James

याकोबाचे पत्र

—–याकोब १—–

देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याजकडून;
बारा कुळांतील पांगलेल्या लोकांसः
जयजय.

माझ्या बंधूंनो, तुम्ही निरनिराळ्या परीक्षांत सापडाल तेव्हा तो सर्व आनंद माना; कारण तुम्ही जाणता की, तुमच्या विश्वासाची कसोटी तुमच्यात धीर उत्पन्न करते. पण धीराचे काम पूर्ण होऊ द्या; म्हणजे त्यायोगे, तुम्ही कशातही उणे न राहता पूर्ण व परिपूर्ण होत जावे.
तुमच्यात कोणाला ज्ञानीपण उणे असेल तर ते त्याने देवाजवळ मागावे, आणि ते त्याला दिले जाईल; कारण तो सर्वांना उदारपणे देतो व कोणाला दोष लावीत नाही. पण त्याने संशय न धरता, विश्वास धरून मागावे. कारण जो संशय धरतो, तो वार्‍याबरोबर पुढे जाणार्‍या व हेलकावणार्‍या, समुद्रावरच्या लाटेप्रमाणे असतो; आणि अशा मनुष्याने आपल्याला प्रभूकडून काही मिळेल असे मानू नये. दोदिल मनुष्य आपल्या सर्व मार्गांत अस्थिर असतो.
दीन अवस्थेत असलेल्या बंधूने आपण वर उचलले गेलो म्हणून अभिमान मिरवावा. १०आणि सधन असेल त्याने आपण दीन अवस्थेत आलो म्हणून अभिमान मिरवावा; कारण गवतावरच्या फुलाप्रमाणे तो नाहीसा होईल. ११कारण सूर्य आपल्या प्रखर तापाने वर येताच गवत वाळते व त्याचे फूल गळते; आणि त्याच्या रूपाची शोभा नष्ट होते; आणि तसाच सधन मनुष्यही आपल्या मार्गात कोमेजून जाईल.
१२जो मनुष्य परीक्षेत टिकून राहतो तो धन्य, कारण तो पारखलेला ठरल्यावर त्याला जीवनाचा मुगुट मिळेल; तो प्रभूवर प्रीती करणार्‍यांस त्याने देण्याचे वचन दिले आहे.
१३एखाद्या मनुष्याची परीक्षा होते तेव्हा त्याने म्हणू नये की, देवाकडून माझी परीक्षा झाली; कारण वाइटाकडून देवाची परीक्षा होत नाही, किवा तो कोणाची परीक्षा करीत नाही. १४पण प्रत्येक मनुष्य स्वतःच्या वासनेने ओढला जातो आणि भुलवला जातो, तेव्हा त्याची परीक्षा होते. १५आणि वासना गर्भवती होते, तेव्हा ती पापाला जन्म देते; आणि पाप पूर्ण वाढते तेव्हा ते मरण उपजवते.
१६माझ्या प्रिय बंधूंनो, चुकू नका. १७प्रत्येक उत्तम दान व प्रत्येक पूर्ण दान वरून असते; आणि ते ज्योतींच्या जनकाकडून खाली येते. त्याच्या ठायी बदल नाही किवा फिरण्याची छाया नाही. १८त्याने स्वतःच्या इच्छेने, सत्याच्या वचनाने आपल्याला जन्म दिला आहे, म्हणजे आपण त्याच्या उत्पत्तीतून एक प्रकारे प्रथमफळ व्हावे.

१९हे जाणून, माझ्या प्रिय बंधूंनो, प्रत्येक मनुष्याने ऐकण्यात शीघ्र, बोलण्यात मंद आणि रागात मंद असावे. २०कारण मनुष्याचा राग देवाचे नीतिमत्व आचरीत नाही. २१म्हणून सर्व अमंगळपणा आणि तुमच्यात राहिलेला कुवृत्तीचा अवशेष काढून टाका; आणि तुमच्या आत्म्यांचे तारण करण्यास समर्थ असलेले दृढमूल वचन तुम्ही सौम्यतेने स्वीकारा.
२२पण वचन आचरणात आणणारे व्हा; केवळ ऐकणारे होऊ नका; आणि स्वतःला फसवू नका. २३कोणी जर वचन ऐकणारा असेल म्हणजे आचरणात आणणारा नसेल, तर असा मनुष्य आपले स्वतःचे तोंड आरशात निरखणार्‍या मनुष्यासारखा आहे. २४कारण तो स्वतःला निरखतो आणि तेथून निघून जातो, आणि आपण कसे आहोत हे लगेच विसरतो. २५पण जो कोणी स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमात लक्ष घालतो आणि त्याला धरून राहतो तो विसराळू ऐकणारा होत नाही, पण तो कृती करणारा होतो; आणि असा मनुष्य आपल्या कृतीत आशीर्वादित होतो.
२६तुमच्यातला कोणी आपल्या स्वतःला धर्माचरणी मानीत असेल व आपल्या जिभेला लगाम घालीत नसेल आणि स्वतःच्या मनाला फसवीत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे.
२७अनाथांचा आणि विधवांचा, त्यांच्या संकटांत, समाचार घेणे व आपल्या स्वतःला जगापासून निष्कलंक राखणे हे देवपित्याच्या दृष्टीपुढे शुद्ध व अदूषित धर्माचरण आहे.  

—–याकोब २—–

माझ्या बंधूंनो, तुम्ही आपल्या, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास पक्षपात बाळगून धरू नका. कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीब मनुष्य पण आला, तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्याला म्हणता की,  इथं चांगल्या जागी बसा; आणि गरिबाला म्हणता, तू तिथं उभा रहा, किंवा इथं माझ्या पदासनाशी बस. म्हणजे, तुम्ही आपआपल्यात भेद ठेवता, आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना? ५माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास, आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे. पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे सधन आहेत ते तुम्हाला जाचतात, आणि न्यायालयात खेचतात ना? आणि तुम्हाला ज्यावरून नाव मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना?
खरोखर, तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर, ह्या शास्त्रलेखातील राजनियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहा. पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता, आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरविले जाता. १०कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळीत असेल आणि एखाद्या बाबतीत तो घसरला, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो. ११कारण ज्याने म्हटले की, व्यभिचार करू नको, त्यानेच म्हटले की, खून करू नको. आता, तू जर व्यभिचार केला नाहीस, पण तू खून केला आहेस तर तू नियमशास्त्र उल्लंघणारा झालास.
१२तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा. १३कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याला दयेवाचून न्याय मिळेल. आणि दया न्यायाविरुद्ध अभिमान मिरवते.

१४माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की, माझ्याजवळ विश्वास आहे; पण त्याच्याजवळ जर कृती नाहीत, तर त्याला काय लाभ? विश्वास त्याला तारू शकेल काय? १५जर कोणी भाऊ उघडा असेल, किंवा कोणी बहीण उघडी असेल, आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल, १६आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा, पण शरीरासाठी लागणार्‍या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ? १७म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.
१८आता, कोणी मनुष्य म्हणेल की, तुझ्याजवळ विश्वास आहे, आणि माझ्याजवळ कृती आहेत. तुझ्या कृतींशिवाय तुझा विश्वास मला दाखव, आणि मी माझ्या कृतींवरून माझा विश्वास तुला दाखवीन. १९तू विश्वास ठेवतोस की, देव एक आहे; हे तू चांगले करतोस. भुतेसुद्धा विश्वास ठेवतात व थरथर कापतात. २०पण मूर्ख मनुष्या, कृतींशिवाय विश्वास कसा निरुपयोगी आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय? २१आपला पूर्वज अब्राहाम ह्याने आपला मुलगा इसहाक ह्याला जेव्हा वेदीवर अर्पण केले, तेव्हा तो कृतींनी नीतिमान ठरला ना? २२आता, त्याच्या कृतींबरोबर विश्वासाने कसे काम केले, आणि त्या कृतींकडून विश्वास पूर्ण केला गेला, हे तुला दिसते का? २३अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व गणण्यात आले, हे म्हणणारा शास्त्रलेख पूर्ण झाला, आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. २४ह्यावरून तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतींनी नीतिमान ठरतो. २५त्याचप्रमाणे राहाब वेश्येने जेव्हा जासुदांना आत घेतले व दुसर्‍या वाटेने पाठवून दिले, तेव्हा ती कृतींनी नीतिमान ठरली ना?
२६कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.  

—–याकोब ३—–

आणि बंधूंनो, तुम्ही इतके अधिक शिक्षक होऊ नका, कारण आपल्यावर अधिक मोठा दोष येईल हे तुम्हाला माहीत आहे.
कारण, पुष्कळ गोष्टींत आपण सर्व जण चुकतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीर लगामीत ठेवण्यास समर्थ आहे. बघा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगामी घालतो, त्या त्यांनी आपले ऐकावे म्हणून घालतो; आणि इकडे तिकडे त्यांचे सर्व शरीर वळवतो. तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्‍याने लोटली जातात, पण ती चालवणार्‍याला एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात. त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे, आणि मोठ्या गोष्टींचा अभिमान मिरवते. बघा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते. आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे जग आहे. जीभ ही सर्व अवयवांत अशी आहे की, ती सर्व शरिराला आग लावते आणि सृष्टिक्रमाला आग लावते; तिला नरकाची आग लागली आहे.
कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी, आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि माणसाने कह्यात आणले आहेत. पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे. आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद गातो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो. १०एकाच मुखातून धन्यवाद आणि शाप बाहेर निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा होऊ नयेत. ११एका झर्‍याला एकाच मुखातून गोडे पाणी व कडू पाणी देता येत नाही. १२माझ्या बंधूंनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे देईल काय? किंवा द्राक्षवेल अंजिरे देईल काय? तसेच खारे पाणी ते गोडे करू शकत नाही.

१३तुमच्यांत ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याला चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःच्या कृती दाखवू द्या. १४पण तुमच्या मनात कडवट ईर्ष्या आणि विरोध असतील तर सत्याविरुद्ध अभिमान मिरवून खोटे बोलू नका. १५हे ज्ञानीपण वरून येत नाही. ते पृथ्वीवरचे, जीवधारी स्वभावाचे व सैतानाकडचे असते. १६कारण ईर्ष्या आणि विरोध जेथे आहेत तेथे अव्यवस्था व प्रत्येक वाईट गोष्ट असते.
१७पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतिशील,  सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते. १८आणि शांती करणार्‍यांसाठी नीतीच्या पिकाची शांतीत पेरणी होते.

—–याकोब ४—–

तुमच्यात लढाया व भांडणे कुठून येतात? तुमच्या अवयवांत लढाई करणार्‍या वासनांमुळेच नाही काय?तुम्ही इच्छा धरता पण तुम्हाला मिळत नाही; तुम्ही खून करता व मिळवण्याची ईर्ष्या धरता, पण तुम्हाला मिळवता येत नाही. तुम्ही भांडता व लढाई करता तरी तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही. तुम्ही मागता आणि तुम्हाला मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य इच्छा बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या वासनांसाठी खर्चावे म्हणून मागता.

तुम्ही जणू व्यभिचारिणी आहात. जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छील तो देवाचा वैरी आहे. किंवा आपल्यात राहणारा आत्मा मत्सराने ईर्ष्या धरतो, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हाला वाटते काय? पण तो अधिक कृपा पुरवतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांना कृपा पुरवतो.
म्हणून देवाच्या अधीन रहा; सैतानाविरुद्ध उभे रहा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळेल. तुम्ही देवाच्या जवळ जा आणि तो तुमच्या जवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो दोदिल मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा. दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होऊ द्या; तुमच्या आनंदाची खिन्नता होऊ द्या. १०परमेशवराच्या दृष्टीपुढे तुम्ही स्वतःस खाली वाकवा आणि तो तुम्हाला वर उचलील.
११बंधूंनो, एकमेकांविषयी वाईट बोलू नका. जो बंधूविषयी वाईट बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमाविषयी वाईट बोलतो आणि नियमाला दोष लावतो. पण तू जर नियमाला दोष लावलास तर तू नियम पाळणारा नाहीस पण न्यायाधीश आहेस. १२जो तारण्यास व नष्ट करण्यास समर्थ आहे असा नियमकर्ता व न्यायाधीश एकच आहे. मग शेजार्‍याला दोष लावणारा तू कोण आहेस

१३आता जा, तुम्ही जे म्हणता की, आज किंवा उद्या आपण ह्या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू, आणि व्यापार करून कमावू. १४पण उद्या काय होईल हे तुम्हाला माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते. १५त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू, आणि हे करू किंवा ते करू. १६आता, तुम्ही आपल्या प्रौढीचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे.
१७म्हणून जो चांगले करणे जाणतो, पण करीत नाही त्याला ते पाप आहे.    

—–याकोब ५—–

धनवानांनो, आता जा; तुमच्यावर विपत्ती येणार आहेत त्याकरता रडा, आणि आकांत करा. तुमचे धन कुजले आहे व तुमची वस्त्रे कसरीचे खाणे झाली आहेत. तुमचे सोनेरुपे गंजले आहे. त्यांचा गंज तुमच्याविरुद्ध साक्ष देईल, आणि अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. तुम्ही शेवटच्या दिवसांसाठी धन साठवून ठेवले आहे. बघा, तुमची शेते कापणार्‍या कामकर्‍यांची, तुम्ही अडवून ठेवलेली मजुरी तुमच्याविरुद्ध ओरडत आहे; आणि कापणार्‍यांच्या आरोळ्या सैन्यांच्या प्रभूच्या कानी गेल्या आहेत. तुम्ही पृथ्वीवर मजेत राहिलात व मौज केलीत; आणि तुम्ही वधाच्या दिवशी तुमची मने तृप्त केलीत. नीतिमानाला दोषी ठरवून तुम्ही मारलेत; तो तुम्हाला प्रतिकार करीत नाही.

म्हणून बंधूंनो, प्रभूचे येणे होईपर्यंत धीर धरा. शेतकरी बघा, तो आपल्या जमिनीच्या मोलवान पिकाची प्रतीक्षा करतो आणि पहिला व पुढचा पाऊस मिळेपर्यंत तो त्यासाठी धीर धरतो. तुम्ही धीर धरा, तुमची अंतःकरणे स्थिर करा; कारण प्रभूचे येणे जवळ आले आहे.
बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करू नका, नाहीतर, तुम्ही दोषी ठराल. बघा, न्यायाधीश दाराशी उभा आहे.
१०माझ्या बंधूंनो, प्रभूच्या नावाने जे संदेष्टे बोलले आहेत त्यांचे तुम्ही, दुःख सहन करण्याविषयी व धीराविषयी, उदाहरण घ्या. ११बघा, जे धीर धरतात त्यांना आपण धन्य म्हणतो; इयोबाच्या धीराविषयी तुम्ही ऐकले आहे व परमेश्वराने केलेला शेवट बघितला आहे; कारण परमेश्वर दयाळू व कन्हवाळू आहे.
१२पण माझ्या बंधूंनो, सर्व गोष्टींवर हे आहे की, शपथ घेऊ नका. स्वर्गाची नको, पृथ्वीची नको किवा दुसर्‍या कशाचीही शपथ नको. तुमचे हो ते हो, आणि नाही ते नाही असावे; नाहीतर, तुम्ही न्यायात पडाल.

१३तुमच्यात कोणी दुःख सोशीत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत. १४तुमच्यात कोणी आजारी आहे काय? मंडळीच्या वडिलांना त्याने बोलवावे; आणि त्यांनी त्याला प्रभूच्या नावाने तेल लावून, त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. १५आणि विश्वासाची प्रार्थना दुखणाइताला वाचवील, परमेश्वर त्याला उठवील व त्याने पापे केली असल्यास त्याला क्षमा केली जाईल.
१६तुम्ही बरे होण्यासाठी आपले अपराध एकमेकांजवळ कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमान माणसाची परिणामकारक प्रार्थना फार करू शकते. १७एलिया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता; त्याने पाऊस पडू नये म्हणून आपल्या प्रार्थनेत याचना केली व साडेतीन वर्षांच्या काळात पृथ्वीवर पाऊस पडला नाही. १८मग त्याने पुन्हा प्रार्थना केल्यावर आकाशाने पाऊस दिला व पृथ्वीने आपले पीक उपजवले.
१९माझ्या बंधूंनो, तुमच्यातला कोणीही सत्यापासून बहकला असता त्याला कोणी वळवले, तर त्याने समजावे की, जो एखाद्या पापी माणसाला त्याच्या मार्गाच्या चुकीपासून मागे वळवतो, तो त्याचा जीव मरणातून वाचवील व पुष्कळ पापांची रास झाकील.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s