John 6-10

संत योहान ह्याचे शुभवर्तमान

—–योहान ६—–

ह्यानंतर येशू गालील समुद्राच्या दुसर्‍या बाजूस गेला (हा तिबिर्याचा समुद्र). आणि लोकांचा एक मोठा घोळका त्याच्या मागोमाग गेला; कारण आजारी असलेल्यांवर तो जी चिन्हे करीत होता ती ते पहात होते. मग येशू एका डोंगरावर गेला, आणि तेथे आपल्या शिष्यांबरोबर बसला. आता वल्हांडण हा यहुद्यांचा सण जवळ आला होता.
येशूने डोळे वर केले आणि बघितले की, लोकांचा एक जमाव आपल्याकडे येत आहे. तेव्हा तो फिलिपाला म्हणतो,
“आपण ह्या लोकांना खायला भाकरी कुठून विकत आणणार?”
आणि त्याने हे त्याची परीक्षा करायला म्हटले. कारण तो काय करणार होता हे तो स्वतः जाणत होता. त्याला फिलिपाने उत्तर दिले,
“त्यांच्यातल्या प्रत्येकाला थोडंसं देता यायला दोनशे दिनार किंमतीच्या भाकरी पुरणार नाहीत.”
त्याच्या शिष्यांतला एक जण, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा त्याला म्हणतो,
“इथं एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ पाच जवाच्या भाकरी, आणि दोन मासळ्या आहेत; पण इतक्या लोकांत त्या काय आहेत?”
१०येशू म्हणाला,
“लोकांना बसवा.”
आता त्या जागी पुष्कळ गवत होते. तेव्हा त बसले. ते संख्येने सुमारे पाच हजार पुरुष होते. ११तेव्हा येशूने त्या पाच भाकरी घेतल्या, आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले. १२आणि ते तृप्त झाल्यावर तो आपल्या शिष्यांना म्हणतो,
“उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे कशाचा नाश होऊ नये.”
१३तेव्हा त्यांनी ते गोळा केले, आणि जेवणार्‍यांना अधिक झालेले त्या पाच जवाच्या भाकरींचे तुकडे बारा करंड्यांत भरले. १४आणि त्या लोकांनी ते त्याने केलेले चिन्ह बघितले तेव्हा ते म्हणाले,
“जगात येणार असलेला संदेष्टा खरोखर हा आहे.”
१५म्हणून येशूने जेव्हा ओळखले की, ते आता येतील, आणि आपल्याला राजा करायला बळाने नेतील, तेव्हा तो पुन्हा एका डोंगरावर एकटा गेला.

१६आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले; १७आणि एका मचव्यात चढून समुद्राच्या दुसर्‍या बाजूस कपर्णहूमकडे जाऊ लागले. आता अंधार झाला होता, आणि येशू त्यांच्याकडे आला नव्हता. १८आणि, मोठा वारा वहात असल्यामुळे समुद्र खवळू लागला होता. १९मग त्यांनी सुमारे दोनतीन कोस वल्हवल्यावर ते येशूला समुद्रावरून चालताना व मचव्याकडे जवळ येताना पाहतात; आणि ते भ्याले. २०पण तो त्यांना म्हणतो,
“मी आहे, भिऊ नका.”
२१तेव्हा त्यांना बरे वाटून त्यांनी त्याला मचव्यात घेतले, आणि लगेच, ते जात होते तिकडील किनार्‍याला मचवा आला.

२२दुसर्‍या दिवशी किनार्‍याच्या दुसर्‍या बाजूस जे लोक उभे होते त्यांनी हे बघितले की, त्याचे शिष्य ज्यात चढले होते त्याशिवाय दुसरा एकही मचवा तेथे नव्हता व त्या मचव्यात येशू त्याच्या शिष्यांबरोबर गेला नव्हता, पण त्याचे शिष्य एकटे गेले होते. २३तरी प्रभूने उपकार मानल्यावर त्यांनी जेथे भाकरखाल्ली त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते. २४म्हणून, तेथे येशू नव्हता व त्याचे शिष्यही नव्हते हे जेव्हा लोकांनी बघितले तेव्हा त्यांनीही मचवे घेतले व येशूला शोधीत ते कपर्णहूमला आले. २५आणि, तो त्यांना समुद्राच्या दुसर्‍या बाजूस भेटला तेव्हा ते त्याला म्हणाले,
“रब्बी, आपण इकडे कधी आलात?”
२६येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, तुम्ही चिन्हं बघितलीत म्हणून नाही, पण त्या भाकरींतून खाल्लंत आणि तृप्त झालात म्हणून मला शोधता. २७नष्ट होणार्‍या अन्नासाठी श्रम करू नका, पण सनातन जीवनाकरता, टिकणार्‍या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्यानं शिक्का मारला आहे.”
२८तेव्हा ते त्याला म्हणाले,
“आम्ही देवाची कामं करावीत म्हणून काय करावं?”
२९येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“देवाचं काम हे आहे की, त्यानं ज्याला पाठवलं आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
३०म्हणून ते त्याला म्हणाले,
“मग आपण कोणतं चिन्ह दाखवता की, ते बघून, आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणतं करता?३१आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; कारण ’त्याने त्यांना स्वर्गातील भाकर खायला दिली’ असं लिहिलेलं आहे.”
३२तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, मोशेनं तुम्हाला स्वर्गातील भाकर दिली नाही; पण माझा पिता तुम्हाला स्वर्गातील खरी भाकर देतो. ३३कारण देवाची भाकर स्वर्गातून उतरून जगाला जीवन देत आहे.”
३४तेव्हा ते त्याला म्हणाले,
“महाराज, ह्यापुढं ही भाकर आम्हाला द्या.”
३५तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“मी जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. ३६पण मी तुम्हाला म्हटलं की, तुम्ही मला पाहिलंही आहे आणि विश्वास ठेवीत नाही. ३७पिता मला जे सर्व देतो ते माझ्याकडे येतील, आणि माझ्याकडे जो येतो त्याला मी कधी घालवणार नाही. ३८कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणं करायला नाही, पण ज्यानं मला धाडलं त्याच्या इच्छेप्रमाणं करायला आलो आहे. ३९आणि ज्यानं मला धाडलं त्याची इच्छा ही आहे की, त्यानं मला जे सर्व दिलं आहे त्यातून मी काही गमावू नये, पण शेवटच्या दिवशी सर्व पुन्हा उठवावं. ४०माझ्या पित्याची इच्छा ही आहे की, जो कोणी पुत्राला पाहतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सनातन जीवन मिळावं; मी त्याला शेवटच्या दिवशी पुन्हा उठवीन.”
४१तेव्हा यहुद्यांनी त्याच्याविरुद्ध कुरकुर केली, कारण त्याने म्हटले, ’मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे’.४२तेव्हा ते म्हणाले,
“हा येशू योसेफाचा मुलगा नाही काय? ह्याच्या बापाला आणि आईला आम्ही ओळखतो. आता हा कसं म्हणतो,  ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’?”
४३येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“तुम्ही आपआपल्यात कुरकुर करू नका. ४४ज्या पित्यानं मला धाडलं त्यानं कोणाला ओढल्याशिवाय तो माझ्याकडे येऊ शकत नाही. आणि, मी त्याला शेवटच्या दिवशी पुन्हा उठवीन. ४५‘आणि ते सगळे देवाने शिकवलेले होतील’, असं संदेष्ट्यांत लिहिलं आहे, म्हणून जो पित्याकडून ऐकून शिकला आहे असा प्रत्येक मनुष्य माझ्याकडे येतो. ४६जो देवापासून आहे त्यानं पित्याला पाहिलं आहे. त्याच्याशिवाय कोणी पित्याला पाहिलं आहे असं नाही. ४७मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सनातन जीवन आहे. ४८मीच जीवनाची भाकर आहे. ४९तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि ते मेले. ५०पण स्वर्गातून उतरलेली भाकर अशी आहे की, कोणीही ती खावी आणि मरू नये. ५१मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. ह्या भाकरीतून कोणी खाईल तर तो सर्वकाळ जिवंत राहील. आणि, जगाच्या जीवनासाठी मी जी भाकर देईन ती माझा देह आहे.”
५२तेव्हा यहुद्यांनी आपआपल्यात वाद लढवून म्हटले,
“हा आम्हाला आपला देह कसा खायला देऊ शकेल?”
५३ह्यावरून येशू त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, तुम्ही जोवर मनुष्याच्या पुत्राचा देह खात नाही, आणि त्याचं रक्त पीत नाही तोवर तुम्हाला तुमच्यात जीवन नाही. ५४जो माझा देह खातो आणि माझं रक्त पितो त्याला सनातन जीवन आहे. आणि मी त्याला शेवटच्या दिवशी पुन्हा उठवीन. ५५कारण, खरोखर, माझा देह अन्न आहे, आणि,खरोखर, माझं रक्त पेय आहे. ५६जो माझा देह खातो आणि माझं रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो. ५७जिवंत पित्यानं जसं मला पाठवलं, आणि मी जसा पित्यामुळं जगतो तसा जो मला खातो तोही माझ्यामुळं जगेल. ५८हीच स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. जी पूर्वजांनी खाल्ली आणि ते मेले तशी ही नाही. जो कोणी ह्या भाकरीतून खातो तो सर्वकाळ जगेल.‘
५९तो कपर्णहूम येथे शिकवीत असताना सभास्थानात ह्या गोष्टी बोलला. ६०म्हणून त्याच्या शिष्यांतल्या पुष्कळांनी हे ऐकून म्हटले,
“हे वचन कठिण आहे; हे कोणाला ऐकवेल?”
६१पण येशूने अंतरी ओळखले की, आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहेत; तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“ह्याचा तुम्हाला अडथळा होतो काय? ६२आणि तुम्ही जर मनुष्याच्या पुत्राला तो आधी होता तिथं वर जाताना पहाल तर? ६३आत्मा जीवन देणारा आहे, देह काही लाभ घडवीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचनं आत्मा आणि जीवन आहेत. ६४पण तुमच्यात असे काही आहेत की, ते विश्वास ठेवीत नाहीत.”
कारण, कोण विश्वास ठेवीत नाही, आणि आपल्याला कोण धरून देईल, हे येशू प्रारंभापासून जाणत होता. ६५आणि तो म्हणाला,
“म्हणून मी तुम्हांला म्हटलं की, कोणीही मनुष्य, त्याला पित्यानं ते दिलं असल्याशिवाय, माझ्याकडे येऊ शकत नाही.”
६६त्यानंतर, त्याच्या शिष्यांतले पुष्कळ जण परत गेले, आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत.
६७तेव्हा येशू बारा जणांना म्हणाला,
“तुमचीपण जायची इच्छा आहे काय?”
तेव्हा शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले,
“प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? तुझ्याजवळ सनातन जीवनाची वचनं आहेत. ६९आणि आम्ही विश्वास ठेवतो, आणि जाणतो की, तू देवाचा पवित्र आहेस.”
७०येशूने त्यांना उत्तर दिले,
“मी तुम्हा बारा जणांना निवडलं ना? आणि तुमच्यात एक जण सैतान आहे.”
७१हे त्याने शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कार्योत ह्याच्याविषयी म्हटले होते; कारण बारा जणांतला तो एक असून त्याला धरून देणार होता.  

—–योहान ७—–

ह्यानंतर येशू गालिलात फिरला, कारण यहुदियात फिरायची त्याची इच्छा नव्हती; कारण यहुदी त्याला ठार मारायला टपले होते. आता यहुद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता. तेव्हा त्याचे भाऊ त्याला म्हणाले,
‘तू इथून नीघ, आणि यहुदियात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामं तुझ्या शिष्यांनीही पहावीत. कारण कोणाही मनुष्य काही गुप्तात करून स्वतः उघडपणे प्रसिद्ध होऊ पहात नाही; तू ह्या गोष्टी करीत असशील तर स्वतः जगाला प्रगट हो.‘
कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवीत नव्हते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“माझी वेळ अजून आलेली नाही; तुमची वेळ सतत तयार आहे. जग तुमचा द्वेष करू शकणार नाही; ते माझा द्वेष करते; कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्याची कामं वाईट आहेत. तुम्ही ह्या सणाला वर जा. मी ह्या सणाला आताच वर जात नाही. कारण माझा काळ अजून पूर्ण झाला नाही.”
तो हे शब्द त्यांना बोलल्यावर गालिलात राहिला.
१०पण त्याचे भाऊ वर गेल्यावर तोही सणाला वर गेला; पण उघडपणे नाही, तर जणू गुप्तपणे गेला. ११तेव्हा,यहुदी त्याला सणात शोधीत होते आणि म्हणत होते,
“तो कुठं आहे?”
१२आणि लोकांत त्याच्याविषयी पुष्कळ कुजबुज होत होती. कोणी म्हणत,
“तो चांगला आहे.‘
दुसरे कोणी म्हणत,
“नाही; पण तो लोकांना फसवतो.”
१३पण यहुद्यांच्या भयाने कोणीही त्याच्याविषयी उघडपणे  बोलत नसे.
१४पण सण अर्ध्यावर आला तेव्हा येशू वर मंदिरात जाऊन शिकवू लागला. १५तेव्हा यहुद्यांनी आश्चर्य केले व म्हटले,
“हा मनुष्य शिकलेला नसता हा लेख कसे जाणतो?”
१६म्हणून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“माझं शिक्षण माझं नाही, पण ज्यानं मला धाडलं त्याचं आहे. १७कोणी त्याच्या इच्छेप्रमाणं करू इच्छील तर त्याला कळेल की, हे शिक्षण त्याचं आहे किवा मी स्वतःचं सांगतो. १८जो स्वतःचं सांगतो तो आपलं स्वतःचं गौरव पाहतो; पण जो आपल्याला ज्यानं धाडलं त्याचं गौरव पाहतो तो मनुष्य खरा आहे; आणि त्याच्यात काही अनीती नाही. १९मोशेनं तुम्हाला नियमशास्त्र दिलं आहे ना? आणि तुमच्यातला कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारायला का टपता?”
२०लोकांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“तुझ्यात भूत आहे. कोण तुला ठार मारायला टपतो आहे?”
२१येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मी एक काम केलं, आणि तुम्ही सगळे आश्चर्य करता. २२मोशेनं ह्याकरता, तुम्हाला सुनत लावून दिली. तरी ती मोशेपासून नाही, पण पूर्वजांपासून आहे. आणि तुम्ही शब्बाथ दिवशी मनुष्याची सुनत करता. २३मोशेचं नियमशास्त्र मोडू नये म्हणून जर शब्बाथ दिवशी मनुष्याला सुनत मिळते, तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला सर्वांगी निरोगी केलं म्हणून तुम्ही माझ्यावर रागावता काय? २४दिसतं त्यावरून न्याय करू नका,पण उचित न्यायानं न्याय करा.”
२५तेव्हा यरुशलेमच्या लोकांतले कित्येक म्हणाले,
“ज्याला ठार मारायला टपलेत तो हाच आहे ना? २६पण बघा, तो उघडपणे बोलत आहे, आणि ते त्याला काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे, हे खरोखर अधिकार्‍यांना कळलं आहे काय? २७तरी हा मनुष्य कुठला आहे हे आम्ही जाणतो; पण ख्रिस्त आल्यावर तो कुठून आला हे कोणाला कळणार नाही.”
२८म्हणून येशू मंदिरात शिकवीत असता ओरडून म्हणाला,
“तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता; तरी मी स्वतः आलो नाही; पण, ज्यानं मला धाडलं तो खरा आहे. आणि तुम्ही त्याला ओळखीत नाही. २९पण मी त्याला ओळखतो, कारण मी त्याच्याकडून आहे आणि त्यानं मला पाठवलं आहे.”
३०म्हणून ते त्याला धरायला टपले; पण कोणी त्याच्यावर हात टाकले नाहीत, कारण त्याची घटका अजून आलेली नव्हती. ३१तेव्हा लोकांतल्या पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणाले,
“ख्रिस्त येईल तेव्हा ह्यानं केलेल्या चिन्हांपेक्षा तो काही अधिक करील काय?”
३२लोक त्याच्याविषयी अशा गोष्टी कुजबुजतात हे परोश्यांनी ऐकले, तेव्हा परोश्यांनी आणि वरिष्ठ याजकांनी त्याला धरायला कामदारांना धाडले.
३३म्हणून येशू म्हणाला,
“मी आणखी अल्पकाळ तुमच्याबरोबर आहे. आणि ज्यानं मला धाडलं त्याच्याकडे मी निघून जाईन. ३४तुम्ही माझा शोध कराल, पण मी तुम्हाला सापडणार नाही; आणि मी असेन तिकडे तुम्हाला येता येणार नाही.”
३५तेव्हा यहुदी आपआपल्यात म्हणाले,
“हा आपल्याला सापडणार नाही असा हा कुठं जाईल? हा हेल्लेण्यांत पांगलेल्या लोकांत जाऊन हेल्लेण्यांना शिकवील  काय? ३६हा जे म्हणतो की, ‘तुम्ही माझा शोध कराल आणि मी तुम्हाला सापडणार नाही’, आणि  ‘मी असेन तिकडे तुम्हाला येता येणार नाही’, हे म्हणणं काय आहे?”
३७मग शेवटच्या दिवशी, त्या सणातल्या मोठ्या दिवशी, येशू उभा राहून ओरडून म्हणाला,
“कोणाला तहान लागली असेल तर त्यानं माझ्याकडे येऊन प्यावं. ३८जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या पोटातून, शास्त्रलेखात म्हटल्याप्रमाणं जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”
३९पण ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी तो हे बोलला. कारण अजून पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.
४०म्हणून लोकांनी हे वचन ऐकले तेव्हा त्यांच्यातले पुष्कळ जण म्हणाले,
“खरोखर, हा तो संदेष्टा आहे.”
४१दुसरे म्हणाले,
“हा ख्रिस्त आहे.”
पण काही म्हणाले,
“ख्रिस्त गालिलातून येणार आहे काय? ४२दाविदाच्या संतानातून आणि ज्या गावात दावीद होता त्या बेथलेहेमातून ख्रिस्त येईल असं शास्त्रलेख म्हणत नाही काय?”
४३ह्यामुळे त्याच्यावरून लोकांत फूट झाली. ४४आणि त्यांच्यातल्या काही जणांची त्याला धरायची इच्छा होती, पण कोणी त्याच्यावर हात टाकले नाहीत.
४५म्हणून कामदार वरिष्ठ याजकांकडे व परोश्यांकडे आले तेव्हा ते त्यांना म्हणाले,
“तुम्ही त्याला का आणलं नाही?”
४६कामदारांनी उत्तर दिले,
“हा मनुष्य बोलतो तसा कोणी कधी बोलला नाही.”
४७तेव्हा परोश्यांनी त्यांना उत्तर दिले,
“तुम्ही पण फसलात काय? ४८अधिकार्‍यांपैकी किवा परोश्यांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? ४९पण नियमशास्त्र न जाणणारे हे लोक शापित आहेत.”
५०(पूर्वी त्याच्याकडे आलेला, आणि त्यांच्यातला एक असलेला) निकदेम त्यांना म्हणतो,
५१“एखाद्या मनुष्याचं ऐकण्याअगोदर, आणि तो काय करतो हे कळण्याअगोदर आपलं नियमशास्त्र त्याचा न्याय करतं काय?”
५२त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“तुम्हीपण गालिलातले आहात काय? शोधा आणि बघा, कारण गालिलातून संदेष्टा उद्भवत नाही.”
(५३आणि प्रत्येक जण आपआपल्या घरी गेला.

—–योहान ८—–

पण येशू जैतूनांच्या डोंगरावर गेला, आणि, पुन्हा पहाटेस मंदिरात आला; तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले, आणि, तो खाली बसून त्यांना शिकवू लागला. तेव्हा, व्यभिचार करण्यात धरलेल्या एका बाईला शास्त्री व परोशी त्याच्याकडे आणतात, आणि तिला मध्यभागी उभी करून ते त्याला म्हणतात,
“गुरू, ही बाई व्यभिचारकर्मात धरली गेली. आता अशांना दगडमार करावा, म्हणून मोशेनं नियमशास्त्रात आम्हाला आज्ञा दिली आहे. पण आपण काय म्हणता?”
आपल्याला त्याच्यावर काही आरोप करायला मिळावे म्हणून त्यांनी हे त्याची परीक्षा करायला म्हटले. पण येशू खाली वाकला व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. पण ते जेव्हा त्याला विचारीत राहिले तेव्हा तो सरळ बसला व त्यांना म्हणाला,
“तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्यानं प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.”
आणि तो पुन्हा खाली वाकला व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला.
पण त्यांनी हे ऐकले तेव्हा सर्वांत वडील माणसापासून प्रारंभ होऊन, ते एकामागून एक निघून गेले; आणि,येशू एकटा राहिला व ती बाई मध्यभागी उभी होती. १०तेव्हा येशू सरळ बसला व तिला म्हणाला,
“बाई, तुला कुणी दोषी ठरवलं नाही काय?”
११ती म्हणाली,
“कुणी नाही, प्रभू.”
आणि येशू म्हणाला,
“मीपण तुला दोषी ठरवीत नाही; जा, ह्यापुढं पाप करू नको.”)

१२म्हणून पुन्हा, येशू त्यांच्याबरोबर बोलू लागला आणि म्हणाला,
“मी जगाचा प्रकाश आहे; जो माझ्यामागं येतो तो अंधारात चालणार नाही, पण त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
१३म्हणून परोशी त्याला म्हणाले,
“तू स्वतःविषयी साक्ष देतोस; तुझी साक्ष खरी नाही.”
१४येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कुठून आलो आणि कुठं जाणार हे मला माहीत आहे; पण मी कुठून आलो आणि कुठं जाणार हे तुम्हाला माहीत नाही. १५तुम्ही देहानुसार न्याय करता;मी कुणाचा न्याय करीत नाही. १६आणि तरी मी न्याय करतो, तर माझा न्याय खरा आहे. कारण मी एकटा नाही, पण मी आणि मला धाडणारा,  असे आम्ही आहो. १७तुमच्या नियमशास्त्रातपण लिहिलं आहे की, दोघांची साक्ष खरी असते. १८माझ्याविषयी साक्ष देणारा मी एक आहे, आणि मला धाडणारा पिता माझ्याविषयी साक्ष देतो.”
१९तेव्हा ते त्याला म्हणाले,
“तुझा पिता कुठं आहे?”
येशूने उत्तर दिले,
“तुम्ही मला किवा माझ्या पित्यालाही ओळखीत नाही. तुम्ही मला ओळखलं असतं तर माझ्या पित्यालाही ओळखलं असतं.”
२०तो मंदिरात शिकवीत असता भांडारासमोर ही वचने बोलला; पण कोणीही त्याच्यावर हात टाकले नाहीत, कारण त्याची घटका अजून आलेली नव्हती.
२१म्हणून पुन्हा तो त्यांना म्हणाला,
“मी निघून जाईन, आणि तुम्ही माझा शोध कराल, आणि तुमच्या पापात मराल; मी जाईन तिकडे तुम्हाला येता येणार नाही.”
२२तेव्हा यहुदी म्हणाले,
“हा आत्महत्या करणार काय? कारण हा म्हणतो की, ‘मी जाईन तिकडे तुम्हाला येता येणार नाही’.”
२३आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही खालचे आहा, मी वरचा आहे; तुम्ही ह्या जगाचे आहा, मी ह्या जगाचा नाही. २४म्हणून मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही तुमच्या पापांत मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास ठेवला नाही, तर तुम्ही तुमच्या पापांत मराल.”
२५तेव्हा ते त्याला म्हणाले,
“तू कोण आहेस?”
आणि येशू त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला तेच प्रारंभापासून सांगतो. २६तुमच्याविषयी बोलायला आणि न्याय करायला पुष्कळ गोष्टी माझ्याजवळ आहेत; पण ज्यानं मला धाडलं तो खरा आहे आणि मी त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टी जगाला सांगतो.‘
२७तो त्यांच्याशी पित्याविषयी बोलत होता हे त्यांना कळले नाही.
२८तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“तुम्ही जेव्हा मनुष्याच्या पुत्राला वर चढवाल तेव्हा तुम्हाला हे कळेल की, मी तो आहे, आणि मी स्वतः काही करीत नाही; पण पित्यानं मला सांगितल्याप्रमाणं मी हे करतो. २९आणि मला ज्यानं धाडलं तो माझ्याबरोबर आहे; त्यानं मला एकटं सोडलं नाही; कारण मी नेहमी त्याला आवडणार्‍या गोष्टी करतो.”
३०तो हे बोलत असता पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

३१तेव्हा ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता त्यांना येशू म्हणाला,
“तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा. ३२तुम्हाला सत्य समजेल, आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करील.”
३३त्यांनी त्याला उत्तर दिले,
“आम्ही अब्राहामाचे संतान आहो, आणि कधी कोणाचे दास झालो नाही. तू आम्हाला कसा म्हणतोस की, तुम्ही स्वतंत्र केले जाल?”
३४येशूने त्यांना उत्तर दिले,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. ३५दास सदैव घरात रहात नाही;पुत्र सदैव घरात राहतो. ३६म्हणून जर पुत्रानं तुम्हाला स्वतंत्र केलं तर तुम्ही, खरोखर, स्वतंत्र व्हाल. ३७मी जाणतो की, तुम्ही अब्राहामाचे वंशज आहा, पण मला ठार मारायला टपला आहा; कारण माझ्या वचनाला तुमच्यात वाव मिळत नाही. ३८मी माझ्या पित्याजवळ पाहिलं ते बोलतो, आणि तुम्ही तुमच्या पित्याकडून ऐकलं ते करता.”
३९त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“अब्राहाम आमचा पिता आहे.”
येशू त्यांना म्हणतो,
“तुम्ही अब्राहामाची मुलं आहा तर अब्राहामाच्या कृती करा. ४०पण मी जे सत्य देवाकडून ऐकलं, ते तुम्हाला सांगणार्‍या मला तुम्ही ठार मारायला पाहता. हे अब्राहामानं केलं नाही. ४१तुम्ही तुमच्या पित्याच्या कृती करता.”
ते त्याला म्हणाले,
“आम्ही जारकर्मानं जन्मलो नाही, आम्हाला एक पिता आहे. तो देव आहे.”
४२येशू त्यांना म्हणाला,
“देव तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो आणि आलो, आणि स्वतः होऊन आलो नाही, पण त्यानं मला पाठवलं. ४३माझं बोलणं तुम्हांला का कळत नाही? कारण तुम्हाला माझं वचन ऐकवत नाही. ४४तुम्ही ज्याचे आहात तो सैतान तुमचा पिता आहे, आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणं करावं ही तुमची इच्छा आहे. तो प्रारंभापासून खुनी आहे. तो सत्यात राहिला नाही, कारण त्याच्यात सत्य नव्हतं. तो जेव्हा असत्य सांगतो तेव्हा तो स्वतःचं सांगतो कारण तो लबाड आहे आणि असत्याचा जनक आहे. ४५आणि, मी सत्य सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवीत नाही. ४६तुमच्यातला कोण मला पापाचा दोष लावील? आणि मी जर सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवीत नाही? ४७जो देवाकडचा आहे तो देवाची वचनं ऐकतो. म्हणून तुम्ही ऐकत नाही, कारण तुम्ही देवाकडचे नाही.”
४८तेव्हा यहुद्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“तू शोमरोनी आहेस, आणि तुझ्यात भूत आहे, हे आम्ही बरोबर म्हणतो ना?”
४९येशूने त्यांना उत्तर दिले,
“माझ्यात भूत नाही; पण मी माझ्या पित्याला मान देतो आणि तुम्ही माझा अपमान करता. ५०पण मी माझं स्वतःचं गौरव पहात नाही; जो ते पाहतो आणि न्याय करतो असा एक आहे. ५१मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, कोणी माझी वचनं पाळील तर तो कधीच मरण पाहणार नाही.”
५२तेव्हा यहुदी त्याला म्हणाले,
“आता आम्हाला कळलं की, तुझ्यात भूत आहे. अब्राहाम मेला आणि संदेष्टे मेले; आणि तू म्हणतोस की, ‘कोणी माझं वचन पाळील तर तो कधी मरण अनुभवणार नाही’. ५३आमचा पिता अब्राहाम मेला; त्याच्यापेक्षा तू मोठा आहेस काय? आणि संदेष्टे मेले; तू स्वतःला काय बनवतोस?”
५४येशूने उत्तर दिले,
“मी स्वतःचं गौरव केलं तर माझं गौरव काही नाही, पण जो तुमचा देव आहे असं ज्याच्याविषयी तुम्ही म्हणता तो माझा पिता माझं गौरव करतो. ५५तरी, तुम्ही त्याला जाणलेलं नाही, पण मी त्याला ओळखतो. आणि मी जर म्हटलं की, मी त्याला ओळखीत नाही, तर मी तुमच्यासारखा लबाड होईन. पण, मी त्याला ओळखतो, आणि त्याचं वचन पाळतो. ५६माझा दिवस बघायला तुमचा पिता अब्राहाम उल्लासला; त्यानं तो बघितला आणि तो आनंदित झाला.”
५७म्हणून यहुदी त्याला म्हणाले,
“तू अजून पन्नास वर्षांचा नाहीस आणि अब्राहामाला पाहिलंस काय?”
५८येशू त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, अब्राहाम झाल्याअगोदर मी आहे.”
५९तेव्हा त्यांनी त्याच्यावर टाकायला दगड उचलले, पण येशू दडला आणि मंदिरामधून बाहेर गेला. 

—–योहान ९—–

आणि तो पुढे जात असता त्याने एका जन्मांध मनुष्याला बघितले. आणि त्याचे शिष्य त्याला प्रश्न करून म्हणाले,
“रब्बी, कोणी पाप केलं? ह्यानं, किंवा ह्याच्या आईबापांनी, म्हणून हा अंधळा जन्मला?”
येशूने उत्तर दिले,
“ह्यानं, किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केलं असं नाही, पण देवाची कामं ह्याच्यात प्रगट व्हावीत म्हणून असं झालं. ज्यानं मला धाडलं त्याची कामं आपण दिवस असेपर्यंत केली पाहिजेत. रात्र येते तेव्हा कोणीही काम करू शकत नाही. मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे.”
तो एवढे बोलल्यावर त्याने जमिनीवर थुंकी टाकली व थुंकीने ओली माती करून ती ओली माती त्याच्या डोळ्यांवर लावली. आणि त्याला म्हटले,
“जा, शिलोहाच्या तळ्यात धू.”
(ह्याचा अर्थ पाठवलेले) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो पहात आला.
म्हणून त्याचे शेजारी व ज्यांनी त्याला भीक मागताना पूर्वी पाहिले होते ते म्हणाले,
“तो जो बसून भीक मागत असे तो हाच ना?”
कोणी म्हणाले,
“हा तो आहे.”
दुसरे म्हणाले,
“नाही, पण हा त्याच्यासारखा आहे.”
पण तो म्हणाला,
“मी तो आहे.”
१०म्हणून ते त्याला म्हणाले,
“मग तुझे डोळे कसे उघडले?”
११त्याने उत्तर दिले,
“ज्या मनुष्याला येशू म्हणतात त्यानं ओली माती करून ती माझ्या डोळ्यांना लावली आणि तो मला म्हणाला, ‘शिलोहावर जा आणि धू’. मी जाऊन धुतले, आणि मला दृष्टी आली.”
१२आणि ते त्याला म्हणाले,
“तो कुठं आहे?”
तो म्हणतो,
“मला माहीत नाही.”
१३तो जो पूर्वी अंधळा होता त्याला ते परोश्यांकडे आणतात, १४आता, येशूने ओली माती करून जेव्हा त्याचे डोळे उघडले त्या दिवशी शब्बाथ होता. १५तेव्हा त्याला दृष्टी कशी आली हे पुन्हा परोश्यांनीही त्याला विचारले. आणि तो त्यांना म्हणाला,
“त्यानं माझ्या डोळ्यांवर ओली माती लावली, आणि मी धुतली, आणि मला दिसतं.”
१६तेव्हा परोश्यांतले काही जण म्हणाले,
“हा देवाकडून नाही, कारण हा शब्बाथ पाळीत नाही.”
पण दुसरे म्हणाले,
“जो मनुष्य पापी आहे तो असली चिन्हं कशी करू शकेल?”
१७म्हणून, पुन्हा ते त्या अंधळ्याला म्हणतात,
“त्यानं जर तुझे डोळे उघडले तर तू त्याच्याविषयी काय म्हणतोस?”
तो म्हणाला,
“तो एक संदेष्टा आहे.”
१८म्हणून यहुद्यांनी ज्याला दृष्टी आली होती त्याच्या बाबतीत, त्याच्या आईबापांना बोलवीपर्यंत, तो अंधळा होता व त्याला दृष्टी आली होती ह्यावर विश्वास ठेवला नाही. १९आणि त्यांनी त्यांना प्रश्न करून म्हटले,
“तुमचा जो मुलगा अंधळा जन्मला म्हणून तुम्ही म्हणता तो हा आहे काय? मग आता त्याला कसं दिसतं?”
२०त्याच्या आईबापांनी उत्तर देऊन म्हटले,
“हा आमचा मुलगा आहे; आणि हा अंधळा जन्मला होता हे आम्हाला माहीत आहे. २१पण आता त्याला कशामुळं दिसतं हे आम्हाला माहीत नाही, किवा कोणी त्याचे डोळे उघडले हेही आम्हाला माहीत नाही. तो मोठ्या वयाचा आहे, त्याला विचारा; तो स्वतःविषयी सांगेल.”
२२त्याच्या आईबापांनी असे उत्तर दिले, कारण ते त्यांना भीत होते; कारण,  तो ख्रिस्त आहे असे कोणी पतकरल्यास त्याला सभास्थानबहिष्कृत करावे, हे यहुद्यांनी आधीच ठरवले होते. २३म्हणून त्याच्या आईबापांनी म्हटले, ‘तो मोठ्या वयाचा आहे, त्याला विचारा.’
२४तेव्हा जो मनुष्य अंधळा होता त्याला त्यांनी दुसर्‍यांदा बोलावले आणि ते त्याला म्हणाले,
“देवाला गौरव दे; हा मनुष्य पापी आहे हे आम्ही जाणतो.”
२५म्हणून त्याने उत्तर दिले,
“तो पापी आहे काय, हे मी जाणत नाही. मी एक गोष्ट जाणतो; मी अंधळा होतो आणि आता मला दिसतं.”
२६म्हणून ते त्याला म्हणाले,
“त्यानं तुला काय केलं? त्यानं तुझे डोळे कसे उघडले?”
२७त्याने त्यांना उत्तर दिले,
“मी तुम्हाला आताच सांगितलं, आणि तुम्ही ऐकलं नाही; ते कशाला पुन्हा ऐकायची तुमची इच्छा आहे? त्याचे शिष्य व्हायची तुमची इच्छा आहे काय?”
२८तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी केली, आणि ते त्याला म्हणाले,
“तू त्याचा शिष्य आहेस; आम्ही मोशेचे शिष्य आहोत. २९देव मोशेबरोबर बोलला हे आम्हाला माहीत आहे. ह्याच्याविषयी हा कुठला आहे हे आम्हाला माहीत नाही.”
३०तो मनुष्य त्यांना उत्तर देऊन म्हणतो,
“तर ह्यात आश्चर्यकारक हे आहे की, हा कुठला आहे हे तुम्हाला माहीत नाही; आणि तरी त्यानं माझे डोळे उघडले. ३१आपल्याला हे माहीत आहे की, देव पाप्यांचं ऐकत नाही, पण जो मनुष्य देवभक्त आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणं करतो त्याचं तो ऐकतो. ३२कोणी मनुष्यानं अंधळा जन्मलेल्या कोणाचे डोळे उघडले हे युगादीपासून ऐकलेलं नाही. ३३हा जर देवाकडून नसता तर काही करू शकला नसता.”
३४त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“तू सर्वस्वी पापात जन्मलास, आणि तू आम्हाला शिकवतोस काय?”
आणि त्यांनी त्याला बाहेर काढले.
३५त्यांनी त्याला बाहेर काढले होते हे येशूने ऐकले; आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला,
“तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”
३६त्याने उत्तर देऊन म्हटले,
“आणि, प्रभू, तो कोण आहे की, मी त्याच्यावर विश्वास ठेवू?”
३७येशू त्याला म्हणाला,
“तू त्याला पहात आहेस आणि तोच तुझ्याशी बोलत आहे.”
३८तो म्हणाला,
“प्रभू, मी विश्वास ठेवतो.”
आणि त्याने त्याला नमन केले.

३९आणि येशू म्हणाला,
“मी ह्या जगात ह्या न्यायनिवाड्यासाठी आलो; म्हणजे ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावं, आणि ज्यांना दिसतं त्यांनी अंधळे व्हावं.”
४०तेव्हा परोश्यांतले जे त्याच्याबरोबर होते त्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या; आणि ते त्याला म्हणाले,
“आम्ही पण अंधळे आहोत काय?”
४१येशू त्यांना म्हणाला,
“तुम्ही जर अंधळे असता तर तुमच्याकडे पाप नसतं, पण आता तुम्ही म्हणता की, ‘आम्हाला दिसतं’, म्हणून तुमचं पाप राहतं.  

—–योहान १०—–

“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, जो दारातून मेंढवाड्यात जात नाही, पण दुसरीकडे चढतो, तो चोर आणि लुटारू आहे. पण, जो दारातून आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे. द्वारपाल त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरं त्याचा आवाज ऐकतात. तो आपल्या मेंढरांना नावानं बोलावतो आणि त्यांना बाहेर आणतो;आणि आपली सगळी बाहेर काढतो तेव्हा तो त्यांच्या पुढं जातो, आणि मेंढरं त्याच्यामागं जातात; कारण ती त्याचा आवाज ओळखतात. आणि ती परक्याच्या मागं जाणार नाहीत, पण ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांचा आवाज ओळखीत नाहीत.”
येशूने त्यांना हा दाखला सांगितला पण तो त्यांच्याशी कोणत्या गोष्टींविषयी बोलत होता हे त्यांना कळले नाही. तेव्हा येशू पुन्हा त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, मी मेंढरांचं दार आहे. माझ्या आधी जे कोणी आले ते सगळे चोर आणि लुटारू आहेत, पण मेंढरांनी त्यांचं ऐकलं नाही. मी दार आहे; माझ्यामधून जर कोणी आत येईल तर त्याचं तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल, आणि त्याला अन्न मिळेल. १०चोर, नाहीतरी, चोरायला, ठार मारायला आणि नष्ट करायला येतो. मी त्यांना जीवन मिळावं, आणि विपुलपणे मिळावं म्हणून आलो. ११मी चांगला मेंढपाळ आहे; चांगला मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःचा जीव देईल. १२जो मोलकरी आहे आणि मेंढपाळ नाही, ज्याची स्वतःची मेंढरं नाहीत, तो लांडगा यत आहे हे पाहतो तेव्हा मेंढरं सोडतो आणि पळून जातो; आणि लांडगा येऊन त्यांना धरतो आणि पांगवतो. १३मोलकरी पळतो कारण तो मोलकरी आहे, आणि मेंढरांची पर्वा करीत नाही. १४-१५मी चांगला मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसा मी जी माझी आहेत त्यांना ओळखतो, आणि माझी आहेत ती मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी माझा जीव देत आहे. १६आणि, जी ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरं आहेत; मला त्यांनापण आणलं पाहिजे, आणि ती माझा आवाज ऐकतील. मग त्यांचा एक कळप आणि एक मेंढपाळ होईल. १७म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो, कारण मी माझा जीव, तो परत घ्यावा म्हणून, देत आहे. १८कोणी मनुष्य तो माझ्यापासून घेत नाही. पण मी तो स्वतः होऊन देत आहे. मला तो द्यायचा अधिकार आहे, आणि मला तो परत घ्यायचा अधिकार आहे. मला माझ्या पित्याकडून ही आज्ञा मिळाली आहे.”
१९म्हणून ह्या शब्दांवरून यहुद्यांत पुन्हा फूट झाली. २०तेव्हा त्यांच्यातले पुष्कळ जण म्हणाले,
“त्याच्यात भूत आहे, आणि तो वेडा आहे. तुम्ही त्याचं कशाला ऐकता?”
२१दुसरे म्हणाले,
“भूत लागलेल्या मनुष्याचे हे शब्द नाहीत. भूत कधी अंधळ्याचे डोळे उघडू शकेल काय?”
२२हे यरुशलेमात झाले तेव्हा पुनःसमर्पणाचा सण होता, आणि हिवाळा होता. २३आणि येशू मंदिरात शलमोनाच्या देवडीत फिरत होता. २४म्हणून यहुदी त्याच्या भोवती जमले आणि त्याला म्हणाले,
“आपण कुठवर आमचं मन चळवणार? आपण जर ख्रिस्त असाल तर आम्हाला उघडपणे सांगा.”
२५येशूने त्यांना उत्तर दिले,
“मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवीत नाही. मी माझ्या पित्याच्या नावानं जी कामं करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. २६पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणं तुम्ही माझ्या मेंढरांतले नाही. २७माझी मेंढरं माझी हाक ऐकतात, मी त्यांना ओळखतो, आणि ती माझ्यामागं येतात. २८आणि मी त्यांना सनातन जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही. २९मला देणारा माझा पिता सर्वांपेक्षा मोठा आहे, आणि माझ्या पित्याच्या हातातून कोणी हिसकून घेऊ शकत नाही. ३०मी आणि पिता एक आहोत.”
३१तेव्हा यहुद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. ३२येशूने त्यांना उत्तर दिले,
“मी माझ्या पित्याकडची पुष्कळ चांगली कामं तुम्हाला दाखवलीत. त्या कामांतील कोणत्याकरता तुम्ही मला दगडमार करता?”
३३यहुद्यांनी त्याला उत्तर दिले,
“आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी; आणि, कारण तू मनुष्य असून तू स्वतःला देव करतोस.”
३४येशूने त्यांना उत्तर दिले,
“तुमच्या नियमशास्त्रात, ‘मी म्हणालो, तुम्ही देव आहा’, असं लिहिलं नाही काय? ३५देवाचं वचन ज्यांना प्राप्त झालं त्यांना जर त्यानं देव म्हटलं, आणि शास्त्रलेख नष्ट करता येत नाही, ३६तर ‘मी देवाचा पुत्र आहे’ असं मी म्हटलं म्हणून, ज्याला पित्यानं पवित्र केलं आणि जगात पाठवलं, त्याला ‘तू दुर्भाषण करतोस’ असं तुम्ही म्हणता काय? ३७मी जर माझ्या पित्याची कामं करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका. ३८पण मी करीत असेन तरी माझ्यावर विश्वास ठेवीत नसाल, तर त्या कामांवर विश्वास ठेवा. म्हणजे तुम्हाला कळावं आणि समजावं की,  माझ्यात पिता आहे आणि मी पित्यात आहे.”
३९त्यांनी पुन्हा त्याला धरायचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्या हातातून सुटला; ४०आणि पुन्हा यार्देनेच्या दुसर्‍या बाजूस, जेथे योहान प्रथम बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी जाऊन राहिला.
४१आणि पुष्कळ जण त्याच्याकडे येत आणि म्हणत,
“योहानानं कोणतंही चिन्ह केलं नाही, पण योहान ह्याच्याविषयी जे काही बोलला ते सगळं खरं होतं.”
४२आणि पुष्कळ जणांनी तेथे त्याच्यावर विश्वास ठेवला.                 

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s