Luke 1-5

संत लूक ह्याचे शुभवर्तमान

—–लूक १—–

ज्याअर्थी पुष्कळ जणांनी आपल्यात घडलेल्या गोष्टींचा वृत्तान्त लिहून काढण्याचे हाती घेतले आहे, आणि जे प्रारंभापासून त्याचे प्रत्यक्ष साक्षी होते आणि वचनाचे सेवक झाले, त्यांनी तशाच त्या आपल्या हाती दिल्या आहेत, आणि मीही सर्व गोष्टींचा प्रारंभापासून शोध केला आहे,  त्याअर्थी,  अहो थिओफिल महाराज, मीही आपल्यासाठी त्या क्रमवार लिहाव्यात हे मला बरे वाटले, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींत शिक्षण मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्याला कळावा.

यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबियाच्या वर्गातला, एक जखर्या नावाचा याजक झाला; त्याची बायको अहरोनाच्या मुलींतली होती व तिचे नाव अलिशिबा होते. आणि दोघेही देवापुढे नीतिमान राहून प्रभूच्या सर्व आज्ञांत व निर्बंधांत निर्दोषपणे चालत असत. आणि त्यांना मूलबाळ नव्हते, कारण अलिशिबा वांझ होती, आणि आता दोघांचे वय होऊन गेले होते.
आणि असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या क्रमाप्रमाणे देवापुढे याजक म्हणून काम करीत असता, याजकाच्या कामाच्या परिपाठाप्रमाणे त्याची प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याची पाळी होती, १०आणि लोकांचा सगळा जमाव बाहेर, धुपाच्या वेळी, प्रार्थना करीत होता.
११आणि, त्याला धुपाच्या वेदीच्या उजवीकडे प्रभूचा दूत तेथे उभा असलेला दिसला. १२जखर्याने त्याला बघितले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्यावर थरकाप आला.
१३पण देवदूत त्याला म्हणाला,
“जखर्या, भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे; कारण तुझी बायको अलिशिबा ही तुला मुलगा देईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव.
१४“तुला आनंद आणि हर्ष होईल आणि पुष्कळ त्याच्या जन्मामुळे आनंद करतील. १५कारण, तो प्रभूपुढं महान होईल. तो द्राक्षारस किवा मादक पेय पिणार नाही. आणि त्याच्या आईच्या उदरापासून तो पवित्र आत्म्यानं भरलेला असेल. १६तो इस्राएलाच्या पुत्रांतील पुष्कळ जणांना त्यांचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळवील. १७तो बापांची मनं मुलांकडे आणि अवमान करणार्‍यांना नीतिमानांच्या विचारांकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्यानं आणि सामर्थ्यानं त्याच्यापुढं चालेल.”
१८तेव्हा जखर्या देवदूताला म्हणाला,
“मला हे कशावरून समजेल? कारण मी वृद्ध आहे, आणि माझी बायको वयातीत आहे.”
१९देवदूताने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“मी देवाच्या समक्षतेत उभा राहणारा गब्रिएल आहे. आणि मी तुझ्याशी बोलून तुला ह्या गोष्टीची सुवार्ता सांगावी म्हणून मला पाठवण्यात आलं. २०आणि बघ, हे होईल त्या दिवसांपर्यंत तू मुका होशील; आणि तुला बोलता येणार नाही. कारण ही माझी वचनं त्यांच्या काळात पूर्ण होणार आहेत, त्यांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”
२१आणि लोक जखर्याची वाट पहात राहिले, आणि तो एवढा वेळ पवित्र स्थानात राहिला ह्याचे त्यांनी आश्चर्य केले. २२आणि तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याशी बोलता येईना, तेव्हा त्यांनी ओळखले की, त्याला पवित्र स्थानात दर्शन घडले; आणि तो त्यांना खुणावीत राहून अबोल राहिला. २३आणि असे झाले की, त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण होताच तो आपल्या घरी गेला.
२४आणि त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली, आणि तिने पाच महिने स्वतःला लपवून घेतले. आणि ती म्हणत असे, २५“लोकांतली माझी निंदा दूर करायला प्रभूनं जेव्हा खाली पाहिलं त्या दिवसांत त्यानं हे माझ्यासाठी केलं.”

२६-२७आणि देवाकडून गब्रिएल दूताला सहाव्या महिन्यात, गालिलातील नासरेथ नावाच्या एका गावी, दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या एका मनुष्याला वाग्दत्त असलेल्या एका कुमारिकेकडे पाठविण्यात आले. २८आणि देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला,
“जयजय! कृपायुक्ते, प्रभू तुझ्याबरोबर आहे.”
२९पण त्याच्या बोलण्याने ती अस्वस्थ झाली व ती विचार करू लागली की, हे अभिवादन काय असेल? ३०आणि देवदूत तिला म्हणाला,
“मरिये, भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. ३१आणि बघ, तुझ्या पोटी गर्भ राहील, आणि तुला पुत्र होईल; आणि तू त्याचं येशू हे नाव ठेव. ३२तो महान होईल आणि त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि परमेश्वर देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचं राजासन देईल. ३३तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”
३४तेव्हा मरिया देवदूताला म्हणाली,
“हे कसं होईल? कारण माझा पुरुषाशी संबंध नाही.”
३५तेव्हा देवदूत तिला उत्तर देऊन म्हणाला,
“पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल, आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर छाया करील. आणि म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील. ३६आणि बघ, तुझी नातलग जी अलिशिबा तिलाही तिच्या म्हातारपणी मुलाचा गर्भ राहिला आहे. आणि जिला वांझ म्हटलं जाई तिला हा सहावा महिना आहे. ३७कारण देवाचं कोणतंही वचन अशक्य होईल असं होणार नाही.”
३८आणि मरिया म्हणाली,
“बघा, मी प्रभूची दासी, मला आपल्या वचनानुसार होवो.”
मग देवदूत तिला सोडून गेला.

३९आणि त्या दिवसांत मरिया निघाली, आणि घाईने, यहुदाच्या डोंगराळ प्रदेशात एका नगरात आली, ४०आणि जखर्याच्या घरात जाऊन, तिने अलिशिबेला अभिवादन केले. ४१आणि असे झाले की, अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकले तेव्हा बाळाने तिच्या उदरात उडी मारली; आणि अलिशिबा पवित्र आत्म्याने भरून ४२मोठ्या आवाजात ओरडून म्हणाली,
“स्त्रियांत तू धन्य! आणि तुझ्या पोटचं फळ धन्य! ४३आणि माझ्या प्रभूच्या आईनं माझ्याकडे यावं हे मला कुठून? ४४कारण बघ, माझ्या कानी तुझ्या अभिवादनाचा आवाज आला, तेव्हा बाळानं माझ्या उदरात हर्षानं उडी मारली. ४५जिनं विश्वास ठेवला ती धन्य, कारण तिला प्रभूकडून जे सांगण्यात आलं त्याची पूर्णता होईल.”

४६आणि मरिया म्हणाली,
“माझा जीव प्रभूला थोर मानतो,
४७आणि माझा आत्मा माझ्या तारक देवामुळं
उल्लासला आहे.
४८कारण त्यानं आपल्या दासीच्या
दैन्यावस्थेकडे पाहिलं आहे,
कारण पहा, आतापासून सर्व पिढ्या
मला धन्य म्हणतील.
४९कारण, जो समर्थ आहे त्यानं माझ्यासाठी
मोठ्या गोष्टी केल्यात.
त्याचं नाव पवित्र आहे.
५०आणि त्याला भिणार्‍यांवर त्याची दया
पिढ्यान् पिढ्या असते.
५१त्यानं आपल्या बाहूनं आपलं बळ
दाखवलं आहे.
गर्विष्ठांना त्यांच्या मनांतल्या कल्पनेनं
पांगवलं आहे.
५२अधिपतींना आसनांवरून
उतरवलं आहे.
आणि दीन अवस्थेत असलेल्यांना
वर उचललं आहे.
५३त्यानं भुकेल्यांना उत्तम पदार्थांनी
तृप्त केलं आहे.
आणि सधन असलेल्यांना
रिकामं पाठवून दिलं आहे.
५४-५५त्यानं आपल्या पूर्वजांना म्हटल्याप्रमाणं
अब्राहामावरील आणि त्याच्या संतानावरील
सर्वकाळची दया स्मरून
आपला सेवक इस्राएल ह्याला
साहाय्य केलं आहे.
५६मग मरिया सुमारे तीन महिने तिच्याजवळ राहिली आणि आपल्या घरी परत आली.

५७अलिशिबेचा प्रसूत व्हायचा काळ पूर्ण होऊन तिला मुलगा झाला,  ५८आणि प्रभूने कशा प्रकारे तिच्यावर मोठी दया केली हे तिच्या शेजार्‍यांनी व नातलगांनी ऐकले तेव्हा ते तिच्याबरोबर आनंद करू लागले.
५९आणि असे झाले की, मुलाची सुनत करण्याकरता ते आठव्या दिवशी आले, आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याला जखर्या हे नाव ठेवणार होते. ६०तेव्हा त्याच्या आईने उत्तर देऊन म्हटले,
“तसं नाही, पण त्याचं नाव योहान ठेवायचं.”
६१आणि ते तिला म्हणाले,
“हे नाव असलेला तुझ्या नातलगांत कोणी नाही.”
६२आणि त्यांनी त्याच्या बापाला खुणावले की, त्याची त्याचे काय नाव ठेवायची इच्छा होती. ६३तेव्हा त्याने पाटी मागितली आणि लिहून सांगितले, ‘त्याचं नाव योहान आहे’. आणि त्या सर्वांनी आश्चर्य केले. ६४आणि लगेच, त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली, आणि तो बोलू लागला, आणि देवाचा धन्यवाद गाऊ लागला.
६५तेव्हा त्यांच्या सभोवती राहणार्‍या सर्वांवर धाक आला, आणि सर्व यहुदियाच्या डोंगराळ प्रदेशात ह्या गोष्टी बोलण्यात येऊ लागल्या. ६६आणि ऐकणारे सर्व जण त्या मनांत ठेवून म्हणत, ‘हा मुलगा काय होणार आहे?’,कारण प्रभूचा हात त्याच्याबरोबर होता.
६७आणि त्याचा बाप जखर्या पवित्र आत्म्याने भरला आणि संदेश देत म्हणाला,
६८“इस्राएलाचा देव परमेश्वर धन्यवादित असो.
कारण त्यानं आपल्या लोकांची भेट घेऊन सुटका केली आहे;
६९त्यानं आपला सेवक दावीद ह्याच्या घराण्यात
आमच्यासाठी एक तारणाचं शिग उभारलं आहे.
७०हे त्यानं युगादीपासून आपल्या
पवित्र संदेष्ट्याच्या मुखाद्वारे सांगितलं होतं;
७१ते ह्यासाठी की, आमची आमच्या
वैर्‍यांपासून आणि आमचा द्वेष करणार्‍या
सर्वांच्या हातून सुटका व्हावी.
७२-७३म्हणजे त्यानं आमच्या पूर्वजांवर
दया करून
आणि आपला पवित्र करार
म्हणजे आमचा पिता अब्राहाम ह्याला
शपथ घेऊन दिलेलं वचन स्मरून
७४त्यानं आम्हाला असं द्यावं की,
आमची आमच्या वैर्‍यांच्या हातून
सुटका होऊन
७५आम्ही आमच्या सर्व दिवसांत
पावित्र्यानं आणि नीतिमत्वानं त्याच्यासमोर
त्याची सेवा करावी.
७६आणि बाळ, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील.
कारण तू प्रभूसमोर त्याचे मार्ग
तयार करावेस म्हणून त्याच्यापुढं चालशील;
७७आणि तू त्याच्या लोकांना त्यांच्या
पापांच्या क्षमेच्या द्वारे तारणाचं ज्ञान देशील.
७८कारण आमच्या देवाच्या दयेच्या
कळवळ्यामुळं वरून उदयप्रकाश
आमच्यावर येईल.
७९ह्यासाठी की, त्यानं जे अंधारात
आणि मृत्यूच्या छायेत बसलेत
त्यांना प्रकाश द्यावा,
आणि आमचे पाय शांतीच्या मार्गाकडे न्यावेत.”
८०आणि मुलगा वाढला, आत्म्याने बलवान झाला व इस्राएलात प्रकट व्हायच्या दिवसापर्यंत रानात राहिला.

—–लूक २—–

आणि त्या दिवसांत असे झाले की, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्याची आज्ञा झाली. क्विरीनियस सूरियाचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. आणि प्रत्येक जण स्वतःच्या गावी, असे सर्व जण आपली नावनिशी लिहून द्यायला गेले.
४-५आणि योसेफदेखील गालिलातून, नासरेथ गावाहून, आपली वाग्दत्त पत्नी मरिया ही गरोदर असताना,आपली नावनिशी लिहून द्यायला, तिच्याबरोबर यहुदियात, बेथलेहेम नावाच्या दाविदाच्या नगरास वर गेला; कारण तो दाविदाच्या घराण्यातला आणि कुळातला होता.
आणि असे झाले की, ते तेथे असताना तिचे प्रसूत व्हायचे दिवस पूर्ण होऊन, तिने आपल्या प्रथम पुत्राला जन्म दिला; आणि त्याला बाळंत्यांत गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती.

आणि त्याच प्रांतात मेंढपाळ रानात रहात होते व आपल्या कळपांवर रात्रीचा पहारा करीत होते. आणि परमेश्वराचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या सभोवती प्रकाशले व ते फार भयभीत झाले. १०तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला,
“भिऊ नका, कारण बघा, सर्व लोकांना जो मोठा आनंद होईल त्याची मी तुम्हाला सुवार्ता सांगतो; ११कारण आज, दाविदाच्या नगरात, तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभू आहे. १२आणि तुम्हाला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळून गव्हाणीत ठेवलेलं बाळ तुम्हाला आढळेल.”
१३आणि अकस्मात्, त्या देवदूताजवळ, एक स्वर्गीय सैन्याचा समुदाय आला, आणि त्यांनी देवाचे स्तवन करीत म्हटले,
१४“ऊर्ध्वलोकी देवाला गौरव,
आणि पृथ्वीवर शांती,
मनुष्यांवर कृपा.”
१५आणि असे झाले की, देवदूत त्यांच्याजवळून आकाशात निघून गेल्यावर ते मेंढपाळ एकमेकांना म्हणाले,
“आपण आताच बेथलेहेमला जाऊ, आणि ही जी गोष्ट घडली आहे, आणि प्रभूनं आपल्याला कळवली आहे ती आपण बघू या.”
१६तेव्हा ते घाईने आले, आणि त्यांना मरिया व योसेफ आणि गव्हाणीत ठेवलेले बाळ आढळले. १७आणि त्यांनी त्यांना बघितले तेव्हा त्यांना ह्या मुलाविषयी जी गोष्ट सांगण्यात आली होती ती त्यांनी तेथे सांगितली; १८आणि मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून त्या ऐकणार्‍या सर्वांनी आश्चर्य केले. १९पण मरियेने त्या सर्व गोष्टी आपल्या मनात साठवून त्यांवर मनन केले. २०आणि मेंढपाळ त्यांना सांगितल्याप्रमाणे, त्या सर्व गोष्टी ऐकून व बघून, देवाचे गौरव व स्तवन करीत परत गेले.

२१आणि त्याची सुनत करण्याकरता आठ दिवस पूर्ण झाल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले; तो पोटी संभवण्याआधी देवदूताने त्याचे ते नाव ठेवले होते.

२२आणि, मोशेच्या नियमशास्त्रानुसार ते आपल्या शुद्धिकरणाचे दिवस पूर्ण झाल्याबरोबर त्याला यरुशलेमला घेऊन आले, ह्यासाठी की, त्याला परमेश्वराला समर्पण करावे; २३(कारण परमेश्वराच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, गर्भाशय उघडणारा प्रत्येक नरवत्स परमेश्वरासाठी पवित्र म्हटला जावा;) २४आणि,परमेश्वराच्या नियमशास्त्रात म्हटल्याप्रमाणे  ‘होल्यांची एक जोडी किवा पारव्यांची दोन पिले’ ह्यांचे बलिदान अर्पण करावे.

२५तेव्हा बघा, यरुशलेमात शिमोन नावाचा एक मनुष्य होता; आणि तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य इस्राएलाच्या सांत्वनाची प्रतीक्षा करीत होता; आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता. २६आणि तो प्रभूच्या अभिषिक्ताला बघण्याअगोदर मरण बघणार नाही, अशी त्याला पवित्र आत्म्याकडून सूचना मिळाली होती. २७तो आत्म्याने प्रेरित होऊन मंदिरात आला; आणि, जेव्हा आईबाप बाळ येशूला नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे त्याच्यासाठी करण्याकरता, आत घेऊन आले, २८तेव्हा त्याने त्याला आपल्या हातांवर घेतले आणि देवाचा धन्यवाद गाऊन म्हटले,
२९“स्वामी, तू आपल्या वचनानुसार आता, आपल्या दासाला शांतीनं जाऊ देत आहेस.
३०-३१कारण जे तुझं तारण,
तू सर्व राष्ट्रांसमोर सिद्ध केलं आहेस,
ते माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे.
३२ते इतर राष्ट्रांना प्रकटीकरणासाठी प्रकाश,
आणि तुझ्या राष्ट्राचं, इस्राएलाचं गौरव आहे.”
३३आणि त्याच्याविषयी बोलण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याच्या बापाने व त्याच्या आईने आश्चर्य केले. ३४आणि शिमोनाने त्याला आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला तो म्हणाला,
“बघ, ह्याला इस्राएलातल्या पुष्कळ जणांच्या पडण्यासाठी आणि पुन्हा उठण्यासाठी, आणि ज्याच्या विरुद्ध बोलतील असं चिन्ह म्हणून, नेमलं आहे. ३५आणि शिवाय, एक तरवार तुझ्या जिवातून पार जाईल, म्हणजे पुष्कळ मनांचे विचार प्रगट होतील.”
३६आणि तेथे हन्ना ही एक संदेष्ट्री होती. ती आशेर वंशातील फनुएलाची कन्या होती. ती फार वयातीत होती व आपल्या कौमार्यकाळापासून ती आपल्या पतीबरोबर सात वर्षे राहिली होती. ३७ती आता, चौर्‍याऐंशी वर्षांची विधवा होती आणि मंदिर सोडून जात नसे. पण ती उपास व प्रार्थना करून सेवा करी. ३८ती त्याच घटकेस पुढे आली; तिने देवाचे उपकार मानले व जे यरुशलेमच्या मुक्तीची प्रतीक्षा करीत होते अशा सर्वांबरोबर ती त्याच्याविषयी बोलली.
३९आणि परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार त्यांनी सर्व पूर्ण केल्यावर, ते गालिलात आपल्या नासरेथ गावी परत आले.
४०आणि मुलगा वाढला, बलवान झाला व ज्ञानीपणाने भरला; आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.

४१आणि त्याचे आईबाप प्रत्येक वर्षी वल्हांडण सणाला यरुशलेमला जात असत. ४२आणि त्या सणाच्या परिपाठाप्रमाणे तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते वर गेले. ४३आणि, त्यांनी ते दिवस पूर्ण केल्यावर ते परत निघाले,  तेव्हा, तो मुलगा येशू यरुशलेमला मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. ४४पण तो वाटसरू मंडळीत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालले, आणि त्यांनी आपल्या आप्तांत व ओळखीच्यांत त्याचा शोध केला; ४५आणि तो त्यांना सापडला नाही, तेव्हा त्याचा शोध करीत ते यरुशलेमकडे निघाले.
४६आणि असे झाले की, तीन दिवसांनी, त्यांना तो मंदिरात, गुरुजनांच्या मध्यभागी, त्यांचे ऐकत व त्यांना प्रश्न विचारीत बसलेला आढळला. ४७आणि जे त्याचे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीमुळे व उत्तरांमुळे चकित होत होते.
४८आणि त्यांनी त्याला बघितले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले, आणि त्याची आई त्याला म्हणाली,
“बाळ, तू आमच्याशी असा का वागलास? बघ, तुझे पिता आणि मी दुःखित होऊन तुला शोधीत होतो.”
४९आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही मला शोधीत होता हे कसं? मी माझ्या पित्याच्या घरात असलो पाहिजे हे तुम्ही ओळखलं नाही काय?”
५०पण तो जे त्यांना बोलला ते बोलणे त्यांना समजले नाही.

५१मग तो त्यांच्याबरोबर खाली गेला, आणि नासरेथला राहिला; आणि त्यांना आज्ञांकित राहिला. पण त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात बाळगल्या.
५२आणि येशू ज्ञानीपणात व शारीरिक वाढीत आणि देवाच्या व मनुष्यांच्या कृपेत वाढत गेला.        

—–लूक ३—–

आता कैसर तिबिर्यस ह्याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात हा यहुदियाचा सुभेदार होता, हेरोद गालिलाचा मांडलिक होता; त्याचा भाऊ फिलिप हा इत्तुरियाचा व त्राखोनिती प्रांताचा मांडलिक होता, आणि लुसुनियस हा अबिलेनेचा मांडलिक होता, आणि हन्ना व कयफा हे श्रेष्ठ याजक होते. तेव्हा जखर्याचा पुत्र योहान ह्याला अरण्यात देवाचे वचन प्राप्त झाले; आणि यार्देनेच्या आसपासच्या सर्व प्रांतात तो पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत प्रगट झाला. यशया संदेष्ट्याच्या वचनांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे,
‘तो रानात ओरडणार्‍याचा आवाजः
प्रभूचा मार्ग तयार करा,
त्याच्या वाटा नीट करा;
प्रत्येक दरी भरली जाईल,
प्रत्येक डोंगर आणि टेकडी पाडण्यात येईल,
वाकडे नीट होतील,
आणि खडबडीत मार्ग सपाट होतील,
आणि सर्व देही देवाचे तारण पाहतील.’
म्हणून जे लोकांचे घोळके त्याच्याकडून बाप्तिस्मा घ्यायला येत त्यांना तो म्हणत असे,
“अहो तुम्ही सर्पिणींच्या पिलांनो, येणार्‍या क्रोधापासून पळायला कोणी तुम्हाला सावध केलं? तर पश्चात्तापाला शोभतील अशी फळं द्या, आणि अब्राहाम आमचा पिता आहे असं आपल्या मनात म्हणायला लागू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, देव ह्या दगडांमधून अब्राहामाची मुलं उठवायला समर्थ आहे. आणि, आताच, झाडांच्या मुळांशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; म्हणून जे चांगलं फळ देत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकलं जाईल.”
१०तेव्हा लोक त्याला विचारीत आणि म्हणत,
“तर मग आम्ही काय करावं?”
११आणि तो त्यांना उत्तर देऊन म्हणे,
“ज्याच्याजवळ दोन झगे आहेत त्यानं ज्याच्याजवळ एकही नाही त्याला द्यावा; आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्यानंही तसंच करावं.”
१२आणि जकातदारही बाप्तिस्मा घ्यायला येत, आणि ते त्याला म्हणत,
“गुरू, आम्ही काय करावं?”
१३आणि तो त्यांना म्हणे,
“तुम्हाला ठरवण्यात आलं असेल त्यापेक्षा अधिक घेऊ नका.”
१४आणि शिपाईही त्याला प्रश्न करून म्हणत,
“आणि आम्ही काय करावं?”
आणि तो त्यांना म्हणे,
“कोणावर जुलुम करू नका, किवा खोटा आरोप करू नका, पण तुमच्या पगारात संतुष्ट रहा.”
१५आणि लोक वाट पहात असता, आणि सर्व लोक आपल्या मनात, योहानाविषयी, ‘हाच ख्रिस्त असेल काय?’,असा विचार करीत असता, योहान सर्वांना उत्तर देऊन म्हणे,
“मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं करतो, पण जो येणार आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे; १६मी त्याच्या वहाणा काढायला लायक नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं आणि अग्नीनं करील. १७आपलं खळं नीट स्वच्छ करायला आणि गहू आपल्या कोठारात साठवायला त्याच्या हातात त्याचं सूप आहे; पण भूस तो न विझणार्‍या अग्नीत जाळील.”
१८तो दुसर्‍या पुष्कळ बोधाच्या गोष्टींद्वारे लोकांना अशा प्रकारे सुवार्ता सांगत असे.

१९पण त्याने हेरोद मांडलिकाला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी व हेरोदाने केल्या होत्या त्या सर्व वाईट गोष्टींविषयी दोष लावला असल्यामुळे, २०त्याने सर्वांत ही आणखी भर घातली की, त्याने योहानाला तुरुंगात कोंडले.

२१आता, असे झाले की, सर्व लोकांचा बाप्तिस्मा झाल्यावर येशूचाही बाप्तिस्मा झाला आणि, तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले, २२आणि पवित्र आत्मा कबुतरासारखा, शारीरिक रूपात, त्याच्यावर उतरला, आणि आकाशातून वाणी झाली,
‘तू माझा प्रिय पुत्र आहेस.’

२३आणि येशूने सेवेला आरंभ केला, तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. तो योसेफाचा पुत्र होता असे समजत. तो एलीचा, २४तो मत्थाताचा, तो लेवीचा, तो मलखीचा, तो यन्नायाचा, तो योसेफाचा, २५तो मत्तथ्याचा, तो आमोसाचा, तो नहूमाचा, तो हेस्लीचा, तो नग्गयाचा, २६तो महथाचा, तो मत्तथ्याचा, तो शमेनाचा, तो योसेखाचा, तो योदाचा, २७तो योहानानाचा, तो रेशाचा, तो जरुब्बाबेलाचा, तो शल्तीएलाचा, तो नेरीचा, २८तो मलखीचा, तो अद्दीचा, तो कोसामाचा, तो एल्मदामाचा, तो एराचा, २९तो येशूचा, तो एलिएझराचा, तो योरिमाचा, तो मत्थाताचा, तो लेवीचा, ३०तो शिमोनाचा, तो यहुदाचा, तो योसेफाचा, तो योनामाचा, तो एल्याकिमाचा, ३१तो मलआचा, तो मन्नाचा, तो मत्ताथाचा, तो नाथानाचा, तो दाविदाचा,
३२तो इशायाचा, तो ओबेदाचा, तो बवाजाचा, तो सलमोनाचा, तो नहशोनाचा, ३३तो अम्मिनादाबाचा, तो अद्मिनाचा, तो अर्णयाचा, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहुदाचा, ३४तो याकोबाचा, तो इसहाकाचा, तो अब्राहामाचा, तो तेरहाचा, तो नाहोराचा, ३५तो सरूगाचा, तो रऊचा, तो पेलेगाचा, तो एबराचा, तो शेलहाचा, ३६तो केनानाचा, तो अर्पक्षदाचा, तो शेमाचा, तो नोहाचा, तो लामेखाचा, ३७तो मथूशलहाचा, तो हनोखाचा, तो यारेदाचा, तो महलललाचा, तो केनानाचा, ३८तो अनोशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा होता, तो देवाचा होता.                     

—–लूक ४—–

आणि, पवित्र आत्म्याने भरलेला येशू यार्देनेकडून परतला व आत्म्याने त्याला रानात नेले; आणि चाळीस दिवस सैतानाकडून त्याची परीक्षा झाली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही, आणि ते पूर्ण झाल्यावर त्याला त्यानंतर भूक लागली.
आणि सैतान त्याला म्हणाला,
“तू जर देवाचा पुत्र आहेस, तर ह्या दगडाची भाकर व्हावी म्हणून ह्याला आज्ञा कर.”
आणि येशूने त्याला उत्तर दिले,
“ ‘मनुष्य केवळ भाकरीने वाचणार नाही’, असं लिहिलं आहे.”
आणि त्याने त्याला वर नेले व त्याला काळाच्या एका निमिषात जगातली सर्व राष्ट्रे दाखवली. आणि सैतान त्याला म्हणाला,
“मी तुला ही सर्व सत्ता आणि ह्यांचं वैभव देईन, कारण ती माझ्या हाती दिलेली आहे, आणि मला वाटेल त्याला मी ती देतो. तू जर माझ्यापुढं नमन करशील तर मी तुला हे सर्व देईन.”
आणि येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“ ‘तू आपला देव परमेश्वर ह्याला नमन कर आणि केवळ त्याचीच उपासना कर’, असं लिहिलं आहे.”
तेव्हा त्याने त्याला यरुशलेमला नेले व मंदिराच्या एका वरच्या टोकावर उभे केले, आणि त्याला म्हटले,
“तू जर देवाचा पुत्र आहेस तर इथून खाली उडी टाक; १०कारण असं लिहिलं आहे की, ‘तो तुझे रक्षण करायला तुझ्याविषयी आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल, ११आणि तू आपला पाय दगडावर आदळू नयेस म्हणून ते तुला आपल्या हातांवर घेतील.’ ”
१२आणि येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“ ‘तू आपला देव परमेश्वर ह्याची परीक्षा करू नकोस’, असं म्हटलं आहे.”
१३आणि सैतानाने सर्व परीक्षा पूर्ण केल्यावर तो त्याला काही काळ सोडून गेला.

१४आणि येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलास आला व आसपासच्या सर्व प्रांतात त्याची कीर्ती पसरली. १५त्याने त्यांच्या सभास्थानांत शिकविले आणि सर्वांकडून त्याचे गौरव झाले.

१६आणि जेथे त्याचे पालनपोषण झाले त्या नासरेथला तो आला; आणि तो आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. १७आणि तेथे त्याला यशया संदेष्ट्याचे पुस्तक देण्यात आले, आणि त्याने ते पुस्तक उघडून जे स्थळ काढले तेथे असे लिहिले होते,
१८‘प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे.
कारण मी दीनांना सुवार्ता सांगावी
ह्याकरता त्याने मला अभिषेक केला आहे.
आणि ह्याकरता पाठविले आहे की,
मी अटकेतल्यांना सुटका
आणि अंधळ्यांना दृष्टी विदित करावी;
जे ठेचले जात आहेत त्यांना सोडवावे;
१९प्रभूचे अनुकूल वर्ष गाजवावे.’
२०मग त्याने ते पुस्तक मिटले आणि कामदाराला परत दिले, आणि तो खाली बसला. आणि जे सर्व जण सभास्थानात होते त्यांचे डोळे त्याच्याकडे लागले. २१आणि तो त्यांच्याशी बोलू लागला की, “आज तुमच्या श्रवणात हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे”. २२आणि सर्वांनी त्याला ग्वाही दिली, आणि त्याच्या मुखावाटे जी कृपेची वचने निघाली त्यांवरून त्यांनी आश्चर्य केले; आणि ते म्हणाले,
“हा योसेफाचा मुलगा नाही काय?”
२३आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही निश्चित ही म्हण मला लावाल, ‘वैद्या, स्वतःला बरं कर; जे कपर्णहूमला झालं म्हणून ऐकलं, ते इथं स्वतःच्या देशात कर.’ ”
२४आणि तो म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या देशात कधी मान्य होत नाही. २५पण मी तुम्हाला खरं सांगतो, एलियाच्या दिवसांत साडेतीन वर्षं आकाश बंद होतं. आणि सर्व देशभर मोठा दुष्काळ उद्भवला, तेव्हा इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या; २६तरी एलियाला त्यांच्यातल्या एकीकडेही नाही पण सिदोनातल्या सारफथला, एका विधवा बाईकडे धाडलं होतं. २७तसेच अलीशा संदेष्ट्याच्या काळात इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते; तरी सूरियातल्या नामानाशिवाय त्यांच्यातला एकही शुद्ध झाला नाही.”
२८तेव्हा ह्या गोष्टी ऐकून सभास्थानात सर्व जण रागाने भरून २९उठले,  त्यांनी त्याला नगरातून बाहेर काढले, आणि त्यांचे नगर ज्या डोंगरावर बांधले होते त्याच्या कड्याकडे, ते त्याला कड्यावरून लोटायला घेऊन गेले. ३०पण त्यांच्यामधून चालू लागून तो आपल्या मार्गाने गेला.

३१आणि तो खाली, गालिलातील कपर्णहूम गावी होता, आणि शब्बाथ दिवशी तो त्यांना शिकवीत होता; ३२आणि ते त्याच्या शिक्षणाने थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. ३३आणि ज्याच्यात एका अशुद्ध भुताचा आत्मा होता असा एक मनुष्य सभास्थानात होता आणि तो मोठ्या आवाजात ओरडला,
३४“अरे नासरेथकर येशू, तुला आमच्याशी काय करायचं आहे? तू आम्हाला नष्ट करायला आलास काय? तू कोण आहेस हे मी जाणतो; देवाचा पवित्र तू आहेस.”
३५पण येशूने त्याला दटावून म्हटले,
“तोंड बंद कर आणि ह्याच्यामधून बाहेर नीघ.”
तेव्हा भुताने त्याला मध्यभागी खाली पाडल्यावर ते त्याला उपद्रव न करता त्याच्यामधून बाहेर निघाले.
३६तेव्हा सर्व जण आश्चर्य पावले व एकमेकांशी बोलून म्हणाले,
“काय हे बोलणं आहे? कारण हा अधिकारानं आणि सामर्थ्यानं अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघतात.”
३७आणि आसपासच्या प्रांतात प्रत्येक ठिकाणी त्याची कीर्ती पसरली.

३८मग तो सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी आला, आणि शिमोनाच्या सासूला कडक तापाने पछाडले होते व त्यांनी त्याला तिच्याकरता विनंती केली. ३९आणि त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले; तेव्हा तिच्यामधून ताप निघाला; आणि, तिने लगेच उठून त्यांची सेवा केली.
४०मग सूर्य मावळत आला, तेव्हा ज्या सर्वांकडे जे जे कोणी नाना रोगांनी आजारी होते त्यांना त्यांनी त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवले व त्यांना बरे केले. ४१आणि भुतेदेखील पुष्कळ जणांतून बाहेर निघत, आणि ओरडून म्हणत, ‘तू देवाचा पुत्र आहेस’. पण त्यांना दटावून त्याने त्यांना बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहीत होते.

४२आणि दिवस उगवताच तो निघाला व रानातल्या एका जागी गेला; आणि लोक त्याचा शोध करीत त्याच्याकडे गेले, आणि त्याने आपल्याकडून जाऊ नये म्हणून त्यांनी त्याला आडवले असते. ४३पण तो त्यांना म्हणाला,
“मला इतर नगरांतपण देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे; कारण त्यासाठीच मला पाठवलं आहे.”
४४मग तो यहुदियातील सभास्थानांत घोषणा करीत गेला.                               

—–लूक ५—–

आणि असे झाले की, लोक त्याच्याजवळ गर्दी करून देवाची वचनं ऐकत असता तो गनेसरेतच्या सरोवराजवळ उभा होता. आणि त्याने सरोवराजवळ दोन मचवे उभे असलेले बघितले; पण कोळी त्यांवरून बाहेर आले होते व आपली जाळी धूत होते. तो त्यांतील एका मचव्यात चढला; तो शिमोनाचा होता आणि तो त्याने किनार्‍याजवळून थोडा मागे लोटावा म्हणून त्याने त्याला विनंती केली. मग तो खाली बसला व त्याने मचव्यावरून लोकांना शिकवले.
आणि त्याने बोलणे समाप्त केल्यावर तो शिमोनाला म्हणाला,
“खोल पाण्यात मागं घेऊन जा, आणि मासे धरायला तुमची जाळी सोडा.”
शिमोनाने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“स्वामी, आम्ही रात्रभर दमलो, आणि काही धरलं नाही, पण आपल्या शब्दावरून मी जाळं सोडतो.”
आणि त्याने ते केले, तेव्हा माशांचा एक मोठा घोळका त्यांनी एकत्र धरला आणि जाळे फाटले. तेव्हा त्याचे जे वाटेकरी दुसर्‍या मचव्यांत होते त्यांनी येऊन आपल्याला मदत करावी म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. आणि ते आले व त्यांनी दोन्ही मचवे भरले; त्यामुळे ते बुडू लागले. शिमोन पेत्राने हे बघितल्यावर तो येशूच्या गुडघ्यांशी पालथा पडला, आणि म्हणाला,
“माझ्याजवळून निघून जा; कारण मी पापी मनुष्य आहे, प्रभू!”
९-१०कारण तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व जण व शिमोनाचे भागीदार, जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान हे त्यांनी धरलेल्या माशांच्या घोळक्यामुळे आश्चर्यचकित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला,
“भिऊ नको, ह्यापुढं तू माणसं धरशील.”
११आणि त्यांनी आपले मचवे किनार्‍यावर आणले. तेव्हा त्यांनी सर्व सोडले आणि ते त्याच्यामागे गेले.

१२आणि असे झाले की, तो एका नगरात असता, बघा, कुष्ठाने भरलेला एक मनुष्य; आणि त्याने येशूला बघितले तेव्हा तो आपल्या तोंडावर पालथा पडला व त्याने त्याला विनंती करून म्हटले,
“प्रभू, आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करू शकाल.”
१३तेव्हा त्याने आपला हात पुढे करून त्याला धरले, आणि म्हटले,
“माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”
आणि लगेच त्याच्यावरून कुष्ठ निघाले. १४आणि त्याने त्याला निक्षून सांगितले की,
“हे कोणाला सांगायचं नाही, पण जा, आणि स्वतःला याजकाला दाखव, आणि त्यांना साक्ष म्हणून, तुझ्या शुद्धिकरणासाठी मोशेनं नेमल्याप्रमाणं अर्पण ने.”
१५पण त्याची कीर्ती तितकी अधिक पसरली; आणि, लोकांचे मोठाले घोळके ऐकायला व आपले व्याधी बरे करून घ्यायला एकत्र येऊ लागले. १६पण तो रानात एकीकडे जाऊन प्रार्थना करी.

१७आणि असे झाले की, तो एक दिवशी शिकवीत असता, गालिलातल्या व यहुदियातल्या प्रत्येक गावाहून व नगराहून तेथे आलेले परोशी व नियमशास्त्राचे शिक्षक तेथे बसले होते, आणि रोग बरे करायला त्याच्यात प्रभूचे सामर्थ्य होते. १८आणि बघा, काही लोक, एका खाटल्यावर एका पक्षघात झालेल्या मनुष्याला घेऊन गेले. आणि ते त्याच्यापुढे त्याला ठेवायला आत नेऊ पहात होते. १९पण त्यांना त्याला आत न्यायला गर्दीमुळे कुठे वाट सापडेना; तेव्हा ते छपरावर चढले, आणि त्यांनी कौलांमधून त्याला त्याच्या अंथरुणासकट खाली, मध्यभागी, येशूसमोर सोडले. २०आणि त्याने त्यांचा विश्वास बघून म्हटले,
“गड्या, तुला तुझ्या पापांची क्षमा केली गेली आहे.”
२१तेव्हा ते शास्त्री व परोशी विचार करू लागले व म्हणाले,
“हा दुर्भाषण बोलणारा कोण आहे? कोण एका देवाशिवाय पापांची क्षमा करू शकतो?”
२२पण येशूने त्यांचे विचार जाणून त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“तुम्ही काय आपल्या मनात विचार करता? २३‘तुला तुझ्या पापांची क्षमा केली आहे’ असं म्हणणं, किंवा ‘ऊठ आणि चाल’ असं म्हणणं अधिक सोपं आहे? २४पण मनुष्याच्या पुत्राला, पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावं म्हणून,”
(तो त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला,)
“मी तुला सांगतो, ऊठ, तुझं अंथरूण उचल आणि तुझ्या घरी जा.”
२५आणि लगेच तो त्यांच्यापुढे उठला, तो ज्यावर पडला होता ते त्याने उचलले, आणि देवाचे गौरव करीत तो आपल्या घरी निघून गेला. २६तेव्हा ते सर्व जण आश्चर्याने भारावले व त्यांनी देवाचे गौरव केले; आणि ते भयभीत होऊन म्हणाले, ‘आज आम्ही विलक्षण गोष्टी बघितल्या’.

२७आणि ह्या गोष्टीनंतर तो बाहेर निघाला, आणि त्याला लेवी नावाचा एक जकातदार जकातनाक्यावर बसलेला दिसला. आणि तो त्याला म्हणाला,
“माझ्यामागं ये.”
२८तेव्हा त्याने सर्व सोडले; आणि तो उठला व त्याच्यामागे गेला.
२९आणि लेवीने त्याच्यासाठी आपल्या घरी मोठी जेवणावळ केली. आणि जकातदारांचा व इतरांचा एक मोठा जमाव त्यांच्या पंगतीला बसला होता. ३०तेव्हा परोश्यांनी व त्यांच्या शास्त्र्यांनी त्याच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर केली आणि ते त्यांना म्हणाले,
“तुम्ही जकातदारांच्या आणि पाप्यांच्या पंगतीला का खाता पिता?”
३१आणि येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“निरोग्यांना वैद्याची गरज नाही, पण रोग्यांना आहे. ३२मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही, पण पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो.”

३३आणि ते त्याला म्हणाले,
“योहानाचे शिष्य वारंवार उपास करतात आणि प्रार्थना करतात; तसेच परोश्यांचे शिष्य करतात, पण आपले खातात आणि पितात?”
३४आणि येशू त्यांना म्हणाला,
“वर्‍हाड्यांबरोबर वर असताना तुम्ही त्यांना उपास करायला लावू शकाल काय? ३५पण ते दिवस येतील; आणि वर त्यांच्यामधून काढला जाईल;  आणि तेव्हा, त्या दिवसांत, ते उपास करतील.”
३६आणि त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला,
“कोणी नव्या कपड्यातून ठिगळ फाडून जुन्या कपड्यावर लावीत नाही; नाहीतर, तो नवं फाडील आणि नव्यातलं ठिगळ जुन्याशी जुळणार नाही.
३७“आणि कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत भरीत नाही; नाहीतर, तो नवा द्राक्षारस बुधले फोडील आणि बाहेर पडेल, आणि बुधल्यांचा नाश होईल. ३८पण नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत भरला पाहिजे.
३९“आणि कोणी जुना प्याल्यावर नवा इच्छीत नाही. कारण तो म्हणतो, ‘जुना चांगला आहे’.”

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s