Luke 6-10

संत लूक ह्याचे शुभवर्तमान

—–लूक ६—–

आणि एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो शेतांमधून जात होता, तेव्हा त्याचे शिष्य कणसे तोडून, आपल्या हातांवर चोळून खाऊ लागले. तेव्हा परोश्यांतले कित्येक म्हणाले,
“शब्बाथ दिवशी जे करणं योग्य नाही ते तुम्ही का करता?”
आणि येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“जेव्हा दाविदाला, आणि त्याच्याबरोबर जे होते त्यांना भूक लागली होती तेव्हा त्यानं काय केलं हेही तुम्ही कधी वाचलेलं नाही काय? तो देवाच्या मंडपात कसा गेला, आणि ज्या समर्पित भाकरी केवळ याजकांशिवाय कोणी खाणं योग्य नाही त्या त्यानं कशा घेतल्या आणि खाल्ल्या, आणि जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या?”
आणि तो त्यांना म्हणाला,
“मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.”

आणि दुसर्‍या एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो सभास्थानात जाऊन शिकवू लागला. तेव्हा तेथे एक मनुष्य होता, आणि त्याचा उजवा हात वाळलेला होता. आणि तो त्याला शब्बाथ दिवशी बरा करतो काय, म्हणजे त्याच्यावर आरोप कसा करता येईल हे आपल्याला सापडेल म्हणून शास्त्री व परोशी त्याच्या पाळतीवर राहिले. पण त्याने त्यांचे विचार ओळखले व तो त्या हात वाळलेल्या मनुष्याला म्हणाला,
“ऊठ, आणि मध्यभागी उभा रहा.”
तेव्हा तो उठला आणि उभा राहिला. आणि येशू त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला प्रश्न करतो, शब्बाथ दिवशी चांगलं करणं योग्य आहे किंवा वाईट करणं? जीव वाचवणं किंवा नष्ट करणं?”
१०मग त्याने त्या सर्वांकडे सभोवार पाहिले आणि तो त्याला म्हणाला,
“तुझा हात पुढं कर.”
आणि त्याने केला, आणि त्याचा हात नीट झाला. ११तेव्हा ते वेडाने भरले व आपण येशूला काय करावे असे ते एकमेकांत बोलू लागले.

१२आणि त्या दिवसांत असे झाले की, तो बाहेर डोंगरावर प्रार्थना करायला गेला व देवाच्या प्रार्थनेत त्याने सर्व रात्र घालवली. १३आणि दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना आपल्याकडे बोलावले, आणि त्याने त्यांच्यातून बारा जणांना निवडले व त्यांना प्रेषित हे नाव दिले; १४शिमोन (त्याने त्याला पेत्र हेही नाव दिले), आणि त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब आणि योहान, फिलिप आणि बर्थलमय, १५मत्तय आणि थोमा, अल्फीचा याकोब व ज्याला गिलोत असे म्हणत तो शिमोन, १६आणि याकोबाचा यहुदा व यहुदा इस्कार्योत; तोच विश्वासघातकी झाला.

१७आणि तो त्यांच्याबरोबर खाली आला व एका सपाट जागी उभा राहिला; आणि त्याच्या शिष्यांचा एक मोठा जमाव, आणि सर्व यहुदियामधून व यरुशलेममधून आणि सोन व सिदोन ह्यांच्या समुद्रकाठच्या पट्टीमधून तेथे आलेल्या लोकांचा एक मोठा समुदाय उभा होता. ते त्याचे ऐकायला व आपले रोग बरे करून घ्यायला आले होते. १८आणि अशुद्ध आत्म्यांनी पछाडलेले होते ते बरे झाले. १९तेव्हा सगळे लोक त्याला शिवायचा प्रयत्न करीत होते, कारण त्याच्यामधून गुण बाहेर जाऊन त्यांना बरे करीत होता.

२०आणि, त्याने आपल्या शिष्यांकडे डोळे वर करून म्हटले,
“तुम्ही जे दीन ते तुम्ही धन्य, कारण देवाचं राज्य तुमचं आहे.
२१“तुम्ही जे आता भुकेले आहा ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल.
“तुम्ही जे आता रडत आहा ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल.
२२“मनुष्याच्या पुत्राकरता लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला आपल्यातून वेगळे करतील, तुमची निंदा करतील, आणि तुमचं नाव ते वाईट म्हणून टाकतील तेव्हा तुम्ही धन्य. २३त्या दिवशी तुम्ही आनंद करा आणि उड्या मारा; कारण बघा, स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना तसंच केलं.
२४“पण तुम्ही जे धनवान आहा त्या तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही आपलं सांत्वन भरून पावला आहा.
२५“तुम्ही जे आता तृप्त झाला आहा त्या तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही भुकेले व्हाल!
“तुम्ही जे आता हसत आहा त्या तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.
२६“सगळे लोक तुमच्याविषयी चांगलं बोलतील तेव्हा तुम्हाला हळहळ! कारण त्यांच्या पूर्वजांनी खोट्या संदेष्ट्यांना तसंच केलं.
२७“पण तुम्ही जे ऐकत आहा त्या तुम्हाला हे मी सांगतो की, तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात त्यांचं बरं करा, २८जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. आणि जे तुम्हाला वाईट वागवतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
२९“आणि, जो तुला तुझ्या गालावर मारतो त्याच्याकडे तू दुसराही पुढं कर; आणि जो तुझा अंगरखा घेतो त्याला बंडीही घ्यायला मना करू नको. ३०तुझ्याजवळ मागणार्‍या प्रत्येक जणाला दे; आणि जो तुझ्या वस्तू घेतो त्याच्याकडून त्या मागू नको. ३१आणि लोकांनी तुमच्याशी जशी वागणूक करावी अशी तुमची इच्छा असते तशीच तुम्हीही त्यांच्याशी वागणूक करा.
३२“कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केलीत तर तुमचा उपकार काय? कारण पापीही त्यांच्यावर प्रीती करणार्‍यांवर प्रीती करतात. ३३आणि जे तुमचं बरं करतात त्यांचं तुम्ही बरं केलंत तर तुमचा उपकार काय? कारण पापीही तसंच करतात. ३४आणि, तुम्ही ज्यांच्याकडून मिळण्याची आशा करता त्यांना तुम्ही उसनं दिलंत तर तुमचा उपकार काय? पापीही आपल्याला तेवढं परत मिळेल म्हणून पाप्यांना उसनं देतात. ३५पण तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा आणि त्यांचं बरं करा, आणि काही परत मिळण्याची आशा न करता उसनं द्या; तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल, आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्नांशी आणि दुष्टांशी दयाळू आहे. ३६म्हणून तुमचा पिताही उपकारी आहे तसेच तुम्ही उपकारी व्हा.
३७“न्याय करू नका आणि तुमचा न्याय केला जाणार नाही; दोषी ठरवू नका आणि तुम्हाला दोषी ठरवलं जाणार नाही; क्षमा करा आणि तुम्हाला क्षमा केली जाईल. ३८द्या आणि तुम्हाला दिलं जाईल; दाबून, हलवून, शीग भरून तुमच्या पदरात घालतील. कारण तुम्ही ज्या मापानं मोजून द्याल त्यानंच तुम्हाला परत मोजून दिलं जाईल.”
३९आणि त्याने त्यांना एक दाखला सांगितला,
“अंधळा अंधळ्याला नेऊ शकेल काय? ते दोघेही खाड्यात पडणार नाहीत काय? ४०शिष्य आपल्या गुरूहून मोठा नाही, पण पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.
४१“तुझ्या भावाच्या डोळ्यात कुसळ आहे ते तू का पाहतोस, पण तुझ्या स्वतःच्या डोळ्यात मुसळ आहे तिकडे तू लक्ष देत नाहीस? ४२किंवा तू जेव्हा तुझ्या स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ पहात नाहीस तेव्हा तू आपल्या भावाला कसं म्हणू शकशील की, ‘भाऊ, मला तुझ्या डोळ्यातलं कुसळ काढू दे’? अरे ढोंग्या, त्याआधी आपल्या स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ काढ; आणि मग तुला आपल्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ काढायला नीट दिसेल.
४३“कारण, कोणतंच चांगलं झाड कुजकं फळ देईल असं नसतं; किंवा,  उलट, कोणतंच कुजकं झाड चांगलं फळ देईल असं नसतं. ४४प्रत्येक झाड त्याच्या फळावरून समजतं. कारण कोणी काटेर्‍यांवरून अंजीर, किंवा करवंदीवरून द्राक्षं गोळा करीत नाहीत. ४५चांगला मनुष्य स्वतःच्या मनाच्या चांगल्या भांडारातून चांगलं काढतो. पण वाईट वाइटातून वाईट काढतो, कारण मनात भरलेल्या गोष्टींमधून त्याचं तोंड बोलतं.
४६“आणि तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू,’ का म्हणता? आणि मी सांगतो त्या गोष्टी करीत नाही? ४७जो कोणी माझ्याकडे येतो आणि माझी वचनं ऐकतो,  आणि त्याप्रमाणं करतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो; ४८तो एका, घर बांधणार्‍या मनुष्यासारखा आहे; त्यानं खोल खणून खडकावर पाया घातला. आणि जेव्हा पूर आला तेव्हा लोंढा त्या घरावर आदळला, आणि त्याला हलवू शकला नाही; कारण ते चांगलं बांधलेलं होतं. ४९पण जो ऐकतो आणि करीत नाही तो पायाशिवाय मातीवर घर बांधणार्‍या मनुष्यासारखा आहे. त्यावर लोंढा आदळला आणि, लगेच, ते पडलं आणि त्या घराचा नाश मोठा झाला.”  

—–लूक ७—–

मग त्याने आपली सर्व वचने लोकांच्या श्रवणात समाप्त केल्यावर तो कपर्णहूमला आला. तेव्हा एका शतपतीचा एक आवडता दास आजारी होता, आणि मरायला टेकला होता. आणि त्याने जेव्हा येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने येऊन आपल्या दासाला बरे करावे अशी त्याला विनंती करायला त्याने यहुद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवले. तेव्हा ते येशूकडे आले व त्यांनी त्याला आग्रहाने विनंती करून म्हटले,
“आपण हे त्यांच्यासाठी करावं असे ते योग्य आहेत. कारण ते आपल्या राष्ट्रावर प्रीती करतात, आणि त्यांनी आमच्यासाठी आमचं सभास्थान बांधलं.”
तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला; आणि आता घरापासून दूर नव्हता,  इतक्यात शतपतीने आपल्या मित्रांना त्याच्याकडे धाडून म्हटले,
“प्रभू, स्वतःला त्रास घडवू नका कारण मी असा लायक नाही की, आपण माझ्या छपराखाली यावं. म्हणून मी आपल्याकडे यायला स्वतःला लायक मानलं नाही; पण आपण शब्द बोला आणि माझा नोकर बरा होईल. कारण मी पण अधिकाराखालचा मनुष्य आहे, आणि माझ्या हाताखाली शिपाई आहेत. आणि मी एकाला म्हणतो, ‘जा’, आणि तो जातो, आणि दुसर्‍याला, ‘ये’, आणि तो येतो आणि माझ्या दासाला म्हणतो, ‘हे कर’, आणि तो करतो.”
आणि ह्या गोष्टी ऐकून येशूने आश्चर्य केले; तो मागे वळला, आणि त्याच्या मागोमाग जे आले होते त्यांना तो म्हणाला,
“मी तुम्हाला सांगतो, मला एवढा मोठा विश्वास इस्राएलातही आढळला नाही.”
१०आणि ज्यांना धाडले होते ते जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना तो दास बरा झालेला आढळला.

११आणि दुसर्‍या दिवशी असे झाले की, तो नाईन नावाच्या नगरात गेला; तेव्हा त्याचे शिष्य व पुष्कळ लोक त्याच्याबरोबर आले. १२आणि तो नगराच्या वेशीजवळ आला तेव्हा, बघा, ते एका मेलेल्या मनुष्याला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता, आणि ती विधवा होती व नगरातील पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. १३आणि प्रभूने तिला बघितले तेव्हा त्याला तिचा कळवळा आला आणि तो तिला म्हणाला,
“रडू नको.”
१४आणि, तो जवळ गेला व त्याने तिरडीला हात लावला तेव्हा ती घेऊन जाणारे उभे राहिले. आणि तो म्हणाला,
“मुला, मी तुला सांगतो, ऊठ.”
१५तेव्हा मेलेला उठून बसला आणि बोलू लागला व त्याने त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. १६तेव्हा सर्वांनी भय घेतले व ते देवाचे गौरव करीत म्हणाले, ‘आपल्यात एक मोठा संदेष्टा उद्भवला आहे’, आणि ‘देवानं आपल्या लोकांची भेट घेतली आहे’. १७आणि त्याच्याविषयीची ही गोष्ट सर्व यहुदियात व आसपासच्या सर्व प्रांतांत पसरली.

१८तेव्हा योहानाच्या शिष्यांनी त्याला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. १९आणि योहानाने आपल्या शिष्यांतल्या दोघांना आपल्याकडे बोलावले आणि त्यांना असे म्हणून प्रभूकडे धाडले की, ‘आपण जो येणार आहे तो आहात की, आम्ही दुसर्‍याची वाट पहावी?’ २०आणि ते लोक आले तेव्हा ते त्याला म्हणाले,
“बाप्तिस्मा करणार्‍या योहानानं आम्हाला असं म्हणून आपल्याकडे पाठवलं की, ‘आपण जो येणार आहे तो आहात की, आम्ही दुसर्‍याची वाट पहावी?’ ”
२१आणि त्याच घटकेस त्याने पुष्कळ जणांना आजारांपासून, बाधांपासून व दुष्ट आत्म्यांपासून बरे केले आणि पुष्कळ अंधळ्यांना दृष्टी दिली. २२आणि येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“जा, आणि तुम्ही ज्या गोष्टी बघितल्यात आणि ऐकल्यात त्या योहानाला सांगा; अंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात आणि बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात, दीनांना सुवार्ता सांगण्यात येते. २३आणि ज्या कोणाला माझ्यात अडथळा होणार नाही तो धन्य.”
२४आणि योहानाचे निरोप्ये गेल्यावर तो लोकांना योहानाविषयी सांगू लागला,
“तुम्ही काय बघायला बाहेर रानात गेलात? वार्‍यानं हालणारा बोरू काय? २५तर काय बघायला बाहेर गेलात? तलम पेहराव घालणार्‍या मनुष्याला काय? बघा, जे उंची पेहराव घालतात आणि चैनीत राहतात ते राजवाड्यात असतात. २६तर काय बघायला बाहेर गेलात? संदेष्ट्याला काय? मी तुम्हाला सांगतो, हो, आणि संदेष्ट्याहून जो श्रेष्ठ त्याला;  २७ज्याच्याविषयी हे लिहिलं आहे तोच हा आहे,
 ‘पहा, मी माझ्या निरोप्याला तुझ्यापुढे पाठवीन;
  आणि तो तुझ्यापुढे तुझा मार्ग तयार करील.’
२८मी तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानापेक्षा कोणी मोठा झाला नाही; पण देवाच्या राज्यात जो सर्वांत लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.
 (२९आणि योहानाच्या बाप्तिस्म्याने ज्यांनी बाप्तिस्मा घेतला होता अशा सर्व लोकांनी व जकातदारांनी हे ऐकून देवाला न्यायी ठरवले. ३०पण परोश्यांनी व शास्त्र्यांनी त्याच्याकडून बाप्तिस्मा न घेऊन आपल्याविषयीचा देवाचा मनोरथ निष्फळ केला.)
३१“म्हणून मी ह्या पिढीच्या लोकांना कोणाची उपमा देऊ? आणि ते कोणासारखे आहेत? ३२ते बाजारात बसणार्‍या मुलांसारखे आहेत. ते एकमेकांना हाक मारून म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी सनई वाजवली आणि तुम्ही नाचला नाही; आम्ही तुमच्यासाठी आक्रोश केला आणि तुम्ही रडला नाही.’ ३३बाप्तिस्मा करणारा योहान हा भाकर खात किवा द्राक्षारस पीत आला नाही, आणि तुम्ही म्हणता, ‘त्याच्यात भूत आहे.’ ३४मनुष्याचा पुत्र खात पीत आला आहे, आणि तुम्ही म्हणता, ‘बघा, हा एक खादाड आणि दारूबाज! जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र!’ ३५पण सुज्ञता तिच्या सर्व पुत्रांकडून न्यायी ठरते.”

३६आणि परोश्यांपैकी एका मनुष्याने त्याला आपल्याकडे भोजन करायची विनंती केली. आणि तो त्या परोश्याच्या घरी गेला आणि भोजनास बसला. ३७तेव्हा बघा, त्या नगरात एक पापी स्त्री होती, आणि, तो त्या परोश्याच्या घरी भोजनास बसला होता हे तिला माहीत झाले तेव्हा ती एक, सुवासिक तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली; ३८आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व ती आपल्या आसवांनी त्याचे पाय धुऊ लागली. मग ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून तिने त्याच्या पायांचे मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले. ३९आणि ज्या परोश्याने त्याला आमंत्रण केले होते त्याने जेव्हा हे बघितले तेव्हा तो आपल्या मनात म्हणाला, ‘हा मनुष्य जर संदेष्टा असता तर ह्याला समजलं असतं की, जी बाई आपल्याला शिवत आहे ती कोण आणि कसल्या प्रकारची आहे; कारण ती पापी आहे.’ ४०आणि येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“शिमोना, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.”
तेव्हा तो म्हणाला,
“गुरू, बोला.”
४१“एक सावकार होता आणि त्याचे दोन कर्जदार होते. एकाला पाचशे दिनार देणं होतं आणि दुसर्‍याला पन्नास. ४२आणि ते फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हतं. तेव्हा त्यानं ते त्या दोघांनाही सोडलं. तर त्यांच्यामधला कोण त्याच्यावर अधिक प्रीती करील?”
४३शिमोनाने उत्तर देऊन म्हटले,
“मला वाटतं ज्याला अधिक सोडलं तो.”
आणि तो त्याला म्हणाला,
“तू बरोबर ठरवलंस.”
४४तेव्हा तो त्या स्त्रीकडे मागे वळला व शिमोनाला म्हणाला,
“तू ह्या बाईला पहात आहेस? मी तुझ्या घरी आलो; तू माझ्या पायांसाठी पाणी दिलं नाहीस; पण हिनं माझे पाय आसवांनी धुतले. ४५तू मला चुंबन दिलं नाहीस पण हिनं मी आत आल्यापासून माझ्या पायांचे मुके घेणं थांबवलं नाही. ४६तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाहीस पण हिनं माझ्या पायांना सुवासिक तेल लावलं. ४७म्हणून, मी तुला सांगतो की, हिची जी पुष्कळ पापं आहेत त्यांची क्षमा केली आहे; कारण हिनं पुष्कळ प्रीती केली. पण ज्याला थोड्यांची क्षमा केली आहे तो थोडी प्रीती करतो.”
४८आणि तो तिला म्हणाला,
“तुझ्या पापांची क्षमा केली आहे.”
४९तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले एकमेकांना म्हणू लागले की,
“हा पापांची क्षमा करतो असा हा कोण आहे?”
५०आणि तो त्या स्त्रीला म्हणाला,
“तुझ्या विश्वासानं तुला तारलं आहे; शांतीत जा.”

—–लूक ८—–

आणि त्यानंतर असे झाले की, तो नगरांमधून व खेड्यांमधून घोषणा करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवीत फिरत गेला, आणि बारा जण त्याच्याबरोबर होते. आणि, दुष्ट आत्म्यांपासून व आजारांपासून बर्‍या झालेल्या कित्येक स्त्रिया, जिच्यामधून सात भुते निघाली व जिला मग्दाली म्हणत ती मरिया, आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, आणि सुसान्ना व दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्याची सेवा करीत असत.

मग पुष्कळ लोक एकत्र जमले असता, आणि प्रत्येक नगरातून ते त्याच्याकडे आले असता त्याने त्यांना एक दाखला सांगितला,
“एक पेरणारा आपलं बी पेरायला गेला, आणि तो पेरीत असता काही वाटेच्या कडेला पडलं. ते तुडवलं गेलं, आणि आकाशातल्या पक्ष्यांनी खाऊन टाकलं. काही खडकाळीवर पडलं, ते उगवल्याबरोबर वाळून गेलं; कारण त्याला ओलावा नव्हता. आणि काही काटेर्‍यांत पडलं आणि त्याबरोबर काटेरे वाढले, आणि त्यांनी त्याची वाढ खुंटवली. आणि दुसरं चांगल्या जमिनीत पडलं आणि उगवलं, आणि त्यानं शंभरपट पीक दिलं.”
आणि तो हे बोलल्यावर ओरडून म्हणाला,
“ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
मग त्याच्या शिष्यांनी त्याला हा दाखला काय असेल ते विचारले. १०आणि तो म्हणाला,
“देवाच्या राज्याची रहस्यं जाणणं तुम्हाला दिलेलं आहे, पण इतरांसाठी ते दाखल्यांत आहे; म्हणजे
 ‘त्यांनी पाहून पाहू नये,
  आणि ऐकून विचार करू नये.’
११आता तो दाखला हा आहे; बी देवाचं वचन आहे १२आणि जे वाटेच्या कडेचे आहेत ते ज्यांनी वचन ऐकलं ते होत. मग सैतान येतो, आणि त्यांनी विश्वास ठेवू नये आणि त्यांचं तारण होऊ नये म्हणून त्यांच्या मनातून वचन काढून घेतो. १३खडकाळीवरचे आहेत ते हे की, त्यांनी ऐकल्यावर ते आनंदानं वचन स्वीकारतात. त्यांना मूळ नसतं, ते काही काळ विश्वास ठेवतात आणि परीक्षेच्या काळात पडतात. १४आणि काटेर्‍यांत पडलं ते ज्यांनी ऐकलं आहे ते होत. ते आपल्या मार्गानं जात असता आयुष्यातील काळज्या, धन आणि सुखं ह्यांनी त्यांची वाढ खुंटते आणि ते पिकास येत नाहीत. १५आणि चांगल्या जमिनीत पडलं ते हे आहेत; ते वचन ऐकून चांगल्या, सालस मनात धरतात आणि टिकाव धरून पीक देतात.
१६“कोणी मनुष्य दिवा पेटवून तो भांड्याखाली झाकीत नाही किंवा पलंगाखाली ठेवीत नाही, पण आत येणार्‍यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. १७कारण प्रगट केलं जाणार नाही असं काही लपवलेलं नाही; किंवा कळणार नाही, किंवा प्रसिद्धीस येणार नाही असं गुप्त ठेवलेलं नाही. १८म्हणून तुम्ही कसं ऐकता ह्याची काळजी घ्या; कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे असं तो समजतो तेपण त्याच्याकडून काढून घेतलं जाईल.”

१९तेव्हा तेथे त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, आणि गर्दीमुळे ते त्याच्याजवळ जाऊ शकले नाहीत. २०तेव्हा त्याला हे सांगण्यात आले की,
“आपली आई आणि आपले भाऊ बाहेर उभे आहेत; आणि आपल्याला भेटायची त्यांची इच्छा आहे.”
२१पण त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“माझी आई आणि माझे भाऊ हे, जे देवाचं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणं करतात ते आहेत.”

२२आणि त्या दिवसांत एकदा असे झाले की, तो शिष्यांबरोबर एका मचव्यात चढला, आणि तो त्यांना म्हणाला,
“आपण सरोवराच्या दुसर्‍या बाजूस जाऊ.”
आणि ते चालवू लागले. २३पण ते वल्हवीत असता त्याला झोप लागली, आणि त्या सरोवरावर वावटळीचे वादळ आले; ते पाण्याने भरू लागले आणि धोक्यात होते. २४तेव्हा ते त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याला उठवून म्हटले,
“स्वामी, स्वामी, आपण बुडतोत.”
तेव्हा तो उठला, आणि त्याने वार्‍याला व उसळणार्‍या पाण्याला दटावले;  आणि ते थांबले व स्तब्धता आली. २५मग तो त्यांना म्हणाला,
“तुमचा विश्वास कुठं आहे?”
आणि ते भ्याले होते, आणि त्यांनी आश्चर्य करीत एकमेकांस म्हटले,
“असा हा कोण आहे की, हा वार्‍याला आणि पाण्यालादेखील आज्ञा करतो आणि ते त्याचं ऐकतात?”

२६मग ते गालिलाच्या विरुद्ध बाजूस गरसेकरांच्या प्रांतात आले. २७आणि तो बाहेर किनार्‍यावर आला तेव्हा त्याला त्या नगरातला एक मनुष्य भेटला; त्याच्यात भुते होती. तो दीर्घकाळापासून कधी कपडे पेहरीत नसे आणि घरात रहात नसे, पण थडग्यांत राही. २८आणि त्याने येशूला बघितले तेव्हा तो ओरडून त्याच्यापुढे पालथा पडला, आणि मोठ्या आवाजात म्हणाला,
“येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय करायचं आहे? मी तुला विनवणी करतो, मला पीडू नकोस.”
२९कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यातून बाहेर निघायची आज्ञा देत होता; (कारण त्याने त्याला पुष्कळदा पछाडले होते, त्याला साखळ्यांत व पायबेड्यांत जखडून पहार्‍यात ठेवीत; पण तो ती बंधने तोडी,आणि भूत त्याला रानात हाकलून नेई.) ३०आणि येशूने त्याला विचारले,
“तुझं नाव काय?”
आणि तो म्हणाला,
“सैन्य.”
कारण त्याच्यात पुष्कळ भुते शिरली होती. ३१आणि त्याने त्यांना अगाधकूपात जायची आज्ञा देऊ नये अशी त्यांनी त्याला विनंती केली. ३२आता एक, पुष्कळ डुकरांचा कळप तेथे डोंगरावर चरत होता; आणि त्याने त्यांना त्यांच्यात जाऊ द्यावे अशी त्यांनी त्याला विनंती केली; आणि त्याने त्यांना जाऊ दिले. ३३तेव्हा ती भुते त्या मनुष्यातून निघून त्या डुकरांत शिरली. आणि तो कळप एका कड्यावरून जोरात पळत खाली सरोवरात गेला, आणि ती गुदमरली. ३४तेव्हा जे त्यांची राखण करीत होते त्यांनी काय झाले ते बघितले तेव्हा ते पळाले आणि त्यांनी ते नगरात आणि शिवारात सांगितले. ३५तेव्हा ते काय झाले ते बघायला बाहेर निघाले व येशूकडे आले; आणि ज्या मनुष्यातून भुते निघाली होती तो त्यांना कपडे घातलेला, शुद्धीवर आलेला आणि येशूच्या पायांशी बसलेला आढळला; आणि ते भ्याले. ३६आणि ज्यांनी ते बघितले होते त्यांनी ज्याला भुते लागली होती तो कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. ३७तेव्हा गरसेकरांच्या आसपासच्या प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्यामधून निघून जायची विनंती केली; कारण त्यांना मोठ्या भयाने पछाडले होते. तेव्हा तो मचव्यात चढला व परत गेला. ३८तेव्हा ज्या मनुष्यातून भुते निघाली होती त्याने आपण त्याच्याबरोबर असावे म्हणून त्याला तशी विनंती केली. पण त्याने त्याला लावून दिले व म्हटले,
“तू आपल्या घरी जा आणि देवानं तुझ्यासाठी किती मोठ्या गोष्टी केल्यात त्या सर्व सांग.”
३९तेव्हा तो गेला, आणि येशूने त्याच्यासाठी ज्या मोठ्या गोष्टी केल्या होत्या त्या त्याने सर्व नगरात गाजवल्या.

४०आणि येशू परत आला तेव्हा लोकांनी त्याचे स्वागत केले. कारण ते सगळे त्याची वाट पहात होते. ४१आणि बघा, तेथे याईर नावाचा एक मनुष्य आला. तो एक, सभास्थानाचा अधिकारी होता. तो येशूच्या पायांशी पालथा पडला, आणि त्याने आपल्या घरी यावे अशी त्याने त्याला विनंती केली. ४२कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती आणि ती मरत होती. पण तो आत जात असता लोक त्याला चेंगरू लागले. ४३आणि तेथे बारा वर्षे रक्तस्राव लागलेली एक स्त्री होती; ती कोणाकडूनही बरी होऊ शकली नव्हती. ४४आणि ती त्याच्या मागोमाग आली व त्याच्या वस्त्राला शिवली. आणि, लगेच, तिचा रक्तस्राव थांबला. ४५तेव्हा येशू म्हणाला,
“मला कोण शिवलं?”
आणि सगळे जण नाकारू लागले तेव्हा पेत्र म्हणाला,
“स्वामी, ही गर्दी आपल्याला रेटीत आहे आणि लोटीत आहे.”
४६पण येशू म्हणाला,
“मला कोणी तरी शिवलं. कारण माझ्यातून गुण बाहेर गेला हे मी जाणलं. ४७आणि त्या बाईने जेव्हा बघितले की, आपण लपून राहिलो नाही, तेव्हा ती कापत कापत येऊन त्याच्यापुढे पालथी पडली; आणि ती त्याला कोणत्या कारणावरून शिवली होती व तत्काळ कशी बरी झाली हे तिने त्याला सर्व लोकांपुढे सांगितले. ४८आणि तो तिला म्हणाला,
“मुली, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे; शांतीत जा.”

४९तो बोलत होता तेवढ्यात सभास्थानाच्या अधिकार्‍याकडचा एक जण आला व त्याला म्हणाला,
“आपली मुलगी मरण पावली; गुरूंना त्रास देऊ नका.”
५०पण येशूने हे ऐकून त्याला उत्तर दिले,
“भिऊ नको. मात्र विश्वास ठेव, आणि ती बरी होईल.”
५१आणि तो घरात गेला, तेव्हा त्याने पेत्र, याकोब व योहान, आणि मुलीचा बाप व आई एवढ्यांशिवाय कोणालाही आत येऊ दिले नाही. ५२तेव्हा सगळे तिच्यासाठी रडत होते व ऊर बडवीत होते; पण तो म्हणाला,
“रडू नका; ती मेली नाही पण झोपली आहे.”
५३तेव्हा ते त्याला हसले, कारण ती मेली होती हे ते जाणत होते. ५४पण त्याने तिच्या हाताला धरून, हाक मारून म्हटले,
“मुली, ऊठ.”
तेव्हा तिचा आत्मा परत आला आणि ती लगेच उठली. ५५आणि त्याने तिला काही खायला द्यायला सांगितले. ५६तेव्हा तिचे आईबाप चकित झाले. पण जे झाले ते कोणाला सांगू नये असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. 

—–लूक ९—–

आणि त्याने बारा जणांना एकत्र बोलावले; आणि त्यांना सर्व भुतांवर आणि रोग बरे करायला सामर्थ्य व अधिकार देऊन त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करायला व आजारी असलेल्यांना बरे करायला पाठवले. आणि तो त्यांना म्हणाला,
“वाटेसाठी काही घेऊ नका; काठी नाही, झोळी नाही, भाकर नाही किंवा पैसा नाही, किंवा दोन झगेही घेऊ नका. आणि तुम्ही ज्या कोणत्या घरात जाल तिथं रहा, आणि तिथून पुढं जा. आणि जे कोणी तुमचं स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून त्या नगरातून बाहेर जाताना तुम्ही आपल्या पायांवरची धूळ झटकून टाका.”
तेव्हा ते निघाले आणि प्रत्येक ठिकाणी सुवार्ता सांगत व रोग बरे करीत त्यांनी खेड्यांमधून प्रवास केला.

आणि जे काही केले जात होते ते सर्व मांडलिक हेरोदाने ऐकले आणि तो मोठ्या संभ्रमात पडला. कारण कोणी म्हणत की, ’योहान मेलेल्यांतून उठवला गेला आहे.’ कोणी म्हणत की, ‘एलिया प्रगट झाला आहे’ आणि दुसरे म्हणत की, ‘प्राचीन संदेष्ट्यांतला कोणी पुन्हा उठला आहे.’ आणि हेरोद म्हणाला,
“मी योहानाचा शिरच्छेद केला, पण मी हे ज्याच्याविषयी ऐकतो तो कोण आहे?”
आणि त्याला बघावे अशी त्याची इच्छा होती.

१०आता प्रेषित परत आले, तेव्हा त्यांनी जे काही केले होते ते त्याला सविस्तर सांगितले; तेव्हा त्याने त्यांना आपल्याबरोबर घेतले व बेथसैदा नावाच्या गावाकडे तो एका एकान्त स्थळी एकीकडे गेला. ११पण हे लोकांना कळले तेव्हा ते त्याच्या मागोमाग गेले व त्याने त्यांचे स्वागत केले. तो त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलला आणि ज्यांना बरे करायची गरज होती त्यांना त्याने बरे केले. १२आता दिवस सरत आला; आणि बारा जण त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले,
“लोकांना लावून द्या; म्हणजे ते सभोवताली, खेड्यांत आणि शिवारात जाऊन राहतील, आणि काही खाणं मिळवतील, कारण आपण इथं रानातल्या जागी आहो.”
१३आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही त्यांना खायला द्या.”
तेव्हा ते म्हणाले,
“आम्ही जर गेलो नाही आणि ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत घेतलं नाही, तर आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन माशांशिवाय अधिक काही नाही.”
१४कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
“त्यांना सुमारे पन्नासपन्नासांच्या पंगती करून बसवा.”
१५तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे केले व त्या सर्वांना खाली बसवले. १६मग त्याने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन, आकाशाकडे वर पाहिले, आणि आशीर्वाद मागून त्यांचे तुकडे केले; आणि लोकांना वाढायला शिष्यांजवळ दिले. १७आणि ते सर्व जण जेवले व तृप्त झाले. मग त्यांनी बारा करंडे भरून त्यांतले राहिलेले तुकडे उचलले.

१८आणि असे झाले की, तो एकीकडे प्रार्थना करीत असता शिष्य त्याबरोबर होते; तेव्हा त्याने त्यांना प्रश्न करून म्हटले,
“मी कोण आहे म्हणून लोक म्हणतात?”
१९आणि त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक एलिया, आणि दुसरे कित्येक प्राचीन संदेष्ट्यांतला कोणी पुन्हा उठला असेल असं म्हणतात.”
२०तेव्हा त्याने त्यांना म्हटले,
“पण मी कोण आहे म्हणून तुम्ही म्हणता?”
आणि पेत्राने उत्तर देऊन म्हटले,
“देवाचा ख्रिस्त.”
२१आणि हे कोणाला सांगू नये म्हणून त्याने त्यांना निक्षून सांगितले व आज्ञा दिली.

२२आणि तो म्हणाला,
“मनुष्याच्या पुत्रानं पुष्कळ सोसावं, वडील, वरिष्ठ याजक आणि शास्त्री ह्यांच्याकडून नाकारलं जावं आणि मारलं जावं, आणि तिसर्‍या दिवशी उठवलं जावं हे अगत्य आहे.”
२३आणि तो सर्वांना म्हणाला,
“जर कोणी माझ्यामागं येऊ इच्छीत असेल तर त्यानं स्वतःला नाकारावं, आणि दररोज आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागं यावं. २४कारण जो आपला जीव वाचवू पाहील तो आपल्या जिवाला मुकेल, पण जो माझ्याकरता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. २५कारण मनुष्यानं सगळं जग मिळवून जर स्वतःला नष्ट केलं, किवा गमावलं, तर त्याला काय लाभ झाला? २६कारण ज्याला माझी आणि माझ्या वचनांची लाज वाटेल त्याची मनुष्याच्या पुत्राला तो जेव्हा आपल्या, आणि आपल्या पित्याच्या आणि पवित्र दूतांच्या गौरवात येईल तेव्हा लाज वाटेल. २७पण मी तुम्हाला खरोखर सांगतो, इथं उभे राहिलेत त्यांच्यात कोणी असे आहेत की, ते देवाचं राज्य बघतील तोवर मरणाचा अनुभव घेणार नाहीत.”

२८आणि असे झाले की, त्याने ह्या बोलण्यानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले, आणि तो प्रार्थना करायला एका डोंगरावर गेला. २९आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुद्रेचे रूप पालटले, आणि त्याचे वस्त्र शुभ्र व चकचकीत झाले. ३०आणि बघा, दोघे जण त्याच्याशी बोलत होते; ते मोशे आणि एलिया होते. ३१ते तेजात प्रगट झाले, आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमात पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. ३२आणि पेत्र व त्याचे सोबती हे झोपेने भारावले होते; पण ते नीट जागे झाले तेव्हा त्यांनी त्याचे तेज, आणि त्याच्याबरोबर उभे राहिलेले दोघे जण बघितले. ३३आणि असे झाले की, ते त्याच्याजवळून निघत असता, आपण काय बोलतो हे न समजता, पेत्र येशूला म्हणाला,
“स्वामी, आम्ही इथं आहोत हे चांगलं आहे. आम्ही तीन मंडप करू, एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी.”
३४तो हे बोलत होता तेवढ्यात एक ढग आला, आणि त्याने त्यांच्यावर छाया केली; आणि, ते ढगात गेले तेव्हा ते भ्याले. ३५आणि ढगातून वाणी आली; ती म्हणाली,
‘हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे;
ह्याचं ऐका.’
३६आणि ही वाणी झाली तेव्हा येशू एकटा आढळला; आणि ते गप्प राहिले; आणि त्यांनी जे पाहिले होते त्यातले काहीच त्यांनी त्या दिवसांत कोणाला सांगितले नाही.

३७आणि असे झाले की, दुसर्‍या दिवशी ते डोंगरावरून खाली आले. तेथे पुष्कळ लोक त्याला भेटले. ३८आणि बघा, लोकांतला एक जण ओरडून म्हणाला,
“गुरू, मी आपल्याला विनवणी करतो, माझ्या मुलाकडे पहा; कारण तो माझा एकुलता एक आहे. ३९आणि बघा, एक भूत त्याला धरतं, आणि हा एकदम ओरडतो; आणि ते ह्याला असं पिळतं की, ह्याला फेस येतो; ते ह्याला ठेचतं आणि ह्याला लवकर सोडीत नाही. ४०आणि त्याला बाहेर काढायला मी आपल्या शिष्यांना विनवणी केली; पण त्यांना ते करता आलं नाही.”
४१तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले,
“हे विश्वासहीन आणि विपरीत पिढी, मी कुठवर तुमच्याबरोबर राहू आणि तुमचं सहन करू? तुझ्या मुलाला इकडे आण.”
४२आणि तो येत असतानाच भुताने त्याला पाडून पिळले; पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला दटावले, आणि त्या मुलाला बरे केले व त्याच्या बापाजवळ परत दिले. ४३आणि देवाच्या महान सामर्थ्यावरून सर्व थक्क झाले.

पण त्याने केलेल्या सर्व गोष्टींवरून सर्व जण आश्चर्य करीत असताना तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
४४“हे शब्द तुमच्या कानांत ठसवा; कारण मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाईल.”
४५पण त्यांना हे बोलणे समजले नाही; आणि ते त्यांना कळू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते. आणि ते ह्या गोष्टींविषयी त्याला विचारायला भ्याले.

४६आणि आपल्यात सर्वांत मोठा कोण व्हावा, असा त्यांच्यात वाद उद्भवला. पण, ४७येशूने त्यांच्या मनांतले विचार ओळखले तेव्हा त्याने एका बालकाला घेतले व त्याला आपल्याजवळ बसवले; आणि त्यांना म्हटले,
४८“जो कोणी ह्या बालकाचा माझ्या नावानं स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो माझा स्वीकार करतो तो ज्यानं मला पाठवलं त्याचा स्वीकार करतो. कारण तुमच्यात जो सर्वांत लहान आहे तो मोठा आहे.”

४९आणि योहानाने उत्तर देऊन म्हटले,
“स्वामी, आम्ही एकाला आपल्या नावानं भुतं काढीत असताना बघितलं आणि आम्ही त्याला मना करायचा प्रयत्न केला; कारण तो आमच्याबरोबर आपल्यामागं येत नाही.”
५०पण येशू त्याला म्हणाला,
“त्याला मना करू नका; कारण जो तुमच्या विरुद्ध नाही तो तुमच्या बाजूचा आहे.”

५१आणि असे झाले की, त्याचे वर घेतले जाण्याचे दिवस जवळ आले तेव्हा त्याने यरुशलेमकडे जायला निश्चयाने आपले तोंड वळवले, ५२आणि त्याने आपल्यापुढे निरोप्यांना पाठवले; तेव्हा ते गेले व त्याच्यासाठी तयारी करायला शोमरोन्यांच्या एका खेड्यात गेले. ५३आणि त्यांनी त्याचे स्वागत केले नाही. कारण तो यरुशलेमकडे जात असल्यासारखे त्याचे तोंड होते. ५४आणि त्याचे शिष्य याकोब व योहान ह्यांनी हे बघितले तेव्हा ते म्हणाले,
“प्रभू, आकाशातून अग्नीनं येऊन ह्यांचा संहार करावा, अशी आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय?”
५५पण तो वळला व त्याने त्यांना दटावले. ५६आणि ते पुढच्या खेड्याकडे गेले.
५७आणि ते वाटेने जात असता एक जण त्याला म्हणाला,
“प्रभू, आपण जाल तिकडे मी आपल्यामागं येईन.”
५८आणि येशू त्याला म्हणाला,
“खोकडांना बिळं, आणि आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला कुठंच काही नाही.”
५९आणि तो दुसर्‍या एकाला म्हणाला,
“माझ्यामागं ये.”
पण तो म्हणाला,
“प्रभू, मला प्रथम जाऊ द्या, आणि माझ्या बापाला पुरू द्या.”
६०पण तो त्याला म्हणाला,
“मृतांना त्यांच्या मृतांना पुरू दे, पण तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा कर.”
६१आणि आणखीही एक जण म्हणाला,
“प्रभू, मी आपल्यामागं येईन; पण प्रथम मला माझ्या घरच्यांची रजा घेऊ द्या.”
६२पण येशू त्याला म्हणाला,
“जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागं पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही.”     

—–लूक १०—–

ह्यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांना नेमले व तो स्वतः जिकडे जाणार होता अशा प्रत्येक गावी व ठिकाणी, त्याने त्यांना दोघादोघांना, आपल्या पुढे पाठवले. आणि तो त्यांना म्हणाला,
“पीक फार आहे, पण कामकरी थोडे आहेत; तर पिकाच्या धन्यानं आपल्या पिकात कामकरी पाठवावेत म्हणून तुम्ही त्याला विनवणी करा. जा,  बघा, मी तुम्हाला लांडग्यांत मेंढरांसारखे पाठवीत आहे. पिशवी,  झोळी, किंवा वहाणा घेऊ नका; आणि वाटेत कोणाला अभिवादन करू नका. आणि तुम्ही ज्या कोणत्या घरात जाल, तिथं प्रथम, ‘ह्या घराला शांती असो’, असं म्हणा. आणि शांतीचा पुत्र तिथं असेल तर तुमची शांती त्याच्यावर राहील; नसेल तर ती तुमच्याकडे परत येईल. आणि त्याच घरात, ते जे काही देतील ते खात पीत रहा, कारण कामकरी त्याच्या वेतनाला पात्र आहे. एक घर सोडून दुसर्‍या घरी जाऊ नका. तुम्ही कोणत्याही नगरात गेलात आणि त्यांनी तुमचं स्वागत केलं, तर ते जे तुम्हाला वाढतील ते खा. तिथल्या आजार्‍यांना बरं करा, आणि त्यांना सांगा, ‘देवाचं राज्य तुमच्या जवळ आलं आहे’. १०पण कोणत्याही नगरात तुम्ही जाल आणि त्यांनी तुमचं स्वागत केलं नाही, तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन म्हणा, ११‘आमच्या पायांना चिकटून राहिलेली तुमच्या नगरातली धूळदेखील आम्ही तुमच्याविरुद्ध पुसतो. पण हे जाणा की, देवाचं राज्य जवळ आलं आहे.’ १२पण मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी, त्या नगरापेक्षा सदोमाला अधिक सोपं होईल. 
१३“हे खोराजिना, तुला हळहळ! हे बेथसैदा, तुला हळहळ! कारण तुमच्यात जे चमत्कार झाले ते सोर आणि सिदोन इथं घडले असते, तर त्यांनी तरट आणि राख अंगावर घालून, बसून पश्चात्ताप केला असता. १४पण न्यायाच्या वेळी, तुमच्यापेक्षा सोर आणि सिदोन ह्यांना अधिक सोपं होईल. १५आणि हे कपर्णहुमा, तुला स्वर्गापर्यंत चढवण्यात येईल काय? तुला अधोलोकापर्यंत खाली आणण्यात येईल.
१६“जो तुमचं ऐकतो तो माझं ऐकतो; जो तुमचा अवमान करतो तो माझा अवमान करतो; आणि जो माझा अवमान करतो तो ज्यानं मला पाठवलं त्याचा अवमान करतो.”
१७आणि सत्तर जण आनंदाने परत येऊन म्हणाले,
“प्रभू, आपल्या नावानं भुतंही आम्हाला आज्ञांकित झाली.”
१८आणि तो त्यांना म्हणाला,
“मी सैतानाला आकाशातून विजेसारखा पडताना पाहिलं. १९बघा, मी तुम्हाला साप आणि विचू ह्यांना तुडवायचा, आणि वैर्‍याच्या सर्व शक्तीवर अधिकार दिला आहे; आणि तुम्हाला काही कसाही अपाय करणार नाही. २०तरी भुतं तुम्हाला आज्ञांकित होतात म्हणून आनंद करू नका, पण त्यापेक्षा स्वर्गात तुमची नावं लिहिलेली आहेत म्हणून आनंद करा.”
२१त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात हर्षित होऊन म्हणाला,
“हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी तुझी स्तुती करतो, कारण तू ह्या गोष्टी ज्ञान्यांपासून आणि बुद्धिवानांपासून गुप्त ठेवल्यास आणि बालकांना प्रकट केल्यास. हो, पित्या, कारण ते तुला अधिक बरं दिसलं. २२माझ्या पित्यानं सर्व गोष्टी माझ्या हाती दिल्या आहेत, आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणी जाणत नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्राशिवाय, आणि पुत्र ज्या कोणाला प्रकट करू इच्छील त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही.”
२३मग तो शिष्यांकडे वळला आणि त्यांना एकीकडे म्हणाला,
“तुम्ही ह्या ज्या गोष्टी पाहता त्या पाहणारे डोळे धन्य! २४कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ संदेष्ट्यांनी आणि राजांनी तुम्ही ज्या गोष्टी पहात आहा त्या बघण्याची इच्छा धरली आणि त्यांनी त्या बघितल्या नाहीत; आणि तुम्ही ज्या गोष्टी ऐकत आहा त्या ऐकण्याची इच्छा धरली आणि त्यांनी त्या ऐकल्या नाहीत.”

२५आणि बघा, एक शास्त्री उभा राहिला व त्याने त्याची परीक्षा करावी म्हणून त्याला म्हटले,
“गुरू, मी सार्वकालिक जीवन हे वतन मिळवायला काय करू?”
२६आणि तो त्याला म्हणाला,
“नियमशास्त्रात काय लिहिलं आहे? तू कसं वाचतोस?”
२७तेव्हा तो उत्तर देऊन म्हणाला,
“ ‘तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर तू आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण बुद्धीने प्रीती कर;’ आणि ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर.’  
२८आणि तो त्याला म्हणाला,
“तू बरोबर उत्तर दिलंस. हे कर, आणि तू जगशील.”
२९पण आपण स्वतःला नीतिमान ठरवावं अशी इच्छा धरून त्याने येशूला म्हटले,
“आणि माझा शेजारी कोण?”
३०तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले,
“एक मनुष्य यरुशलेमहून खाली यरिहोकडे निघाला, आणि चोरांच्या गराड्यात पडला. त्यांनी त्याचे कपडे काढले, त्याला फटके लगावले,  त्याला अर्धमेला सोडलं, आणि ते निघून गेले. ३१आणि संयोगानं एक याजक त्या वाटेनं खाली आला, आणि त्यानं त्याला बघितलं तेव्हा तो दुसर्‍या बाजूकडून गेला. ३२तसाच एक लेवी त्या ठिकाणी आला, तेव्हा त्यानं त्याला बघितलं आणि तो दुसर्‍या बाजूकडून गेला. ३३पण, तो होता तिथं एक शोमरोनी प्रवास करीत आला; आणि त्यानं त्याला बघितलं तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. ३४तो त्याच्याकडे गेला, आणि त्यानं त्याच्या जखमांवर तेल आणि द्राक्षारस ओतून त्या बांधल्या; त्याला आपल्या जनावरावर बसवून एका उतारशाळेत आणलं, आणि त्याची चांगली काळजी घेतली. ३५आणि त्यानं दुसर्‍या दिवशी दोन दिनार काढून ते उतारशाळेच्या मालकाला दिले, आणि तो त्याला म्हणाला, ‘ह्याची चांगली काळजी घ्या, आणि तुम्ही जे काही अधिक खर्चाल ते मी पुन्हा परत येईन तेव्हा तुम्हाला देईन.’ ३६तर जो चोरांच्या गराड्यात पडला त्याचा शेजारी ह्या तिघांतून कोण झाला असं तू समजतोस?”
३७आणि तो म्हणाला,
“ज्यानं त्याच्यावर दया केली तो.”
तेव्हा येशू त्याला म्हणाला,
“जा, आणि तू तसंच कर.”

३८आणि ते जात असता तो एका खेड्यात आला; आणि मार्था नावाची एक स्त्री त्याला आपल्या घरी घेऊन गेली. ३९तिला मरिया नावाची एक बहीण होती; ती पण प्रभूच्या पायांशी बसून त्याचे बोलणे ऐकत होती. ४०पण मार्था पुष्कळ कामाने दगदगून त्याच्याजवळ येऊन म्हणाली,
“प्रभू, माझ्या बहिणीनं मला एकटीला काम करायला सोडलं, ह्याची आपण काही पर्वा करीत नाही? तर तिला मला मदत करायला सांगा.”
४१प्रभूने तिला उत्तर देऊन म्हटले,
“मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींच्या काळजीत आणि गोंधळात आहेस. ४२पण एकाच गोष्टीची गरज आहे, कारण मरियेने चांगला भाग निवडला आहे; तो तिच्याकडून काढून घेतला जाणार नाही.”      

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s