Acts 16-20

प्रेषितांची कृत्ये

—–प्रे. कृ. १६—–

मग तो खाली दर्बे व लुस्त्र येथे आला, आणि बघा, तेथे एक शिष्य होता; त्याचे नाव तिमथ्य होते. तो एका, विश्वास ठेवणार्‍या यहुदी बाईचा मुलगा होता, पण त्याचा बाप हेल्लेणी होता. आणि लुस्त्रात व इकुन्यात राहणार्‍या सर्व बांधवांत त्याची ग्वाही दिली जात होती. त्याने आपल्याबरोबर चलावे अशी पौलाची इच्छा होती; आणि त्याने त्याला घेतले व त्या ठिकाणच्या यहुद्यांमुळे त्याने त्याची सुनत केली; कारण त्याचा बाप हेल्लेणी होता हे त्या सर्वांना माहीत होते. आणि त्या नगरातून प्रवास करताना त्यांनी त्यांना यरुशलेममधील प्रेषितांनी आणि वडिलांनी जे निर्णय ठरविले होते ते त्यांनी पाळावेत म्हणून नेमून दिले. आणि त्यायोगे मंडळ्या विश्वासात स्थिर केल्या जाऊन दररोज संख्येने वाढत होत्या.

आणि त्यांना पवित्र आत्म्याकडून आसियात वचन सांगण्यास प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगियाच्या व गलतियाच्या सुभ्यामधून गेले; आणि मुसियापर्यंत आल्यावर त्यांनी बिथुनियात जायचा प्रयत्न केला पण येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. तेव्हा ते मुसियाजवळून पुढे जाऊन खाली त्रोवसास आल.
आणि रात्री पौलाला एक दृष्टान्त दिसला; मासेदोनियाचा एक मनुष्य उभा होता व त्याने त्याला विनंती करून म्हटले,
आमच्याकडे मासेदोनियास या आणि आम्हाला साह्य करा.
१०आणि त्याने दृष्टान्त बघितला तेव्हा त्या लोकांना सुवार्ता सांगण्यास देवाने आम्हाला बोलावले आहे असे ठरवून आम्ही लगेच मासेदोनियास जायचा प्रयत्न केला.

११मग आम्ही त्रोवसाकडून गलबताने निघालो व सरळ पल्ल्याने समथ्राकेस आलो; मग दुसर्‍या दिवशी नियापलीस आलो, १२आणि तेथून फिलिपैस आलो. हे मासेदोनियाच्या त्या भागातील एक प्रमुख नगर असून वसाहतीचे ठाणे आहे. आम्ही ह्या नगरात काही दिवस राहिलो. १३आणि शब्बाथ दिवशी, वेशीबाहेर, नदीच्या किनार्‍याजवळ, जेथे प्रार्थना करणे नियमशास्त्रानुसार होते तेथे गेलो आणि बसलो व तेथे जमलेल्या स्त्रियांशी बोलू लागलो. १४तेथे जांभळ्या वस्त्राचा व्यापार करणारी, थुवतिरा नगरची, लुदिया नावाची एक बाई आमचे ऐकत होती. ती देवाची उपासना करणारी होती. आणि पौलाच्या बोलण्याकडे लक्ष देण्यास प्रभूने तिचे अंतःकरण उघडले. १५मग तिचा व तिच्या घरच्यांचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तिने विनंती करून म्हटले,
तुम्ही मला प्रभूवर विश्वास ठेवणारी मानता तर माझ्या घरी येऊन रहा.
आणि तिने आम्हाला भाग पाडले.
१६आणि असे झाले की, आम्ही प्रार्थनेच्या जागेकडे जात असता एक मुलगी आम्हाला भेटली; तिच्यात एक,भविष्य सांगणारे भूत होते, आणि ती भविष्य सांगून आपल्या धन्यांकडे पुष्कळ मिळकत आणीत असे. १७ती पौलाच्या व आमच्या मागोमाग आली आणि ओरडून म्हणाली,
हे लोक परात्पर देवाचे दास आहेत; हे आपल्याला तारणाचा मार्ग दाखवीत आहेत.
१८असे तिने पुष्कळ दिवस केले तेव्हा पौलाला वाईट वाटले, आणि त्याने मागे फिरून भुताला म्हटले,
मी तुला येशू ख्रिस्ताच्या नावानं आज्ञा करतो, तू हिच्यामधून बाहेर नीघ.
आणि त्याच घटकेस ते तिच्यामधून बाहेर निघाले.

१९आणि जेव्हा तिच्या धन्यांनी बघितले की, आपल्या मिळकतीची आशा गेली तेव्हा त्यांनी पौल व सिला ह्यांना धरले व बाजारपेठेत अधिकार्‍यांकडे नेले; २०आणि त्यांना न्यायाधिशांपुढे आणले; आणि ते म्हणाले,
हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देत आहेत. २१आणि आम्ही रोमी आहोत म्हणून आम्ही आमच्यात घेणं किवा आचरणं योग्य नाही असे परिपाठ हे शिकवीत आहेत.
२२तेव्हा लोक, एकजुटीने, त्यांच्याविरुद्ध उभे राहिले; आणि न्यायाधिशांनी त्यांचे कपडे फाडून काढले व त्यांना छड्यांनी फटके मारण्याची आज्ञा केली. २३मग त्यांना पुष्कळ फटके लगावल्यावर त्यांनी त्यांना बंदिशाळेत टाकले. आणि त्यांनी बंदिपालाला त्यांना सुरक्षितपणे अटकेत ठेवायची आज्ञा दिली. २४त्याला अशी आज्ञा मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या कोठडीत टाकले आणि त्यांचे पाय खोड्यांत पक्के केले.
२५त्यानंतर मध्यरात्री पौल व सिला हे प्रार्थना करून देवाची स्तोत्रे गात होते. आणि बंदिवान त्यांचे ऐकत होते. २६तेव्हा अकस्मात् मोठा भूकंप झाला; त्यामुळे बंदिशाळेचे पाये हादरले; आणि लगेच सर्व दारे उघडली व प्रत्येक जणाच्या बेड्या सुटल्या.
२७तेव्हा बंदिपाल झोपेतून उठला व बंदिशाळेची दारे उघडी बघून त्याने आपली तरवार उपसली व बंदिवान पळालेत असे समजून तो स्वतःला ठार करणार होता. २८पण पौल मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला,
स्वतःला अपाय करू नकोस. कारण आम्ही सगळे आत आहोत.
२९तेव्हा त्याने दिवा मागवून आत उडी घेतली आणि भयभीत होऊन तो पौल व सिला ह्यांच्यासमोर पडला. ३०आणि त्याने त्यांना बाहेर आणल्यावर तो त्यांना म्हणाला,
धनी, माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे?”
३१आणि ते म्हणाले,
प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं तारण होईल.
३२मग त्याला व त्याच्या घरातल्या सर्वांना त्यांनी प्रभूचे वचन सांगितले. ३३आणि त्याने रात्रीच्या त्याच घटकेस त्यांना नेऊन त्यांचे वळ धुतले, आणि लगेच त्याने आणि त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. ३४आणि त्यांना आपल्या घरात आणून त्याने त्यांना जेवण वाढले; आणि हर्ष केला कारण त्याने व त्याच्या घरच्या सर्वांनी देवावर विश्वास ठेवला होता.
३५आणि सकाळ झाली तेव्हा न्यायाधिशांनी भालदारांना पाठवून निरोप दिला की, त्या माणसांना जाऊ दे. ३६बंदिपालाने हा निरोप पौलाला सांगितला,
न्यायाधिशांनी तुम्हाला सोडायला निरोप पाठवला आहे; म्हणून आता बाहेर या आणि शांतीनं जा.
३७पण पौल त्याला म्हणाला,
आम्ही रोमी आहोत, आणि त्यांनी आम्हाला दोषी ठरवल्याशिवाय,  उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकलं. आणि ते आता, गुप्त प्रकारे, आम्हाला घालवीत आहेत काय? मुळीच नाही; म्हणून त्यांनी स्वतः यावं आणि आम्हाला बाहेर काढावं.
३८तेव्हा भालदारांनी न्यायाधिशांना ह्या गोष्टी सांगितल्या. आणि हे रोमी आहेत हे त्यांनी ऐकले तेव्हा ते भ्याले. ३९मग ते आले आणि त्यांनी त्यांना विनंती केली व बाहेर आणले. आणि, त्यांनी नगर सोडून जावे म्हणून याचना केली. ४०मग ते बंदिशाळेतून बाहेर निघाले आणि लुदियेच्या घरी आले; त्यांनी बांधवांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि ते निघाले. 

—–प्रे. कृ. १७—–

आणि त्यांनी अंफिपुलीमधून व अपुल्लोनियामधून प्रवास केल्यावर ते थेसलनिकेस आले; तेथे यहुद्यांचे सभास्थान होते. तेव्हा पौल त्याच्या परिपाठाप्रमाणे तेथे त्यांच्यात जाऊ लागला. आणि त्याने तीन शब्बाथवारी, त्यांच्याबरोबर, शास्त्रलेखांवरून वादविवाद केला. त्याने उलगडा करून प्रतिपादन केले की, ख्रिस्ताने सोसणे व मेलेल्यांतून पुन्हा उठणे हे अगत्य होते, आणि मी ज्या येशूची तुम्हाला घोषणा करतो तो ख्रिस्त आहे. आणि त्यांच्यातील काहींनी हे मानले व ते पौल आणि सिला ह्यांच्याकडे वळले. त्यांच्याबरोबर भक्तिमान हेल्लेण्यांतील एक मोठा गट होता, आणि प्रमुख स्त्रियांतीलही थोड्या नव्हत्या.
पण यहुद्यांनी ईर्ष्येने प्रेरित होऊन खालच्या थरांतील टवाळ लोकांना जवळ घेतले, आणि घोळका जमवून त्यांनी नगरात गलबला केला व यासोनाच्या घरावर हल्ला करून, त्यांना लोकांत बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. आणि ते आढळले नाहीत तेव्हा त्यांनी यासोनाला व काही बंधूंना नगरन्यायाधिशांपुढे ओढून आणले आणि ते ओरडून म्हणाले,
जगाची उलथापालथ करणारे हे लोक इथं पण आले आहेत, आणि यासोनानं त्यांना घरात घेतलं आहे. हे सगळे जण असं सांगतात की, येशू म्हणून एक दुसरा राजा आहे, आणि हे कैसराच्या नियमाविरुद्ध वागतात.
आणि त्यांनी ह्या गोष्टी ऐकल्यावर त्यांनी लोकांना व न्यायाधिशांना अस्वस्थ केले; आणि त्यांनी यासोनाकडून व इतरांकडून जामीन घेतल्यावर त्यांना जाऊ दिले.

१०लगेच बांधवांनी पौल व सिला ह्यांना रात्री बिरुयाकडे धाडले; आणि ते तेथे आल्यावर यहुद्यांच्या सभास्थानात गेले. ११हे थेसलनिकेच्या यहुद्यांपेक्षा अधिक मोठ्या मनाचे होते, कारण त्यांनी पूर्ण उत्सुकतेने वचन स्वीकारले आणि त्या गोष्टी अशाच आहेत काय ह्याचा त्यांनी दररोज, शास्त्रलेखांवरून पुरावा पाहिला. १२ह्यामुळे त्यांच्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला;  त्याचप्रमाणे हेल्लेण्यांतील प्रतिष्ठित स्त्रियांनी व पुरुषांनीही विश्वास ठेवला; तेही थोडे नव्हते.
१३पण थेसलनिकेतल्या यहुद्यांना समजले की, पौलाने बिरुयातही देवाच्या वचनाची घोषणा केली, तेव्हा ते तेथेही गेले आणि त्यांनी लोकांना चिथावले व अस्वस्थ केले. १४तेव्हा बांधवांनी लगेच पौलाला समुद्राकडे जाण्यास पाठवून दिले, पण सिला व तिमथ्य तेथेच मागे राहिले. १५आणि ज्यांनी पौलाला नेले त्यांनी त्याला अथेनैस आणले; आणि सिला व तिमथ्य ह्यांनी आपल्याकडे शक्य तितक्या लवकर यावे अशी त्यांनी त्याची आज्ञा घेतल्यावर ते निघाले.

१६आता पौल त्यांच्यासाठी अथेनैस थांबला असता, ते नगर मूर्तींनी भरले होते हे त्याने पाहिले तेव्हा त्याचा आत्मा त्याच्या अंतर्यामी प्रक्षुब्ध झाला. १७म्हणून तो सभास्थानात यहुद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर,आणि दररोज जे त्याला बाजारात भेटत त्यांच्याबरोबर वादविवाद करी. १८मग एपिकूरियन पंथातले व स्तोइक पंथातले कित्येक तत्वज्ञानी त्याला विरोध करू लागले, आणि काही म्हणाले,
ह्या बडबड्याची काय सांगायची इच्छा आहे?”
आणि दुसरे म्हणाले,
हा परक्या देवाची घोषणा करणारा कोणी दिसतो,
कारण तो त्यांना येशू व पुनरुत्थान ह्यांची सुवार्ता सांगत होता. १९तेव्हा त्यांनी त्याला घेतले व अरियापगावर नेऊन म्हटले,
आपण ज्याविषयी बोलत आहा ते नवं शिक्षण काय आहे हे आम्हाला कळू शकेल काय? २०कारण आपण काही अपरिचित गोष्टी आमच्या कानांवर आणीत आहा; म्हणून ह्या गोष्टींचा अर्थ काय हे आम्हाला कळावं, अशी आमची इच्छा आहे.
२१कारण सर्व अथेनैकर आणि तेथे असलेले परके एखादी नवी गोष्ट सांगण्यात किवा ऐकण्यात वेळ घालवीत.

२२तेव्हा पौल अरियापगाच्या मध्यभागी उभा राहिला, आणि म्हणाला,
अहो अथेनैकरांनो, मी हे सगळ्या गोष्टींत पाहतो की, तुम्ही फार भाविक आहात. २३कारण मी फिरत असता तुमची पूजास्थानं पाहिली,  तेव्हा  अज्ञात देवाला असा कोरीव लेख असलेली एक वेदी मला आढळली. ह्याकरता, तुम्ही ज्याला न जाणता भजता त्याची मी तुम्हाला घोषणा करतो.
२४ज्या देवानं जग आणि त्यातील सर्व उत्पन्न केलं तो आकाश आणि पृथ्वी ह्यांचा प्रभू असल्यामुळं तो हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही. २५आणि जणू त्याला गरज आहे म्हणून मनुष्यांच्या हातून त्याची सेवा होत नाही. कारण तो सर्वांना जीवन, प्राण, आणि सर्व काही देतो. २६आणि त्यानं एकापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रं पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागावर वसती करायला उत्पन्न केली; आणि त्यानं त्यांचे नियोजित काळ, आणि त्यांच्या वसतीच्या सीमा ठरवल्या, २७ह्यासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे, कदाचित्, ते त्याच्यामागं चाचपडत गेल्यास तो त्यांना सापडावा; तरी आपल्यातील प्रत्येकापासून तो दूर नाही. २८कारण आपण त्याच्यात जगतो, त्याच्यात वावरतो आणि त्याच्यात आपलं अस्तित्व आहे. त्याचप्रमाणं, तुमच्या कवींपैकी कित्येक म्हणतात की, कारण खरोखर, आपण त्याचा वंश आहो. २९म्हणून जर आपण देवाचा वंश आहो तर माणसाच्या कलेनं आणि कल्पनेनं रूप दिलेल्या, सोन्याच्या, रुप्याच्या आणि दगडाच्या आकृतीसारखा देव आहे असं समजू नये. ३०म्हणून ह्या अज्ञानाच्या काळांकडे देवानं दुर्लक्ष केलं आहे, पण आता तो सर्वत्र, सर्व लोकांना पश्चात्ताप करायची आज्ञा देत आहे; ३१कारण त्यानं एक दिवस नेमलेला असून, तो तेव्हा, त्यानं नेमलेल्या मनुष्याकडून नीतीनं जगाचा न्याय करील; त्यानं त्याला मृतांतून पुन्हा उठवून सर्वांना ह्याची खातरी दिली आहे.
३२त्यांनी मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकले तेव्हा काहींनी त्याची थट्टा केली आणि दुसरे म्हणाले,
आम्ही तुमचं हे पुन्हा ऐकू.
३३ह्यानंतर पौल त्यांच्यामधून निघाला. ३४तरी त्यांच्यातील कित्येक जण त्याला बिलगून राहिले आणि त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यात दियोनुश्यस हा अरियापगी मनुष्य आणि दमारीस नावाची एक बाई आणि त्यांच्याबरोबरचे दुसरेही होते.

—–प्रे. कृ. १८—–

ह्या गोष्टीनंतर तो अथेनैहून निघाला आणि करिंथला आला. तेथे त्याला अक्विला नावाचा एक यहुदी भेटला; तो जन्माने पंतचा होता आणि आपली बायको प्रिस्किल्ला हिच्याबरोबर नुकताच इटलीहून आला होता. (कारण क्लौदियसने सर्व यहुद्यांना रोममधून निघून जायची आज्ञा दिली होती,) आणि तो त्यांच्याकडे गेला. आणि तो त्यांच्याच धंद्याचा असल्यामुळे त्यांच्याबरोबर राहिला व त्याने त्यांच्याबरोबर काम केले ते धंद्याने तंबू बनवणारे होते. आणि त्याने सभास्थानात प्रत्येक शब्बाथ दिवशी वादविवाद करून यहुद्यांची व हेल्लेण्यांची खातरी पटवली.
पण सिला व तिमथ्य मासेदोनियाहून खाली आले तेव्हा पौल वचनात मग्न होऊन यहुद्यांना निक्षून साक्ष देत राहिला की, येशू हा ख्रिस्त आहे. आणि जेव्हा त्यांनी विरोध केला व दुर्भाषण केले तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकली व त्यांना म्हटले,
तुमचं रक्त तुमच्या माथ्यांवर! मी निर्दोष आहे. ह्यापुढं मी परजनांकडे जाईन.
मग तो तेथून निघाला व तीत युस्तस ह्या नावाच्या एका मनुष्याच्या घरी गेला. तो देवाचा उपासक होता. त्याचे घर सभास्थानाच्या शेजारीच होते. आणि सभास्थानाचा अधिकारी क्रिस्पस ह्याने आपल्या घरच्या सर्वांसह प्रभूवर विश्वास ठेवला; शिवाय पुष्कळ करिंथकरांनी ऐकले आणि विश्वास ठेवला, आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला.
तेव्हा रात्री, प्रभू पौलाला दृष्टान्तात म्हणाला,
भिऊ नको, पण बोल; आणि उगा राहू नको. १०कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि तुला अपाय करायला कोणी तुझ्यावर येणार नाही; कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.
११आणि तो त्यांच्यात देवाचे वचन शिकवीत तेथे दीड वर्ष राहिला.

१२पण गल्लियो अखयाचा अधिकारी असताना यहुद्यांनी एकमताने पौलाविरुद्ध उठाव कला व त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले,
१३हा लोकांना नियमशास्त्रविरोधक प्रकारे देवाची उपासना करायला शिकवतो.
१४आणि, पौल तोंड उघडणार होता इतक्यात गल्लियो यहुद्यांना म्हणाला,
अहो यहुद्यांनो, हे काही अपराधाचं किंवा दुष्ट अत्याचाराचं प्रकरण असेल तर मी अर्थात् तुमचं ऐकलं पाहिजे; १५पण जर हा शब्दांचा, नावांचा आणि तुमच्या नियमशास्त्राचा प्रश्न असेल तर तुम्हीच पहा; कारण मी असल्या प्रकरणात तुमचा न्यायाधीश होऊ इच्छीत नाही.
१६आणि त्याने त्यांना न्यायासनापुढून हाकलले. १७तेव्हा सर्वांनी सभास्थानाचा अधिपती सोस्थेनेस ह्याला धरले आणि न्यायासनापुढे मार दिला; पण गल्लियोने कोणत्याच गोष्टीची पर्वा केली नाही.

१८ह्यानंतर पौल तेथे पुष्कळ दिवस राहिल्यावर त्याने बांधवांची रजा घेतली, आणि तो तेथून गलबताने सूरियाकडे निघाला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला हे निघाले व त्याचा नवस होता म्हणून त्याने किख्रियात डोक्यावरचे केस उतरले. १९आणि तो इफिसला आला, तेथे त्याने त्यांना सोडले; पण तो स्वतः सभास्थानात गेला व त्याने यहुद्यांबरोबर वादविवाद केला. २०आणि त्यांनी त्याला आपल्याजवळ अधिक काळ राहण्याची विनंती केली तेव्हा तो कबूल झाला नाही. २१पण त्याने त्यांची रजा घेतली, आणि तो म्हणाला,
जर देवाची इच्छा असेल तर मी तुमच्याकडे परत येईन.
मग तो इफिसहून गलबताने निघाला.
२२तो कैसरियास उतरल्यावर वर गेला आणि त्याने मंडळीला सलाम दिल्यावर तो अंत्युखियास खाली गेला; २३आणि त्याने तेथे काही काळ घालविल्यावर तो निघाला, आणि त्याने क्रमाने गलतिया प्रांतातून व फ्रुगियातून प्रवास करून सर्व शिष्यांना स्थिर केले.

२४ह्यावेळी अपुल्लो नावाचा, एक जन्माने अलेक्झांद्रियाचा यहुदी मनुष्य इफिसला आला; तो वक्ता होता व शास्त्रलेखांत अधिकारी होता. २५त्याला प्रभूच्या मार्गाचे शिक्षण मिळाले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे तो बोलत असे व प्रभूच्या गोष्टी नीट शिकवीत असे; पण त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता. २६आणि तो सभास्थानात धैर्याने बोलू लागला. आणि प्रिस्किल्ला व अक्विला ह्यांनी त्याचे ऐकले तेव्हा त्यांनी त्याला आपल्याजवळ घेतले व त्याला देवाच्या मार्गाचे अधिक नीट स्पष्टीकरण केले; २७आणि त्याने जेव्हा अखयास जायचा विचार केला तेव्हा बांधवांनी त्याला उत्तेजन दिले व शिष्यांनी त्याचे स्वागत करावे म्हणून त्यांना लिहिले. आणि तो पोहचला तेव्हा ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांचे फार साह्य केले. २८कारण तो शास्त्रलेखांवरून, येशू हा ख्रिस्त आहे, हे दाखवीत असे; आणि मोठ्या जोरदारपणे यहुद्यांना लोकांत निरुत्तर करीत असे.

—–प्रे. कृ. १९—–

आणि असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल वरच्या भागांतून जाऊन इफिसला आला; तेथे त्याला काही शिष्य भेटले. तेव्हा तो त्यांना म्हणाला,
तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?”
आणि ते त्याला म्हणाले,
नाही. पवित्र आत्मा आहे, हेही आम्ही ऐकलेलं नाही.
तेव्हा तो त्यांना म्हणाला,
मग तुम्ही कशात बाप्तिस्मा घेतला?”
आणि ते म्हणाले,
योहानाच्या बाप्तिस्म्यात.
तेव्हा पौल त्यांना म्हणाला,
योहान खरोखर पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे, आणि लोकांना सांगत असे की, त्याच्यामागून येणार्‍यावर त्यांनी विश्वास ठेवावा; म्हणजेच येशूवर.
आणि त्यांनी ते ऐकले तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. आणि, पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला, ते अन्य भाषांत बोलू लागले आणि संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे बारा जण होते.
मग तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याच्या गोष्टींविषयी वादविवाद करीत व खातरी पटवीत तीन महिने धैर्याने बोलला. पण जेव्हा कित्येक कठिण झाले आणि विश्वास न ठेवता ते त्या मार्गाविषयी लोकांपुढे वाईट बोलू लागले, तेव्हा तो त्यांच्यामधून निघाला, त्याने शिष्यांना वेगळे केले व तुरन्नाच्या पाठशाळेत तो दरदोज वादविवाद करू लागला.
१०हे सतत दोन वर्षे चालू राहिले; त्यामुळे आसियात राहणार्‍या सर्व लोकांनी, यहुद्यांनी व हेल्लेण्यांनीही प्रभूचे वचन ऐकले. ११आणि देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडविले. १२ह्यामुळे, जे आजारी असत त्यांच्याकडे त्याच्या अंगावरून फडके आणि कपडे नेत आणि त्यांच्यातले रोग जात व त्यांच्यातून दुष्ट आत्मे बाहेर निघत.
१३तेव्हा भुते काढणार्‍या भटक्या यहुद्यांतील काही जणांनी दुष्ट आत्मे लागलेल्यांवर प्रभू येशूचे नाव घेण्यास, असे म्हणण्यास सुरुवात केली की, मी तुम्हाला, पौल ज्याची घोषणा करतो त्या येशूच्या नावानं शपथ घालतो. १४आणि स्किवा नावाच्या एका यहुदी वरिष्ठ याजकाचे सात मुलगे होते; आणि त्यांनीही तसे केले. १५तेव्हा दुष्ट आत्म्याने उत्तर देऊन म्हटले, मी येशूला जाणतो, आणि पौलाला जाणतो, पण तुम्ही कोण?’ १६आणि तो दुष्ट आत्मा ज्या माणसात होता त्याने त्यांच्यावर उडी घेऊन, एकाएकाला काबूत आणले आणि तो त्यांच्याविरुद्ध इतका प्रबळ झाला की, ते उघडे नागडे व जखमी होऊन त्या घरामधून बाहेर पळाले.
१७आणि हे इफिसात राहणार्‍या सर्व यहुद्यांना व हेल्लेण्यांनाही माहीत झाले; तेव्हा त्या सर्वांवर दहशत पडली आणि प्रभूचे नाव थोर मानले गेले. १८आणि विश्वास ठेवणारे पुष्कळ जण झाले, आणि ते ज्या गोष्टी करीत असत त्या त्यांनी कबूल केल्या व सांगितल्या. १९जे लोक जादूटोणा करीत असत त्यांच्यातल्याही पुष्कळांनी आपली पुस्तके एकत्र आणली व ती सर्वांसमक्ष जाळली; त्यांनी त्यांच्या किंमतीची बेरीज केली; ती पन्नास हजार रुप्याच्या नाण्यांइतकी भरली. २०अशा प्रकारे प्रभूच्या वचनाची बळाने वाढ झाली व ते प्रबळ झाले.

२१ह्या गोष्टी पूर्ण झाल्यावर पौलाने आपल्या आत्म्यात ठरवले की,  मासेदोनियातून व अखयातून प्रवास केल्यावर यरुशलेमला जावे, आणि म्हटले की,
मी तिथं पोहचल्यावर मला रोमही बघितलं पाहिजे.
२२तेव्हा त्याने आपली सेवा करणार्‍यांपैकी तिमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियास पाठविले पण तो स्वतः काही दिवस आसियात राहिला.

२३त्याच वेळी, तेथे त्या मार्गाविषयी एक मोठी खळबळ झाली. २४कारण,  दिमित्रियस नावाचा एक सोनार अर्तमीचे रुप्याचे देव्हारे करून कारागिरांना पुष्कळ काम देत असे. २५त्याने त्यांना व त्याच्या धंद्यातील इतर कामकर्‍यांना एकत्र बोलवून त्यांना म्हटले,
गड्यांनो, तुम्ही हे जाणता की, ह्या धंद्यात आपली मिळकत आहे. २६पण तुम्ही जाणता आणि ऐकता की, हा पौल म्हणतो, जे हातांनी केले गेलेत ते देवच नाहीत. आणि ह्याने केवळ इफिसात नाही पण बहुतेक सर्व आसियात लोकांचं मन वळवून त्यांना फिरवलं आहे. २७म्हणून घोका हा आहे की, आपला धंदाच बदनामीत जाईल असं नाही, पण महान अर्तमी देवीचं मंदिरही काहीच नाही असं गणलं जाईल. आणि सर्व आसिया आणि सर्व जग जिला भजत आहे तिची महती नष्ट केली जाईल.
२८आणि त्यांनी हे ऐकले तेव्हा ते रागाने भरले आणि ओरडून म्हणाले,
इफिसकरांची महान अर्तमी!
२९तेव्हा सगळे नगर घोळक्यांनी भरले; त्यांनी पौलाचे प्रवासी-सोबती,  मासेदोनियाचे गायस आणि अरिस्तार्ख ह्यांना धरले व ते एकमताने नाटकगृहात घुसले. ३०पौल त्या लोकांत जाऊ इच्छीत असता, शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही. ३१शिवाय त्याचे मित्र असलेल्या, आसियाच्या अधिकार्‍यांतील काही जणांनी त्याने स्वतःला नाटकगृहात ढकलू नये म्हणून त्याला निरोप धाडून तशी विनंती केली. ३२तेव्हा तेथे कोणी काही, तर कोणी आणखी काही ओरडू लागले; कारण मंडळी गोंधळली होती आणि बहुतेकांना ते का जमले होते हे माहीत नव्हते. ३३पण यहुद्यांनी अलेक्झांदरला पुढे नेले, आणि घोळक्यातील काही जण त्याच्याशी बोलले. तेव्हा अलेक्झांदरने हाताने खुणावले, आणि लोकांना प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला. ३४पण तो यहुदी आहे हे त्यांना समजले तेव्हा ते सगळे एका आवाजात, इफिसकरांची महान अर्तमी! असे सुमारे दोन तास ओरडत राहिले.
३५मग शिरस्तेदाराने लोकांना समजावून म्हटले,
अहो इफिसकर, हा इफिसकरांचा गाव महान अर्तमीचा आणि स्वर्गातून पडलेल्या तिच्या मूर्तीचा मंदिररक्षक आहे, हे न जाणणारा कोणी मनुष्य आहे काय? ३६आणि ह्या गोष्टी निर्विवाद असल्यामुळं तुम्ही शांत असावं आणि काहीही घाईनं करू नये हे आवश्यक आहे. ३७कारण, तुम्ही ज्या लोकांना इथं आणलं आहे ते मंदिरं लुटणारे किंवा आपल्या देवीची निंदा करणारे नाहीत. ३८म्हणून दिमेत्रियस आणि त्याच्याबरोबर असलेले कारागीर ह्यांचा जर कोणाशी वाद असेल तर न्यायालयं उघडी आहेत आणि न्यायाधीशही आहेत. त्यांनी एकमेकांवर आरोप करावेत. ३९पण तुम्ही आणखी काही विचारणार असाल तर ते रीतसर सभेत ठरवलं जाईल. ४०आपल्याला ह्या जमावाबद्दल उत्तर देता येईल असं काहीच कारण नसल्यामुळं, आपण आजच्या उठावाबद्दल आपल्यावर आरोप केला जाण्याच्या धोक्यात आहोत.
४१आणि असे बोलून त्याने मंडळीला लावून दिले.

—–प्रे. कृ. २०—–

मग गलबला थांबल्यावर पौलाने शिष्यांस बोलवून बोध केला, आणि त्यांना वंदन करून तो मासेदोनियाला जायला निघाला. मग तो त्या भागांत फिरला आणि त्याने त्यांना पुष्कळ बोध केल्यावर तो हेल्लास प्रांतात आला, आणि तीन महिने राहिला. आणि सूरियाकडे गलबताने निघणार असताना यहुद्यांनी त्याच्याविरुद्ध कट केला, तेव्हा त्याने मासेदोनियातून परत जायचा विचार केला; आणि पुर्‍हाचा मुलगा सोपेतर बिरुयाकर, थेसलनिकेकरांपैकी अरिस्तार्ख व सुकुंद, दर्बेचा गायस आणि तिमथ्य आणि आसियातले तुखीक व त्रफीम हे त्याच्याबरोबर आले. ते पुढे जाऊन आमच्यासाठी त्रोवसाला थांबले. आणि बेखमीर भाकरींच्या दिवसांनंतर आम्ही फिलिपैहून गलबताने निघालो, आणि पाच दिवसांत त्रोवसाला त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही सात दिवस राहिलो.

आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्यास एकत्र जमलो. तेव्हा पौलाने त्यांना उपदेश केला; तो सकाळी निघणार होता आणि मध्यरात्रीपर्यंत त्याने भाषण लांबवले. आणि ज्या वरच्या खोलीत ते जमले होते तेथे पुष्कळ दिवे होते.
युतुख नावाचा एक तरुण तेथे खिडकीत बसला होता. तो गाढ झोपेने भारावला होता; आणि पौल आणखी उपदेश करीत असता, तो झोपेने भारावून, तिसर्‍या मजल्यावरून खाली पडला आणि मेलेला हाती लागला. १०तेव्हा पौल खाली गेला, त्याच्यावर पालथा पडला, आणि त्याने त्याला कवटाळले व म्हटले,
तुम्ही स्वतःला अस्वस्थ करू नका; कारण त्याचा जीव त्याच्यात आहे.
११म्हणून तो पुन्हा वर आल्यावर त्याने भाकर मोडली आणि खाल्ली व त्याने त्यांच्याशी पुष्कळ वेळ, अगदी पहाटेपर्यंत संभाषण केल्यावर तो निघाला. १२आणि ते त्या मुलाला जिवंत घेऊन गेले व त्यांचे फार सांत्वन झाले.

१३आणि आम्ही गलबताकडे खाली गेलो, आणि अस्साकडे निघालो; आणि तेथे पौलाला गलबतावर घेणार होतो, कारण तो स्वतः पायी जाणार होता म्हणून त्याने तसे सांगितले होते. १४आणि तो आम्हाला अस्साला भेटला तेव्हा आम्ही त्याला बरोबर घेतले, आणि आम्ही मितुलेनास आलो. १५आणि तेथून निघून दुसर्‍या दिवशी खियासमोर आलो, पुढच्या दिवशी सामा येथे आलो, आणि त्याच्या पुढच्या दिवशी मिलेतास आलो. १६कारण आसियात काळ न घालवता इफिसवरून पुढे जावे असे पौलाने ठरवले होते, कारण त्याला शक्य असल्यास त्याला पन्नासाव्या दिवसाच्या सणासाठी यरुशलेमला जाता यावे म्हणून तो घाई करीत होता.
१७त्याने मिलेताहून इफिसला निरोप धाडला आणि मंडळीच्या वडिलांना बोलावले. १८आणि ते त्याच्याकडे आले तेव्हा तो त्यांना म्हणाला,
मी आसियात पाय टाकला त्या पहिल्या दिवसापासून, सर्व काळात, मी तुमच्याशी कसा झालो हे तुम्ही जाणता. १९मी मनाच्या पूर्ण लीनतेने, अश्रू गाळीत, आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेल्या परीक्षांत मी प्रभूची सेवा कशी केली, २०आणि तुमच्या हिताचं असलेलं काहीच मी कसं मागं ठेवलं नाही पण तुम्हाला दाखवलं आहे, आणि लोकांत आणि घरोघरी मी तुम्हाला शिकवलं आहे; २१आणि देवासमोर पश्चात्ताप करणं, आणि आपला प्रभू येशू ह्याच्यावर विश्वास ठेवणं ह्याविषयी मी यहुद्यांना आणि हेल्लेण्यांना निक्षून साक्ष दिली आहे हे तुम्ही जाणता.
२२आणि आता बघा, मी आत्म्यानं बेड्यांत पडून यरुशलेमला जात आहे. तिथं माझ्यावर काय काय येईल हे मला माहीत नाही, २३पण पवित्र आत्मा प्रत्येक नगरात मला साक्ष देऊन सांगत आहे की, बेड्या आणि संकटं माझी वाट पहात आहेत. २४पण, मी माझी धाव, आणि प्रभू येशूकडून मला मिळालेली, देवाच्या कृपेच्या सुवार्तेची निक्षून साक्ष द्यायची सेवा मी पुरी करावी म्हणून मी माझा जीवही काही मोलाचा मानीत नाही.
२५आणि आता बघा, मी ज्या तुमच्यात, राज्याची घोषणा करीत फिरलो ते तुम्ही सर्व जण माझं तोंड पुन्हा पाहणार नाही हे मी जाणतो. २६म्हणून आज, मी तुम्हाला निक्षून सांगतो की, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. २७कारण मी देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यात काही मागं ठेवलं नाही. २८म्हणून तुम्ही स्वतःकडे, आणि त्यानं जी देवाची मंडळी आपल्या रक्तानं मिळविली आहे तिचं पालन करण्यासाठी पवित्र आत्म्यानं तुम्हाला ज्यावर रक्षक म्हणून नेमलं आहे त्या सर्व कळपाकडे लक्ष द्या. २९कारण मी हे जाणतो की, मी गेल्यावर कळपाची गय न करणारे, क्रूर लांडगे तुमच्यात शिरतील. ३०आणि तुमच्यातूनच लोक उठतील,आणि आपल्यामागं शिष्यांना ओढायला ते विपरीत गोष्टी बोलतील; ३१म्हणून तुम्ही जागृत रहा आणि आठवण ठेवा की, तीन वर्षांत मी रात्रंदिवस अश्रू गाळीत, प्रत्येक जणाला बोध करायचं थांबवलं नाही.
३२मी आता तुम्हाला देवावर आणि त्याच्या कृपेच्या वचनावर सोपवतो. ते तुमची उभारणी करायला आणि तुम्हाला, पवित्र केलेल्या सर्वांबरोबर,  वतन द्यायला समर्थ आहे. ३३मी कोणाच्या चांदीसोन्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. ३४कारण तुम्ही स्वतः जाणता की, माझ्या स्वतःच्या आणि माझ्या सोबत्यांच्या गरजांसाठी ह्या हातांनी काम केलं आहे. ३५मी तुम्हाला सगळ्या गोष्टींत दाखवलं आहे की, तुम्ही असे श्रम करून जे दुर्बळ आहेत त्यांना तुम्ही कसं साह्य केलं पाहिजे, आणि प्रभू येशूनं जे म्हटलं आहे की, घेण्यापेक्षा देणं अधिक आशीर्वादित आहे त्या त्याच्या शब्दांची आठवण ठेवली पाहिजे.
३६आणि असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. ३७तेव्हा ते सगळे पुष्कळ रडले,आणि पौलाच्या गळ्यात पडून त्यांनी त्याचे मुके घेतले. ३८आणि तुम्ही माझं तोंड पुन्हा पाहणार नाही ह्या त्याच्या शब्दांमुळे त्यांना सर्वाधिक दुःख झाले. आणि त्यांनी त्याला गलबतापर्यंत पोहचवले.  

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s