Hebrews 6-10

इब्रीयांस पत्र

—–इब्री ६—–

म्हणून आपण ख्रिस्ताविषयीच्या शिकवणीच्या, प्राथमिक गोष्टी मागे ठेवून पूर्ण करणार्‍या गोष्टींकडे पुढे जाऊ या. त्याच गोष्टींच्या शिकवणीचा पाया पुन्हा पुन्हा घालू नये; निर्जीव कामांविषयी पश्चात्ताप आणि देवावर विश्वास, बाप्तिस्म्याविषयी शिकवण व डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्यायनिवाडा ह्या त्या गोष्टी आहेत. आणि हे देवाने करू दिले तर आपण करू. कारण हे की, ज्यांना एकदा प्रकाश मिळाला आणि ज्यांनी स्वर्गीय दानाचा अनुभव घेतला आहे, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणार्‍या युगांच्या सामर्थ्यांची रुची घेतली आहे, ते स्वतः जर पतित झाले तर त्यांचे पुन्हा, पश्चात्तापासाठी नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला आपल्या स्वतःसाठी पुन्हा वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात. कारण जी जमीन वारंवार येणारा पाऊस पिते व तिची मशागत करणार्‍यांना जी उपयोगी पिके देते ती देवाचा आशीर्वाद घेते. पण जी काटेकिंकर उपजवते ती नापसंत होऊन शाप घेईल; ती जाळली जावी हा तिचा शेवट आहे.
पण प्रियांनो, आम्ही जरी हे म्हटले आहे तरी आम्हाला अधिक चांगल्या गोष्टींविषयी व तारणाबरोबर येणार्‍या गोष्टींविषयी तुमच्या बाबतीत खातरी आहे. १०कारण देव तुमचे काम आणि, तुम्ही करीत आहा तशी, पवित्र जनांची सेवा करण्यात तुम्ही त्याच्या नावाकरता दाखविलेली प्रीती विसरून जाण्यास अन्यायी नाही. ११आणि आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यामधील प्रत्येकाने आशेच्या पूर्ण खातरीसाठी शेवटपर्यंत अशीच आस्था दाखवावी. १२म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, पण विश्वास व धीर हा मार्ग पतकरून जे वचनाचा वारसा घेत आहेत त्यांचे अनुकरण करणारे व्हावे.

१३कारण देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याला आपल्याहून मोठ्याची शपथ घेणे शक्य नसल्यामुळे त्याने स्वतःची शपथ घेतली; १४आणि त्याला म्हटले की, खरोखर, मी तुला आशीर्वाद देऊन आशीर्वाद देईन, आणि बहुगुणित करून बहुगुणित करीन. १५आणि त्याने धीर धरल्यावर त्याला ते वचन प्राप्त झाले.
१६आणि लोक, खरोखर, आपल्याहून मोठ्याची शपथ घेतात व ते आपल्या समर्थनासाठी, शपथ घेऊन वादाचा शेवट करतात. १७आणि, तशीच देवाची इच्छा असल्यामुळे त्याने आपल्या योजनेची अचलता वचनाच्या वारसांना स्पष्टपणे दाखविण्यास स्वतः मध्यस्थ होऊन शपथ घेतली. १८म्हणजे, ज्यात देवाला खोटे बोलणे अशक्य होते अशा दोन अचल गोष्टींच्या योगे, आपण जे आश्रयासाठी धावलोत त्या आपल्यापुढे ठेवलेली आशा आपण हस्तगत करावी म्हणून, आपल्याला सबळ उत्तेजन मिळावे. १९ही आशा आपल्या जिवांचा नांगर आहे; तो स्थिर व अढळ असून पडद्यापलीकडे आत जातो. २०तेथे आपल्याकरता पुढे धावणारा येशू आत गेला असून, मलकीसेदेकाच्या प्रकारचा सनातन श्रेष्ठ याजक झाला आहे. 

—–इब्री ७—–

कारण हा मलकीसेदेक शालेमाचा राजा असून परात्पर देवाचा याजक होता; आणि अब्राहाम राजांना मारून परतला तेव्हा त्याला भेटून ह्याने त्याला आशीर्वाद दिला; आणि त्याला अब्राहामाने सगळ्या लुटीचा दशमांश दिला. तो प्रथमतः, त्याच्या नावाच्या अर्थाप्रमाणे, नीतिमत्वाचा राजा होता व तो शिवाय, शालेमाचा म्हणजे शांतीचा राजा होता. बाप नाही, आई नाही, वंशावळ नाही, त्याच्या दिवसांचा प्रारंभ नाही किंवा जीवनाचा अंत नाही; पण देवाच्या पुत्रासारखा केला गेल्यामुळे तो निरंतर याजक राहतो.
तर आता, कुलपिता अब्राहाम ह्याने ज्याला उत्तम लुटीचा दशमांश दिला तो हा मनुष्य किती मोठा होता ह्याचा विचार करा. आणि लेवीच्या वंशजांतील ज्यांना याजकपण मिळत असते त्यांना लोकांकडून, म्हणजे अब्राहामाच्या पोटच्या, आपल्या स्वतःच्या बांधवांकडून, नियमशास्त्रानुसार दशमांश घेण्याची आज्ञा आहे. पण जो त्यांच्या कुळातला नव्हता त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला; आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला. आणि हे निर्विवाद आहे की, मोठ्याकडून लहानास आशीर्वाद दिला जातो. आणि येथे, मरणारे लोक दशमांश घेतात, पण तेथे घेणारा असा आहे की, तो जिवंत आहे अशी त्याच्याविषयी साक्ष दिली गेली आहे. आणि असे म्हणता येईल की, दशमांश घेणार्‍या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशमांश दिला. १०कारण, त्याच्या बापाला मलकीसेदेक भेटला तेव्हा तो त्याच्या पोटी होता.

११म्हणून लेवीय याजकपणाने जर पूर्णता झाली असती, (कारण त्याखालीच लोकांना नियमशास्त्र दिले गेले) तर मग अहरोनाच्या प्रकारचा कोणी बोलावण्यात न येता, मलकीसेदेकाच्या प्रकारचा आता दुसरा याजक व्हावा ह्याचे आणखी अगत्य काय होते? १२कारण याजकपण बदलले म्हणून, आवश्यकतेने, नियमशास्त्राचा बदलही आला. १३कारण ज्याच्याविषयी हे म्हटले आहे तो, ज्या वंशातील, कोणी मनुष्याने वेदीची काळजी घेतलेली नाही अशा दुसर्‍या वंशातील वाटेकरी आहे. १४कारण आपला प्रभू यहुदाच्या वंशात जन्मास आला हे आधीपासून उघड आहे; आणि याजकांबद्दल त्या वंशाविषयी मोशे काही म्हणाला नाही.
१५आणि तरी हे अधिक स्पष्ट आहे; कारण मलकीसेदेकासारखा दुसरा आला आहे. १६तो दैहिक आज्ञेच्या नियमशास्त्रानुसार केलेला नाही, पण अव्यय जीवनाच्या सामर्थ्याने केला गेला आहे. १७कारण तो अशी साक्ष देतो की, मलकीसेदेकाच्या प्रकारचा तू सनातन याजक आहेस.
१८कारण, प्रथम आलेली आज्ञा दुर्बळ आणि निरुपयोगी म्हणून, खरोखर, रद्द करण्यात आली. १९कारण, नियमशास्त्राने काही पूर्ण केले नाही, पण अधिक चांगल्या आशेच्या आगमनाने केले आहे. तिच्या द्वारे आपण देवाजवळ जातो. २०आणि ज्याअर्थी हे शपथेशिवाय झाले नाही, (२१कारण, ते याजक शपथेशिवाय केले गेले, पण परमेश्वराने शपथ घेतली आहे, ती तो बदलणार नाही, तू सनातन याजक आहेस असे ज्याला त्याने म्हटले तो हा त्याच्या शपथेने झाला.) २२त्याअर्थी येशू अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला. २३आणि, खरोखर, ते याजक पुष्कळ झाले; कारण मरणाने त्यांना राहू दिले नाही. २४पण हा निरंतर राहणार आहे म्हणून ह्याचे याजकपण अबाधित आहे. २५म्हणून जे त्याच्या द्वारे देवाकडे जातात त्यांना शेवटपर्यंत तारण्यासदेखील तो समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सर्वकाळ जिवंत आहे. २६कारण अशा प्रकारचा पवित्र, निष्कपट,  अदूषित, पाप्यांहून वेगळा व स्वर्गांहून उंच केला गेला आहे असा श्रेष्ठ याजक आपल्याला असणे उचित होते. २७त्याला दररोज, त्या श्रेष्ठ याजकांप्रमाणे, प्रथम स्वतःच्या व नंतर लोकांच्या पापांबद्दल बलिदान अर्पावे लागत नाही. कारण त्याने स्वतःचे अर्पण केले तेव्हा त्याने हे एकदाच केले.
२८कारण नियमशास्त्र हे अशक्तपणाने भरलेल्या मनुष्यांना श्रेष्ठ याजक म्हणून नेमते; पण नियमशास्त्राच्या मागून आलेले शपथेचे वचन सर्वकाळसाठी पूर्ण केलेल्या पुत्राला नेमते.  

—–इब्री ८—–

आम्ही जे काही म्हटले आहे त्याचे आता हे सार आहे की, असा श्रेष्ठ याजक आपल्याला आहे; तो स्वर्गातील, राजवैभवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे; आणि माणसांनी नव्हे, पण परमेश्वराने उभारलेल्या पवित्र स्थानाचा व खर्‍या मंडपाचा सेवक झाला आहे. कारण प्रत्येक श्रेष्ठ याजक अर्पणे व बलिदाने सादर करण्यास नेमलेला असतो; तेव्हा तसेच सादर करण्यास ह्याच्याजवळही काही असावे हे आवश्यक आहे.
कारण तो पृथ्वीवर असता, तर तो याजक झाला नसता; कारण असे याजक, नियमशास्त्रानुसार, अर्पणे सादर करीत आहेत. ते ज्या गोष्टींची सेवा करतात त्या स्वर्गीय गोष्टींच्या प्रतिकृती व छाया आहेत; कारण, मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला तशा अर्थाची सूचना देण्यात आली होती. कारण त्याला तो म्हणतो की, पहा, तुला डोंगरावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे तू सर्व गोष्टी कर. पण ह्याला अधिक चांगली सेवा मिळाली आहे, कारण हा अधिक चांगल्या वचनांवर आधारलेल्या, अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थ आहे. कारण पहिला करार जर निर्दोष असता तर दुसर्‍यासाठी जागा शोधली गेली नसती.
कारण तो त्यांना दोष देऊन म्हणतो की,
परमेश्वर म्हणतो,
बघा, असे दिवस येत आहेत की,
इस्राएलाच्या घराण्याबरोबर,
आणि यहुदाच्या घराण्याबरोबर,
  मी त्या दिवसांत नवा करार करीन;
९मी त्यांच्या पूर्वजांना
मिसर देशातून बाहेर नेण्यास
  माझ्या हाताने धरले त्या दिवशी
मी त्यांच्याबरोबर करार केला
तसा करणार नाही.
  कारण ते माझ्या करारात राहिले नाहीत,/strong>
आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,
असे परमेश्वर म्हणतो.
१०कारण त्या दिवसांनंतर
इस्राएलाच्या घराण्याबरोबर
  मी असा करार करीन,
असे परमेश्वर म्हणतो.
  मी त्यांच्या मनांत माझे नियम घालीन,/strong>
  आणि ते त्यांच्या अंतःकरणांवर लिहीन.
मी त्यांचा देव होईन
आणि ते माझी प्रजा होतील.
११तेव्हा ते, प्रत्येक जण आपल्या गावकर्‍याला,
  आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला,
  असे शिकवणार नाहीत,
आणि सांगणार नाहीत की,
तुम्ही परमेश्वराला ओळखा,
  १२कारण मी त्यांच्या अपराधांची गय करीन,
  आणि त्यांची पापे पुन्हा स्मरणार नाही.
१३ह्यात तो नवा म्हणतो, म्हणजे पहिला त्याने जुना ठरवला, आणि जे जुने झाले व जीर्ण होत आहे ते रद्द होण्याच्या लागास आले आहे.  

—–इब्री ९—–

तेव्हा पहिल्या करारातदेखील उपासनेचे नियम होते व पृथ्वीवरील पवित्र स्थान होते. कारण एक मंडप केलेला होता; तो पहिला होता. त्यात दीपवृक्ष व मेज असून त्यावर समर्पणाच्या भाकरी ठेवीत. त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. आणि दुसर्‍या पडद्यामागे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. तेथे सोन्याचे धुपाटणे होते व सगळीकडून सोन्याने मढविलेला, कराराचा कोश होता. त्यात मान्ना ठेवलेली सोन्याची वाटी, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या. आणि वरील दयासनावर छाया करणारे गौरवी करूबिम त्यावर होते; येथे आपल्याला ह्या गोष्टींविषयी सविस्तर बोलता येत नाही.
आणि ह्या गोष्टी जेव्हा अशा केल्या गेल्या तेव्हापासून पहिल्या मंडपात, पवित्र सेवा करण्यासाठी याजक सतत जात आहेत. पण केवळ श्रेष्ठ याजक दुसर्‍यात वर्षातून एकदा जातो, आणि जे रक्त स्वतःसाठी व लोकांकडून अज्ञानामुळे केल्या गेलेल्या पापांबद्दल तो अर्पण करतो, ते घेतल्याशिवाय तो आत जात नाही. ह्यात पवित्र आत्मा दाखवितो की, पहिला मंडप उभा असेपर्यंत परमपवित्र स्थानाचा मार्ग प्रकट केला गेला नव्हता. तो आताच्या काळासाठी दाखला आहे. तेथे अर्पीत ती दाने व बलिदाने, ती सेवा करणार्‍याला, विवेकदृष्ट्या, पूर्ण करू शकत नव्हती. १०त्यांचा केवळ खाण्यापिण्याशी व अनेक प्रकारच्या प्रक्षालनांशी संबंध होता; त्यांत सुधारणेच्या काळापर्यंत त्यांना लावलेले दैहिक नियम होते.

११पण ख्रिस्त येणार्‍या चांगल्या गोष्टींचा श्रेष्ठ याजक झाल्यामुळे, अधिक मोठ्या, अधिक परिपूर्ण व कोणी हातांनी न केलेल्या, म्हणजे ह्या सृष्टीतील नाही अशा मंडपाद्वारे, १२बकर्‍यांचे व गोर्‍ह्यांचे रक्त घेऊन नाही, पण आपल्या स्वतःचे रक्त घेऊन एकदाच पवित्र स्थानात गेला; आणि, त्याने आपल्यासाठी सार्वकालिक मुक्ती मिळवली. १३कारण, बकर्‍यांचे किवा बैलांचे रक्त, किवा कालवडीची राख, शिंपडल्याने, जर देहाची शुद्धी करते आणि विटाळलेल्यांना शुद्ध करते, १४तर, सनातन आत्म्याद्वारे ज्याने देवाला आपल्या स्वतःला निष्कलंक असे अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमचे विवेक जिवंत देवाची सेवा करण्यास निर्जीव कामांपासून किती अधिक शुद्ध करील.
१५आणि म्हणून, तो नव्या कराराचा मध्यस्थ होण्याचे कारण हे की, आता बोलावले गेलेत त्यांना पहिल्या कराराच्या उल्लंघनातून मुक्त करणार्‍या मरणाद्वारे सार्वकालिक वतनाचे वचन मिळावे. १६कारण मृत्युपत्र असते तेथे मृत्युपत्र करणार्‍याचा मृत्यू होणेही आवश्यक असते. १७कारण मनुष्य मेल्यानंतर मृत्युपत्र अंमलात येते; उलट, मृत्युपत्र करणारा जोवर जिवंत आहे तोवर ते काहीच करू शकत नाही. १८ह्या कारणामुळे पहिला करारही रक्ताशिवाय स्थापित झाला नाही; १९कारण मोशेने सर्व लोकांना नियमशास्त्रानुसार प्रत्येक आज्ञा सांगितल्यावर, त्याने पाण्याबरोबर किरमिजी लोकर व एजोब घेऊन, गोर्‍ह्यांचे व बकर्‍यांचे रक्त घेतले; आणि पुस्तकावर व सर्व लोकांवर शिंपडून २०म्हटले की, देवाने तुम्हाला नेमून दिलेल्या कराराचे हे रक्त आहे.२१त्याचप्रमाणे त्याने मंडपावर, आणि सेवेच्या सर्व पात्रांवर रक्त शिंपडले.
२२नियमशास्त्रानुसार बहुतेक सर्व गोष्टी रक्ताने शुद्ध केल्या जातात, आणि रक्त ओतल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही.

२३ह्या कारणाने स्वर्गातील गोष्टींच्या ह्या प्रतिकृती अशा प्रकारे शुद्ध करण्याचे अगत्य होते, तर त्याच स्वर्गीय गोष्टींसाठी ह्यांहून चांगल्या बलिदानांचे अगत्य होते.
२४कारण खर्‍याच्या प्रतिकृती म्हणून, हातांनी केलेल्या पवित्र स्थानात ख्रिस्त गेला नाही, पण आपल्यासाठी देवासमोर उभा राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला आहे. २५आणि श्रेष्ठ याजक प्रत्येक वर्षी दुसर्‍यांचे रक्त घेऊन पवित्र स्थानात प्रवेश करतो, तसे त्याने वारंवार स्वतःचे अर्पण करावे हे त्याला आवश्यक नाही. २६कारण तसे होते, तर त्याला जगाच्या स्थापनेपासून अनेकदा सोसणे आवश्यक होते, पण आता, एकदाच, युगाच्या समाप्तीस, तो स्वतःचे बलिदान करून पाप रद्द करण्यास प्रगट झाला.
२७पण मनुष्यांसाठी एकदा मरणे व नंतर त्यांचा न्याय होणे हे नेमलेले असल्यामुळे, २८पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यास ख्रिस्त एकदा अर्पिला गेला; आणि तो दुसर्‍या वेळी पापांसाठी म्हणून नाही, पण तारणासाठी जे त्याची प्रतीक्षा करीत राहतील त्यांना प्रगट होईल.  

—–इब्री १०—–

कारण येणार्‍या चांगल्या गोष्टींची नियमशास्त्रात छाया आहे त्यांचे प्रत्यक्ष प्रतिरूप नाही असे असल्यामुळे, त्याच्याकडे येणार्‍यांना ते सतत वर्षानुवर्ष, अर्पीत असलेल्या बलिदानांनी ते कधीच पूर्ण करू शकत नाही. नाहीतर, ती अर्पण करणे थांबले नसते काय? कारण, एकदा जे शुद्ध केले गेलेत अशा उपासकांत पापांचा विवेक पुढे राहू नये. पण त्या बलिदानांत प्रत्येक वर्षी पापांचे स्मरण केले जाते. कारण, बैलांच्या व बकर्‍यांच्या रक्ताने पाप काढून टाकले जाणे अशक्य आहे.
म्हणून जगात येतेवेळी तो असे म्हणतो की,
 बलिदान आणि अर्पण तू इच्छीत नव्हतास,
  पण माझ्यासाठी तू शरीर निर्माण केले आहेस.
होमार्पणांत आणि पापांबद्दल केलेल्या अर्पणांत
  तुला संतोष वाटला नाही.
  तेव्हा मी म्हणालो, देवा, पहा,
पुस्तकाच्या गुंडाळीत
माझ्याविषयी लिहिले आहे.
  मी तुझ्या इच्छेप्रमाणे करायला आलो.
वर जेव्हा त्याने म्हटले की, बलिदान व अर्पण, होमार्पणे व पापांबद्दल केलेली अर्पणे तू इच्छीत नाहीस, तुला त्यात संतोष वाटला नाही, (ही नियमशास्त्रानुसार अर्पिली जातात) तेव्हा तो म्हणाला, देवा, पहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करायला आलो. म्हणजे दुसरे प्रस्थापित करायला तो पहिले रद्द करतो. १०आणि त्या इच्छेच्या योगे एकदाच झालेल्या, येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या अर्पणाने आपण पवित्र केले गेलोत.

११कारण प्रत्येक याजक दररोज आपली सेवा करीत उभा राहतो; आणि जी बलिदाने कधीच पाप काढून घेऊ शकणार नाहीत तीच तो पुन्हा पुन्हा अर्पण करतो, १२पण हा तर पापासाठी, सर्वकाळसाठी एकच बलिदान अर्पण करून देवाच्या उजवीकडे बसला आहे. १३आणि पुढील काळात त्याचे वैरी हे त्याचे पदासन केले जाईपर्यंत तो वाट पहात आहे. १४कारण ज्यांना तो पवित्र करतो त्यांना त्याने सर्वकाळसाठी एकाच अर्पणाने पूर्ण केले आहे.
१५पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो; १६परमेश्वर म्हणतो की,
मी त्या दिवसांनंतर
त्यांच्याबरोबर हा करार करीन.
  मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणांत घालीन,
  आणि मी ते त्यांच्या मनांवर लिहीन.
१७आणि हे म्हटल्यावर तो पुढे म्हणतो,
मी त्यांची पापे आणि त्यांचे अनाचार
कधी स्मरणार नाही.
१८आणि जेथे ह्यांची क्षमा झाली आहे तेथे पुन्हा पापाबद्दल अर्पण नाही.

१९-२०म्हणून बंधूंनो, आपल्याला येशूच्या रक्ताद्वारे, त्याने आपल्यासाठी पवित्र केलेल्या नव्या आणि जिवंत मार्गाने, पडद्यामधून म्हणजे त्याच्या देहाद्वारे, पवित्र स्थानात प्रवेश करण्यास धैर्य आहे. २१आणि आपल्यासाठी देवाच्या मंदिरावर एक थोर याजक आहे; २२म्हणून आपण आपली मने सिंचनाने, वाईट विवेकापासून शुद्ध करून व शरिरे शुद्ध पाण्याने धुऊन, विश्वासाच्या पूर्ण खातरीने खर्‍या मनाने जवळ जाऊ या. २३आपण आपल्या आशेचा पतकर न डगमगता बळकट धरू या. कारण ज्याने वचन दिले तो विश्वासू आहे. २४आणि, आपण प्रीतीत व चांगल्या कामात ईर्ष्येसाठी एकमेकांकडे लक्ष द्यावे. २५काहींची रीत झाली आहे तसे आपण एकत्र जमणे सोडू नये; पण एकमेकांना उत्तेजन द्यावे; आणि, तुम्ही तो दिवस जवळ येत असताना पहात असता हे अधिक करा.
२६कारण आपल्याला सत्याचे ज्ञान मिळाल्यावर, आपण स्वेच्छेने पाप केले, तर पापाबद्दल पुन्हा बलिदान रहात नाही. २७पण न्यायाची, आणि विरोधकांना गिळून टाकणार्‍या प्रज्वलित ईर्ष्येची एक भयानक प्रतीक्षा मात्र राहते. २८मोशेच्या नियमशास्त्राचा अवमान करणारा कोणीही मनुष्य दोन किवा तीन साक्षी असल्यास दयेवाचून मरत असे. २९तर मग, देवाच्या पुत्राला ज्याने पायाखाली तुडवले, आणि तो स्वतः ज्यायोगे पवित्र झाला होता ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले व कृपेच्या आत्म्याचा अवमान केला तो किती अधिक वाईट शिक्षेला पात्र गणला जाईल असे तुम्हाला वाटते? ३०कारण, सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, आणि पुन्हा, परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, असे ज्याने म्हटले आहे त्याला आपण ओळखतो. ३१जिवंत देवाच्या हाती सापडणे ही भयंकर गोष्ट आहे.

३२पण पूर्वीच्या दिवसांची आठवण करा; त्या दिवसांत तुम्हाला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखांचा मोठा घाला सहन केला. ३३कित्येकदा विटंबना व छळणूक करून तुमचा तमाशा केला गेला; तर कित्येकदा, ज्यांना असे वागविण्यात आले त्यांचे तुम्ही भागीदार झाला. ३४कारण मी बेड्यांत असता माझ्या दुःखांत तुम्ही सहभागी झाला व तुमच्या मालमत्तेची लूट तुम्ही आनंदाने पतकरली. कारण तुम्ही हे जाणता की, तुमच्यासाठी अधिक चांगली मालमत्ता आहे; आणि ती राहणारी आहे.
३५म्हणून आपले धैर्य सोडू नका. त्याचे प्रतिफळ मोठे आहे. ३६कारण तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे केल्यावर तुम्हाला वचन प्राप्त व्हावे म्हणून तुम्हाला धीराची गरज आहे.
  ३७कारण आता थोडा वेळ राहिला आहे;
  जो येणार आहे तो येईल
  आणि विलंब लावणार नाही.
  ३८पण नीतिमान विश्वासाने जगेल;
  आणि कोणी माघार घेईल,
  तर माझ्या जिवाला त्याच्याविषयी
  काही संतोष वाटणार नाही.
३९पण नाशाकडे माघार घेणार्‍यातले आपण नाही, तर जिवाच्या तारणासाठी जे विश्वास ठेवतात त्यांच्यातले आहोत.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s