Colossians

कलसैकरांस पत्र

—–कलसै १—–

देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल, आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून;
कलसैमधील पवित्र जनांस व ख्रिस्तामधील विश्वासू बांधवांसः
देव आपला पिता ह्याजकडून तुम्हाला कृपा व शांती.

आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नित्य देवाचे, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पित्याचे उपकार मानतो; कारण येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी, आणि सर्व पवित्र जनांविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे. कारण तुमच्यासाठी स्वर्गात आशा ठेवलेली आहे. ह्या आशेविषयी,तुम्ही प्रथम, सुवार्तेच्या सत्याच्या वचनात ऐकलेत. ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत, आणि तुम्हाला सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले, त्या दिवसापासून, ती जशी सार्‍या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे. आणि ह्या कृपेविषयीही तुम्ही एपफ्रासकडून शिकलात; तो आमचा प्रिय जोडीदार-कामकरी, आणि आमच्या वतीने तुमच्यात असलेला ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे. आणि आत्म्यातील तुमच्या प्रीतीविषयी त्याने आम्हाला सांगितले आहे.
म्हणून, हे ऐकले त्या दिवसापासून, आम्हीदेखील न विसंबता, तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की,तुम्हाला सर्व आत्मिक ज्ञानीपण व बुद्धी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे. १०ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्याला शोभेल असे वागावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी. ११आणि तुम्हाला सर्व धीर व आनंद देणारी सहनशीलता मिळण्यास त्याच्या गौरवाच्या बळाप्रमाणे तुम्हाला संपूर्ण सामर्थ्य मिळून तुम्ही समर्थ व्हावे; १२आणि प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे, म्हणून ज्याने तुम्हाला पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत.
१३त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे, १४आणि त्याच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापांची क्षमा मिळाली आहे.
१५तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे.
आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.
१६कारण, स्वर्गात व पृथ्वीवर,
दृश्य आणि अदृश्य,
राजासने किवा शासने, सत्ता किवा शक्ती,
अशा सर्व गोष्टी त्याच्या द्वारे केल्या गेल्या;
सर्व गोष्टी त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी
केल्या गेल्या.
१७तो सर्वांच्या आधी आहे
आणि त्याच्यात सर्व प्रस्थापित आहेत.
१८तो शरिराचे मस्तक
म्हणजे मंडळीचे मस्तक आहे.
तो आरंभ आहे,
आणि मृतांतून प्रथम जन्मलेला आहे,
म्हणजे त्याला सर्व गोष्टींत प्राधान्य असावे.
१९-२०कारण त्याच्यात सर्व पूर्णता वसावी,
आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून,
पृथ्वीवर किवा स्वर्गात असलेल्या
सर्व गोष्टींचा,
त्याच्या द्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा
हे देवाला बरे वाटले.
२१आणि तुम्ही जे एकदा परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता, २२त्या तुमचा, त्याने त्याच्या दैहिक शरिरात त्याच्या मरणाद्वारे, आता, स्वतःशी समेट केला आहे. म्हणजे त्याने तुम्हाला त्याच्या दृष्टीपुढे पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे सादर करावे. २३कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यात आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे. २४तुमच्यासाठी ह्या माझ्या दुःखांत मी आनंद करीत आहे; आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखांत त्याच्या शरिराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे. आणि त्याचे शरीर मंडळी आहे.

२५आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे. त्यात मी मंडळीचा सेवक झालो आहे. २६आणि युगानुयुग व पिढ्यान् पिढ्या जे रहस्य गुप्त ठेवले होते, पण जे त्याने, आताच्या काळात, त्याच्या पवित्र जनांना प्रगट केले आहे, ते रहस्य हे वचन आहे. २७त्या रहस्याच्या गौरवाचे धन परजनांत किती आहे, हे त्याच्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; ते असे की, तुमच्यात ख्रिस्त गौरवाची आशा आहे. २८आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक मनुष्याला बोध करतो, आणि सर्व ज्ञानीपणाद्वारे प्रत्येक मनुष्याला आम्ही शिकवतो, ते ह्यासाठी की, आम्ही प्रत्येक मनुष्याला ख्रिस्ताच्या ठायी प्रौढ करून सादर करावे. २९म्हणून माझ्यात सामर्थ्याने कार्य करणार्‍या कृतीच्या योगे मीही झटून श्रम करीत आहे.

————————-
१:१५-२० मूळ ग्रीक भाषेत हे एक गीत असावे

 

 

—–कलसै २—–

कारण माझी इच्छा आहे की, तुमच्यासाठी व त्याचप्रमाणे जे लावदीकियात आहेत, आणि ह्या देहातले माझे तोंड ज्यांनी पाहिलेले नाही, अशा तुम्हा सर्वांसाठी माझा लढा किती मोठा आहे हे तुम्हाला समजून, तुमच्या मनाचे सांत्वन व्हावे; आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जाऊन तुम्हाला बुद्धीच्या पूर्ण खातरीच्या विपुलतेने देवाच्या रहस्याचे म्हणजे ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान व्हावे. त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे निधी लपलेले आहेत.

कोणी तुम्हाला लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे. कारण मी देहाने दूर असलो तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे, आणि तुमची व्यवस्था व तुमच्यात असलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा पाहून मी आनंद करीत आहे. आणि म्हणून, ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला. तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हाला शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन, उपकारस्मरण करीत, त्यात वाढत जा.

तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्‍या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हाला कह्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही. कारण देवत्वाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते.
१०तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्या ठायी तुम्ही पूर्ण झाला आहा, ११आणि ख्रिस्ताच्या सुनतविधीने तुमचे दैहिक शरीर काढले जाऊन, कोणी हातांनी न केलेल्या सुनतविधीने तुमचीही त्याच्यात सुनत झाली आहे. १२त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यातच त्याच्याबरोबर उठवले गेला, १३आणि तुम्ही जे तुमच्या अपराधांमुळे व देहात सुनत न झाल्यामुळे मेलेले होता त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे; १४आणि आपल्या आड येणारा जो नियमांचा हस्तलेख आपल्याविरुद्ध होता तो त्याने खोडला व तो त्याने वधस्तंभावर खिळून बाजूस सारला. १५त्याने त्यावर सत्तांना व शक्तींना निःशस्त्र केले व त्यांच्यावर जय मिळवून त्यांचे उघड प्रदर्शन केले.
१६म्हणून तुमच्या खाण्यावरून किंवा पिण्यावरून, किंवा सण, अमावास्या किंवा शब्बाथ पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका. १७ह्या गोष्टी तर येणार्‍या गोष्टींची छाया अशा आहेत; पण शरीर ख्रिस्ताचे आहे. १८तुम्ही कोणाला त्याने स्वतः पाहिल्याच्या आधारावर, स्वतः स्वीकारलेल्या मनाच्या लीनतेने व देवदूतांच्या उपासनेने तुम्हाला तुमच्या बक्षिसापासून ढळवू देऊ नका; तसा मनुष्य आपल्या दैहिक मनाने विनाकारण फुगलेला असतो, १९आणि ज्या मस्तकापासून संपूर्ण शरीर हे संधी व संधिबंध ह्यांच्या द्वारे पुरवठा मिळवून एकत्र जोडले जाते व देवाने योजलेल्या वाढीप्रमाणे त्याची वाढ होते, त्या मस्तकाला तो धरीत नाही.
२०म्हणून जगाच्या मूलतत्त्वांना तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात, तर जगात जगत असल्याप्रमाणे तुम्ही नियमाधीन कसे आहात? २१शिवू नको, चाखू नको, हातात घेऊ नको २२अशा नियमांतील सर्व गोष्टी ह्या उपभोगाने नष्ट होणार्‍या गोष्टी आहेत. २३ह्या गोष्टींत स्वेच्छेची उपासना, मनाची लीनता व शरिराची उपेक्षा असल्यामुळे ह्यांत खरोखर ज्ञानीपणाची भाषा आहे, पण देहाचे शमन करण्याची योग्यता नाही.   

—–कलसै ३—–

मग जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठला आहा तर ख्रिस्त जेथे देवाच्या उजवीकडे बसला आहे तेथील वरच्या गोष्टींसाठी झटा. वरच्या गोष्टींवर मन ठेवा, पृथ्वीवरील गोष्टींवर ठेवू नका; कारण तुम्ही मेला आहा, आणि देवाच्या ठायी तुमचे जीवन ख्रिस्तात गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन असलेला ख्रिस्त जेव्हा प्रगट होईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट व्हाल.
म्हणून तुम्ही जारकर्म, अमंगळपणा, वांछा, वाईट वासना, आणि, मूर्तिपूजा होणारा लोभ हे तुमचे पार्थिव अवयव ठार मारा. कारण ह्या गोष्टींमुळे आज्ञाभंगाच्या पुत्रांवर देवाचा क्रोध ओढवतो. तुम्ही त्यांमध्ये रहात होता तेव्हा एकदा, तुम्ही त्यांमध्ये चालत होता. पण आता तुमच्यातील कोप, राग व कुवृत्ती, आणि तुमच्या मुखातील दुर्भाषण व अपशब्द हे सर्व तुम्ही काढून टाका. एकमेकांशी खोटे बोलू नका; कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतींसहित काढून टाकला आहे १०व नवा परिधान केला आहे; आणि त्याला निर्माण करणार्‍याच्या प्रतिरूपानुसार तो ज्ञानात नवा केला जात आहे. ११येथे हेल्लेणी किवा यहुदी नाही, सुनत झालेले किवा बेसुनत, बर्बर किवा स्कुथी, दास किवा स्वतंत्र नाही, परंतु ख्रिस्त सर्व आहे व सर्वांत आहे.
१२तर मग, देवाचे निवडलेले, पवित्र आणि प्रिय म्हणून, तुम्ही उपकार करणारा कळवळा, ममता व मनाची लीनता, सौम्यता व सहनशीलता परिधान करा. १३एकमेकांचे सहन करा; आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. १४आणि ह्या सर्वांवर प्रीती परिधान करा; ती पूर्ण करणारे बंधन आहे. १५ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात निर्णय करो. तिच्यासाठी एका शरिरात तुम्ही बोलावले गेला आहात; आणि तुम्ही कृतज्ञ व्हा.
१६ख्रिस्ताचे वचन तुमच्यात संपन्नतेने राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; स्तोत्रे, भजने व आत्मिक गीते गाऊन, अंतःकरणात स्तुती करून, देवाला गा.
१७आणि शब्दाने किवा कृतीने कराल ते सर्व काही प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देवपित्याचे उपकार माना.

१८विवाहित स्त्रियांनो, प्रभूच्या सहवासात योग्य होईल त्याप्रमाणे, आपल्या पतीला आज्ञांकित रहा. १९पतींनो, आपल्या पत्नीवर प्रीती करा; तिच्याशी कठोर होऊ नका. २०मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आईबापांच्या आज्ञा पाळा, कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे. २१तुम्ही बापांनो, आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; नाहीतर, कदाचित् ती निरुत्साही होतील. २२दासांनो, दैहिक दृष्ट्या जे तुमचे धनी आहेत त्यांचे सर्व गोष्टींत आज्ञापालन करा. माणसांना खुश करणार्‍यांसारखे त्यांच्या डोळ्यांपुढे काम करून नाही, पण मनाच्या सरळपणाने,परमेश्वराला भिऊन करा. २३आणि जे काही कराल ते माणसांसाठी म्हणून नाही, पण मनापासून प्रभूसाठी करावे तसे करा. २४कारण तुम्ही जाणता की, तुम्हाला प्रभूकडून वतन हे प्रतिफळ मिळेल; कारण तुम्ही ख्रिस्त प्रभूची सेवा करता. २५पण जो वाईट करतो त्याला वाईट करण्याचे प्रतिफळ मिळेल; आणि तेथे पक्षपात नाही.     

—–कलसै ४—–

धन्यांनो, तुम्ही दासांना उचित व समान वागणूक द्या; कारण तुम्हालाही स्वर्गात धनी आहे हे तुम्ही जाणता.

प्रार्थना करण्यात ठाम राहून त्यात उपकारस्मरणाने जागृत रहा. आणि आमच्यासाठी प्रार्थना करा; कारण ज्या ख्रिस्ताच्या रहस्यासाठी मी बेड्यांतही पडलो आहे ते सांगता येण्यास आमच्यासाठी देवाने घोषणेचे दार उघडावे. म्हणजे मी जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते प्रगट करावे.
तुम्ही काळाचा सदुपयोग करून बाहेरच्यांबरोबर ज्ञानीपणाने चाला. तुमचे बोलणे नेहमी औदार्याचे, जणू मिठाने चव आणलेले असावे, म्हणजे प्रत्येक मनुष्याला आपण कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजेल.

माझा प्रिय बंधू व प्रभूमधील विश्वासू सेवक व जोडीदार-दास तुखीक हा माझ्याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हाला कळवील. मी त्याला त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हाला कळवून तुमच्या मनाचे सांत्वन करावे. मी त्याला अनेसिमबरोबर धाडले आहे; हा एक विश्वासू व प्रिय बंधू असून तुमच्यामधला आहे. ते तुम्हाला इकडील सर्व गोष्टी कळवतील.
१०माझा जोडीदार-बंदिवान अरिस्तार्ख तुम्हाला सलाम देत आहे; तसाच बर्णबाचा भाचा मार्क हाही तुम्हाला सलाम देत आहे; त्याच्याविषयी तुम्हाला आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचे स्वागत करा. ११आणि युस्तस म्हटलेला येशू हाही सलाम पाठवीत आहे; हे सुनत झालेल्यांपैकी आहेत. हेच केवळ देवाच्या राज्यासाठी माझे जोडीदार-कामकरी आहेत आणि तेच माझे सांत्वन झाले आहेत. १२तुमच्यातील असलेला ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास हा तुम्हाला सलाम पाठवीत आहे; तुम्ही देवाच्या सर्व इच्छेत पूर्ण व संपूर्ण स्थिर रहावे म्हणून नित्य प्रार्थना करून तो तुमच्यासाठी झटत असतो. १३कारण त्याला तुमच्याविषयी आणि तशीच लावदीकियाच्या व हेरापलीच्या लोकांविषयी फार ईर्ष्या आहे, अशी त्याच्याविषयी मी साक्ष देतो.
१४प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हाला सलाम सांगतात. १५लावदीकियातील बांधवांना आणि नुंफाला व तिच्या घरी जमणार्‍या मंडळीला सलाम द्या. १६हे पत्र तुमच्यात वाचल्यावर तुम्ही अशी व्यवस्था करा की,लावदीकियाच्या मंडळीतदेखील ते वाचले जावे, आणि लावदीकियाचे तुम्ही वाचा. १७अर्खिपाला असे सांगा की, तू जी सेवा प्रभूकडून स्वीकारली आहेस ती तू पूर्ण करावीस म्हणून तिची काळजी घे.
१८माझा पौलाचा स्वहस्ते सलाम; माझ्या बेड्यांची आठवण ठेवा. तुमच्याबरोबर कृपा असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s