Luke 16-20

संत लूक ह्याचे शुभवर्तमान

—–लूक १६—–

आणि तो शिष्यांनाही म्हणाला,
“एक धनवान मनुष्य होता, आणि त्याचा एक कारभारी होता; आणि हा आपला माल उडवतो असा आरोप त्याच्याविरुद्ध त्याच्याकडे करण्यात आला. तेव्हा त्यानं त्याला बोलवून म्हटलं, ‘मी तुझ्याविषयी ऐकतो हे काय आहे? तुझ्याकडच्या कारभाराचा हिशोब दे; कारण ह्यापुढं, तू कारभारी म्हणून राहणार नाहीस.’ तेव्हा कारभारी मनात म्हणाला, ‘मी काय करू? कारण माझा धनी माझ्याकडून कारभार काढीत आहे; मला खणायला शक्ती नाही आणि भीक मागायला लाज वाटते. मला कारभारावरून काढल्यावर त्यांनी मला आपल्या घरात घ्यावं म्हणून मी काय करावं ते मी जाणतो.’
“मग, त्यानं आपल्या धन्याच्या देणेकर्‍यांतील एकेकाला आपल्याकडे बोलावलं. आणि तो पहिल्याला म्हणाला, ‘माझ्या धन्याला तुम्ही किती देणं लागता?’ तो म्हणाला, ‘शंभर मण तेल.’ आणि तो त्याला म्हणाला, “तुमचा लेख घ्या, लवकर बसा आणि पन्नास लिहा.’ मग तो दुसर्‍याला म्हणाला, ‘तुम्हाला किती देणं आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर खंडी गहू.’ आणि तो म्हणाला, ‘तुमचा लेख घ्या आणि ऐंशी लिहा.’
“आणि अन्यायी कारभार्‍यानं हे शहाणपण केलं म्हणून धन्यानं त्याची वाखाणणी केली; कारण ह्या युगाचे पुत्र आपल्या पिढीच्या बाबतीत,  प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा शहाणे असतात.
“आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अनीतिकारक धनानं आपल्यासाठी मित्र जोडा, म्हणजे ते नाहीसे होईल तेव्हा ते तुम्हाला सार्वकालिक वस्त्यांत घेतील.
१०“जो थोड्यावर विश्वासू असतो तो पुष्कळावरही विश्वासू असतो. जो थोड्यावर अन्यायी असतो तो पुष्कळावरही अन्यायी असतो. ११म्हणून तुम्ही जर अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नसाल तर जे खरं आहे ते तुमच्या विश्वासावर कोण सोपवील? १२आणि जे दुसर्‍याचं आहे त्याविषयी विश्वासू झाला नसाल तर जे तुमचं स्वतःचं आहे ते तुम्हाला कोण देईल?
१३“कोणीही नोकर दोन धन्यांची सेवा करू शकत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसर्‍यावर प्रीती करील; किंवा एकाला बिलगून राहील आणि दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.”
१४आणि, धनलोभी असलेले परोशी ह्या सर्व गोष्टी ऐकत होते व त्याचा उपहास करीत होते. १५आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही स्वतःला मनुष्यांपुढं नीतिमान ठरवणारे आहा; पण देव तुमची मनं जाणतो; कारण मनुष्यांपुढं जे उच्च आहे ते देवाच्या दृष्टीपुढं अमंगळ आहे.
१६“नियमशास्त्र आणि संदेष्टे हे योहानापर्यंत होते; तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली जात आहे, आणि प्रत्येक मनुष्य त्यात जायला लगट करीत आहे.
१७“नियमशास्त्राचा एक फाटा गळण्यापेक्षा आकाश आणि पृथ्वी नाहीशी होणं अधिक सोपं आहे.
१८“जो कोणी आपल्या बायकोला सोडतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आणि तिला नवर्‍यानं सोडलं आहे तिच्याशी जो लग्न करतो तो व्यभिचार करतो.
१९“एक धनवान मनुष्य होता; तो जांभळे आणि तलम तागाचे कपडे पेहरीत असे, आणि रोज ऐशआराम करीत असे. २०तिथं लाजर नावाचा,  फोडांनी भरलेला कोणी भिकारी त्याच्या फाटकाशी पडलेला असे. २१आणि धनवानाच्या मेजावरून पडेल त्यावर पोट भरावं अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्रे येऊन त्याचे फोड चाटीत. २२आणि असं झालं की, तो भिकारी मेला, आणि त्याला देवदूतांनी अब्राहामाच्या उराशी नेलं; तो धनवानही मेला आणि त्याला पुरलं. २३तो अधोलोकात यातनांत असताना त्यानं डोळे वर लावले आणि दूर अंतरावर तो अब्राहामाला आणि त्याच्या उराशी लाजराला पाहतो. २४तेव्हा तो ओरडून म्हणाला, ‘अब्राहाम अब्बा, माझ्यावर दया करा; आणि लाजराला धाडा; म्हणजे त्यानं आपल्या बोटाचं टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण मला ह्या जाळात यातना होत आहेत.’
२५“पण अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात भरून पावलास, तसाच लाजर वाईट भरून पावला ह्याची आठवण कर; पण आता त्याचं सांत्वन झालं आहे. आणि तुला यातना होत आहेत. २६आणि, ह्याशिवाय, तुमच्या आणि आमच्या मध्यंतरी एक मोठी दरी स्थापलेली आहे; म्हणजे इकडून तुमच्याकडे जे जाऊ पाहतील त्यांना जाता येऊ नये, किंवा तिकडून आमच्याकडे येऊ पाहतील त्यांना येता येऊ नये.’ २७तेव्हा तो म्हणाला, ‘म्हणून अब्बा, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याला माझ्या बापाच्या घरी धाडा; २८कारण मला पाच भाऊ आहेत; आणि त्यानं त्यांना निक्षून साक्ष द्यावी; नाहीतर, ते पण ह्या यातनेच्या ठिकाणी येतील.’ २९पण अब्राहाम म्हणतो, ‘त्यांना मोशे आणि संदेष्टे आहेत; त्यांनी त्यांचं ऐकावं.’ ३०तो म्हणाला, ‘अब्राहाम अब्बा, असं नाही; पण मेलेल्यांतून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.’ ३१आणि तो त्याला म्हणाला, ‘ते मोशेचं आणि संदेष्ट्यांचं ऐकत नसतील, तर मेलेल्यांतून कोणी पुन्हा उठला तरी ते त्याचं मानणार नाहीत.’ ”     

—–लूक १७—–

मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
“अडथळे येऊ नयेत हे अशक्य आहे. पण ज्याच्यामुळं ते येतात त्याला हळहळ! त्यानं ह्या लहानांतल्या एकाला अडथळा करावा ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात एक जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकलं तर ते त्याच्यासाठी अधिक बरं होईल. तुम्ही स्वतः संभाळा, तुझ्या भावानं जर तुझा अपराध केला तर त्याचा निषेध कर; आणि, त्यानं पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. आणि त्यानं दिवसात सात वेळा तुझा अपराध केला, आणि दिवसात सात वेळा तो तुझ्याकडे परत येऊन म्हणाला, ‘मी पश्चात्ताप करत’, तर तू त्याला क्षमा कर.”
तेव्हा प्रेषित प्रभूला म्हणाले,
“आमचा विश्वास वाढवा.”
आणि प्रभू म्हणाला,
“तुमच्यात मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही ह्या तुतीला म्हणाल, ‘तू समूळ उपटून नीघ आणि समुद्रात टाकली जा’; आणि ती तुमचं ऐकेल. तुमच्यातला कोणता मनुष्य त्याचा दास नांगरीत किंवा मेंढरं राखीत असेल, तर तो शेतावरून आल्यावर त्याला म्हणेल की, ‘आता जा आणि जेवायला बस’? उलट त्याला म्हणणार नाही की, ‘माझं भोजन तयार कर आणि कंबर बांध, आणि मी खात पीत आहे तोवर माझी सेवा कर, आणि मग तू खा आणि पी’? त्यानं त्याला सांगितलेल्या गोष्टी केल्या म्हणून तो दासाचे उपकार मानतो काय? १०त्याचप्रमाणं तुम्ही तुम्हाला सांगण्यात आलेल्या सर्व गोष्टी कराल तेव्हा असं म्हणा की, ‘आम्ही निरुपयोगी दास आहो; जे करणं आमचं कर्तव्य होतं ते आम्ही केलं.’ ”
११आणि असे झाले की, तो यरुशलेमला जात असता त्याने शोमरोन आणि गालील ह्या दोहोंमधून प्रवास केला. १२आणि तो एका खेड्यात जात असता तेथे त्याला दहा इसम भेटले. ते कुष्ठरोगी होते आणि दूर उभे राहिले होते. १३त्यांनी आपला आवाज चढवून म्हटले,
“येशू, स्वामी, आमच्यावर दया करा.”
१४आणि त्याने त्यांना बघितले तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“जा, आणि स्वतःला याजकांना दाखवा.”
आणि असे झाले की, ते जात असता शुद्ध केले गेले. १५आणि आपण बरे झालोत हे त्यांच्यातल्या एकाने बघितले तेव्हा तो मोठ्या आवाजात देवाचे गौरव करीत परतला, १६आणि त्याचे उपकार मानीत तो त्याच्या पायांशी तोंडावर पडला. आणि तो शोमरोनी होता. १७तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले,
“दहा शुद्ध केले गेले ना? मग नऊ कुठं आहेत? १८ह्या एका शोमरोन्याशिवाय देवाला गौरव द्यायला परतलेले, दुसरे कोणी आढळले नाहीत काय?”
१९आणि तो त्याला म्हणाला,
“ऊठ, तुझ्या मार्गानं जा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे.”

२०आणि देवाचे राज्य कधी येईल असे परोश्यांनी विचारले असता त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“देवाचं राज्य निरीक्षणात येणार नाही; २१आणि ‘इथं बघा’, किंवा ‘तिथं बघा’ असंदेखील ते म्हणणार नाहीत; कारण बघा, देवाचं राज्य तुमच्यात आहे.”
२२आणि तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
“असे दिवस येतील की, तुम्ही तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतला एक दिवस आपण बघावा अशी इच्छा कराल, पण तुम्ही पाहणार नाही;  २३आणि ते तुम्हाला म्हणतील, ‘इकडे बघा’, ‘तिकडे बघा’, तेव्हा जाऊ नका आणि त्यांच्यामागं लागू नका. २४कारण आकाशाखालच्या एका बाजूस चमकणारी वीज जशी आकाशाखालच्या दुसर्‍या बाजूपर्यंत प्रकाशते तसा मनुष्याचा पुत्रही त्याच्या दिवशी येईल. २५पण प्रथम त्यानं पुष्कळ सोसावं आणि ह्या पिढीकडून नाकारलं जावं हे अगत्य आहे. २६आणि नोहाच्या दिवसांत जसं झालं तसं मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांत होईल. २७नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत ते खात होते, पीत होते, लग्न करीत होते आणि लग्न करून देत होते; आणि महापूर आला आणि त्यानं सर्वांना नष्ट केलं. २८तसंच लोटाच्या दिवसांत झाल्याप्रमाणं होईल. ते खात होते, पीत होते, विकत घेत होते, विकीत होते, पेरीत होते आणि बांधीत होते. २९पण लोट सदोमातून बाहेर निघाला त्याच दिवशी अग्नी आणि गंधक ह्यांचा आकाशातून वर्षाव झाला आणि त्यानं सर्वांना नष्ट केलं. ३०त्याचप्रमाणं मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी होईल. ३१त्या दिवशी जो धाब्यावर असेल आणि त्याचं सामान घरात असेल, त्यानं ते घ्यायला खाली येऊ नये. त्याचप्रमाणं जो शेतात असेल त्यानं परत जाऊ नये. ३२लोटाच्या बायकोची आठवण करा. ३३जो आपला जीव वाचवू पाहील तो आपल्या जिवाला मुकेल; आणि जो आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. ३४आणि मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री दोघे एका खाटल्यावर असतील; एक घेतला जाईल, आणि दुसरा ठेवला जाईल. ३५दोघी एकत्र दळीत असतील; एक घेतली जाईल आणि दुसरी ठेवली जाईल.”
३६-३७आणि त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“कुठं, प्रभू?”
आणि तो त्यांना म्हणाला,
“जिथं मढं तिथं गिधाडं जमतील.”   

—–लूक १८—–

आणि त्यांनी नित्य प्रार्थना करावी व खचू नये म्हणून त्याने त्यांना एक दाखला सांगितला; तो म्हणाला,
“एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे आणि माणसाची भीड धरीत नसे. आणि त्या नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे जाई आणि म्हणे, ‘मला माझ्या वादीविरुद्ध न्याय द्या.’ तो काही काळ तयार होईना. पण मग तो आपल्या मनात म्हणाला, ‘मी देवाला भीत नसलो आणि माणसाची भीड धरीत नसलो, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी हिला न्याय देईन; नाहीतर, हिच्या सतत येण्यानं ही मला त्रास देईल.’ ”
तेव्हा प्रभू म्हणाला,
“अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ऐका. मग देव जे त्याचे निवडलेले अहोरात्र त्याचा धावा करतात त्यांना न्याय देणार नाही काय? आणि त्यांच्या बाबतीत विलंब लावील काय? मी तुम्हाला सांगतो, तो लवकर त्यांना न्याय देईल. पण मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”

आणि आपण नीतिमान आहोत असे जे लोक स्वतःला मानीत, आणि दुसर्‍यांचा उपहास करीत त्यांना त्याने एक दाखला सांगितला,
१०“दोन इसम प्रार्थना करायला मंदिरात वर गेले; एक परोशी होता आणि दुसरा जकातदार. ११परोशी उभा राहिला, आणि त्यानं आपल्या मनात अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण जसे दुसरे लोक लुबाडणारे, अनीतिमान आणि व्यभिचारी आहेत तसा मी नाही, किंवा ह्या जकातदारासारखाही नाही. १२मी आठवड्यात दोनदा उपास करतो, आणि मला मिळतं त्या सर्वाचा दशमांश देतो.’ १३आणि जकातदार दूर उभा राहिला. तो आपले डोळेही आकाशाकडे वर लावायला धजला नाही; पण तो आपला ऊर बडवीत राहिला आणि म्हणाला, ‘हे देवा, मज पाप्यावर दया कर.’ १४मी तुम्हाला सांगतो, हा मनुष्य त्या दुसर्‍यापेक्षा नीतिमान ठरून, खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला मोठा करतो तो लहान केला जाईल आणि जो कोणी स्वतःला लहान करतो तो मोठा केला जाईल.”

१५आणि लोक त्याच्याकडे आपल्या तान्ह्या मुलांनाही त्याने त्यांना हात लावावा म्हणून घेऊन आले. पण शिष्यांनी हे बघितले तेव्हा त्यांनी त्यांना दटावले. १६पण येशूने त्यांना आपल्याकडे बोलवून म्हटले,
“बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका; कारण देवाचं राज्य अशांचं आहे. १७मी तुम्हाला सत्य सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाचं राज्य स्वीकारणार नाही तो त्यात प्रवेश करणार नाही.”

१८आणि एका अधिकार्‍याने त्याला प्रश्न करून म्हटले,
“उत्तम गुरू, मी सनातन जीवन हे वतन मिळवायला काय करू?”
१९तेव्हा येशू त्याला म्हणाला,
“मला उत्तम का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणी उत्तम नाही. २०तू आज्ञा जाणतोस; ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको आणि तू आपल्या बापाला आणि आईला मान दे.’ ”
२१आणि तो म्हणाला,
“मी ह्या सगळ्या लहानपणापासून पाळल्या आहेत.”
२२आणि येशूने हे ऐकले तेव्हा तो त्याला म्हणाला,
“तुझ्यात एक गोष्ट अजून कमी आहे. तुझ्याजवळ जे आहे ते सगळं वीक, आणि गरिबांना वाटून दे, आणि स्वर्गात तुला धन मिळेल;  चल, माझ्यामागं ये.”
२३पण त्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखित झाला; कारण तो फार धनवान होता. २४येशूने त्याच्याकडे बघून म्हटले,
“ज्यांच्याजवळ संपत्ती आहे त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश करणं किती कठिण आहे? २५कारण धनवान मनुष्याला देवाच्या राज्यात प्रवेश करण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे.”
२६तेव्हा ऐकणारे म्हणू लागले,
“मग कोण तारला जाईल?”
२७पण तो म्हणाला,
“ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”
२८आणि पेत्र म्हणाला,
“पहा, आम्ही सगळं सोडलं आणि तुझ्यामागं आलो.”
२९आणि तो त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, कोणी देवाच्या राज्याकरता घर, किंवा बायको, किंवा भाऊ, किंवा आईबाप, किंवा मुलं सोडणारा असा नाही की, ३०त्याला ह्या काळात अधिकपट, आणि येणार्‍या युगात सनातन जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.”

३१आणि त्याने बारा जणांना आपल्याजवळ घेतले व त्यांना म्हटले,
“बघा, आपण यरुशलेमला वर जात आहो; आणि संदेष्ट्यांनी मनुष्याच्या पुत्राविषयी लिहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होतील. ३२कारण, त्याला परजनांच्या हाती देण्यात येईल; त्याची चेष्टा केली जाईल आणि हेलना केली जाईल, आणि ते त्याच्यावर थुंकतील; ३३ते त्याला फटके मारतील आणि ठार मारतील. आणि तो तिसर्‍या दिवशी पुन्हा उठेल.”
३४पण त्यांना ह्यातली कोणतीही गोष्ट समजली नाही; हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवले गेले, आणि त्यांना सांगण्यात आलेल्या गोष्टी समजल्या नाहीत.

३५आणि असे झाले की, तो यरिहोजवळ आला तेव्हा एक अंधळा बाहेरच्या रस्त्याच्या कडेला बसला होता. ३६आणि लोकांचा घोळका जवळून जात असताना त्याने ऐकले; तेव्हा हे काय आहे असे त्याने विचारले. ३७ते त्याला म्हणाले,
“नासोरी येशू जात आहे.”
३८तेव्हा तो ओरडून म्हणाला,
“अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”
३९तेव्हा त्याने गप्प रहावे म्हणून पुढे जाणार्‍यांनी त्याला दटावले. पण तो आणखी अधिक ओरडून म्हणाला,
“अहो दावीदपुत्र, माझ्यावर दया करा.”
४०तेव्हा येशू उभा राहिला व त्याने त्याला आपल्याकडे आणण्याची आज्ञा दिली. आणि तो जवळ आला तेव्हा त्याने त्याला विचारले,
४१“तुझ्यासाठी मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?”
४२आणि तो म्हणाला,
“प्रभू, मला दृष्टी यावी.”
तेव्हा येशू त्याला म्हणाला,
“तुला दृष्टी येवो. तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे.”
४३आणि लगेच त्याला दृष्टी आली व तो देवाचे गौरव करीत त्याच्या मागोमाग गेला. आणि सर्व लोकांनी ते बघून देवाला धन्यवाद दिला.   

—–लूक १९—–

आणि तो यरिहोत आला व पुढे जात होता; आणि बघा, जक्कय नावाचा एक मनुष्य तेथे होता. तो एक प्रमुख जकातदार असून धनवान होता. आणि येशू हा कोण आहे हे बघावे ही त्याची इच्छा होती. पण त्याला ते गर्दीमुळे शक्य होईना, कारण तो बांध्याने ठेंगणा होता. आणि तो त्याला बघायला धावत पुढे जाऊन एका उंबराच्या झाडावर चढला. कारण तो त्या वाटेने जाणार होता. आणि, येशू त्या ठिकाणी आला, तेव्हा त्याने वर पाहिले आणि तो त्याला म्हणाला,
“जक्कय, घाई कर आणि खाली उतर, कारण मला आज तुझ्या घरी राहिलं पाहिजे.”
तेव्हा त्याने घाई केली, तो खाली आला आणि आनंदित होऊन त्याने त्याला बरोबर घेतले. हे बघून सगळ्यांनी कुरकुर करीत म्हटले,
“हा पापी माणसाकडे उतरायला गेला.”
तेव्हा जक्कय उभा राहिला व प्रभूला म्हणाला,
“बघा, प्रभू, मी माझी अर्धी मालमत्ता गरिबांना देतो आणि मी कुणाकडून काही अन्यायानं घेतलं असेल तर ते चौपट परत देतो.”
तेव्हा येशू त्याला म्हणाला,
“आज ह्या घराला तारण प्राप्त झालं आहे. कारण हापण अब्राहामाचा पुत्र आहे. १०कारण मनुष्याचा पुत्र हरवलेल्यास  शोधायला आणि तारायला आला आहे.”

११आणि, ते हे ऐकत असता तो आणखी बोलला आणि त्याने एक दाखला सांगितला, कारण तो यरुशलेमला जात होता, आणि देवाचे राज्य आताच प्रगट होणार आहे असे त्यांना वाटत होते. १२म्हणून तो म्हणाला,
“एक उमराव आपलं राज्य घ्यावं आणि परत यावं म्हणून दूरदेशी गेला, १३तेव्हा त्यानं आपल्या दहा दासांना बोलवून त्यांना दहा मिना दिल्या; आणि त्यांना म्हटलं, ‘मी येईपर्यंत व्यापार करा.’ १४पण त्याचे गावकरी त्याचा द्वेष करीत असत, आणि त्यांनी त्याच्या मागोमाग वकिलांना पाठवून निरोप केला की, ‘ह्यानं आमच्यावर राज्य करावं अशी आमची इच्छा नाही.’ १५आणि असं झालं की, त्याला राज्य मिळाल्यावर तो जेव्हा परत आला तेव्हा त्यानं ज्या दासांना पैसा दिला होता, त्यांनी व्यापार करून काय मिळवलं हे समजावं म्हणून त्यानं त्यांना आपल्याकडे बोलवायची आज्ञा दिली. १६तेव्हा पहिला येऊन म्हणाला, ‘धनी, आपल्या मिनेनं दहा मिना मिळवल्यात.’ १७आणि तो त्याला म्हणाला, ‘छान केलंस, भल्या दासा, तू फार थोड्यावर विश्वासू झालास म्हणून दहा नगरांवर अधिकार घे.’ १८आणि दुसरा येऊन म्हणाला, ‘धनी, आपल्या मिनेनं पाच मिना मिळवल्यात.’ १९आणि तो त्याचप्रमाणं त्याला म्हणाला, ‘तूपण पाच नगरांवर हो.’ २०मग दुसरा एक येऊन म्हणाला, ‘धनी, बघा, आपली मिना माझ्याजवळ फडक्यात ठेवलेली आहे. २१कारण मी आपल्याला ओळखीत होतो; कारण आपण करडे माणूस आहा; आपण ठेवलं नाही ते उचलता आणि पेरलं नाही ते कापता.’ २२आणि तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडून तुझा न्याय करतो; मी करडा माणूस आहे, मी ठेवलं नाही ते उचलतो, आणि पेरलं नाही ते कापतो, हे तू जाणतोस. २३तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? म्हणजे मी आल्यावर मी तो व्याजासकट घेतला असता.’ २४तेव्हा जे जवळ उभे होते त्यांना तो म्हणाला, ‘ह्याच्याजवळून ती मिना घ्या, आणि ज्याच्याजवळ दहा मिना आहेत त्याला द्या.’ (२५तेव्हा ते त्याला म्हणाले, ‘धनी, त्याच्याजवळ दहा मिना आहेत.’) २६‘कारण, मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल; पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडून काढून घेतलं जाईल. २७आणि जे माझे वैरी मी त्यांच्यावर राज्य करावं असं इच्छीत नव्हते त्यांना इकडे आणा, आणि माझ्यासमोर ठार मारा.’ ”
२८आणि तो हे बोलल्यावर यरुशलेमकडे वर जाताना तो पुढे गेला. २९आणि असे झाले की, ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्या डोंगरापाशी, बेथफगेच्या व बेथानीच्या जवळ तो आला तेव्हा त्याने शिष्यांतील दोघांना पाठवले. ३०आणि त्यांना म्हटले,
“तुमच्या समोरच्या खेड्यात जा; आणि तिथं तुम्ही आत जाताना तुम्हाला एक बांधलेलं शिंगरू आढळेल. कोणी मनुष्य त्यावर कधी बसलेला नाही; त्याला सोडून घेऊन या. ३१आणि कोणी तुम्हाला विचारील, ‘ह्याला का सोडता?’ तर तुम्ही म्हणा, ‘प्रभूला त्याची गरज आहे.’ ”
३२तेव्हा ज्यांना पाठविले होते ते गेले, आणि त्याने त्यांना सांगितले होते तसे त्यांना आढळले. ३३आणि ते शिंगराला सोडीत असता त्याचे मालक त्यांना म्हणाले,
“तुम्ही शिंगराला का सोडता?”
३४आणि ते म्हणाले,
“प्रभूला त्याची गरज आहे.”
३५आणि त्यांनी ते येशूकडे आणले; त्यांनी शिंगरावर आपली वस्त्रे घातली आणि येशूला त्यावर बसवले. ३६आणि तो जात असता त्यांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. ३७आणि तो आता जवळ, जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीजवळ येत असता त्याच्या शिष्यांचा सर्व समुदाय त्यांनी जे चमत्कार बघितले होते त्या सर्वांमुळे आनंदित होऊन, मोठ्या आवाजात देवाचे स्तवन करू लागला. ३८आणि ते म्हणत होते,
“प्रभूच्या नावानं येणारा राजा धन्य!
“स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव!”
३९तेव्हा लोकांच्या घोळक्यातले काही परोशी त्याला म्हणाले,
“गुरू, आपल्या शिष्यांना आज्ञा करा.”
४०पण त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मी तुम्हाला सांगतो, हे जर गप्प राहिले तर दगड ओरडतील.”
४१मग तो जेव्हा जवळ आला आणि त्याने ते नगर बघितले, तेव्हा तो त्याकरता रडून ४२म्हणाला,
“तू, हो तू, ह्या तुझ्या दिवशी तुझ्या शांतीच्या गोष्टी जर ओळखल्या असत्यास! पण त्या तुझ्या डोळ्यांपुढून आता लपल्या आहेत. ४३कारण तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे वैरी तुझ्या सभोवती मेढेकोट उभारतील, तुला घेरतील आणि प्रत्येक बाजूस तुला अडवतील. ४४ते तुला आणि तुझ्यात असलेल्या तुझ्या मुलांना धुळीस मिळवतील, ते तुझ्यात दगडावर दगड सोडणार नाहीत. कारण तुझ्या भेटीची वेळ तू ओळखली नाहीस.”

४५आणि तो मंदिरात गेला, आणि जे कोणी विकीत होते त्यांना तो बाहेर काढू लागला, ४६आणि त्यांना म्हणाला,
“ ‘माझं घर प्रार्थनेचं घर होईल’ असं लिहिलं आहे; पण तुम्ही त्याची लुटारूंची गुहा केलीत.”
४७आणि तो मंदिरात प्रत्येक दिवशी शिकवीत राहिला; पण वरिष्ठ याजक, शास्त्री आणि लोकांचे प्रमुख त्याला नष्ट करायला टपले होते. ४८तरी त्यांना काय करता येईल ते सुचले नाही, कारण त्याचे ऐकायला सर्व लोक त्याला बिलगून असत.    

——लूक २०—–

आणि त्या दिवसांत एकदा असे झाले की, तो मंदिरात लोकांना शिकवीत असता व सुवार्ता सांगत असता तेथे वरिष्ठ याजक व शास्त्री हे वडिलांबरोबर त्याच्याकडे आले, आणि ते त्याच्याशी बोलून म्हणाले,
“आम्हाला सांग, तू कोणत्या अधिकारानं ह्या गोष्टी करतोस? किंवा तुला हा अधिकार देणारा कोण आहे?”
आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मीपण तुम्हाला एक गोष्ट विचारतो; आणि तुम्ही मला सांगा, योहानाचा बाप्तिस्मा हा स्वर्गाकडून होता की, मनुष्यांकडून?”
तेव्हा ते आपआपल्यात वाद करू लागले व म्हणाले, आपण म्हटलं, ‘स्वर्गाकडून’, तर तो म्हणेल, ‘तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ पण आपण म्हटलं, ‘मनुष्यांकडून’, तर सर्व लोक आपल्याला दगडमार करतील. कारण ते मानतात की, योहान संदेष्टा होता. आणि त्यांनी उत्तर दिले की, तो कोणाकडून होता हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“आणि मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकारानं करतो ते मीपण तुम्हाला सांगत नाही.”

आणि तो लोकांना हा दाखला सांगू लागला,
“एका मनुष्यानं एक द्राक्षमळा लावला, आणि माळ्यांकडे सोपून दिला; आणि तो दीर्घकाळ दूरदेशी गेला. १०आणि हंगामात माळ्यांनी आपल्याला द्राक्षमळ्याच्या फळांतून द्यावं म्हणून त्यानं माळ्यांकडे एका दासाला धाडलं. पण त्या माळ्यांनी त्याला पिटलं आणि रिकामं पाठवून दिलं. ११तेव्हा त्यानं पुन्हा दुसर्‍या दासाला झाडलं. आणि त्यांनी त्यालापण पिटलं, त्याची हेटाळणी केली, आणि त्याला रिकामं पाठवून दिलं. १२तेव्हा त्यानं पुन्हा तिसर्‍या दासाला धाडलं; त्यांनी त्यालापण जखमी केलं आणि बाहेर घालवलं. १३तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, ‘मी काय करू? मी माझ्या प्रिय पुत्राला धाडतो; ते त्याला कदाचित् मान देतील.’ १४पण त्या माळ्यांनी त्याला बघितलं तेव्हा ते एकमेकांत वाद करीत म्हणाले, ‘हा वारीस आहे; आपण त्याला ठार मारू, आणि हे वतन आपलं होईल.’ १५आणि त्यांनी त्याला द्राक्षमळ्यातून बाहेर काढलं. तर द्राक्षमळ्याचा धनी त्यांना काय करील? १६तो येईल आणि त्या माळ्यांना नष्ट करील, आणि द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल.”
आणि त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले,
“तसं न होवो.”
१७पण त्याने त्यांच्याकडे न्याहाळून पहात म्हटले,
“मग हे जे लिहिलं आहे ते काय आहे?
 ‘बांधणार्‍यांनी जो दगड नाकारला
  तोच कोपर्‍याचा मुख्य चिरा झाला आहे.’
१८जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे होतील, पण तो ज्या कोणावर पडेल त्याचा भुगा उडवील.”
१९आणि त्याच घटकेस शास्त्री आणि वरिष्ठ याजक त्याच्यावर हात टाकायला पहात असता ते लोकांना भ्याले;कारण त्याने हा दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले.
२०मग त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली व आपल्या हेरांना पुढे पाठवले, म्हणजे त्यांनी आपण नीतिमान आहो असा बहाणा करून त्याला सुभेदाराच्या सत्तेखाली व अधिकाराखाली धरून द्यायला त्याला बोलण्यात धरावे, २१आणि त्यांनी त्याला प्रश्न करून म्हटले,
“गुरू, आम्हाला माहीत आहे की, आपण बरोबर बोलता आणि शिकवता,  आपण बाह्यरूप लक्षात घेत नाही, पण देवाचा मार्ग खरेपणानं शिकवता. २२आम्ही कैसराला कर देणं योग्य आहे की नाही?”
२३पण त्याने त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हटले,
२४“मला एक दिनार दाखवा, ह्यावर हा मुखवटा आणि वरचा लेख कुणाचा आहे?”
ते म्हणाले,
“कैसराचा.”
२५आणि तो त्यांना म्हणाला,
“मग कैसराचं आहे ते कैसराला द्या आणि देवाचं आहे ते देवाला द्या.”
२६आणि त्यांना लोकांपुढे त्याला ह्या बोलण्यात धरता येईना, तेव्हा त्यांनी त्याच्या उत्तराचे आश्चर्य केले आणि ते गप्प राहिले.
२७त्यानंतर, जे पुनरुत्थान नाही असे म्हणतात त्या सदोक्यांपैकी कित्येक जण त्याच्याकडे आले, आणि त्यांनी त्याला प्रश्न करून २८म्हटले,
“गुरू, मोशेनं आमच्यासाठी लिहिलं आहे की, जर एखाद्या मनुष्याचा भाऊ त्याला बायको असताना विनापत्य मेला, तर त्याच्या भावानं त्याची बायको घ्यावी आणि आपल्या भावासाठी संतान उभं करावं. २९आणि म्हणून सात भाऊ होते; पहिल्यानं बायको आणली आणि तो विनापत्य मेला; ३०आणि दुसर्‍यानं ३१आणि तिसर्‍यानं तिला घेतलं; आणि त्याचप्रमाणं त्या सातांनीही, मूलबाळ मागं ठेवलं नाही. आणि ते मेले. ३२नंतर ती बाईपण मेली. ३३तर ती पुनरुत्थानात त्यांच्यातल्या कोणाची बायको होईल? कारण ती त्या सातांची बायको होती.”
३४आणि येशू त्यांना म्हणाला,
“जे ह्या युगाचे पुत्र आहेत ते लग्न करतात आणि लग्न करून देतात. ३५पण ते युग आणि मेलेल्यांतून पुनरुत्थान हे प्राप्त व्हायला जे लायक गणले जातील ते लग्न करीत नाहीत किंवा लग्न करून देत नाहीत. ३६आणि त्यानंतर ते मरू शकत नाहीत, कारण ते देवदूतांसारखे होतात. आणि पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचेही पुत्र होतात. ३७आता,  मेलेले उठवले जातात हे मोशेनंपण झुडपाच्या प्रकरणात, तो जिथं परमेश्वराला  ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव’ असं संबोधतो तिथं दर्शवलं आहे. ३८कारण तो मृतांचा देव नाही, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्व जिवंत आहेत.”

३९तेव्हा शास्त्र्यांतील कित्येक जणांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“गुरू, आपण बरोबर बोललात.”
४०कारण ते त्याला पुन्हा आणखी प्रश्न करायला धजले नाहीत.

४१आणि तो त्यांना म्हणाला,
“ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असं ते कसं म्हणतात? ४२-४३कारण दावीद स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो,
  ‘परमेश्वर माझ्या प्रभूला म्हणाला,
  मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत,
  तू माझ्या उजवीकडे बस.’
४४म्हणून दावीद त्याला प्रभू म्हणतो, आणि तो त्याचा पुत्र कसा?”

४५आणि सर्व लोक ऐकत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
४६“तुम्ही शास्त्र्यांपासून जपा; त्यांना पायघोळ झग्यांत मिरवणं आवडतं; त्यांना बाजारांत मुजरे घेणं, सभास्थानांत पुढच्या जागा आणि जेवणावळींत वरच्या जागा घेणं आवडतं. ४७ते विधवांची घरं खाऊन टाकतात, आणि बहाण्यासाठी लांब प्रार्थना करतात. त्यांना अधिक दोष मिळेल.” 

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s