Acts 26-28

प्रेषितांची कृत्ये

—–प्रे. कृ. २६—–

तेव्हा अग्रिपा पौलाला म्हणाला,
“तुला आता स्वतःविषयी बोलायची परवानगी आहे.”
तेव्हा, पौलाने हात पुढे केला आणि स्वतःतर्फे उत्तर दिले,
“राजे अग्रिपा, मी स्वतःला धन्य मानतो; कारण यहुद्यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्या सर्वांविषयी मी आपल्यापुढं आज स्वतःतर्फे उत्तर देत आहे. कारण यहुद्यांत जे सर्व परिपाठ आणि प्रश्न आहेत त्यांत विशेषतः आपण जाणते आहात. म्हणून मी आपल्याला विनवणी करतो की, आपण माझं ऐकण्यासाठी मला वागवून घ्या.
“माझ्या बाळपणापासून प्रथमारंभी माझ्या लोकांत आणि यरुशलेमात,  माझं आयुष्य कसं गेलं हे सर्व यहुदी जाणतात, आणि जे मला प्रारंभापासून ओळखतात ते इच्छीत असल्यास साक्ष देतील की, मी आमच्या धर्माच्या, सर्वांत कडक पंथाप्रमाणं परोशी म्हणून राहिलो. ६-७आणि देवाकडून आमच्या पूर्वजांना जे वचन प्राप्त झालं, आणि आमचे बारा वंश एकाग्रतेने, अहोरात्र सेवा करून, जे गाठण्याची आशा करीत आहेत त्या वचनाच्या आशेमुळं मी आता उभा राहिलो आहे, आणि माझा न्याय केला जात आहे; आणि राजे, त्या आशेविषयी यहुद्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. आणि, देव मृतांना उठवतो हे आपल्यात अविश्वसनीय का म्हटलं जावं?
“मी स्वतः खरोखर मानीत होतो की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध मी पुष्कळ गोष्टी केल्या पाहिजेत. १०आणि मी ही गोष्ट यरुशलेमात कृतीतही आणली; आणि वरिष्ठ याजकांकडून अधिकार मिळवून मी पुष्कळ पवित्र जनांना बंदिशाळेत कोंडलं, आणि त्यांना मरणाची शिक्षा देत असता मी त्यांच्याविरुद्ध आवाज दिला. ११आणि, मी प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शिक्षा करवून त्यांना दुर्भाषण करायला लावायचा प्रयत्न केला;  आणि त्यांच्यावर फार चवताळून, मी बाहेरच्या नगरांपर्यंतदेखील त्यांचा पाठलाग केला. १२त्यानंतर, मी वरिष्ठ याजकांकडून अधिकार आणि आदेश मिळवून दिमिष्काकडे जात होतो, १३तेव्हा राजे, मी त्या वाटेवर, दुपारच्या वेळी, एक, सूर्याच्या तेजाहून प्रखर प्रकाश आकाशातून, माझ्या आणि माझ्याबरोबर जाणार्‍यांच्या सभोवताली चमकताना बघितला. १४आणि आम्ही सगळे जमिनीवर पडलो, तेव्हा मला माझ्याशी बोलणारा आवाज ऐकू आला; तो इब्री भाषेत मला म्हणाला, ‘शौला, शौला, तू माझा छळ का करतोस? तुला काट्यांवर लाथ मारणं कठिण आहे.’
१५“आणि मी म्हणालो, ‘प्रभू, तू कोण आहेस?’ आणि तो म्हणाला, ‘तू ज्याचा छळ करतोस तो येशू मी आहे. १६तर ऊठ, आणि आपल्या पायांवर उभा रहा. कारण मी तुला दर्शन दिलं ते ह्यासाठी की, तू ज्याकरता मला बघितलंस, आणि मी ज्याकरता तुला दर्शन देईन त्या सर्व गोष्टींकरता मी तुला सेवक आणि साक्षी नेमावं. १७मी ह्या प्रजेपासून आणि परजनांपासून तुला सोडवीन. १८त्यांच्याकडे मी आता तुला पाठवीत आहे, ते ह्यासाठी की, तू त्यांचे डोळे उघडावेस आणि अंधारातून प्रकाशाकडे, आणि सैतानाच्या सत्तेतून देवाकडे तू त्यांना वळवावंस. म्हणजे त्यांना पापांची क्षमा मिळून माझ्यावरील विश्वासानं पवित्र झालेल्या लोकांबरोबर वाटा मिळावा.’
१९“अहो राजे अग्रिपा, म्हणून मी त्या स्वर्गीय दर्शनाचा अवमान करायला धजलो नाही. २०पण मी प्रथम दिमिष्कात, यरुशलेमात आणि यहुदियाच्या सर्व प्रांतात राहणार्‍यांना, आणि त्यानंतर परजनांना घोषणा केली की, त्यांनी पश्चात्ताप करून देवाकडे वळावं आणि पश्चात्तापास शोभतील अशी कामं करावीत.   
२१“ह्या कारणावरून यहुद्यांनी मला मंदिरात धरलं आणि ते मला ठार मारायच्या प्रयत्नात होते. २२म्हणून मी, ह्या दिवसापर्यंत, देवाचं साह्य घेऊन लहानमोठ्यांना साक्ष देत आहे, पण ज्या गोष्टी होतील म्हणून संदेष्टे आणि मोशे म्हणाले होते त्यांशिवाय मी दुसरं काही सांगत नाही. २३म्हणजे ख्रिस्तानं दुःख सोसावं, मेलेल्यांतून पुन्हा उठण्यात पहिला व्हावं, आणि ह्या प्रजेला आणि परजनांना प्रकाश दाखवावा.”
२४आणि तो हे स्वतःतर्फे बोलत असता फेस्त मोठ्या आवाजात म्हणाला,
“पौला, तू वेडा आहेस, पुष्कळ शिक्षण तुला वेड लावीत आहे.”
२५तेव्हा पौल म्हणाला,
“फेस्त महाराज, मी वेडा नाही, पण खरेपणाच्या आणि समंजसपणाच्या गोष्टी बोलत आहे. २६कारण राजे ह्या गोष्टी जाणतात, आणि मी त्यांच्यापुढं धैर्यानं बोलत आहे. कारण मी मानतो की, ह्यांपैकी कोणत्याच गोष्टी त्यांच्यापासून लपलेल्या नाहीत; कारण ही गोष्ट एका कोपर्‍यात केलेली नाही. २७राजे अग्रिपा, आपण संदेष्ट्यांवर विश्वास ठेवता काय? आपण विश्वास ठेवता हे मी जाणतो.”
२८तेव्हा अग्रिपा पौलाला म्हणाला,
“मी ख्रिस्ती व्हावं म्हणून थोड्या अवधीत तू माझं मन वळवीत आहेस.”
२९तेव्हा पौल म्हणाला,
“मी देवाजवळ हे मागतो की, आपणच नाही, पण आज जे माझं ऐकत आहेत त्या सर्वांनीच, थोड्या अवधीत किंवा जास्त अवधीत, ह्या माझ्या बेड्यांशिवाय मी आहे तसं व्हावं.”     
३०तेव्हा राजे व सुभेदार आणि बर्णिका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते लोक उठले; ३१आणि बाहेर गेल्यावर ते आपआपल्यात बोलताना म्हणाले,
“ह्या माणसाला मरणाची शिक्षा किंवा कैद व्हावी असं काहीच हा करीत नाही.”
३२तेव्हा अग्रिपा फेस्ताला म्हणाला,
“ह्या माणसानं कैसराकडे दाद मागितली नसती तर ह्याला सोडता आलं असतं.”  

—–प्रे. कृ. २७—–

आणि, जेव्हा असे ठरवण्यात आले की, आम्ही गलबताने इटलीला जावे, तेव्हा त्यांनी पौलाला व आणखी काही बंदिवानांना बादशाही पलटणीतील यूलियस नावाच्या एका शतपतीच्या स्वाधीन केले. तेव्हा आसियाच्या किनार्‍याने जाणार असलेल्या, अद्रिमुत्तिमच्या, एका गलबतावर आम्ही चढलो आणि निघालो. आणि थेसलनिकेचा अरिस्तार्ख मासेदोनियाकर हा आमच्याबरोबर होता. आणि दुसर्‍या दिवशी आम्ही सिदोनास आलो. तेव्हा यूलियस पौलाशी सहानुभूतीने वागला व त्याने त्याला त्याच्या मित्रांकडे पाहुणचार घ्यायला जाऊ दिले. आणि तेथून गलबताने निघाल्यावर वारे उलटे असल्यामुळे आम्ही कुप्राच्या आडोशाने गेलो. आणि किलिकियाच्या व पंफुलियाच्या समुद्रांवरून पुढे गेलो, आणि लुकियातल्या मूर्‍हापर्यंत आलो. तेथे शतपतीला इटलीस जाणारे अलेक्झांद्रियाचे एक गलबत मिळाले; आणि त्याने आम्हाला त्यात चढवले. आणि आम्ही पुष्कळ दिवस हळू हळू जात होतो, आणि मोठ्या प्रयासाने निदासमोर आलो; तेव्हा वारा आम्हाला पुढे जाऊ देईना, म्हणून आम्ही सलमोनासमोरून क्रेताच्या आडोशाने गेलो; आणि मोठ्या प्रयासाने त्याच्या जवळून जाऊन ज्याला सुंदर बंदर म्हणतात त्या ठिकाणी आलो. तेथून लसया नगर जवळ होते.

आता, पुष्कळ काळ होऊन गेल्यामुळे गलबत हाकारणे धोक्याचे होते,  आणि उपोषणकाळही निघून गेला होता. म्हणून पौलाने त्यांना बोध करून १०म्हटले,
“गड्यांनो, मी समजतो की, हा प्रवास हालअपेष्टा आणि हानी होऊन, केवळ मालाची आणि गलबताची नाही, पण आपल्या जिवांची हानी होऊन होणार आहे.”
११पण पौलाच्या ह्या म्हणण्यापेक्षा शतपतीने तांडेलाचे व गलबताच्या धन्याचे अधिक मानले.
१२आणि ते बंदर हिवाळा घालवण्यास गैरसोयीचे असल्यामुळे बहुतेकांनीही सल्ला दिला की, येथून निघून कसेही फैनिकेस जाता आल्यास तेथे हिवाळा घालवावा. हे क्रेताचे बंदर असून नैऋत्येकडे आणि वायव्येकडे त्याचे तोंड आहे. १३आणि दक्षिण वायू हळू हळू वाहू लागला तेव्हा आपला संकल्प साधला असे ते समजले, त्यांनी तेथून नांगर उचलले व ते क्रेताच्या जवळून जाऊ लागले.
१४पण लवकरच त्यांच्या उलट युरकुलोन नावाचा वादळी वारा वाहू लागला; १५आणि जेव्हा गलबत अडवले गेले आणि वार्‍याला तोंड देऊ शकले नाही तेव्हा आम्ही त्याला ते चालवून नेऊ दिले. १६आणि क्लौदा नाव असलेल्या लहान बेटाजवळून जात असता आम्ही मोठ्या प्रयासाने होडी ओढून घेऊ शकलो; १७आणि त्यांनी ती वर घेतल्यावर साहित्यांचा उपयोग करून गलबत खालून आवळून घेतले. आणि आपण कदाचित् सुरतीवर आदळू अशी त्यांना भीती वाटल्यामुळे त्यांनी शीड उतरले, आणि आम्ही वाहवत गेलो. १८आणि आम्ही फार जोराने वादळात हेलकावू लागल्यामुळे त्यांनी दुसर्‍या दिवशी भरगत टाकणे सुरू केले. १९आणि त्यांनी तिसर्‍या दिवशी गलबताचे अवजार आपल्या हातांनी टाकले. २०आणि जेव्हा पुष्कळ दिवस सूर्य किंवा तारे दिसले नाहीत व आमच्यावर मोठे वादळ राहिले, तेव्हा आमची वाचण्याची आशा हिरावली गेली.
२१पण पुष्कळ उपासानंतर पौल त्यांच्यात उभा राहिला आणि म्हणाला,
“गड्यांनो, तुम्ही माझं ऐकायचं असतं. तुम्ही इतकी हालअपेष्टा आणि हानी पदरी पाडून घ्यायला क्रेताहून निघायचं नसतं. २२आणि, आता, मी तुम्हाला विनंती करतो की, आनंदित व्हा; कारण तुमच्यात कोणाच्या जिवाचा नाश होणार नाही, पण गलबताचा होईल. २३कारण मी ज्याचा आहे, आणि ज्याची सेवा करतो त्या देवाचा दूत रात्री माझ्याजवळ उभा राहिला, २४आणि म्हणाला, ‘पौला, भिऊ नको; तुला कैसरापुढं उभं राहिलं पाहिजे; आणि बघ, तुझ्याबरोबर जे गलबतावर जिवंत आहेत ते सगळेच देवानं तुला दिले आहेत.’ २५म्हणून गड्यांनो, आनंदित व्हा. कारण मी देवावर विश्वास ठेवतो की, मला सांगितल्याप्रमाणं होईल. २६तरी आपल्याला एका बेटावर पडावं लागेल.”
२७आणि चौदावी रात्र आली तेव्हा आम्ही अद्रियाच्या समुद्रावर इकडून तिकडे लोटले जात असता, सुमारे मध्यरात्रीस खलाश्यांना वाटले की, आपण कुठल्यातरी किनार्‍याकडे नेले जात आहो. २८आणि त्यांनी बुडीद टाकले तेव्हा वीस वावे भरली. मग थोडे पुढे गेल्यावर त्यांनी पुन्हा बुडीद टाकले तेव्हा पंधरा वावे भरली. २९तेव्हा आपण कदाचित् खडकावर आदळू अशी त्यांना भीती वाटल्यामुळे त्यांनी वरामावरून चार नांगर टाकले आणि दिवस उगवावा म्हणून प्रार्थना केली.
३०मग ते जणू नाळीवरून नांगर टाकीत आहेत अशा बहाण्याने खलाश्यांनी खाली समुद्रात होडी सोडली व ते गलबतावरून पळणार होते; ३१तेव्हा पौल शतपतीला म्हणाला,
“हे गलबतावर राहिले नाहीत तर तुम्ही वाचू शकणार नाही.”
३२तेव्हा शिपायांनी होडीचे दोर कापले आणि ती पडू दिली.
३३आणि दिवस वर येत असता पौलाने सर्वांना अन्न घेण्याची विनंती केली व म्हटले,
“आज चौदावा दिवस आहे; तुम्ही काही न घेता, वाट पहात उपास करीत आहा. ३४म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही अन्न घ्या; हे तुमच्या आरोग्यासाठी आहे. कारण, तुमच्यातील कोणाच्या डोक्यावरून एक केसदेखील गळणार नाही.”
३५आणि असे बोलून त्याने भाकर घेतली आणि सर्वांसमक्ष देवाचे उपकार मानून तो ती खाऊ लागला. ३६मग ते सगळे उत्तेजित झाले आणि त्यांनी अन्न घेतले. ३७तेव्हा गलबतावर आम्ही सगळे दोनशे शहात्तर जीव होतो.
३८आणि ते भरपूर जेवल्यावर गलबत हलके करू लागले व गहू समुद्रात टाकू लागले. ३९मग दिवस उगवला तेव्हा त्यांनी ती जमीन ओळखली नाही, पण त्यांनी तेथे किनारा असलेली एक खाडी पाहिली, आणि शक्य झाल्यास तेथपर्यंत गलबत लोटावे असा त्यांनी विचार केला. ४०तेव्हा त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात राहू दिले; सुकाणूच्या दोर्‍या सोडल्या, आणि वारा धरायला पुढचे शीड चढवून ते किनार्‍याकडे निघाले. ४१आणि जेथे दोन समुद्र मिळतात अशा ठिकाणी ते सापडले व त्यांनी भाटीवर गलबत नेले. तेव्हा पुढची बाजू रुतली आणि हलणार नाही अशी राहिली. पण लाटांच्या मार्‍यामुळे मागची बाजू फुटली.
४२तेव्हा शिपायांचा बेत झाला की, कैद्यांतून कोणी पोहून पळू नये म्हणून त्यांना मारून टाकावे. ४३पण पौलाला वाचवायची शतपतीची इच्छा असल्यामुळे तो त्यांच्या योजनेस आडवा आला; आणि त्याने त्यांना आज्ञा दिली की, ज्यांना पोहता येत असेल त्यांनी प्रथम उडी टाकून किनार्‍यावर जावे, ४४आणि बाकीच्यांनी, कोणी फळ्यांवर तर कोणी गलबतातील दुसर्‍या कशावर जावे. आणि असे झाले की, ते सगळे अशा प्रकारे किनार्‍यापर्यंत सुखरूप गेले.     

—–प्रे. कृ. २८—–

आणि आम्ही सुखरूप आलो तेव्हा त्या बेटाला मिलेता नाव होते हे आम्हाला समजले. आणि तेथील बर्बर लोकांनी आम्हाला पुष्कळ सहानुभूती दाखवली; कारण वरून येणार्‍या पावसामुळे व गारठ्यामुळे त्यांनी आगटी पेटवून आमचे प्रत्येकाचे स्वागत केले.
आणि जेव्हा पौलाने एक काटक्यांचा भारा जमवून त्या विस्तवावर टाकला, तेव्हा एक नागीण त्या उष्णतेतून बाहेर आली व त्याच्या हातावर लटकली. ते जनावर त्याच्या हातावर लोंबकळत होते, हे बघून ते बर्बर लोक एकमेकांस म्हणाले,
“हा माणूस खरोखर खुनी आहे; हा समुद्रातून वाचला असला तरी न्याय ह्याला जगू देत नाही.”
मग त्याने त्या जनावराला अग्नीत झटकून टाकले, तेव्हा त्याला स्वतःला काहीच इजा भासली नाही. तरी तो सुजेल किवा एकदम मेलेलाच खाली पडेल अशी ते वाट पहात होते; पण त्यांनी पुष्कळ वाट पाहिल्यावर त्याला काही विपरीत झाले नाही हे त्यांनी पाहिले. तेव्हा त्यांनी आपले मत बदलून म्हटले,
“हा एक देव आहे.”
तेथे, त्या जागेच्या आसपास त्या बेटावरील प्रमुख मनुष्याची शेती होती. त्याचे नाव पुब्लियस होते. त्याने आमचे स्वागत केले आणि त्याने मित्रभावाने तीन दिवस आमचा पाहुणचार केला. आणि असे झाले की, पुब्लियसचा बाप तापाने व आवरक्ताने आजारी होता. पौल त्याच्याकडे आत गेला, आणि त्याने प्रार्थना केली व त्याच्यावर आपले हात ठेवले,  आणि त्याला बरे केले. आणि हे झाले तेव्हा त्या बेटावर ज्यांना काही आजार होते असे बाकीचेही आले आणि बरे झाले. १०त्यांनीही आम्हाला पुष्कळ देणग्या देऊन आमचा मान केला. आणि आम्ही गलबताने निघालो तेव्हा त्यांनी आम्हाला लागणार्‍या वस्तू चढवून दिल्या.

११आणि तीन महिन्यांनंतर अलेक्झांद्रियाच्या एका गलबताने आम्ही निघालो. ते त्या बेटाशी हिवाळा घालविण्यास राहिले होते. आणि त्याला ‘दुयस्कुरै’ ही निशाणी होती. १२आणि आम्ही सुराकूसला येऊन तेथे तीन दिवस राहिलो. १३आम्ही तेथून वळसा घेतला आणि आम्ही रेगियोनला आलो; आणि एक दिवसानंतर दक्षिण वायू वाहू लागला व आम्ही पुढच्या दिवशी पुन्त्युलास आलो. १४तेथे आम्हाला बांधव भेटले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे सात दिवस राहण्याची विनंती केली. आणि मग आम्ही रोमला आलो. १५तेथील बांधवांनी आमच्याविषयी ऐकल्यावर ते अप्पियाच्या पेठेपर्यंत व तीन उतारशाळांपर्यंत आमच्या भेटीस आले. पौलाने त्यांना बघून देवाचे उपकार मानले आणि धीर घेतला.
१६आणि आम्ही रोमला आल्यावर पौलाला त्याच्यावर पहारा करणार्‍या शिपायाबरोबर स्वतंत्र राहण्याची परवानगी मिळाली. १७आणि असे झाले की, त्याने तीन दिवसांनंतर तेथे जे यहुद्यांचे प्रमुख होते त्यांना एकत्र बोलावले, आणि ते एकत्र आले तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“अहो बंधूंनो, मी आपल्या लोकांविरुद्ध किवा पूर्वजांच्या परिपाठाविरुद्ध काही केलेलं नाही, तरी यरुशलेमात, मी बंदिवान केला जाऊन रोम्यांच्या हाती दिला गेलो. १८आणि त्यांनी माझी चौकशी केली तेव्हा मला जाऊ द्यावं अशी त्यांची इच्छा होती. कारण माझ्या बाबतीत मरणाच्या शिक्षेला काही कारण नव्हतं. १९पण जेव्हा यहुदी माझ्याविरुद्ध बोलले तेव्हा मला कैसराकडे दाद मागणं भाग पडलं; पण माझ्या राष्ट्रावर आरोप करायला माझ्याजवळ काही होतं म्हणून नाही. २०म्हणून, ह्या कारणावरून, मी तुम्हाला भेटायला आणि तुमच्याशी बोलायला माझ्याकडे बोलावलं आहे. कारण इस्राएलाच्या आशेमुळं मी ह्या साखळीनं बांधलेला आहे.”
२१तेव्हा ते त्याला म्हणाले,
“आम्हाला यहुदियाहून आपल्याविषयी काही पत्रं मिळालेली नाहीत, किंवा आलेल्या बंधूंपैकी कोणी काही सांगितलं नाही किंवा कोणी वाईट बोलला नाही. २२पण तुम्ही जे मानता ते तुमच्याकडून ऐकायची आमची इच्छा आहे, कारण ह्या पंथाविषयी आम्हाला माहीत आहे की, सर्वत्र ह्याविरुद्ध बोलण्यात येतं.”
२३आणि त्यांनी त्याच्यासाठी एक दिवस नेमला तेव्हा पुष्कळ जण त्याच्याकडे घरी आले; आणि त्यानं देवाच्या राज्याविषयी निक्षून साक्ष देत आणि मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांवरून येशूविषयी त्यांची खातरी पटवीत, त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत उलगडा केला. २४आणि ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या काहींनी मानल्या व काहींनी त्यांवर विश्वास ठेवला नाही.
२५आणि त्यांचे आपसात एकमत न होऊन ते जात असता पौलाने त्यांना एक वचन सांगितले,
“यशया संदेष्ट्याच्या द्वारे, पवित्र आत्मा तुमच्या पूर्वजांना बरोबर बोलला. २६तो म्हणतो की,
 ‘ह्या लोकांकडे जाऊन सांग.
  तुम्ही ऐकून ऐकाल,
  आणि विचार करणार नाही.
  तुम्ही पाहून पहाल,
  आणि ओळखणार नाही.
  २७कारण ह्या लोकांचे मन जड झाले आहे;
  कान ऐकण्यात मंद आहेत, 
  त्यांनी आपले डोळे मिटलेत;
  म्हणजे त्यांनी डोळ्यांनी बघू नये,
  कानांनी ऐकू नये,
  त्यांनी मनाने विचार करू नये,
  आणि वळू नये,
  आणि मी त्यांना बरे करू नये.’
२८म्हणून तुम्हाला हे विदित होवो की, देवाचं तारण परजनांकडे पाठवलं आहे; आणि ते त्याविषयी ऐकतील.”
२९-३०आणि तो पुरी दोन वर्षे आपल्या भाड्याच्या घरात राहिला; आणि त्याच्याकडे जे तेथे येत त्या सर्वांचे स्वागत करून ३१तो त्यांना पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करी, आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवी. त्याला मना करणारा कोणी नव्हता. 

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s