Acts 1-5

प्रेषितांची कृत्ये

—–प्रे. कृ, १—–

अहो थिओफिल, येशूने जे प्रेषित निवडले होते, त्यांना पवित्र आत्म्याद्वारे त्याने आज्ञा दिल्यानंतर तो जेव्हा वर घेतला गेला त्या दिवसापर्यंत त्याने जे करण्यास व शिकविण्यास प्रारंभ केला त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. त्याने मरण सोसल्यानंतरही आपण जिवंत आहो हे पुष्कळ प्रमाणांनी त्यांना दाखवले, आणि चाळीस दिवस त्यांना दर्शने देऊन देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगितल्या. आणि तो त्यांच्याबरोबर एकत्र असता त्याने त्यांना आज्ञा दिली की,
“यरुशलेम सोडून जाऊ नका; पण तुम्ही माझ्याकडून ज्याविषयी ऐकलं आहे त्या पित्याच्या वचनाची वाट पहात रहा. कारण योहान, खरोखर,  पाण्यानं बाप्तिस्मा करी, पण फार दिवस जाण्याअगोदर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं केला जाईल.”
म्हणून ते एकत्र आले असता त्यांनी त्याला प्रश्न करून म्हटले,
“प्रभू, ह्या काळात, तू इस्राएलाचं राज्य पुन्हा प्रस्थापित करणार काय?”
आणि तो त्यांना म्हणाला,
“पित्यानं जे काळ आणि समय आपल्या स्वतःच्या सत्तेत ठेवलेत ते कळणं तुमच्यासाठी नाही. पण पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल; आणि यरुशलेमात, सर्व यहुदियात, शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटच्या भागापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”
आणि, त्याने ह्या गोष्टी सांगितल्यावर, ते पहात असता, तो वर घेतला गेला व एका ढगाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. १०आणि त्यांनी, तो जात असता, आकाशाकडे टक लावली, तेव्हा बघा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ११आणि ते म्हणाले,
“अहो गालीलकरांनो, तुम्ही असे आकाशाकडे टक लावून उभे का राहिला?  हा जो येशू तुमच्यामधून वर आकाशात घेतला गेला, तो जसा आकाशात गेला हे तुम्ही पाहिलंत तसाच तो येईल.”

१२मग, ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्या डोंगरावरून ते यरुशलेमास परत आले. तो यरुशलेमपासून शब्बाथ दिवसाच्या प्रवासाइतका दूर आहे. १३आणि ते आत आल्यावर त्या माडीवरच्या खोलीत वर गेले; तेथे पेत्र, याकोब, योहान, आणि अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय व मत्तय, आणि अल्फीचा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा यहुदा हे रहात होते. १४हे सर्व जण, आणि त्यांच्याबरोबर आलेल्या स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ, हे एकमनाने प्रार्थनेत ठाम राहिले.
१५तेव्हा त्या दिवसांत पेत्र बांधवांत (म्हणजे सुमारे एकशे वीस जणांच्या जमलेल्या गटात) उभा राहिला व त्यांना म्हणाला,
१६“अहो बंधूनो, येशूला ज्यांनी धरून नेलं त्यांना मार्गदर्शक होणार्‍या यहुदाविषयी पवित्र आत्म्यानं दाविदाच्या मुखावाटे, जे अगोदर सांगितलं आहे त्याचा हा शास्त्रलेख पूर्ण होणं जरूर आहे. १७कारण त्याला आपल्याबरोबर गणलं होतं आणि त्याला ह्या सेवेचा वाटा दिलेला होता.
(१८त्याने आपल्या अनीतीच्या वेतनाने एक शेत मिळवले; तो तोंडावर पडला, त्याचे पोट फुटले आणि त्याची सगळी आतडी बाहेर निघाली. १९आणि यरुशलेमात राहणार्‍या सर्वांना हे माहीत होऊन त्या शेताला त्यांच्या भाषेत हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत हे नाव मिळाले आहे.)
२०“कारण स्तोत्रांच्या पुस्तकात लिहिलं आहे की,
 ‘त्याचा वाडा ओसाड होवो,
  त्यात कोणी न राहो, ’
आणि
‘त्याचे अधिकारपद दुसरा घेवो.’
२१-२२म्हणून जेव्हा प्रभू येशू आपल्यात येत जात होता, त्या सर्व काळात, म्हणजे योहानाच्या बाप्तिस्म्यानं प्रारंभ झाला तेव्हापासून तो आपल्यामधून घेतला गेला त्या दिवसापर्यंत जे लोक आपल्याबरोबर राहिले त्यांच्यातला एक जण आमच्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी होणं जरूर आहे.”
२३तेव्हा त्यांनी युस्तस हे उपनाव असलेला योसेफ ऊर्फ बर्सबा, आणि मत्थिया ह्या दोघांना पुढे आणले. २४-२५तेव्हा त्यांनी प्रार्थना करून म्हटले,
“हे सर्वांची अंतःकरणे जाणणार्‍या प्रभू, तू आम्हाला हे दाखव की, यहुदा आपल्या स्थानी जायला जिथून निघाला ते ह्या सेवेचे आणि अधिकारपदाचे स्थान घ्यायला तू ह्या दोघांतून कोणाला निवडलं आहेस?”
२६मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्या टाकल्या व मत्थियावर चिठी पडली; आणि त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.     

—–प्रे. कृ, २—–

मग पन्नासाव्या दिवसाचा सण आला तेव्हा ते सगळे एकमनाने एकत्र असता, अकस्मात्  सुसाट्याचा वारा सुटल्यासारखा आकाशातून आवाज आला; आणि त्याने ते जेथे बसले होते ते सर्व घर भरले. आणि त्यांना ज्वालेसारख्या वेगळ्या होत असलेल्या जिभा दिसल्या; आणि ती त्यांच्यातील प्रत्येक जणावर एक बसली. आणि ते सगळे पवित्र आत्म्याने भरले जाऊन त्यांना आत्म्याने जशी वाचा दिली, तसे ते अन्य भाषांत बोलू लागले.
त्यावेळी, आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील यहुदी, भक्तिमान लोक, यरुशलेमात रहात होते, आणि हा आवाज झाला तेव्हा लोक एकत्र जमले आणि गोंधळून गेले, कारण प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या स्वतःच्या भाषेत त्यांना बोलताना ऐकले.
तेव्हा सर्व चकित झाले व त्यांनी आश्चर्य करीत म्हटले,
“बघा, हे सगळे बोलणारे गालिली आहेत ना? मग आपण जन्मलो तिथल्या आपल्या स्वतःच्या भाषेत आपण, प्रत्येक जण, ऐकत आहो हे कसे? पार्थी, मेदी आणि एलामी, आणि मेसापोटेम्या, यहुदिया,  कपद्दुकिया, पंत, आणि आसिया येथील राहणारे, १०फ्रुगियातले,  पंफुलियातले, मिसरातले, आणि कुरेनेकडच्या लिबुवातील भागातले, तसेच रोमकडून आलेले यहुदी आणि यहुदीय मतानुसारी, ११क्रेती आणि अरबी असे आपण हे देवाच्या महान कृत्यांविषयी आपल्याच भाषांत बोलत आहेत हे ऐकत आहो.”
१२तेव्हा ते सगळे चकित झाले व साशंक होऊन ते एकमेकांस म्हणाले,
“ह्याचा अर्थ काय?”
१३पण दुसरे हसून म्हणाले,
“ह्यांना नवा द्राक्षारस भरपूर झालाय.”
१४पण पेत्र इतर अकरांबरोबर उभा राहिला व त्याने आपला आवाज चढवून त्यांना म्हटले,
“अहो तुम्ही यहुदियाचे लोक, आणि यरुशलेमात राहणारे तुम्ही सर्व जण, तुम्हाला हे विदित होऊ द्या, आणि माझ्या शब्दांकडे कान द्या. १५कारण तुम्हाला वाटतं तसे हे प्यालेले नाहीत, कारण हा दिवसाचा तिसरा तास आहे.
१६“पण योएल संदेष्ट्यानं सांगितलं होतं ते हे आहे,
  १७‘आणि देव म्हणतो,
  त्या शेवटच्या दिवसांत असे होईल की,
मी सर्व मनुष्यांवर
माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन;
आणि तुमचे मुलगे आणि तुमच्या मुली
संदेश देतील.
  तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील,
  आणि तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील.
  १८आणि मी, त्या दिवसांत,
  माझ्या दासांवर आणि माझ्या दासींवर
  माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन,
  आणि ते संदेश देतील.
  १९आणि, मी वर आकाशात अद्भुते,
  आणि खाली पृथ्वीवर चिन्हे दाखवीन;
  रक्त, आणि अग्नी आणि धुराची वाफ!
२०परमेश्वराचा तो मोठा, प्रसिद्ध दिवस येण्याअगोदर,
  सूर्य अंधकारमय आणि चंद्र रक्तमय होईल.
  २१आणि असे होईल की,
  जो कोणी परमेश्वराच्या नावाने धावा करील
  तो तारला जाईल.’
२२“अहो इस्राएलाचे लोकहो, हे शब्द ऐका. नासोरी येशू हा तुम्ही जाणता त्याप्रमाणं, देवानं तुमच्यात त्याच्याकडून चमत्कार, अद्धुतं आणि चिन्हं केल्यामुळं देवानं तुमच्यात खातरी पटवलेला मनुष्य २३देवाच्या नियोजित संकल्पानुसार आणि पूर्वज्ञानानुसार धरून दिला गेल्यामुळं, तुम्ही त्याला घेऊन, दुष्टांच्या हातून त्याला वधस्तंभावर खिळलं आणि ठार मारलं. २४त्याला देवानं मृत्यूच्या यातनांतून सोडवून उठवलं आहे; कारण मृत्यूनं त्याला धरावं हे शक्य नव्हतं. २५कारण त्याविषयी दावीद म्हणतो,
‘मी सदोदित परमेश्वराला
माझ्या तोंडापुढे पाहिले;
  कारण मी ढळू नये
  म्हणून तो माझ्या उजव्या हाताशी आहे.
  २६म्हणून माझे मन आनंदित झाले,
  आणि माझी जीभ हर्षित झाली.
  शिवाय, माझा देह पण आनंदित राहील.
  २७कारण तू माझा जीव
  अधोलोकात राहू देणार नाहीस,
  आणि तू आपल्या पवित्र पुरुषाला
  कुजण्याचा अनुभव घेऊ देणार नाहीस.
  २८जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेस;
  तू आपल्या समक्षतेने मला आनंदाने भरशील.’
२९“अहो बंधूंनो, कुलपिता दावीद ह्याच्याविषयी मला तुमच्याशी हे उघडपणे बोलू द्या; तो मेला आणि त्याला पुरलं आणि त्याचं थडगं, ह्या दिवसापर्यंत आपल्यात आहे. ३०आता, तो संदेष्टा होता, आणि जाणत होता की, त्याच्या पोटच्या फळांतून एक त्याच्या राजासनावर बसेल; असं देवानं त्याला शपथेवर वचन दिलं होतं. ३१म्हणून त्याला आधी दिसल्यामुळं, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी तो हे बोलला की, त्याला अधोलोकात राहू दिलं नाही, किंवा त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.
३२“ह्या येशूला देवानं पुन्हा उठवलं आहे, आणि आम्ही सगळे ह्याचे साक्षी आहो. ३३म्हणून तो देवाच्या उजव्या हाताशी, वर चढविला गेला असून, त्याला पित्याकडून पवित्र आत्म्याविषयी वचन मिळालं असल्यामुळं तुम्ही आता जे पाहता आणि ऐकता त्याचा त्यानं वर्षाव केला आहे. ३४-३५कारण दावीद स्वर्गात वर गेला नाही पण तो म्हणतो,
 ‘परमेश्वर माझ्या प्रभूला म्हणाला,
  मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत
  तू माझ्या उजवीकडे बस.’
३६“म्हणून इस्राएलाच्या सगळ्या घराण्यानं हे निश्चित समजावं की, तुम्ही ज्या येशूला वधस्तंभावर खिळलं त्यालाच देवानं प्रभू आणि ख्रिस्त केलं आहे.”
३७आणि हे ऐकल्यावर त्यांच्या मनाला टोचणी लागली, आणि ते पेत्राला व इतर प्रेषितांना म्हणाले,
“अहो बंधूंनो, आम्ही काय करावं?”
३८तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला,
“पश्चात्ताप करा, आणि येशू ख्रिस्ताच्या नावानं तुम्ही, प्रत्येक जण, पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा घ्या. आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळेल. ३९कारण हे वचन तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी आणि जे दूर आहेत त्या सर्वांसाठी, म्हणजे आपला देव परमेश्वर हा जितक्यांना आपल्याकडे बोलवील तितक्या सर्वांसाठी आहे.”
४०आणि, आणखी पुष्कळ शब्दांनी त्याने निक्षून साक्ष दिली व बोध करून म्हटले,
“तुम्ही ह्या कुटिल पिढीपासून स्वतःला वाचवा.”

४१तेव्हा ज्या लोकांनी त्याच्या वचनाचे स्वागत केले त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि सुमारे तीन हजार जीव, त्या दिवशी, त्यांच्यात मिळवले गेले. ४२आणि ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थनेत ठाम राहिले.
४३तेव्हा प्रत्येक मनुष्यावर दहशत आली आणि प्रेषितांकडून पुष्कळ चिन्हे व अद्भुते झाली. ४४तेव्हा सर्व विश्वासणारे एकत्र असत व त्यांचे सर्व समाईक असे. ४५ते आपली जमीन आणि मालमत्ता विकीत आणि प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे ते सर्वांना वाटून देत.
४६आणि, ते प्रत्येक दिवशी, एकमताने मंदिरात जाण्यात व घरोघर भाकर मोडण्यात ठाम राहिले. ते हर्षाने व सालस मनाने आपले अन्न खात, ४७आणि देवाचे स्तवन करीत; आणि ते सर्व लोकांत मान्यता पावले आणि जे जे तारले जात होते त्यांना प्रभू दररोज त्यांच्यात मिळवीत होता.  

—–प्रे. कृ, ३—–

आता पेत्र व योहान हे एकत्र मिळून प्रार्थनेच्या वेळी, नवव्या ताशी वर मंदिरात गेले. तेव्हा, आईच्या उदरापासून पांगळा असलेल्या एका मनुष्याला नेत होते; ते त्याला मंदिरात जाणार्‍यांजवळ भिक्षा मागायला सुंदर वेस नावाच्या मंदिराच्या वेशीजवळ दररोज ठेवीत असत. आणि पेत्र आणि योहान हे मंदिरात जात आहेत हे बघून त्याने भिक्षा मागितली. तेव्हा पेत्राने योहानाबरोबर त्याच्याकडे टक लावून म्हटले,
“आमच्याकडे पहा.”
त्याला त्यांच्याकडून काही मिळेल असे वाटून त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले.
पण पेत्र त्याला म्हणाला,
“माझ्याजवळ चांदी आणि सोनं काही नाही; पण माझ्याजवळ जे काही आहे ते मी तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावानं चाल.”
मग त्याने त्याच्या उजव्या हाताला धरून त्याला उठवले. आणि, लगेच,  त्याच्या पायांत व घोट्यांत शक्ती आली. तेव्हा त्याने उडी मारली व तो उभा राहिला आणि चालला; आणि चालत, उड्या मारीत व देवाचे स्तवन करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.
आणि, तो चालत होता व देवाचे स्तवन करीत होता हे सर्व लोकांनी बघितले. १०आणि हाच मंदिराच्या सुंदर वेशीजवळ भिक्षेसाठी बसत असे हे त्यांनी ओळखले. आणि त्याला असे झालेले पाहून ते आश्चर्याने व अत्यानंदाने भरून गेले.

११तो पेत्राला व योहानाला बिलगला असता, सर्व लोक फार आश्चर्यचकित होऊन, शलमोनाची देवडी म्हणत त्या ठिकाणी, त्यांच्याकडे एका घोळक्याने धावत आले. १२आणि हे बघून पेत्राने लोकांना उत्तर दिले,
“अहो इस्राएलाचे लोकहो, तुम्ही आश्चर्य का करता? किंवा अशी आमच्याकडे टक का लावता? जणू आम्ही आमच्या स्वतःच्या सामर्थ्यानं किवा सुभक्तीनं ह्या मनुष्याला चालतं केलं? १३अब्राहामाचा, इसहाकाचा आणि याकोबाचा जो देव त्या आपल्या पूर्वजांच्या देवानं आपला सेवक येशू ह्याला गौरव दिलं आहे. तुम्ही त्याला धरून दिलं; आणि त्याला सोडून द्यावं असं पिलातानं ठरवलं असता, तुम्ही त्याच्यासमोर त्याला नाकारलं. १४पण तुम्ही जो पवित्र आणि नीतिमान त्याला नाकारलं, आणि तुम्ही तुमच्यासाठी एक खुनी सोडला जावा, अशी मागणी केली. १५आणि जीवनाच्या नेत्याला तुम्ही मारलं; त्याला देवानं मेलेल्यांतून उठवलं आहे ह्याचे आम्ही साक्षी आहो. १६आणि त्याच्या नावानं, त्याच्या नावावरील विश्वासाद्वारे, ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता आणि ओळखता त्याला सुदृढ केलं आहे; आणि त्याच्याकडून प्राप्त होणार्‍या विश्वासानं त्याला तुमच्या सर्वांच्या तोंडापुढं हा सुदृढपणा दिला आहे.
१७“आणि बंधूंनो, मी हे जाणतो की, तुम्ही आणि तुमच्या अधिकार्‍यांनी हे अज्ञानामुळं केलं. १८पण देवानं जे जे काही त्याच्या ख्रिस्तानं सोसलं पाहिजे, हे त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखातून आधी विदित केलं होतं ते अशा प्रकारे पूर्ण केलं आहे. १९तर तुमची पापं पुसली जावीत म्हणून पश्चात्ताप करा आणि वळा. म्हणजे परमेश्वराकडून विश्रांतीचे समय यावेत २०आणि तुमच्यासाठी पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्यानं पाठवावं. २१आणि देव युगादीपासून त्याच्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे ज्या गोष्टींविषयी बोलला, त्या सर्व पूर्वीप्रमाणं प्रस्थापित करायचे काळ येईपर्यंत त्याला स्वर्गानं स्थान देणं आवश्यक आहे.
२२“मोशेही म्हणतो की, ‘परमेश्वर देव तुमच्या बांधवांतून माझ्यासारखा एक संदेष्टा तुमच्यासाठी उभा करील. तो तुम्हाला सांगेल त्या सर्व गोष्टींत त्याचं ऐका. २३आणि असं होईल की, जो त्या संदेष्ट्याचं ऐकणार नाही असा प्रत्येक जीव प्रजेतून सर्वस्वी नष्ट केला जाईल.’ २४हो, आणि शमुवेलापासून, परंपरेनं, जे जे सर्व संदेष्टे बोलले त्यांनीदेखील ह्या दिवसांविषयी सांगितलं आहे.
२५“तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहा; आणि, ‘तुझ्या संतानाच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व वंशांना आशीर्वाद मिळेल’, असं अब्राहामाला सांगून, देवानं तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही पुत्र आहा. २६आणि देवानं आपला सेवक उभा करून त्याला तुमच्याकडे प्रथम पाठवलं, म्हणजे त्यानं तुम्हाला, तुमच्यातील प्रत्येकाला, तुमच्या कुकर्मांपासून फिरवून आशीर्वाद द्यावा.”

—–प्रे. कृ, ४—–

आणि ते लोकांशी बोलत असता, तेथे याजक आणि मंदिराचा सरदार व सदोकी त्यांच्यावर चालून आले, कारण ते लोकांना शिकवीत होते व येशूच्या द्वारे मेलेल्यांतून पुनरुत्थान आहे, असे ते गाजवीत होते, म्हणून ते चिडले होते. आणि त्यांनी त्यांच्यावर हात टाकले व त्यांना दुसर्‍या दिवसापर्यंत अटकेत ठेवले कारण तेव्हा संध्याकाळ झाली होती. परंतू ज्यांनी वचन ऐकले त्यांच्यातील पुष्कळांनी विश्वास ठवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती.

आणि असे झाले की, यरुशलेमात, दुसर्‍या दिवशी, त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री एकत्र जमले; तेथे श्रेष्ठ याजक हन्ना व कयफा, योहान व अलेक्झांदर आणि श्रेष्ठ याजकाच्या कुळातले सगळे जमले होते. आणि त्यांना मध्यभागी उभे केल्यावर त्यांनी विचारले,
“तुम्ही हे कोणत्या सामर्थ्यानं किवा कोणत्या नावानं केलंत?”
तेव्हा पवित्र आत्म्याने भरलेला पेत्र त्यांना म्हणाला,
“अहो तुम्ही लोकांचे अधिकारी आणि वडीलहो, ह्या अधू मनुष्यावर झालेल्या उपकाराविषयी, हा कसा बरा झाला म्हणून, आज आमची चौकशी केली जात असेल, १०तर तुम्हा सर्वांस आणि इस्राएलाच्या सर्व लोकांस हे विदित व्हावं की, तुम्ही ज्याला वधस्तंभावर खिळलं आणि देवानं ज्याला मेलेल्यांमधून उठवलं त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावामुळं, हा मनुष्य बरा झालेला तुमच्यापुढं उभा आहे. ११तुम्ही बांधणार्‍यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्‍याचा मुख्य चिरा झाला आहे. १२आणि दुसर्‍या कोणाकडून तारण नाही; कारण ज्यानं आपलं तारण झालं पाहिजे असं दुसरं कोणतंही नाव मनुष्यांत, आकाशाखाली, दिलेलं नाही.”
१३आणि त्यांनी पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहिले, आणि हे अज्ञ व अशिक्षित आहेत हे त्यांना दिसले तेव्हा त्यांनी आश्चर्य केले; आणि त्यांनी ओळखले की, ते येशूच्या सोबतीत असत.
१४आणि, तो बरा झालेला मनुष्य त्यांच्याबरोबर उभा होता हे त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना त्याविरुद्ध काही बोलता येईना. १५पण त्यांनी त्यांना न्यायसभेतून बाहेर जायची आज्ञा दिल्यावर त्यांनी आपसात विचार केला. १६ते म्हणाले,
“आपण ह्या माणसांना काय करावं? कारण खरोखर ह्यांच्याकडून एक प्रख्यात चिन्ह झालं आहे, हे यरुशलेमात राहणार्‍या सर्वांना माहीत आहे, आणि आपण नाकारू शकत नाही. १७पण हे लोकांत अधिक पसरू नये म्हणून आपण त्यांना धमकावणी देऊ की, त्यांनी ह्या नावानं कोणाशी ह्यापुढं बोलू नये.”
१८मग त्यांनी त्यांना बोलावले व त्यांना अशी आज्ञा दिली की, त्यांनी ह्यापुढे येशूच्या नावाने बोलू नये किवा शिकवू नये. १९पण पेत्राने व योहानाने उत्तर देऊन त्यांना म्हटले,
“देवापेक्षा तुमचं ऐकणं हे देवाच्या दृष्टीपुढं उचित आहे काय? तुम्हीच न्याय करा. २०कारण आम्ही ज्या गोष्टी बघितल्या आहेत आणि ऐकल्या आहेत त्या न सांगणं आम्हाला शक्य होणार नाही.”
२१म्हणून त्यांनी त्यांना पुन्हा धमकावणी देऊन त्यांना जाऊ दिले. कारण त्यांना शिक्षा द्यायला त्यांना लोकांपुढे काहीच मिळेना. कारण, हे जे झाले त्यामुळे सर्व लोक देवाचे गौरव करीत होते. २२कारण हे बरे करण्याचे चिन्ह ज्या माणसावर केले गेले तो चाळीस वर्षांहून अधिक मोठ्या वयाचा होता.

२३मग त्यांना सोडल्यावर ते आपल्या सोबत्यांकडे गेले व त्यांना वरिष्ठ याजक आणि वडील जे काही बोलले होते ते सर्व त्यांनी सांगितले. २४आणि त्यांनी हे ऐकल्यावर एकमताने देवाकडे आपला आवाज चढवला व म्हटले,
“हे स्वामी, आकाश, पृथ्वी आणि समुद्र, आणि त्यांतले सर्व उत्पन्न करणारा तूच एक आहेस, २५आणि आमचा पिता, तुझा सेवक दावीद ह्याच्या मुखातून तू पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हटलेस की,
 ‘राष्ट्रे का खवळली?
  आणि लोकांनी व्यर्थ गोष्टी का योजल्या?
  २६परमेश्वराविरुद्ध,
  आणि त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध,
  पृथ्वीचे राजे उभे राहिले,
  आणि अधिकारी एकत्र जमले.’
२७कारण तुझा पवित्र सेवक येशू, ज्याला तू अभिषेक केलास, त्याच्याविरुद्ध खरोखर ह्या नगरात, हेरोद आणि पंतय पिलात हे परजनांबरोबर आणि इस्राएलाच्या प्रजेबरोबर २८जे करायला एकत्र जमले होते, ते जे काही व्हावं असं तुझ्या हातानं आणि संकल्पानं पूर्वनियोजित केलं होतं तसंच होतं. २९-३०आणि प्रभू, आता त्यांच्या धमकावण्यांकडे बघ, आणि तुझ्या दासांना असं दे की, तू बरं करायला तुझा हात पुढं करीत असता, त्यांनी पूर्ण धैर्यानं तुझं वचन सांगावं आणि तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावानं चिन्हं आणि अद्भुतं केली जावीत.”
३१आणि त्यांनी प्रार्थना केली तेव्हा ते जेथे एकत्र जमले होते ती जागा हादरली, ते सर्व जण पवित्र आत्म्याने भरले आणि धैर्याने देवाचे वचन सांगत गेले.

३२आणि ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांचा समुदाय एकभावाचा व एकजिवाचा झाला होता, आणि आपल्याजवळ असेल त्यातील काही आपले स्वतःचे आहे असे कोणी म्हणत नसे, तर त्यांचे सर्व समाईक असे. ३३आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. ३४आणि त्यांच्यात कोणाला काही कमी असेल असे कोणी नव्हते; कारण त्यांच्यात जितके कोणी शेतांचे किवा घरांचे मालक होते ते ती विकीत आणि ज्यांची विक्री होई त्यांच्या किंमती ते घेऊन येत ३५व प्रेषितांच्या पायांशी ठेवीत असत; आणि प्रत्येक जणाला जशी गरज असेल तशी वाटणी केली जाई. ३६म्हणून बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) हे दुसरे नाव ज्याला प्रेषितांनी दिले होते, तो जन्माने कुप्राचा, लेवी योसेफ ३७ह्याची जमीन असल्यामुळे त्याने ती विकली आणि पैसा आणून प्रेषितांच्या पायांशी ठेवला.      

—–प्रे. कृ, ५—–

पण हनन्या नावाचा एक मनुष्य आणि त्याची बायको सफीरा ह्यांनी आपली एक जमीन विकली. त्याने किंमतीतला काही भाग मागे ठेवला हे त्याच्या बायकोला माहीत होते; आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायांशी ठेवला. ३पण पेत्र म्हणाला,
“हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावीस, आणि तुझ्या जमिनीच्या किंमतीमधून काही भाग ठेवावास हे सैतानानं तुझ्या मनात का भरवलं? ती होती तेव्हा तुझी स्वतःची नव्हती काय? आणि विकल्यावर ती तुझी सत्तेची नव्हती काय? तू आपल्या मनात हे का ठरवलंस? तू माणसांशी नाही, पण देवाशी लबाडी केलीस.”
हनन्याने हे शब्द ऐकले तेव्हा तो पालथा पडला व त्याने प्राण सोडला; आणि ह्या गोष्टी ज्यांनी ऐकल्या त्यांच्यावर मोठी दहशत आली. तेव्हा तरुण लोक उठले, त्यांनी त्याला गुंडाळले, बाहेर नेले आणि पुरले.
आणि सुमारे तीन तासांच्या अवधीनंतर असे झाले की, त्याची बायको आत आली; तेव्हा काय झाले होते हे तिला माहीत नव्हते. आणि, पेत्राने तिला उत्तर दिले,
“मला सांग, तुम्ही एवढ्यालाच जमीन विकली काय?”
आणि ती म्हणाली,
“हो, एवढ्यालाच.”
तेव्हा पेत्र तिला म्हणाला,
“प्रभूच्या आत्म्याची परीक्षा करायला तुम्ही सहमत का झाला? बघ, तुझ्या नवर्‍याला ज्यांनी पुरलं आहे त्यांचे पाय दाराशी आहेत, आणि ते तुला घेऊन जातील.”
१०तेव्हा लगेच ती त्याच्या पायांशी पालथी पडली व तिने प्राण सोडला. मग तरुण आले तेव्हा त्यांना ती मेलेली आढळली; आणि त्यांनी तिला नेऊन तिच्या नवर्‍याजवळ पुरले. ११तेव्हा सर्व मंडळीवर आणि जितक्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या त्या सर्वांवर मोठी दहशत आली.

१२आणि प्रेषितांच्या हातून लोकांत पुष्कळ चिन्हे व अद्भुते होत होती; आणि ते सर्व एकमताने शलमोनाच्या देवडीत असत. १३पण बाहेरचा कोणीही त्यांच्यात मिसळायला धजत नसे; पण लोक त्यांना थोर मानीत. १४शिवाय, ज्यांनी विश्वास ठेवला अशा पुरुषांचे व स्त्रियांचे समुदाय प्रभूकडे अधिक मिळवले गेले. १५त्यामुळे ते आजार्‍यांना बाहेर रस्त्यांवर नेऊन, त्यांना खाटल्यांवर आणि अंथरुणांवर ठेवीत, म्हणजे पेत्र चालला असता, त्यांच्यामधील काही जणांवर निदान त्याची सावली पडावी. १६शिवाय तेथे यरुशलेमला, आसपासच्या नगरांतील लोकांचा एक घोळका आजार्‍यांना, आणि ज्यांना अशुद्ध आत्म्यांनी पछाडले होते अशा लोकांना घेऊन आला; आणि ते सर्व जण बरे झाले.

१७तेव्हा श्रेष्ठ याजक आणि त्याच्याबरोबर असलेले (सदोकी पंथाचे) सर्व जण ईर्ष्येने भरून उठले; १८आणि त्यांनी प्रेषितांवर हात टाकले व त्यांना अटकेत ठेवले. १९पण प्रभूच्या दूताने रात्री बंदिशाळेची दारे उघडून त्यांना बाहेर आणले व म्हटले,
२०“जा, आणि मंदिरात उभे रहा; आणि ह्या जीवनाची सर्व वचनं लोकांना सांगा.”
२१त्यांनी हे ऐकल्यावर ते पहाटेस मंदिरात जाऊन शिकवू लागले. आता, श्रेष्ठ याजक व त्याच्याबरोबर असणारे लोक आले, त्यांनी न्यायसभा व इस्राएलाच्या वंशजांची संपूर्ण वडीलसभा एकत्र बोलावली, आणि त्यांना घेऊन यायला कामदारांना तुरुंगाकडे धाडले. २२पण जेव्हा कामदार आले व त्यांना ते बंदिशाळेत आढळले नाहीत, तेव्हा ते परत गेले आणि त्यांनी तसे सांगितले; २३ते म्हणाले,
“आम्हाला खरोखर, पूर्ण संरक्षणाखाली तुरुंग बंद असलेला आढळला; आणि बाहेर दारापुढं रखवालदार उभे होते. २३पण आम्ही उघडल्यानंतर आत आम्हाला कोणी मनुष्य सापडला नाही.”
२४त्यांनी ह्या गोष्टी ऐकल्यावर, ह्याचे काय होईल म्हणून मंदिराचा सरदार आणि वरिष्ठ याजक साशंक झाले. २५तेव्हा कोणी मनुष्य आला आणि त्याने त्यांना सांगितले व म्हटले,
“बघा, तुम्ही ज्या माणसांना बंदिशाळेत टाकलंत ते मंदिरात उभे आहेत आणि लोकांना शिकवीत आहेत.”
२६मग सरदार कामदारांबरोबर गेला व त्यांनी त्यांच्यावर जुलूम न करता त्यांना आणले. कारण आपल्यावर दगडमार केला जाऊ नये म्हणून ते लोकांना भीत होते. २७आणि त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. मग श्रेष्ठ याजकाने त्यांना प्रश्न करून २८म्हटले,
“ह्या नावानं शिकवू नका अशी आम्ही तुम्हाला निक्षून आज्ञा दिली नाही काय? आणि बघा, तुम्ही तुमच्या शिकवणीनं यरुशलेम भरलं आहे. आणि ह्या माणसाचं रक्त तुम्ही आमच्यावर आणू इच्छिता.”
२९पण पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर देऊन म्हटले,
“आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ३०तुम्ही ज्या येशूला झाडावर टांगून मारलंत त्याला आपल्या पूर्वजांच्या देवानं पुन्हा उठवलं. ३१त्यानं इस्राएलाला पश्चात्ताप आणि पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवानं त्याला नेता आणि तारणारा करून आपल्या उजवीकडे उच्चपद दिलं; ३२आणि आम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहो. आणि देवाची आज्ञा मानणार्‍यांना त्यानं दिलेला पवित्र आत्माही साक्षी आहे.”
३३त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांना चटका लागला, आणि ते त्यांना ठार मारायचा विचार करू लागले. ३४पण गमलिएल नावाचा एक परोशी न्यायसभेत उभा राहिला; तो एक शास्त्राध्यापक होता, आणि सर्व लोक त्याला मान देत; त्याने अशी आज्ञा केली की, ह्या माणसांना थोडा वेळ बाहेर काढा. ३५मग तो त्यांना म्हणाला,
“अहो इस्राएलाचे लोकहो, तुम्ही ह्या माणसांना काय करणार आहात ह्याची काळजी घ्या. ३६कारण ह्या दिवसांपूर्वी थुदास उठला, आणि तो स्वतः कोणी आहे असे सांगू लागला, आणि त्याला जे लोक चिकटून राहिले त्यांची संख्या सुमारे चार हजार होती. तो मारला गेला, आणि त्याचं ऐकणारे होते तितके सगळे पांगले, आणि नाहीसे झाले. ३७त्याच्यानंतर नावनिशीच्या दिवसात गालिलातला यहुदा उठला, आणि त्यानं पुष्कळ लोक आपल्याकडे ओढले. तो नष्ट झाला, आणि त्याचं ऐकणारे होते तितके सगळे जण पांगवले गेले.
३८“आणि, आता तुम्हाला मी सांगतो की, ह्या माणसांपासून दूर रहा, आणि त्यांना सोडा. कारण ही योजना किवा ही कृती मनुष्यांची असल्यास नष्ट होईल, ३९पण ती देवाची असल्यास तुम्ही ह्यांना नष्ट करू शकणार नाही; उलट तुम्ही देवाला विरोध करणारे व्हाल.”
४०आणि त्यांनी त्याचे ऐकले, आणि प्रेषितांना आत बोलवून मार दिल्यावर त्यांनी त्यांना आज्ञा दिली की,त्यांनी येशूच्या नावाने बोलू नये, आणि त्यांना जाऊ दिले.
४१आणि ते त्याच्या नावाकरता अपमान सोसायला लायक गणले गेले म्हणून ते आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले. ४२आणि त्यांनी मंदिरात व प्रत्येक घरी दररोज शिकवून, येशू हा ख्रिस्त आहे ही सुवार्ता सांगणे थांबवले नाही.   

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s