1 Timothy

तिमथ्याला पहिले पत्र

—–१ तिमथ्य १—–

देव आपला तारक व ख्रिस्त येशू आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याजकडून;
विश्वासातला माझा पुत्र तिमथ्य ह्यासः
देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून कृपा, दया व शांती.

मी मासेदोनियात जात असताना तुला विनंती केली होती, तशी आताही करतो की, इफिसमध्येच तू आणखी रहा; म्हणजे तू तेथे कोणाकोणाला हे निक्षून सांगावेस की, त्यांनी भलतेच शिकवू नये, किंवा त्यांनी कहाण्यांकडे व ज्यांना काही शेवट नाही अशा प्रकारच्या वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नये. अशा गोष्टी ह्या विश्वासातील देवनियोजित व्यवस्थेऐवजी वाद आणतात. आपल्या आज्ञेचा उद्देश हा आहे की, शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकातून व निष्कपट विश्वासातून प्रीती व्यक्त व्हावी. ह्या गोष्टींपासून कित्येक जण बहकलेत व निरर्थक वादाकडे वळलेत. ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात; पण ते स्वतः काय सांगतात व कशाविषयी निक्षून सांगतात हे त्यांचे त्यांनाच समजत नाही.
पण आपण जाणतो की, जर कोणी नियमशास्त्राचा नियमाप्रमाणे उपयोग केला तर नियमशास्त्र चांगले आहे. कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र हे नीतिमान मनुष्यांसाठी केलेले नाही; पण अनाचारी व आज्ञाभंग करणारे, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, तसेच बापाला मारणारे व आईला मारणारे, मनुष्यवध करणारे, १०-११जारकर्मी, पुरुषसंभोग करणारे, माणसांना धरून नऊन विकणारे, खोटे बोलणारे, आणि खोटी शपथ वाहणारे अशा प्रकारच्या मनुष्यांसाठी आहे; तसेच मला सोपवून दिलेल्या धन्य देवाच्या गौरवी सुवार्तेच्या,चांगल्या शिक्षणाविरुद्ध असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आहे.

१२आणि ज्याने मला शक्ती पुरविली तो आपला प्रभू, ख्रिस्त येशू, ह्याचे मी उपकार मानतो, कारण, त्याने ज्या मला विश्वासू गणून आपल्या सेवेत घातले, १३तो मी पूर्वी दुर्भाषण करणारा व टवाळखोर होतो; पण ते माझ्या अविश्वासात, मी अज्ञानी असताना केले असल्यामुळे माझ्यावर दया केली गेली. १४आणि ख्रिस्त येशूच्या ठायी लाभणार्‍या विश्वासाच्या व प्रीतीच्या जोडीस आपल्या प्रभूची कृपा माझ्यावर विपुल झाली. १५ख्रिस्त येशू पाप्यांस तारावयास जगात आला, हे एक विश्वसनीय वचन आहे व हे सर्वस्वी स्वीकार करण्यास योग्य आहे; आणि मी पाप्यांतला प्रमुख आहे. १६पण माझ्यावर दया केली गेली, ह्याचे कारण हे आहे की, मी प्रमुख आहे म्हणून माझ्या ठायी येशू ख्रिस्ताने सर्व सहनशीलता प्रगट करावी; म्हणजे सनातन जीवनासाठी जे त्याच्यावर ह्यापुढे विश्वास ठेवतील त्यांना माझे उदाहरण व्हावे.
१७आणि आता, जो सनातन, अविनाशी आणि अदृश्य राजा असा एकच देव, त्याला मान आणि गौरव युगानुयुग असोत. आमेन.
१८माझ्या मुला, तिमथ्या, तुझ्याविषयी पूर्वी झालेल्या संदेशास अनुसरून मी तुला हा आदेश देतो की, त्यांना अनुसरून तू चांगली लढाई लढ, १९आणि विश्वास व चांगला विवेक राख. कित्येकांनी तो सोडल्यामुळे, ते आपल्या विश्वासाच्या बाबतीत तारू फुटल्याचा अनुभव घेत आहेत. २०हुमनाय व अलेक्झांदर हे त्यांच्यातलेच आहेत. त्यांनी दुर्भाषण न करणे शिकावे म्हणून त्यांना मी सैतानाच्या हाती दिले आहे.

—–१ तिमथ्य २—–

म्हणून, सर्वांत प्रथम, मी बोध करतो की, आपण सर्व मनुष्यांसाठी विनवण्या व प्रार्थना व मध्यस्थीच्या प्रार्थना करून उपकारस्मरण करावे; राजांसाठी व जे लोक आपल्यावर अधिकार चालवितात अशा सर्वांसाठी; म्हणजे आपल्याला शांतीत व स्वास्थ्यात, संपूर्ण सुभक्तीने व उदात्त वृत्तीने आपले आयुष्य घालविता यावे. हे चांगले आहे व आपल्या तारक देवाच्या दृष्टीपुढे हे त्याला आवडणारे आहे. कारण, त्याची इच्छा आहे की, सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या ज्ञानाकडे यावे.
कारण देव एक आहे, आणि देव व मनुष्य ह्यांच्यामधला मध्यस्थ एक आहे; तो मनुष्य ख्रिस्त येशू आहे. त्याने सर्वांच्या खंडणीसाठी आपल्या स्वतःचे दान केले, ह्याची साक्ष नियोजित काळी द्यायची आहे. आणि मी, ह्यासाठी, उपदेशक व प्रेषित, आणि विश्वासात व सत्यात परजनांचा शिक्षक म्हणून नेमलो गेलो आहे; मी हे खरे बोलत आहे, खोटे बोलत नाही.
म्हणून माझी इच्छा आहे की, प्रत्येक ठिकाणी, पुरुषांनी राग आणि वाद सोडून, पवित्र हात उभारून प्रार्थना करावी. तसेच स्त्रियांनी, त्यांना साजेशा पायघोळ वस्त्रात, मर्यादेने व समंजसपणाने, स्वतःला सजवावे; केस गुंफून, किवा सोने, मोती किवा उंची वस्त्रे वापरून नाही, १०पण देवभक्तीचा स्वीकार करणार्‍या स्त्रियांस शोभेल अशा प्रकारे त्यांनी आपल्या चांगल्या कामांनी स्वतःस सजवावे. ११स्त्रीने शांतपणे व पूर्ण आज्ञांकितपणे शिकावे. १२पण मी स्त्रीला शिकविण्याची व तशीच पुरुषांवर सत्ता चालविण्याचीही मुभा देत नाही; परंतु तिने शांत रहावे. १३कारण आदाम प्रथम केला गेला, त्यानंतर हव्वा; १४आणि आदाम भुलला नाही, पण स्त्री भुलली आणि उल्लंघनात आली. १५पण त्या जर संयमाने, विश्वास, प्रीती व पावित्र्य ह्यांत राहिल्या, तर मुलाला जन्म देण्यात स्त्री सुरक्षित राहील.

—–१ तिमथ्य ३—–

हे म्हणणे खरे आहे की, रक्षकपदाची इच्छा धरणारा चांगल्या कामाची इच्छा धरतो.
म्हणून रक्षक हा अदूष्य असला पाहिजे. तो एका पत्नीचा पती असावा; तो संयमशील, समंजस, सभ्य, आतिथ्यप्रेमी व शिक्षकवृत्तीचा असला पाहिजे. तो मद्यपी नसावा किवा मारपीट करणारा नसावा, पण सहनशील असावा; तो भांडखोर नसावा किवा लोभी नसावा. तो चांगल्या प्रकारे घरचा कारभार चालविणारा असावा; आणि पूर्ण उदात्त वृत्तीने मुलांना वळणात ठेवणारा असावा. कारण आपण कशा प्रकारे आपल्या घरचा कारभार चालवावा हे जर त्याला समजत नाही, तर देवाच्या मंडळीचा तो कसा सांभाळ करील? तो नवशिष्य नसावा, नाहीतर, तो गर्वाने फुगून सैतानाप्रमाणे शिक्षेत पडेल. आणि, त्याला बाहेरच्यांकडून चांगली साक्ष मिळाली पाहिजे; नाहीतर, त्याचा अपमान होऊन तो सैतानाच्या पाशात सापडेल.
तसेच सेवकही गंभीर असावेत. ते दुतोंड्ये नसावेत, मद्यासक्त नसावेत आणि अयोग्य लाभ मिळविणारे नसावेत; पण स्वतः शुद्ध विवेक बाळगून विश्वासाचे रहस्य राखणारे असावेत. १०ह्यांचीदेखील प्रथम पारख केली जावी आणि निर्दोष आढळल्यास त्यांनी सेवकपण करावे. ११तशाच स्त्रियाही गंभीर असाव्यात, निंदक नसाव्यात; त्या संयमशील असाव्यात व सर्व गोष्टींत विश्वासू असाव्यात. १२शिवाय सेवक हे एका पत्नीचे पती असावत, आणि चांगल्या प्रकारे आपल्या मुलांचा व घरचा कारभार चालविणारे असावेत. १३कारण ज्यांनी चांगल्या प्रकारे आपले सेवकपण केले आहे, ते आपल्यासाठी चांगली प्रतिष्ठा व ख्रिस्त येशूवरील आपल्या विश्वासात मोठे धैर्य मिळवीत असतात.
१४मी तुझ्याकडे लवकरच येईन अशी मी आशा करीत असता, मी ह्या गोष्टी तुला लिहीत आहे; १५पण ह्याचे कारण हे आहे की, मला जर फार उशीर लागला, तर देवाच्या घरात, म्हणजे जिवंत देवाच्या मंडळीत कसे वागले पाहिजे हे तुला कळावे. ती सत्याचा स्तंभ व पाया अशी आहे.
१६आणि, सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहेः
  तो देहाने प्रगट झाला,
  आत्म्याने नीतिमान ठरला.
  देवदूतांनी त्याला पाहिले,
  परजनांत त्याची घोषणा झाली,
  जगात त्याच्यावर विश्वास ठेवला गेला,
  तो गौरवात वर घेतला गेला.
—————————-
३:१६ मूळ ग्रीक भाषेत हे एक गीत असावे

—–१ तिमथ्य ४—–

आता, आत्मा स्पष्ट म्हणतो की, कित्येक जण, पुढील काळात, विश्वासापासून दूर जातील व ते फसव्या आत्म्यांकडे व भुतांच्या शिकवणींकडे वळतील. ज्यांचा विवेक डागलेला आहे अशा फसव्यांच्या ढोंगामुळे ते तिकडे वळतील. ते लग्न करणे मना करतील, आणि जे विश्वास ठेवणारे आहेत व ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे, त्यांनी उपकारस्मरण करून जी अन्ने घ्यावीत म्हणून देवाने निर्माण केलीत त्यांपासून त्यांना ते दूर राहण्यास सांगतील. देवाने केलेली प्रत्येक सृष्ट गोष्ट चांगली आहे व उपकारस्मरण करून घेतल्यास काहीच वर्ज्य करायला नको. कारण ते देवाच्या वचनाद्वारे व प्रार्थनेद्वारे पवित्र होते.
तू जर ह्या गोष्टी बांधवांपुढे ठेवल्यास तर तू ज्यांच्या पाठीस राहिलास त्या विश्वासाच्या व चांगल्या शिकवणीच्या वचनांच्या योगे तुझे पोषण होऊन तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
पण अभक्तीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर रहा; आणि तू स्वतःला सुभक्तीची तालीम दे. कारण शारीरिक तालीम ही थोडक्या गोष्टींत हितकारक आहे; पण सुभक्ती ही सर्व गोष्टींत हितकारक असते. तिला आताच्या व येणार्‍या युगाचे वचन आहे. हे एक विश्वसनीय वचन आहे व हे सर्वस्वी स्वीकार करण्यास योग्य आहे. १०म्हणून आपणही परिश्रम व प्रयत्न करीत आहो, कारण जो सर्वांचा तारक आहे, विशेषतः जे विश्वास ठेवतात त्यांचा तारक आहे, त्या जिवंत देवावर आपण भाव ठेवतो. ११तू ह्या गोष्टी निक्षून सांग आणि शिकव.

१२कोणी तुझ्या तरुणपणामुळे तुझा उपहास करू नये, पण, तुझ्या स्वतःच्या बोलण्यात आणि वागण्यात, प्रीतीत, विश्वासात व शुद्धाचरणात तू विश्वास ठेवणार्‍यांस उदाहरण हो. १३आणि मी येईपर्यंत तू वाचनाकडे, बोधाकडे व शिकवणीकडे लक्ष दे. १४वडील वर्गाने हात ठेवल्याकडून संदेशाद्वारे दिले गेलेले, जे कृपादान तुझ्यात आले आहे त्याची उपेक्षा करू नकोस. १५तू ह्या गोष्टींवर चिंतन कर; त्यांत गढून रहा म्हणजे सर्वांस तुझी प्रगती प्रगट व्हावी. १६तू स्वतःकडे व शिकवणीकडे लक्ष दे; आणि ह्या गोष्टींत टिकून रहा. कारण असे करण्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणार्‍यांचे तारण करशील. 

—–१ तिमथ्य ५—–

वडील माणसाला दोष लावू नको पण बापाप्रमाणे विनंती कर; तरुणांना भावांप्रमाणे, वृद्ध स्त्रियांना आईप्रमाणे आणि तरुण स्त्रियांना बहिणींप्रमाणे, सर्व प्रकारे, शुद्ध भावाने, बोध कर.

ज्या खरोखर विधवा आहेत अशा विधवांना मान दे. पण अशा विधवेला मुलेनातवंडे कोणी असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या घरी धर्माचरण करण्यास शिकून, आपल्या कुटुंबातील वडील व्यक्तींची सोय करावी;कारण हे देवाला आवडणारे आहे.

जी खरोखर विधवा आहे व निराधार आहे ती देवावर भाव ठेवते आणि त्याला रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करीत राहते. पण जी कोणी विषयोपभोगात जगत असेल ती जिवंत असून मेलेली आहे. त्यांनी अदूष्य रहावे म्हणून तू ह्या गोष्टी निक्षून सांग.
पण कोणी आपल्या कुटुंबियांची, आणि विशेषतः आपल्या घरच्यांची स्वतः तरतूद करीत नसेल तर त्याने विश्वास नाकारला आहे, आणि जो विश्वास ठेवीत नाही, अशा एखाद्या माणसापेक्षा तो अधिक वाईट आहे.
साठ वर्षांहून खालची विधवा यादीवर घेऊ नको; जी एकाच पतीची पत्नी होती अशी ती असावी; १०तिने मुलांचा प्रतिपाळ केला असेल, परक्यांचा पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, नाडलेल्यांना साह्य केले असेल, तिने प्रत्येक चांगल्या कामाचे मनोभावे अनुकरण केले असेल, तर तिने तिच्या चांगल्या कामाविषयी साक्ष मिळवलेली असावी.
११तरुण विधवांना यादीवर घेऊ नको. कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला झुगारण्यास धडपडू लागतात, तेव्हा लग्न करण्याची इच्छा धरतात. १२त्यांनी आपली पहिली प्रतिज्ञा मोडली असल्यामुळे त्यांच्यावर दोष आलेला असतो. १३आणि घरोघर फेर्‍या करून, शिवाय त्या आळशी व्हायला शिकतात; त्या केवळ आळशी नाही, पण बडबड्या आणि लुडबुड्या होतात व त्यांनी बोलू नये ते बोलतात.
१४म्हणून माझी इच्छा आहे की, ज्या तरुण आहेत त्यांनी लग्न करावे, त्यांनी मुलांना जन्म द्यावा, घर चालवावे आणि विरोध करणार्‍याला निदा करण्यास संधी देऊ नये. १५कारण कित्येक सैतानामागे आधीच वळल्या आहेत.
१६विश्वास ठेवणार्‍या एखाद्या स्त्रीकडे जर कोणी विधवा असतील तर तिने त्यांची सोय करावी; मंडळीवर भार घालू नये; म्हणजे ज्या खरोखर विधवा आहेत त्यांची मंडळीला सोय करता येईल.

१७जे वडील चांगल्या प्रकारे कारभार चालवितात, आणि विशेषतः जे वचनाद्वारे व शिकवणीद्वारे सेवा करतात ते दुहेरी मानास पात्र गणले जावेत. १८कारण शास्त्रलेख असे म्हणतो की, बैल मळणी करीत असताना त्याला मुसके घालू नको; आणि, कामकरी त्याच्या वेतनास पात्र आहे. १९दोन किवा तीन साक्षी समोर असल्याशिवाय वडिलांविरुद्ध काही आरोप तू आपल्याकडे घेऊ नको. २०जे पाप करणारे असतील त्यांना सर्वांसमोर दोष लाव, म्हणजे इतरांसही भय वाटावे.
२१मी तुला देवापुढे, ख्रिस्त येशूपुढे व निवडलेल्या देवदूतांपुढे निक्षून सांगतो की, तू कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय ह्या गोष्टी कर; पक्षपाताने काही करू नको.
२२कोणावरही उतावळीने हात ठेवू नको, आणि दुसर्‍यांच्या पापांत भागीदार होऊ नको; स्वतःला शुद्ध राख.
२३आतापासून केवळ पाणी पिऊ नको; पण तुझ्या पोटाकरता आणि वारंवारच्या आजारांकरता तू थोड्या द्राक्षारसाचा उपयोग कर.
२४काहींची पापे आधीपासून उघड असतात आणि न्यायासाठी पुढे जातात; पण काहींची मागून जातात. २५तशीच काही चांगली कामेही आधीपासून उघड असतात; आणि जी तशी नसतात तीही लपवता येत नाहीत.

—–१ तिमथ्य ६—–

जे जुवाखालचे दास आहेत तितक्या सर्वांनी आपल्या स्वामींना सर्वस्वी मानास पात्र लेखावे; म्हणजे देवाच्या नावाची व त्याच्या शिकवणीची निंदा होऊ नये. आणि ज्यांना विश्वास ठेवणारे स्वामी आहेत त्यांनी, ते बंधू आहेत म्हणून, त्यांचा अवमान करू नये पण त्यांची अधिक सेवा करावी. कारण ज्यांना चांगली सेवा लाभेल ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत. तू ह्या गोष्टी शिकवून बोध कर.

जर कोणी निराळी शिकवण शिकवीत असेल, आणि चांगली वचने, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची वचने, आणि सुभक्तीची शिकवण मानीत नसेल, तर तो गर्वाने फुगला आहे आणि काही जाणत नाही, पण तो वादांत व शाब्दिक विरोधांत भ्रमिष्ठ झाला आहे. अशा गोष्टींतून मत्सर, कलह, निंदा व कुशंका निर्माण होतात; आणि ज्यांची मने भ्रष्ट झालीत व जे सत्याला पारखे आहेत अशा मनुष्यांत निरर्थक वाद होतात. कारण त्यांना असे वाटते की, सुभक्ती ही प्राप्ती आहे, पण संतुष्ट वृत्तीसहित सुभक्ती ही मोठी प्राप्ती आहे.
कारण, आपण जगात काही आणले नाही व काही बाहेर नेऊ शकत नाही. म्हणून, आपल्याला अन्नवस्त्र मिळते तेवढ्यात आपण संतुष्ट रहावे. पण जे संपन्न होऊ पाहतात, ते परीक्षेत व पाशात आणि प्रत्येक प्रकारच्या अविचारी व अपायकारक वासनांत पडतात; आणि अशा प्रकारच्या वासना माणसाला हानीत व नाशात बुडवतात. १०कारण पैशाचा लोभ हे सर्व वाइटाचे मूळ आहे. कित्येक त्याचा लोभ धरून विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ यातनांनी स्वतःला भोसकून घेतले आहे. ११पण हे देवाच्या माणसा, तू ह्या गोष्टींपासून दूर पळ, आणि नीती, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्यामागे लाग.

१२विश्वासाची चांगली लढाई लढ; सनातन जीवन बळकट धर; त्यासाठी तू बोलावला गेला आहेस आणि पुष्कळ साक्षींपुढे तू चांगला पतकर पतकरला आहेस. १३आणि, जो सर्वांना जिवंत ठेवतो त्या देवाच्या दृष्टीसमोर व ज्याने पंतय पिलातापुढे स्वतः चांगला पतकर करून साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर, मी तुला हे निक्षून सांगतो की, १४आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनापर्यंत, निष्कलंक व अदूष्य आचरणाने, तू ही आज्ञा पाळ. १५तो धन्य आणि अनन्य अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ते स्वतःच्या काळांत प्रगट करील. १६त्या केवळ एकालाच अमरत्व आहे व तो अशा प्रकाशात राहतो की, तेथे कोणी जाऊ शकत नाही; त्याला कोणी बघितले नाही व कोणी बघू शकत नाही; सर्व मान आणि सनातन सत्ता त्याला असोत. आमेन.
१७जे ह्या जगातले सधन आहेत त्यांना तू हे निक्षून सांग की, त्यांनी मोठेपणा मानू नये, किवा अशाश्वत धनावर भाव ठेवू नये; पण जो आपल्या उपभोगासाठी आपल्याला सर्व विपुलतेने पुरवतो त्या देवावर भाव ठेवावा. १८चांगले ते करावे, चांगल्या कामांत संपन्न व्हावे; परोपकारी व उदार असावे. १९आणि पुढच्यासाठी आपल्याकरता त्यांनी चांगला पाया ठेवावा, म्हणजे त्यांना खरे जीवन बळकट धरता येईल.
२०हे तिमथ्या, तुझ्यावर सोपविलेली ठेव संभाळ. आणि अभक्तीच्या वटवटींपासून व ज्याला ज्ञान हे खोटे नाव आहे त्याच्या विरोधांपासून दूर रहा. २१कित्येक त्याचा स्वीकार करून विश्वासापासून बहकले आहेत. तुमच्याबरोबर कृपा असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s