2 Corinthians 11-13

करिंथकरांस दुसरे पत्र

—–२ करिंथ ११—–

मी प्रार्थना करतो की, तुम्ही माझे थोडेसे मूर्खपण सहन करावे; तरी माझे सहन करा. कारण तुमच्या बाबतीत मी दैवी ईर्ष्येने ईर्ष्या धरली आहे; कारण मी एका पतीशी तुमचा वाङ् निश्चय केला आहे; म्हणजे तुम्हाला एक शुद्ध कुमारिका म्हणून, मी ख्रिस्ताला सादर करावे.
पण सापाने कपटाने हव्वेची फसवणूक केली, तशी तुमची मने तुमच्या ख्रिस्तावरील निष्ठेपासून कशामुळे तरी भ्रष्ट होतील अशी मला भीती वाटते. कारण, जर कोणीही येऊन, आम्ही ज्याची घोषणा केली नाही अशी दुसर्‍या येशूची घोषणा केली, किंवा तुम्हाला मिळाला नव्हता असा दुसरा आत्मा तुम्हाला मिळाला, किंवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता तुम्हाला मिळाली तर तुम्ही त्याचे सहन करता. कारण मी मानतो की, मी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा काहीच कमी नाही. आणि मी भाषेत अशिक्षित असलो तरी ज्ञानात नाही. आम्ही हे तुम्हाला सर्व गोष्टींत, सर्व प्रकारे, प्रगट केले. तुम्ही मोठे केले जावे म्हणून मी स्वतःला लहान केले; कारण मी तुम्हाला देवाची सुवार्ता फुकट गाजविली ह्यात मी अपराध केला काय? तुमची सेवा करण्याकरता मी दुसर्‍या मंडळ्यांना, त्यांचे वेतन घेऊन लुटले. जेव्हा मी तुमच्याबरोबर होतो आणि मला कमी पडले, तेव्हा मी कोणावर भार घातला नाही; कारण मला जे कमी होते ते मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी पुरवले; आणि तुम्हाला भारभूत होण्यापासून मी स्वतःस सर्वस्वी संभाळले आहे, आणि संभाळीन. १०ख्रिस्ताचे सत्य माझ्यात असल्यामुळे माझा हा अभिमान, ह्या अखयाच्या भागात कोणी बंद करणार नाही.
११का? कारण मी तुमच्यावर प्रीती करीत नाही? देव जाणतो. १२तरी मी जे करीत आहे ते मी करीत राहीन. म्हणजे त्यांना जे कारण पाहिजे आहे ते मी त्यांच्यासाठी ठेवू नये. ते त्यांना ह्यासाठी हवे आहे की, ते ज्या कामात अभिमान मिरवतात त्यात ते आमच्यासारखे दिसावेत. १३कारण हे खोटे प्रेषित, फसवे कामकरी ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप घेत आहेत. १४आणि आश्चर्य नाही; कारण स्वतः सैतानाने प्रकाशाच्या देवदूताचे रूप घेतले आहे. १५मग जर त्याच्या सेवकांनाही नीतिमत्वाच्या सेवकांचे रूप देण्यात आले, तर काही मोठेसे झाले नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कामांप्रमाणे होईल.
१६मी पुन्हा सांगतो की, मला कोणीही मूर्ख समजू नये; पण, तुम्ही समजत असल्यास माझा मूर्ख म्हणून स्वीकार करा. म्हणजे मला स्वतःला थोडासा अभिमान मिरवता येईल. १७मी हे बोलत आहे ते प्रभूला अनुसरून बोलत नाही, पण मी ह्या अभिमानाच्या धीटपणाने, जणू हे मूर्खपणाने बोलतो. १८जसे पुष्कळ लोक दैहिक दृष्ट्या अभिमान मिरवतात तसा मी पण अभिमान मिरवीन. १९कारण तुम्ही शहाणे आहात म्हणून मूर्खाचे आनंदाने सहन करता. २०कारण कोणी तुम्हाला दास्यात नेले, कोणी गिळले, कोणी धरले, कोणी स्वतःला वरचढ केले, कोणी तुमच्या तोंडात मारले तर तुम्ही त्याचे सहन करता. २१आम्ही जणू दुर्बळ होतो म्हणून मी हे स्वतःस दोष लावून बोलतो.

२२पण कोणी ज्या कशात धीट असेल त्यात मीही धीट आहे (मी हे मूर्खपणाने बोलतो). ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीही आहे. ते अब्राहामाचे वंशज आहेत काय? मीही आहे. २३ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? (मी हे वेड्याप्रमाणे बोलतो) मी अधिक आहे. कष्टांत पुष्कळ अधिक आहे, अधिक वेळा तुरुंगात होतो, प्रमाणाबाहेर फटके खाण्यात अधिक आहे, अनेक वेळा मरणात सापडलो. २४मला यहुद्यांकडून पाचदा एकूणचाळीस फटके मिळाले. २५तीनदा मला छड्यांनी मारले, एकदा दगडमार केला गेला, तीनदा माझे गलबत फुटले; एक रात्र आणि एक दिवस मी तुरुंगात होतो. २६पुष्कळ वेळा प्रवास करताना पुरांमुळे संकटे आली, लुटारूंमुळे संकटे आली, माझ्या लोकांमुळे संकटे आली, आणि परजनांमुळे संकटे आली; नगरात संकटे आली, रानात संकटे आली, समुद्रावर संकटे आली, खोट्या बांधवांमुळे संकटे आली; २७काम करताना दगदग काढली, पुष्कळ वेळा जागरणे काढली, भूक काढली, तहान काढली, पुष्कळ वेळा उपास काढले, थंडी सोसली, वस्त्राची वाण सहन केली.
२८आणि इतर गोष्टींशिवाय माझ्यावर चालून येत आहे ती मंडळीची काळजी. २९कोण दुर्बळ झाला आहे आणि मी दुर्बळ झालो नाही? कोणाला अडथळा केला गेला आणि मी संतप्त झालो नाही?
३०मला जर अभिमान मिरवणे भाग असेल, तर मी माझ्या अशक्तपणाच्या गोष्टींविषयी अभिमान मिरवीन. ३१आपल्या प्रभू येशूचा देव आणि पिता युगानुयुग धन्यवादित आहे; तो हे जाणतो की, मी खोटे बोलत नाही.
३२दिमिष्कात मला धरण्यासाठी अरीतास राजाच्या सुभेदाराने दिमिष्क्यांच्या नगरावर पहारा ठेवला. ३३पण मला पेटार्‍यात बसवून, खिडकीतून तटावरून उतरवण्यात आले आणि मी त्याच्या हातांतून सुटलो.

—–२ करिंथ १२—–

मला अभिमान मिरवणे भाग आहे; हे उचित नाही पण मी प्रभूच्या दर्शनांकडे व प्रकटीकरणांकडे येत आहे. मला एक ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे; तो चौदा वर्षांपूर्वी (सशरीर की अशरीर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) तिसर्‍या स्वर्गापर्यंत नेला गेला. तो मला माहीत आहे. आणि असा तो मनुष्य (सशरीर की अशरीर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) सुखलोकात उचलून नेला गेला व ज्या गोष्टी माणसाने बोलणे योग्य नाही अशा गुप्त गोष्टी त्याने ऐकल्या. मी अशा मनुष्याविषयी अभिमान मिरवीन. पण मी माझ्या अशक्तपणाशिवाय माझ्याविषयी काही अभिमान मिरवणार नाही. कारण आपण अभिमान मिरवावा अशी जरी मी इच्छा धरली, तरी मी मूर्ख होणार नाही, कारण मी जे खरे ते बोलेन; पण मी स्वतःस आवरले पाहिजे. म्हणजे कोणी जे माझे पाहतो किवा ऐकतो त्याहून त्याने मला अधिक मानू नये. आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे, मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये, म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्‍या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली, आणि त्याने मला म्हटले की, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते. म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे; १०आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारांत, अपमानांत व आपत्तींत, पाठलागांत आणि दुःखांत मी संतुष्ट असतो. कारण मी जेव्हा दुर्बळ आहे तेव्हा मी बलवान आहे.

११मी मूर्ख झालो, तुम्ही मला भाग पाडले; तुम्ही माझ्याविषयी खातरी द्यायला पाहिजे होती कारण मी काहीच नसलो, तरी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही गोष्टीत कमी नाही. १२खरोखर पूर्ण सोशिकपणाने चिन्हे, अद्भुते व चमत्कार घडवून तुमच्यात प्रेषितांची चिन्हे करण्यात आली. १३कारण मी स्वतः तुमच्यावर भार घातला नाही ह्या एका गोष्टीशिवाय तुम्ही दुसर्‍या कोणत्या गोष्टीत दुसर्‍या मंडळ्यांपेक्षा कमी आहात? मला ह्या अपराधाची क्षमा करा.
१४बघा, मी तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे, आणि तुमच्यावर भार घालणार नाही; कारण मी तुमचे मिळवू पहात नाही, पण मी तुम्हाला मिळवू पाहतो. कारण मुलांनी आईबापांसाठी साठवू नये, पण आईबापांनी मुलांसाठी साठवले पाहिजे. १५मी तुमच्या जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन आणि खर्ची पडेन. मी जर तुमच्यावर फार प्रीती केली तर माझ्यावर कमी प्रीती केली जावी काय?
१६असे असेल; मी तुमच्यावर भार घातला नाही पण मी धूर्त असल्यामुळे मी तुम्हाला युक्तीने धरले. १७मी तुमच्यासाठी ज्यांना पाठविले अशा कोणाकडून मी तुमचा फायदा घेतला काय? १८मी तीताला विनंती केली आहे आणि मी एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवीत आहे. तीताने तुमच्याकडून फायदा मिळवला काय? आम्ही एकाच आत्म्याने चाललो नाही काय? एकाच चालीने चाललो नाही काय?
१९तुम्हाला इतका वेळ वाटत असेल की, आम्ही तुमच्यापुढे आमचे समर्थन करीत आहो, आम्ही देवासमोर ख्रिस्तात बोलत आहो; आणि, प्रियांनो, सर्व गोष्टी तुमच्या उभारणीसाठी आहेत.
२०कारण मला भीती वाटते की, मी येईन तेव्हा, मी अपेक्षा करीत असेन तसे, कदाचित्, तुम्ही मला आढळणार नाही; आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हाला आढळेन. कदाचित्, तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध, कुरकुरी, रुसवे व गोंधळ मला आढळून येतील. २१किंवा मी पुन्हा येईन तेव्हा माझा देव तुमच्यासमोर मला लीन करील, आणि ज्यांनी पाप केले असून आपण केलेल्या अमंगळपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा ज्यांनी पश्चात्ताप केलेला नाही अशा पुष्कळ जणांसाठी मला शोक करावा लागेल.   

—–२ करिंथ १३—–

मी आता तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येत आहे. दोन किवा तीन साक्षींच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध होईल. ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि दुसर्‍या सगळ्यांना मी अगोदर सांगितले होते, आणि दुसर्‍या वेळी स्वतः आलो होतो तेव्हाप्रमाणे आता दूर असताना मी आधी सांगतो की, मी जर पुन्हा आलो तर गय करणार नाही; कारण माझ्या द्वारे ख्रिस्त बोलतो ह्याचे तुम्ही प्रमाण मानता; तो तुमच्यात दुर्बळ नाही पण तुमच्यात समर्थ आहे. कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे. कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.
तुम्ही विश्वासात राहता काय, म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा, आपली स्वतःची पारख करा. तुम्हाला आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही कसोटीस न उतरलेले आहात. मी आशा करतो की, आम्ही कसोटीस न उतरलेले नाही हे तुम्ही ओळखाल. आता देवाजवळ मी हे मागतो की, तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही कसोटीस उतरलेले दिसावे म्हणून नाही, पण आम्ही कसोटीस न उतरलेले असलो तरी तुम्ही चांगले ते करावे. कारण आम्ही सत्याविरुद्ध काही करू शकत नाही, पण सत्यासाठी करू शकतो.
जेव्हा आम्ही दुर्बळ आहो व तुम्ही बलवान आहा तेव्हा आम्ही आनंद करतो व तुमच्यात अधिकाधिक सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. १०एवढ्याकरता दूर असताना मी ह्या गोष्टी लिहीत आहे, म्हणजे प्रभूने मला जो अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे, नाश करण्यास नाही, त्याचा उपयोग करून, मी तेथे असताना कडकपणा वापरू नये.

११शेवटी, जयजय. बंधूंनो, तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा; आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील. १२पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. १३तुम्हाला येथील सर्व पवित्र जन सलाम पाठवतात.

१४प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.


Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s