John 16-21

संत योहान ह्याचे शुभवर्तमान

—–योहान १६—–

“तुम्हाला अडथळा होऊ नये म्हणून मी ह्या गोष्टी तुमच्याशी बोललो. ते तुम्हाला सभास्थानबहिष्कृत करतील; पण अशी घटका येत आहे की, तेव्हा जो कोणी तुमचा वध करील तो देवाला सेवा अर्पण करीत आहे असे समजेल. ते हे तुम्हाला करतील, कारण त्यांनी पित्याला आणि मला ओळखलं नाही.
“पण मी तुम्हाला ह्या गोष्टी ह्याकरता सांगितल्यात की, मी तुम्हाला ह्याविषयी बोललो ह्याची, ती घटका येईल तेव्हा तुम्हाला आठवण व्हावी. मी तुम्हाला, प्रारंभापासून, ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्याबरोबर होतो. पण ज्यानं मला धाडलं त्याच्याकडे मी आता, जातो आणि तुमच्यातला कोणीही मला विचारीत नाही, ‘तू कुठं जातोस?’ पण मी ह्या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळं तुमचं मन दुःखानं भरलं आहे. तरीपण मी तुम्हाला खरं सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचं आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे धाडीन; आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी खातरी पटवील. पापाविषयी; कारण ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत. १०नीतिमत्वाविषयी; कारण मी माझ्या पित्याकडे जातो, आणि पुढं तुम्ही मला पाहणार नाही. ११आणि न्यायाविषयी; कारण ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय होत आहे.
१२“मला तुम्हाला अजून पुष्कळ गोष्टी सांगायच्यात, पण तुम्ही आता त्या सहन करू शकणार नाही. १३पण तो सत्याचा आत्मा आल्यावर तो तुम्हाला सर्व सत्यात वाट दाखवून नेईल कारण तो स्वतःचं सांगणार नाही; तो जे ऐकेल ते तो सांगेल आणि येणार्‍या गोष्टी तुम्हाला विदित करील. १४तो माझं गौरव करील, कारण तो माझ्यातून घेईल आणि तुम्हाला प्रगट करील. १५जे सर्व काही पित्याजवळ आहे ते माझं आहे; म्हणून मी म्हटलं, तो माझ्यामधून घेईल आणि तुम्हाला प्रगट करील.
१६“थोडा वेळ, आणि तुम्ही मला पाहणार नाही; आणि पुन्हा, थोडा वेळ आणि तुम्ही मला पहाल.”
१७तेव्हा त्याच्या शिष्यांतले कित्येक एकमेकांत म्हणाले,
“हा हे आपल्याला काय म्हणतो? ‘थोडा वेळ, आणि तुम्ही मला पाहणार नाही, आणि पुन्हा, थोडा वेळ आणि तुम्ही मला पहाल;’ आणि, ‘कारण मी पित्याकडे जातो.’ ”
१८म्हणून ते म्हणाले,
“हा ‘थोडा वेळ’ हे काय म्हणतो? हा काय बोलतो ते कळत नाही.”
१९तेव्हा येशूने ओळखले की, ह्यांची आपल्याला विचारायची इच्छा आहे,  आणि तो त्यांना म्हणाला,
“मी म्हटले की, थोडा वेळ, आणि तुम्ही मला पाहणार नाही, आणि पुन्हा, थोडा वेळ, आणि तुम्ही मला पहाल, ह्याविषयी एकमेकांत प्रश्न करता काय? २०मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, तुम्ही रडाल आणि आक्रोश कराल, पण जग आनंद करील. तुम्ही दुःखित व्हाल, पण तुमच्या दुःखाचा आनंद होईल. २१स्त्री प्रसूत व्हायची असते तेव्हा तिला दुःख असतं, कारण तिची घटका आलेली असते; पण मूल जन्मल्याबरोबर जगात एक मनुष्य जन्मला आहे, ह्या आनंदामुळं तिला ते दुःख आठवत नाही. २२आणि म्हणून, आता तुम्हाला दुःख आहे; पण मी तुम्हाला पाहीन, आणि तुमचं मन आनंदित होईल, आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणी हिरावणार नाही. २३आणि त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, तुम्ही माझ्या नावानं पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला देईल. २४अजून तुम्ही माझ्या नावानं काही मागितलं नाही; तुम्ही मागा, आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून तुम्हाला मिळेल.

२५“ह्या गोष्टी मी तुमच्याशी दाखल्यांत बोललो आहे; पण जेव्हा मी तुमच्याशी दाखल्यांत बोलणार नाही पण मी तुम्हाला उघडपणे पित्याविषयी सांगेन अशी घटका येत आहे. २६त्या दिवशी तुम्ही माझ्या नावानं मागाल; आणि मी तुम्हाला म्हणत नाही की, मी पित्याला तुमच्यासाठी विनंती करीन; २७कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि विश्वास ठेवला आहे की, मी देवाकडून आलो आहे. २८मी पित्याकडून निघालो आणि जगात आलो; पुन्हा, मी जग सोडतो आणि पित्याकडे जातो.”
२९त्याचे शिष्य त्याला म्हणाले,
“बघा, आता आपण उघडपणे बोलत आहा, दाखला सांगत नाही. ३०आता आम्हाला कळलं आहे की, आपल्याला सर्व काही कळतं आणि कोणी आपल्याला विचारावं ह्याची आपल्याला गरज नाही. ३१ह्यावरून आम्ही विश्वास ठेवतो की, आपण देवाकडून आलात.”
येशूने त्यांना उत्तर दिले,
“तुम्ही आता विश्वास ठेवता काय? ३२बघा, जेव्हा पांगाल, प्रत्येक जण आपल्या घरी, आणि मला एकटा सोडाल अशी घटका येत आहे, हो, आता आली आहे; पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. ३३तुम्हाला माझ्या ठायी शांती मिळावी म्हणून मी ह्या गोष्टी तुमच्याशी बोललो आहे. जगात तुमच्यावर दुःख येईल; पण धीर धरा, मी जगाला जिकलं आहे.”

—–योहान १७—–

येशू हे बोलला, आणि त्याने वर आकाशाकडे डोळे लावून म्हटले,
“बापा, घटका आली आहे; पुत्रानं तुझं गौरव करावं म्हणून तुझ्या पुत्राचं गौरव कर. कारण, तू जे त्याला दिले आहेस त्या सर्वांना त्यानं सनातन जीवन द्यावं म्हणून तू त्याला सर्व मनुष्यांवर अधिकार दिला आहेस. त्यांनी जो तू एकच, खरा देव त्या तुला, आणि तू ज्याला पाठवलंस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं हे सनातन जीवन आहे. तू जे काम मला करायला दिलंस ते पूर्ण करून मी तुला पृथ्वीवर गौरवलं आहे. आणि आता, बापा, हे जग होण्याआधी मला जे तुझ्याजवळ होतं त्या गौरवात तुझ्याजवळ माझं गौरव कर.
“तू जे मला जगात दिलेस त्यांना मी तुझं नाव प्रगट केलं. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस, आणि त्यांनी तुझं वचन पाळलं आहे. त्यांना आता समजलं आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्याकडून आहेत. कारण तू मला जी वचनं दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; आणि त्यांनी स्वीकारली, त्यांना खरोखर समजलं की, मी तुझ्याकडून आलो, आणि त्यांनी विश्वास ठेवला की, तू मला पाठवलंस. मी त्यांच्यासाठी विनंती करतो, जगासाठी नाही; पण तू जे मला दिलेस त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत. १०आणि माझे सर्व तुझे आहेत आणि तुझे माझे आहेत, आणि त्यांच्या ठायी माझं गौरव झालं आहे. ११आणि आता, ह्यापुढं मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येतो. पवित्र बापा, तू जे मला दिलेस त्यांना तू आपल्या नावात राख, म्हणजे आपण एक आहोत तसं त्यांनीही एक व्हावं. १२तू जे मला दिलेस त्यांना, मी त्यांच्याबरोबर होतो तेव्हा, तुझ्या नावात राखलं; मी त्यांचं रक्षण केलं, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून एकही बहकला नाही. हे शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून झालं. १३आणि आता मी तुझ्याकडे येतो. आणि, त्यांच्या ठायी पूर्ण झालेला माझा आनंद त्यांना मिळावा म्हणून मी हे जगात बोलतो. १४मी त्यांना तुझं वचन दिलं आहे, आणि जगानं त्यांचा द्वेष केला आहे; कारण मीही जगाचा नाही तसे ते जगाचे नाहीत. १५तू त्यांना जगातून काढून घ्यावंस अशी मी विनंती करीत नाही, पण त्यांना वाइटापासून राखावंस. १६जसा मीही जगाचा नाही, तसे ते जगाचे नाहीत. १७तू त्यांना सत्यात समर्पित कर. तुझं वचन हे सत्य आहे. १८तू मला जगात पाठवलंस तसंच मी त्यांना जगात पाठवलं आहे. १९आणि तेही सत्यात समर्पित केले जावेत म्हणून त्यांच्याकरता मी स्वतःला समर्पित करतो.
२०“मी केवळ त्यांच्यासाठी विनंती करीत नाही, पण त्यांच्या शब्दावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतील त्यांच्यासाठीही विनंती करतो २१की, त्या सर्वांनी एक व्हावं – बापा, जसा तू माझ्यात आहेस आणि मी तुझ्यात आहे तसं त्यांनीही एक व्हावं – आणि जगानं विश्वास ठेवावा की, तू मला पाठवलं आहेस. २२तू जे गौरव मला दिलंस ते मी त्यांना दिलं आहे, ह्यासाठी की, आपण जसे एक आहो तसं त्यांनी एक व्हावं – २३मी त्यांच्यात आणि तू माझ्यात – ह्यासाठी की, एकात पूर्ण झालेले व्हावं; आणि, जगाला समजावं की, तू मला पाठवलंस, आणि माझ्यावर प्रीती केलीस तशीच त्यांच्यावर प्रीती केलीस. २४बापा, माझी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेस त्यांनीही मी असेन तिथं माझ्याबरोबर असावं, ह्यासाठी की, तू मला दिलेलं माझं गौरव त्यांनी पहावं; कारण जगाच्या स्थापनेअगोदर तू माझ्यावर प्रीती केलीस.
२५“नीतिमान बापा, जगानं तुला ओळखलं नाही, पण मी तुला ओळखतो; आणि ह्यांनी ओळखलं आहे की, तू मला पाठवलंस. २६मी त्यांना तुझं नाव कळवलं आहे आणि मी कळवीन, ह्यासाठी की, तू ज्या प्रीतीनं माझ्यावर प्रीती केलीस ती त्यांच्यात असावी आणि मी त्यांच्यात असावं.”      

—–योहान १८—–

हे बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहोळाच्या दुसर्‍या बाजूस आला. तेथे एक बाग होती; आणि तो आत गेला – तो स्वतः व त्याचे शिष्य – आणि ज्या यहुदाने त्याला धरून दिले त्यालापण ते ठिकाण माहीत होते. कारण तेथे येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर जात असे. आता यहुदाला वरिष्ठ याजक व परोशी ह्यांच्याकडून एक शिपायांची तुकडी व कामदार मिळाल्यावर, तो दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे येतो.
येशूला आपल्यावर येणार्‍या सर्व गोष्टी माहीत असल्यामुळे तो पुढे गेला आणि त्यांना म्हणाला,
“तुम्ही कोणाला शोधता?”
त्यांनी त्याला उत्तर दिले,
“नासोरी येशूला.”
तो त्यांना म्हणाला,
“मी तो आहे.”
आणि ज्या यहुदाने त्याला धरून दिले तोपण त्यांच्याबरोबर उभा होता. आणि जेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘मी तो आहे’ तेव्हा ते मागे सरले आणि जमिनीवर पालथे पडले. मग त्याने त्यांना पुन्हा विचारले,
“तुम्ही कोणाला शोधता?”
आणि ते म्हणाले,
“नासोरी येशूला.”
येशूने उत्तर दिले,
“मी तुम्हाला सांगितलं, मी तो आहे; म्हणून मला शोधीत असला तर ह्यांना जाऊ द्या.”
म्हणजे, ‘तू जे मला दिलेस त्यांच्यातला एकपण मी गमावला नाही’ असे तो जे बोलला होता ते वचन पूर्ण व्हावे.
१०तेव्हा शिमोन पेत्राजवळ तरवार असल्याने त्याने ती उपसली व श्रेष्ठ याजकाच्या दासावर वार करून त्याचा उजवा कान कापून टाकला. आता त्या दासाचे नाव मल्ख होते. ११तेव्हा येशू पेत्राला म्हणाला,
“तरवार म्यानात घाल. पित्यानं मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय?”

१२तेव्हा शिपायांची तुकडी व सेनापती आणि यहुद्यांचे कामदार हे येशूला धरून बांधून, १३प्रथम हन्नाकडे घेऊन गेले. कारण, त्या वर्षी कयफा हा जो श्रेष्ठ याजक होता त्याचा हा सासरा होता, १४आणि ह्याच कयफाने यहुद्यांना मसलत दिली होती की, एका मनुष्याने लोकांसाठी मरावे हे हिताचे आहे.
१५तेव्हा शिमोन पेत्र येशूच्या मागोमाग गेला; तसाच दुसरा एक शिष्य गेला. तो शिष्य श्रेष्ठ याजकाच्या ओळखीचा होता, आणि येशूबरोबर श्रेष्ठ याजकाच्या वाड्यात गेला. १६पण पेत्र बाहेर, दाराशी उभा राहिला. म्हणून, तो श्रेष्ठ याजकाच्या ओळखीचा दुसरा शिष्य बाहेर आला,  द्वारपालिकेशी बोलला आणि पेत्राला आत घेऊन आला. १७तेव्हा जी दासी द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणते,
“तूपण ह्या मनुष्याच्या शिष्यांतला आहेस काय?”
तो म्हणाला,
“मी नाही.”
१८तेथे जे दास व कामदार उभे होते त्यांनी थंडी असल्यामुळे कोळशांची आगटी केली होती, आणि ते शेकत होते. आणि पेत्रपण त्यांच्याबरोबर शेकत उभा होता.
१९मग श्रेष्ठ याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिक्षणाविषयी प्रश्न केले. २०येशूने त्याला उत्तर दिले,
“मी जगाशी उघडपणे बोललो, मी नेहमी सभास्थानात आणि मंदिरात,  जिथं यहुदी नेहमी असतात, तिथं शिकवलं. आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही. २१आपण मला कशाला विचारता? जे माझं ऐकत असत त्यांना मी काय सांगितलं ते त्यांना विचारा. बघा, मी काय बोललो हे त्यांना माहीत आहे.”
२२तो असे बोलताच जवळ उभ्या असलेल्या कामदारांमधून एकाने त्याला थप्पड दिली व म्हटले,
“तू श्रेष्ठ याजकांना असं उत्तर देतोस काय?”
२३येशूने त्याला उत्तर दिले,
“मी वाईट बोललो असलो तर वाइटाविषयी साक्ष दे; पण बरोबर बोललो असलो तर तू मला का मारतोस?”
२४आता हन्नाने त्याला श्रेष्ठ याजक कयफा ह्याच्याकडे बांधून पाठवले.
२५आणि शिमोन पेत्र शेकत उभा होता; तेव्हा ते त्याला म्हणाले,
“तूपण त्याच्या शिष्यांतला आहेस काय?”
त्याने नाकारले व म्हटले,
“मी नाही.”
२६पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला, श्रेष्ठ याजकाच्या दासांतला एक जण म्हणतो,
“मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही बघितलं काय?”
२७तेव्हा पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लगेच, कोंबडा आरवला.

२८तेव्हा ते येशूला कयफाकडून वाड्यात नेतात; तेव्हा सकाळ होती आणि विटाळ होऊ नये, पण वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः वाड्यात गेले नाहीत. २९म्हणून पिलात त्यांच्याकडे बाहेर गेला आणि म्हणाला,
“तुम्ही ह्या मनुष्याविरुद्ध काय आरोप आणता?”
३०त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“तो वाईट करणारा नसता तर आम्ही त्याला आपल्या हाती दिलं नसतं.”
३१म्हणून पिलात त्यांना म्हणाला,
“त्याला तुम्हीच घ्या, आणि तुम्ही तुमच्या नियमशास्त्रानुसार त्याचा न्याय करा.”
यहुदी त्याला म्हणाले,
“आम्हाला मरणाची शिक्षा द्यायची मोकळीक नाही.”
३२तो कोणत्या मरणाने मरणार होता हे प्रगट करायला येशू बोलला होता ते वचन पूर्ण व्हावं म्हणून हे झाले.
३३म्हणून पिलात पुन्हा वाड्यात गेला; आणि त्याने येशूला बोलावले आणि म्हटले,
“तू यहुद्यांचा राजा आहेस काय?”
३४येशूने उत्तर दिले,
“आपण स्वतः हे म्हणता किवा दुसर्‍यांनी आपल्याला माझ्याविषयी हे सांगितलं?”
३५पिलाताने उत्तर दिले,
“मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि वरिष्ठ याजकांनी तुला माझ्या हाती दिलं; तू काय केलंस?”
३६येशूने उत्तर दिले,
“माझं राज्य ह्या जगातलं नाही. माझं राज्य ह्या जगातलं असतं तर यहुद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझे कामदार लढले असते; पण माझं राज्य आता इथलं नाही.”
३७म्हणून पिलात त्याला म्हणाला,
“तर तू राजा आहेस काय?”
येशूने उत्तर दिले,
“मी राजा आहे असं आपण म्हणता. मी सत्याची साक्ष द्यावी ह्याकरता मी जन्मास आलो, आणि ह्याकरता मी जगात आलो. जो कोणी सत्याचा आहे तो माझा आवाज ऐकतो.”
३८पिलात त्याला म्हणतो,
“सत्य काय आहे?”
आणि हे म्हटल्यावर तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला,
“मला त्याच्यात काही अपराध आढळत नाही. ३९पणतुमच्यासाठी वल्हांडणात मी एकाला सोडावं अशी तुमच्यात प्रथा आहे; तर तुमच्यासाठी मी यहुद्यांच्या राजाला सोडावं अशी तुमची इच्छा आहे काय?”
४०तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले,
“ह्याला नाही, पण बरब्बाला.”
आता बरब्बा एक लुटारू होता.     

—–योहान १९—–

म्हणून मग पिलाताने येशूला घेतले आणि फटके मारवले. तेव्हा शिपायांनी एक काट्यांचा मुगुट गुंफून त्याच्या मस्तकावर घातला आणि त्याला एक जांभळा झगा पेहरवला. ते त्याच्यापुढे येऊ लागले आणि म्हणू लागले,
“जयजय! यहुद्यांचे राजे!”
आणि त्यांनी त्याला थपडा दिल्या.
म्हणून पिलात पुन्हा बाहेर गेला, आणि त्यांना म्हणतो,
“बघा, मला त्याच्यात काही अपराध आढळत नाही, हे तुम्हाला समजावं म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. तेव्हा काट्यांचा मुगुट व जांभळा झगा घातलेला येशू बाहेर आला. आणि पिलात त्यांना म्हणतो,
“बघा, हा मनुष्य!”
म्हणून वरिष्ठ याजक व कामदार त्याला बघून ओरडत म्हणतात,
“वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.”
पिलात त्यांना म्हणतो,
“त्याला तुम्हीच घ्या, आणि वधस्तंभावर खिळा; कारण मला त्याच्यात काही अपराध आढळत नाही.”
यहुद्यांनी त्याला उत्तर दिले,
“आमच्याकडे एक नियम आहे आणि आमच्या नियमशास्त्रानुसार हा मेला पाहिजे; कारण ह्यानं स्वतःला देवाचा पुत्र केलं.”
म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकले तेव्हा तो अधिकच भ्याला; आणि पुन्हा वाड्यात गेला व येशूला म्हणाला,
“तू कुठला आहेस?”
पण येशूने त्याला उत्तर दिले नाही. १०तेव्हा पिलात त्याला म्हणतो,
“तू माझ्याशी बोलत नाहीस? मला तुला सोडून द्यायचा अधिकार आहे, आणि वधस्तंभावर खिळायचा अधिकार आहे हे तुला माहीत नाही काय?”
११येशूने त्याला उत्तर दिले,
“आपल्याला तो वरून दिलेला नसता तर आपल्याला माझ्यावर अधिकार नसता, म्हणून ज्यानं मला आपल्या हाती दिलं त्याचं पाप मोठं आहे.”

१२ह्यावरून पिलाताने त्याला सोडायचा प्रयत्न केला, पण यहुदी ओरडून म्हणाले,
“आपण जर ह्याला सोडलंत तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला नाकारतो.”
१३म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकल्यावर येशूला बाहेर आणले. आणि ज्या जागेला फरशी म्हणतात (पण इब्री भाषेत गब्बाथा म्हणतात) तेथे तो न्यायासनावर बसला.
१४तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता. आणि तेव्हा सुमारे सहावा तास होता. आणि तो यहुद्यांना म्हणतो,
“बघा, तुमचा राजा!”
१५पण ते ओरडले,
“वाट लावा, वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा.”
पिलात त्यांना म्हणतो,
“मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळू काय?”
वरिष्ठ याजकांनी उत्तर दिले,
“आम्हाला कैसराशिवाय राजा नाही.”
१६म्हणून मग, त्याने त्याला वधस्तंभावर खिळायला त्यांच्या हाती दिले.

१७तेव्हा त्यांनी येशूला घेतले आणि तो आपला वधस्तंभ घेऊन ‘कवटीचे ठिकाण’ म्हटलेल्या ठिकाणापर्यंत गेला. ह्याला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. १८त्याठिकाणी त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना वधस्तंभावर खिळले – प्रत्येक बाजूस एकाला, आणि येशूला मध्यभागी – १९आणि पिलाताने एक फलक लिहिला व तो वधस्तंभावर लावला; त्यावर लिहिले होत,
‘यहुद्यांचा राजा नासरेथकर येशू’
२०आणि यहुद्यांतल्या पुष्कळांनी तो फलक वाचला. कारण येशूला जेथे वधस्तंभावर खिळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. तो इब्री, रोमी व हेल्लेणी भाषांत लिहिला होता. २१तेव्हा यहुद्यांचे श्रेष्ठ याजक पिलाताला म्हणाले,
“ ‘यहुद्यांचा राजा’ असं लिहू नका पण ‘ह्याने म्हटले मी यहुद्यांचा राजा आहे’ असं लिहा.”
२२पिलाताने उत्तर दिले,
“मी लिहिलं ते लिहिलं.”
२३मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले; आणि झगाही घेतला. ह्या झग्याला शिवण नव्हती; तो वरपासून थेट विणलेला होता. २४म्हणून ते आपआपल्यात म्हणाले,
“आपण हा फाडू नये; पण तो कोणाचा होईल म्हणून त्याकरता चिठ्या टाकू.”
हे ह्यासाठी झाले की,
 ‘त्यांनी माझे कपडे आपल्यात वाटून घेतले,
आणि माझ्या झग्याकरता
त्यांनी चिठ्या टाकल्या,’
हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा; म्हणून शिपायांनी ह्या गोष्टी केल्या.

२५पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याच्या आईची बहीण व क्लोपाची बायको मरिया आणि मग्दाली मरिया ह्या उभ्या होत्या. २६येशूने जेव्हा आपल्या आईला व तो ज्या शिष्यावर प्रीती करीत असे त्याला जवळ उभे असलेले बघितले तेव्हा तो आपल्या आईला म्हणतो,
“बाई, बघ, तुझा पुत्र!’
२७मग तो त्या शिष्याला म्हणतो,
“बघ, तुझी आई!”
आणि त्या शिष्याने तिला त्या घटकेपासून आपल्याकडे घेतले.
२८मग, आता सर्व पूर्ण झाले आहे, हे येशू जाणत असल्यामुळे, (शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून) म्हणतो,
“मला तहान लागली आहे.”
२९तेथे, एक आंबेने भरलेले भांडे ठेवलेले होते, आणि त्यांनी आंबेने भरलेला एक बोळा एका एजोबाच्या फांदीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. ३०येशूने आंब घेतल्यावर म्हटले,
“पूर्ण झाले.”
आणि आपले मस्तक लववून त्याने प्राण सोडला.
३१तो तयारीचा दिवस होता, आणि शब्बाथ दिवशी वधस्तंभावर शरिरे राहू नयेत (कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता) म्हणून यहुद्यांनी पिलाताला विनंती केली की, त्यांचे पाय तोडून त्यांना काढून घ्यावे. ३२तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसर्‍याचे पाय तोडले. ३३आणि ते जेव्हा येशूकडे आले, आणि तो मेला होता हे त्यांनी बघितले, तेव्हा त्याचे पाय त्यांनी तोडले नाहीत. ३४तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत विधले; आणि,  लगेच,  रक्त व पाणी बाहेर आले.
३५आणि हे ज्याने पाहिले त्याने तुम्हीही विश्वास ठेवावा म्हणून साक्ष दिली आहे. आणि त्याची साक्ष खरी आहे; आणि तो खरे सांगत आहे हे त्याला माहीत आहे. ३६कारण,
‘त्याचे एक हाड मोडणार नाही,’
हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी झाल्या. ३७आणि दुसरा एक शास्त्रलेख पुन्हा म्हणतो,
‘त्यांनी ज्याला विधले त्याच्याकडे ते पाहतील.’

३८ह्यानंतर, जो अरिमथाईचा योसेफ येशूचा शिष्य होता, पण यहुद्यांच्या भीतीमुळे गुप्तपणे झाला होता, त्याने आपल्याला येशूचे शरीर नेता यावे म्हणून पिलाताला विनंती केली व पिलाताने त्याला परवानगी दिली. म्हणून तो आला आणि त्याने येशूचे शरीर घेतले. ३९आणि, जो त्याच्याकडे रात्रीचा आला होता तो निकदेमही तेथे आला; त्याने गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे शंभर मापे मिश्रण आणले. ४०मग त्यांनी येशूचे शरीर घेतले, आणि यहुद्यांच्या पुरायच्या रीतीप्रमाणे त्यांनी ते मसाल्यांसहित तागाच्या वस्त्रात गुंडाळले. ४१त्याला ज्या ठिकाणी वधस्तंभावर खिळले होते तेथे एक बाग होती; आणि त्या बागेत एक नवे थडगे होते; त्यात कोणाला कधीही ठेवलेले नव्हते. ४२म्हणून त्यांनी, तो यहुद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे व ते थडगे जवळ असल्यामुळे, त्यात येशूला ठेवले.

—–योहान २०—–

आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सकाळी अजून अंधार असताना, मग्दाली मरिया थडग्याकडे येते; आणि थडग्यावरून शिळा काढलेली पाहते. तेव्हा ती धावत निघते आणि शिमोन पेत्राकडे व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसर्‍या शिष्याकडे येते व म्हणते,
“त्यांनी प्रभूला थडग्यातून काढून नेलं आणि त्याला कुठं ठेवलं हे आम्हाला माहीत नाही.”
म्हणून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर निघून थडग्याकडे आले. म्हणून ते दोघे जण बरोबर धावत निघाले;पण तो दुसरा शिष्य पेत्राच्या पुढे धावत गेला व थडग्याजवळ प्रथम आला. आणि तो ओणवला तेव्हा त्याने तागाची वस्त्रे ठेवलेली पाहिली. पण तो आत गेला नाही. त्याच्या मागोमाग येत असलेला शिमोन पेत्र तेव्हा येतो; आणि तो थडग्यात गेला; आणि तागाची वस्त्रे ठेवलेली पाहतो व त्याच्या डोक्याभोवतालचा रुमाल त्या तागाच्या वस्त्रांबरोबर ठेवलेला नाही, पण एका जागी वेगळा गुंडाळून ठेवलेला पाहतो. तेव्हा जो थडग्याशी प्रथम आला होता तो दुसरा शिष्य आत गेला व त्याने बघितले आणि विश्वास ठेवला. कारण त्याने मेलेल्यांतून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना अजून कळला नव्हता. १०मग ते शिष्य पुन्हा आपल्या घरी गेले.
११पण मरिया थडग्याजवळ बाहेर रडत उभी राहिली, आणि ती रडत असता थडग्यात ओणवली; १२आणि येशूचे शरीर आधी ठेवलेले होते तेथे तिने दोन देवदूत पाहिले; ते शुभ्र वस्त्रे परिधान करून बसले होते – एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायांकडील बाजूस – १३आणि ते तिला म्हणतात,
“बाई, तू का रडतेस?”
ती त्यांना म्हणते,
“कारण त्यांनी माझ्या प्रभूला काढून नेलं, आणि त्याला कुठं ठेवलं ते मला माहीत नाही.”
१४ती एवढे बोलल्यावर मागे वळली, आणि उभ्या असलेल्या येशूला पाहते; पण तो येशू आहे हे तिला समजले नाही.  १५येशू तिला म्हणतो,
“बाई, तू का रडतेस? तू कुणाला शोधतेस?”
ती त्याला माळी समजून त्याला म्हणते,
“महाराज, तुम्ही त्याला इथून नेलं असेल तर कुठं ठेवलंत ते मला सांगा म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”
१६येशू तिला म्हणतो,
“मरिये,”
ती वळते व इब्री भाषेत त्याला म्हणते,
“रब्बोनी,” (म्हणजे गुरू)
१७येशू तिला म्हणतो,
“मला धरू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; पण माझ्या बांधवांकडे जा, आणि त्यांना सांग, ‘जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.’ ”
१८मग्दाली मरिया गेली आणि तिने ‘मी प्रभूला पाहिले’ आणि तो तिच्याशी ह्या गोष्टी बोलला हे शिष्यांना सांगितले.

१९तेव्हा त्याच दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी,  यहुद्यांच्या भीतीमुळे, शिष्य जेथे जमले होते तेथील दारे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला; आणि त्यांना म्हणतो,
“तुम्हाला शांती असो.”
२०आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात दाखवले आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले २१तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला,
“तुम्हाला शांती असो. जसं पित्यानं मला पाठवलं तसंच मी तुम्हाला धाडतो.”
२२एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणतो,
“पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. २३तुम्ही ज्यांची पापं सोडाल त्यांना ती सोडलेली आहेत आणि ज्यांची ठेवाल ती ठेवलेली आहेत.”

२४पण येशू आला असताना, बारांतला एक, ज्याला दिदुम म्हणत तो थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. २५म्हणून दुसरे शिष्य त्याला म्हणाले,
“आम्ही प्रभूला पाहिलं.”
तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“मी त्याच्या हातांत खिळ्यांची खूण बघितल्याशिवाय, खिळ्यांच्या जागी माझं बोट घातल्याशिवाय, आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही.”

२६आणि पुन्हा, आठ दिवसांनी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दारे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला, आणि म्हणाला,
“तुम्हाला शांती असो.”
२७मग तो थोमाला म्हणतो,
“तुझं बोट पुढं कर, आणि माझे हात बघ; तुझा हात पुढं कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो.”
२८आणि थोमाने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“माझा प्रभू आणि माझा देव!”
२९येशू त्याला म्हणतो,
“तू मला पाहिलंस म्हणून विश्वास ठेवलास. ज्यांनी बघितलं नाही आणि विश्वास ठेवला आहे ते धन्य!”

३०आणि ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली. ३१पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे.

—–योहान २१—–

आणि ह्या गोष्टीनंतर पुन्हा तिबिर्याच्या समुद्राजवळ येशूने शिष्यांना स्वतःस प्रगट केले; आणि अशा प्रकारे स्वतःस प्रगट केले. शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालिलातील काना येथील नथनेल व जब्दीचे पुत्र, आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते. शिमोन पेत्र त्यांना म्हणतो,
“मी मासे धरायला जातो.”
ते त्याला म्हणतात,
“आम्हीपण तुझ्याबरोबर येतो.”
ते बाहेर गेले आणि लगेच एका मचव्यात चढले आणि त्या रात्री त्यांनी काही धरले नाही.
पण आता सकाळ होतेवेळी येशू किनार्‍याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही. तेव्हा येशू त्यांना म्हणतो,
“मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे काय?”
ते त्याला म्हणाले,
“नाही.”
आणि तो त्यांना म्हणाला,
“मचव्याच्या उजवीकडे जाळं टाका आणि तुम्हाला मिळेल.”
म्हणून ते टाकतात, आणि त्यांना माशांच्या घोळक्यामुळे  ते आता ओढवेना.
तेव्हा ज्याच्यावर येशू प्रीती करीत असे तो शिष्य पेत्राला म्हणतो,
“तो प्रभू आहे.”
शिमोन पेत्राने ऐकले की, तो प्रभू आहे, तेव्हा तो उघडा असल्यामुळे त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि समुद्रात उडी टाकली. आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत आले. (कारण ते किनार्‍यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातांवर होते.)
तेव्हा ते किनार्‍यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव पाहतात, आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकर. १०येशू त्यांना म्हणतो,
“तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.”
११तेव्हा शिमोन पेत्र वर गेला व त्याने ते जाळे किनार्‍यावर ओढले. ते मोठ्या माशांनी भरलेले होते. ते एकशे त्रेपन्न होते, आणि ते इतके होते तरी ते जाळे फाटले नव्हते.
१२येशू त्यांना म्हणतो,
“या, जेवा.”
तेव्हा शिष्यांतील कोणीदेखील त्याला विचारू शकला नाही की, ‘आपण कोण आहा?’ कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले होते. १३तेव्हा येशू येतो, भाकर घेतो आणि त्यांना देतो; आणि त्याचप्रमाणे मासळी देतो. १४येशू मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रगट व्हायची ही तिसरी वेळ आहे.
१५मग ते जेवल्यावर येशू शिमोन पेत्राला म्हणतो,
“योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर ह्यांपेक्षा अधिक प्रीती करतोस काय?”
तो त्याला म्हणतो,
“हो, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.”
तो त्याला म्हणतो,
“माझी कोकरं चार.”
१६तो पुन्हा दुसर्‍यांदा त्याला म्हणतो,
“योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?”
तो त्याला म्हणतो,
“हो, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.”
तो त्याला म्हणतो,
“माझी मेंढरं राख.”
१७तो तिसर्‍यांदा त्याला म्हणतो,
“योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?”
पेत्र दुःखी होऊ लागला; कारण तो तिसर्‍यांदा त्याला म्हणाला, ‘तू माझ्यावर प्रीती करतोस काय?’ आणि तो त्याला म्हणाला,
“प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.”
येशू त्याला म्हणतो,
“माझी मेंढरं चार.”
१८“मी तुला सत्य सत्य सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू जर्जर होशील तेव्हा आपले हात पुढं करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.”
१९(तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रगट करायला तो हे बोलला.) आणि हे बोलल्यावर तो त्याला म्हणतो,
“माझ्यामागं ये.”
२०तेव्हा पेत्र मागे वळतो आणि पाहतो की, येशू ज्याच्यावर प्रीती करीत असे तो मागोमाग येत आहे. त्याच शिष्याने भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी लागून म्हटले होते की, ‘प्रभू, तुला धरून देणारा कोण आहे?’ २१म्हणून, त्याला बघून, पेत्र येशूला म्हणतो,
“प्रभू, ह्याचं काय?”
२२येशू त्याला म्हणतो,
“मी येईपर्यंत त्यानं रहावं अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचं तुला काय? तू माझ्यामागं ये.”
२३तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्याला म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण ‘मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?’

२४जो ह्या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे.

२५आणि ह्याशिवाय येशूने केल्या अशा पुष्कळ गोष्टी आहेत; त्या एक एक लिहिण्यात आल्या तर जी पुस्तके लिहिण्यात येतील ती जगातदेखील मावणार नाहीत असे मला वाटते.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s