Luke 11-15

संत लूक ह्याचे शुभवर्तमान

—–लूक ११—–

आणि असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता, आणि त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला,
“प्रभू, योहानानं त्याच्या शिष्यांना जसं प्रार्थना करायला शिकवलं, तसं आपण आम्हाला शिकवा.”
आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा म्हणा,
‘हे पित्या,
तुझे नाव पवित्र मानिले जावो,
तुझे राज्य येवो,
आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे;
आणि आमच्या पापांची
आम्हाला क्षमा कर,
कारण आम्हीही आमच्या
प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो,
आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस.’ ”

आणि तो त्यांना म्हणाला,
“तुमच्यात कोणाला कोणी मित्र असेल आणि तो मध्यरात्री त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणेल, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासात माझ्याकडे उतरला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही.’ आणि तो आतून उत्तर देऊन म्हणेल, ‘मला त्रास देऊ नकोस; आता दार बंद आहे, आणि माझी मुलं माझ्याबरोबर अंथरुणात आहेत. तुला द्यायला मला उठता येत नाही.’ मी तुम्हाला सांगतो की, तो त्याचा मित्र आहे म्हणून जरी तो उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळं उठेल आणि त्याला लागतील तितक्या देईल. आणि मी तुम्हाला सांगतो, मागा, आणि ते तुम्हाला दिलं जाईल; शोधा, आणि तुम्हाला सापडेल; ठोका, आणि तुमच्यासाठी उघडलं जाईल. १०कारण जो कोणी मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला सापडतं, आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जाईल. ११तुमच्यात कोण बाप असा आहे की, त्याचा मुलगा त्याच्याजवळ भाकर मागेल तर तो त्याला दगड देईल? आणि मासा मागेल तर तो त्याला माशाऐवजी साप देईल? १२किंवा तो अंडं मागेल तर तो त्याला विचू देईल? १३मग तुम्ही वाईट असून जर आपल्या मुलांना चांगल्या देणग्या कशा द्याव्यात हे तुम्ही जाणता तर तुमचा स्वर्गीय पिता त्याच्याजवळ जे मागतात त्यांना किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”

१४आणि तो एक भूत काढीत होता ते मुके होते, आणि असे झाले की, ते भूत बाहेर निघाले तेव्हा मुका बोलू लागला, आणि लोकांनी आश्चर्य केले. १५पण त्यांच्यातले कित्येक जण म्हणाले, ‘हा भुतांचा अधिपती जो बालजबूल, त्याच्या साह्यानं भुतं काढतो.’ १६दुसर्‍यांनी आपण त्याची परीक्षा करावी म्हणून त्याच्याकडून आकाशातून चिन्ह मागितले. १७पण त्याने त्यांचे विचार जाणून त्यांना म्हटले,
“स्वतःविरुद्ध फुटलेलं राज्य उजाड होतं; आणि घराविरुद्ध घर पडतं. १८सैतानही स्वतःविरुद्ध फुटला तर त्याचं राज्य कसं टिकेल? कारण तुम्ही म्हणता, मी बालजबूलच्या साह्यानं भुतं काढतो. १९आणि मी जर बालजबूलच्या साह्यानं भुतं काढतो तर तुमचे पुत्र कुणाच्या साह्यानं काढतात? म्हणून ते तुमचे न्यायाधीश होतील. २०पण, मी देवाच्या बोटानं भुतं काढीत असेन तर देवाचं राज्य तुमच्यावर आलं आहे.
२१“जेव्हा कोणी बलवान मनुष्य शस्त्रं धारण करून, आपल्या वाड्याचं रक्षण करतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित असते; २२पण त्याच्याहून अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर चालून येऊन, त्याला जिंकतो, त्यावेळी ज्या शस्त्रसामग्रीवर त्यानं भिस्त ठेवली होती ती तो काढून घेतो आणि त्याची लूट करतो.
२३“जो माझ्या बाजूला नाही तो माझ्या विरुद्ध आहे; जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखरतो.
२४“जेव्हा एखाद्या मनुष्यामधून अशुद्ध आत्मा बाहेर निघतो तेव्हा तो विसावा शोधीत निर्जल ठिकाणांमधून फिरतो, आणि तो त्याला मिळत नाही तेव्हा तो म्हणतो, ‘मी जिथून बाहेर आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन’. २५आणि तो येतो तेव्हा ते त्याला झाडलेलं आणि सजवलेलं आढळतं. २६मग तो जातो आणि आपल्यापेक्षा दुष्ट असलेले आणखी सात आत्मे आपल्याबरोबर घेतो; आणि ते आत जाऊन तिथं राहतात. मग त्या मनुष्याची शेवटची स्थिती पहिल्या स्थितीपेक्षा अधिक वाईट होते.”
२७आणि असे झाले की, तो ह्या गोष्टी बोलत असता, गर्दीतली एक स्त्री आपला आवाज चढवून त्याला म्हणाली,
“तुझा भार ज्यानं वाहिला ते उदर, आणि तू चोखलीस ती स्तनं धन्य!”
२८पण तो म्हणाला,
“उलट जे देवाचं वचन ऐकतात आणि पाळतात ते धन्य!”

२९आणि लोक गर्दीने एकत्र जमले तेव्हा तो बोलू लागला,
“ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते; पण योनाच्या चिन्हाशिवाय तिला कोणतंच चिन्ह दिलं जाणार नाही. ३०कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला, तसाच मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. ३१दक्षिणेची राणी, न्यायाच्या वेळी, ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठेल आणि ह्यांना दोषी ठरवील; कारण ती पृथ्वीच्या सीमेपासून शलमोनाचं ज्ञानीपण ऐकायला आली; आणि बघा, शलमोनापेक्षा इथं काही अधिक आहे. ३२निनवेचे लोक, न्यायाच्या वेळी, ह्या पिढीबरोबर उठतील आणि तिला दोषी ठरवतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला; आणि बघा, योनापेक्षा इथं काही अधिक आहे.
३३“कोणीही मनुष्य दिवा पेटवून तो तळघरात किंवा मापाखाली ठेवीत नाही, पण आत येणार्‍यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. ३४तुझा डोळा तुझ्या शरिराचा दिवा आहे. तुझा डोळा नीट असेल तेव्हा तुझं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल, पण तो वाईट असेल तेव्हा तुझं शरीरही अंघकारमय होईल. ३५म्हणून तुझ्यातला प्रकाश अंधार नसेल काय हे पहा. ३६जर तुझं संपूर्ण शरीर प्रकाशमय असेल आणि कोणताही अवयव अंघकारमय नसेल, तर दिवा त्याच्या उज्वल प्रकाशानं जसा तुला प्रकाश देतो तसं ते पूर्ण प्रकाशमय होईल.”

३७आणि एक परोशी, तो हे बोलत असता, त्याला आपल्याकडे भोजन करायची विनंती करतो. तेव्हा तो आत जाऊन भोजनास बसला. ३८आणि जेव्हा त्या परोश्याने बघितले की, त्याने भोजनापूर्वी, प्रथम हात धुतले नाहीत तेव्हा त्याने आश्चर्य केले. ३९तेव्हा प्रभू त्याला म्हणाला,
“तुम्ही परोशी आपले थाळे आणि प्याले बाहेरून स्वच्छ करता, पण तुमचा अंतर्भाग अपहार आणि दुष्टभाव ह्यांनी भरलेला आहे. ४०अहो निर्बुद्धी, ज्यानं बाहेरची बाजू केली त्यानंच आतली बाजूही केली ना?  ४१पण, उलट, तुमच्याजवळ असेल त्यातून दयेच्या देणग्या द्या; आणि बघा, तुम्हाला सर्व गोष्टी शुद्ध आहेत.
४२“पण तुम्ही परोशी, तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही पुदिना, सताप, आणि सर्व प्रकारच्या भाज्या ह्यांचा दशमांश देता; पण न्याय आणि देवाची प्रीती वगळता. पण तुम्ही ह्या करायच्या होत्या आणि दुसर्‍या सोडायच्या नव्हत्या. ४३तुम्ही परोशी, तुम्हाला हळहळ! कारण तुम्हाला सभास्थानांत पुढच्या जागा आणि बाजारांत मुजरे घेणं आवडतं. ४४अहो ढोंगी, शास्त्री आणि परोशी,  तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही न दिसणार्‍या कबरांसारखे आहा; आणि जे लोक वरून चालतात त्यांना त्या दिसत नाहीत.”
४५तेव्हा एक शास्त्री त्याला उत्तर देऊन म्हणतो,
“गुरू, आपण हे बोलून आमचीपण हेलना करता.”
४६आणि तो म्हणाला,
“तुम्ही शास्त्री, तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही वहायला अवजड ओझी माणसांवर लादता, आणि तुम्ही स्वतः त्या ओझ्याला तुमच्या एका बोटानंही स्पर्श करीत नाही. ४७तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता, आणि तुमच्या पूर्वजांनी त्यांना मारलं. ४८तर तुम्ही साक्षी होऊन, त्या तुमच्या पूर्वजांच्या कृत्यांना संमती देता, कारण त्यांनी त्यांना ठार मारलं आणि तुम्ही त्यांची थडगी बांधता. ४९म्हणून देवाची सुज्ञतापण म्हणाली, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन; आणि ते त्यांच्यातल्या काहींना ठार मारतील, आणि काहींचा पाठलाग करतील.’ ५०-५१म्हणून जगाच्या स्थापनेपासून, हबेलाच्या रक्तापासून, ज्याला वेदी आणि मंदिर ह्यांच्या मध्यंतरी मरण आलं त्या जखर्याच्या रक्तापर्यंत, ओतलं गेलेलं, सर्व संदेष्ट्यांचं रक्त ह्या पिढीकडून मागितलं जाईल; हो, मी तुम्हाला सांगतो, ते ह्या पिढीकडून मागितलं जाईल. ५२अहो तुम्ही शास्त्री,  तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली उचललीत. तुम्ही स्वतः आत गेला नाही, आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही अडवलंत.”
५३आणि तो तेथून बाहेर आला तेव्हा शास्त्री व  परोशी त्याच्यावर चवताळून आले, आणि त्याने अधिक बोलावे म्हणून ते त्याला चिडवू लागले. ५४आणि त्याच्या तोंडचे काही धरता येईल ह्याकरता त्याच्यावर टपून राहिले.                            

—–लूक १२—–

तेथे मध्यंतरी इतके अगणित लोक जमले की, ते एकमेकांना तुडवू लागले. तेव्हा तो प्रथम, आपल्या शिष्यांना म्हणाला,
“तुम्ही परोश्यांच्या खमिराविषयी जपा; ते ढोंग आहे. पण प्रकट होणार नाही असं काही झाकलेलं नाही, आणि कळणार नाही असं गुप्त ठेवलेलं नाही. तर तुम्ही जे काही अंधारात बोललात ते उजेडात ऐकू येईल, आणि आतल्या खोल्यांत कानात सांगितलंत ते धाब्यावर गाजवलं जाईल. आणि माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरिराचा वध करू शकतात आणि त्यानंतर अधिक काही करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका,पण तुम्ही कोणाला भ्यावं हे मी तुम्हाला सुचवतो. ज्यानं मारलं असता ज्याला नरकात टाकायचा अधिकार आहे त्याला भ्या. हो, मी तुम्हाला सांगतो, त्याला भ्या. दोन दमड्यांना पाच चिमण्या मिळतात की नाही? आणि त्यातली एकपण देवासमोर विस्मरणात जात नाही. पण तुमच्या डोक्याचे सगळे केसही मोजलेले आहेत. भिऊ नका, तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलाचे आहा.
“आणि मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पतकरील त्याला मनुष्याचा पुत्रदेखील देवाच्या दूतांसमोर पतकरील. पण जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. १०आणि जो कोणीही मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कुठलाही शब्द बोलेल त्याला त्याची क्षमा कोली जाईल, पण जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा केली जाणार नाही. ११आणि ते तुम्हाला सभास्थानांत, न्यायसभांपुढं आणि न्यायालयांत नेतील, तेव्हा आपण कसं किंवा काय उत्तर द्यावं, किंवा काय बोलावं ह्याची काळजी करू नका. १२कारण तुम्ही काय बोललं पाहिजे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला शिकवील.”
१३तेव्हा जमावातला एक जण त्याला म्हणाला,
“गुरू, माझ्या भावानं मला वतन विभागून द्यावं म्हणून आपण त्याला बोला.”
१४पण तो त्याला म्हणाला,
“गड्या, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमलं?”
१५आणि तो त्यांना म्हणाला,
“पहा, आणि सर्व प्रकारच्या लोभांपासून सावध रहा; कारण मनुष्याचं जीवन हे त्याच्या मालमत्तेच्या विपुलतेत नाही.”
१६आणि त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो म्हणाला,
“एका धनवान मनुष्याच्या जमिनीला चांगलं पीक आलं. १७तेव्हा तो मनात विचार करीत म्हणाला, ‘मी काय करू? कारण माझं पीक साठवायला माझ्याजवळ जागा नाही.’ १८आणि तो म्हणाला, ‘मी हे करीन; मी माझी कोठारं पाडून मोठी बांधीन; आणि त्यांत मी माझं सर्व धान्य आणि माझा माल साठवीन. १९आणि माझ्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षांसाठी पुष्कळ माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी आणि आनंद कर.’ २०पण देव त्याला म्हणाला, ‘हे निर्बुद्धी, ह्या रात्री तुझ्याजवळून तुझा जीव मागितला जाईल, मग तू जे काही साठवलं आहेस ते कोणाचं होईल?’ २१जो स्वतःसाठी धन साठवतो, पण देवाकडे सधन नाही तो असा आहे.”
२२आणि तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
“म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या जिवाविषयी, आपण काय खावं अशी किंवा आपल्या शरिराविषयी, आपण काय पेहरावं अशी काळजी करू नका; २३अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. २४ह्या कावळ्यांकडे लक्ष द्या; ते पेरीत नाहीत किंवा कापणीही करीत नाहीत; त्यांना कोठी नाही किंवा कणगी नाही. आणि देव त्यांचं पोषण करतो; मग पक्ष्यांपेक्षा तुम्ही किती अधिक मोलाचे आहा? २५आणि तुमच्यातला कोण काळजी करून आपलं आयुष्य लवभर वाढवू शकेल? २६मग तुम्ही एक लहान गोष्टही करू शकत नाही, तर इतर गोष्टींची काळजी का करता? २७तेरड्यांकडे लक्ष द्या; ते कष्ट करीत नाहीत किवा कातीत नाहीत; तरी मी तुम्हाला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखा सजला नव्हता. २८मग जे रानातलं गवत आज आहे आणि उद्या भट्टीत टाकतील त्याला जर देव असा पेहराव घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो तुम्हाला किती विशेषेकरून घालील? २९आणि आपण काय खावं आणि काय प्यावं ह्याच्यामागं लागू नका, किंवा सचिंत मनाचे होऊ नका. ३०कारण जगातली राष्ट्रं ह्या सर्व गोष्टींच्या मागं लागतील. आणि तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची गरज आहे हे तुमचा पिता जाणतो. ३१पण त्यापेक्षा तुम्ही त्याचं राज्य मिळवू पहा. आणि तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पुरवल्या जातील.
३२“हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हाला राज्य द्यावं हे तुमच्या पित्याला बरं वाटलं आहे.३३तुमच्याजवळ आहे ते विका आणि दयेच्या देणग्या द्या; आणि तुम्ही आपल्यासाठी न फाटणार्‍या थैल्या, न सरणारं धन, स्वर्गात तयार करा. तिथं चोर जात नाही किंवा कसर नाश करीत नाही. ३४कारण जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मनही राहील.
३५“तुम्ही आपल्या कमरा बांधलेल्या आणि दिवे जळत राहू द्या. ३६म्हणजे आपला धनी लग्नाहून परत येईल, आणि येऊन दार ठोकील तेव्हा त्याच्यासाठी आपण उघडावं म्हणून त्याची प्रतीक्षा करणार्‍या मनुष्यांसारखे तुम्ही व्हा. ३७धनी येईल तेव्हा त्याला जे दास जागृत असलेले आढळतील ते धन्य होत. मी तुम्हाला सत्य सांगतो, तो स्वतः आपली कंबर बांधील आणि त्यांना खाली भोजनास बसवून, पुढं येऊन त्यांची सेवा करील. ३८आणि जर तो दुसर्‍या किंवा तिसर्‍या प्रहरी आला आणि त्याला ते तसे आढळले ते धन्य होत. ३९आणि हे जाणा की, कोणत्या घटकेस चोर येईल हे जर घरधनी जाणत असता, तर तो जागृत राहिला असता आणि त्यानं आपलं घर फोडू दिलं नसतं. ४०म्हणून तुम्ही तयार व्हा; कारण तुम्हाला वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”
४१त्यावर पेत्र त्याला म्हणाला,
“प्रभू, तू हा दाखला आम्हाला सांगतोस की, सगळ्यांना सांगतोस?”
४२तेव्हा प्रभू म्हणाला,
“तर ज्याला त्याचा धनी आपल्या परिवारावर त्यांना त्याच्या अन्नाची वाटणी वेळेवर द्यावी म्हणून नेमील तो विश्वासू आणि विचारी कारभारी कोण आहे? ४३जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसं करताना आढळेल तो धन्य. ४४मी तुम्हाला खरोखर सांगतो, तो आपल्या सर्व मालमत्तेवर त्याला नेमील. ४५पण जर तो दास आपल्या मनात म्हणेल की, ‘माझा धनी यायला विलंब लावीत आहे’ आणि दासदासींना मारू लागेल, आणि खाऊन पिऊन झिगेल, ४६तर त्या दासाचा धनी, तो वाट पहात नाही अशा दिवशी आणि जाणत नाही अशा घटकेस येईल, आणि त्याला कापून काढील; आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील. ४७आणि ज्या दासाला धन्याची इच्छा माहीत असून ज्यानं तयारी केली नाही, आणि त्याच्या इच्छेप्रमाणं केलं नाही, त्याला पुष्कळ फटके मारले जातील; ४८पण ज्याला माहीत नव्हती आणि ज्यानं फटक्यांलायक गोष्टी केल्या त्याला थोडे मारले जातील. कारण ज्याला पुष्कळ दिलं आहे त्याच्याकडून पुष्कळ मागण्यात येईल; आणि लोकांनी ज्याच्यावर पुष्कळ सोपवलं आहे त्याच्याकडून ते अधिक मागतील.
४९“मी पृथ्वीवर अग्नी पाडायला आलो आहे; आणि तो आताच पेटला असेल तर मला काय पाहिजे? ५०पण मला एका बाप्तिस्म्यानं बाप्तिस्मा घ्यायचा आहे. आणि तो पूर्ण होईपर्यंत मी कसा पेचात आहे. ५१मी पृथ्वीवर शांती द्यायला आलो असं तुम्ही समजता काय? मी तुम्हाला सांगतो, ‘नाही’; उलट विभक्तपणा. ५२कारण आतापासून एका घरातले पाच जण, दोघांविरुद्ध तिघे, आणि तिघांविरुद्ध दोघे असे फुटलेले असतील. ५३मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा फुटेल. मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू, आणि सासूविरुद्ध सून फुटेल.”
५४तो लोकांनाही म्हणाला,
“तुम्ही जेव्हा हे बघता की, पश्चिमेकडून ढग चढत आहे, तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, ‘आता सर येईल’ आणि तसं होतं. ५५आणि दक्षिण वायू वहात आहे तेव्हा म्हणता, ‘उष्णता होईल’ आणि तसं होतं. ५६अहो ढोंग्यांनो, आकाशाचं आणि पृथ्वीचं स्वरूप हे कसं ओळखावं हे तुम्हाला समजतं पण हे कसं की, हा काळ कसा ओळखावा हे तुम्हाला समजत नाही?
५७“हो, तसंच उचित काय आहे हे तुम्ही स्वतःच का ठरवीत नाही? ५८तू आपल्या वादीबरोबर अधिकार्‍याकडे जात असताना वाटेत त्याच्यापासून सुटायचा प्रयत्न कर. नाहीतर, तो कदाचित् तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल, न्यायाधीश तुला शिपायाकडे देईल आणि शिपाई तुला तुरुंगात टाकील. ५९मी तुला सांगतो, तू आपली शेवटची टोली फेडल्याशिवाय तिथून निघणार नाहीस.”

—–लूक १३—–

त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येक जणांनी त्याला पिलाताने ज्या गालीलकरांचे रक्त त्यांच्या बलिदानांत मिसळले होते त्यांच्याविषयी सांगितले. त्याने त्यांना उत्तर दिले,
“त्यांनी ह्या गोष्टी सोसल्या म्हणून ते गालीलकर इतर सर्व गालीलकरांहून अधिक पापी झाले, असं तुम्ही समजता काय? मी तुम्हाला सांगतो, ‘नाही’. पण तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्ही सगळे तसेच नष्ट व्हाल. किंवा जे अठरा लोक त्यांच्यावर शिलोहातला बुरुज पडून मेले ते यरुशलेमात राहणार्‍या इतर सर्व लोकांहून अधिक अपराधी झाले असं तुम्ही मानता काय? मी तुम्हाला सांगतो, ‘नाही’. पण तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्ही सगळे तसेच नष्ट व्हाल.”
आणि त्याने त्यांना हा दाखला सांगितला,
“एका मनुष्याचं, त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेलं, एक अंजिराचं झाड होतं. आणि, तो त्यावर फळ पहावं म्हणून आला पण त्याला काही आढळलं नाही. तेव्हा तो माळ्याला म्हणाला, ‘बघ, मी ही तीन वर्षं, ह्या अंजिराच्या झाडावर फळ पहावं म्हणून आलो; आणि मला काही आढळलं नाही; हे तोडून टाक; ह्यानं जमीन का अडवावी?’ तेव्हा त्यानं त्याला उत्तर देऊन म्हटलं, ‘धनी, ह्या वर्षी पण हे राहू द्या; मी तोपर्यंत त्याच्या सभोवती खणतो आणि खत घालतो. मग त्यानं त्यापुढं फळ दिलं तर बरं, नाहीतर, मग ते तोडून टाका.’ ”

१०आणि तेथील एका सभास्थानात तो शब्बाथ दिवशी शिकवीत होता, आणि बघा, तेथे एक स्त्री होती. ११तिला अठरा वर्षांपासून एक व्याधीचा आत्मा लागला होता. ती पुरी वाकली होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. १२आणि येशूने तिला बघितले तेव्हा त्याने तिला आपल्याकडे बोलवून म्हटले,
“बाई, तू आपल्या व्याधीपासून मुक्त झाली आहेस.”
१३आणि त्याने तिच्यावर हात ठेवले. तेव्हा लगेच ती सरळ झाली व तिने देवाचे गौरव केले. १४आणि येशूने शब्बाथ दिवशी व्याधी बरा केला म्हणून सभास्थानाच्या अधिकार्‍याला राग आला, आणि त्याने लोकांना उत्तर देऊन म्हटले,
“ज्या दिवसांत काम केलं पाहिजे असे सहा दिवस आहेत; म्हणून त्या दिवसांत या आणि बरे व्हा; शब्बाथ दिवशी नको.”
१५पण प्रभूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“अहो ढोंग्यांनो, तुमच्यातला प्रत्येक जण शब्बाथ दिवशी आपल्या बैलाला किंवा गाढवाला गोठ्यातून सोडतो आणि पाणी पाजायला नेतो ना? १६ही तर अब्राहामाची कन्या आहे; आणि, बघा, जिला ही अठरा वर्षं सैतानानं बांधलं होतं तिला शब्बाथ दिवशी त्या बंधनातून सोडवू नये काय?”
१७आणि तो हे बोलत असता त्याला विरोध करणारे लज्जित झाले. आणि सर्व लोक त्याच्याकडून होत असलेल्या सर्व गौरवशाली गोष्टींमुळे आनंदित झाले.
१८तेव्हा तो म्हणाला,
“देवाचं राज्य कशासारखं आहे? आणि मी त्याला कशाची उपमा देऊ? १९ते एका मोहरीच्या बीप्रमाणं आहे. ते एका मनुष्यानं घेऊन आपल्या मळ्यात टाकलं. ते उगवून त्याचं मोठं झाड झालं, आणि आकाशातले पक्षी त्याच्या फांद्यांत राहू लागले.”
२०आणि तो पुन्हा म्हणाला,
“मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ? २१ते खमिराप्रमाणं आहे. ते एका स्त्रीनं घेऊन तीन मापं पिठात दडवलं; तेव्हा ते सगळं फुगलं.”

२२आणि तो आपल्या मार्गाने नगरांमधून व खेड्यांमधून शिकवीत, आणि यरुशलेमकडे प्रवास करीत गेला. २३आणि एक जण त्याला म्हणाला,
“प्रभू, तारले जातील ते थोडेच आहेत काय?”
आणि तो त्याला म्हणाला,
२४“अरुंद दारानं आत जायला झटा, कारण, मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ आत जायला पाहतील आणि जाऊ शकणार नाहीत. २५घरधनी एकदा उठला आणि त्यानं दार बंद करून घेतलं, आणि तुम्ही बाहेर उभे राहू लागला, दार ठोकू लागला आणि म्हणाला, ‘प्रभू, आमच्यासाठी उघडा’, तर तो उत्तर देऊन तुम्हाला म्हणेल, ‘तुम्ही कुठले आहात, मी तुम्हाला ओळखीत नाही.’ २६तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, ‘आपल्यापुढं आम्ही खात पीत होतो आणि आपण आमच्या रस्त्यावर शिकवीत होता.’ २७पण तो म्हणेल, ‘मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठले आहात, मी तुम्हाला ओळखीत नाही. तुम्ही सगळे अनीतीचे कामकरी, माझ्यापुढून निघा.’ २८आणि तुम्ही तेव्हा पहाल की, अब्राहाम, इसहाक आणि याकोब, आणि सर्व संदेष्टे देवाच्या राज्यात आहेत, आणि तुम्ही बाहेर टाकले गेला आहात; तेव्हा रडणं आणि दात खाणं होईल. २९आणि पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून लोक येतील, आणि देवाच्या राज्यात बसतील. ३०पण बघा, जे पहिले होतील असे शेवटले आहेत आणि शेवटले होतील असे पहिले आहेत.”

३१त्याच घटकेस काही परोशी आले आणि त्याला म्हणाले,
“आपण बाहेर निघा, आणि इथून जा; कारण हेरोद आपल्याला ठार मारायच्या विचारात आहे.”
३२तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“जा, आणि त्या खोकडाला सांगा, ‘पहा, मी आज आणि उद्या भुतं काढतो आणि रोग बरे करतो आणि तिसर्‍या दिवशी मी पूर्ण केला जाईन.’ ३३पण मला आज, उद्या आणि परवा चाललं पाहिजे, कारण यरुशलेमबाहेर संदेष्ट्याचा नाश व्हावा असं होणार नाही.
३४“अरे यरुशलेमा, यरुशलेमा, संदेष्ट्यांना ठार मारणार्‍या, तुझ्याकडे पाठविलेल्यांना दगडमार करणार्‍या, कोंबडी जशी आपल्या पिलांना पंखाखाली एकवट करते तसं मी तुझ्या मुलांना एकवट करावं अशी किती वेळा माझी इच्छा होती, आणि तुझी इच्छा नव्हती. ३५बघा, तुमचं घर तुमच्यासाठी सोडलं आहे; आणि मी तुम्हाला सांगतो, ‘प्रभूच्या नावानं येणारा धन्य!’ असं तुम्ही म्हणाल तोपर्यंत तुम्ही मला बघणार नाही.”     

—–लूक १४—–

आणि असे झाले की, तो एकदा शब्बाथ दिवशी, परोश्यांतील एका अधिकार्‍याच्या घरी, भाकर खायला गेला असता ते त्याच्या पाळतीवर राहिले. आणि बघा, त्याच्यासमोर एक जलोदर झालेला मनुष्य होता. तेव्हा येशूने शास्त्र्यांना आणि परोश्यांना उत्तर देऊन म्हटले आणि विचारले,
“शब्बाथ दिवशी कोणाला बरं करणं योग्य आहे काय?”
आणि ते स्तब्ध राहिले. तेव्हा त्याने त्याला जवळ घेतले, बरे केले व जाऊ दिले. तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“तुमच्यातल्या कोणाचा मुलगा किवा बैल जर विहिरीत पडला तर तो त्याला शब्बाथ दिवशी, लगेच बाहेर काढणार नाही?”
आणि त्यावर ते त्याला उलटून बोलू शकले नाहीत.
आणि ज्यांना आमंत्रण केले होते ते वरच्या जागा कसे निवडीत होते, हे त्याने पाहिले तेव्हा त्याने त्यांच्यापुढे एक दाखला मांडला; तो त्यांना म्हणाला,
“कोणी तुला लग्नाच्या भोजनाला कधीही आमंत्रण केलं असेल, तेव्हा तू वरच्या जागेवर बसू नकोस. त्यानं कदाचित् दुसर्‍या एखाद्या, तुझ्याहून अधिक मानाच्या मनुष्याला आमंत्रण केलं असेल, आणि ज्यानं तुला आणि त्याला आमंत्रण केलं तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्या मनुष्याला जागा दे’. आणि तू लाजेनं सर्वांत खालची जागा घेऊ लागशील. १०पण तुला आमंत्रण केलं असेल तेव्हा सर्वांत खालच्या जागेवर जाऊन बस; म्हणजे ज्यानं तुला आमंत्रण केलं तो येईल तेव्हा तुला म्हणेल, ‘मित्रा, वर जा’; मग तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. ११कारण जो कोणी स्वतःला मोठा करतो तो लहान केला जाईल; आणि जो कोणी स्वतःला लहान करतो तो मोठा केला जाईल.”
१२मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला,
“तुम्ही जेव्हा दुपारची किंवा रात्रीची जेवणावळ कराल, तेव्हा तुमच्या मित्रांना, तुमच्या भावांना, तुमच्या नातलगांना किंवा तुमच्या धनवान शेजार्‍यांना बोलवू नका; नाहीतर, कदाचित्, ते पण तुम्हाला परत बोलावतील आणि तुमची फेड होईल. १३पण तुम्ही जेव्हा जेवणावळ कराल तेव्हा भिकारी, अधू, पांगळे, अंधळे ह्यांना बोलवा. १४आणि तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नाही. कारण नीतिमानांच्या पुनरुत्थानात तुमची फेड होईल.”
१५आणि त्याच्याबरोबर जे बसले होते त्यांच्यातल्या एकाने हे ऐकून म्हटले,
“देवाच्या राज्यात जो भाकर खाईल तो धन्य!”
१६तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“कोणी एका मनुष्यानं संध्याकाळची मोठी जेवणावळ केली आणि पुष्कळांना आमंत्रण केलं. १७आणि ज्यांना आमंत्रण केलं होतं त्यांना त्या जेवणावळीच्या घटकेस, ‘आपण या, कारण आता सर्व तयार आहे’ असं सांगायला आपल्या एका दासाला पाठवलं. १८आणि ते सगळेच सारखी सबब सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी एक शेत विकत घेतलं आहे, आणि मी जाऊन ते बघणं अगत्य आहे; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ १९आणि दुसरा म्हणाला, ‘मी पाच बैलजोड्या विकत घेतल्यात; आणि मी त्यांची तपासणी करायला जातो. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ २०आणि दुसरा एक म्हणाला, ‘मी बायको केली आहे आणि म्हणून मी येऊ शकत नाही.’ २१म्हणून तो दास आला आणि त्यानं आपल्या धन्याला त्या गोष्टी सांगितल्या; तेव्हा घरधनी रागावला आणि आपल्या दासाला म्हणाला, ‘तू लवकर नगरातल्या रस्त्यांत आणि बोळांत जा, आणि भिकारी, अधू, अंधळे आणि पांगळे असे असतील त्यांना इकडे आण.’ २२आणि दास म्हणाला, ‘धनी, आपण आज्ञा केलीत ते झालं, आणि अजून जागा आहे.’ २३तेव्हा धनी दासाला म्हणाला, ‘बाहेरच्या रस्त्यांवर आणि बांधांवर जा, आणि माझं घर भरावं म्हणून त्यांना यायला लाव. २४कारण मी तुम्हाला सांगतो की, ज्या लोकांना बोलावलं होतं त्यांच्यातला एकपण माझं भोजन चाखणार नाही.’ ”

२५आणि लोकांचे मोठाले घोळके त्याच्याबरोबर जात होते. तेव्हा तो मागे वळला आणि त्यांना म्हणाला,
२६“जर कोणी माझ्याकडे येईल, आणि आपल्या बापाचा आणि आईचा, बायकोचा आणि मुलांचा, भावांचा आणि बहिणींचा, हो, आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. २७आणि जो कोणी आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागं येणार नाही तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. २८कारण तुमच्यातला कोणी मनुष्य बुरुज बांधायचा विचार करताना आधी बसून खर्चाचा हिशोब करीत नाही की, आपल्याजवळ तो पुरा करायला आहे काय?  २९नाहीतर,  कदाचित्, तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही, तेव्हा पाहणारे सर्व जण त्याला चिडवू लागतील, ३०आणि म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला आणि पूर्ण करू शकला नाही.’ ३१किंवा कोणता राजा दुसर्‍या राजाला लढाईत तोंड द्यायला जात असताना आधी बसून विचार करीत नाही की, आपण आपले दहा हजार घेऊन जो त्याचे वीस हजार घेऊन आपल्यावर येत आहे त्याला सामोरे जायला समर्थ आहोत काय?  ३२नाहीतर, तो दूर असतानाच हा आपल्या वकिलांना पाठवून समेटाच्या अटी विचारील. ३३म्हणून, त्याचप्रमाणं, तुमच्यातला कोणीही आपलं सर्वस्व सोडणार नाही तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
३४‘म्हणून मीठ हे उपयोगी आहे, पण मीठ निचव झालं तर त्याला कशानं चव आणता येईल? ३५ते जमिनीसाठी किवा खतासाठीही उपयोगी नाही. लोक ते बाहेर टाकतात. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”

—–लूक १५—–

आता सगळे जकातदार आणि पापी हे त्याचे ऐकायला त्याच्याकडे येऊ लागले; आणि शास्त्री व परोशी हे कुरकुर करून म्हणू लागले, ‘हा पाप्यांना जवळ घेतो, आणि त्यांच्याबरोबर जेवतो.’
आणि त्याने त्यांना हा दाखला सांगितला; तो म्हणाला,
“तुमच्यातला कोणता मनुष्य त्याच्याजवळ शंभर मेंढरं असताना जर त्यांतलं एक हरवलं तर तो ती नव्याण्णव रानात ठेवून ते हरवलेलं सापडेपर्यंत त्याच्यामागं जात नाही? आणि त्याला ते सापडताच तो आनंदित होऊन त्याला खांद्यावर घेतो, आणि तो घरी आल्यावर मित्रांना आणि शेजार्‍यांना एकत्र बोलावतो आणि त्यांना म्हणतो, ‘माझ्याबरोबर आनंद करा; कारण जे माझं मेंढरू हरवलं होतं ते मला सापडलं आहे.’ त्याचप्रमाणं, मी तुम्हाला सांगतो, पश्चात्तापाची गरज नसलेल्या नव्याण्णव नीतिमान लोकांपेक्षा पश्चात्ताप करणार्‍या एका पाप्याकरता स्वर्गात अधिक आनंद होईल.
“किंवा कोणती स्त्री, तिच्याजवळ चांदीच्या दहा पुतळ्या असताना,  त्यांतली एक पुतळी हरवली तर दिवा पेटवून, घर झाडून ती सापडेपर्यंत काळजीपूर्वक शोधीत नाही? आणि तिला सापडल्यावर ती मैत्रिणींना आणि शेजारणींना एकत्र बोलावते आणि म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा; कारण जी माझी पुतळी हरवली होती ती मला सापडली आहे.’  १०त्याचप्रमाणं, मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्‍या एका पाप्याकरता देवाच्या दूतांसमोर आनंद होतो.”
११आणि तो म्हणाला,
“एका मनुष्याला दोन मुलगे होते; १२आणि त्यांच्यातला धाकटा बापाला म्हणाला, ‘अब्बा, तुम्ही मला मालमत्तेचा, मला पडणारा वाटा द्या.’ आणि त्यानं त्यांना आपली मिळकत वाटून दिली. १३मग फार दिवस गेले नाहीत तोच, धाकटा मुलगा सगळं गोळा करून एका दूरच्या प्रांतात गेला आणि तिथं उधळेपणानं जगण्यात त्यानं आपली मालमत्ता उडवली. १४आणि, त्यानं सर्व खर्च केल्यावर त्या प्रांतात मोठा दुष्काळ उद्भवला; आणि त्याला वाण पडू लागली. १५तेव्हा तो गेला आणि त्या प्रांतातल्या एका गावकर्‍याला बिलगला; आणि त्यानं त्याला आपल्या शेतात डुकरांना खाणं द्यायला धाडलं. १६तेव्हा डुकरं जी टरफलं खात ती खाऊन आपलं पोट भरावं अशी त्याला इच्छा होई. आणि कोणी त्याला देत नसे.
१७“मग तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या अब्बांच्या किती मोलकर्‍यांना पुरून उरेल इतकी भाकर मिळते आणि मी भुकेनं मरत आहे; १८मी उठून माझ्या अब्बांच्याकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, अब्बा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केलं आहे; १९मी तुमचा मुलगा म्हटला जायला आता लायक नाही. तुमच्या एका मोलकर्‍याप्रमाणं मला ठेवा.’ २०आणि तो उठून आपल्या बापाकडे आला. आणि तो दूर नव्हता इतक्यात त्याच्या बापानं त्याला बघितलं, आणि त्याला त्याचा कळवळा येऊन तो धावत गेला, त्याच्या गळ्यात पडला, आणि त्यानं त्याचे मुके घेतले. २१आणि मुलगा त्याला म्हणाला, ‘अब्बा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केलं आहे; मी तुमचा मुलगा म्हटला जायला आता लायक नाही.’
२२“पण बाप आपल्या दासांना म्हणाला, ‘लवकर सगळ्यात चांगला झगा आणा, आणि ह्याला पेहरवा, त्याच्या हातात अंगठी आणि पायांत वहाणा घाला; २३आणि पोसलेलं वासरू आणून मारा. आपण भोजन करू आणि उत्सव करू. २४कारण, हा माझा मुलगा मेला होता, आणि पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता आणि सापडला आहे.’ आणि ते उत्सव करू लागले.
२५“आणि त्याचा वडील मलगा शेतात होता; तो येत असता घराजवळ आला तेव्हा त्याला गाणं नाचणं ऐकू आलं. २६तेव्हा त्यानं एका दासाला बोलवून विचारलं, ’हे काय आहे?’ २७आणि तो त्याला म्हणाला, ‘आपला भाऊ आला आहे; आणि आपल्या अब्बांना तो सुखरूप मिळाला म्हणून त्यांनी पोसलेलं वासरू मारलं आहे.’ २८पण तो रागावला आणि आत जायला तयार नव्हता. तेव्हा त्याचा बाप बाहेर आला आणि त्यानं त्याला विनंती केली. २९आणि त्यानं बापाला उत्तर देऊन म्हटलं, ‘बघा, मी इतकी वर्षं तुमची सेवा केली, आणि कधीच तुमच्या आज्ञा मोडल्या नाहीत. पण मी माझ्या मित्रांबरोबर आनंद करावा म्हणून तुम्ही मला कधी एक करडू दिलं नाही. ३०पण, ज्यानं वेश्यांबरोबर तुमची मिळकत खाऊन टाकली तो हा मुलगा येताच तुम्ही त्याच्यासाठी पोसलेलं वासरू मारलंत.’
३१“आणि तो त्याला म्हणाला, ‘बाळ, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि माझ्याजवळ जे सगळं आहे ते तुझं आहे. ३२आपण उत्सव करून आनंद करावा हे योग्य होतं; कारण हा तुझा भाऊ मेला होता, आणि पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता आणि सापडला आहे.’ ”                

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s