Galatians

गलतीकरांस पत्र

—–गलती १—–

मी (मनुष्यांकडून नेमलेला नाही, किवा मनुष्याने नेमलेला नाही, पण येशू ख्रिस्ताने व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले, त्या देवपित्याकडून नेमलेला) प्रेषित पौल आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधू ह्यांजकडून;
गलतियातील मंडळ्यांसः
देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती. त्याने आपला देव जो पिता त्याच्या इच्छेप्रमाणे, ह्या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडविण्यास, आपल्या पापांबद्दल, स्वतःचे दान केले. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.

ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्‍या सुवार्तेकडे वळला ह्याचे मी आश्चर्य करतो. ती दुसरी नाही; पण तुम्हाला कोणी तरी अस्वस्थ करीत आहेत आणि ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करण्याची त्यांची इच्छा आहे. पण आम्ही कोणी किवा स्वर्गातील देवदूताने तुम्हाला दुसरी सुवार्ता सांगितली तरी आम्ही सुवार्ता सांगितली तशी ती नसेल, तर तो शापित असो. आम्ही अगोदर सांगितले आहे तसेच आता मी पुन्हा सांगतो की, कोणी तुम्हाला, तुम्ही स्वीकारलीत तिच्यापेक्षा, जर दुसरी सुवार्ता विदित केली तर तो शापित असो. १०कारण, आता मी मनुष्यांची मान्यता मागतो किवा मी देवाची मान्यता मागतो? किवा मी मनुष्यांना संतोषवू पाहतो?  कारण, अजून मी मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.

११पण, बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो की, मी ज्या सुवार्तेची घोषणा केली ती मानवी नाही. १२मी ती मनुष्याकडून स्वीकारली नाही, तशीच ती मला शिकवलेली नाही; पण येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला शिकवली. १३तुम्ही माझ्या, यहुदी धर्मातील, पूर्वीच्या आचरणाविषयी ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा अपरिमित छळ करून तिचा नाश केला. १४आणि मी यहुदी धर्मात, माझ्या लोकांतल्या, माझ्या वयाच्या पुष्कळांपेक्षा अधिक पुढे गेलो होतो. कारण मी माझ्या पूर्वजांच्या प्रथांविषयी पुष्कळ अधिक आवेशी होतो. १५पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्याला जेव्हा बरे वाटले की, १६आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रगट करावे, म्हणजे परजनांत मी त्याची सुवार्ता विदित करावी तेव्हा मी हे कोणत्याही मनुष्यापुढे लगेच ठेवले नाही, १७किंवा वर यरुशलेमास, जे माझ्या पूर्वीचे प्रेषित होते त्यांच्याकडे मी गेलो नाही; पण मी अरबस्तानात गेलो व पुन्हा दिमिष्कास परत आलो.
१८पुढे, तीन वर्षांनंतर, मी केफाला भेटण्यास वर यरुशलेमास गेलो, आणि पंधरा दिवस मी त्याच्याजवळ राहिलो; १९पण प्रभूचा भाऊ याकोब ह्याच्याशिवाय मी इतर प्रेषितांपैकी कोणालाच बघितले नाही. २०मी जे तुम्हाला लिहीत आहे, ते बघा, देवासमोर, मी खोटे बोलत नाही.
२१त्यानंतर मी सूरिया व किलिकिया प्रांतांत आलो २२आणि ख्रिस्तात असलेल्या, यहुदियातील मंडळ्यांना मी तोंडाने अपरिचित होतो. २३पण त्यांनी एवढेच ऐकले होते की, ज्याने पूर्वी आमचा छळ केला तो पूर्वी जो विश्वास नष्ट करीत होता त्याची आता तो सुवार्ता सांगतो. २४आणि त्यांनी माझ्यावरून देवाचे गौरव केले.

—–गलती २—–

पुढे, चौदा वर्षांनंतर मी पुन्हा, बर्णबाबरोबर, यरुशलेमास वर गेलो, आणि तीतालाही बरोबर नेले. आणि मला प्रकटीकरण झाले म्हणून मी वर गेलो, आणि जी सुवार्ता मी परजनांस गाजवितो ती मी त्यांना निवेदन केली; पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकान्ती निवेदन केली;  नाहीतर, मी व्यर्थ धावतो किवा धावलो, असे कदाचित् झाले असते.
पण माझ्याबरोबर असलेला तीत हा हेल्लेणी असल्यामुळे, त्यालाही सुनत करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. आणि युक्तीने आत आणलेल्या खोट्या बांधवांमुळेदेखील ते आपल्याला दास्यात नेण्यास, आपल्याला ख्रिस्त येशूत जे स्वातंत्र्य आहे ते हेरण्यास, युक्तीने आले होते. आम्ही त्यांना घटकाभरही आज्ञांकितपणे वश झालो नाही, म्हणजे सुवार्तेचे सत्य तुमच्याकडेच रहावे. तरी पण, जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकडून – (ते कोण होते ह्याचे मला काही आकर्षण नाही; देव माणसाचे बाह्य रूप पहात नाही.) कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी माझ्यापुढे काही ठेवले नाही. तर सुनत पाळणार्‍यांत सुवार्ता सांगणे जसे पेत्रावर सोपविले होते तसेच सुनत न पाळणार्‍यांत सुवार्ता सांगणे माझ्यावर आहे, हे त्यांनी बघितले. (कारण जो पेत्राच्या द्वारे सुनत पाळणार्‍यांत प्रेषितपण व्हावे म्हणून कार्य करीत होता त्यानेच माझ्या द्वारे परजनांत कार्य केले.) 
आणि त्यांनी मला पुरविलेली कृपा ओळखली, तेव्हा याकोब, केफा व योहान हे जे विशेष मानलेले आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला भागीपणाचे उजवे हात दिले, म्हणजे आम्ही परजनांकडे आणि त्यांनी सुनत पाळणार्‍यांकडे जावे. १०मात्र आम्ही गरजवंतांची आठवण ठेवावी, आणि मीही तेच करण्यास झटत होतो.

११पण त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्या तोंडापुढे त्याच्याविरुद्ध उभा राहिलो, कारण त्याच्याकडे दोष दिसत होता. १२कारण याकोबाकडून कोणी येण्याअगोदर तो परजनांबरोबर जेवत असे; पण ते आल्यावर सुनत पाळणार्‍यांकडील लोकांस भिऊन त्याने माघार घेऊन स्वतःस वेगळे केले. १३तेव्हा तसेच दुसर्‍या यहुद्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले; त्यामुळे बर्णबादेखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला. १४पण मी जेव्हा बघितले की, सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते धीटपणे चालत नव्हते, तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले की, तू स्वतः यहुदी असून तू जर परजनांप्रमाणे राहतोस आणि यहुद्यांप्रमाणे रहात नाहीस, तर जे परजन आहेत त्यांना यहुद्यांप्रमाणे राहण्यास का भाग पाडतोस?’

१५आम्ही स्वतः यहुदी आहोत, परजनांतले पापी नाही. १६पण आम्हाला कळले आहे की, नियमशास्त्रातील आचार पाळून मनुष्य नीतिमान ठरवला जात नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरवले जावे, नियमशास्त्रातील आचार पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील आचार पाळून, कोणीही देही नीतिमान ठरणार नाही. १७पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास आम्ही स्वतः झटत असता जर आम्हीदेखील पापी आढळलो तर ख्रिस्त पापाचा सेवक झाला काय? असे न होवो. १८कारण मी जे मोडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला अपराधी ठरवीन.
१९कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो आहे, म्हणजे मी देवासाठी जगावे. २०मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे तरी मी जगतो, पण मी नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता, मी देहात जे जीवन जगत आहे ते ज्याने माझ्यावर प्रीती केली व ज्याने माझ्यासाठी स्वतःचे दान केले त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो. २१मी देवाची कृपा अवमानली नाही; कारण नियमशास्त्राकडून नीतिमत्व असेल तर ख्रिस्त मेला हे व्यर्थ झाले.
————————–
२:४, २:६ मूळ ग्रीक भाषेत वाक्य अपूर्ण

—–गलती ३—–

अहो तुम्ही अविचारी गलतीकर, तुमच्यात ज्यांच्या डोळ्यांपुढे, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त मांडला गेला त्या तुम्ही सत्याचे ऐकू नये म्हणून तुम्हाला कोणी भुरळ घातली? मला तुमच्याकडून हे समजावे अशी माझी इच्छा आहे; तुम्हाला जो आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील आचार पाळल्यामुळे की, विश्वासाचे ऐकल्यामुळे? तुम्ही इतके अविचारी आहा काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहाने पूर्ण झाला काय? तुम्ही इतक्या गोष्टी सोसल्यात त्या व्यर्थ होत्या, त्या व्यर्थ सोसल्यात काय?
म्हणून जो तुम्हाला आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार घडवतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील आचार पाळल्यामुळे की, विश्वासाचे ऐकल्यामुळे? अब्राहामानेही असाच देवावर विश्वास ठेवला व ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व गणले गेले. आणि म्हणून जे विश्वास ठेवतात तेच अब्राहामाचे पुत्र आहेत हे तुम्ही जाणा. आणि देव विश्वासाद्वारे परजनांना नीतिमान ठरवील हे आधी दिसल्यामुळे, शास्त्रलेखाने अब्राहामाला आधी सुवार्ता सांगितली की, तुझ्या द्वारे सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे.
१०कारण नियमशास्त्रातील आचार पाळण्यावर भिस्त ठेवणारे सगळे शापाखाली आहेत; कारण असे लिहिले आहे की, ज्या गोष्टी करण्याकरता नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिल्यात त्या सर्व गोष्टींत जो टिकून राहणार नाही तो शापित आहे. ११पण नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे; कारण नीतिमान विश्वासाने जगेल.
१२आणि नियम विश्वासासाठी नाहीत, पण जो मनुष्य ते आचरतो तो त्यायोगे जगेल. १३नियमशास्त्राच्या शापाखालून ख्रिस्ताने आपल्याला सोडविले आहे, कारण तो आपल्यासाठी शापित झाला. कारण असे लिहिले आहे की, झाडावर टांगलेला प्रत्येक मनुष्य शापित आहे, १४म्हणजे ख्रिस्त येशूच्या द्वारे अब्राहामाचा आशीर्वाद परजनांवर यावा. म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आपल्याला आत्म्याचे वचन मिळावे.
१५आणि बंधूंनो, मी हे मनुष्यांच्या प्रथेप्रमाणे बोलतो; एखाद्या मनुष्याचा करारदेखील तो स्थापित केला गेल्यानंतर कोणी रद्द करीत नाही, किंवा त्यात काही अधिक घालीत नाही. १६आता, जी वचने अब्राहामाला व त्याच्या संतानाला दिली होती आणि तो संतानांना असे अनेकांविषयी म्हणत नाही, पण तुझ्या संतानाला असे एकाविषयी म्हणतो आणि तो ख्रिस्त आहे. १७आणि, मी हे म्हणतो की, देवाने तो करार आधी स्थापल्यावर चारशे तीस वर्षांनंतर आलेले नियमशास्त्र त्यातील वचन निरुपयोगी करण्यास तो रद्द करू शकत नाही. १८कारण नियमशास्त्राद्वारे वतन असेल, तर ते वचनाद्वारे नाही; पण देवाने अब्राहामाला ते वचनाद्वारे दिले.

१९मग नियमशास्त्र कशासाठी? कारण, ज्या संतानास वचन दिले होते त्याचे येणे होईपर्यंत ते उल्लंघनामुळे देण्यात आले; ते देवदूतांकडून मध्यस्थाच्या हाती सोपविण्यात आले. २०आता, एकाकरता मध्यस्थ नसतो; पण देव एक आहे.
२१मग नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुद्ध आहे काय? तसे न होवो. कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र जर दिलेले असते तर,  खरोखर, नियमशास्त्राकडून नीतिमत्व असते. २२पण शास्त्रलेखाने सार्‍या जगाला पापात एकत्र कोंडले आहे, म्हणजे विश्वास ठेवणार्‍यांना येशू ख्रिस्तावरील विश्वासाचे जे वचन आहे ते देण्यात यावे.
२३पण जो विश्वास प्रकट होणार होता, तो येण्याअगोदर त्या विश्वासासाठी, आम्हाला नियमशास्त्राखाली एकत्र कोंडून राखले होते. २४म्हणून आम्हाला ख्रिस्ताकडे आणण्यास नियमशास्त्र हे शिक्षक झाले; म्हणजे आम्ही विश्वासाने नीतिमान ठरावे. २५पण आता, विश्वास आल्यावर, आम्ही शिक्षकाच्या स्वाधीन राहिलो नाही.

२६पण ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहा. २७कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला आहे तितक्यांनी ख्रिस्त परिधान केला आहे. २८यहुदी किवा हेल्लेणी नाही, दास किवा स्वतंत्र नाही, पुरुष किवा स्त्री नाही; कारण ख्रिस्त येशूत तुम्ही सर्व एक आहा. २९पण जर तुम्ही ख्रिस्ताचे आहा तर अब्राहामाचे संतान आहा; आणि वचनाप्रमाणे वारीस आहा.         

—–गलती ४—–

आता मी म्हणतो की, वारीस लहान मुलगा असताना, तो सर्वांचा धनी असूनही दासापेक्षा अधिक नसतो. पण बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत तो शिक्षकांच्या व कारभार्‍यांच्या स्वाधीन असतो. आपणदेखील मुले असताना, आपण जगाच्या मूलतत्त्वांच्या दास्यात होतो. पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राखाली जन्मास आला, ते ह्यासाठी की, नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे; म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा.

आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने तुमच्या अंतःकरणात आपल्या पुत्राचा आत्मा घातला आहे; तो अब्बा,बापा, अशी हाक मारतो. म्हणून आता तू दास नाहीस, तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस, तर देवाकडून वारीस आहेस.

तरी देवाला ओळखीत नसताना, तुम्ही तेव्हा, जे स्वभावतः देव नाहीत त्यांची सेवा केलीत; पण आता देवाला ओळखीत असताना, किंवा देव तुम्हाला ओळखीत असताना, तुम्ही त्या दुर्बळ, दरिद्री मूलतत्त्वांकडे पुन्हा कसे परत जाता आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता? १०तुम्ही दिवस, महिने, ऋतू, आणि वर्षे पाळता. ११मला तुमच्याविषयी भीती वाटते की, मी तुमच्यावर, जणू, व्यर्थ श्रम केले.
१२बंधूंनो, मी तुम्हाला विनवणी करतो की, तुम्ही माझ्यासारखे व्हा, कारण मी तुमच्यासारखा होतो. तुम्ही माझे काहीच वाईट केले नाही. १३तुम्ही जाणता की, मी देहाच्या अशक्तपणामुळे प्रथम तुम्हाला सुवार्ता सांगितली. १४आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता, तुम्ही तिरस्कार किवा तिटकारा केला नाही. पण माझे देवाच्या दूताप्रमाणे,  किंबहुना, ख्रिस्त येशूप्रमाणे स्वागत केले. १५तर तुम्ही वर्णन केलेला आशीर्वाद कोठे आहे? कारण, मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते. १६मग मी तुम्हाला खरे सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो काय? १७त्यांना तुमच्याविषयी आस्था वाटते ती चांगली नाही; पण तुम्हाला त्यांच्याविषयी आस्था वाटावी म्हणून ते तुम्हाला बाहेर ठेवू पहात आहेत. १८त्यांना चांगल्या गोष्टींसाठी, नेहमी तुमच्याविषयी आस्था वाटावी हे चांगले आहे; केवळ मी तुमच्याबरोबर असतानाच नाही.
१९माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी फिरून वेणा येत आहेत. २०आता मी तुमच्याबरोबर असतो आणि आवाज चढवून बोललो असतो, तर मला बरे वाटले असते; कारण तुमच्याविषयी मी साशंक आहे.
२१नियमशास्त्राखाली राहू इच्छिणारे म्हणून, तुम्ही मला हे सांगा की, तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? २२कारण असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन मुलगे होतेः एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून. २३पण दासीचा देहानुसार जन्मला होता; तर स्वतंत्र स्त्रीचा वचनानुसार जन्मला होता. २४ह्या गोष्टी एक दाखला होतात, कारण ह्या स्त्रिया दोन करार दाखवितातः एक सिनाय डोंगरावरील, म्हणजे दास्यासाठी मुले प्रसवणारी हगार. २५कारण ही हगार अरबस्तानातील सिनाय डोंगर आहे; आणि आता आपल्या मुलांसहित दास्यात असलेल्या यरुशलेमेसारखी आहे. २६पण वरील यरुशलेम स्वतंत्र आहे; ही आपल्या सर्वांची माता आहे. २७कारण असे म्हटले आहे की,
अगे वंध्ये, मुलांस जन्म न देणारी,
तू आनंद कर,
आणि वेणा न देणारी,
तू उसळून ओरड;
कारण नवरा असलेल्या स्त्रीपेक्षा,
सोडलेल्या स्त्रीची मुले
पुष्कळ अधिक आहेत.

२८आता बंधूंनो, इसहाक होता त्याप्रमाणे आपण वचनाची मुले आहोत. २९पण देहाकडून जो जन्मला होता, त्याने जो आत्म्याकडून होता, त्याला त्यावेळी, जसे छळले तसे आताही होत आहे. ३०पण शास्त्रलेख काय म्हणतो? तू त्या दासीला व तिच्या मुलाला बाहेर काढ; कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारीस होणार नाही. ३१तर मग, बंधूंनो, आपण दासीची मुले नाही, पण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.     

—–गलती ५—–

म्हणून ख्रिस्ताने ज्या स्वातंत्र्यात तुम्हाला मुक्त केले आहे त्यात तुम्ही स्थिर रहा, आणि दास्याच्या जुवाखाली पुन्हा अडकू नका.

बघा, मी पौल तुम्हाला हे सांगतो की, तुम्ही जर सुनत करून घेतलीत तर तुम्हाला ख्रिस्ताचा उपयोग नाही. कारण सुनत झालेल्या प्रत्येक मनुष्याला मी हे पुन्हा निक्षून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे. नियमशास्त्राने नीतिमान ठरण्याची इच्छा धरता ते तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहा; तुम्ही कृपेतून बाहेर पडला आहा, कारण आपण विश्वासाने, आत्म्याच्या द्वारे, नीतिमत्वाच्या आशेची प्रतीक्षा करीत आहो. कारण सुनत होणे, हे ख्रिस्त येशूत उपयोगी नाही; आणि सुनत न होणे हेही नाही; पण प्रीतीने कार्य करणारा विश्वास आहे.
तुम्ही चांगले धावत होता; तुम्हाला असे कोणी अडविले की, तुम्ही सत्याचे ऐकू नये? तुम्हाला जो बोलवीत आहे त्याच्याकडची ही शिकवण नाही. थोडेसे खमीर सगळा गोळा फुगवते. १०प्रभूच्या द्वारे मला तुमच्याबद्दल खातरी आहे की, तुम्ही कोणीही निराळ्या मनाचे होणार नाही. पण तुम्हाला जो कोणी अस्वस्थ करीत आहे तो आपली शिक्षा आपल्यावर घेईल.
११आणि बंधूंनो, मी जर अजून सुनत गाजवीत असेन, तर अजून माझा छळ का व्हावा? मग तर, वधस्तंभाचा अडथळा नष्ट झाला. १२मला वाटते की, तुम्हाला ढळवू पाहणार्‍यांनी स्वतःचे विच्छेदन करून घ्यावे.

१३कारण बंधूंनो, तुम्ही स्वातंत्र्यात बोलावले गेले आहा. मात्र देहाला संधी म्हणून स्वातंत्र्य घेऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा. १४कारण सर्व नियमशास्त्र एका वचनात पूर्ण होते; ते हे आहे की, तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर. १५पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि गिळून घेता, तर काळजी घ्या की, तुम्ही एकमेकाचा संहार करू नये.

१६म्हणून मी म्हणतो, आत्म्याने चाला, आणि देहाची वासना तुम्ही तृप्त करणार नाही. १७कारण देह आत्म्याविरुद्ध आणि आत्मा देहाविरुद्ध इच्छा धरतो; हे परस्परांस विरोध करतात, आणि म्हणून तुम्ही ज्याची इच्छा धरता ते करू शकत नाही. १८पण तुम्ही आत्म्याने चालविले गेलात तर नियमशास्त्राखाली येणार नाही.

१९आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः जारकर्म, अमंगळपणा, कामातुरपणा, २०मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह,  ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट, २१मत्सर, धुंदी, दंगल आणि ह्यांसारखी आणखी; ह्यांविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की, ह्या गोष्टी करणार्‍यांना देवाचे राज्य वतन मिळणार नाही.

२२पण आत्म्याची फळे ही आहेतः प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सदिच्छा, विश्वास, २३सौम्यता, संयमन; अशांविरुद्ध कोणताही नियम नाही.
२४आणि जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला भावनांसहित व वासनांसहित वधस्तंभावर खिळले आहे. २५आपण आत्म्याने जगत आहो तर तसेच आत्म्याने नीट चालू या. २६निरर्थक गौरव मिळवू पाहणारे, एकमेकाला चिरडीस आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे असे होऊ नये.

—–गलती ६—–

आणि बंधूंनो, कोणी जर अपराधात धरला गेला, तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्याला सौम्यतेच्या आत्म्याने वळवा; स्वतःकडे लक्ष दे,  नाहीतर, तुझीपण तशी परीक्षा होईल. तुम्ही एकमेकांची ओझी वहा आणि अशा प्रकारे ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा.
कारण जो मनुष्य कोणी नसताना आपण कोणी तरी आहोत असे मानतो, तो स्वतःची फसवणूक करतो. पण प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या कामाची परीक्षा करावी आणि मग, त्याला दुसर्‍याच्या संबंधात नाही, पण केवळ आपल्यात अभिमानाला जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला भार वाहिला पाहिजे.
ज्याला वचनाचे शिक्षण मिळते त्याने शिक्षण देणार्‍याला सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींत भागी द्यावी.
फसू नका, कारण देवाचा उपहास होणार नाही; कारण मनुष्य जे पेरतो त्याचेच तो पीक घेईल. कारण जो देहाकरता पेरतो तो देहाकडून नाशाचे पीक मिळवील, पण जो आत्म्याकरता पेरतो तो आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळवील. आणि आपण चांगले करण्यात खचू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू. १०म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व जे आपल्या विश्वासाच्या घराण्यातले आहेत त्यांचे विशेषतः बरे करावे.

११बघा, किती मोठ्या अक्षरात, मी तुम्हाला स्वहस्ते लिहीत आहे.
१२जे देहात श्रेष्ठता मिळवू पाहतात असे जितके आहेत, ते तुम्हाला सुनत करून घेण्यास वळवू पहात आहेत; ते एवढ्यासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये. १३कारण ज्यांची सुनत झाली आहे ते स्वतः तर नियमशास्त्र पाळीत नाहीत, पण तुमच्या देहात त्यांनी अभिमान मिरवावा, म्हणून, तुमची सुनत व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. १४पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलो आहो तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाशिवाय कशाचाही अभिमान मिरवणे माझ्यापासून दूर राहो. १५कारण सुनत होणे किंवा सुनत न होणे हे उपयोगी नाही; पण नवी उत्पत्ती होणे आहे; १६आणि जे ह्या नियमाने नीट चालतात अशा सर्वांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो. १७आतापासून कोणी मला त्रास देऊ नये, कारण मी माझ्या शरिरावर येशूच्या खुणा धारण केल्यात.
१८बंधूंनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s