले तर आपला कैवारी, नीतिमान येशू ख्रिस्त पित्याजवळ आहे. तो आपल्या पापांबद्दल, आणि केवळ आपल्याच नाही पण सार्‍या जगाच्या पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे.

आणि, आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपण त्याला ओळखतो हे आपण ओळखू. मी त्याला ओळखतो,असे जो म्हणतो व त्याच्या आज्ञा पाळीत नाही, तो लबाड आहे, आणि त्याच्यात सत्य नाही. पण जो त्याच्या आज्ञा पाळतो त्याच्यात, खरोखर, देवाची प्रीती पूर्ण होते. आणि ह्यावरून आपण ओळखतो की, आपण त्याच्यात आहोत. तो माझ्यात राहतो असे जो म्हणतो त्याने तो चालला तसे चालावे.
बंधूंनो, मी तुम्हाला नवी आज्ञा लिहीत नाही, पण तुम्ही प्रारंभापासून ऐकली आहे तीच जुनी लिहीत आहे; तुम्ही प्रारंभापासून ऐकलेले वचन ही जुनी आज्ञा आहे. पुन्हा, मी एक नवी आज्ञा तुम्हाला लिहितो; ती त्याच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत खरी आहे. कारण अंधार जात आहे व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे जो म्हणतो व आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजूनही अंधारात आहे. १०जो आपल्या बंधूवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो व त्याला अडथळा होत नाही. ११पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे आणि अंधारात चालतो व कोठे जातो हे त्याला समजत नाही; कारण त्याचे डोळे अंधाराने अंधळे होतात.
१२मुलांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण त्याच्या नावाकरता तुमची पापे सोडली गेली आहेत.
१३बापांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे, त्याला तुम्ही ओळखले आहे.
तरुणांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे.
मुलांनो, तुम्हाला लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता.
१४बापांनो, तुम्हाला लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखले आहे.
तरुणांनो, तुम्हाला लिहिले आहे, कारण तुम्ही सुदृढ असून देवाचे वचन तुमच्यात राहिले आहे व तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे.
१५जगावर किवा जगाच्या गोष्टींवर प्रीती करू नका; जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर पित्याची प्रीती त्याच्यात नाही. १६कारण देहाची वासना, डोळ्यांची वासना व आयुष्याची प्रौढी, अशा सगळ्या, जगातील गोष्टी पित्याच्या नाहीत पण जगाच्या आहेत; १७आणि जग व जगाची वासना नष्ट होत आहे, पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळ राहतो.

१८मुलांनो, ही शेवटची घटका आहे; आणि ख्रिस्तविरोधी येणार आहे, हे तुम्ही ऐकल्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधी आले आहेत; आणि ह्यावरून आपण ओळखतो की, ही शेवटची घटका आहे. १९ते आपल्यातून बाहेर गेले, पण ते आपल्यातील नव्हते; कारण ते आपल्यातले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. पण ते सगळे आपल्यातले नव्हते हे प्रगट व्हावे म्हणून ते गेले.
२०पण जो पवित्र आहे त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे व तुम्ही सर्व गोष्टी जाणता. २१तुम्ही सत्य जाणत नाही म्हणून मी लिहिले असे नाही, पण ह्यासाठी की, तुम्हाला ते समजले आहे आणि तुम्ही जाणता की,सत्यापासून कोणतीही लबाडी उद्भवत नाही. २२येशू हा ख्रिस्त आहे, हे जो नाकारतो त्याच्याशिवाय लबाड कोण आहे? जो कोणी पित्याला आणि पुत्राला नाकारतो तो ख्रिस्तविरोधी आहे.
२३जो पुत्राला नाकारतो त्याला पिता नाही, पण जो पुत्राला पतकरतो त्याला पिताही आहे. २४म्हणून तुम्ही जे प्रारंभापासून ऐकले आहे ते तुमच्यात राहू द्या. तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे ते तुमच्यात राहिले तर तुम्हीही पुत्रात व पित्यात रहाल. २५आणि हे वचन, म्हणजे त्याने तुम्हाला ज्याचे वचन दिले ते सार्वकालिक जीवन आहे. २६जे तुम्हाला भुरळ घालतात त्यांच्याविषयी मी हे तुम्हाला लिहिले आहे.
२७पण त्याच्याकडून तुम्हाला जो अभिषेक मिळाला आहे तो तुमच्यात राहतो; आणि तुम्हाला कोणी शिकवले पाहिजे अशी तुम्हाला गरज नाही. पण त्याचा अभिषेक खरा आहे, खोटा नाही; तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकवतो आणि त्याने तुम्हाला शिकविले आहे तसे तुम्ही त्याच्यात रहा. २८आणि बाळांनो, त्याच्यात रहा; म्हणजे तो जेव्हा प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असेल व आपण त्याच्या येण्याच्या वेळी ओशाळणार नाही. २९तो नीतिमान आहे हे तुम्हाला कळले, तर तुम्हाला समजेल की, नीती आचरणारा प्रत्येक मनुष्य देवापासून जन्मला आहे. 

——१ योहान ३—–

बघा, आपल्याला देवाची मुले म्हणावे आणि आपण झालो आहो, ह्यात पित्याने आपल्यावर केवढी प्रीती वर्षवली आहे? म्हणून आपल्याला जग ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही.
प्रियांनो, आपण आता देवाची मुले आहो, आणि पुढे कसे होऊ ते अजून प्रगट झालेले नाही; पण आपण जाणतो की, तो प्रगट होईल त्यावेळी, आपण त्याच्यासारखे होऊ; कारण, आपण त्याला तो आहे तसा पाहू. आणि त्याच्या ठायी ही आशा ठेवणारा प्रत्येक मनुष्य, जसा तो शुद्ध आहे तसा स्वतःला शुद्ध करतो.

जो पाप करतो तो अनाचार करतो, कारण पाप अनाचार आहे. तुम्ही जाणता की, आपली पापे स्वतःवर घेण्यास तो प्रगट झाला, आणि त्याच्यात पाप नाही. जो काणी त्याच्यात राहतो तो पाप करीत नाही; जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिलेले नाही व तो त्याला ओळखीत नाही.
मुलांनो, तुम्ही कोणाही मनुष्याला तुम्हाला भुलवू देऊ नका; तो ज्याप्रमाणे नीतिमान आहे त्याप्रमाणे जो नीती आचरतो तो नीतिमान आहे. जो कोणी पाप करतो तो सैतानापासून आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. आणि म्हणून, सैतानाची कामे नष्ट करण्यास देवाचा पुत्र प्रगट झाला. जो देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यात राहते; तो पाप करू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मला आहे.
१०आणि ह्यावरून देवाची मुले आणि सैतानाची मुले उघड दिसतात. जो कोणी नीती आचरीत नाही तो देवाचा नाही; आणि तसाच, जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही. ११कारण तुम्ही प्रारंभापासून जो संदेश ऐकला तो हा आहे, आपण एकमेकांवर प्रीती करावी. १२काइनाप्रमाणे नाही, तो त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाला ठार मारले. आणि त्याने त्याला का मारले? कारण त्याची स्वतःची कामे वाईट होती व त्याच्या भावाची नीतीची होती. १३बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य करू नका. 

१४आपण बंधूंवर प्रीती करतो ह्यावरून आपण हे जाणतो की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत; जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो. १५जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो खुनी आहे; आणि कोणाही खुनी मनुष्यास सनातन जीवन रहात नाही हे तुम्ही जाणता.
१६त्याने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला, ह्यावरून आपल्याला प्रीती समजते; आणि आपण त्याचप्रमाणे बांधवांकरता जीव द्यावेत. १७पण ज्याच्याजवळ ह्या जगाची जिदगी आहे, आणि आपल्या बंधूला गरज आहे हे पहात असता, त्याच्यापासून तो आपला कळवळा आवरून धरतो तर त्याच्यात देवाची प्रीती कशी राहणार?१८मुलांनो, आपण शब्दाने किवा जिभेने प्रीती करू नये, पण कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
१९-२०ह्यावरून आपण सत्याचे आहो हे आपण ओळखू, आणि जेव्हा आपले मन आपल्याला कशात दोष लावील,तेव्हा आपण त्याच्यासमोर आपल्या मनाला धीर देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव मोठा आहे आणि सर्व काही जाणतो. २१प्रियांनो, आपले मन जर आपल्याला दोष लावीत नसेल तर आपल्याला देवासमोर धैर्य राहील. २२आणि आपण जे काही मागतो ते त्याच्याकडून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला आवडणार्‍या गोष्टी करतो.
२३त्याची आज्ञा ही आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा, आणि त्याने आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. २४जो त्याची आज्ञा पाळतो तो त्याच्यात राहतो व तो त्याच्यात राहतो; आणि तो आपल्यात राहतो हे त्याने दिलेल्या आत्म्याच्या योगे आपण ओळखतो.

—–१ योहान ४—–

प्रियांनोप्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका; पण ते आत्मे देवाकडून आहेत काय, ह्याची पारख करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात बाहेर निघाले आहेत. देवाचा आत्मा तुम्ही ह्यावरून ओळखावा; येशू ख्रिस्त देह धारण करून आला हे जो पतकरतो तो प्रत्येक आत्मा देवाकडून आहे. पण जो येशूला पतकरीत नाही असा प्रत्येक आत्मा देवाकडून नाही; आणि तुम्ही ज्याच्याविषयी ऐकले आहे की, ख्रिस्तविरोधी येणार आहे त्याचा हा आत्मा आहे; आणि तो आताच जगात आहे.
मुलांनो, तुम्ही देवाचे आहा, आणि तुम्ही त्याच्यावर विजय मिळविला आहे; कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. ते जगाचे आहेत; म्हणून ते जगाविषयी बोलतात व जग त्यचे ऐकते. आपण देवाचे आहोत; जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो; जो देवाला ओळखीत नाही तो आपले ऐकत नाही. आणि ह्यावरून सत्याचा आत्मा व संभ्रमाचा आत्मा आपण ओळखतो.

प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवाकडून आहे; जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे.
देवाने आपल्या एकुलत्या पुत्राला जगात पाठवले, ते ह्यासाठी की, त्याच्या द्वारे आपण जगावे; ह्यात आपल्यावरील देवाची प्रीती प्रगट झाली. १०ह्यात प्रीती आहे; आपण देवावर प्रीती केली असे नाही, पण त्याने आपल्यावर प्रीती केली आणि आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त होण्यास त्याने आपल्या पुत्राला पाठवले. ११प्रियांनो, देवाने आपल्यावर जर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे.
१२कोणीही देवाला कधी पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती केली तर देव आपल्यात राहतो व त्याची प्रीती आपल्यात पूर्ण होते. १३ह्यावरून आपण ओळखतो की, आपण त्याच्यात आणि तो आपल्यात राहतो. कारण त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे.
१४आणि आम्ही पाहिले आहे आणि साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा होण्यास पाठवले. १५येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, हे जो कोणी पतकरतो त्याच्यात देव राहतो व तो देवात राहतो. १६आणि देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे,आणि जो प्रीतीत राहतो तो देवात राहतो व देव त्याच्यात राहतो. १७आणि आपली प्रीती ह्यात पूर्ण केली जाते. म्हणजे आपल्याला न्यायाच्या दिवशी धैर्य रहावे; कारण तो जसा आहे तसेच आपण ह्या जगात आहो. १८प्रीतीच्या ठायी भीती नसते, उलट, पूर्ण प्रीती भीती घालवते; कारण भीतीत शिक्षेची भीती असते. जो कोणी भितो तो प्रीतीत पूर्ण झालेला नाही.
१९त्याने आपल्यावर प्रथम प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. २०मी देवावर प्रीती करतो असे म्हणणारा कोणी मनुष्य आपल्या बंधूचा द्वेष करीत असेल तर तो लबाड आहे. कारण त्याने ज्याला पाहिले आहे त्या बंधूवर तो प्रीती करीत नाही, तर त्याने ज्याला पाहिले नाही त्या देवावर तो कशी प्रीती करील? २१आणि त्याची आपल्याला आज्ञा आहे की, जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी. 

—–१ योहान ५—–

येशू हा ख्रिस्त आहे असा जो कोणी विश्वास ठेवतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि ज्याने आपल्याला जन्म दिला त्याच्यावर जो प्रीती करतो तो त्याने ज्याला जन्म दिला त्याच्यावरही प्रीती करतो.
म्हणून जेव्हा आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो, तेव्हा आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो हे आपण ओळखतो. कारण देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय. आणि त्याच्या आज्ञा कठिण नाहीत. कारण, देवापासून जो जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो; आणि आपला विश्वास हा विजय असून तो जगावर विजय मिळवतो. येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास ठेवणार्‍याशिवाय कोण जगावर विजय मिळवील? जो पाण्याद्वारे व रक्ताद्वारे प्रगट झाला तो हा आहे; म्हणजे येशू ख्रिस्त हा केवळ पाण्याकडून नाही, पण पाण्याकडून व रक्ताकडून प्रगट झाला. आणि साक्ष देणारा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे. आणि साक्ष देणारे तीन आहेत; आत्मा, पाणी आणि रक्त; आणि तिघांची साक्ष एकच आहे. आपण जर मनुष्यांची साक्ष पतकरतो तर देवाची साक्ष अधिक मोठी आहे; कारण देवाने आपल्या पुत्राविषयी जी साक्ष दिली ती साक्ष ही आहे.
१०जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्याजवळ, त्याच्या ठायी, ती साक्ष आहे. जो विश्वास ठेवीत नाही त्याने देवाला लबाड ठरविले आहे. कारण देवाने स्वतः साक्ष देऊन आपल्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. ११आणि ती साक्ष ही आहे की, देवाने आपल्याला सनातन जीवन दिले आहे, आणि ते जीवन त्याच्या पुत्रात आहे
१२ज्याला पुत्र आहे त्याला जीवन आहे; पण ज्याला देवाचा पुत्र नाही त्याला जीवन नाही.

१३मी हे तुम्हाला लिहिले आहे ह्याचे कारण हे आहे की, जे तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता, त्या तुम्हाला समजावे की, तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. १४आणि आपल्याला त्याच्यासमोर धैर्य आहे, कारण आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकतो. १५आपण काही मागितले असता तो आपले ऐकतो हे जर आपण जाणतो, तर आपण हे जाणतो की, आपण त्याच्याकडून ज्या मागण्या मागितल्या त्या आपल्याला मिळाल्या आहेत.
१६ज्या पापाचा परिणाम मरण नाही अशा प्रकारे पाप करताना कोणी आपल्या बंधूला बघितले तर त्याने त्याच्यासाठी मागावे आणि तो त्याला जीवन देईल; हो, ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्‍यांस देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे, आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही. १७सर्व अनीती पाप आहे; आणि ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे.
१८आपण जाणतो की, देवापासून जो जन्मला आहे असा कोणीही पाप करीत नाही; पण देवापासून जो जन्मला आहे तो त्याला राखतो, आणि तो दुष्ट त्याला हात लावीत नाही. १९आपण जाणतो की, आपण देवाकडचे आहोत आणि सर्व जग त्या दुष्टाकडे राहिलेले आहे. २०आणि आपण जाणतो की, देवाचा पुत्र आला आहे आणि त्याने आपल्याला असे ज्ञान दिले आहे की, आपण जो खरा आहे त्याला ओळखावे; आणि जो खरा आहे त्याच्या ठायी आपण आहोत, कारण त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी आपण आहोत. हा खरा देव व सार्वकालिक जीवन आहे.
२१मुलांनो, मूर्तींपासून स्वतःस जपा.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s