John 11-15

संत योहान ह्याचे शुभवर्तमान

—–योहान ११—–

आता बेथानीचा लाजर म्हणून एक मनुष्य आजारी होता. हे मरिया व तिची बहीण मार्था ह्यांचे गाव. जिने सुवासिक तेल घेऊन प्रभूला लावले व आपल्या केसांनी त्याचे पाय धुतले ती ही मरिया होती. आणि तिचा भाऊ लाजर आजारी होता.
म्हणून त्याच्या बहिणींनी त्याला निरोप पाठवून कळवले, ‘प्रभू, बघा, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे.’ पण येशूने ते ऐकले तेव्हा तो म्हणाला, ‘हा आजार मरणासाठी नाही, पण देवाच्या गौरवासाठी आहे; म्हणजे देवाच्या पुत्राचं त्यामुळं गौरव व्हावं.’ आता मरिया व तिची बहीण मार्था, आणि लाजर ह्यांच्यावर येशू प्रीती करीत असे. त्याकरता तो आजारी होता हे त्याने ऐकले त्यावेळी तो जेथे होता त्या ठिकाणी तो दोन दिवस राहिला. मग, त्यानंतर, तो शिष्यांना म्हणतो,
“आपण पुन्हा यहुदियात जाऊ या.‘
शिष्य त्याला म्हणतात,
“रब्बी, यहुदी आपल्याला आताच दगडमार करू पहात होते आणि आपण पुन्हा तिकडे जाऊ पाहता?”
येशूने उत्तर दिले,
“दिवसाचे बारा तास असतात ना? कोणी दिवसा चालल्यास तो अडखळणार नाही, कारण त्याला ह्या जगाचा प्रकाश दिसतो; १०पण कोणी रात्री चालल्यास तो अडखळतो, कारण त्याच्यात प्रकाश नाही.”
११तो ह्या गोष्टी बोलला, आणि त्यानंतर तो त्यांना म्हणतो,
“आपला मित्र लाजर आजारी आहे, पण मी त्याला झोपेतून उठवावं म्हणून जातो.”
१२म्हणून त्याचे शिष्य त्याला म्हणाले,
“प्रभू, तो निजला असेल तर बरा होईल.”
१३आता येशू त्याच्या मरणाविषयी बोलला. पण त्यांना वाटले तो झोपेत विसावा घेण्याविषयी बोलला.
१४मग येशू उघडपणे म्हणाला,
“लाजर मेला आहे. १५आणि तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून तुमच्याकरता मी आनंद करतो की, मी तिथं नव्हतो; पण आपण त्याच्याकडे जाऊ या.”
१६मग ज्याला दिदुम म्हणत तो थोमा आपल्या जोडीच्या शिष्यांना म्हणाला,
“आपणपण जाऊ या; म्हणजे आपण त्याच्या बरोबर मरू.”
१७मग येशू आला तेव्हा तो चार दिवस थडग्यात होता हे त्याला समजले. १८आता बेथानी यरुशलेमजवळ सुमारे एक कोसावर होती. १९आणि यहुद्यांपैकी पुष्कळ जण मार्था व मरिया ह्यांच्याकडे त्यांच्या भावासाठी त्यांचे सांत्वन करायला आले होते. २०म्हणून येशू येत आहे हे मार्थेने ऐकले तेव्हा ती जाऊन त्याला भेटली, पण मरिया घरी बसली. २१तेव्हा मार्था येशूला म्हणाली,
“प्रभू, आपण इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. २२पण मी जाणते की, आतासुद्धा आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल.”
२३येशू तिला म्हणतो,
“तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
२४मार्था त्याला म्हणते,
“तो पुनरुत्थानात शेवटच्या दिवशी पुन्हा उठेल हे मी जाणते.”
२५येशू तिला म्हणाला,
“पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो जरी मेला तरी जिवंत राहील, २६आणि जो जिवंत आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, ह्यावर तू विश्वास ठेवतेस काय?”
२७ती त्याला म्हणाली,
“हो, प्रभू, मी विश्वास ठेवते की, जगात येणार आहे तो देवाचा पुत्र तू आहेस.”
२८आणि एवढे बोलून ती गेली व तिने आपली बहीण मरिया हिला एकीकडे बोलवून म्हटले, ‘गुरू आलेत आणि तुला बोलवीत आहेत.’
२९तिने हे ऐकले, तेव्हा ती लवकर उठून त्याच्याकडे आली. ३०आता, येशू अजून गावात आला नव्हता, पण मार्था त्याला जेथे भेटली त्याच ठिकाणी होता.
३१तेव्हा जे यहुदी तिच्याबरोबर घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी बघितले की, मरिया घाईघाईने उठून निघाली; तेव्हा ती थडग्याकडे रडायला निघून गेली, असे समजून ते तिच्या मागोमाग गेले. ३२मग जेथे येशू होता तेथे मरिया आली, आणि तिने त्याला बघितले तेव्हा ती त्याच्या पायाशी पालथी पडली व त्याला म्हणाली,
“प्रभू, आपण इथं असता तर माझा भाऊ मेला नसता.”
३३म्हणून जेव्हा, ती रडत होती व तिच्याबरोबर आलेले यहुदीही रडत होते हे येशूने बघितले तेव्हा तो आत्म्यात कण्हला व अस्वस्थ झाला; ३४आणि म्हणाला,
“तुम्ही त्याला कुठं ठेवलंत?”
ते त्याला म्हणाले,
“प्रभू, या आणि बघा.”
३५येशू रडला. ३६तेव्हा ते यहुदी म्हणाले,
“बघा हा त्याच्यावर कशी प्रीती करीत होता?”
३७पण त्यांच्यातले कोणी म्हणाले,
‘ज्यानं त्या अंधळ्याचे डोळे उघडले त्याला हा मनुष्य मरू नये असंही करता आलं नसतं काय?‘
३८म्हणून येशू पुन्हा आतल्या आत कण्हत कबरेकडे येतो. ती एक गुहा होती व तिला एक शिळा लावलेली होती. ३९येशू म्हणतो,
“तुम्ही ती शिळा काढा.”
मृताची बहीण मार्था त्याला म्हणते,
“प्रभू, आतापर्यंत त्याला दुर्गंधी येत असेल; कारण तो चार दिवस आहे.”
४०येशू तिला म्हणतो,
“मी तुला नव्हतो म्हणालो की, तू जर विश्वास ठेवशील तर तू देवाचं गौरव पाहशील?”
४१तेव्हा त्यांनी शिळा काढली; आणि येशूने डोळे वर लावले व तो म्हणाला,
“बापा, तू माझं ऐकलंस म्हणून मी तुझे उपकार मानतो. ४२मला हे माहीत होतं की, तू माझं नेहमी ऐकतोस,पण जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्याकरता मी हे बोललो, म्हणजे त्यांनी विश्वास ठेवावा की, तू मला पाठवलं आहेस.”
४३आणि एवढे बोलून तो मोठ्या आवाजात ओरडला,
“लाजर, बाहेर ये.”
४४आणि जो मेला होता तो बाहेर आला; त्याचे पाय व त्याचे हात प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशू त्यांना म्हणतो,
“त्याला सोडवा आणि जाऊ द्या.”
४५तेव्हा मरियेकडे आलेल्या ज्या यहुद्यांनी त्याने केलेल्या गोष्टी पाहिल्या होत्या त्यांच्यातल्या पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; ४६पण त्यांच्यातले काही परोश्यांकडे गेले व त्यांनी त्यांना येशूने केलेल्या गोष्टी सांगितल्या.

४७मग वरिष्ठ याजक व परोशी ह्यांनी न्यायसभा भरवून म्हटले,
“आपण काय करणार आहो? कारण हा मनुष्य पुष्कळ चिन्हं करीत आहे. ४८आपण त्याला असंच राहू दिलं तर सगळे त्याच्यावर विश्वास ठेवतील; आणि रोमी येऊन आपलं स्थान, आणि आपलं राष्ट्रही हस्तगत करतील.”
४९तेव्हा त्यांच्यातला एक जण, त्या वर्षी श्रेष्ठ याजक असलेला कयफा,  त्यांना म्हणाला,
“तुम्ही काहीच जाणत नाही. ५०आणि तुम्ही विचार करीत नाही की, एका मनुष्यानं लोकांसाठी मरावं हे हिताचं आहे; आणि सर्व राष्ट्राचा नाश होऊ नये.”
५१आणि हे तो स्वतः होऊन बोलला नाही; पण त्या वर्षी तो श्रेष्ठ याजक असल्यामुळे त्याने संदेश दिला की, येशूने राष्ट्रासाठी मरावे; ५२आणि राष्ट्रासाठी केवळ नाही, पण त्याने देवाची पांगलेली मुलेही एकात एकत्र आणावीत ह्यासाठी.
५३मग ते त्या दिवसापासून, आपण त्याला कसे ठार मारावे ह्याचा विचार करू लागले. ५४म्हणून त्यानंतर येशू यहुद्यांत उघडपणे फिरला नाही; पण तो तेथून जवळच्या प्रांतात, एफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे आपल्या शिष्यांबरोबर राहिला.

५५आता यहुद्यांचा वल्हांडण जवळ आला होता; आणि वल्हांडणाच्या अगोदर, आपल्या स्वतःला शुद्ध करायला,त्या प्रांतातून पुष्कळ लोक वर यरुशलेमला गेले होते. ५६आणि त्यांनी येशूचा शोध केला व ते मंदिरात उभे असताना त्यांनी एकमेकांना म्हटले,
“तुम्हाला काय वाटतं? तो सणाला येणार नाही काय?”
५७आता वरिष्ठ याजक व परोशी ह्यांनी आपण त्याला धरावे म्हणून अशी आज्ञा दिली होती की, जर कोणाला तो कोठे आहे हे कळले तर त्याने कळवावे.  

—–योहान १२—–

मग येशू वल्हांडणाच्या सहा दिवस आधी बेथानीस आला. आणि येशूने ज्याला मेलेल्यांतून उठवले होते तो लाजर तेथे होता. त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले, आणि मार्था वाढीत होती. पण त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांत लाजर हा एक होता. तेव्हा मरियेने एक माप, शुद्ध जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेतले व ते येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरले.
तेव्हा, त्याच्या शिष्यांतला एक, त्याला धरून देणार होता तो यहुदा इस्कार्योत म्हणाला,
“हे सुवासिक तेल तीनशे दिनारांना का विकलं नाही? आणि गरिबांना दिलं नाही?”
तो गरिबांची काळजी करीत होता म्हणून हे बोलला असे नाही, पण तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबा होता आणि तो त्यात टाकलेले घेऊन जाई. तेव्हा येशू म्हणाला,
“तिला राहू दे; मला पुरायच्या दिवसासाठी तिला हे ठेवू दे. कारण गरीब तुमच्याबरोबर नेहमी आहेत, पण मी तुमच्याबरोबर नेहमी नाही.”
म्हणून यदुद्यांतील पुष्कळ लोकांना तो तेथे होता हे कळले होते; आणि येशूसाठी केवळ नाही, पण त्याने ज्याला मेलेल्यांतून उठवले होते त्या लाजरालाही बघावे म्हणून ते आले होते. १०पण वरिष्ठ याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला. कारण ११यहुद्यांतील पुष्कळ लोक त्याच्यामुळे गेले, आणि त्यांनी येशूवर विश्वास ठेवला.

१२दुसर्‍या दिवशी, सणाला आलेल्या पुष्कळ लोकांनी येशू यरुशलेमला येत आहे हे ऐकले. १३तेव्हा त्यांनी खजुरीच्या झावळ्या घेतल्या आणि ते त्याची भेट घ्यायला बाहेर निघाले, आणि ओरडत म्हणू लागले,
“होसान्ना! प्रभूच्या नावानं येणारा धन्य इस्राएलाचा राजा!”
१४आणि येशूला एक शिंगरू मिळाल्यावर तो त्यावर बसला. कारण असे लिहिले आहे की,
  १५‘सियोनकन्ये, भिऊ नको,
  बघ, तुझा राजा
  गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’
१६त्याच्या शिष्यांना प्रथम ह्या गोष्टी कळल्या नाहीत, पण जेव्हा येशूचे गौरव झाले, तेव्हा त्यांना आठवले की, हे त्याच्याविषयी लिहिले होते, आणि त्यांनी त्याला हे केले.
१७म्हणून जेव्हा त्याने लाजराला त्याच्या थडग्यातून बोलावले व मेलेल्यांतून उठवले तेव्हा त्याच्याबरोबर जे लोक होते त्यांनी त्याच्याविषयी साक्ष दिली. १८लोक ह्याही कारणामुळे जाऊन त्याला भेटले, कारण त्याने हे चिन्ह केले होते हे त्यांनी ऐकले होते. १९तेव्हा परोशी एकमेकांस म्हणाले,
“विचार करा, तुमचं कसं काही चालत नाही. बघा, त्याच्यामागं जग गेलं आहे.”

२०आता जे लोक उपासना करायला ह्या सणात वर आले त्यांच्यात काही हेल्लेणी होते. २१म्हणून ते फिलिपाकडे आले; तो गालिलातील बेथसैदा येथील होता आणि त्यांनी त्याला विनंती करून म्हटले,
“महाराज, आमची येशूला भेटायची इच्छा आहे.”
२२फिलिप जाऊन अंद्रियाला सांगतो; अंद्रिया व फिलिप जाऊन येशूला सांगतात. २३आणि येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मनुष्याच्या पुत्राचं गौरव व्हायची घटका आली आहे. २४मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, गव्हाचा दाणा जर जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटा राहतो; पण तो मेला तर तो पुष्कळ पीक देतो. २५जो आपल्या जिवाचा लोभ धरतो तो त्याला मुकतो आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याला सार्वकालिक जीवनासाठी राखील. २६जर कोणी माझी सेवा करील तर त्यानं माझ्यामागं यावं, आणि मी जिथं आहे तिथं माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करील तर पिता त्याला मान देईल.
२७“आता माझा जीव अस्वस्थ होत आहे, आणि मी काय बोलू? बापा, तू ह्या घटकेतून मला राख पण मी ह्या कारणासाठीच ह्या घटकेत आलो आहे. २८बापा, तू आपल्या नावाचं गौरव कर.”
तेव्हा आकाशातून वाणी झाली,
‘मी गौरवलं आहे आणि पुन्हा गौरवीन.’
२९म्हणून जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले,
“हा गडगडाट झाला.”
दुसरे म्हणाले,
“त्याच्याशी देवदूत बोलला.”
३०येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“माझ्यासाठी ही वाणी झाली नाही पण तुमच्यासाठी. ३१आता ह्या जगाचा न्याय आहे; आता ह्या जगाचा अधिपती बाहेर टाकला जाईल. ३२आणि मला जर पृथ्वीपासून वर चढवलं तर मी सर्वांना माझ्याकडे ओढीन.”
३३तो आपल्याला कोणत्या मरणाने मेले पाहिजे हे प्रगट करायला असे बोलला. ३४लोकांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“ख्रिस्त सर्वकाळ राहील असं आम्ही नियमशास्त्रातून ऐकलं आहे. आणि,  आपण कसं म्हणता की, मनुष्याचा पुत्र वर चढवला गेला पाहिजे? हा मनुष्याचा पुत्र कोण आहे?”
३५म्हणून येशू त्यांना उत्तर देऊन म्हणाला,
“आणखी अल्पकाळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हाला प्रकाश आहे तोवर चाला; नाहीतर, अंधार तुम्हाला गाठील; जो अंधारात चालतो त्याला आपण कुठं जातो हे कळत नाही. ३६तुम्हाला प्रकाश आहे तोवर प्रकाशावर विश्वास ठेवा; म्हणजे तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हाल.”
येशू हे बोलला आणि निघून गेला, आणि त्याने त्यांच्यापासून स्वतःला लपवले.

३७पण जरी त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली होती तरी त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही;३८म्हणजेयशया संदेष्टा जे म्हणाला, ते त्याचे वचन पूर्ण व्हावे,
 ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर
  कोणी विश्वास ठेवला आहे?
परमेश्वराचा बाहू कोणाला प्रगट झाला आहे?’
३९म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही; कारण यशया पुन्हा म्हणाला,
  ४०‘त्याने त्यांचे डोळे अंधळे केले आहेत
  आणि त्यांचे मन कठिण केले आहे;
  म्हणजे त्यांनी डोळ्यांनी बघू नये,
  आणि मनाने समजू नये,
  त्यांनी वळू नये, 
  आणि मी त्यांना बरे करू नये.’
४१जेव्हा यशयाने त्याचे गौरव बघितले व तो त्याच्याविषयी बोलला तेव्हा त्याने ह्या गोष्टी सांगितल्या.
४२तरी अधिकार्‍यांतही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण त्यांनी आपण सभास्थानबहिष्कृत केले जाऊ नये म्हणून ते परोश्यांमुळे पतकरले नाही. ४३कारण त्यांना देवाकडच्या मानापेक्षा मनुष्याकडचा मान अधिक आवडला.

४४आणि येशू ओरडून म्हणाला,
“जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो माझ्यावर नाही, तर ज्यानं मला धाडलं त्याच्यावर विश्वास ठेवतो. ४५आणि जो मला पाहतो तो ज्यानं मला धाडलं त्याला पाहतो. ४६मी जगात प्रकाश म्हणून आलो आहे; आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्यानं अंधारात राहू नये. ४७कोणी जर माझी वचनं ऐकतो आणि ती पाळीत नाही,तर मी त्याचा न्याय करीत नाही; कारण मी जगाचा न्याय करायला नाही, पण मी जगाचं तारण करायला आलो. ४८जो माझा अवमान करतो आणि माझी वचनं स्वीकारीत नाही त्याचा न्याय करायला एक आहे. मी जे वचन सांगितलं आहे तेच त्याचा, शेवटच्या दिवशी, न्याय करील. ४९कारण मी स्वतःचं बोललो नाही, पण ज्या पित्यानं मला धाडलं त्यानं मला मी काय सांगावं आणि काय बोलावं ह्याची आज्ञा दिली आहे. ५०आणि मी हे जाणतो की, त्याची आज्ञा सनातन जीवन आहे. म्हणून मी ज्या गोष्टी बोलतो त्या पित्यानं मला जशा सांगितल्यात तशा बोलतो.”

—–योहान १३—–

आता, वल्हांडण सणाअगोदर जेव्हा येशू जाणत होता की, त्याची ह्या जगातून पित्याकडे निघून जायची घटका आली होती, तेव्हा त्याने, जे त्याचे स्वतःचे जगात होते त्यांच्यावर प्रीती केली असल्यामुळे, त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीती केली.
ह्यावेळी सैतानाने शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कार्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे घातले होते, आणि रात्रीचे भोजन होत असता येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते, आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता; तेव्हा तो भोजनावरून उठतो; त्याने आपली वस्त्रे एकीकडे ठेवली, आणि एक फडका घेऊन आपल्या कमरेला बांधला. त्यानंतर येशू एका भांड्यात पाणी ओततो; आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या फडक्याने पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे येतो; तेव्हा तो त्याला म्हणतो,
“प्रभू, तू माझे पाय धुतोस?”
येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“मी काय करतो हे तू आता जाणत नाहीस, पण तुला पुढे कळेल.”
पेत्र त्याला म्हणतो,
“तुला माझे पाय कधीच धुवायचे नाहीत.”
येशूने त्याला उत्तर दिले,
“मी जर तुला धुतलं नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”
शिमोन पेत्र त्याला म्हणतो,
“प्रभू, माझे पायच नाही, पण हात आणि डोकंपण धू.”
१०येशू त्याला म्हणतो,
“ज्याचं स्नान झालं आहे त्याला पायांशिवाय काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे नाही.”
११कारण त्याला कोण धरून देईल हे तो जाणत होता, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे शुद्ध नाही.” 
१२मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली वस्त्रे घेतली व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला काय केलं ते तुम्हाला समजलं का? १३तुम्ही मला गुरू आणि प्रभू म्हणता, आणि ठीक म्हणता; कारण मी आहे. १४मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत.
१५“कारण मी तुम्हाला केलं तसं तुम्हीही करावं म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे. १६मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, दास आपल्या धन्याहून मोठा नाही; आणि ज्याला पाठवलं आहे तो त्याला धाडणार्‍याहून मोठा नाही. १७तुम्हाला जर ह्या गोष्टी समजल्या तर तुम्ही त्या केल्यात तर तुम्ही धन्य!
१८“मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडलं आहे त्यांना मी ओळखतो. पण, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुद्ध आपली टाच उचलली’, हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, १९जे होईल त्याअगोदर, मी आतापासून तुम्हाला सांगतो, म्हणजे ते होईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे. २०मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, मी ज्याला धाडलं त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो माझा स्वीकार करतो तो ज्यानं मला धाडलं त्याचा स्वीकार करतो.”
२१एवढे बोलून येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, तुमच्यातला एक मला धरून देईल.”
२२तो कोणाविषयी बोलला म्हणून शिष्य साशंक होऊन एकमेकांकडे पाहू लागले. २३तेव्हा येशू ज्याच्यावर प्रीती करीत असे, असा त्याच्या शिष्यांतला एक जण येशूच्या उराशी भोजनास बसला होता. २४म्हणून शिमोन पेत्र त्याला खुणावतो आणि म्हणतो,
“तो कोणाविषयी बोलतो ते सांग.”
२५तो येशूच्या छातीशी लागून त्याला म्हणतो,
“प्रभू, तो कोण?”
२६येशूने उत्तर दिले,
“मी ज्याला हा घास भिजवून देईन, तोच तो आहे.”
आणि त्याने तो घास भिजवल्यावर, तो शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कार्योत ह्याला दिला. २७आणि त्या घासानंतर सैतान तेव्हा त्याच्यात शिरला. म्हणून येशू त्याला म्हणतो,
“तू जे करणार ते लवकर कर.”
२८पण तो हे कशाकरता बोलला ते भोजनास बसलेल्या कोणालाही समजले नाही. २९कारण यहुदाजवळ डबा असल्यामुळे कोणी समजले की, ‘आपल्याला सणात कशाची गरज आहे ते विकत घे,’ किंवा गरिबांना काही द्यावे असे येशू त्याला म्हणाला होता. ३०मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला; आणि रात्र होती.

३१म्हणून तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला,
“आता मनुष्याच्या पुत्राचं गौरव झालं आहे, आणि, त्याच्या ठायी देवाचं गौरव झालं आहे; ३२जर त्याच्या ठायी देवाचं गौरव झालं तर देवही आपल्या ठायी त्याला गौरवील. आणि, लगेच, त्याला गौरवील. ३३मुलांनो,  मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे; तुम्ही मला शोधाल; आणि मी यहुद्यांना म्हणालो तसंच मी तुम्हाला म्हणतो, ‘मी जाईन तिकडे तुम्हाला येता येणार नाही.’ ३४मी एक नवी आज्ञा तुम्हाला देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा. ३५तुमची एकमेकांवर प्रीती असेल तर ह्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”
३६शिमोन पेत्र त्याला म्हणाला,
“प्रभू, तू कुठं जातोस?”
येशूने त्याला उत्तर दिले,
“मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागं येता येणार नाही; पण नंतर तू माझ्यामागं येशील.”
३७पेत्र त्याला म्हणाला,
“प्रभू, मला तुझ्यामागं का येता येणार नाही? मी तुझ्याकरता माझा जीव देईन.”
३८येशूने त्याला उत्तर दिले,
“तू माझ्याकरता तुझा जीव देशील काय? मी तुला सत्य सत्य सांगतो, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”        

—–योहान १४—–

“तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ वसतीच्या जागा आहेत. नसत्या तर, मी तुम्हाला सांगितलं असतं; कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि, मी जर गेलो आणि मी तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन; म्हणजे जिथं मी आहे तिथं तुम्ही पण असावं. आणि मी कुठं जातो तो मार्ग तुम्हाला माहीत आहे.”
थोमा त्याला म्हणतो,
“प्रभू, आपण कुठं जाता ते आम्हाला माहीत नाही; मग मार्ग कसा माहीत आहे?”
येशू  त्याला म्हणतो,
“मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणी पित्याकडे येत नाही. तुम्ही मला ओळखलं असतं तर माझ्या पित्यालाही ओळखलं असतं. तुम्ही त्याला आता ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलं आहे.”
फिलिप त्याला म्हणतो,
“प्रभू, आम्हाला पिता दाखवा, आणि आम्हाला तेवढं पुरे आहे.”
येशू त्याला म्हणतो,
“मी इतका दीर्घकाळ तुमच्याबरोबर आहे आणि, फिलिपा, तू मला ओळखीत नाहीस? ज्यानं मला पाहिलं आहे त्यानं पित्याला पाहिलं आहे; आणि ‘आम्हाला पिता दाखवा’ असं कसं म्हणतोस? १०मी पित्यात आहे, आणि पिता माझ्यात आहे, ह्यावर तू विश्वास ठेवीत नाहीस काय? मी जे शब्द तुमच्याशी बोलतो ते मी स्वतःचे बोलत नाही; पण माझ्यात राहणारा पिता स्वतःची कामं करतो. ११तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की, मी पित्यात आहे आणि पिता माझ्यात आहे; किंवा ह्या कामांकरता तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा.
१२“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तोपण मी करतो ती कामं करील. आणि, ह्यांहून अधिक मोठ्या गोष्टी करील, कारण मी पित्याकडे जात आहे, १३आणि माझ्या नावानं तुम्ही जे काही मागाल ते पुत्राद्वारे पित्याचं गौरव व्हावं म्हणून मी करीन. १४माझ्या नावानं तुम्ही काही मागाल तर ते मी करीन.
१५“तुम्ही माझ्यावर प्रीती करता तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. १६मी पित्याला विनंती करीन, आणि, तो तुमच्याबरोबर सर्वकाळ राहायला दुसरा कैवारी तुम्हाला देईल. १७तो सत्याचा आत्मा आहे; जग त्याला पहात नाही आणि ओळखीत नाही म्हणून ते त्याचा स्वीकार करू शकत नाही. पण तो तुमच्याबरोबर राहतो, म्हणून तुम्ही त्याला ओळखता, आणि तो तुमच्यात राहील.
१८“मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन. १९आणखी थोडा वेळ, आणि जग मला पुढं पाहणार नाही. पण तुम्ही मला पहाल; कारण मी जिवंत आहे, आणि तुम्हीही जिवंत असाल. २०त्या दिवशी तुम्हाला समजेल की, मी माझ्या पित्यात आहे, तुम्ही माझ्यात आहा, आणि मी तुमच्यात आहे. २१ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करतो. आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; आणि मी त्याच्यावर प्रीती करीन आणि स्वतः त्याला प्रगट होईन.”
२२यहुदा त्याला म्हणतो (इस्कार्योत नव्हे),
“प्रभू, असं काय झालं की, आपण आम्हाला प्रगट व्हाल आणि जगाला नाही?”
२३येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“कोणीही माझ्यावर प्रीती करील तर तो माझं वचन पाळील; आणि त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; आणि आम्ही त्याच्याकडे येऊ, आणि त्याच्याकडे आमचं वसतीचं ठिकाण करू. २४जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचनं पाळीत नाही. आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझं नाही पण ज्यानं मला धाडलं त्या पित्याचं आहे.
२५“मी तुमच्याबरोबर रहात असताना मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. २६पण पिता ज्याला माझ्या नावानं धाडील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी शिकवील; आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात त्या सर्व गोष्टींची तुम्हाला आठवण देईल. २७मी तुम्हाला शांती ठेवतो; माझी शांती तुम्हाला देतो. जग देतं तशी मी तुम्हाला देत नाही; तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका, किंवा भयभीत होऊ देऊ नका. २८तुम्ही ऐकलंत की, मी तुम्हाला म्हणालो, ‘मी जातो आणि तुमच्याकडे परत येईन.’ तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असता तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्ही आनंद केला असता, कारण पिता माझ्यापेक्षा मोठा आहे. २९आणि आता, ते होण्याअगोदर, मी तुम्हाला सांगितलं आहे, म्हणजे ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा. ३०मीतुमच्याशी, ह्यापुढं, फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिपती येत आहे, आणि माझ्यात त्याला काही नाही. ३१पण मी पित्यावर प्रीती करतो, आणि पित्यानं मला आज्ञा दिली तसं मी करतो, हे जगाला समजलं पाहिजे. उठा, इथून चला.    

—–योहान १५—–

“मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. तो माझ्यातला, फळ न देणारा, प्रत्येक फाटा काढून टाकतो. आणि फळ देणार्‍या प्रत्येक फाट्यानं अधिक फळ द्यावं म्हणून तो त्याला स्वच्छ करतो. मी तुम्हाला सांगितलेल्या वचनांमुळं, आता, तुम्ही स्वच्छ आहा. तुम्ही माझ्यात रहा, आणि मी तुमच्यात राहीन, फाटा वेलीत राहिल्याशिवाय त्याला स्वतः फळ देता येत नाही, तसंच तुम्हालाही माझ्यात राहिल्याशिवाय येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा; जो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यावाचून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यात राहिला नाही, तर तो फाट्यासारखा फेकला जातो, आणि वाळून जातो. ते गोळा करून अग्नीत टाकतात आणि जाळतात. जर तुम्ही माझ्यात राहिला आणि माझी वचनं तुमच्यात राहिली तर तुम्ही इच्छीत असाल ते मागा आणि तुमच्यासाठी ते केलं जाईल. तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानं माझ्या पित्याचं गौरव होतं; आणि तुम्ही त्यायोगे माझे शिष्य व्हाल. पित्यानं माझ्यावर प्रीती केली तशीच मी तुमच्यावर प्रीती केली; तुम्ही माझ्या प्रीतीत रहा. १०मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळल्यात आणि त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत रहाल. ११माझा आनंद तुमच्यात रहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी हे तुमच्याशी बोलतो.
१२‘माझी आज्ञा ही आहे की, मी तुमच्यावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. १३आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा ह्याहून मोठी प्रीती कोणाच्याजवळ नाही. १४मी तुम्हाला ज्या गोष्टींची आज्ञा देतो त्या तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. १५मी तुम्हाला आतापासून दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला कळत नाही; पण मी तुम्हाला मित्र म्हटलं आहे, कारण मी जे पित्याकडून ऐकलं आहे ते मी तुम्हाला कळवलं आहे. १६तुम्ही मला निवडलं नाही, पण मी तुम्हाला निवडलं आहे आणि नेमलं आहे; माझा हेतू हा आहे की, तुम्ही जावं, पुष्कळ फळ द्यावं, तुमचं फळ रहावं, आणि तुम्ही माझ्या नावानं पित्याजवळ जे काही मागाल ते त्यानं तुम्हाला द्यावं. १७तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टींची आज्ञा देतो.
१८“जग तुमचा द्वेष करीत आहे तर तुम्ही जाणता की, त्यानं तुमचा द्वेष करायच्या अगोदर माझा द्वेष केला. १९जर तुम्ही जगाचे असता तर जगाला त्याचे स्वतःचे आवडले असते. पण तुम्ही जगाचे नाही, पण मी तुम्हाला जगातून निवडलं आहे म्हणून जग तुमचा द्वेष करीत आहे. २०मी तुम्हाला जे म्हटलं की, ‘दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही’ त्या वचनाची आठवण ठेवा. त्यांनी माझा पाठलाग केला असेल तर ते तुमचा पाठलाग करतील; त्यांनी माझं वचन पाळलं असेल तर ते तुमचंपण पाळतील. २१पण ते माझ्या नावामुळं हे सगळं तुम्हाला करतील; कारण ज्यानं मला धाडलं त्याला ते ओळखीत नाहीत. २२मी जर आलो नसतो आणि त्यांच्याशी बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसतं, पण आता त्यांच्या पापाबद्दल त्यांच्याजवळ बहाणा नाही. २३जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. २४जर दुसर्‍या कोणी केली नाहीत अशी कामं मी त्यांच्यात केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसतं. पण आता पाहूनही, त्यांनी माझा आणि माझ्या पित्याचा द्वेष केला. २५पण ’त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’ हे त्यांच्या नियमशास्त्रात जे वचन लिहिलं आहे ते पूर्ण व्हावं म्हणून हे होत आहे. २६पण मी ज्याला पित्याकडून तुमच्याकडे धाडीन तो कैवारी म्हणजे पित्यापासून निघणारा सत्याचा आत्मा जेव्हा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. २७आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही प्रारंभापासून माझ्याबरोबर आहा.”       

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s