Acts 6-10

प्रेषितांची कृत्ये

—–प्रे. कृ. ६—–

आणि त्या दिवसांत शिष्यांची संख्या बहुगुणित होत असता, इब्री भाषा बोलणार्‍यांविरुद्ध हेल्लेणी बोलणार्‍यांची कुरकुर होऊ लागली; कारण रोजच्या वाढण्यात त्यांच्या विधवांकडे दुर्लक्ष होत असे. तेव्हा त्या बारांनी शिष्यसमुदायास आपल्याकडे बोलवून म्हटले,
“आम्ही देवाचं वचन सोडून पंगती वाढणं हे बरोबर नाही. म्हणून बंधूंनो, तुम्ही आपल्यातले नावाजलेले, आत्म्यानं आणि ज्ञानीपणानं भरलेले सात जण शोधून काढा. म्हणजे आम्ही त्यांना ह्या कामावर नेमू; पण आम्ही प्रार्थनेत आणि वचनाच्या सेवेत ठाम राहू.”
आणि ह्या म्हणण्याने सर्व लोक संतुष्ट झाले; तेव्हा त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने भरलेला स्तेफन, तसेच फिलिप, प्रखोरस, निकानूर,  तिमोन, पारमिनास आणि अंत्युखियाचा यहुदीय धर्मानुयायी निखोलाव ह्यांना निवडले, आणि त्यांना प्रेषितांपुढे उभे केले. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर त्यांनी त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाची वाढ झाली, आणि यरुशलेमात शिष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात बहुगुणित झाली. आणि याजकांमधील एक मोठा गट विश्वासाचे आज्ञापालन करू लागला.

आता, कृपेने आणि सामर्थ्याने भरलेला स्तेफन हा लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करीत होता. पण ज्याला लिबर्टीन लोकांचे सभास्थान म्हणत त्या सभास्थानातील कित्येक जण, त्यांच्यातलेच कुरेनेचे व अलेक्झांद्रियाचे काही जण, आणि किलिकियातले व आसियातले कित्येक जण स्तेफनाबरोबर वाद करायला उठले. १०आणि तो ज्या ज्ञानीपणाने व आत्म्याने बोलला त्याला ते तोंड देऊ शकले नाहीत.
११तेव्हा त्यांनी काही लोक मिळवून उभे केले; आणि त्यांनी आरोप केला की, त्यांनी त्याला मोशेविरुद्ध आणि देवाविरुद्ध दुर्भाषणपर शब्द बोलताना ऐकले होते. १२मग त्यांनी लोकांना आणि वडिलांना व शास्त्र्यांना चिथवले, आणि त्याच्यावर चाल करून त्याला धरले, आणि न्यायसभेपुढे आणले. १३आणि त्यांनी खोटे साक्षी उभे केले; आणि ते म्हणाले,
“हा मनुष्य ह्या पवित्र स्थानाविरुद्ध आणि नियमशास्त्राविरुद्ध दुर्भाषणपर शब्द बोलायचं थांबवीत नाही. १४कारण आम्ही ह्याला बोलताना ऐकलं आहे की, नासोरी येशू हे स्थान मोडील, आणि मोशेनं आपल्याला जे परिपाठ नेमून दिलेत ते तो बदलील.”
१५आणि जे सर्व जण न्यायसभेत बसले होते त्यांनी त्याच्याकडे टक लावली आणि त्यांनी त्याची चर्या देवदूताच्या चर्येसारखी झालेली बघितली.    

—–प्रे. कृ. ७—–

तेव्हा श्रेष्ठ याजक म्हणाला,
“ह्या गोष्टी अशाच आहेत काय?”
आणि तो म्हणाला,
“अहो बंधूहो, आणि पितेहो,
“आपला पूर्वज अब्राहाम हा हारानास जाऊन राहण्याअगोदर, मेसापोटेम्यात होता तेव्हा गौरवाचा देव त्याला प्रगट झाला. आणि तो त्याला म्हणाला, ‘तू ह्या देशातून, आणि तुझ्या नातलगातून बाहेर नीघ; आणि मी तुला दाखवणार आहे त्या देशात जा.’ मग तो खास्द्यांच्या देशातून बाहेर जाऊन हारानात राहिला, आणि, त्यानं त्याचा बाप मेल्यावर, त्याला तेथून आता तुम्ही रहात आहा त्या देशात आणलं. आणि त्यानं त्याला काही वतन दिलं नाही. हो, चवडाभरदेखील नाही; पण तेव्हा त्याला मूल नसताना त्यानं त्याला आणि त्याच्यामागून त्याच्या संतानाला तो वतन द्यायचं वचन दिलं. आणि देव असं म्हणाला की, ‘त्याच्या संतानाला परदेशात उपरी होऊन रहावं लागेल; ते त्यांना आपले दास करतील आणि चारशे वर्षं त्यांना जाचतील.’ आणि देव म्हणाला की, ‘ते ज्या राष्ट्राच्या दास्यात राहतील त्याचा मी न्याय करीन, आणि त्यानंतर ते बाहेर येतील आणि ह्या ठिकाणी माझी सेवा करतील.’ आणि त्यानं त्याला सुनतविधीचा करार दिला; आणि तो अशा प्रकारे इसहाकाचा जनक झाला; आणि त्याने त्याची आठव्या दिवशी सुनत केली. आणि इसहाक याकोबाचा, आणि याकोब बारा कुलपतींचा जनक झाला.
“कुलपतींनी ईर्ष्या धरून योसेफाला मिसरात विकलं पण देव त्याच्याबरोबर होता. १०त्यानं त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवलं आणि मिसरात फारो राजापुढं त्याला कृपा आणि सुज्ञता पुरवली. तेव्हा त्यानं त्याला मिसरावर आणि आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमलं.
११“आता, सर्व मिसर देशात आणि कनान देशात दुष्काळ पडल्यामुळं मोठं संकट आलं; आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेना. १२पण याकोबानं जेव्हा ऐकलं की, मिसरात धान्य आहे तेव्हा त्यानं आपल्या पित्यांना पहिल्या वेळी पाठवून दिलं. १३मग दुसर्‍या वेळी योसेफानं आपल्या भावांना ओळख दिली; आणि फारोला योसेफाचं कुळ माहीत झालं. १४मग योसेफानं त्यांना पाठवून आपल्या पित्याला म्हणजे याकोबाला, आणि सर्व नातलगांना तिकडे बोलावलं; ते पंचाहत्तर जीव होते. १५अशा प्रकारे याकोब मिसरात गेला, आणि मेला; आणि तसेच आपले पितेही मेले. १६तेव्हा त्यांना शखेमात नेलं, आणि शखेमात अब्राहामानं हमोराच्या पुत्रांकडून रुप्याच्या मोबदल्यात विकत घेतलेल्या थडग्यात ठेवलं.
१७“पण देवानं अब्राहामाला ज्याचं आश्वासन दिलं होतं त्या वचनाचा काळ जेव्हा जवळ आला तेव्हा ते लोक मिसरात वाढले आणि बहुगुणित झाले, १८तेव्हा ज्याला योसेफ माहीत नव्हता असा दुसरा राजा मिसरात झाला. १९तो आपल्या लोकांशी कपटानं वागला, आणि त्यानं आपल्या पूर्वजांवर अशी सक्ती केली की, त्यांनी आपल्या नवजात बालकांना बाहेर टाकावं; हेतू हा की, ती जगू नयेत.
२०“आणि त्या काळात मोशे जन्मला; तो देवाच्या दृष्टीपुढं सुंदर होता,  आणि त्याच्या बापाच्या घरात त्यांनी त्याला तीन महिने संभाळलं. २१आणि त्याला बाहेर टाकलं तेव्हा फारोच्या कन्येनं उचलून घेतलं, आणि तिनं त्याला आपला मुलगा म्हणून संभाळलं. २२आणि, मिसर्‍यांच्या सर्व ज्ञानात मोशेला शिक्षण दिलं गेलं; तो शब्दांत आणि कृतीत पराक्रमी होता.
२३“आणि जेव्हा त्याचं चाळीस वर्षांचं वय होत आलं तेव्हा त्याच्या मनात आलं की, आपण आपल्या बांधवांची, इस्राएलाच्या वंशजांची भेट घ्यावी;  २४आणि एकावर अन्याय केला जात होता हे बघितल्यावर ज्याच्यावर जुलुम होत होता त्याची कड घेऊन त्यानं त्याचा न्याय केला; आणि त्या मिसर्‍याला मारलं; २५कारण त्याला असं वाटलं की, त्याच्या हातानं देव त्यांना अशा प्रकारे सोडवील, हे त्याच्या बांधवांना समजेल; पण ते त्यांना समजलं नाही. २६दुसर्‍या दिवशी ते भांडत असताना तो त्यांच्यापुढं उभा राहिला आणि त्यांची समजूत घडवून आणायला त्यांना म्हणाला, ‘गड्यांनो, तुम्ही भाऊ आहा; तुम्ही एकमेकांवर अन्याय का करता?’  २७पण, जो आपल्या सोबत्यांवर अन्याय करीत होता त्यानं त्याला दूर लोटून म्हटलं, ‘कोणी तुला आमच्यावर अधिकारी आणि न्यायाधीश नेमलं? २८काल त्या मिसर्‍याला ठार मारलंस, तसंच मला ठार मारावं अशी तुझी इच्छा आहे काय?’ २९तेव्हा ह्या बोलण्यामुळं मोशे पळाला आणि मिद्यानात उपरी झाला; तेथे त्याला दोन मुलगे झाले.
३०“आणि चाळीस वर्षं पूर्ण झाल्यावर त्याला सिनाय डोंगराच्या रानात,  एका झुडपात, अग्नीच्या ज्वालेत एक देवदूत दिसला. ३१मोशेनं ते बघितलं तेव्हा त्यानं त्या दृश्याविषयी आश्चर्य केलं; आणि तो ते न्याहाळायला जवळ जात असता परमेश्वराचा आवाज तो होता तेथवर आला, ३२‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, आणि याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे भयभीत झाला, आणि तो ते न्याहाळायला जवळ जायला धजला नाही. ३३तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, ‘तू आपल्या वहाणा आपल्या पायांतून काढ, कारण, तू ज्या जागेवर उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. ३४मी मिसरात असलेल्या माझ्या लोकांची गांजणूक बघितली आहे, खरोखर बघितली आहे, त्यांचं कण्हणं ऐकलं आहे, आणि मी त्यांना सोडवायला उतरलो आहे. आणि आता चल, मी तुला मिसरात पाठवीन.’
३५“ ‘कोणी तुला आमच्यावर अधिकारी आणि न्यायाधीश नेमलं?’, असं म्हणून त्यांनी ज्याला नाकारलं त्या ह्या मोशेला, त्याला झुडपात प्रगट झालेल्या देवदूताकरवी, देवानं अधिकारी आणि मुक्तिदाता करून पाठवलं. ३६ह्यानं त्यांना, मिसर देशात, तांबड्या समुद्रात आणि अरण्यात, चाळीस वर्षं, अद्भुतं आणि चिन्हं दाखवून बाहेर आणलं.
३७“ ‘आणि देव तुमच्या बांधवांतून माझ्यासारखा एक संदेष्टा तुमच्यासाठी उभा करील’, असं जो इस्राएलाच्या वंशजांना म्हणाला, तो हा मोशे होय. ३८रानातल्या मंडळीत, सिनाय डोंगरावर त्याच्याशी बोलणार्‍या देवदूतांबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हा होय. आणि त्याला आपल्याला द्यायला जिवंत वचनं मिळाली. ३९त्याच्या अधीन रहावं अशी आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती. त्यांनी त्याला आपल्यापासून दूर लोटलं, ते आपल्या मनांत मिसराकडे फिरले, ४०आणि अहरोनाला म्हणाले, ‘तू आमच्यासाठी जे आमच्यापुढं चालतील असे देव कर कारण, ज्यानं आपल्याला मिसर देशातून बाहेर आणलं त्या ह्या मोशेचं काय झालं ते आम्हाला माहीत नाही.’ ४१मग त्यांनी, त्या दिवसांत, एक वासरू घडवून त्या मूर्तीपुढं बलिदान आणलं; आणि, त्यांनी आपल्या हातांच्या कामांत आनंद केला. ४२तेव्हा देव फिरला, आणि त्यानं त्यांना आकाशातल्या सेनागणाची उपासना करायला सोडून दिलं; कारण संदेष्ट्यांच्या ग्रंथात असं लिहिलं आहे की,
 ‘हे इस्राएलाच्या घराण्या,
  तुम्ही मला रानात, चाळीस वर्षे,
  मारलेले पशू आणि बली
  अर्पण केलेत काय?
  ४३पण तुम्ही मोलोखाचा मंडप
  आणि रेफान देवाचा तारा
  उचलून घेतला.
  ते त्यांची उपासना करायला
  तुम्ही केलेले नमुने होते.
  आणि मीही तुम्हाला बाबेलाच्या
  पलीकडे घेऊन जाईन.’
४४आपल्या पूर्वजांना रानात साक्षीचा मंडप होता. तो देवानं मोशेला त्यानं पाहिलेल्या नमुन्याप्रमाणं करायला सांगतेवेळी आज्ञा दिल्याप्रमाणं होता. ४५आणि, त्यांच्या मागून ज्यांना मिळाला त्या आपल्या पूर्वजांनी, यहोशवाबरोबर, परजनांच्या देशात आणला. देवानं त्यांना आपल्या पूर्वजांपुढून बाहेर लोटले. दाविदाच्या दिवसांपर्यंत तो तसाच होता. ४६त्यानं देवाच्या दृष्टीपुढं कृपा संपादली; आणि याकोबाच्या देवासाठी एक वसतिस्थान मिळवता यावं म्हणून याचना केली. ४७पण शलमोनानं त्याच्यासाठी मंदिर बांधलं; ४८तरी जो परात्पर आहे तो हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही. कारण संदेष्टा म्हणतो की,
  ४९‘परमेश्वर म्हणाला,
  आकाश माझे आसन आहे,
  आणि पृथ्वी माझे पदासन आहे;
  तुम्ही माझ्यासाठी कोणते घर बांधणार?
  किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?
  ५०माझ्या हाताने ह्या सगळ्या गोष्टी
  केल्या नाहीत काय?’
५१“अहो तुम्ही ताठ मानेच! मनाचे आणि कानांचे बेसुनत! तुम्ही सतत पवित्र आत्म्याला विरोध करता. तुमच्या पूर्वजांनी जसं केलं तसंच तुम्ही करता. ५२तुमच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांतल्या कोणाचा पाठलाग केला नाही? आणि तो ‘एक नीतिमान’ येणार आहे असं ज्यांनी आधी सांगितलं त्यांना त्यांनी ठार मारलं; आणि तुम्ही त्याला धरून देणारे आणि ठार मारणारे झाला आहात. ५३देवदूतांच्या सेवेद्वारे तुम्हाला नियमशास्त्र मिळालं, पण तुम्ही ते पाळलं नाही.”

५४त्यांनी हे सर्व ऐकले तेव्हा त्यांच्या मनाला चटका लागला. आणि ते त्याच्यावर दात खाऊ लागले. ५५पण, तो पवित्र आत्म्याने भरला असता, त्याने आकाशाकडे टक लावली तेव्हा त्याला देवाचे तेज, आणि देवाच्या उजवीकडे येशू उभा आहे असे दिसले. ५६आणि तो म्हणाला,
“बघा, मी पहात आहे की, आकाश उघडलं आहे, आणि, मनुष्याचा पुत्र देवाच्या उजव्या हाताजवळ उभा आहे.”
५७तेव्हा ते मोठ्या आवाजात ओरडले आणि त्यांनी आपले कान दाबले; आणि ते एकमताने त्याच्यावर धावले. ५८आणि त्यांनी त्याला नगरातून बाहेर नेऊन दगडमार केला. तेव्हा साक्षींनी शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ आपले कपडे टाकले. ५९आणि, ते स्तेफनाला दगडमार करीत असता, तो धावा करीत म्हणाला,
“प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.”
६०आणि त्याने गुडघे टेकले व तो मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला,
“प्रभू, हे पाप ह्यांच्या हिशोबी मांडू नको.”
आणि एवढे बोलून तो निजला.   

—–प्रे. कृ. ८—–

आणि शौल त्याच्या मृत्यूला संमती देत होता. आणि, त्या दिवशी,  यरुशलेममधील मंडळीचा मोठा छळ सुरू झाला. आणि, प्रेषितांखेरीज ते सर्व जण यहुदियाच्या व शोमरोनाच्या प्रांतात पांगले. पण भक्तिमान लोकांनी स्तेफनाला नेले आणि त्यांनी त्याच्याकरता मोठा शोक केला. पण इकडे शौलाने मंडळीला सतावले. आणि प्रत्येक घरात शिरून पुरुषांना व स्त्रियांना ओढून नेऊन बंदिशाळेत घातले.

ह्या कारणांमुळे जे लोक पांगले ते प्रत्येक ठिकाणी वचनाची सुवार्ता सांगत गेले. तेव्हा फिलिप खाली, शोमरोन नगरात गेला व त्याने त्यांना ख्रिस्ताची घोषणा केली. आणि लोकांनी त्याचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे बघितली, तेव्हा त्यांनी, एकमताने, फिलिप त्यांना सांगत असलेल्या गोष्टींकडे लक्ष दिले. कारण पछाडलेल्या पुष्कळ लोकांतून अशुद्ध आत्मे मोठ्या आवाजात ओरडून निघाले. आणि पुष्कळ पक्षघाती व पांगळे बरे झाले. आणि त्या नगरात मोठा आनंद झाला.

पण तेथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता; तो त्या नगरात पूर्वी जादुगिरी करीत असे. तो शोमरोनी लोकांना भुलवीत असे, आणि तो कोणी मोठा होता असे दाखवीत असे. १०ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्याच्याकडे लक्ष देत, आणि म्हणत की, ‘देवाची महाशक्ती म्हणतात तो हाच आहे.’ ११आणि ते त्याला मानीत असत, कारण त्याने आपल्या जादूंनी त्यांना दीर्घकाळ भुलवले होते. १२पण फिलिप देवाच्या राज्याविषयी व येशू ख्रिस्ताच्या नावाविषयी त्यांना सुवार्ता सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा त्यांनी, पुरुषांनी व स्त्रियांनी, बाप्तिस्मा घेतला. १३मग स्वतः शिमोनानेही विश्वास ठेवला, आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिपाजवळ ठाम राहिला; आणि चिन्हे व मोठे चमत्कार होत असता तो पहात असे व चकित होत असे.

१४आता, जे प्रेषित यरुशलेमात होते त्यांनी ऐकले की, शोमरोनानेदेखील वचन स्वीकारले आहे, तेव्हा त्यांनी पेत्र व योहान ह्यांना त्यांच्याकडे पाठवले. १५आणि ते खाली आल्यावर, त्यांनी त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. (१६कारण तोपर्यंत तो त्यांच्यातल्या कोणावर उतरला नव्हता; केवळ प्रभू येशूच्या नावाने त्यांचा बाप्तिस्मा झाला होता.) १७मग त्यांनी त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.
१८आणि शिमोनाने बघितले की, प्रेषितांचे हात वर ठेवले गेल्याने पवित्र आत्मा दिला जातो तेव्हा त्याने त्यांच्यापुढे पैसे ठेवले, १९आणि तो त्यांना म्हणाला,
“मला पण हा अधिकार द्या, म्हणजे मी ज्या कोणावर माझे हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा.”
२०तेव्हा पेत्र त्याला म्हणाला,
“तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश होवो; कारण तू विचार केलास की, पैशानं देवाचं दान मिळवता येईल. २१तुला ह्या गोष्टीत भागी नाही किंवा वाटा नाही, कारण देवाच्या दृष्टीपुढं तुझं मन सरळ नाही. २२तर तू आपल्या ह्या कुवृत्तीचा पश्चात्ताप कर, आणि प्रभूची प्रार्थना कर; म्हणजे,  तुझ्या मनातल्या कल्पनेची तुला, कदाचित्, क्षमा केली जाईल. २३कारण मी पाहतो, तू कडूपणाच्या कडू मुळात, आणि अनीतीच्या बंधनात आहेस.”
२४तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले,
“तुम्ही म्हटलेल्या गोष्टींपैकी कोणतीच माझ्यावर येऊ नये म्हणून तुम्हीच माझ्याकरता प्रभूची प्रार्थना करा.”
२५आणि तेथे त्यांनी निक्षून साक्ष देऊन प्रभूचे वचन सांगितल्यावर ते यरुशलेमकडे परत निघाले; आणि त्यांनी शोमरोन्यांच्या पुष्कळ खेड्यांत सुवार्ता सांगितली.

२६तेव्हा परमेश्वराचा दूत फिलिपाशी बोलला व त्याला म्हणाला,
“ऊठ आणि दक्षिणेकडे जा, आणि यरुशलेमकडून गज्जास जाणार्‍या वाटेस लाग.”
(तेथे वाळवंट आहे.) २७आणि तो उठला आणि गेला; आणि बघा, एक हबशी मनुष्य, हबशी लोकांची राणी कांदके हिच्या सर्व भांडारावर अधिकारी असलेला एक षंढ यरुशलेमला उपासना करायला आला होता; २८तो परत जात होता, आणि आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचे वाचन करीत होता.
२९तेव्हा आत्मा फिलिपाला म्हणाला,
“जवळ जा आणि तो रथ गाठ.”
३०फिलिप त्याच्याकडे धावत गेला तेव्हा तो यशया संदेष्ट्याचे वाचन करीत होता हे त्याने ऐकले, आणि तो त्याला म्हणाला,
“आपण काय वाचता ते आपल्याला समजतं काय?”
३१तेव्हा तो म्हणाला,
“मला कोणी मार्गदर्शन केल्याशिवाय कसं समजू शकेल?”
आणि त्याने फिलिपाला वर येऊन आपल्याजवळ बसायची विनंती केली.
३२आणि तो जो शास्त्रलेख वाचीत होता तो भाग असा होता,
 ‘मेंढराप्रमाणे त्याला वधासाठी नेण्यात आले,
  आणि कोकरू जसे कातरणार्‍यापुढे
  मुके असते
  तसे त्याने आपले तोंड उघडले नाही.
  ३३त्याचा न्याय त्याच्या दीन अवस्थेत
  हिरावला गेला.
  आणि कोण त्याच्या पिढीचे वर्णन करील?
  कारण पृथ्वीवरून त्याचा जीव
घेतला गेला आहे.’
३४आणि षंढाने फिलिपाला उत्तर देऊन म्हटले,
“मी आपल्याला सादर विचारतो की, संदेष्टा हे कोणाविषयी म्हणतो?  स्वतःविषयी किंवा दुसर्‍या कोणाविषयी?”
३५तेव्हा फिलिपाने आपले तोंड उघडले व त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूची सुवार्ता सांगितली.
३६आणि ते वाटेने पुढे जात असता एका पाणवठ्याजवळ आले; तेव्हा षंढ म्हणाला,
“बघा, हे पाणी; मला बाप्तिस्मा घेता यायला काय आडकाठी आहे?”
३७-३८आणि त्याने रथ थांबवायची आज्ञा दिली. मग फिलिप व षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले; आणि त्याने त्याचा बाप्तिस्मा केला. ३९आणि ते पाण्यातून वर येताच परमेश्वराच्या आत्म्याने फिलिपाला उचलले; त्यामुळे त्यानंतर षंढाने त्याला बघितले नाही, आणि तो आपल्या वाटेने आनंद करीत गेला. ४०पण फिलिप अजोत येथे आढळला; आणि तो कैसरियास येईपर्यंत त्याने सर्व नगरांत सुवार्ता गाजवीत प्रवास केला.

—–प्रे. कृ. ९—–

आणि शौल, अजून प्रभूच्या शिष्यांविरुद्ध धमकावण्यांचे व ठार मारणार्‍यांचे फूत्कार काढीत, श्रेष्ठ याजकाकडे गेला; आणि त्याने त्याच्याकडून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, त्याला कोणीही, पुरुष किवा स्त्रिया, हा मार्ग अवलंबीत आहेत असे आढळल्यास त्याने त्यांना अटक करून यरुशलेमास आणावे.
आणि तो प्रवास करीत दिमिष्काजवळ आला असता, त्याच्या सभोवती आकाशातून, अकस्मात्, एक प्रकाश चमकला; आणि तो जमिनीवर पडला; तेव्हा त्याने एक आवाज ऐकला आणि तो त्याला म्हणाला,
‘शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?‘
तेव्हा तो म्हणाला,
“प्रभू, तू कोण आहेस?”
आणि प्रभू म्हणाला,
“तू ज्याचा छळ करतोस तो येशू मी आहे. तर ऊठ, आणि नगरात जा; आणि तू काय केलं पाहिजे ते तुला सांगण्यात येईल.”
तेव्हा जे लोक त्याच्याबरोबर जात होते ते स्तब्ध उभे राहिले; कारण त्यांनी आवाज ऐकला पण कोणाला पाहिले नाही. आता, शौल जमिनीवरून उठला; आणि त्याचे डोळे उघडले. तेव्हा त्याला काही दिसेना; पण त्यांनी त्याला, हाताला धरून चालवीत, दिमिष्कात आणले. त्याला तीन दिवस दिसत नव्हते, आणि तो काही खात पीत नव्हता.

१०तेव्हा दिमिष्कात हनन्या नावाचा एक शिष्य होता; आणि प्रभू त्याला दृष्टान्तात म्हणाला,
“हनन्या,”
आणि तो म्हणाला,
“प्रभू, पहा, मी इथं आहे.”
११आणि प्रभू त्याला म्हणाला,
“ऊठ, आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा; आणि तिथं यहुदाच्या घरी तार्स इथल्या शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण बघ, तो प्रार्थना करीत आहे; १२आणि त्याला दृष्टी यावी म्हणून हनन्या नावाचा एक जण आत येऊन त्याच्यावर हात ठेवीत आहे असं त्यानं दृष्टान्तात बघितलं आहे.”
१३तेव्हा हनन्याने उत्तर दिले,
“प्रभू, ह्या मनुष्यानं यरुशलेमात तुझ्या पवित्र जनांचं किती वाईट केलं आहे, हे मी त्याच्याविषयी पुष्कळांकडून ऐकलं आहे; १४आणि त्याला वरिष्ठ याजकांकडून, इथंदेखील जे तुझ्या नावाचा धावा करतात अशा सर्वांना अटक करायचा अधिकार आहे.”
१५पण प्रभू त्याला म्हणाला,
“जा, कारण तो परजनांपुढं, राजांपुढं आणि इस्राएलाच्या वंशजांपुढं माझं नाव घेऊन जायला माझं निवडलेलं पात्र आहे. १६कारण माझ्या नावावरून त्याला किती मोठ्या गोष्टी सोसल्या पाहिजेत हे मी त्याला प्रगट करीन.”
१७तेव्हा हनन्या निघून त्या घरात गेला; त्याने त्याच्यावर आपले हात ठेवले व तो त्याला म्हणाला,
“बंधू शौल, तू येत असताना तुझ्या वाटेवर ज्या प्रभूनं म्हणजे येशूनं तुला दर्शन दिलं, त्यानं तुला दृष्टी यावी आणि तू पवित्र आत्म्यानं भरावंस म्हणून मला पाठवलं आहे.”
१८आणि तेव्हाच त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले. आणि लगेच त्याला दृष्टी आली; आणि तो उठला व त्याने बाप्तिस्मा घेतला.
१९आणि त्याने अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. त्यानंतर तो कित्येक दिवस दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर आढळला. २०आणि, लगेच, त्याने सभास्थानातून येशूविषयी अशी घोषणा केली की, ‘तो देवाचा पुत्र आहे.’ २१आणि हे ऐकणारे सर्व चकित झाले व म्हणू लागले की,
“जे ह्या नावाचा धावा करणारे यरुशलेमात होते त्यांचा ज्यानं नाश केला तो हाच ना? आणि इथं त्यांना अटक करावी आणि वरिष्ठ याजकांकडे न्यावं एवढ्याच हेतूनं हा आला होता ना?”
२२पण शौल अधिक प्रबळ होत गेला, आणि, हाच ख्रिस्त आहे, हे प्रस्थापित करून, त्याने दिमिष्कात राहणार्‍या यहुद्यांना कुंठित केले.
२३आता, पुष्कळ दिवस झाल्यावर यहुद्यांनी त्याला ठार मारायचा आपसात विचार केला; पण शौलाला त्यांचा कट कळला. २४ते त्याला ठार मारायला दिवसा व रात्री वेशीवर टेहळणी करीत होते. २५पण शिष्यांनी त्याला रात्री नेले व पेटार्‍यात घालून तटावरून खाली सोडले.

२६तो यरुशलेमात आल्यानंतर त्याने शिष्यांत मिसळण्याचा प्रयत्न केला. पण ते सगळे त्याला भीत होते, कारण तो एक शिष्य होता ह्यावर त्यांनी विश्वास ठेवला नव्हता. २७पण बर्णबाने त्याला घेऊन प्रेषितांकडे आणले, आणि त्याने वाटेत प्रभूला कसे बघितले, प्रभू त्याच्याशी कसा बोलला, आणि तो दिमिष्कात येशूच्या नावाने कसा धैर्याने बोलला हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले. २८मग तो यरुशलेमात त्यांच्याबरोबर येत जात राहिला. २९तो प्रभूच्या नावाने धैर्याने बोलला, आणि त्याने हेल्लेणी यहुद्यांशी वादविवाद केला. पण ते त्याला मारायचा प्रयत्न करू लागले. ३०हे बांधवांना समजले तेव्हा त्यांनी त्याला कैसरियास आणले, आणि तार्सला पाठवून दिले.
३१तेव्हा सर्व यहुदियात, गालिलात आणि शोमरोनात मंडळीला सर्वत्र स्वास्थ्य लाभून तिची उभारणी झाली आणि परमेश्वराच्या भयात व पवित्र आत्म्याच्या सांत्वनात ती पुढे जात असता बहुगुणित झाली.

३२आणि असे झाले की, पेत्र चहुकडे फिरत असता, लोद येथे रहात असलेल्या पवित्र जनांकडेही आला. ३३तेथे त्याला ऐनियास नावाचा एक मनुष्य आढळला. तो आठ वर्षे आपले अंथरूण धरून होता आणि पक्षघाताने आजारी होता. ३४आणि पेत्र त्याला म्हणाला,
“ऐनियास, येशू ख्रिस्त तुला बरं करीत आहे; ऊठ, तुझं अंथरूण नीट कर.”
आणि तो लगेच उठला. ३५आणि लोद व शारोन येथे राहणार्‍या सर्वांनी त्याला बघितले व ते प्रभूकडे वळले.

३६ह्यावेळी यापो येथे टबिया (म्हणजे दुर्कस) नावाची एक शिष्या होती. ती करीत असलेल्या चांगल्या कामांत व परोपकारांत गढलेली असे. ३७आणि असे झाले की, त्या दिवसांत ती आजारी झाली आणि मेली; आणि त्यांनी तिला स्नान घालून माडीवरच्या खोलीत ठेवले.
३८आणि यापोपासून लोद जवळ असल्यामुळे आणि पेत्र तेथे होता हे शिष्यांनी ऐकल्यामुळे त्यांनी त्याच्याकडे दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की, ‘तुम्ही आमच्याकडे विनाविलंब या.’ ३९तेव्हा पेत्र उठला आणि त्यांच्याबरोबर निघाला, आणि तो आला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; आणि सर्व विधवा रडत त्याच्याजवळ उभ्या राहिल्या; आणि दुर्कस त्यच्यात होती तेव्हा तिने केलेले झगे व अंगरखे त्याला दाखवू लागल्या.
४०पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली; आणि शरिराकडे मागे वळून तो म्हणाला, ‘टबिया, ऊठ’. तेव्हा तिने आपले डोळे उघडले आणि पेत्राला बघताच ती उठून बसली. ४१तेव्हा त्याने तिला हात दिला आणि उठवले. मग त्याने पवित्र जनांना आणि विधवांना आत बोलवून तिला जिवंत सादर केले. ४२हे सर्व यापोत माहीत झाले आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
४३आणि असे झाले की, तो यापो येथे कातडी कमावणार्‍या शिमोनाजवळ पुष्कळ दिवस राहिला.

—–प्रे. कृ. १०—–

आणि कैसरियात कर्नेल्यस नावाचा एक मनुष्य होता. तो ‘इटलिक पलटण’ म्हटलेल्या एका पलटणीचा शतपती होता. तो एक धार्मिक मनुष्य असून तो व त्याच्या घरचे सर्व जण देवाचे भय धरणारे होते. तो लोकांना पुष्कळ दाने देत असे व देवाची नित्य प्रार्थना करीत असे. आणि, त्याला दिवसाच्या नवव्या तासाच्या सुमारास, दृष्टान्तात असे दिसले की, देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला,
“कर्नेल्यस,”
तेव्हा त्याने त्याच्याकडे टक लावली आणि तो भयभीत होऊन म्हणाला,
“प्रभू, काय आहे?’
आणि तो त्याला म्हणाला,
“तुझ्या प्रार्थना आणि दयेच्या देणग्या वर देवासमोर स्मरणात आल्या आहेत. आणि, आता कुणाला यापोला धाड, आणि शिमोन नावाच्या मनुष्याला बोलाव; त्याचं दुसरं नाव पेत्र आहे. तो कातडी कमावणार्‍या शिमोनाच्या घरी उतरला आहे. त्याचं घर समुद्राच्या किनार्‍याजवळ आहे.”
मग, त्याच्याशी बोलणारा देवदूत गेल्यावर, त्याने त्याच्या दोन नोकरांना आणि त्याच्या तैनातीत राहणार्‍या एका धार्मिक शिपायाला बोलावले; आणि त्यांना सर्व गोष्टी सांगून त्याने त्यांना यापोस पाठवले.
दुसर्‍या दिवशी ते आपल्या मार्गाने प्रवास करून, त्या नगराच्या जवळ येत असता, पेत्र सहाव्या तासाच्या सुमारास प्रार्थना करायला धाब्यावर गेला. १०आणि त्याला फार भूक लागली होती व त्याची जेवायची इच्छा होती; पण ते तयारी करीत असता तो तंद्रीत गेला ११आणि त्याने पाहिले की, आकाश उघडले, आणि जणू मोठ्या झोळीसारखे, चार कोपरे बांधून पृथ्वीवर सोडलेले एक पात्र त्याच्यापुढे उतरले. १२त्यात पृथ्वीवरील सगळ्या प्रकारचे चतुष्पाद प्राणी, आणि सरपटणारे जीव, आणि आकाशातील पक्षी होते. १३आणि त्याला बोलण्याचा आवाज आला,
“पेत्रा, ऊठ, मार आणि खा.”
१४पण पेत्र म्हणाला,
“नको, प्रभू, कारण मी कधीच, काही निषिद्ध किवा अशुद्ध खाल्लेलं नाही.”
१५आणि त्याला पुन्हा, दुसर्‍या वेळी, तो आवाज आला,
“देवानं शुद्ध केलं आहे त्याला निषिद्ध मानू नको.” १६असे तीनदा झाले, आणि ते पात्र पुन्हा आकाशात घेतले गेले.
१७आता, पेत्राला जो दृष्टान्त दिसला होता त्याचा अर्थ काय असावा असा तो मनात विचार करीत असता, बघा, कर्नेल्यसाने धाडलेले इसम शिमोनाचे घर शोधीत फाटकाजवळ आले होते. १८आणि त्यांनी हाक मारून विचारले की,
“इकडे कोणी शिमोन पाहुणे आलेत काय? त्यांना पेत्र म्हणतात.”
१९पण पेत्र त्या दृष्टान्तावर विचार करीत असता आत्मा त्याला म्हणाला,
“बघ, तीन इसम तुला शोधीत आहेत. २०म्हणून ऊठ, खाली उतर, आणि कशाचा संशय न धरता त्यांच्याबरोबर जा; कारण मी त्यांना पाठवलं आहे.”
२१तेव्हा पेत्र त्या इसमांकडे खाली गेला आणि त्यांना म्हणाला,
“बघा, तुम्ही ज्याला शोधीत आहा तो मी आहे, तुमच्या येण्याचं कारण काय?”
२२आणि ते म्हणाले,
“शतपती कर्नेल्यस एक नीतिमान मनुष्य असून देवाला भिणारे आहेत;  आणि यहुद्यांच्या सर्व राष्ट्रांत त्यची ग्वाही दिली जाते. त्यांना पवित्र देवदूताकडून अशी सूचना मिळाली की, त्यांनी आपल्याला घरी बोलवून आपली वचनं श्रवण करावीत.”
२३मग त्याने त्यांना बोलवून त्यांचा पाहुणचार केला आणि दुसर्‍या दिवशी तो त्यांच्याबरोबर निघाला; आणि यापोतले काही बंधू त्याच्याबरोबर गेले.
२४आणि दुसर्‍या दिवशी ते कैसरियात आले तेव्हा कर्नेल्यस त्यांची वाट पहात होता, आणि त्याने आपल्या नातलगांना व जवळच्या मित्रांना एकत्र बोलावले होते. २५आणि पेत्र आत येत होता तेव्हा कर्नेल्यस त्याला भेटला, त्याच्या पायांशी पालथा पडला व त्याने त्याला नमन केले. २६पण पेत्राने त्याला वर उचलून म्हटले,
“उभे रहा; कारण मीपण एक मनुष्य आहे.”
२७मग तो त्याच्याशी बोलत असता तसाच आत गेला; आणि तेथे पुष्कळ जण जमले होते हे त्याला दिसले.
२८तेव्हा तो त्याला म्हणाला,
“आपण जाणता की, यहुदी मनुष्यानं परराष्ट्रीय मनुष्याशी संबंध ठेवणं किंवा त्याच्याकडे येणं हे त्याला कसं निषिद्ध आहे; पण देवानं मला दाखवलं की, मी कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध मानू नये. २९म्हणून मला बोलावलं तेव्हाच मी काही एक हरकत न घेता आलो; आणि म्हणून मी विचारतो की, आपण मला कोणत्या हेतूनं बोलावलं आहे?”
३०तेव्हा कर्नेल्यस म्हणाला,
“मी चार दिवसांपूर्वी सुमारे ह्याच घटकेला म्हणजे नवव्या ताशी, माझ्या घरात प्रार्थना केली, आणि बघा, एक मनुष्य झगझगीत वस्त्रांत माझ्यापुढं उभा होता. ३१आणि तो म्हणाला, ‘कर्नेल्यस, तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, आणि तुझ्या दयेच्या देणग्या देवाच्या दृष्टीपुढं स्मरणात आणल्या गेल्या आहेत. ३२म्हणून कोणाला यापोला धाड, आणि शिमोनाला इकडे बोलाव; त्याचं दुसरं नाव पेत्र आहे. तो समुद्राच्या किनार्‍याजवळ, कातडी कमावणार्‍या शिमोनाच्या घरी उतरला आहे.’ ३३म्हणून, लगेच, मी आपल्याला बोलावणं धाडलं आणि आपण आलात हे बरं केलं म्हणून प्रभूनं ज्या गोष्टींविषयी आपल्याला आज्ञा दिली आहे, त्या सर्व ऐकायला आम्ही सर्व जण आता देवासमोर उपस्थित आहोत.”

३४तेव्हा पेत्राने तोंड उघडले आणि म्हटले,
“मला हे सत्य दिसत आहे की, देव पक्षपाती नाही. ३५पण प्रत्येक राष्ट्रातील जो कोणीही त्याला भितो आणि नीती आचरतो तो त्याला मान्य आहे. ३६त्यानं इस्राएलाच्या वंशजांकडे आपलं वचन पाठवलं, आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे शांतीच्या सुवार्तेची घोषणा केली. तो सर्वांचा प्रभू आहे. ३७योहानानं गाजविलेल्या बाप्तिस्म्यानंतर जी गोष्ट गालिलापासून सुरू होऊन सर्व यहुदियात झाली ती तुम्हाला माहीत आहे. ३८देवानं कसा नासरेथच्या येशूला पवित्र आत्म्यानं आणि सामर्थ्यानं अभिषेक केला! तो चांगल्या गोष्टी करीत, आणि सैतानाकडून जे जाचले जात होते त्या सर्वांना बरं करीत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता.
३९“आणि त्यानं यहुद्यांच्या प्रांतात आणि यरुशलेमात जे सर्व केलं त्याचे आम्ही साक्षी आहो. त्यांनी त्याला झाडावर टांगून मारलं. ४०-४१देवानं त्याला तिसर्‍या दिवशी उठवलं आणि, सर्व लोकांना नाही, पण देवानं ज्यांना आधीपासून निवडलं होतं अशा साक्षींना म्हणजे आम्हाला प्रगट होऊ दिलं; आणि तो मेलेल्यांतून पुन्हा उठल्यावर आम्ही त्याच्याबरोबर खात पीत होतो. ४२आम्ही लोकांना त्याची घोषणा करावी आणि देवानं निवडलेला, जिवंतांचा आणि मृतांचा न्यायाधीश हाच आहे अशी निक्षून साक्ष द्यावी, अशी आम्हाला आज्ञा दिली. ४३सर्व संदेष्टे त्याच्याविषयी साक्ष देतात की, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाला त्याच्या नावाद्वारे क्षमा मिळेल.”

४४आणि, पेत्र हे शब्द बोलत असता ज्या सर्वांनी वचन ऐकले त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला. ४५आणि सुनत झालेल्यांपैकी जे विश्वास ठेवणारे लोक पेत्राबरोबर आले होते ते चकित झाले; कारण, पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव परजनांवरही झाला होता; ४६कारण, ते अन्य भाषांत बोलून, देवाला थोरवी देत होते हे त्यांनी ऐकले. तेव्हा पेत्राने उत्तर दिले,
४७“आपल्याप्रमाणं ज्या ह्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा केला जाऊ नये म्हणून कोणी पाणी मना करू शकेल काय?”
४८आणि त्याने आज्ञा दिली की, येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा केला जावा. मग त्याने काही दिवस रहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.  

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s