तिमथ्याला दुसरे पत्र
—–२ तिमथ्य १—–
१देवाच्या इच्छेने, ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या वचनानुसार ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याजकडून;
२प्रिय पुत्र तिमथ्य ह्यासः
देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून कृपा, दया व शांती.
३मी शुद्ध विवेकाने ज्या देवाची पूर्वजांपासून सेवा करतो त्याचे मी उपकार मानतो, कारण रात्रंदिवस माझ्या विनवण्यांत मी तुझी निरंतर आठवण करतो; ४आणि तुझ्या अश्रूंची आठवण होऊन मला असे फार वाटले की,तुला भेटून मी आनंदाने भरून जावे. ५तुझ्यात असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण आली. तो प्रथम, तुझी आजी लोईस हिच्या ठायी आणि तुझी आई युनिके हिच्या ठायी वास करीत होता, आणि माझी खातरी आहे की, तसाच तो तुझ्या ठायी वास करीत आहे. ६म्हणून मी तुला आठवण देतो की, माझे हात ठेवण्याकडून जे देवाचे कृपादान तुझ्यात आले आहे ते प्रज्वलित ठेव.
७कारण देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. ८म्हणून, आपल्या प्रभूच्या साक्षीची व त्याचा बंदिवान असलेल्या माझी तू लाज धरू नकोस, पण तू देवाच्या सामर्थ्याने, सुवार्तेकरता दुःख सोसण्यात सहभागी हो. ९त्याने आपल्या कामांप्रमाणे आपल्याला तारले असे नाही, पण त्याच्या स्वतःच्या योजनेप्रमाणे व कृपेप्रमाणे तारले आहे, आणि पवित्र पाचारणाने बोलावले आहे; ही कृपा त्याने आपल्याला, युगांचा आरंभ होण्याअगोदर, ख्रिस्त येशूच्या द्वारे दिली. १०पण आपले तारण करणार्या ख्रिस्त येशूच्या आगमनाने आता ती प्रगट झाली आहे. त्याने मरण नष्ट केले आणि सुवार्तेद्वारे जीवन व अमरपण प्रकाशात आणले. ११आणि मी, ह्या सुवार्तेसाठी, उपदेशक व प्रेषित, आणि शिक्षक म्हणून नेमलो गेलो आहे. १२आणि ह्या कारणाकरता मी ह्या गोष्टी सोशीतही आहे; पण मी लाजत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला ओळखतो, आणि माझी खातरी आहे की, मी त्याच्यावर सोपविलेली ठेव तो त्या दिवसासाठी सुरक्षित ठेवण्यास समर्थ आहे.
१३तू जे माझ्याकडून ऐकले आहे ते चांगल्या वचनांचे उदाहरण म्हणून तू ख्रिस्त येशूवरील विश्वासात व प्रीतीत आपल्याजवळ ठेव. १४ती तुझ्यावर सोपविलेली चांगली ठेव आहे; ती आपल्यात राहणार्या पवित्र आत्म्याच्या योगे संभाळ.
१५तू जाणतोस की, आसियात आहेत ते सगळे माझ्यापासून फुटले आहेत. त्यांच्यातले फुगल व हर्मगेन हे आहेत. १६अनेसिफरच्या घरच्यांना प्रभू दया दाखवो. कारण त्याने पुष्कळदा माझे समाधान केले आहे व त्याला माझ्या बेडीची लाज वाटली नाही. १७उलट, तो जेव्हा रोमला आला तेव्हा माझ्याविषयी लगेच विचारून त्याने मला शोधून काढले. १८प्रभू त्याला असे देवो की, त्याला प्रभूकडून, त्या दिवशी, दया मिळावी. त्याने इफिसात किती प्रकारे सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
—–२ तिमथ्य २—–
१ह्यासाठी, माझ्या मुला, तू ख्रिस्त येशूतील कृपेत बलवान हो; २आणि, माझ्याकडून तू ज्या गोष्टी पुष्कळ साक्षींच्या समोर ऐकल्या आहेस, त्या जे दुसर्यांसही शिकवू शकतील अशा विश्वासू मनुष्यांवर सोपव.
३ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई म्हणून दुःख सोसण्यात सहभागी हो. ४शिपाईगिरी करणारा कोणीही मनुष्य, ज्याने त्याला शिपाई केले असेल त्याला संतुष्ट करावे म्हणून, स्वतःला आयुष्याच्या गोष्टींत गुंतवीत नाही. ५कुस्ती खेळणारा मनुष्यदेखील नियमाप्रमाणे कुस्ती खेळल्याशिवाय त्याला मुगुट घालीत नाहीत. ६आणि, कष्ट करणारा शेतकरीही त्याच्या पिकाचा पहिला वाटेकरी झाला पाहिजे.
७मी जे म्हणतो त्यावर विचार कर, आणि प्रभू तुला सर्व गोष्टींत बुद्धी देईल. ८दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त, हा माझ्या सुवार्तेप्रमाणे, मेलेल्यांतून उठवला गेला ह्याची आठवण ठेव. ९ह्यासाठी, मी गुन्हेगार म्हणून, ह्या बेड्यांत दुःख सोशीत आहे; पण देवाचे वचन बंधनात नाही. १०म्हणून निवडलेल्यांकरता मी सर्व गोष्टी सहन करतो. म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूत असलेले तारण सनातन गौरवासहित मिळावे. ११आणि हे एक विश्वसनीय वचन आहेः
कारण आपण त्याच्याबरोबर मेलोत,
तर तसेच त्याच्याबरोबर जगू.
१२आपण सोसले,
तर त्याच्याबरोबर राज्यही करू.
आपण जर त्याला नाकारले
तर आपल्याला तोही नाकारील.
१३आपण विश्वासू राहिलो नाही,
तरी तो विश्वासू राहतो;
तो स्वतःस नाकारू शकत नाही.
१४ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे व प्रभूपुढे निक्षून सांग की, त्यांनी शाब्दिक वाद लढवू नये; त्यामुळे काही लाभ न होता ऐकणार्यांची हानीच होते.
१५तू स्वतः आपल्याकडून, सत्याच्या वचनाची नीट फोड करण्यात लाज वाटण्याचे कारण नसलेला व कसोटीस उतरलेला कामकरी म्हणून, स्वतःस देवासमोर ठेवण्याचा प्रयत्न कर. १६पण अभक्तीच्या वटवटींपासून दूर रहा; कारण अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिकाधिक पुढे जातील, १७आणि त्यांची शिकवण पुळीसारखी चरत जाईल. हुमनाय व फिलेत हे त्यांच्यातलेच आहेत; १८ते सत्यापासून बहकले आहेत; पुनरुत्थान आधीच झाले असे ते सांगतात व पुष्कळांचा विश्वास कोलमडून टाकतात.
१९पण देवाने घातलेला स्थिर पाया उभा आहे; आणि त्यावर असा शिक्का आहे की, ‘परमेश्वर आपले लोक ओळखतो’ व ‘परमेश्वराचे नाव घेणारा अनीतीपासून दूर राहो’.
२०पण एखाद्या मोठ्या घरात सोन्यारुप्याचीच पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात; आणि काही मानासाठी, तर काही अपमानासाठी असतात. २१म्हणून कोणी जर अशा गोष्टी आपल्यामधून साफ काढील, तर तो एक पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी व प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले, मानाचे पात्र होईल.
२२त्याचप्रमाणे तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ; आणि शुद्ध मनाने, प्रभूचा धावा करणार्यांबरोबर, तू नीती, विश्वास, प्रीती व शांती ह्यांच्यामागे लाग. २३पण मूर्खपणाचे व अशिक्षितपणाचे वाद टाळीत जा; कारण ते भांडणे उत्पन्न करतात हे तू जाणतोस. २४म्हणून प्रभूच्या दासाने भांडू नये; तो सर्वांशी सौम्य व शिक्षकवृत्तीचा, आणि वाइटांशी सहनशील असला पाहिजे. २५त्याने विरोध करणार्यांना सौम्यतेने शिक्षण द्यावे. कारण त्यांना सत्याचे ज्ञान व्हावे म्हणून देव कदाचित् पश्चात्ताप देईल, २६आणि त्याने, त्याच्या इच्छेप्रमाणे, त्यांना जिकल्यास ते सैतानाच्या पाशातून सुटून शुद्धीवर येतील.
—————————–
२:११-१३ मूळ ग्रीक भाषेत हे एक गीत असावे
—–२ तिमथ्य ३—–
१तू हेही जाण की, शेवटच्या दिवसांत फार कठिण काळ येतील. २लोक स्वतःवर प्रेम करणारे, तसेच पैशावर प्रेम करणारे, प्रौढी मिरवणारे व गर्विष्ठ होतील; दुर्भाषणी व आईबापांचा अवमान करणारे, कृतघ्न व अपवित्र होतील; ३ममताहीन, असहिष्णू, निंदक, संयमहीन व क्रूर, चांगुलपणाचा द्वेष करणारे, ४घातकी, हूड व गर्वाने फुगलेले, देवावर प्रेम करणारे नाही, पण सुखावर प्रेम करणारे होतील; ५ते सुभक्तीचे स्वरूप घेतील पण ते तिचे सामर्थ्य नाकारतील; अशांपासून दूर जा.
६-७अशा प्रकारचे काही लोक हळू हळू घरांत शिरतात, आणि पापांनी भारावलेल्या, नाना वासनांनी ओढल्या जाणार्या, आणि सदा शिकत असता सत्याच्या ज्ञानाप्रत जाऊ शकत नाहीत अशा दुर्बळ स्त्रियांना कह्यात घेतात. ८आणि जसे यान्नेस व यांब्रेस मोशेविरुद्ध उभे राहिले तसेच हे सत्याविरुद्ध उठतात; हे लोक भ्रष्ट मनाचे असतात, आणि विश्वासाच्या बाबतीत कसोटीस न उतरलेले आढळतात. ९हे लोक अधिक पुढे जाणार नाहीत; कारण त्यांचे मूर्खपण उघड झाले तसेच ह्यांचेही होईल.
१०तू माझी शिकवण जाणतोस; त्याचप्रमाणे माझी वागणूक व माझा निर्धार, माझा विश्वास व माझी सहनशीलता, माझी प्रीती व माझा धीर, ११माझे छळ व माझी दुःखे, म्हणजे अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात काय झाले व मी काय छळ सोसले हे तू जाणतोस. पण प्रभूने सर्वांतून मला सोडविले. १२आणि, असे सुभक्तीने जे ख्रिस्त येशूत जगू इच्छितील त्या सर्वांचा छळ होईल. १३पण दुष्ट लोक व दांभिक लोक हे फसवीत राहून व फसत राहून अधिक वाईट होत जातील.
१४पण तू ज्या गोष्टी शिकला आहेस व ज्यांची तुला खातरी पटली आहे त्यांत तू टिकून रहा; तू कोणाकडून शिकला आहेस हे तू जाणतोस. १५तू बाळ होतास तेव्हापासून तू पवित्र लेख जाणतोस; आणि ते तुला ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे तारणासाठी सुबुद्ध करण्यास समर्थ आहेत.
१६प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने दिलेला आहे; आणि शिकवणीसाठी, निषेधासाठी, सुधारणेसाठी व नीतिमत्वाच्या शिस्तीसाठी उपयोगी आहे. १७म्हणजे देवाचा मनुष्य सज्ज होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सुसज्ज व्हावा.
—–२ तिमथ्य ४—–
१मी तुला देवासमक्ष, आणि, जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करणार आहे त्याच्या समक्ष, त्याच्या आगमनाची व त्याच्या राज्याची आठवण देऊन हे निक्षून सांगतो की, २तू वचनाची घोषणा कर; सुवेळी आणि अवेळी तयार रहा; दोष दाखव, निषेध कर आणि सर्व प्रकारे सहनशीलतेने व शिक्षणाने उत्तेजन दे. ३कारण, असा काळ येणार आहे की, तेव्हा ते चांगली शिकवण सहन करणार नाहीत; आणि त्यांचे कान खाजत असल्यामुळे, ते आपल्या वासनांप्रमाणे आपल्यासाठी शिक्षक जमवतील. ४ते सत्याकडून कान वळवतील व कहाण्यांकडे वळवले जातील.
५पण तू सर्व गोष्टींत सावध रहा, दुःख सोस, सुवार्तिकाचे काम कर आणि तुझी सेवा पूर्ण कर.
६आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. ७मी चांगली लढाई लढलो आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखला आहे. ८आतापासून माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुगुट ठेवलेला आहे; आणि नीतिमान न्यायाधीश प्रभू, त्या दिवशी तो मला देईल. आणि केवळ मलाच नाही, पण त्याच्या आगमनाची आवड धरणार्या सर्वांनाच देईल.
९तू माझ्याकडे लवकर यायचा प्रयत्न कर. १०देमास ह्याला आताचे युग प्रिय वाटल्यामुळे तो मला सोडून थेसलनिकेला गेला आहे; क्रेस्केस गलतियास व तीत दालमातियास गेला आहे. ११केवळ लूक माझ्याबरोबर आहे. मार्काला घेऊन तुझ्याबरोबर आण; कारण तो मला सेवेसाठी उपयोगी आहे. १२तुखीक ह्याला मी इफिस येथे पाठविले आहे.
१३मी त्रोवसात कार्पाजवळ ठेवलेला झगा तू येशील तेव्हा घेऊन ये; त्याचप्रमाणे पुस्तके, आणि विशेषतः चर्मपत्रे घेऊन ये. १४अलेक्झांदर तांबटाने माझे फार वाईट केले. प्रभू त्याच्या कामांप्रमाणे त्याला प्रतिफळ देईल. १५त्याच्यापासून तूही सावध रहा; कारण त्याने आमच्या भाषणांना पुष्कळ विरोध केला आहे.
१६माझ्या पहिल्या प्रत्युत्तराच्या वेळी कोणीही माझ्याबरोबर उभा राहिला नाही; पण सगळ्यांनी मला सोडले. हे त्यांच्याविरुद्ध गणले न जावो. १७तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, आणि माझी घोषणा पूर्ण व्हावी व सर्व परजनांनी ती ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती पुरवली, आणि सिंहाच्या तोंडून माझी सुटका झाली. १८प्रभू प्रत्येक वाईट गोष्टीतून मला सोडवील व त्याच्या स्वर्गीय राज्यासाठी तो मला राखील. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
१९प्रिस्का व अक्विला ह्या दोघांना आणि अनेसिफरच्या घरच्यांना सलाम दे. २०एरास्त करिंथला राहिला आहे. पण त्रफीम आजारी होता म्हणून मी त्याला मिलेतात ठेवले आहे. २१तू हिवाळ्याअगोदर यायचा प्रयत्न कर. युबुल, पुदेस, लीन व क्लौदिया आणि सर्व बांधव तुला सलाम पाठवीत आहेत.
२२प्रभू तुझ्या आत्म्याबरोबर असो; तुझ्याबरोबर कृपा असो.