1 Peter

पेत्राचे पहिले पत्र

—–१ पेत्र १—–

येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून;
पंत, गलतिया, कपद्दुकिया, आसिया व बिथुनिया येथे, उपरी म्हणून पांगलेल्या लोकांसः
देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, आज्ञापालन करण्यासाठी, येशू ख्रिस्ताचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्ही आहा; तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळोत.

आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे, आणि त्यायोगे मिळणारे अविनाशी, अदूषित व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे, आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहा. आणि ह्या कारणास्तव, आताच्या काळात, नाना प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हाला थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही सोशीत असताही उल्लसित होता. म्हणजे, अग्नीने ज्याची पारख करतात तरी जे नष्ट होणारे आहे, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी. तुम्ही त्याला बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्याला पहात नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसित होता. कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवीत आहा.
१०तुम्हाला प्राप्त होणार्‍या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश दिले ते ह्या तारणाविषयी विचार व शोध करीत होते. ११त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या गौरवी गोष्टींविषयी आधी साक्ष देत होता, तेव्हा त्याने कोणता किवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला ह्याचा ते विचार करीत होते. १२त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हाला सुवार्ता सांगणार्‍यांनी आता ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्यात ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी अवलोकन करण्याची देवदूतांना इच्छा आहे.

१३म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा; आणि, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण भाव ठेवा. १४तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. १५पण तुम्हाला ज्याने बोलावले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. १६कारण असे लिहिले आहे की, तुम्ही पवित्र व्हा; कारण मी पवित्र आहे.
१७आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामांप्रमाणे न्याय करतो त्याला तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागा. १८कारण तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टींद्वारे, तुमची सुटका केली गेली नसून, १९निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे केली गेली आहे. २०खरोखर, जगाच्या स्थापनेअगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रगट झाला, २१आणि त्याच्या द्वारे तुम्ही देवावर विश्वास  ठेवला; कारण, देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्याने त्याला मृतांतून उठवून गौरव दिले. २२तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहेत, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा. २३कारण तुमचा पुनर्जन्म नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून,  म्हणजे देवाच्या, जिवंत राहणार्‍या व टिकणार्‍या वचनाकडून झाला आहे. २४कारण,
सर्व देही जणू गवत आहेत,
आणि गवतावरील फुलासारखे
मनुष्याचे वैभव आहे;
  गवत वाळते व त्याचे फूल गळते,
  २५पण परमेश्वराचे वचन सर्वकाळ राहते.
आणि तुम्हाला त्याच वचनाची सुवार्ता सांगण्यात आली आहे.

—–१ पेत्र २—–

म्हणून तुम्ही सर्व कुवृत्ती, सर्व कपट, ढोंग, मत्सर व सर्व कुजबुज दूर ठेवून, २-३नव्या जन्मलेल्या बाळांप्रमाणे तुम्ही वचनाच्या निर्भेळ दुधाची आवड धरा; म्हणजे परमेशवर कृपाळू आहे, हे तुम्ही अनुभवले असेल तरी तुमची त्यायोगे तारणासाठी वाढ व्हावी.
मनुष्यांनी नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही आला असल्यामुळे, तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, एक आत्मिक मंदिर असे, आणि देवाला आवडणारे आत्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यास एक पवित्र याजकसंघ असे उभारले जात आहा. आणि म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की,
बघा, मी एक निवडलेला
व मोलवान असलेला,
  कोपर्‍यावरचा मुख्य चिरा सियोनात ठेवतो;
  आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो
तो ओशाळणार नाही.
म्हणून विश्वास ठेवणार्‍या तुम्हाला तो मोलवान आहे; पण, अवमान करणार्‍यांना बांधणार्‍यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्‍याचा मुख्य चिरा झाला आहे; आणि अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे.’ ते अवमान करून वचनावर अडखळतात. त्यासाठीच ते नेमलेले होते.
पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजवंशी याजकसंघ, एक पवित्र राष्ट्र, एक विशिष्ट समाज असे झाला आहात. ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. १०तुम्ही पूर्वी समाज नव्हता, पण आता देवाचा समाज आहा. तुमच्यावर दया केली नव्हती, पण आता दया केली गेली आहे.
११माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्‍या दैहिक वासनांपासून दूर रहा. १२आणि, परजनांत आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हाला दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यांवरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.

१३प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभूकरता, आज्ञांकित रहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याला, १४आणि त्याचे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित रहा; कारण वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यास व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यास ते नेमलेले आहेत. १५कारण देवाची इच्छा आहे की, तुम्ही चांगले करीत राहून मूर्ख माणसांच्या अज्ञानाला गप्प करावे. १६स्वतंत्र म्हणून, पण कुवृत्तीवर पांघरूण घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता, देवाचे दास म्हणून रहा. १७सर्वांना मान द्या; बांधवांवर प्रीती करा; देवाला भ्या; राजाला मान द्या.

१८घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण आदराने आपल्या स्वामींना आज्ञांकित रहा. जे चांगले आणि सहनशील असतील त्यांनाच नव्हे, पण विपरीत असतील त्यांनादेखील आज्ञांकित रहा. १९कारण, जर कोणी देवाविषयी विवेक बाळगून, अन्याय सोसून, दुःख सहन करीत असेल, तर ते स्तुत्य आहे; २०पण, तुम्ही अपराध करता तेव्हा तुम्हाला ठोसे दिले गेले, आणि तुम्ही ते सहन केलेत तर त्यात वाखाणणी काय आहे? पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केलेत, तर ते देवाला आवडणारे आहे. २१कारण ह्यासाठीच तुम्ही बोलावले गेला आहात. कारण, ख्रिस्तानेही तुमच्यासाठी सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे. २२त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. २३त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण जो नीतीने न्याय करतो त्याच्यावर त्याने स्वतःस सोपविले. २४आपली पापे त्याने स्वतः, त्याच्या स्वतःच्या शरिरात, झाडावर वाहिली, म्हणजे आपण पापाला मरून नीतिमत्वाला जिवंत रहावे; त्याच्या वळांनी तुम्ही बरे झाला आहात; २५कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जिवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहा.

—–१ पेत्र ३—–

आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीला आज्ञांकित रहा; म्हणजे कोणी वचनाचा अवमान केला असेल तरी तेही आपल्या बायकांच्या आचरणाने वचनाशिवाय जिकले जातील. कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील. तुमची शोभा ही केस गुंफणे, सोने घालणे आणि वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये; पण अंतःकरणात गुप्त राहणार्‍या मनुष्यपणात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी. कारण देवावर भाव ठेवणार्‍या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशा प्रकारे आपल्या पतीला आज्ञांकित राहून स्वतःला भूषवले. उदाहरणार्थ, सारेनेही अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या. तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहा.
पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजुक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या; आणि जीवनाच्या कृपेतील जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा. म्हणजे तुमच्या प्रार्थना खुंटू नयेत.

शेवटी सर्व जण एकमनाचे व्हा; आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कन्हवाळू व प्रेमळ मनाचे व्हा. वाइटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या. कारण ह्यासाठीच तुम्ही बोलावले गेला आहात; म्हणजे तुम्हाला आशीर्वाद हे वतन मिळावे. १०कारण,
 जो आयुष्याची आवड धरतो
  व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो
  त्याने वाइटापासून आपली जीभ
व खोटे बोलण्यापासून आपले ओठ आवरावेत.
  ११त्याने वाईट सोडून चांगले करावे,
  शांतीचा शोध करून तिला अनुसरावे.
१२कारण परमेश्वराचे डोळे
नीतिमानांवर असतात
  व त्याचे कान त्यांच्या विनवण्यांकडे असतात
पण वाईट करणार्‍यांविरुद्ध
परमेश्वराचे तोंड असते.

१३आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला, तर कोण तुमचे वाईट करील? १४पण, नीतीकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने गांगरू नका किवा अस्वस्थ होऊ नका. १५पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या मनांत पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्‍या प्रत्येक मनुष्याला सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा. १६आणि चांगला विवेक ठेवा; म्हणजे, तुमच्याविषयी वाईट बोलत असता, ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणार्‍यांना लाज वाटावी. 
१७कारण चांगले केल्याबद्दल तुम्ही सोसावे हे जर देवाला बरे वाटते, तर वाईट केल्याबद्दल सोसण्यापेक्षा ते अधिक बरे. १८कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमानांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला. १९आणि तो त्यायोगे गेला व त्याने अटकेतल्या आत्म्यांना घोषणा केली. २०नोहाच्या दिवसांत, तारू तयार होतेवेळी, देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता, पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे, म्हणजे आठ जीव, पाण्याकडून तारले गेले. २१आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा (देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून) येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो. २२तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजव्या हाताशी आहे; आणि देवदूत, शक्ती व बले त्याच्या अधीन आहेत.

—–१ पेत्र ४—–

म्हणून ख्रिस्ताने देहात सोसले; आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा. कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे. म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील काळात, पुन्हा मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे. कारण, परजनांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच पानोत्सवात व अमंगळ मूर्तिपूजेत आपल्या मार्गाने गेलात. अशा दंगलीच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात. तरी पण, जो जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे त्याला ते आपला हिशोब देतील. कारण, ह्याकरता, मृतांनादेखील सुवार्ता सांगण्यात आली होती; म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत रहावे.
पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे; म्हणून समंजस मनाचे व्हा, आणि प्रार्थनेसाठी सावध रहा; आणि सर्वांत महत्वाची गोष्ट ही की, आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकते. काही कुरकुर न करता तुम्ही सर्व जण एकमेकांचे आदरातिथ्य करणारे व्हा. १०तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी ह्या नात्याने,  प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा. ११जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव केले जावे. त्याला गौरव व सत्ता युगानुयुग असोत. आमेन.

१२प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हाला काही भलते झाले, असे भलते मनात आणू नका. १३उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखांत भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लसित व्हावे. १४जर ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर तळपत आहे. १५पण तुमच्यातील कोणी खुनी किवा चोर म्हणून, वाईट करणारा किवा दुसर्‍याच्या कामात लुडबुड करणारा म्हणून सोसू नये. १६पण ख्रिस्ती म्हणून जर कोणी सोसले तर त्याने लज्जित होऊ नये, पण त्या नावाने त्याने देवाचे गौरव करावे.
१७कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ व्हायचा काळ आता आला आहे; आणि प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल? १८आणि, जर नीतिमान क्वचित् तारला जाईल, तर भक्तिहीन व पापी कोठे दिसतील? १९म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्या हाती आपले जीव सोपवावेत. 

—–१ पेत्र ५—–

तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक जोडीदार-वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रगट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो. तुमच्यामधील, देवाच्या कळपाचे पालन करा; भाग पडते म्हणून नाही, पण देवाला आवडेल असे, स्वेच्छेने; अयोग्य लाभासाठी नाही, पण उत्सुकतेने;  आणि, वतनावर धनीपण चालवून नाही, पण कळपाला उदाहरणे होऊन त्याचे पालन करा. आणि मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा अक्षय हार मिळेल.

तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा. आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो. म्हणून देवाच्या समर्थ बाहूखाली तुम्ही स्वतःला खाली वाकवा; ह्यासाठी की, त्याने तुम्हाला यथाकाळी वर उचलावे. तुम्ही आपली सर्व काळजी त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो.

सावध रहा; जागृत रहा; कारण तुमचा शत्रू सैतान हा गुरगुरणार्‍या सिंहाप्रमाणे, कोणाला खावे म्हणून शोधीत फिरत आहे. तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुद्ध उभे रहा. कारण तुम्ही जाणता की, जगात असलेल्या तुमच्या बांधवांवर तशीच दुःखे आणली जात आहेत. १०पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील. ११त्याला युगानुयुग सत्ता आहे. आमेन.

१२मी ज्या सिलवानला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्या हाती तुम्हाला थोडक्यात लिहून पाठवून, बोध करतो आणि साक्ष देतो की, ही देवाची खरी कृपा आहे. हीत तुम्ही स्थिर रहा. १३बाबेल येथील, तुमच्या जोडीची निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम पाठवीत आहे; आणि माझा मुलगा मार्क हाही पाठवीत आहे. १४प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s