2 Peter

पेत्राचे दुसरे पत्र

—–२ पेत्र १—–

येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून;
ज्यांना देवाच्या व तारणकर्त्या येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वामुळे आमच्यासारखा, समान मानाचा विश्वास मिळाला आहे अशा सर्वांसः
तुम्हास देवाच्या आणि आपल्या प्रभू येशूच्या ज्ञानाद्वारे कृपा व शांती बहुगुणित मिळोत.

ज्याने आपल्याला गौरवात व चांगुलपणात बोलावले आहे, त्याच्याविषयीच्या ज्ञानाद्वारे, त्याने आपल्याला, त्याच्या स्वतःच्या दैवी सामर्थ्याने जीवनाविषयी व सुभक्तीविषयी सर्व गोष्टी दिल्या आहेत. त्यांत त्याने आपल्याला अतिमहान व मोलवान वचने दिली आहेत; म्हणजे त्यायोगे तुम्ही वासनेमुळे जगात आलेल्या भ्रष्टतेतून बाहेर निघून देवाच्या स्वभावात भागीदार व्हावे.
म्हणून पूर्ण प्रयत्न करीत तुमच्या विश्वासात चांगुलपणा मिळवा,  चांगुलपणात ज्ञान, ज्ञानात संयमन, संयमनात धीर, धीरात सुभक्ती, सुभक्तीत बंधुप्रेम आणि बंधुप्रेमात प्रीती मिळवा. कारण ह्या गोष्टी तुमच्यात असल्या आणि वाढत गेल्या तर त्या तुम्हाला आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानात पुढे जाण्यास निरुपयोगी किवा निष्फळ करणार नाहीत. पण ह्या गोष्टींची ज्याच्यात उणीव आहे तो अंधळा आहे; त्याला दूरचे पाहता येत नाही; आणि त्याच्या जुन्या पापांपासून त्याची शुद्धी झाली होती हे तो विसरला आहे.
१०म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यास तुम्ही विशेष प्रयत्न करा. ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधीही पतन पावणार नाही. ११त्यायोगे तुम्हाला आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात संपन्नतेने प्रवेश दिला जाईल.

१२ह्या कारणामुळे, जरी तुम्ही ह्या गोष्टी जाणता, आणि प्रगट झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहा, तरी नेहमीच मी तुम्हाला त्यांची आठवण देईन. १३मी ह्या मंडपात असेपर्यंत तुम्हाला आठवण देऊन चालना द्यावी,हे मला उचित वाटते. १४कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला दर्शविल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल. १५आणि माझे निर्गमन झाल्यानंतर ह्या गोष्टी, सतत तुमच्या स्मरणात रहाव्या म्हणून तोवर मी झटत राहीन.

१६कारण आम्ही तुम्हाला आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या सामर्थ्याविषयी व येण्याविषयी जे कळवले आहे, ते सुबुद्ध केलेल्या कहाण्या घेऊन आम्ही कळवले नाही, पण आम्ही त्याच्या वैभवाचे प्रत्यक्ष साक्षी झालो होतो. १७कारण जेव्हा देवपित्याकडून त्याला मान व गौरव मिळाले तेव्हा श्रेष्ठ गौरवाद्वारे त्याच्यापर्यंत वाणी आली की, हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. १८ही आकाशातून आलेली वाणी त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर आम्ही होतो तेव्हा ऐकली. १९आणि आम्हाला अधिक निश्चित असे संदेशाचे वचन आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल.
२०तुम्ही प्रथम हे जाणा की, शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही. २१कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, पण पवित्र आत्म्याने चालना दिलेल्या मनुष्यांनी देवाकडून संदेश दिले. 

—–२ पेत्र २—–

पण त्या लोकांत खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील, आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील. पुष्कळ जण त्यांच्या कामातुरपणाचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निदा होईल. आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांचा ठरलेला न्यायनिवाडा खोळंबून नाही, त्यांचा नाश निजून नाही.
कारण जर देवाने पाप करणार्‍या देवदूतांनाही राखले नाही, पण नरकात लोटून, गडद काळोखाच्या भुयारात न्यायासाठी अटकेत ठेवले; जर त्याने पहिले जग राखले नाही, पण अभक्तांच्या त्या जगावर जलप्रलय आणून, नीतिमत्वाचा उपदेशक नोहा ह्यालाच केवळ इतर सातांसहित सुरक्षित ठेवले; जर त्याने सदोम व गमोरा ह्या नगरांची राख करून त्यांना नाशाची शिक्षा दिली व पुढे जे लोक अभक्तीने वागतील त्यांच्यासाठी त्यांचे उदाहरण ठेवले, आणि तेथील दुराचार्‍यांचे, कामतुरपणाचे वागणे पाहून त्रस्त झालेल्या नीतिमान लोटाला त्याने सोडवले; (कारण तो नीतिमान माणूस त्यांच्यात राहून पहात असता व ऐकत असता, त्यांच्या स्वैर कृत्यांमुळे, दिवसानुदिवस, त्याच्या नीतिमान जिवाला यातना होत होत्या; ९-१०तर जे धार्मिक आहेत त्यांना त्यांच्या परीक्षांतून कसे सोडवावे व जे अनीतिमान आहेत त्यांना, पण अधिक विशेषेकरून, जे लोक आपल्या देहाला अनुसरून अमंगळपणाच्या वासनेत चालतात व शासनाचा उपहास करतात त्यांना, न्यायाचा दिवस येईपर्यंत, शिक्षेसाठी कसे राखावे हे परमेश्वर जाणतो. 
स्वैर, स्वच्छंदी असे हे लोक! सत्तांविषयी वाईट बोलण्यात हे कचरत नाहीत! ११पण त्यांच्यापेक्षा शक्तीने व सामर्थ्याने मोठे असलेले देवदूतसुद्धा, त्यांच्याविरुद्ध परमेश्वरापुढे निदेने आरोप आणीत नाहीत.
१२पण जे निर्बुद्ध प्राणी, नैसर्गिक रीत्या, धरले जाण्यास व मारले जाण्यास जन्मास येतात त्यच्याप्रमाणे हे स्वतःला न समजणार्‍या गोष्टींविषयी वाईट बोलतात; आणि स्वतःच्या भ्रष्टतेत नाश पावतील. १३त्यांचे वाईट होईल ह्यात त्यांना त्यांच्या वाईट करण्याचे प्रतिफळ मिळेल.
ते दिवसाच्या ख्यालीखुशालीत सुख मानतात; ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर ते जेवतात तेव्हा ते दंगली करून मजा करतात. १४त्यांच्या डोळ्यांत जणू वेश्या भरलेली असते; त्यांना पापापासून दूर राहवत नाही. ते अस्थिर जिवांना भुरळ घालतात; त्यांनी लोभाच्या प्रकारांनी आपल्या मनाला वळण लावले आहे. शापित मुले! १५ते सरळ मार्ग सोडून बहकलेत, आणि, बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गास लागलेत; त्याला अनीतीचे वेतन प्रिय वाटले. १६तरी त्याच्या अनाचाराचा निषेध झाला; मुक्या गाढवीने माणसासारख्या आवाजात बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला अटकाव केला.
१७ते पाणी नसलेले झरे आहेत, ते वार्‍याने विखरलेले ढग आहेत, आणि अंधाराचा गडद काळोख त्यांच्यासाठी राखलेला आहे. १८कारण जेव्हा, चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भुरळ घालतात. १९ते त्यांना स्वातंत्र्याचे वचन देतात तेव्हा स्वतः भ्रष्टतेचे दास असतात; कारण, मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दास होतो. २०कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे ज्ञान होऊन, ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून, जर स्वतःला असहाय्य करून घेतले, तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते. २१कारण, त्यांना नीतिमत्वाचा मार्ग कळल्यावर, त्यांनी दिलेली पवित्र आज्ञा सोडून देऊन त्यांनी मागे फिरावे, हे होण्यापेक्षा, त्यांना त्याचे ज्ञान झाले नसते तर त्यांच्यासाठी ते बरे झाले असते. २२कारण, कुत्रे आपल्या ओकीकडे पुन्हा फिरते, आणि धुतली डुकरीण लोळीसाठी घाणीत शिरते, ह्या सार्थ म्हणीप्रमाणे हे त्यांच्या बाबतीत झाले आहे.

—–२ पेत्र ३—–

आता प्रियांनो, हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहीत आहे, आणि, तुम्हाला ह्यातून आठवण देऊन तुमच्या शुद्ध बुद्धीला चालना देत आहे. म्हणजे, पवित्र संदेष्ट्यांनी अगोदर सांगितलेल्या वचनांची, आणि जो आपला प्रभू व तारणारा आहे त्याने तुमच्या प्रेषितांद्वारे तुम्हाला कळविलेल्या त्याच्या आज्ञेची तुम्ही आठवण ठेवावी. प्रथम जाणा की, शेवटल्या दिवसांत, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालून, थट्टा करणारे थट्टा करीत येतील, आणि म्हणतील की, त्याच्या येण्याचे वचन कोठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी पृथ्वीच्या प्रारंभापासून होत्या तशाच राहिल्या आहेत.
कारण, ते बुद्ध्या विसरतात की, देवाच्या शब्दाने पूर्वी आकाश झाले; आणि पाण्याबाहेर व पाण्याच्या मध्यंतरी पृथ्वी स्थिर झाली. आणि त्यायोगे, तेव्हाच्या जगावर पाण्याचा पूर येऊन ते नष्ट झाले. पण, आता आकाश व पृथ्वी आहेत, ती त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली असून, ती न्यायाच्या व अभक्तांच्या नाशाच्या दिवसासाठी राखलेली आहेत.
पण प्रियांनो, तुम्ही एक गोष्ट विसरू नये की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसमान, आणि हजार वर्षे एका दिवसासमान आहेत. आणि, लोक विलंब मानतात त्या प्रकारे, प्रभू त्याच्या स्वतःच्या वचनाविषयी विलंब करीत नाही. उलट, लोकांचा नाश होऊ नये, तर प्रत्येक जणाला पश्चात्तापाला वाव मिळावा म्हणून तो तुमच्याशी सहनशील आहे. १०पण रात्री जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल व आकाश फडफड करीत निघून जाईल, सृष्टितत्त्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील सर्व कामांसहित जळून जाईल.

११ह्या सर्व गोष्टी जर नष्ट होणार आहेत तर तुम्ही स्वतः पवित्र आचरणात व सुभक्तीत कसे असले पाहिजे?१२पण देवाच्या दिवसाच्या आगमनाची वाट पहात त्यासाठी झटत रहा. त्यामुळे आकाश नष्ट होईल आणि सृष्टितत्त्व तापून विरघळतील. १३पण, जेथे नीतिमत्व राहते, अशा नव्या आकाशाची व नव्या पृथ्वीची आपण त्याच्या वचनानुसार वाट पहात आहो.
१४म्हणून प्रियांनो, जर अशा गोष्टींची तुम्ही वाट पाहता, तर तुम्ही स्वतः निर्दोष व निष्कलंक असे शांतीत आढळावे म्हणून झटा. १५पण आपल्या प्रभूची सहनशीलता हे तारण आहे असे गणा. आपला प्रिय बंधू पौल ह्याने त्याला दिल्या गेलेल्या ज्ञानीपणाने हेच तुम्हाला लिहिले आहे. १६तसेच त्याच्या सर्व पत्रांत तो ह्या गोष्टींविषयी सांगतो; त्यांतील काही समजण्यास कठिण आहेत. आणि जे अशिक्षित व अस्थिर आहेत ते आपल्या स्वतःच्या नाशासाठी, इतर शास्त्रलेखांप्रमाणे, त्यांचा विपरीत अर्थ लावतात.
१७म्हणून प्रियांनो, तुम्हाला ह्या गोष्टी आधी कळल्या आहेत म्हणून तुम्ही काळजी घ्या की, दुराचार्‍यांच्या संभ्रमात ओढले जाऊन, आपल्या स्थैर्यापासून ढळू नये; १८आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेने व त्याच्याविषयीच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी. त्याला आता आणि युगानुयुग गौरव असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s