Acts 21-25

प्रेषितांची कृत्ये

—–प्रे. कृ. २१—–

आणि असे झाले की, त्यांना सोडल्यावर आणि गलबताने निघाल्यावर आम्ही सरळ पल्ल्याने कोसापर्यंत आलो; पुढच्या दिवशी रुदासपर्यंत आणि तेथून पातर्‍यास आलो. आणि आम्हाला फैनिकेस जाणारे गलबत मिळाल्यामुळे आम्ही त्यावर चढलो आणि निघालो. आता आम्हाला कुप्र दिसले, तेव्हा आम्ही ते उजवीकडे सोडले आणि आम्ही सूरियाकडे गेलो व सोरला आलो; कारण ते गलबत तेथे आपला माल उतरवणार होते. आणि तेथे आम्हाला शिष्य भेटले म्हणून सात दिवस राहिलो. आणि त्यांनी आत्म्याच्या द्वारे पौलाला सांगितले की, त्याने यरुशलेमला वर जाऊ नये.
आणि ते दिवस पूर्ण झाल्यावर आम्ही निघालो आणि जाऊ लागलो, तेव्हा त्या सगळ्यांनी, बायकामुलांना बरोबर घेऊन, आम्ही नगरातून बाहेर येईपर्यंत आम्हाला पोहचवले; आणि आम्ही किनार्‍यावर गुडघे टेकून प्रार्थना केली; आणि एकमेकांची रजा घेतल्यावर आम्ही गलबतावर चढलो व ते घरी परतले.
मग आम्ही सोरपासूनचा आमचा पल्ला पुरा केला व आम्ही तोलेमैस येथे आलो; आम्ही बांधवांना सलाम केला आणि त्यांच्याबरोबर आम्ही एक दिवस राहिलो. मग दुसर्‍या दिवशी आम्ही निघालो आणि कैसरियास आलो, आणि सातांपैकी जो फिलिप सुवार्तिक तेथे होता त्याच्या घरी जाऊन त्याच्याकडे राहिलो. त्याला चार मुली होत्या; त्या कुमारिका होत्या व त्या संदेश देत असत.
१०आणि आम्ही पुष्कळ दिवस राहिल्यानंतर अगब नावाचा एक संदेष्टा यहुदियाहून आला. ११तो आमच्याकडे आला असता त्याने पौलाचा कमरबंद घेतला, आणि स्वतःचे हातपाय बांधले, आणि तो म्हणाला,
“पवित्र आत्मा हे सांगतो की, ‘हा कमरबंद ज्याचा आहे त्या माणसाला यहुदी यरुशलेमात असे बांधतील आणि परजनांच्या हाती देतील. ’ ”
१२आम्ही ह्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याने यरुशलेमला वर जाऊ नये, म्हणून आम्ही व तिथल्यांनीही त्याला विनंती केली. १३तेव्हा पौलाने उत्तर दिले,
“तुम्ही रडून आणि माझ्या मनाचे तुकडे करून काय करता? कारण मी बेड्यांत पडायलाच नाही, पण प्रभू येशूच्या नावाकरता यरुशलेमात मरायलाही तयार आहे.”
१४आणि तो मानीना तेव्हा आम्ही उगे राहिलो आणि म्हणालो,
“प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”

१५मग त्या दिवसांनंतर आम्ही आमचे सामान घेतले व आम्ही यरुशलेमला वर गेलो. १६तेव्हा कैसरियातले काही शिष्यही आमच्याबरोबर आले; आणि त्यांनी आपल्याबरोबर कुप्राच्या नासोनाला आणले. हा एक जुना शिष्य होता आणि त्याच्याकडे आम्ही उतरणार होतो. १७आम्ही यरुशलेमला आलो तेव्हा बांधवांनी आमचे आनंदाने स्वागत केले. १८मग पुढच्या दिवशी पौल आमच्याबरोबर याकोबाकडे गेला, आणि सर्व वडील उपस्थित होते. १९आणि त्याने त्यांना सलाम केल्यावर देवाने त्याच्या सेवेद्वारे परजनांत कोणत्या गोष्टी केल्या त्या सर्व त्याने त्यांना एकेक सांगितल्या.
२०हे ऐकून त्यांनी देवाचे गौरव केले आणि ते त्याला म्हणाले,
“बंधू, तू पाहतोस की, कितीतरी शेकडोशे यहुदी विश्वास ठेवणारे झाले आहेत, आणि ते सगळे नियमशास्त्राविषयी आवेशी आहेत. २१आणि त्यांना तुझ्याविषयी सांगण्यात आले आहे की, जे सर्व यहुदी परजनांत राहतात त्यांना तू शिकवतोस की, त्यांनी मोशेचा त्याग करावा, आणि म्हणतोस की, त्यांनी मुलांची सुनत करू नये, आणि परिपाठानुसार चालू नये, २२तर मग काय? कारण तू आला आहेस हे सर्वांना कळणार. २३तर आम्ही तुला सांगतो हे कर, आमच्यात ज्यांनी नवस केलेत असे चौघे जण आहेत. २४तू त्यांना बरोबर घे, आणि त्यांच्याबरोबर तूपण स्वतःला शुद्ध कर, आणि त्यांच्यासाठी डोकी मुंडण्याचा खर्च कर. आणि सर्वांना कळेल की,  तुझ्या बाबतीत त्यांना सांगण्यात आलेल्या गोष्टी काहीच नाहीत,  आणि तू पण नीट चालणारा असून, नियमशास्त्राचे पालन करतोस. २५पण विश्वास ठेवणार्‍या परजनांविषयी आम्ही लिहून निर्णय दिला आहे की, त्यांनी स्वतःला, मूर्तीला वाहिलेली अर्पणं आणि रक्त, आणि मुरगळून मारलेले प्राणी आणि जारकर्म, ह्यांपासून जपावं.”

२६मग त्या लोकांना पौलाने घेतले आणि दुसर्‍या दिवशी त्यांच्याबरोबर त्याने स्वतःला शुद्ध केले; आणि तो त्यांच्याबरोबर, त्या प्रत्येकासाठी अर्पण अर्पून होईपर्यंत शुद्धिकरणाचे दिवस पूर्ण करण्याविषयी सविस्तर सांगण्यास मंदिरात गेला. २७आणि ते सात दिवस पूर्ण होत आले असता, आसियातील यहुद्यांनी त्यांना मंदिरात पाहिले. तेव्हा त्यांनी लोकांना चिथावले आणि त्याच्यावर हात टाकले; २८आणि ते ओरडले,
“अहो इस्राएलाचे लोकहो, धावा! हाच मनुष्य आपल्या लोकांविरुद्ध,  नियमशास्त्राविरुद्ध आणि ह्या स्थानाविरुद्ध सगळ्या लोकांना सगळीकडे शिकवीत असतो. आणि शिवाय, ह्यानं हेल्लेण्यांना मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळवलं आहे.”
(२९कारण त्यांनी अगोदर त्याच्याबरोबर इफिसकर त्रफीम ह्याला नगरात पाहिले होते आणि पौलाने त्याला मंदिरात आणले आहे असे ते समजत होते.) ३०तेव्हा सर्व नगर उठले, आणि लोक घोळका करून धावले; आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर काढले आणि दारे बंद केली गेली.
३१आणि ते त्याला ठार मारायला पहात असता पलटणीच्या सेनापतीकडे बातमी आली की, सर्व यरुशलेम गोंधळात आहे. ३२त्याने लगेच शिपायांना व शतपतींना बरोबर घेतले व तो त्यांच्याकडे खाली धावला आणि त्यांनी जेव्हा सेनापतीला व शिपायांना बघितले तेव्हा पौलाला मारणे थांबवले. ३३मग सेनापतीने पुढे पाऊल टाकून त्याला धरले आणि दोन साखळ्यांनी त्याला बांधायची आज्ञा दिली. आणि हा कोण, आणि काय करीत होता ह्याची चौकशी केली. ३४तेव्हा गर्दीतून कोणी काही आणि कोणी काही ओरडू लागले. आणि जेव्हा त्याला त्या गलबल्याबद्दल काहीच खातरीलायक कळू शकले नाही तेव्हा त्याने त्याला गढीत नेण्याची आज्ञा दिली. ३५आणि असे झाले की, तो पायर्‍यांवर आला तेव्हा लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले. ३६कारण त्यांच्या मागोमाग लोकांचा घोळका ’त्याची वाट लावा’ असे ओरडत येत होता.
३७आणि पौलाला गढीत नेत असता तो सेनापतीला म्हणाला,
“मी आपल्याशी बोलू का ?”
आणि तो म्हणाला,
“तुला हेल्लेणीत बोलता येतं का? ३८ह्या आजच्या दिवसापर्यंत ज्या मिसर्‍यानं उलथापालथ करून चार हजार खुनी लोक रानात नेले तो तूच नाहीस काय?”
३९पण पौल म्हणाला,
“मी किलिकियातील तार्स येथील यहुदी आहे; मी एखाद्या हलक्या नगराचा रहिवासी नाही. आणि मी आपल्याला विनवणी करतो की, मला लोकांशी बोलू द्या.”
४०आणि त्याने परवानगी दिली तेव्हा पौल पायर्‍यांवर उभा राहिला व त्याने लोकांना आपल्या हातांनी खुणावले, आणि पुष्कळ शांतता झाली तेव्हा तो त्यांना उद्देशून इब्री भाषेत बोलू लागला व म्हणालाः  

—–प्रे. कृ. २२—–

“अहो बंधूंहो, पितेहो, आता माझं तुम्हाला प्रत्युत्तर ऐका.”
(आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, त्यांना उद्देशून तो हे इब्री भाषेत बोलला तेव्हा त्यांनी अधिक शांतता राखली. मग तो म्हणाला,)
“मी एक यहुदी मनुष्य आहे. किलिकियातील तार्स इथं जन्मलो. पण मी ह्या नगरात वाढलो. मला गमलिएलाच्या पायांपाशी आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्राच्या काटेकोर पद्धतीनं शिक्षण मिळालं आणि जसे तुम्ही सगळे आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. आणि, मी ह्या मार्गाचा मरणाच्या शिक्षेपर्यंत पाठलाग केला; मी पुरुषांना आणि स्त्रियांनाही बेड्या घालून बंदिशाळेत नेलं. ह्याविषयी श्रेष्ठ याजक आणि सर्व वडीलसभा माझ्या बाजूनं साक्ष देतील. मी त्यांच्याकडून बांधवांना पत्रं घेतली आणि मी दिमिष्कास जात होतो; म्हणजे तिथं होते त्यांनादेखील शिक्षा व्हावी म्हणून यरुशलेमला बांधून आणावं.
“आणि असं झालं की, मी माझा प्रवास करीत दिमिष्काजवळ आलो असता, दुपारच्या सुमारास, आकाशामधून, अकस्मात्, एक मोठा प्रकाश माझ्या सभोवती चमकला, आणि मी खाली पडलो; तेव्हा मला, ‘शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?’, असं माझ्याशी बोलणारा एक आवाज ऐकू आला. आणि मी उत्तर दिलं, ‘प्रभू, तू कोण आहेस?’ आणि तो म्हणाला, ‘तू ज्याचा छळ करतोस तो नासोरी येशू मी आहे.’ आणि तेव्हा जे माझ्याबरोबर होते त्यांनी तो प्रकाश खरोखर पाहिला, पण जो माझ्याशी बोलला त्याचा आवाज त्यांनी ऐकला नाही. १०आणि मी म्हणालो, ‘प्रभू, मी काय करू?’ आणि प्रभू म्हणाला, ‘ऊठ, आणि दिमिष्कास जा, आणि तुझ्यासाठी, तू कराव्यात म्हणून, ज्या सर्व गोष्टी नेमलेल्या आहेत त्यांविषयी तुला तिथं सांगण्यात येईल.’ ११मला त्या प्रकाशाच्या प्रखर तेजामुळं दिसेनासं झालं, तेव्हा जे माझ्याबरोबर होते त्यांनी मला हाताला धरून नेलं, आणि मी दिमिष्कास आलो.
१२“आणि एक हनन्या म्हणून, नियमशास्त्रानुसार धार्मिक मनुष्य तिथं होता. आणि तिथं राहणार्‍या सर्व यहुद्यांत त्याची ग्वाही दिली जात होती. १३तो माझ्याजवळ येऊन उभा राहिला, आणि म्हणाला, ‘बंधू शौल, तुला दृष्टी यावी.’ आणि मी त्याच घटकेस त्याच्याकडे वर पाहिलं. १४आणि तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवानं तुला ह्यासाठी निवडलं आहे की, तुला त्याची इच्छा कळावी, तू त्या नीतिमान पुरुषाला बघावंस आणि त्याच्या तोंडचे शब्द ऐकावेस. १५कारण तू जे पाहिलं आहेस आणि ऐकलं आहेस त्याविषयी तू सर्व लोकांपुढं त्याचा साक्षी होशील. १६आणि आता का थांबतोस? ऊठ, आणि बाप्तिस्मा घे; आणि त्याच्या नावाचा धावा करून तुझी पापं पुसून टाक.’
१७“मग असं झालं की, मी यरुशलेमला परत आल्यावर मंदिरात प्रार्थना करीत होतो; आणि तंद्रीत असता, १८मी त्याला बघितलं आणि तो मला म्हणाला, ‘घाई कर, तू लवकर यरुशलेमच्या बाहेर नीघ; कारण ते माझ्याविषयी तुझी साक्ष स्वीकारणार नाहीत.’ १९तेव्हा मी म्हणालो, ‘प्रभू, त्यांना ठाऊक आहे की, मी तुझ्यावर विश्वास ठेवणार्‍यांस अटकेत घातलं, आणि प्रत्येक सभास्थानात फटके मारवले; २०आणि तुझा साक्षी स्तेफन ह्याचं रक्त पाडलं जात असता मीही जवळ उभा राहून संमती देत होतो, आणि ज्यांनी त्याला ठार मारलं त्यांचे कपडे संभाळीत होतो.’ २१आणि तो म्हणाला, ‘नीघ, कारण मी तुला दूर, परजनांकडे पाठवून देईन.’ ”

२२त्यांनी ह्या वाक्यापर्यंत त्याचे ऐकले, पण मग आपला आवाज चढवला आणि म्हटले,
“असल्या ह्याची पृथ्वीवरून वाट लावा, कारण ह्यानं जिवंत राहणं योग्य नाही.”
२३आणि ते ओरडत असता, कपडे काढून फेकीत असता, आणि हवेत धूळ उडवीत असता, २४सेनापतीने त्याला गढीत घेऊन जाण्याची आज्ञा दिली; आणि ते त्याच्याविरुद्ध इतके का ओरडत होते हे त्याला माहीत व्हावे म्हणून त्याने त्याला फटके मारून विचारण्यास सांगितले.
२५आणि त्यांनी त्याला वाद्यांनी बांधले तेव्हा पौल जवळ उभ्या असलेल्या शतपतीला म्हणाला,
“आपण रोमी मनुष्याला, त्याच्यावर दोष ठेवला नसताना, फटके मारणं योग्य आहे काय?”
२६शतपतीने हे ऐकले तेव्हा तो गेला आणि सेनापतीशी बोलून म्हणाला,
“आपण हे काय करणार आहात? कारण हा मनुष्य रोमी आहे.”
२७तेव्हा सेनापती येऊन त्याला म्हणाला,
“मला सांग, तू रोमी आहेस काय?”
तो म्हणाला,
“हो.”
२८मग सेनापतीने उत्तर दिले,
“मी हे नागरिकत्व मोठी रक्कम देऊन मिळवलं आहे.”
तेव्हा पौल म्हणाला,
“मी तर जन्मानं रोमी आहे.”
२९आणि मग, जे त्याची चौकशी करणार होते ते लगेच त्याला सोडून गेले. आणि तो रोमी आहे हे माहीत झाल्यावर सेनापती भ्याला होता, आणि ह्याचे कारण त्याने त्याला बांधले होते.

३०आणि यहुदी त्याच्यावर का आरोप करीत होते ह्याविषयी त्याला काही खातरीलायक कळावे, अशी त्याची इच्छा असल्यामुळे त्याने त्याला सकाळी सोडले, आणि वरिष्ठ याजकांना व त्यांच्या सर्व न्यायसभेला उपस्थित राहण्याची आज्ञा करून त्याने पौलाला खाली आणले व त्यांच्यापुढे उभे केले.  

—–प्रे. कृ. २३—–

तेव्हा पौलाने न्यायसभेकडे टक लावून म्हटले,
“अहो बंधूंनो, मी सर्वस्वी चांगल्या विवेकानं आजवर देवासमोर वागलो आहे.”
तेव्हा श्रेष्ठ याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना त्याच्या तोंडावर मारण्याची आज्ञा केली. तेव्हा पौल त्याला म्हणाला,
“अरे पांढर्‍या भिताड्या, देव तुला मारील. तू नियमशास्त्राखाली माझा न्याय करायला बसतोस, आणि नियमशास्त्राविरुद्ध मला मारायची आज्ञा देतोस.”
तेव्हा जे जवळ उभे होते ते त्याला म्हणाले,
“तू देवाच्या श्रेष्ठ याजकाची निंदा करतोस काय?”
तेव्हा पौल म्हणाला,
“बंधूंनो, हे श्रेष्ठ याजक आहेत हे मला माहीत नव्हतं. कारण असं लिहिलं आहे की, ‘तू आपल्या लोकांच्या अधिकार्‍यांविषयी वाईट बोलू नकोस.’ ”
पण पौलाने जेव्हा ओळखले की, तेथे एका बाजूस सदोकी आणि दुसर्‍या बाजूस परोशी होते तेव्हा तो न्यायसभेत ओरडून म्हणाला,
“अहो बंधूंनो, मी परोशी आहे, आणि परोश्याचा मुलगा आहे. आणि ह्या आशेबाबत आणि मृतांच्या पुनरुत्थानाबाबत माझी चौकशी होत आहे.”
आणि जेव्हा तो असे बोलला तेव्हा परोशी व सदोकी ह्यांच्यात विरोध उद्भवला आणि त्या लोकांत फूट पडली. (कारण सदोकी म्हणतात की, पुनरुत्थान नाही, देवदूत नाहीत आणि आत्मा नाही; पण परोशी हे सर्व पतकरतात.) तेव्हा मोठा गलबला झाला आणि परोश्यांच्या बाजूचे शास्त्री उठले, आणि विरोध करून म्हणाले,
“आम्हाला ह्याच्यात काही वाईट आढळत नाही; पण कोणी आत्मा किंवा देवदूत ह्याच्याशी बोलला असेल तर?”
१०आणि मोठा विरोध उद्भवला तेव्हा ते पौलाला ओढून ताणून त्याचे तुकडे करतील अशी सेनापतीला भीती वाटल्यामुळे शिपायांनी खाली जावे आणि त्याला त्यांच्यामधून बळाने घेऊन गढीत आणावे, अशी त्याने आज्ञा दिली. ११आणि लगेच रात्री, प्रभू त्याच्याजवळ उभा राहिला आणि म्हणाला,
“धीर धर; कारण तू यरुशलेमात जशी माझ्याविषयी निक्षून साक्ष दिलीस तशी तुला रोमलादेखील दिली पाहिजे.”

१२आणि दिवस उगवला तेव्हा काही यहुद्यांनी एकजूट केली, आणि त्यांनी पौलाला ठार मारीपर्यंत काही खायचे प्यायचे नाही असे म्हणून स्वतःला शपथेने बांधून घेतले. १३आणि ज्यांनी हा कट केला होता ते चाळिसांहून अधिक होते. १४मग ते वरिष्ठ याजक आणि वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले,
“आम्ही अशा घोर शपथेनं स्वतःला बांधून घेतलं आहे की, पौलाला ठार मारीपर्यंत आम्ही काही खाणार नाही. १५आणि ह्यासाठी, आपण आणि न्यायसभा मिळून, जणू आपण त्याच्याविषयी अधिक नीट चौकशी करणार आहात, म्हणून सेनापतींनी उद्या सकाळी त्याला खाली आणावं असं त्यांना कळवावं, आणि तो जवळ येण्याअगोदर आम्ही त्याला ठार मारायला तयार आहोत.”
१६ते दबा धरून बसले होते हे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले, तेव्हा तो निघून गढीत गेला आणि त्याने हे पौलाला सांगितले. १७त्यावर पौलाने एका शतपतीला आपल्याकडे बोलवून म्हटले,
“ह्या तरुणाला सेनापतींकडे घेऊन जा. कारण ह्याला त्यांना काही सांगायचं आहे.”
१८म्हणून त्याने त्याला बरोबर घेतले आणि सेनापतीकडे आणून म्हटले,
“बंदिवान पौलानं मला आत बोलावलं, आणि ह्या तरुणाला आपल्याकडे घेऊन जायची विनंती केली; ह्याला आपल्याशी काही बोलायचं आहे.”
१९तेव्हा सेनापतीने त्याचा हात धरला, तो त्याच्याबरोबर एकीकडे गेला, आणि त्याने त्याला विचारले,
“तुला मला काय सांगायचं आहे?”
२०आणि तो म्हणाला,
“हे यहुदी एकमत झाले आहेत आणि जणू पौलाची अधिक नीट चौकशी करता यावी म्हणून आपण त्याला उद्या सकाळी न्यायसभेत आणावं, अशी ते आपल्याला विनंती करणार आहेत. २१पण आपण त्यांचं ऐकू नका, कारण त्यांच्यातले चाळिसांहून अधिक लोक त्याच्यावर टपलेत,  आणि पौलाला ठार मारीपर्यंत काही खायचं प्यायचं नाही, अशा शपथेनं त्यांनी स्वतःला बांधून घेतलं आहे; आणि ते आता तयार असून आपल्या वचनाची प्रतीक्षा करीत आहेत.”
२२तेव्हा सेनापतीने त्या तरुणाला लावून दिले, आणि त्याला आज्ञा दिली की,
“तू ह्या गोष्टी मला सांगितल्यास हे कोणाला सांगू नको.”

२३मग त्याने दोन शतपतींना आपल्याकडे बोलवून म्हटले,
“आज रात्री तिसर्‍या ताशी कैसरियात जायला दोनशे शिपाई, सत्तर घोडेस्वार, आणि दोनशे भालेकरी तयार ठेवा; २४आणि त्यांना जनावरं पुरवा, म्हणजे त्यांतील एकावर पौलाला बसवून ते त्याला सुभेदार फेलिक्सकडे सुरक्षित नेतील.”
२५आणि त्याने ह्या पद्धतीने एक पत्र लिहिलेः
२६क्लौदियस लुसियास ह्याजकडून,
श्रेष्ठ फेलिक्स सुभेदार ह्यांसः
जयजय.
२७ह्या मनुष्याला यहुद्यांनी धरले होते, आणि त्यांनी त्याला ठार मारले असते; तेव्हा हा रोमी आहे हे मला कळल्यावर मी एक तुकडी घेऊन चाल केली आणि ह्याला सोडवले. २८आणि ते त्याच्यावर कोणत्या कारणावरून आरोप करीत होते हे मला माहीत व्हावे, अशी माझी इच्छा असल्यामुळे,  मी त्याला त्यांच्या न्यायसभेपुढे आणले. २९आणि मला आढळले की,  त्यांच्या स्वतःच्या नियमशास्त्रातील प्रश्नांवरून ह्याच्यावर आरोप आणले होते; पण, ह्याला मरणाची शिक्षा किंवा कैद व्हावी असा काही योग्य आरोप त्याच्याविरुद्ध मांडला नव्हता असे मी पाहिले. ३०आणि मला त्या मनुष्याविरुद्ध कट करण्यात आला आहे असे सांगण्यात आले तेव्हा लगेच मी त्याला आपल्याकडे धाडले. आणि त्याच्यावर आरोप करणार्‍यांना त्याच्याविरुद्ध काही बोलायचे असेल तर त्यांनी आपल्यापुढे बोलावे अशी मी त्यांना आज्ञा देत आहे.
कुशल असो.
३१मग शिपायांनी पौलाला घेतले आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे अंतिपात्रीपर्यंत रात्री आणले. ३२मग दुसर्‍या दिवशी स्वारांनी त्याच्याबरोबर जावे म्हणून त्यांनी त्यांना सोडले व ते गढीकडे परत निघाले. ३३आणि ते कैसरियास आले तेव्हा त्यांनी सुभेदारांना पत्र दिल्यावर पौलाला त्यांच्यासमोर उभे केले.
३४आणि त्याने ते वाचल्यावर तो कोणत्या प्रांतातला आहे हे विचारले व त्याला तो किलिकियातला आहे हे समजले ३५तेव्हा तो त्याला म्हणाला,
“तुझ्यावर आरोप करणारेही येतील तेव्हा मी तुझी बाजू ऐकेन.”
आणि त्याने त्याला हेरोदाच्या वाड्यात पहार्‍यात ठेवण्याची आज्ञा दिली. 

—–प्रे. कृ. २४—–

आणि पाच दिवसांनंतर श्रेष्ठ याजक हनन्या हा काही वडिलांबरोबर व तिर्तुल्लस नावाच्या वकिलाबरोबर खाली आला; आणि त्यांनी सुभेदाराला पौलाविरुद्ध माहिती दिली. मग त्याला पुढे बोलावल्यावर तिर्तुल्लस त्याच्यावर आरोप ठेवू लागला व म्हणाला,
“आपल्यामुळं आम्हाला मोठं स्वास्थ्य आहे; आणि आपल्या योजनेमुळं ह्या राष्ट्रासाठी पुष्कळ सुधारणा केल्या जात आहेत, म्हणून श्रेष्ठ फेलिक्स,  आम्ही सदा, सर्व ठिकाणी, तिचं संपूर्ण कृतज्ञतेनं स्वागत करतो. पण आपल्याला अधिक अडथळा न करता, मी आपल्याला विनंती करतो की, आपण आपल्या सहनशीलतेनं थोड्या शब्दांत आमचं एवढं ऐकावं.
“कारण आम्हाला आढळलं आहे की, हा एक उपद्रवी मनुष्य आहे, आणि हा जगभर सर्व यहुद्यांत उठाव चालू करीत आहे; आणि हा नासोरी पंथाचा पुढारी आहे. ह्यानं मंदिरपण भ्रष्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही ह्याला धरलं. ७-८ह्याच्याकडून आपण चौकशी केल्यावर आम्ही ज्या गोष्टींविषयी ह्याच्यावर आरोप आणीत आहोत त्या सर्व गोष्टी आपल्याला समजतील.”
तेव्हा यहुद्यांनी संमती दिली, आणि ‘ह्या गोष्टी अशाच आहेत’ असं ते म्हणाले.
१०मग पौलाने, त्याला सुभेदाराने बोलण्यास खुणावल्यावर, उत्तर दिले,
“आपण पुष्कळ वर्षांपासून ह्या राष्ट्रावर न्यायाधीश आहात हे मला माहीत असल्यामुळं, मी अधिक आनंदानं हे माझ्या वतीनं प्रत्युत्तर देतो. ११कारण आपल्याला हे समजू शकेल की, मी यरुशलेमला उपासना करायला गेलो, त्याला अजून केवळ बारा दिवस झालेत. १२आणि मी त्यांना मंदिरात,  सभास्थानांत किवा नगरात कोणत्याही मनुष्याशी वाद करताना किंवा लोकांत उठाव करताना आढळलो नाही. १३त्याचप्रमाणं, आता ते माझ्यावर ज्या गोष्टींविषयी आरोप करीत आहेत त्या ते प्रस्थापित करू शकत नाहीत.
१४“पण मी आपल्यापुढं पतकरतो की, ते ज्याला पंथ म्हणतात त्या मार्गाला अनुसरून, नियमशास्त्रात आणि संदेष्ट्यांत लिहिलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून, मी माझ्या पूर्वजांच्या देवाची उपासना करतो. १५आणि नीतिमानांचं तसंच अनीतिमानांचं पुनरुत्थान होईल अशी देवाच्या ठायी माझी आशा आहे. ती तेपण पतकरतात. १६आणि ह्यासाठी, देवापुढं आणि मनुष्यांपुढं माझा विवेक निर्दोष असावा म्हणून मी झटतो.
१७“आणि मी आता पुष्कळ वर्षांनी माझ्या लोकांसाठी साह्य घेऊन यावं, आणि अर्पणं करावीत म्हणून इकडे आलो. १८मी ह्या गोष्टी करीत असताना मंदिरात शुद्ध झालेला आढळलो, लोकांच्या घोळक्यात किवा गलबल्यात नाही. पण आसियातील काही यहुदी तिथं होते; १९त्यांच्याजवळ माझ्याविरुद्ध काही असल्यास त्यांनी स्वतः आरोप करायला इथं आपल्यासमोर येणं आवश्यक होतं. २०नाहीतर, ह्यांनी स्वतः सांगावं की, न्यायसभेपुढं, मी उभा असताना त्यांना माझ्यात काही अपराध आढळला काय? २१किंवा माझ्या ह्या बोलण्यात काय? मी त्यांच्यापुढं उभा असताना ओरडून म्हणालो  की, ‘आज मृतांच्या पुनरुत्थानाविषयी माझी तुमच्यापुढं चौकशी होत आहे.’ ”

२२पण ह्या मार्गाविषयी त्याला अधिक चांगली माहिती असल्यामुळे फेलिक्स त्यांना म्हणाला,
“सेनापती लुसियास खाली आल्यावर मी तुमच्या बाबतीत निर्णय करीन.”
आणि त्याने त्यांना तहकुबी दिली; २३आणि एका शतपतीला आज्ञा दिली की, पौलाला अटकेत ठेवून मोकळीक घेऊ द्यावी, आणि त्याची सेवा करायला त्याच्या आप्तांना मनाई होऊ नये.
२४आणि काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्याबरोबर आला; आणि पौलाला बोलवून त्याने त्याच्याकडून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी ऐकले. २५मग तो नीती आणि संयमन व पुढे येणारा न्यायनिवाडा ह्यांवर विवेचन करू लागला; तेव्हा फेलिक्स भयभीत झाला आणि त्याला उद्देशून म्हणाला,
“आता जा; मला वेळ असेल तेव्हा मी तुला बोलवीन.”
२६शिवाय त्याने पौलाला सोडावे म्हणून त्याला त्याच्याकडून पैसे दिले जातील अशी तो आशा करीत होता; आणि म्हणून तो त्याला वरचेवर बोलवून त्याच्याशी बोलत असे.
२७पण अशी दोन वर्षे निघून गेल्यावर फेलिक्सच्या जागी पोक्र्यस फेस्त तेथे येतो आणि यहुद्यांवर मेहरबानी करावी अशी इच्छा धरून फेलिक्स पौलाला अटकेत मागे ठेवतो.     

—–प्रे. कृ. २५—–

आता, फेस्त त्या प्रांतात आल्यावर, तीन दिवसांनी, तो कैसरियाहून यरुशलेमला वर गेला. तेव्हा वरिष्ठ याजक व यहुद्यांचे प्रमुख ह्यांनी त्याला पौलाविरुद्ध माहिती दिली; आणि त्याला यरुशलेमला बोलवावे अशी त्यांनी विनंती केली व त्याच्याविरुद्ध त्याच्या कृपेची याचना केली. म्हणजे वाटेत दबा धरून त्याला मारता यावे. पण फेस्ताने उत्तर देऊन म्हटले,
“पौल कैसरियात अटकेत आहे, आणि मी लवकरच तिकडे जाईन. म्हणून तुमच्यात जे कोणी अधिकारी असतील त्यांनी माझ्याबरोबर खाली यावं आणि ह्या मनुष्यात काही विपरीत असल्यास त्यांनी ह्याच्यावर आरोप करावेत.”
आणि तो त्यांच्यात फार तर आठदहा दिवस राहिल्यावर कैसरियास खाली आला. आणि दुसर्‍या दिवशी तो न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याची आज्ञा दिली. आणि तो आल्यावर यरुशलेमहून आलेले यहुदी सभोवती उभे राहिले; आणि, ते जे सिद्ध करू शकले नाहीत, असे पुष्कळ आणि भारी आरोप त्यांनी त्याच्यावर आणले. आणि पौलाने स्वतःतर्फे उत्तर दिले,
“मी यहुद्यांच्या नियमशास्त्राविरुद्ध किंवा मंदिराविरुद्ध किंवा कैसराविरुद्ध काही अपराध केलेला नाही.”
पण यहुद्यांवर मेहरबानी करावी अशी इच्छा धरून फेस्ताने पौलाला उत्तर देऊन म्हटले,
“ह्या बाबतीत, यरुशलेमास वर जाऊन, तिथं माझ्यापुढं तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?”
१०तेव्हा पौल म्हणाला,
“मी कैसराच्या न्यायासनापुढं उभा आहे; इथं माझा न्याय झाला पाहिजे. मी यहुद्यांचा काहीच अपराध केलेला नाही हे आपल्याला चांगलं विदित झालं आहे. ११कारण मी अपराधी असेन किंवा मरणाच्या शिक्षेस पात्र होईन असं काही मी केलं असेल तर न मरणं मला नको आहे. पण हे माझ्यावर ज्या गोष्टींचा आरोप करीत आहेत तशी कोणतीही गोष्ट नसेल, तर कोणी मला त्यांच्या स्वाधीन करू शकणार नाही. मी कैसराकडे दाद मागतो.”
१२तेव्हा सभेची मसलत घेतल्यावर फेस्ताने उत्तर दिले,
“तू कैसराकडे दाद मागतोस? तू कैसराकडे जाशील.”

१३मग काही दिवस गेल्यावर राजे अग्रिपा आणि बर्णिका ह्यांनी फेस्ताचे अभिनंदन करायला कैसरियाला भेट दिली. १४आणि त्यांनी तेथे बरेच दिवस घालवल्यावर फेस्ताने पौलाची बाब राजापुढे ठेवली आणि तो म्हणाला,
“फेलिक्सकडून अटकेत राहिलेला एक मनुष्य इथं आहे. १५मी यरुशलेमास आलो तेव्हा मला यहुद्यांच्या वरिष्ठ याजकांनी आणि वडिलांनी त्याच्याविषयी माहिती दिली आणि त्याच्याविरुद्ध न्याय मागितला. १६मी त्यांना उत्तर दिले की, ‘ज्याच्यावर आरोप केला असेल त्या माणसाला त्याच्यावर आरोप करणार्‍यांपुढं प्रत्युत्तराची संधी मिळाल्याअगोदर त्याला सोपवून द्यावं ही रोम्यांची रीत नाही.’
१७“म्हणून ते इकडे आल्यावर काही विलंब न होऊ देता, मी दुसर्‍या दिवशी न्यायासनावर बसलो. आणि ह्या मनुष्याला घेऊन येण्याची आज्ञा केली. १८आणि ह्याच्यावर आरोप करणारे उभे राहिले, तेव्हा मला वाटल्याप्रमाणं,  त्यांनी त्याच्यावर कोणत्याच वाईट गोष्टीचा आरोप केला नाही. १९पण त्यांच्या धर्माविषयी, आणि जो मेला असून पौल म्हणतो तो जिवंत आहे, अशा एका येशूविषयी त्यांचे त्याच्याशी वाद आहेत.
२०“आणि ह्या गोष्टींच्या चौकशीविषयी मी साशंक असल्यामुळं मी त्याला विचारलं की, ‘तू यरुशलेमला जायला आणि तिथं ह्या बाबतीत न्याय करून घ्यायला तयार आहेस काय?’’ २१पण पौलानं विनंती केली की, ‘मला बादशाहांच्या निवाड्यासाठी राखा.’ तेव्हा मी त्याला कैसरापुढं पाठवीपर्यंत मी त्याला अटकेत ठेवायची आज्ञा दिली.”
२२तेव्हा अग्रिपा फेस्ताला म्हणाला,
“मला स्वतःलापण त्या माणसाचं ऐकायला आवडेल.”
आणि तो म्हणाला,
“उद्या आपण त्याचं ऐकाल.”
२३मग सकाळी मोठ्या थाटाने अग्रिपा व बर्णिका आल्यानंतर, सेनापतींच्या व नगरातील प्रमुख लोकांच्या समवेत त्यांनी न्यायालयात प्रवेश केला,  तेव्हा फेस्ताने आज्ञा दिल्याप्रमाणे पौलाला पुढे आणण्यात आले. २४मग फेस्त म्हणाला,
“राजे अग्रिपा, आणि आमच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व लोकहो, आपण ह्या माणसाला पाहता; ह्याच्याविषयी, यरुशलेमात आणि इथं यहुद्यांच्या सर्व जमावानं ओरडून माझ्याकडे मागणी केली आहे की, ह्यानं ह्यापुढं जिवंत राहू नये. २५पण ह्यानं मरणाच्या शिक्षेस योग्य होईल असं काही केलेलं नाही हे मला दिसलं. आणि स्वतः ह्यानं बादशाहाकडे न्याय मागितला,  तेव्हा मी ह्याला धाडावं असं ठरवलं. २६ह्याच्या बाबतीत मला आपल्या महाराजांना लिहिण्यासाठी काही निश्चित आढळलं नाही म्हणून मी त्याला आपल्या सर्वांपुढं आणि, राजे अग्रिपा, विशेषतः आपल्यापुढं,  आणलं आहे; म्हणजे मला ही चौकशी झाल्यावर लिहिण्यासाठी काही मिळेल. २७कारण, एखाद्या बंदिवानाला धाडणं आणि त्याच्याविरुद्ध आणलेले आरोप प्रतिपादित न करणं हे मला अयोग्य दिसतं.”  

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s