2 Corinthians 1-5

करिंथकरांस दुसरे पत्र

—–२ करिंथ १—–

देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून;
करिंथमधील देवाच्या मंडळीस व सर्व अखयामधील सर्व पवित्र जनांसः
देव आपला पिता, आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.

आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता, उपकारांचा पिता व सर्व सांत्वनांचा देव धन्यवादित असो. तो आमच्या सर्व दुःखांत आमचे सांत्वन करतो; म्हणजे ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते त्या सांत्वनाने आम्ही स्वतः जे लोक कोणत्याही दुःखात असतात त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण जशी आमच्यावर ख्रिस्ताची दुःखे पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आणि आम्ही जर नाडले जात आहो तर ते तुमच्या सांत्वनासाठी व तारणासाठी, किवा आमचे सांत्वन होत आहे तर तेही तुमच्या सांत्वनासाठी होत आहे. म्हणजे, आम्हीदेखील सोशीत आहो तशा दुःखांत, ते तुमच्यात सोशिकपणा उत्पन्न करते. आणि तुमच्याविषयीची आमची आशा अढळ आहे; कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांत भागीदार आहा तसेच सांत्वनात होणार आहा.
बंधूंनो, आमच्यावर आसियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी आमची इच्छा नाही; म्हणजे आम्ही इतके,  शक्तीपलीकडे,  पराकाष्ठेचे भारावलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीही निराश होतो. पण आम्ही स्वतःवर भिस्त ठेवू नये, तर जो देव मेलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही भिस्त ठेवावी,म्हणून आम्हाला मरणाची शिक्षा मिळाली होती असे आम्हाला आमच्या मनात वाटत होते. १०त्याने आम्हाला अशा मरणातून सोडविले, आणि तो सोडवील; आम्ही त्याच्या ठायी आशा करतो की, तो पुढेही आम्हाला सोडवील. ११तुम्हीदेखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे साह्य करीत रहा; म्हणजे पुष्कळ मनुष्यांमुळे आम्हाला मिळणार्‍या कृपादानाकरता आमच्या वतीने पुष्कळांकडून उपकार मानले जावेत.

१२कारण, आम्ही दैहिक ज्ञानीपणात नव्हे, पण देवाच्या कृपेने, जगात आणि विशेषतः तुमच्याशी, पावित्र्याने आणि देवाने दिलेल्या शुद्ध भावाने वागलो आहो, ही आमच्या विवेकाची साक्ष आमचा अभिमान आहे. १३कारण तुम्हाला वाचता येतात किवा समजतात अशा गोष्टींशिवाय आम्ही तुम्हाला काहीच लिहीत नाही. आणि मी आशा करतो की, त्या तुम्हाला शेवटीही समजतील. १४जसे तुम्हाला हेही अंशतः समजले आहे की, जसे प्रभू येशूच्या दिवशी तुम्हीही आम्हाला अभिमान व्हाल, तसेच आम्ही तुम्हाला अभिमान आहोत.

१५आणि मी ह्या विश्वासामुळे असे योजले होते की, प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हाला दुसरा एक लाभ मिळावा, १६तुमच्याकडून मासेदोनियास जावे व मासेदोनियाहून तुमच्याकडे परत यावे, आणि तुम्ही मला यहुदियाकडे पोहचते करावे. १७असा विचार करीत असता, मी चंचलपणाचा अवलंब केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय, म्हणजे माझे होय, होय आणि नाही, नाही असे असावे?  १८पण देव खरा आहे; आमचे तुमच्याबरोबर बोलणे होय आणि नाही असे नाही.  १९कारण आम्ही, म्हणजे मी, सिलवान व तिमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त हो, ना असा नव्हता तर त्याच्यात होच होते. २०कारण देवाची सर्व वचने त्याच्यात होय अशी आहेत, आणि आपण देवाच्या गौरवासाठी त्याच्या द्वारे आमेन म्हणतो.
२१आता, जो आम्हाला तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे व ज्याने आपल्याला अभिषेक केला आहे तो देव आहे. २२तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे, आणि आपल्या अंतःकरणात आत्मा हा विसार दिला आहे.
२३आणि तुमची गय करावी म्हणून मी अजून करिंथला आलो नाही, म्हणून मी देवाला माझ्या जिवाविरुद्ध साक्षी बोलावतो. २४आम्हाला तुमच्या विश्वासावर अधिकार आहे असे नाही, पण आम्ही तुमच्या आनंदासाठी तुमचे सहकारी आहोत; कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात.  

—–२ करिंथ २—–

कारण मी स्वतःशी ठरवले होते की, मी पुन्हा दुःख आणायला तुमच्याकडे येऊ नये. कारण मी जर तुम्हाला दुःखी केले, तर माझ्यामुळे दुःखी झाला आहे त्याच्याशिवाय मला आनंदित करणारा कोण आहे? आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्यांच्याविषयी मी आनंद करावा त्यांच्याकडून मला दुःख होऊ नये, कारण माझा आनंद हा तुमचा सर्वांचा आनंद आहे अशी तुमच्यामधील प्रत्येक जणाविषयी माझी खातरी आहे. कारण, मी दुःखाने व मनाच्या तळमळीने अश्रू गाळीत तुम्हाला लिहिले ते तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही,पण तुमच्यावर जी माझी विशेष प्रीती आहे ती तुम्ही ओळखावी म्हणून आहे.

जर कोणी दुःख दिले असेल, तर त्याने मला नाही, पण काही अंशी मी भर देत नाही तुमच्यामघील सर्वांना दुःखी केले आहे. अशा मनुष्याला ही बहुमताची शिक्षा पुरी आहे. म्हणून, उलट त्याला क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे; नाहीतर कदाचित् असा कोणीही फार मोठ्या दुःखात गिळला नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, त्याच्यावरील तुमची प्रीती स्थापित करा. कारण मी तुम्हाला ह्या हेतूने लिहिले आहे की, सर्व गोष्टींत तुम्ही आज्ञांकित आहा काय, ह्याचे प्रमाण मला कळावे. १०ज्या कोणाला तुम्ही कशाची क्षमा करता त्याला मीही करतो, कारण मी कशाची क्षमा केली असेल तर ज्या कोणाला मी क्षमा केली आहे, त्याला तुमच्याकरता, मी ख्रिस्ताच्या समक्षतेत केली आहे. ११नाहीतर, सैतान आपल्याला ठकवील; कारण आपण त्याचे विचार जाणत नाही असे नाही.

१२आणि पुढे जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी त्रोवसास आलो आणि प्रभूकडून माझ्यासाठी एक दार उघडले गेले, १३तेव्हा मला, माझ्या आत्म्यात काही स्वास्थ्य नव्हते, कारण माझा बंधू तीत मला भेटला नाही; पण मी त्यांची रजा घेतली आणि मी तेथून मासेदोनियास गेलो.

१४आता जो देव सतत आम्हाला ख्रिस्ताबरोबर विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा गंध प्रत्येक ठिकाणी आमच्या द्वारे प्रगट करतो त्या देवाला धन्यवाद! १५कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकांत आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकांत आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहो. १६पहिल्यांसाठी मरणाकडे नेणारा मरणाचा वास; आणि दुसर्‍यांसाठी जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत. आणि ह्या गोष्टींसाठी कोण लायक आहे? १७कारण दुसर्‍या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही; पण आम्ही शुद्ध भावाने, देवाचे म्हणून, देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.

—–२ करिंथ ३—–

आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करणे आरंभले काय? किंवा आम्हाला, दुसर्‍यांप्रमाणे, तुमच्याकरता किवा तुमच्याकडून शिफारसपत्रे हवीत काय? आमच्या मनावर लिहिले गेलेले आमचे पत्र तुम्ही आहात; ते सर्वांनी ओळखले आहे आणि वाचले आहे. कारण आम्ही आणलेले ख्रिस्ताचे पत्र तुम्ही आहा हे आता प्रगट झाले आहे; ते शाईने नाही, तर जिवंत देवाच्या आत्म्याने लिहिलेले, पण दगडी पाट्यांवर लिहिलेले नाही, तर मानवी मनांच्या पाट्यांवर आहे.
आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठायी आमचा असा विश्वास आहे. कोणतीही गोष्ट आमची गणण्यास आम्हीच लायक आहो असे नाही, पण आमची लायकी देवाकडून आहे. त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण आत्म्याद्वारे केलेला आहे; कारण लेख मरणाची शिक्षा देतो, पण आत्मा जिवंत करतो.

पण दगडावर कोरलेल्या अक्षरांत लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज पाहून त्याच्या तोंडाकडे टक लावू शकले नाहीत आणि ते नाहीसे होणार होते तर आत्म्याची सेवा कशी अधिक गौरवी होणार नाही? पण शिक्षेच्या सेवेत जर गौरव होते, तर नीतिमत्वाची सेवा ही गौरवात पुष्कळ अधिक असणार. १०कारण, ह्या बाबतीत जे गौरवी होते, त्याला अधिक मोठ्या गौरवामुळे गौरव राहिले नाही. ११कारण जे नाहीसे होणार होते ते जर गौरवी होते, तर राहणारे आहे ते अधिक गौरवी असणार. 
१२आम्हाला ही अशी आशा असल्यामुळे आम्ही बोलण्याच्या धिटाईचा अवलंब करतो; १३मोशेप्रमाणे करीत नाही; त्याने तोंडावर आच्छादन घातले ते ह्यासाठी की, जे नाहीसे होणार होते ते इस्राएल लोकांना शेवटपर्यंत बघता येऊ नये. १४पण त्यांची मने अंधळी केली गेली, कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे. १५पण आजपर्यंत ते आच्छादन, ते मोशेचे वाचन करीत असता, त्यांच्या मनावर घातलेले असते. १६पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल.
१७आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे स्वातंत्र्य आहे. १८पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्व जण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पहात असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे. 

—–२ करिंथ ४—–

म्हणून, आमच्यावर दया झाल्यामुळे, हे सेवकपण आमचे आहे, हे पाहून आम्ही खचत नाही. पण शरमेच्या गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही, किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही. पण देवाच्या दृष्टीपुढे, आम्ही सत्याचे प्रकटीकरण करून, प्रत्येक माणसाच्या विवेकाला आम्ही आमच्याविषयी खातरी देतो. पण आमची सुवार्ता आच्छादली गेली असेल तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी ती आच्छादली गेली आहे. जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवीत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही, पण येशू ख्रिस्त जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो, आणि येशूकरता आम्ही तुमचे दास आहोत. कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.

पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, ह्याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे. आम्ही प्रत्येक बाजूस नाडले गेलो, पण आम्ही नडवले गेलो नाही, आम्ही साशंक झालो, पण निराश झालो नाही, आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पाडले गेलो, पण नष्ट केले गेलो नाही. १०आम्ही निरंतर आमच्या शरिरात येशूचे मरण घेऊन फिरतो; म्हणजे आमच्या शरिरात येशूचे जीवनही  प्रगट व्हावे. ११कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशूकरता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत; म्हणजे आमच्या मर्त्य देहात येशूचे जीवनही प्रगट व्हावे. १२म्हणून, आमच्यात मरण, पण तुमच्यात जीवन हे कार्य करते.
१३मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी बोललो, हे लिहिल्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणून बोलतो; १४कारण आमच्यात तोच विश्वासाचा आत्मा आहे. कारण आम्ही हे जाणतो की, प्रभू येशूला ज्याने उठवले तो आपल्यालाही येशूबरोबर उठवील आणि आम्हाला तुमच्याबरोबर सादर करील. १५सर्व गोष्टी तुमच्याकरता आहेत, म्हणजे ही विपुल कृपा पुष्कळ जणांच्या उपकारस्मरणाने, देवाच्या गौरवार्थ बहुगुणित व्हावी.

१६म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील मनुष्यपण नाश पावत आहे, तरी आमचे आतील मनुष्यपण हे दिवसानुदिवस नवीन होत आहे. १७कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. १८आता आम्ही दिसणार्‍या गोष्टींकडे पहात नाही, पण न दिसणार्‍या गोष्टींकडे पाहतो. कारण दिसणार्‍या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्‍या गोष्टी सार्वकालिक आहेत.  

—–२ करिंथ ५—–

कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे पार्थिव मंडपाचे घर जर मोडले गेले तर आम्हाला स्वर्गात एक देवाची इमारत आहे; जे कोणी हातांनी बांधले नाही असे ते सार्वकालिक घर आहे. कारण आम्ही ह्यात कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचे पांघरूण आमच्यावर वरून घातले जावे म्हणून आम्ही उत्कंठित आहोत. म्हणजे, आमच्यावर पांघरूण घातले गेल्याने आम्ही उघडे आढळणार नाही. कारण ह्या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे पांघरूण काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमच्यावर वरून पांघरूण घातले जावे म्हणजे हे मर्त्यपण जीवनात गिळले जावे.
आणि ह्याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हाला तयार केले तो देव आहे; आणि त्यानेच आम्हाला आत्मा हा विसार दिला आहे. म्हणून आम्ही सतत धैर्य धरणारे आहोत; कारण आम्ही हे जाणतो की, आम्ही शरिरात रहात असताना प्रभूपासून दूर आहो. (७कारण आम्ही विश्वासाने चालतो, पाहून नाही;आम्ही धैर्य धरतो, आणि शरिरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत.
म्हणून आम्ही झटत आहो, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे. १०कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रगट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरिरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्याला त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किवा वाईट असेल.

११म्हणून आम्हाला प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्यांचे मन वळवतो; पण आम्ही देवाला प्रगट झालो आहो; आणि मी अशीही आशा धरतो की, आम्ही तुमच्या विवेकांत प्रकट झालो आहो. १२कारण तुमच्याजवळ आम्ही आमची पुन्हा प्रशंसा करीत नाही, पण तुम्हाला आमच्या बाबतीत अभिमानाला कारण देतो; म्हणजे, माणसाच्या अंतःकरणाविषयी नाही, पण त्याच्या बाहेरच्या स्थितीविषयी जे अभिमान मिरवतात त्यांच्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तर असावे. १३कारण आम्ही वेडे झालो असलो तर देवासाठी तसे आहोत, किवा समंजस मनाचे असलो तर तुमच्यासाठी तसे आहोत.
१४कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरते. कारण आम्ही असे मानतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, १५आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मेला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मेला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.

१६म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही. १७म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे; १८हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली; १९म्हणजे लोकांचे अपराध त्यांच्या हिशोबी न धरता, देव जगाचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करीत होता, आणि समेटाचे वचन त्याने आमच्यावर सोपविले.

२०तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हाला आमच्या द्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हाला विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा. २१कारण जो पाप जाणत नव्हता त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.  

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s