1 Thessalonians

थेसलनिकेकरांस पहिले पत्र

—–१ थेसल १—–

पौल, सिलवान व तिमथ्य ह्यांजकडून;
देव जो पिता, आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या समागमातील थेसलनिकेकरांच्या मंडळीसः
तुम्हास कृपा व शांती असो.

आम्ही आमच्या प्रार्थनांत तुमची आठवण करून तुमच्यामधील सर्वांसाठी देवाचे नित्य उपकार मानतो; आणि देव जो आपला पिता आहे त्याच्यापुढे, तुमचे विश्वासाचे काम व प्रीतीचे श्रम, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावरील तुमच्या आशेचा धीर ह्यांची निरंतर आठवण करतो. कारण बंधूंनो, तुम्ही देवाचे प्रिय आणि निवडलेले आहा हे आम्ही जाणतो.
कारण तुमच्याकडे आमची सुवार्ता केवळ शब्दाने आली नाही, पण तशीच सामर्थ्याने, आणि पवित्र आत्म्याद्वारे पूर्ण खातरी पटवीत आली. कारण आम्ही तुमच्यासाठी तुमच्यात कशा प्रकारचे झालो, हे तुम्हाला माहीत आहे; आणि, तुम्ही पुष्कळ दुःखात पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. त्यामुळे मासेदोनियातील  व अखयातील सर्व विश्वास ठेवणार्‍यांना तुम्ही उदाहरणे झाला आहात.
कारण तुमच्याकडून केवळ मासेदोनियात व अखयात प्रभूच्या वचनाची घोषणा झाली असे नाही, पण, तुमचा देवावरील विश्वास प्रत्येक ठिकाणी प्रसृत होत आहे त्यामुळे आम्हाला काहीच बोलण्याची गरज नाही. कारण आपल्याविषयी ते स्वतःच सांगतात; म्हणजे तुमच्यात आमचे येणे कसे झाले, आणि, तुम्ही जिवंत व खर्‍या देवाची सेवा करण्यात मूर्तीकडून देवाकडे वळलात, १०आणि त्याने ज्याला मेलेल्यांतून उठविले त्या त्याच्या पुत्राची म्हणजेच आपल्याला, येणार्‍या क्रोधापासून, सोडविणार्‍या येशूची स्वर्गातून वाट पहात आहा.

—–१ थेसल २—–

कारण बंधूंनो, तुम्ही स्वतः जाणता की, तुमच्यात आमचे येणे व्यर्थ झाले नाही. उलट, तुम्हाला कळल्याप्रमाणे, आम्ही फिलिपैत आधी सोसले असता व आमची हेलना करण्यात आली असताही, तुम्हाला देवाची सुवार्ता सांगण्यास, आम्ही आमच्या देवामुळे पुष्कळ विरोधात धैर्याने बोललो.
कारण आमचा बोध हा संभ्रमातून किवा अमंगळपणातून आला नव्हता, किवा कपटाने केलेला नव्हता. पण,आमच्यावर सुवार्ता सोपविण्यास देवाने पारखलेले म्हणून, आम्ही हे बोलतो; आपली मने पारखणार्‍या देवाला संतुष्ट करावे असे बोलतो, माणसांना संतुष्ट करावे असे नाही. कारण तुम्ही जाणता की, आम्ही तुमच्यात, लाघवी भाषणे करून, प्रवेश केला नाही, किवा लोभाने बहाणा करून नाही. देव साक्षी आहे. आणि आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून तुमच्यावर भार ठेवू शकलो असतो, तरी आम्ही मनुष्यांकडून, तुमच्याकडून किवा इतरांकडूनही मान मिळवू पहात नव्हतो.
पण जशी दाई आपल्या मुलांचे पालन करते तसे आम्ही तुमच्यात सौम्य वृत्तीचे झालो. आणि त्या प्रकारे तुमच्याविषयी आम्ही उत्कंठित असल्यामुळे, आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचीच नाही, पण आमच्या जिवांचीही भागी द्यायला तयार होतो, कारण तुम्ही आम्हाला प्रिय झाला होता. कारण बंधूंनो, तुम्हाला आमच्या कष्टांची व दगदगीची आठवण आहे. कारण तुमच्यातील कोणावरही आम्ही भार घालू नये, म्हणून आम्ही रात्रंदिवस काम करून तुम्हाला देवाची सुवार्ता सांगितली.
१०आणि तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांत आम्ही कसे पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने वागत आलो, ह्याविषयी तुम्ही साक्षी आहा आणि देवही आहे. ११कारण तुम्ही हे जाणता की, बाप आपल्या मुलांना सांगतो,  त्याप्रमाणे,  आम्ही तुमच्यामधील प्रत्येक जणाला बोध केला, धीर दिला व निक्षून सांगितले की, १२जो देव तुम्हाला त्याच्या राज्यात व गौरवात बोलवीत आहे त्याला शोभेल असे चाला.
१३आम्हीदेखील ह्या कारणास्तव देवाचे निरंतर उपकार मानतो; कारण आमच्याकडून तुम्ही ऐकलेले देवाचे वचन तुम्ही स्वीकारले, तुम्ही ते माणसांचे वचन म्हणून नाही, पण ते खरोखर आहे तसे, देवाचे वचन म्हणून स्वीकारले; आणि तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांत तेही कार्य करीत आहे.

१४म्हणून, तुम्ही बंधूंनो, यहुदियात असलेल्या ख्रिस्त येशूमधील देवाच्या मंडळ्यांचे अनुकरण करणारे झाला आहात; कारण त्यांनी यहुद्यांकडून ज्या गोष्टी सोसल्या तशाच तुम्हीही तुमच्या देशबांधवांकडून सोसल्या. १५त्यांनी प्रभू येशूला मारले, तसेच संदेष्ट्यांना मारले, आणि आम्हाला पळवून लावले. ते देवाला संतोषवीत नाहीत आणि सर्व लोकांना विरोध करतात. १६त्यांची पापे सदोदित भरत रहावीत म्हणून, ते आम्हाला परजनांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्याशी बोलण्यास मना करतात; कारण शेवटी त्यांच्यावर त्याचा कोप येईल.

१७पण बंधूंनो, आम्ही तुम्हाला मनाने नाही, पण अल्पकाळ तोंडापुढून मुकलो असल्यामुळे, मोठ्या उत्कंठेने तुमचे तोंड बघण्याचा फार प्रयत्न केला. १८म्हणून आम्ही तुमच्याकडे यावे अशी आमची, स्वतःची माझी पौलाची, एकदा व दुसर्‍यांदाही इच्छा होती, पण आम्हाला सैतानाने अडथळा केला. १९कारण आमची आशा, आमचा आनंद किवा अभिमानाचा मुगुट काय आहे? आपल्या प्रभू येशूच्या समोर त्याच्या येण्याच्या वेळी, तुम्हीच की नाही? २०कारण आमचा मान व आमचा आनंद तुम्ही आहा.

—–१ थेसल ३—–

म्हणून जेव्हा आम्हाला आणखी पुढे सहन करवेना, तेव्हा अथेनैत एकटे रहावे हे आम्हाला बरे वाटले; आणि तुम्हाला स्थिर करण्यास व तुमचे तुमच्या विश्वासाविषयी सांत्वन करण्यास, आमचा बंधू व ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक तिमथ्य ह्याला आम्ही तुमच्याकडे धाडले. म्हणजे ह्या संकटांमुळे तुम्ही कोणीही ढळू नये. कारण, आपण ह्यासाठीच नेमलेले आहोत हे तुम्ही स्वतः जाणता. कारण तुमच्याजवळ आम्ही असताना तुम्हाला आधी सांगितले होते की, आपण दुःख सोसले पाहिजे, आणि तसे झाले हे तुम्ही जाणता. म्हणून जेव्हा मला आणखी पुढे सहन करवेना तेव्हा तुमच्या विश्वासाविषयी मला कळावे म्हणून मी त्याला धाडले; न जाणो, परीक्षकाने काहीही करून तुमची परीक्षा केली असेल व आमचे काम व्यर्थ झाले असेल.
पण तुमच्याकडून आताच तिमथ्य आमच्याकडे आला व त्याने आम्हाला तुमच्या विश्वासाविषयी व तुमच्या प्रीतीविषयी, आणि तुम्हाला आमची नेहमी चांगली आठवण येते व जसे आम्ही तुम्हाला भेटण्यास तसे तुम्ही आम्हाला भेटण्यास उत्कंठित आहात, अशी तुमच्याविषयी सुवार्ता कळविली. म्हणून बंधूंनो, तुमच्या विश्वासामुळे, आमच्या सर्व दुःखात व आपत्तीत आमचे तुमच्या बाबतीत सांत्वन झाले. कारण, तुम्ही प्रभूत स्थिर आहा, तर आता आम्ही जगू. कारण आपल्या देवापुढे, आम्ही तुमच्याकरता, ज्या सर्व आनंदामुळे आनंद करतो त्याबद्दल आम्ही देवाला तुमच्यासाठी काय धन्यवाद देऊ शकणार? १०आम्ही रात्रंदिवस, फार प्रार्थना करतो की, आम्ही तुमचे तोंड बघावे, आणि तुमच्या विश्वासात जे उणे आहे ते पूर्ण करावे.
११आता स्वतः देव आपला पिता आणि आपला प्रभू येशू तुमच्याकडील आमचा प्रवास निर्विघ्न करो. १२आणि आम्ही तुमच्यावर प्रीती करतो तशी तुमची एकमेकांवरील व सर्वांवरील प्रीती प्रभू वाढवो आणि विपुल करो; १३आणि तुमची अंतःकरणे स्थिर करो; म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या येण्याच्या वेळी, त्याच्या सर्व पवित्र जनांसह येईल तेव्हा, देव जो आपला पिता त्याच्यापुढे, तुमची अंतःकरणे पवित्रतेत निर्दोष असावीत. 

—–१ थेसल ४—–

१तर शेवटी, बंधूंनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो व प्रभू येशूत असा बोध करतो की, तुम्ही देवाला संतोषवावे म्हणून कसे चालावे, हे आमच्याकडून जसे स्वीकारलेत व जसे तुम्ही चालत आहा तसेच उत्तरोत्तर पुढे चालावे. कारण आम्ही तुम्हाला प्रभू येशूकडून कोणत्या आज्ञा दिल्या आहेत त्या तुम्ही जाणता. कारण, देवाची इच्छा आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे; आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की, ज्याने त्याने आपले पात्र पावित्र्याने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन करून घ्यावे. जे देवाला ओळखीत नाहीत अशा इतर परजनांप्रमाणे वासनेच्या लोभाने करू नये. कोणीही मर्यादा सोडू नये व आपल्या बंधूला ह्या बाबतीत ठकवू नये. कारण अशा सर्व गोष्टींचा सूड घेणारा परमेश्वर आहे हेही तुम्हाला आम्ही अगोदर सांगितले आहे, आणि निक्षून सांगितले आहे. कारण देवाने आपल्याला अमंगळपणासाठी बोलावले नाही पण पावित्र्यासाठी बोलावले आहे. म्हणून जो अवमान करतो तो माणसाचा अवमान करीत नाही पण ज्याने आपला पवित्र आत्मा आपल्याला दिला त्या देवाचा अवमान करतो.
पण तुम्हाला बंधुप्रेमाविषयी मी लिहिण्याची गरज नाही; कारण तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी हे स्वतःच देवाकडून शिकला आहा. १०आणि ती तुम्ही सगळ्या मासेदोनियातील सर्व बांधवांवर खरोखर करता. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही अधिकाधिक वाढत जा. ११आणि, तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही शांतीने राहण्यास, स्वतःचा उद्योग करण्यास व आपल्या हातांनी काम करण्यास झटा. १२म्हणजे बाहेरच्या लोकांबरोबर तुम्हाला शोभेल असे चालाल व तुम्हाला काही उणे पडणार नाही.
१३पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे निजलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे, ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये. १४कारण येशू मेला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे निजतात त्यांनाही देव त्याप्रमाणेच, त्याच्याबरोबर आणील. १५कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हाला हे सांगतो की, आपण जे जिवंत आहो व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत निजलेल्यांच्या पुढे जाणार नाही. १६कारण आज्ञेचा आवाज, आद्यदेवदूताचा आवाज आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मेलेले प्रथम उठतील. १७मग आपण जे जिवंत आहो व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू. १८म्हणून तुम्ही ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.   

—–१ थेसल ५—–

पण बंधूंनो, तुम्हाला काळ व समय ह्यांविषयी मी लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्ही स्वतः पूर्ण जाणता की, जसा रात्रीचा चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येईल. ते शांती आणि स्वास्थ्य म्हणतील तेव्हा, गरोदर असलेल्या स्त्रीला वेणा याव्यात तसा त्यांच्यावर अकस्मात् नाश येईल, आणि ते सुटणार नाहीत.
पण बंधूंनो, तुमच्यावर तो दिवस चोराप्रमाणे यावा, असे तुम्ही आता अंधारात नाही. तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र आहा, आणि दिवसाचे पुत्र आहा; आपण रात्रीचे किवा अंधाराचे नाही. म्हणून आपण दुसर्‍यांसारखे झोपू नये, पण जागृत राहून सावध रहावे. कारण जे झोपतात ते रात्री झोपतात, आणि झिंगतात ते रात्री झिंगतात, पण दिवसाचे आहो असे आपण विश्वास व प्रीती ह्यांचे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण धारण करून सावध राहू या. कारण देवाने आपल्याला कोपासाठी नेमले नसून, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे तारणाच्या प्राप्तीसाठी नेमले आहे. १०तो आपल्यासाठी ह्याकरता मेला की, आपण जरी जागे राहिलो किवा झोपलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे. ११म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करीतही आहा.

१२आणि बंधूंनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, जे तुमच्यात परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यावर आहेत आणि तुम्हाला बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या; १३आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना, आणि एकमेकांशी शांतीने रहा.
१४आता बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की, जे ऐदी आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, अल्पधीर आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा. १५आणि तुम्ही हे पहा की, कोणी कोणाला वाइटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण, तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा.
१६सदोदित आनंद करा. १७निरंतर प्रार्थना करा. १८प्रत्येक गोष्टीत उपकार माना. कारण तुमच्याविषयी  ख्रिस्त येशूत देवाची इच्छा हीच आहे.
१९आत्म्याला विझवू नका. २०संदेशांचा उपहास करू नका. २१सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते बळकट धरा. २२वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.
२३आणि स्वतः शांतीचा देव तुम्हाला पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, तुमचा जीव आणि तुमचे शरीर पूर्ण निर्दोष राहो. २४तुम्हाला जो बोलवीत आहे तो विश्वासू आहे; तो तेही करील.
२५बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
२६सर्व बंधूंना पवित्र चुंबनाने सलाम द्या.
२७मी तुम्हाला प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा.
२८आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s