Hebrews 11-13

इब्रीयांस पत्र

—–इब्री ११—–

विश्वास हा अपेक्षित गोष्टींचा भरवसा व अदृश्य गोष्टींची खातरी असा आहे. त्यायोगे पूर्वजांनी साक्ष मिळवली. विश्वासाने आपल्याला समजते की, देवाच्या शब्दाने युगे निर्माण झाली; म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टींपासून झाल्या नाहीत.

विश्वासाने, हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगले बलिदान देवाला अर्पण केले; त्यायोगे तो नीतिमान होता अशी त्याने साक्ष मिळवली. कारण देवाने त्याच्या अर्पणाविषयी साक्ष दिली. आणि त्यायोगे तो मेला आहे तरी बोलतो.
विश्वासाने, हनोखाने मरणाचा अनुभव घेऊ नये म्हणून, त्याला लोकान्तरी नेण्यात आले; आणि तो कोठे सापडला नाही. देवाने त्याला लोकान्तरी नेले; कारण त्याला लोकान्तरी नेण्यापूर्वी त्याने अशी साक्ष मिळवली की, तो देवाला संतोषवीत असे. पण विश्वासाशिवाय त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिज की, तो आहे, आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्याला सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब वाचवण्यासाठी तारू बांधले; आणि त्यायोगे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्‍या नीतिमत्वाचा तो वारीस झाला.
विश्वासाने, अब्राहामाने, त्याला जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्याला बोलावण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्याला माहीत नसताना तो निघाला. विश्वासाने, तो वचनाच्या देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वचनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्‍यांत राहिला. १०कारण, ज्या नगराला पाये आहेत, ज्याचा कारागीर व बांधणारा देव आहे अशा नगराची ते प्रतीक्षा करीत होते.
११विश्वासाने, सारेलाही, ती स्वतः वयातीत झाली असता प्रजोत्पादनशक्ती मिळाली; कारण ज्याने वचन दिले त्याला तिने विश्वासू मानले. १२म्हणून केवळ एकापासून, आणि अशा मृतवत् झालेल्या एकापासून ते संख्येने आकाशातील तार्‍यांप्रमाणे, समुद्राच्या किनार्‍यावरील वाळूप्रमाणे असंख्य झाले.
१३हे सगळे विश्वासात मेले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत. १४कारण, असे जे म्हणतात ते स्वतःचा देश मिळवू पहात आहेत हे ते दाखवतात. १५आणि खरोखर, ते ज्या देशातून निघाले होते त्याचा ते विचार करीत असते, तर तिकडे परत जाण्याची संधी त्यांना मिळाली असती. १६पण आता, ते अधिक चांगल्या म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
१७विश्वासाने, अब्राहामाने, त्याची परीक्षा केली जात असता इसहाकाला अर्पण केले; म्हणजे, ज्याने वचने स्वीकारली होती त्याने आपल्या एकुलत्या एकाला अर्पण केले. १८त्याच्याविषयी हे म्हटले होते की, इसहाकाद्वारे तुझे संतान बोलावले जाईल. १९तरी, देव त्याला मेलेल्यांतून उठवायलादेखील समर्थ आहे असे त्याने मानले. तो त्याला तेथून, जणू उपमेने, परतही मिळाला.
२०विश्वासाने, इसहाकाने, याकोबाला व एसावाला येणार्‍या गोष्टींविषयी आशीर्वाद दिला. २१विश्वासाने, याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले. २२विश्वासाने, योसेफाने, मरतेवेळी, इस्राएलाच्या वंशजांच्या निर्गमनांचा उल्लेख केला व आपल्या अस्थींविषयी आज्ञा दिली.
२३विश्वासाने, मोशे जन्मल्यावर, त्याला त्याच्या आईबापांनी तीन महिने लपवून ठेवले; कारण मूल सुंदर आहे हे त्यांनी बघितले व राजाचे भय धरले नाही. २४मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवणे नाकबूल केले. २५पापांची तात्कालिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले, २६आणि ख्रिस्ताचे दूषण हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण तो प्रतिफळाकडे अचल दृष्टीने पहात होता.
२७विश्वासाने, त्याने मिसर देश सोडला, राजाच्या क्रोधाला भिऊन नाही; कारण जो अदृश्य आहे त्याला पहात असल्याप्रमाणे तो ठाम राहिला. २८विश्वासाने, त्याने वल्हांडण व रक्तसिंचन हे विधी पाळले, ते ह्यासाठी की, प्रथम जन्मलेल्यांना मारणार्‍याने त्यांना शिवू नये.
२९विश्वासाने, ते तांबड्या समुद्रामधून, कोरड्या जमिनीवरून गेल्याप्रमाणे गेले व मिसरी तसे करण्याच्या प्रयत्नात बुडवले गेले. ३०विश्वासाने, त्यांनी सात दिवस, यरिहोच्या तटासभोवती फेरे घातल्यावर ते तट पडले.
३१विश्वासाने, राहाब वेश्या ही अवमान करणार्‍या इतरांबरोबर नाश पावली नाही; कारण, तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते.
३२आता मी अधिक काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन आणि इफताह, तसेच दावीद व शमुवेल आणि संदेष्टे ह्यांच्याविषयी मी सांगू लागलो तर मला काळ अपुरा पडेल. ३३विश्वासाने त्यांनी राज्ये जिकली, नीती आचरली, वचने मिळवली, सिहांची तोंडे बंद केली. ३४त्यांनी अग्नीचे बळ शमविले, तरवारीच्या धारेपासून ते निभावले, अशक्तपणात सशक्त झाले, युद्धात पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. ३५कित्येक स्त्रियांना त्यांचे मेलेले, पुन्हा जिवंत होऊन, परत मिळाले. आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पतकरल्यामुळे त्यांचे हाल हाल करण्यात आले. ३६आणखी दुसर्‍यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला. ३७त्यांना दगडमार केला गेला, त्यांना करवतीने कापले, त्यांची परीक्षा केली गेली, ते तरवारीने मारले गेले आणि दुरावलेले, नाडलेले व पीडलेले होऊन ते मेंढरांची व शेरड्यांची कातडी पांघरून भटकले. ३८(जग त्यांच्यासाठी लायक नव्हते) ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकांमधून फिरत राहिले.
३९ह्या सर्वांनी विश्वासाद्वारे साक्ष मिळवली असे असता त्यांना वचन प्राप्त झाले नाही. ४०कारण ते आपल्याशिवाय पूर्ण केले जाऊ नयेत अशी देवाच्या दृष्टीपुढे आपल्यासाठी अधिक चांगली गोष्ट होती.  

—–इब्री १२—–

म्हणून जर आपल्यासभोवती साक्षींचा इतका मोठा मेघ आहे, तर आपणदेखील प्रत्येक ओझे व आपल्याला सहज गुंतविणारे पाप काढून टाकून, आपल्यापुढे ठेवलेली धाव धीराने धावू या. आपल्या विश्वासाचा मार्ग काढणार्‍या व पूर्ण करणार्‍या येशूकडे अचल दृष्टीने पहात राहून आपण धावू या. त्याच्यापुढे ठेवल्या गेलेल्या आनंदासाठी त्याने लज्जा तुच्छ मानून, वधस्तंभ सहन केला आणि तो आता, देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. आणि तुम्ही थकू नये व आपल्या मनांत खचू नये म्हणून असा पाप्यांचा विरोध ज्याने स्वतः सहन केला त्याच्याकडे लक्ष द्या.
तुम्ही पापाविरुद्ध लढण्यात अद्याप रक्तापर्यंत विरोध केलेला नाही. पण तुम्हाला पुत्र म्हणणारा हा बोध तुम्ही विसरलात काय?
माझ्या मुला,
तू परमेश्वराची शिस्त अवमानू नकोस,
आणि तो तुला दोष लावील तेव्हा खचू नकोस.
कारण परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो
त्याला तो शिस्त लावतो,
आणि तो ज्याला जवळ घेतो
त्या प्रत्येक मुलाला फटके मारतो.
तुम्ही जर शिस्त सहन केली आहे तर देव तुम्हाला पुत्रांप्रमाणे वागवीत आहे; कारण बाप ज्याला शिस्त लावीत नाही असा पुत्र कोण आहे? पण सगळे जण जिचे वाटेकरी होतात त्या शिस्तीबाहेर तुम्ही असाल तर तुम्ही दासीपुत्र आहा आणि पुत्र नाही. शिवाय आपल्याला शिस्त लावणारे आपल्या देहाचे बाप होते, आणि आपण त्यांना मान दिला; तर जो आत्म्यांचा पिता आहे त्याला अधिक आज्ञांकित होऊन आपण जगू नये काय?
१०त्यांना योग्य वाटल्याप्रमाणे त्यांनी थोडे दिवस आपल्याला शिस्त लावली; पण तो आपल्याला हितकारक होईल अशी शिस्त लावतो, म्हणजे आपण त्याच्या पावित्र्यात वाटेकरी व्हावे. ११आता, कोणतीही शिस्त तेव्हाच्या वेळी आनंदाची वाटत नाही, पण दुःखाची वाटते; पण ज्यांना तिचे वळण लागते त्यांना पुढे ती नीतिमत्वाचे शांतिमय फळ देते. १२म्हणून तुम्ही लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे ताठ करा. १३आणि तुमच्या पायांखाली तुम्ही सरळ वाटा करा; म्हणजे लंगडा पाय मुरगळू नये, तर तो उलट बरा व्हावा.
१४सर्वांबरोबर शांतीच्या व पावित्र्याच्या मागे लागा; त्याशिवाय कोणी मनुष्य परमेश्वराला पाहणार नाही. १५आणि लक्ष ठेवा; नाहीतर कोणी मनुष्य देवाच्या कृपेला उणा पडेल; नाहीतर, एखादे कडूपणाचे मूळ उगवून ते तुम्हाला अस्वस्थ करील व त्यामुळे पुष्कळ जण दूषित होतील. १६नाहीतर, तुमच्यात कोणी जारकर्मी, किवा एसावासारखा भ्रष्ट होईल; त्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले. १७कारण तुम्ही जाणता की, त्यानंतर आपला आशीर्वादाचा वारसा मिळवायची त्याची इच्छा असता,  जरी त्याने अश्रू गाळीत तो मिळविण्याचा प्रयत्न केला तरी तो नाकारण्यात आला, कारण तेव्हा त्याला पश्चात्ताप करण्यास वाव मिळाला नाही.
१८कारण ज्याला कोणीही शिवेल, अशा अग्नीने जळणार्‍या डोंगराकडे तुम्ही आला नाही, धुक्याकडे व अंधाराकडे नाही, वावटळीकडे नाही, १९कर्णा वाजण्याच्या आवाजाकडे व शब्दांच्या आवाजाकडे आला नाही. तेव्हा तो ऐकणार्‍यांनी अशी विनवणी केली होती की, आमच्याशी त्या शब्दाद्वारे अधिक बोलले जाऊ नये; २०कारण त्या डोंगराला एक पशू जरी शिवला तरी त्याला दगडमार करावा, अशी जी आज्ञा दिली गेली होती ती त्यांना सहन करता येईना. २१ते दृश्य इतके भयानक होते की, मोशे म्हणाला, मी अतिशय भीत आहे आणि कापत आहे.
२२पण तुम्ही सियोन डोंगराकडे, आणि जिवंत देवाच्या नगरात म्हणजे स्वर्गीय यरुशलेमात, अगणित देवदूतांच्या उत्सवात, २३स्वर्गात ज्यांची नोंद आहे अशा ज्येष्ठांच्या मंडळीत, सर्वांवर न्यायाधीश असलेल्या देवाकडे, पूर्ण केलेल्या नीतिमानांच्या आत्म्यांकडे, २४आणि नव्या कराराचा मध्यस्थ झालेल्या येशूपुढे व शिंपडण्याच्या रक्ताजवळ आला आहा; ते हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी बोलत आहे.

२५पहा, जो बोलत आहे त्याला तुम्ही नाकारू नका; कारण पृथ्वीवर सूचना देणार्‍याला नाकारणारे निभावले नाहीत, तर जो स्वर्गातून सूचना देत आहे त्याच्यापासून आपण फिरलो तर किती विशेषेकरून निभावणार नाही! २६तेव्हा त्याच्या आवाजाने पृथ्वी हादरली, पण आता त्याने वचन देऊन म्हटले आहे की, मी अजून आणखी एकदा, केवळ पृथ्वी नाही, पण आकाशही हालवीन.
२७अजून आणखी एकदा ह्या म्हणण्याने निर्माण केलेल्या गोष्टींप्रमाणे हालविल्या जातील अशा गोष्टी काढून टाकणे, हा अर्थ उघड होतो. म्हणजे न हालणार्‍या गोष्टी रहाव्यात. २८तरी पण जे हालविले जाणार नाही असे राज्य आपण घेत आहोत; म्हणून आपण उपकार मानून देवाला संतोष होईल अशा प्रकारे, आनंदाने व भय धरून त्याची सेवा करीत राहू या. २९कारण आपला देव हा संहार करणारा अग्नी आहे.     

—–इब्री १३—–

बंधुप्रेम तुमच्यात राहो. आतिथ्यप्रेम विसरू नका; कारण त्यामुळे कित्येकांनी नकळत देवदूतांचे आतिथ्य केले आहे. जे बंधनात आहेत त्यांच्याबरोबर तुम्हीही बंदीत असल्याप्रमाणे त्यांची आठवण करा; तशीच पीडितांची आठवण करा, कारण स्वतः तुम्ही शरिरात आहा.

सर्वांत लग्न आदरणीय, आणि अंथरूण अदूषित राहो. पण जे कोणी जारकर्मी किवा व्यभिचारी आहेत त्यांचा देव न्याय करील.

तुमची वागणूक निर्लोभ ठेवा, तुम्हाला मिळाले आहे तेवढ्यात संतुष्ट रहा; कारण त्याचे म्हणणे आहे, मी तुला कधी टाकणार नाही किंवा सोडणार नाही. म्हणून आपण धीट होऊन म्हणावे की,
परमेश्वर माझा साहाय्यक आहे;
मी भिणार नाही.
मला मनुष्य काय करू शकेल?’

तुम्हाला देवाचे वचन सांगणार्‍या तुमच्या नेत्यांची आठवण करा; त्यांच्या आचरणाचा परिणाम पाहून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. येशू ख्रिस्त हा काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.

नाना प्रकारच्या नव्या शिकवणींनी वाहवून नेले जाऊ नका; कारण खाण्याच्या प्रकारांपेक्षा कृपेने अंतःकरण सुस्थिर व्हावे हे अधिक चांगले; अशा गोष्टींत जे जातात त्यांना त्यांकडून लाभ झालेला नाही. १०आपल्याला अशी वेदी आहे की, मंडपाची सेवा करणार्‍यांना तीवरील खाण्याचा अधिकार नाही.

११कारण, पापांबद्दल अर्पण करण्यास श्रेष्ठ याजक पवित्र स्थानात ज्या प्राण्यांचे रक्त नेतो, त्यांची शरिरे तळाबाहेर जाळली जातात. १२तसेच येशूने आपल्या रक्ताने लोकांना पवित्र करण्यासाठी वेशीबाहेर मरण सोसले. १३म्हणून आपण त्याचा अपमान सहन करून तळाबाहेर त्याच्याकडे जाऊ या. १४कारण आपल्याला येथे राहणारे नगर नाही, पण आपण येणारे मिळवू पहात आहोत. १५म्हणून त्याचे नाव पतकरणार्‍या ओठांचे फळ, म्हणजे स्तुतीचा यज्ञ आपण देवाला, त्याच्या द्वारे, नित्य अर्पण करू या. १६पण चांगले करणे व भागी देणे विसरू नका. कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.
१७तुम्ही आपल्या नेत्यांचे ऐका व स्वतः आज्ञाधारक व्हा. कारण त्यांना हिशोब देणे असल्याप्रमाणे ते तुमच्या जिवांसाठी जागृत राहतात; म्हणजे त्यांना ते आनंदाने करता यावे, दुःखाने नव्हे, कारण ते तुमच्या अहिताचे होईल.

१८आमच्यासाठी प्रार्थना करा; कारण आमची खातरी आहे की, आमचा विवेक चांगला आहे, कारण सर्व गोष्टींत चांगले वागण्याची आमची इच्छा आहे. १९पण मला तुमच्याकडे लवकर परत येता यावे म्हणून अधिक करा अशी विनंती करतो.

२०आता तो शांतीचा देव, ज्याने सार्वकालिक कराराच्या रक्ताने, मेंढरांचा जो महान मेंढपाळ, आपला प्रभू येशू ह्याला मेलेल्यांमधून आणले, २१त्याच्या दृष्टीस जे संतोषदायक ते तो तुमच्यात येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो, आणि प्रत्येक चांगल्या कामात त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला परिपूर्ण करो. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.

२२आता बंधूंनो, मी विनंती करतो की, तुम्ही एवढे बोधाचे बोलणे सहन करा; कारण मी तुम्हाला थोडक्या शब्दांत पत्र लिहिले आहे.
२३तुम्हाला हे विदित व्हावे की, आपला बंधू तिमथ्य सुटला आहे. तो लवकर आला, तर मीपण त्याच्याबरोबर तुम्हाला भेटेन.
२४तुमच्यावरील अधिकार्‍यांना आणि सर्व पवित्र जनांना सलाम द्या.
इटलीकर तुम्हाला सलाम सांगतात.
२५तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s