Acts 11-15

प्रेषितांची कृत्ये

—–प्रे. कृ. ११—–

आणि प्रेषितांनी व यहुदियातील बांधवांनी ऐकले की, परजनांनीही देवाचे वचन स्वीकारले आहे. आणि पेत्र यरुशलेमास वर आला तेव्हा जे सुनत झालेल्यांपैकी होते त्यांनी त्याच्याशी वाद करून म्हटले,
“तू बेसुनत लोकांत गेलास आणि त्यांच्याबरोबर जेवलास.”
पण पेत्राने प्रारंभ करून त्यांना क्रमाने स्पष्टीकरण करून म्हटले,
“मी यापो नगरात प्रार्थना करीत होतो; आणि मी माझ्या तंद्रीत एक दृष्टान्त बघितला; आकाशातून जणू एखाद्या मोठ्या झोळीसारखं, चार कोपर्‍यांनी खाली सोडलेलं एक पात्र खाली उतरलं, आणि माझ्यापुढं आलं. मी तिकडे टक लावून ते न्याहाळलं, आणि पृथ्वीवरचे चतुष्पाद प्राणी, रानातले पशू, सरपटणारे जीव आणि आकाशातील पक्षी मला दिसले. आणि माझ्याशी बोलणारा एक आवाज मी ऐकला, ‘पेत्रा, ऊठ, मार आणि खा.’ पण मी म्हणालो, ‘नको, प्रभू, कारण माझ्या मुखात कधीच काही निषिद्ध किंवा अशुद्ध गेलेलं नाही.’ पण तो आवाज दुसर्‍या वेळी, आकाशातून मला म्हणाला, ‘देवानं शुद्ध केलं आहे त्याला निषिद्ध मानू नको.’ १०आणि हे तीनदा झालं, आणि पुन्हा सगळं आकाशात घेतलं गेलं.
११“आणि बघा, त्याच वेळी, कैसरियाहून माझ्याकडे धाडलेले तीन इसम मी होतो त्या घराजवळ उभे राहिले होते. १२आणि आत्मा मला म्हणाला, ‘तू कशाचा संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ आणखी हे सहा बंधू माझ्याबरोबर आले, आणि आम्ही त्या मनुष्याच्या घरात गेलो. १३त्यानं आम्हाला सांगितलं की, त्याला एक देवदूत त्याच्या घरात उभा असलेला दिसला होता; आणि तो म्हणाला, ‘तू कुणाला यापोला पाठव आणि शिमोनाला बोलाव. त्याचं दुसरं नाव पेत्र आहे. १४तो जी वचनं तुला सांगेल त्यांकडून तुझं, आणि तुझ्या सगळ्या घराण्याचं तारण होईल.’ १५आणि मी बोलू लागताच पवित्र आत्मा जसा प्रारंभी आपल्यावर उतरला तसाच त्यांच्यावर उतरला.
१६“तेव्हा प्रभूनं जे म्हटलं होतं की, ‘योहान खरोखर पाण्यानं बाप्तिस्मा करी, पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं केला जाईल,’ ते त्याचं वचन मला आठवलं. १७आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा देवानं आपल्याला दिलं तसंच दान जर त्यांना दिलं, तर मी देवाला अडवू शकेन असा मी कोण?”
१८त्यांनी जेव्हा ह्या गोष्टी ऐकल्या तेव्हा ते स्तब्ध राहिले व देवाचे गौरव करून म्हणाले,
“तर मग देवानं परजनांनाही जीवनासाठी पश्चात्ताप दिला आहे.”

१९आता स्तेफनावरून जे संकट उद्भवले त्यामुळे जे पांगले होते ते फेनिकेपर्यंत, कुप्रापर्यंत आणि अंत्युखियापर्यंत केवळ यहुद्यांना वचनाची सुवार्ता सांगत गेले; त्यांनी त्यांच्याशिवाय दुसर्‍या कोणाला ती सांगितली नाही. २०पण त्यांच्यात काही कुप्राचे व कुरेनेचे लोक होते. ते अंत्युखियास आल्यावर हेल्लेण्यांशी बोलले व त्यांनी त्यांना प्रभू येशूची सुवार्ता सांगितली. २१आणि प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता; आणि विश्वास ठेवणारा एक मोठा गट प्रभूकडे वळला. २२त्यांच्याविषयीची ही बातमी यरुशलेमच्या मंडळीच्या कानी आली; आणि त्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठवून दिले. २३तो आला व त्याने देवाची कृपा बघितली तेव्हा त्याने आनंद केला व त्यांनी मनाच्या निर्धाराने प्रभूला धरून रहावे म्हणून त्यांना सर्वांना बोध केला. २४कारण तो चांगला मनुष्य होता व पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने भरलेला होता; आणि पुष्कळ लोक प्रभूकडे मिळवले गेले.
२५मग बर्णबा शौलाचा शोध करायला तार्सला गेला. २६आणि त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियास आणले; आणि असे झाले की, ते वर्षभर मंडळीत मिसळले व त्यांनी पुष्कळ लोकांना शिकवले; आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव अंत्युखियात प्रथम मिळाले.

२७आणि त्या दिवसांत यरुशलेमहून खाली अंत्युखियात संदेष्टे आले,  २८आणि त्यांच्यातील अगब नावाचा एक जण उठला व आत्म्याच्या योगे त्याने प्रगट केले की, सर्व जगभर मोठा दुष्काळ उद्भवेल. (हा क्लौदियसच्या काळात आला.) २९तेव्हा शिष्यांनी, प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे, यहुदियात राहणार्‍या बांधवांसाठी मदत धाडायचे ठरवले. ३०त्यांनी तसे केले, आणि त्यांनी ती बर्णबा व शौल ह्यांच्या हाती तिकडील वडिलांकडे पाठवली. 

—–प्रे. कृ. १२—–

आता, त्या काळात, हेरोद राजाने मंडळीतल्या काहींना त्रास द्यायला त्यांच्यावर आपले हात टाकले. त्याने योहानाचा भाऊ याकोब ह्याला तरवारीने ठार मारले आणि यहुदी खुश झालेत हे बघितल्यावर तो पेत्रालाही धरायला सरसावला. (त्यावेळी बेखमीर भाकरीचे दिवस होते.) आणि त्याने त्याला धरल्यावर तुरुंगात ठेवले; आणि त्याच्यावर पहारा ठेवायला त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले, आणि वल्हांडण सणानंतर तो त्याला लोकांपुढे आणू इच्छीत होता. म्हणून पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले होते, पण त्याच्यासाठी मंडळीकडून आस्थेने देवाला प्रार्थना होत होती.
आणि जेव्हा हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्याच रात्री, दोन साखळ्यांनी जखडलेला पेत्र दोन शिपायांच्या मधोमध निजला होता, आणि दारापुढे पहारेकरी तुरुंगावर पहारा करीत होते. आणि बघा, परमेश्वराचा दूत त्याच्याजवळ आला आणि त्या खोलीत प्रकाश प्रकाशला. त्याने पेत्राला कुशीवर मारून जागे केले आणि म्हटले,
“लवकर ऊठ.”
आणि त्याच्या साखळ्या हातांवरून गळून पडल्या. तेव्हा देवदूत त्याला म्हणाला,
“कमरबंद बांध, आणि तुझ्या वहाणांचे बंद बांध.”
आणि त्याने तसे केले. मग तो त्याला म्हणतो,
“तुझा अंगरखा चढव, आणि माझ्या मागोमाग ये.”
तेव्हा तो बाहेर आला व त्याच्या मागोमाग गेला. तेव्हा देवदूताकडून जे केले गेले ते खरे होते हे त्याला कळले नव्हते, पण त्याला वाटत होते की, तो एक स्वप्न पहात होता. १०त्यांनी पहिला व दुसरा पहारा ओलांडल्यावर ते नगरात नेणार्‍या लोखंडी दरवाजापर्यंत आले तेव्हा तो त्यांच्यापुढे आपोआप उघडला, ते बाहेर आले व एका रस्त्यावरून पार गेले; आणि लगेच देवदूत त्याला सोडून गेला. ११मग पेत्र भानावर येऊन म्हणाला,
“आता मला खरोखर समजलं की, प्रभूनं आपल्या दूताला पाठवून,  हेरोदाच्या हातून आणि यहुदी प्रजेच्या सार्‍या अपेक्षेतून माझी सुटका केली आहे.”
१२हे त्याला उमगताच तो मरियेच्या घरी आला. ती ज्याला मार्क म्हणत त्या योहानाची आई होती. तेथे पुष्कळ लोक एकत्र जमले होते व प्रार्थना करीत होते. १३आणि त्याने फाटकाच्या दारावर ठोकले, तेव्हा रुदा नावाची मुलगी तेथे कानोसा घ्यायला आली; १४तिने पेत्राचा आवाज ओळखला तेव्हा तिने आनंदामुळे फाटक उघडले नाही, पण ती आत पळाली, आणि पेत्र फाटकासमोर उभा आहे असे तिने सांगितले. १५तेव्हा ते म्हणाले,
“तू वेडी आहेस.”
पण ती ठामपणे म्हणत राहिली की, तोच तो आहे. तेव्हा ते म्हणाले,
“तो त्याचा देवदूत आहे.”
१६आणि पेत्र ठोकीत राहिला; आणि त्यांनी उघडल्यावर त्याला बघितले तेव्हा ते चकित झाले; १७पण त्यांनी शांत रहावे म्हणून त्याने त्यांना हाताने खुणावले, आणि प्रभूने त्याला कसे तुरुंगातून बाहेर आणले हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले, आणि म्हटले,
“तुम्ही जा, आणि ह्या गोष्टी याकोबाला आणि बांधवांना सांगा.”
मग तो निघाला आणि दुसर्‍या ठिकाणी गेला.
१८आता दिवस उगवला तेव्हा शिपायांत मोठी खळबळ झाली की, पेत्राचे काय झाले? १९आणि हेरोदाने त्याचा शोध केल्यावर तो त्याला सापडला नाही, तेव्हा त्याने पहारेकर्‍यांची चौकशी केली आणि त्यांना ठार मारायची आज्ञा दिली. आणि तो यहुदियातून कैसरियाला गेला व तेथे राहिला.
२०आता तो सोर व सिदोन येथील रहिवाश्यांवर चिडला होता. म्हणून ते एकमताने त्याच्याकडे आले, आणि राजाचा कारभारी ब्लस्तस ह्याला वश करून घेऊन त्यांनी समेटाची याचना केली; कारण राजाच्या देशावर त्यांच्या देशाचा निर्वाह होत होता. २१मग एका ठरवलेल्या दिवशी हेरोदाने आपली राजवस्त्रे चढवली, तो आपल्या राजासनावर बसला व त्याने त्यांच्यापुढे भाषण केले. २२तेव्हा लोक ओरडून म्हणाले,
“ही देवाची वाणी आहे, मनुष्याची नाही.”
२३आणि लगेच परमेश्वराच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला, कारण त्याने देवाला गौरव दिले नाही; त्याला किड्यांनी खाल्ले व त्याने प्राण सोडला.
२४पण देवाचे वचन वाढत गेले व बहुगुणित झाले. २५आणि बर्णबा व शौल हे आपली सेवा पुरी करून यरुशलेमहून परतले, आणि ते ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला त्यांनी आपल्याबरोबर घेतले. 

—–प्रे. कृ. १३—–

आता, अंत्युखियातील मंडळीत काही शिक्षक व संदेष्टे होते. त्यांच्यात बर्णबा, ज्याला निगर म्हणत तो शिमोन, कुरेनेचा लुकियस, मांडलिक हेरोदाच्या बाळपणी त्याच्याबरोबर वाढलेला मनाएन, आणि शौल हे होते. ते परमेश्वराची उपासना व उपास करीत असता पवित्र आत्मा त्यांना म्हणाला,
“मी ज्या कामासाठी बर्णबा आणि शौल ह्यांना बोलावलं आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करा.”
तेव्हा उपास व प्रार्थना केल्यावर त्यांनी त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना लावून दिले.

म्हणून, पवित्र आत्म्याने रवानगी केलेले असे ते सलुकियाकडे निघाले, आणि तेथून कुप्राकडे गलबताने निघाले. आणि ते सलमीनात होते त्यावेळी त्यांनी यहुद्यांच्या सभास्थानात देवाच्या वचनाची घोषणा केली. आणि त्यांच्याबरोबर योहानही सेवा करायला होता. आणि त्यांनी फपर्यंत बेट ओलांडले. तेव्हा त्यांना एक जादुगार भेटला; तो एक खोटा संदेष्टा असून तो यहुदी होता व त्याचे नाव बर्येशू होते. तो ज्याच्याजवळ होता तो सिर्ग्यस पौल तेथे सुभेदार असून तो एक बुद्धिवान मनुष्य होता. त्याने बर्णबा व शौल ह्यांना बोलवून देवाचे वचन ऐकायची अपेक्षा केली. पण अलूम जादूगार (ह्या अर्थाचेच ह्याचे नाव आहे) हा सुभेदाराला विश्वासापासून फिरवू पाहण्यास त्यांच्याविरुद्ध उभा राहिला. तेव्हा शौल (ऊर्फ पौल) हा पवित्र आत्म्याने भरला आणि त्याने त्याच्याकडे टक लावून १०म्हटले,
“अरे, सर्व कपटानं आणि सर्व कुयुक्तीनं भरलेल्या, सैतानपुत्रा, सर्व नीतिमत्वाच्या वैर्‍या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करणं कधी थांबवणार नाहीस काय? ११आणि आता बघ, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, आणि तू अंधळा होशील आणि काही काळ सूर्य पाहणार नाहीस.”
आणि लगेच त्याच्यावर धुके आणि अंधार येऊन, त्याला हाताने धरून न्यावे म्हणून, तो इकडे तिकडे, कोणाला तरी शोधीत जाऊ लागला. १२आणि प्रभूविषयीच्या शिक्षणाने सुभेदार थक्क झाला असल्यामुळे, त्याने हे जे झाले ते बघितले तेव्हा त्याने विश्वास ठेवला.

१३मग पौल व त्याचे सोबती हे पफेहून गलबताने निघून पंफुलियासमोर पिर्ग्यास आले, आणि योहान त्यांच्याजवळून निघून यरुशलेमास परत गेला. १४पण ते पिर्ग्याहून निघाल्यावर पिसिदियातील अंत्युखियास आले व शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले. १५मग नियमशास्त्रातील व संदेष्ट्यांतील वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकार्‍यांनी त्यांना निरोप पाठवून म्हटले,
“अहो बंधूंनो, तुमच्याजवळ लोकांसाठी काही बोधपर वचन असल्यास तुम्ही बोला.”
१६तेव्हा पौल उभा राहिला, आणि त्याने हाताने खुणावल्यावर तो म्हणाला,
“अहो इस्राएलाच्या लोकांनो, आणि देवाचं भय धरणार्‍यांनो, माझं ऐका. १७ह्या इस्राएल लोकांच्या देवानं आमच्या पूर्वजांना निवडलं. ते लोक मिसर देशात परके म्हणून राहिले असता त्यानं त्यांना मोठं केलं, आणि आपल्या उभारलेल्या बाहूनं त्यांना तेथून बाहेर आणलं. १८त्यानं अरण्यात, सुमारे चाळीस वर्षांच्या काळात त्यांची वागणूक सहन केली. १९आणि कनान देशातील सात राष्ट्रांना नष्ट केल्यावर त्यानं त्यांचा देश त्यांना वतन म्हणून सुमारे साडेचारशे वर्षं दिला. २०त्यानंतर शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यानं त्यांना न्यायाधीश दिले.
२१“मग त्यांनी राजा मागितला, आणि देवानं त्यांना किशाचा पुत्र शौल हा बन्यामिनाच्या वंशातला मनुष्य चाळीस वर्षांपर्यंत दिला. २२आणि त्यानं त्याला दूर केलं तेव्हा त्यांचा राजा व्हायला दावीद उभा केला, आणि त्यानं त्याच्याविषयी साक्ष देऊन म्हटलं, ‘इशायाचा पुत्र दावीद हा मला माझ्या मनासारखा मनुष्य मिळाला आहे; तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील.’ २३आणि देवानं वचनानुसार, ह्या मनुष्याच्या संतानातून,  इस्राएलासाठी येशू हा तारणारा उभा केला; २४योहानानं त्याच्यापुढं इस्राएलाच्या सर्व प्रजेला पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची आधी घोषणा केली होती. २५आणि योहान आपली धाव संपवीत आला असता त्यानं म्हटलं, ‘मी कोण आहे असं तुम्हाला वाटतं? मी तो नाही. आणि बघा, माझ्या मागून एक येत आहे आणि त्याच्या पायांतल्या वहाणा सोडायला मी लायक नाही.’
२६“अहो बंधूंनो, अब्राहामाच्या संतानाचे तुम्ही वंशज, आणि जे देवाचे भय धरणारे तुमच्यात आहेत अशा तुमच्याकडे ह्या तारणाचं वचन पाठवलं गेलं आहे. २७कारण यरुशलेमात राहणार्‍यांनी आणि त्यांच्या अधिकार्‍यांनी त्याला न जाणून, आणि प्रत्येक शब्बाथ दिवशी वाचल्या जाणार्‍या संदेष्ट्यांच्या घोषणाही न जाणून, त्यांनी त्याला दोषी ठरवून त्या पूर्ण केल्या; २८आणि मरणाच्या शिक्षेसाठी त्यांना काहीच कारण आढळलं नसता त्याला मरणाची शिक्षा द्यावी अशी त्यांनी पिलाताकडे मागणी केली. २९आणि त्याच्याविषयी जे लिहिलं होतं ते सगळं त्यांनी पूर्ण केल्यावर त्याला झाडावरून खाली काढलं आणि थडग्यात ठेवलं. ३०पण देवानं त्याला मेलेल्यांमधून उठवलं. ३१आणि जे त्याच्याबरोबर गालिलातून यरुशलेमास आले होते त्यांना तो पुष्कळ दिवस दिसला. ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत.
३२-३३“आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगतो की, देवानं येशूला पुन्हा उठवून आमच्या पूर्वजांना दिलेलं वचन त्यांच्या मुलांकरता, म्हणजे आपल्याकरता, पूर्ण केलं आहे; कारण दुसर्‍या स्तोत्रातही लिहिलं आहे की,
 ‘तू माझा पुत्र आहेस,
  आज मी तुला जन्म दिला आहे.’
३४आणि त्यानं कुजण्याकडे परतू नये म्हणून त्यानं त्याला मेलेल्यांतून पुन्हा उठवलं; ह्याविषयी त्यानं असं म्हटलं आहे,
 ‘मी दाविदाला दिलेले पवित्र आणि
  विश्वसनीय आशीर्वाद तुम्हाला देईन.’
३५म्हणून तो आणखी एका स्तोत्रात म्हणतो,
 ‘तू आपल्या पवित्र पुरुषाला
   कुजण्याचा अनुभव घेऊ देणार नाहीस.’
३६कारण दाविदानं देवाच्या इच्छेप्रमाणं आपल्या पिढीची सेवा केल्यावर तो निजला; त्याला त्याच्या पूर्वजांबरोबर ठेवलं आणि त्यानं कुजण्याचा अनुभव घेतला. ३७पण देवानं ज्याला पुन्हा उठवलं त्यानं कुजण्याचा अनुभव घेतला नाही.
३८“ह्यासाठी, अहो बंधूंनो, तुम्हाला हे विदित असो की, तुम्हाला ह्या मनुष्याद्वारे पापांच्या क्षमेची घोषणा केली जात आहे. ३९आणि मोशेच्या नियमशास्त्रानुसार तुम्ही ज्या गोष्टींपासून निर्दोषी ठरविले जाऊ शकणार नाही, त्या सर्व गोष्टींपासून ह्याच्या योगे विश्वास ठेवणारा प्रत्येक जण निर्दोषी ठरतो. ४०म्हणून जपा, नाहीतर, संदेष्ट्यांत जे सांगितलं आहे ते तुमच्यावर येईल,
  ४१‘बघा, अवमान करणार्‍यांनो,
  आश्चर्य करा आणि नष्ट व्हा;
  कारण तुमच्या दिवसांत मी एक
  कार्य करीत आहे.
  ते कार्य असे आहे की,
  कोणी तुम्हाला त्याविषयी सांगितले,
  तरी तुम्ही मुळीच विश्वास ठेवणार नाही.’ ”
४२आणि लोक बाहेर जात असता, त्यांनी आपल्याला पुढच्या शब्बाथ दिवशी ह्या गोष्टी सांगण्यात याव्यात अशी त्यांना विनंती केली. ४३आता सभास्थानातील मंडळी विखरल्यावर पुष्कळ यहुदी व यहुदीय धर्मानुयायी पौल आणि बर्णबा ह्यांच्या मागोमाग गेले. तेव्हा ते त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी देवाच्या कृपेत रहावे म्हणून त्यांनी त्यांचे मन वळवले.

४४त्यानंतर आलेल्या शब्बाथ दिवशी ते बहुतेक सर्व गाव देवाचे वचन ऐकायला जमले. ४५पण जेव्हा यहुद्यांनी लोकांना बघितले तेव्हा ते ईर्ष्येने भरले आणि पौल जे काही बोलला त्याला त्यांनी विरोध करून दुर्भाषण केले.
४६तेव्हा पौल व बर्णबा धैर्याने बोलून त्यांना म्हणाले,
“देवाचं वचन प्रथम तुम्हाला सांगण्यात यावं हे आवश्यक होतं; पण तुम्ही ते दूर लोटता आणि आपल्या स्वतःला सनातन जीवनासाठी अयोग्य ठरवता, म्हणून बघा, आम्ही परजनांकडे वळतो, ४७कारण परमेश्वरानं आम्हाला अशी आज्ञा दिली आहे,
 ‘मी तुला परजनांना प्रकाश होण्यास,
  पृथ्वीच्या शेवटच्या भागापर्यंत
  तारणासाठी ठेवले आहे.’ ”
४८आणि परजनांनी हे ऐकले तेव्हा ते आनंदित झाले आणि परमेश्वराच्या वचनाचे गौरव करू लागले; आणि जितके सनातन जीवनासाठी नेमलेले होते त्यांनी विश्वास ठेवला. ४९आणि परमेश्वराचे वचन त्या संपूर्ण प्रांतात नेले गेले.
५०पण यहुद्यांनी प्रतिष्ठित भक्तिशील स्त्रियांना व नगरातील प्रमुख पुरुषांना चिथावले, त्यांनी पौल व बर्णबा ह्यांचा छळ आरंभला व त्यांना आपल्या हद्दीतून बाहेर घालवले. ५१पण त्यांनी त्यांच्यापुढे आपल्या पायांची धूळ झटकली आणि ते इकुन्यात आले. ५२आणि शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने भरले.  

—–प्रे. कृ. १४—–

आणि इकुन्यात असे झाले की, ते दोघे जण यहुद्यांच्या सभास्थानात बरोबर गेले, आणि असे बोलले की, यहुद्यांतील आणि हेल्लेण्यांतील एका मोठ्या गटाने विश्वास ठेवला. पण ज्यांनी विश्वास ठेवला नाही अशा यहुद्यांनी परजनांना चिथावले आणि बांधवांविषयी त्यांची मने कलुषित केली. म्हणून ते तेथे दीर्घकाळ राहिले व प्रभूविषयी धैर्याने बोलले; आणि त्याने त्यांच्या हातून चिन्हे व अद्भुते होऊ देऊन आपल्या कृपेच्या वचनाची साक्ष दिली.
पण नगरातल्या लोकांत फूट पडली; काहींनी यहुद्यांची आणि काहींनी प्रेषितांची बाजू घेतली. आणि जेव्हा परजनांकडून, आणि त्याचप्रमाणे यहुद्यांकडून व त्यांच्या अधिकार्‍यांकडून त्यांची हेलना करून त्यांना दगडमार करण्याकरता उठाव झाला तेव्हा ते त्यांना समजले, आणि ते लुस्त्र व दर्बे ह्या लुकवनियातील नगरांत व आसपासच्या प्रांतात पळून गेले आणि तेथे त्यांनी सुवार्ता सांगितली.
तेव्हा लुस्त्रात एक मनुष्य बसलेला होता; तो पायांनी अधू होता; तो आपल्या आईच्या उदरापासून पांगळा होता, आणि कधीच चालला नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत असता त्याने त्याच्याकडे टक लावली; आणि तो बरा होईल असा विश्वास त्याच्यात आहे हे बघितले १०तेव्हा तो त्याला मोठया आवाजात म्हणाला,
“तुझ्या पायांवर नीट उभा रहा.”
तेव्हा त्याने उडी मारली व तो उठून चालला.
११आणि पौलाने काय केले हे लोकांनी बघितले तेव्हा त्यांनी आपले आवाज चढवून लुकवनियाच्या भाषेत म्हटले,
“आपल्यात देव माणसासारखे होऊन खाली आलेत.”
१२त्यांनी बर्णबाला बृहस्पती (जुपितर) म्हटले आणि पौलाला बुध (मर्क्युरी) म्हटले कारण तो वक्ता होता.
१३तेव्हा नगरापुढील बृहस्पतीचा पुजारी बैल व माळा घेऊन वेशीजवळ आला आणि त्याची लोकांबरोबर बलिदान करायची इच्छा होती. १४हे बर्णबा व पौल ह्या प्रेषितांनी ऐकले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व ते लोकांमधून धावत धावत ओरडू लागले, आणि म्हणाले,
१५“गड्यांनो, तुम्ही हे का करता? आम्हीदेखील तुमच्यासारख्या भावना असलेली माणसं आहोत; आणि तुम्ही ह्या व्यर्थ गोष्टी सोडाव्यात. आणि ज्या जिवंत देवानं आकाश, पृथ्वी आणि समुद्र, आणि त्यांतील सर्व गोष्टी उत्पन्न केल्या त्याच्याकडे तुम्ही वळावं म्हणून तुम्हाला सुवार्ता सांगतो. १६त्यानं सर्व राष्ट्रांना पूर्वीच्या दिवसांत त्यांच्या मार्गांनी जाऊ दिलं. १७तरी त्यानं स्वतःला विनासाक्ष ठेवलं नाही; म्हणजे त्यानं उपकार केले; त्यानं तुम्हाला आकाशातून पाऊस दिला, आणि पीक देणारे ऋतू देऊन अन्नानं आणि आनंदानं तुमची मनं तृप्त केली.”
१८आणि अशा बोलण्यांनी त्यांनी मोठ्या प्रयासाने लोकांना त्यांना बलिदान करण्यापासून आवरले.
१९तेव्हा तेथे अंत्युखियातून व इकुन्यातून यहुदी आले आणि लोकांचे मन वळवून त्यांनी पौलाला दगडमार केला आणि त्यांना तो मेला असे वाटून, त्यांनी त्याला नगराबाहेर ओढून नेले. २०पण शिष्य त्याच्याभोवती जमले तेव्हा तो उठून नगरात आला. मग दुसर्‍या दिवशी तो बर्णबाबरोबर दर्बेला गेला.

२१आणि त्यांनी त्या नगरात सुवार्ता सांगून पुष्कळ जणांना शिष्य केल्यावर ते पुन्हा लुस्त्रात, तेथून इकुन्यात, आणि तेथून अंत्युखियात परतून आले. २२त्यांनी शिष्यांचे जीव सुस्थिर केले आणि त्यांना विश्वासात टिकून राहण्यास उत्तेजन देऊन बोध केला की, आपण पुष्कळ दुःखामधून देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे. २३आणि त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील नेमल्यावर त्यांनी उपास करून प्रार्थना केली, आणि ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्यावर त्यांनी त्यांना सोपवले.
२४मग त्यांनी पिसिदियामधून प्रवास केल्यावर ते पंफुलियास आले. २५आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तालियास खाली गेले. २६आणि तेथून अंत्युखियास गलबताने गेले. त्यांनी पुर्‍या केलेल्या कामासाठी त्यांना तेथपासून देवाच्या कृपेवर निरवले होते. २७आणि ते आल्यावर त्यांनी सर्व मंडळी एकत्र जमवून देवाने त्यांच्यासाठी जे सर्व काही केले आणि त्याने परजनांसाठी विश्वासाचे दार कसे उघडले हे त्यांनी निवेदन केले. २८आणि ते तेथे शिष्यांबरोबर दीर्घकाळ राहिले.

—–प्रे. कृ. १५—–

आणि यहुदियातून खाली आलेले कित्येक जण बांधवांना शिकवू लागले की,
“मोशेनं लावलेल्या परिपाठानुसार तुमची सुनत झाल्याशिवाय तुमचं तारण होऊ शकणार नाही.”
आणि पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी पुष्कळ मतभेद आणि वाद झाल्यावर त्यांनी असे ठरवले की, पौल व बर्णबा ह्या दोघांनी, आणि त्यांच्याबरोबर इतर काही जणांनी ह्या प्रश्नासाठी प्रेषितांकडे आणि वडील वर्गाकडे यरुशलेमास जावे. आणि मंडळीने त्यांना वाटेस लावल्यावर ते फेनिकेमधून व शोमरोनामधून जात असता ते परजनांच्या परिवर्तनाविषयी सांगत गेले, आणि त्यांनी सर्व बांधवांना मोठा आनंद घडवला. आणि ते जेव्हा यरुशलेमास आले तेव्हा तेथील मंडळीने,  प्रेषितांनी आणि वडिलांनी त्यांचे स्वागत केले; मग त्यांनी आपल्यासाठी देवाने जे काही केले होते ते सर्व त्यांना सांगितले, पण परोश्यांच्या पंथापैकी ज्यांनी विश्वास ठेवला होता असे काही जण उठून म्हणाले,
‘त्यांची सुनत करणं, आणि त्यांना मोशेचं नियमशास्त्र पाळायची आज्ञा करणं आवश्यक आहे.’

मग ह्या गोष्टीवर विचार करायला प्रेषित आणि वडील एकत्र जमले. आणि पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उठला व त्यांना म्हणाला,
“अहो बंधूंनो, तुम्ही जाणता की, देवानं पुष्कळ दिवसांपूर्वी तुमच्यामधून अशी निवड केली की, परजनांनी माझ्या तोंडून सुवार्तेचं वचन ऐकून विश्वास ठेवावा. आणि जो देव अंतःकरणं जाणतो त्यानं त्यांना आपल्याप्रमाणंच पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. आणि त्यानं त्यांची अंतःकरणं विश्वासानं शुद्ध करून आपल्यात आणि त्यांच्यात भेद ठेवला नाही. १०म्हणून आता, आपले पूर्वज आणि आपण जे जू वाहू शकलो नाही, ते शिष्यांच्या मानेवर लादायला तुम्ही देवाची परीक्षा का करता? ११पण आपण विश्वास ठेवतो की, जसे ते तसेच आपण प्रभू येशूच्या कृपेनं तारले जाऊ.”

१२तेव्हा सर्व लोक शांत राहिले आणि बर्णबा व पौल हे देवाने आपल्याकडून परजनांत कोणकोणती चिन्हे व अद्धुते केली हे सांगत असता त्यांनी त्यांचे ऐकले.
१३त्यांचे बोलणे संपले तेव्हा याकोबाने उत्तर देऊन म्हटले,
“अहो बंधूंनो, माझं ऐका. १४देवानं आपल्या नावाकरता परजनांतून एक समाज काढायला प्रथम कशी त्यांची भेट घेतली हे शिमोनानं सांगितलं आहे. १५आणि ह्याच्याशी संदेष्ट्याचे शब्द जुळतात; कारण असं लिहिलं आहे की,
  १६‘ह्यानंतर मी परत येईन,
  आणि दाविदाचा पडलेला डेरा
  पुन्हा उभारीन,
  मी त्याचे पडलेले भाग
  पुन्हा उभारीन,
  आणि तो नीट करीन
  १७म्हणजे, शेष राहिलेल्यांनी
  आणि ज्यांच्यावर माझं नाव घातलं आहे
  अशा सर्व परजनांनी
  परमेश्वराचा शोध करावा,
  १८हे सर्व करणारा परमेश्वर हे म्हणतो.
  तो हे युगादीपासून विदित करीत आहे.’
१९“म्हणून मी ठरवलं आहे की, जे लोक परजनांतून देवाकडे वळले आहेत त्यांना आपण अस्वस्थ करू नये. २०पण आपण त्यांना लिहावं की, मूर्तींचे विटाळ आणि जारकर्म, मुरगळून मारलेले प्राणी आणि रक्त ह्यांपासून त्यांनी दूर रहावं. २१कारण प्राचीन पिढ्यांपासून शब्बाथ दिवशी सभास्थानांत मोशेचं वाचन करीत असल्यामुळं प्रत्येक नगरात त्याची घोषणा करणारे आहेत.”

२२तेव्हा सर्व मंडळीबरोबर प्रेषित आणि वडील ह्यांना हे उचित वाटले की, पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपल्यातील यहुदा ऊर्फ बर्सबा आणि सिला, ह्या बांधवांमधील प्रमुख माणसांची निवड करून त्यांना अंत्युखियास धाडावे. २३आणि त्यांनी त्यांच्या हस्ते अशा प्रकारची पत्रे लिहिलीः
प्रेषित आणि वडील ह्या बांधवांकडून;
अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील परजनांतील बांधवांसः
जयजय.
२४आम्ही असे ऐकले आहे की, आमच्यामधील काही जणांनी, आम्ही त्यांना तशी आज्ञा दिली नसताना, तुमचे जीव बुचकळ्यात पाडणार्‍या भाषणांनी तुम्हाला अस्वस्थ केले आहे. २५-२६म्हणून आम्ही एकमताने ठरवले की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाकरता ज्या माणसांनी आपले जीव वाहिले आहेत, असे आमचे प्रिय बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर आम्ही निवडलेल्या माणसांना धाडावे. २७म्हणून आम्ही यहुदा व सिला ह्यांना पाठवले आहे. ते आपल्या स्वतःच्या बोलण्यात ह्याच गोष्टी तुम्हाला सांगतील. २८कारण पवित्र आत्म्याला व आम्हाला हे उचित वाटले की, ह्या आवश्यक गोष्टींशिवाय तुमच्यावर काही अधिक मोठे ओझे लादू नये; २९त्या अशा की, मूर्तींना वाहिलेली अर्पणे, आणि रक्त व मुरगळून मारलेले प्राणी, आणि जारकर्म ह्यांपासून तुम्ही स्वतःला राखा. तुम्ही ह्यांतून स्वतःला राखाल तर चांगले कराल.
जयजय.
३०मग त्यांनी त्यांना लावून दिल्यावर ते अंत्युखियास आले, आणि त्यांनी लोकांना एकत्र जमवून ते पत्र दिले;३१आणि त्यांनी ते वाचले, तेव्हा त्यातील उत्तेजनाने ते आनंदित झाले.
३२यहुदा व सिला हे स्वतः संदेष्टे असल्यामुळे त्यांनी पुष्कळ वचनांद्वारे बांधवांना बोध करून स्थिर केले. ३३आणि ते काही काळ तेथे राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठविले होते त्यांच्याकडे बांधवांनी त्यांना शांतीने लावून दिले. ३४-३५पण पौल व बर्णबा हे दुसर्‍या कित्येक जणांबरोबर अंत्युखियात शिकवीत व प्रभूच्या वचनाची सुवार्ता सांगत राहिले.

३६आणि काही दिवसांनंतर पौल बर्णबाला म्हणाला,
“आता आपण परत जाऊ या, आणि आपण ज्या प्रत्येक नगरात प्रभूच्या वचनांची घोषणा केली तेथील बांधवांची भेट घेऊन ते कसे आहेत हे पाहू या.”
३७आणि ते ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे, अशी बर्णबाची इच्छा होती. ३८पण ज्याने त्यांना पंफुलियापासून सोडले होते आणि जो त्यांच्याबरोबर काम करायला गेला नाही, त्याला आता बरोबर घेणे पौलाला बरे वाटले नाही. ३९आणि त्यांच्यातली ईर्ष्या इतकी झाली की, ते एकमेकांपासून वेगळे झाले. तेव्हा बर्णबाने मार्काला घेतले व तो गलबताने कुप्राला गेला. ४०मग पौलाने सिलाची निवड केली, आणि बांधवांनी त्यांना प्रभूच्या कृपेवर निरवल्यावर ते निघाले. ४१आणि तो सूरिया व किलिकिया प्रांतांतून मंडळ्यांना स्थिर करीत गेला.  

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s