Ephesians

इफिसकरांस पत्र

—–इफिस १—–

देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याजकडून;
इफिसमधील पवित्र जनांस आणि ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवणार्‍यांसः
देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.

आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने आपल्याला स्वर्गीय स्थानांतील सर्व आत्मिक आशीर्वाद पुरवून ख्रिस्तात आशीर्वादित केले आहे. कारण आपण त्याच्यापुढे पवित्र व निष्कलंक रहावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला त्याच्या द्वारे प्रीतीने निवडले. कारण येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आपल्या स्वतःसाठी दत्तक मुले करून घेण्यास आपल्याला त्याच्या इच्छेच्या सुयोजनेत पूर्वनियोजित केले होते. म्हणजे त्याने, ज्या कृपेने आपल्याला त्या पित्याच्या द्वारे कृपायुक्त केले, त्या कृपेच्या गौरवाची स्तुती होवो. आणि त्याच्या ठायी, त्याच्या कृपेच्या धनाच्या परिमाणानुसार, त्याच्या रक्ताने आपल्याला मुक्ती म्हणजे अपराधांची क्षमा मिळाली आहे. आणि ती पुरवून, त्याने सर्व ज्ञानीपणात व ज्ञानात आपली वाढ केली आहे. कारण, त्याने योजलेल्या सुयोजनेप्रमाणे त्याने आपल्याला त्याच्या इच्छेचे रहस्य विदित केले आहे. १०ते असे की, त्याने काळांच्या पूर्णतेच्या व्यवस्थेत स्वर्गात असलेल्या व पृथ्वीवर असलेल्या सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या ठायी, हो त्याच्या ठायी, एकत्र कराव्यात.
११त्याच्या द्वारे आपल्याला वतनही मिळाले आहे; कारण, जो आपल्या इच्छेच्या संकल्पास अनुसरून सर्व गोष्टींत कार्य करतो, त्याने आपल्याला त्याच्या योजनेत पूर्वनियोजित केले होते. १२ते ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर आधी भाव ठेवला त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. १३तुम्ही तुमच्या तारणाची सुवार्ता म्हणजे सत्याचे वचन ऐकल्यानंतर, तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर, त्याच्या द्वारे तुमच्यावरही, वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा शिक्का झाला. १४त्याच्या गौरवाच्या स्तुतीसाठी त्याने स्वतःसाठी विकत घेतलेल्या, त्याच्या लोकांच्या मुक्तीपर्यंत तो आपल्या वतनाचा विसार आहे.

१५म्हणून मीही, प्रभू येशूवरील तुमच्या विश्वासाविषयी व सर्व पवित्र जनांवरील तुमच्या प्रीतीविषयी ऐकल्यापासून, १६तुमच्यासाठी उपकार मानण्यास, खंड न पाडता, माझ्या प्रार्थनांत तुमची आठवण करतो, १७आणि याचना करतो की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो गौरवशाली पिता आहे त्याने तुम्हाला त्याच्याविषयीचे ज्ञान होण्यास ज्ञानीपणाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; १८म्हणजे तुमच्या बुद्धीचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हाला हे समजावे की, त्याच्या पाचारणाची आशा काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाचे धन पवित्र जनांत किती आहे, १९आणि त्याच्या शक्तीच्या बळाच्या कृतीप्रमाणे, त्याच्या सामर्थ्याची अपार श्रेष्ठता ही ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्या आपल्यासाठी काय आहे. २०त्याने ख्रिस्तात तिचे कार्य घडवून त्याला मेलेल्यांतून उठवले आणि त्याला स्वर्गीय स्थानी, आपल्या उजवीकडे बसवून, २१सर्व सत्तेच्या, शक्तीच्या,  बलाच्या आणि शासनाच्या, आणि ह्याच युगात नाही, पण येणार्‍या युगातही नाव मिळणार्‍या प्रत्येक नावाच्या वर ठेवले.
२२आणि सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले व त्याने सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्याला मंडळीला दिले. २३ती त्याचे शरीर आहे, आणि जो सर्वांत सर्व भरतो त्याची पूर्णता आहे.

—–इफिस २—–

आणि तुम्ही अमंगळपणात व पापांत मेला असता, त्यांत तुम्हीही मागील काळात, ह्या जगाच्या क्रमानुसार, अंतराळातील शक्तीच्या अधिपतीच्या, म्हणजे, आज्ञाभंगाच्या पुत्रांत आता कार्य करीत असलेल्या आत्म्याला अनुसरून चालला. आणि त्यांच्यात, मागील काळात आम्ही सगळे आमच्या देहाच्या वासनांत वागलो, देहाच्या व मनाच्या इच्छा पुरवल्या, आणि स्वभावतः, इतरांप्रमाणेच आम्ही क्रोधाचे पुत्र होतो.
पण देव जो दयेने सधन आहे, त्याने आपल्यावर जी प्रीती केली त्या महान प्रीतीमुळे, त्याने आपल्याला, आपण अपराधांत मेलो असताही, ख्रिस्ताबरोबर जिवंत केले. तुमचे कृपेने तारण झाले आहे. ख्रिस्त येशूत त्याने आपल्याला त्याच्याबरोबर पुन्हा उठवले आणि स्वर्गीय स्थानी त्याच्याबरोबर बसवले; ते ह्यासाठी की, त्याने ख्रिस्त येशूच्या द्वारे आपल्यावर केलेल्या दयेच्या योगे त्याने आपल्या कृपेचे अपार धन येणार्‍या युगात प्रगट करावे.
कारण तुमचे, विश्वासाद्वारे, कृपेने तारण झाले आहे; आणि स्वतःमुळे नाही; ते देवाचे दान आहे, आणि ते कामांमुळे नाही; नाहीतर, कोणी अभिमान मिरवील. १०कारण आपण त्याची निर्मिती आहो; त्याने चांगल्या कामांसाठी आपल्याला ख्रिस्त येशूत निर्माण केले आहे; आणि आपण त्यांत चालावे म्हणून, ती देवाने आधी योजलेली आहेत.

११म्हणून तुम्ही आठवण करा; मागील काळात तुम्ही देहाने परजन असल्याने, हातांनी केलेल्या दैहिक विधीमुळे, जे स्वतःस सुनत झालेले म्हणतात ते तुम्हाला बेसुनत म्हणत असत. १२तुम्ही त्यावेळी ख्रिस्ताशिवाय होता, इस्राएलाच्या राष्ट्रास पारखे, वचनाच्या करारांस परके, आशा नसलेले, असे तुम्ही देवाशिवाय जगात होता; १३पण ख्रिस्ताच्या रक्तामुळे, तुम्ही जे पूर्वी दूर होता ते आता, ख्रिस्त येशूत, जवळचे झाला आहा.
१४तो आपली शांती आहे; त्याने दोहोंना एक केले, आणि मधली आडभिंत पाडली. १५म्हणजे, आज्ञाविधींचे नियमशास्त्र हे वैर स्वदेहात नष्ट केले; ते ह्यासाठी की, त्याने आपल्या स्वतःच्या ठायी दोहोंमधून एक नवा मनुष्य निर्माण करून शांती करावी. १६आणि वैर ठार मारून स्वतः वधस्तंभाच्या योगे, दोघांचाही एका शरिरात, देवाबरोबर समेट करावा. १७तो आला आणि त्याने दूर असलेल्या तुम्हाला, आणि जवळ असलेल्या त्यांना शांतीची सुवार्ता विदित केली. १८कारण आपल्याला दोघांनाही त्याच्या द्वारे एका आत्म्यात पित्याजवळ प्रवेश आहे.
१९तर आता, ह्यावरून, तुम्ही परके व उपरी नाही, पण पवित्र जनांचे जोडीचे नागरिक व देवाच्या घराण्यातले झाला आहा. २०प्रेषित व संदेष्टे ह्यांच्या पायावर तुम्ही उभारले गेला आहा, आणि स्वतः ख्रिस्त येशू हा कोपर्‍याचा मुख्य चिरा आहे. २१त्याच्यात प्रत्येक वेगवेगळे बांधकाम एकत्र जोडले जाऊन त्याचे प्रभूच्या ठायी एक पवित्र मंदिर उभे होत आहे. २२त्याच्यात तुम्हीही, देवाचे वसतिस्थान होण्यासाठी, जोडून उभारले जात आहात. 

—–इफिस ३—–

म्हणून मी पौल तुम्हा परजनांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. तुमच्यासाठी माझ्यावर सोपविलेल्या, देवाच्या कृपेच्या व्यवस्थेविषयी जर तुम्ही ऐकले असेल, तर आधी थोडक्यात लिहिल्याप्रमाणे, त्याने प्रकटीकरणाद्वारे मला ते रहस्य कसे कळवले, हे तुम्ही वाचाल, तेव्हा ख्रिस्ताच्या रहस्याचे माझे आकलन तुम्हाला त्यावरून समजू शकेल. ते त्याचे पवित्र प्रेषित व संदेष्टे ह्यांना आता आत्म्याच्या द्वारे जसे प्रकट करण्यात आले, तसे इतर पिढ्यांतील मनुष्यांच्या पुत्रांना कळवले नव्हते. ते असे की, सुवार्तेद्वारे, परजनदेखील आमच्याबरोबर जोडीचे वारीस, एका शरिरात जोडलेले अवयव व ख्रिस्त येशूत दिलेल्या वचनात जोडीचे वाटेकरी असे आहेत. आणि मला देवाने, त्याच्या सामर्थ्याच्या कृतीने त्याच्या कृपेचे दान दिल्यामुळे मी ह्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी तर सर्व पवित्र जनांत लहानांतील लहान असा असता मला ती कृपा पुरवली गेली; म्हणजे मी परजनांत ख्रिस्ताच्या अलक्ष्य धनाची सुवार्ता विदित करावी, आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादीपासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकांस मी प्रगट करावे. १०-११ह्यात हेतू हा की, आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्या द्वारे देवाने युगादिकाळापासून नियोजित केलेल्या योजनेप्रमाणे स्वर्गीय स्थानांतील सत्ता व शक्ती ह्यांना देवाचे बहुविध ज्ञानीपण आता मंडळीद्वारे कळवावे. १२आणि आपण त्याच्या द्वारे, त्याच्यावरील विश्वासाद्वारे, धैर्य व निर्भयपणे प्रवेश मिळवतो. १३म्हणून मी ही विनंती करतो की, माझ्यावर तुमच्याकरता आलेल्या संकटांमुळे तुम्ही खचू नका; ते तुमचे गौरव आहे.

१४-१५म्हणून ज्या पित्यामुळे, स्वर्गात व पृथ्वीवर, प्रत्येक कुळाला नाव आहे त्याच्यापुढे मी गुडघे टेकतोः १६त्याच्या गौरवाच्या धनाच्या परिमाणानुसार त्याने तुम्हाला असे द्यावे की, त्याच्या आत्म्याने सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या आतील मनुष्यपणात बलवान व्हावे. १७म्हणजे, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात विश्वासाद्वारे वसती करावी. म्हणजे तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे होऊन, १८तुम्ही सर्व पवित्र जनांसह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी व लांबी, आणि उंची व खोली किती आहे ते ग्रहण करण्यास १९व त्याची ज्ञानातीत प्रीती जाणण्यास समर्थ व्हावे. म्हणजे देवाची सर्व पूर्णता तुमच्यात भरावी.

२०आता जो आपल्यात कार्य करणार्‍या सामर्थ्याने आपण मागतो किवा मनात आणतो त्या सर्वांपेक्षा, पुष्कळ अधिक करण्यास समर्थ आहे,  २१त्याला मंडळीत व ख्रिस्त येशूत पिढ्यान् पिढ्या, युगानुयुग गौरव असो. आमेन.

—–इफिस ४—–

म्हणून मी प्रभूचा बंदिवान, तुम्हाला मी विनंती करतो की, तुम्हाला ज्यायोगे बोलावले आहे, त्या तुमच्या पाचारणास शोभेल असे चाला. मनाच्या पूर्ण लीनतेने व सौम्यतेने, तुम्ही प्रीतीत, सहनशीलतेने, एकमेकांचे सहन करा; आणि शांतीच्या बंधनात आत्म्याचे ऐक्य राखण्यास झटा.
तुमच्या पाचारणाच्या एका आशेत जसे तुम्हाला बोलावले आहे, तसेच शरीर एक व आत्मा एक आहे. एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा व सर्वांचा देव आणि पिता एक आहे; तो सर्वांवर, सर्वांमधून व सर्वांत आहे.
पण आपल्यातील प्रत्येकाला ख्रिस्ताच्या दानाच्या परिमाणानुसार कृपा पुरवली गेली आहे. म्हणून त्याने म्हटले आहे की,
  तो वर चढला,
  तेव्हा त्याने कैद धरून नेली,
  आणि लोकांना देणग्या दिल्या.
आता तो चढला, म्हणजे, तोच प्रथम, पृथ्वीच्या अधोभागी उतरला की नाही? १०आणि जो उतरला तो सर्व स्वर्गांहून वर चढला; म्हणजे त्याने सर्व काही भरावे.
११आणि त्याने काही प्रेषित, काही संदेष्टे, काही सुवार्तिक, आणि काही पाळक व शिक्षक दिले. १२पवित्र जनांच्या सिद्धतेसाठी, सेवकपणाच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरिराच्या उभारणीसाठी, १३आपण सगळे देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व त्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या ऐक्यात, प्रौढ मनुष्यपणात, ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या वाढीच्या परिमाणात पोहोचेपर्यंत दिले आहेत. १४म्हणजे आपण आता मुले राहू नये; म्हणजे मनुष्यांच्या फसवेपणाने व कपटीपणाने, ते ज्यायोगे संभ्रमात नेऊ पाहतात अशा शिकवणीच्या प्रत्येक वावटळीने, इकडून तिकडे फेकले जाऊ नये किंवा गोल गोल फिरवले जाऊ नये. १५पण प्रीतीने खरे बोलून, प्रत्येक प्रकारे, जो ख्रिस्त आपले मस्तक आहे त्याच्यात आपण वाढत जावे. १६त्याच्यापासून संपूर्ण शरीर प्रत्येक सांध्याच्या पुरवठ्याने एकत्र जोडलेले व जुळवलेले होऊन, प्रत्येक भागाच्या परिमाणानुसार त्याच्या उपयोगी कृतीच्या द्वारे शरिराची वाढ करून, प्रीतीत स्वतःची उभारणी करते.

१७म्हणून हे सांगतो व प्रभूमध्ये हे निक्षून सांगतो की, इतर परजन आपल्याच मनाच्या व्यर्थतेत चालतात तसे तुम्ही आता चालू नये. १८त्यांची बुद्धी अंधकारमय होऊन त्यांच्या मनाच्या अंधळेपणाने त्यांच्यात आलेल्या अज्ञानामुळे ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. १९आणि निर्ढावलेले होऊन त्यांनी अमंगळपणा करण्यास आपल्या स्वतःला,  हावरेपणाने, कामातुरपणाच्या स्वाधीन केले आहे.
२०पण तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्त शिकला नाही. २१कारण तुम्ही त्याच्याविषयी ऐकले आहे आणि येशूत असलेल्या सत्याप्रमाणे त्याच्यात तुम्हाला शिकविले आहे की, २२तुम्ही आपल्या, मागील आचरणाशी संबंध असलेला जुना मनुष्य काढून टाका; फसवेपणाच्या वासनांमुळे तो नष्ट होत आहे. २३आणि आपल्या मनाच्या आत्म्यात नवे व्हा. २४आणि नीतिमत्वात व खर्‍या पावित्र्यात देवाशी समरूप असा निर्माण केलेला नवा मनुष्य परिधान करा.
२५म्हणून खोटेपणा दूर सारून, तुम्ही, प्रत्येक जण, आपल्या शेजार्‍याशी खरे बोला कारण तुम्ही एकमेकांचे अवयव आहा.

२६तुम्ही रागवा, पण पाप करू नका. तुमच्या रागावर सूर्य मावळू नये. २७आणि सैतानाला वाव देऊ नका. २८चोरी करणार्‍याने चोरी करू नये; उलट, ज्याला गरज असेल अशा मनुष्याला देण्याकरता त्याने हातांनी चांगले काम करून कष्ट करावे.

२९तुमच्या तोंडातून कसलेच वाईट बोलणे निघू नये; पण जे निघेल ते उभारणीच्या कामी चांगले, म्हणजे ऐकणार्‍याला कृपा पुरवील असे असावे.

३०आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुखवू नका. कारण मुक्तीच्या दिवसासाठी त्याचा तुमच्यावर शिक्का झाला आहे.
३१सर्व कडूपणा, राग व कोप, गलबला व अपशब्द, हे सगळ्या कुवृत्तींसहित,  तुमच्यामधून काढले जावोत.
३२तुम्ही एकमेकांशी दयाळू व कन्हवाळू व्हा; देवाने तुमची ख्रिस्ताकरता क्षमा केली आहे तशी एकमेकांची क्षमा करा.    

—–इफिस ५—–

तर तुम्ही, प्रिय मुलांप्रमाणे, देवाचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली, आणि देवाला सुवास म्हणून, आपल्यासाठी अर्पण व बलिदान असे स्वतःचे दान केले, तसे तुम्ही प्रीतीत चाला. पण जारकर्म, कोणत्याही प्रकारचा अमंगळपणा किवा लोभ, अशा कशाचे, पवित्र जनांना न शोभेल असे, तुमच्यात कधी नावही निघू नये. आणि अश्लीलता, मूर्ख बडबड आणि टवाळी, अशा ज्या गोष्टी योग्य नाहीत त्या तुमच्यात नसाव्यात. पण उलट, उपकारस्मरण होऊ द्या.
कारण तुम्ही हे समजा की, जो कोणी मनुष्य जारकर्मी आहे, अशुद्ध आहे किवा लोभी म्हणजे मूर्तिपूजक आहे त्याला ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही. निरर्थक शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये. कारण अशांमुळे आज्ञाभंगाच्या पुत्रांवर देवाचा क्रोध ओढवतो. म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर जोडीचे वाटेकरी होऊ नका. कारण तुम्ही एकदा जणू अंधकार होता पण आता प्रभूमध्ये प्रकाश झाला आहा. प्रकाशाच्या पुत्रांप्रमाणे चाला. कारण सर्व प्रकारच्या सदिच्छेत, नीतिमत्वात व खरेपणात आत्म्याचे फळ आहे. १०प्रभूला संतोषदायक काय आहे त्याची तुम्ही पारख करा.
११अंधकाराच्या निष्फळ कामांत सहभागी होऊ नका; तर उलट त्यांचा निषेध करा. १२कारण ते ज्या गोष्टी गुप्तात करतात त्यांविषयी बोलणेही लाजेचे आहे. १३पण निषेधलेल्या सर्व गोष्टी प्रकाशाकडून प्रगट होतात; कारण प्रगट करतो तो प्रकाश आहे. १४म्हणून त्याने म्हटले आहे की,
  अरे झोपलेल्या, जागा हो,
  व मेलेल्यांतून पुन्हा ऊठ;
  आणि ख्रिस्त तुझा प्रकाश होईल.
१५म्हणून तुम्ही असे पहा की, तुम्ही मूर्खांसारखे नाही, तर शहाण्यांसारखे सभोवार बघत चालत आहात काय? १६आणि काळाचा सदुपयोग करा;  कारण दिवस वाईट आहेत. १७म्हणून मूर्ख होऊ नका, पण प्रभूची इच्छा काय आहे ते समजणारे व्हा.
१८द्राक्षारसाने झिगू नका; त्यात दंगल आहे; पण आत्म्याने भरा १९आणि आपल्यात एकमेकांना स्तोत्रे, भजने व आत्मिक गीते ऐकवून, तुम्ही आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. २०आणि सर्व गोष्टींसाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने देवपित्याचे उपकार माना. २१ख्रिस्ताच्या भयात, तुम्ही एकमेकांस आज्ञांकित व्हा.

२२विवाहित स्त्रियांनो, तुम्ही प्रभूला आज्ञांकित रहावे तशा प्रकारे, आपल्या पतीला आज्ञांकित रहा. २३कारण ख्रिस्त हा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती हा पत्नीचे मस्तक आहे; आणि ख्रिस्त शरिराचा तारणारा आहे. २४म्हणून मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे, तसेच विवाहित स्त्रियांनी सर्व गोष्टींत आपल्या पतींच्या अधीन असावे.
२५आणि पतींनो, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशीच तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. त्याने तिच्याकरता स्वतःचे दान केले, २६ते ह्यासाठी की, त्याने वचनाच्या जलस्नानाने तिला शुद्ध करून पवित्र करावे. २७म्हणजे तिला डाग, सुरकुती किवा काही न राहून, ती पवित्र व निष्कलंक, अशी गौरवी मंडळी म्हणून आपल्या स्वतःस सादर करावी.
२८म्हणून पुरुषांनी आपल्या बायकांवर आपल्या शरिराप्रमाणे प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो आपल्या स्वतःवर प्रीती करतो. २९कारण कोणीही मनुष्य आपल्या देहाचा कधीही द्वेष करीत  नाही; पण त्याचे पोषण व संगोपन करतो; आणि तसेच ख्रिस्त मंडळीचे करतो. ३०कारण आपण त्याच्या  शरिराचे अवयव आहोत. ३१म्हणून पुरुष आपल्या बापाला व आईला सोडील, आणि आपल्या बायकोशी जडून राहील, आणि ती दोघे एकदेह होतील. ३२हे एक मोठे रहस्य आहे; पण मी हे बोलतो हे ख्रिस्त व मंडळी ह्यांच्याविषयी बोलतो.
३३तरी तुमच्यातील प्रत्येक मनुष्य जशी स्वतःवर प्रीती करतो तशी त्याने स्वतःच्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने पतीचा मान राखावा.
————————-
५:१४ मूळ ग्रीक भाषेत हे एक गीत असावे

—–इफिस ६—–

मुलांनो, तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. २-३तू आपल्या बापाला आणि आईला मान दे, म्हणजे तुझे बरे व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायुषी व्हावेस; असे वचन असलेली ही पहिली आज्ञा आहे.
आणि तुम्ही बापांनो, आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व उत्तेजनात वाढवा.
दासांनो, दैहिक दृष्ट्या जे तुमचे धनी आहेत त्यांचे भय धरून, कापत कापत, तुम्ही मनाच्या सरळपणाने, ख्रिस्ताचे कराल त्या प्रकारे, त्यांचे आज्ञापालन करा. डोळ्यांपुढे सेवा करून माणसांना खुश करणार्‍यांसारखे होऊ नका; पण मनापासून, देवाची इच्छा पूर्ण करणार्‍या ख्रिस्ताच्या दासांसारखे करा. जशी माणसांची सेवा करावी तशी नाही, पण सदिच्छेने, प्रभूची करावी, तशी त्यांची सेवा करा. कारण तुम्ही हे जाणता की, प्रत्येक जण जे चांगले करतो त्याचे त्याला प्रभूकडून प्रतिफळ मिळेल; मग तो दास असो किवा स्वतंत्र असो.
आणि धन्यांनो, तुम्ही त्यांच्याशी तशाच प्रकारे आचरण करून धमकावणे टाळा; कारण तुम्ही जाणता की, त्यांचा व तुमचा धनी स्वर्गात आहे; आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.

१०शेवटी, प्रभूत, त्याच्या शक्तीच्या बळाने सबळ व्हा. ११सैतानाच्या युक्त्यांपुढे उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे म्हणून, तुम्ही देवाची शस्त्रसामग्री परिधान करा. १२कारण आपण रक्तामांसाशी लढत नाही, पण सत्तांशी व शक्तींशी, ह्या युगाच्या अंधकाराच्या जगत्पतींशी आणि अंतराळातील दुर्वृत्तीच्या आत्मिक सैन्यांशी लढत आहोत.
१३ह्याकरता, त्या वाईट दिवशी त्याच्याविरुद्ध उभे राहण्यास व सर्व करून उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे म्हणून, तुम्ही देवाची शस्त्रसामग्री धारण करा. १४म्हणून तुम्ही खरेपणाने कमरा कसून उभे रहा व नीतीचे उरस्त्राण परिधान करा. १५आणि तुमच्या पायांसाठी शांतीच्या सुवार्तेच्या तयारीच्या वहाणा घ्या. १६ह्या सर्वांवर विश्वासाची ढाल धरा, म्हणजे, तुम्ही त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल. १७आणि तारणाचे शिरस्त्राण व देवाचे वचन ही आत्म्याची तरवार घ्या. १८प्रत्येक प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करून सर्वदा आत्म्याने प्रार्थना करा व सर्व पवित्र जनांकरता, तुम्ही पूर्ण चिकाटीने, विनवणी करीत जागृत रहा. १९आणि माझ्याकरता करा, म्हणजे सुवार्तेचे रहस्य सांगण्यास, धैर्याने माझे तोंड उघडण्यास मला वाचा दिली जावी. २०मी, त्यासाठीच, बेड्यांतला वकील आहे. म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.

२१पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे ते तुम्हाला समजावे म्हणून, प्रिय बंधू, आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुखीक ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कळवील. २२मी त्याला त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हाला माझ्याविषयी कळावे, आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे.

२३देव जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून बांधवांना शांती आणि विश्वासाबरोबर प्रीती लाभो. २४आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर अक्षय प्रीती करतात त्या सर्वांवर कृपा असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s