Mark 11-16

संत मार्क ह्याचे शुभवर्तमान

—–मार्क ११—–

आणि जेव्हा ते यरुशलेमकडे, जैतुनांच्या डोंगराजवळील बेथफगेच्या व बेथानीच्या जवळ येतात तेव्हा तो आपल्या शिष्यांतील दोघांना पाठवतो, आणि त्यांना म्हणतो,
“तुमच्या समोरच्या खेड्यात जा आणि तिथं तुम्ही आत जाताच, लगेच,  तुम्हाला एक बांधलेलं शिंगरू आढळेल. कोणी मनुष्य त्यावर कधी बसलेला नाही. त्याला सोडून घेऊन या आणि कोणी तुम्हाला म्हणेल, ‘तुम्ही हे का करता?’, तर तुम्ही म्हणा, ‘प्रभूला त्याची गरज आहे’; आणि, लगेच, तो ते इकडे परत पाठवील.”
आणि, ते गेले, आणि त्यांना नाक्यावर दाराशी बांधलेले शिंगरू आढळले. आणि ते त्याला सोडतात. तेव्हा तेथे जे उभे होते त्यांच्यातले काही त्यांना म्हणाले,
“तुम्ही शिंगराला सोडून काय करता?”
आणि येशूने त्यांना आज्ञा दिली होती तसे त्यांनी त्यांना सांगितले,  आणि त्यांनी त्यांना जाऊ दिले. ते येशूकडे ते शिंगरू आणतात. मग, त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली आणि तो त्यावर बसला. तेव्हा पुष्कळांनी आपली वस्त्रे पसरली आणि इतरांनी शेतातून कापलेल्या डहाळ्या वाटेवर पसरल्या आणि जे पुढे जात होते व जे मागोमाग येत होते ते ओरडून म्हणत होते,
“होसान्ना!
“प्रभूच्या नावानं येणारा धन्य!
१०“धन्य आमच्या दावीदपित्याचं येणारं राज्य!
“ऊर्ध्वलोकी, होसान्ना!”
११आणि येशू यरुशलेमात, मंदिरात आला व त्याने सर्व गोष्टींकडे सभोवार पाहिले; तेव्हा संध्याकाळ झाली असल्यामुळे तो बारा जणांबरोबर बेथानीस निघून गेला.

१२आणि ते सकाळी बेथानीहून निघाले तेव्हा तो भुकेला होता. १३आणि त्याने दुरून एक पाने असलेले अंजिराचे झाड बघितले व तो आपल्याला त्यावर कदाचित् काही मिळेल म्हणून आला; आणि तो त्या झाडाजवळ आला, तेव्हा त्याला पानांशिवाय काही आढळले नाही; कारण तेव्हा अंजिरांचा हंगाम नव्हता. १४तेव्हा तो बोलला व त्याला म्हणाला,
“आतापासून पुढील काळात कोणी तुझं फळ न खावो.”
आणि त्याच्या शिष्यांनी हे ऐकले.

१५मग ते यरुशलेमला येतात. आणि तो मंदिरात गेला, आणि मंदिरात जे कोणी विकीत होते आणि विकत घेत होते त्यांना तो बाहेर काढू लागला;  त्याने सराफांचे मेज व कबुतरे विकणार्‍यांचे चौरंग उलथले. १६आणि तो कोणाला कसलेही भांडे मंदिरामधून इकडून तिकडे नेऊ देईना.
१७मग तो शिकवू लागला व त्यांना म्हणाला,
“माझ्या घराला सर्व राष्ट्रांचं प्रार्थनेचं घर म्हणतील असं लिहिलेलं नाही काय? पण तुम्ही त्याची लुटारूंची गुहा केलीत.”
१८हे वरिष्ठ याजकांनी आणि शास्त्र्यांनी ऐकले व ते त्याला कसे नष्ट करता येईल हे पाहू लागले. कारण ते त्याला भीत होते, कारण त्याच्या शिक्षणाने सर्व लोक थक्क झाले होते. १९आणि संध्याकाळ झाली तेव्हा ते नगरातून बाहेर गेले.

२०आणि ते सकाळी चालले होते तेव्हा त्यांनी ते अंजिराचे झाड त्याच्या मुळापासून वाळलेले बघितले. २१आणि पेत्राला आठवण झाली व तो त्याला म्हणतो,
“पहा, रब्बी, तू ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिलास ते वाळून गेलं.”
२२आणि येशू उत्तर देऊन त्यांना म्हणाला,
“देवावर विश्वास ठेवा. २३मी तुम्हाला सत्य सांगतो, जो कोणी ह्या डोंगराला म्हणेल, ‘तू इथून काढला जाऊन समुद्रात टाकला जा’, आणि आपल्या मनात संशय धरणार नाही, पण आपण म्हणू ते होईल असा विश्वास ठेवील त्याच्यासाठी ते होईल. २४म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या गोष्टी प्रार्थना करून मागाल त्या आपल्याला मिळाल्यात असा विश्वास ठेवा, आणि त्या तुम्हाला मिळतील. २५आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे असता तेव्हा जर तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा; ह्यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्यानंपण तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी.”

२६-२७मग ते यरुशलेमला येतात, आणि तो मंदिरातून चालला असता, वरिष्ठ याजक, शास्त्री आणि वडील त्याच्याकडे येतात; २८आणि त्याला म्हणतात,
“तू कोणत्या अधिकारानं ह्या गोष्टी करतोस? किंवा ह्या गोष्टी करायला कोणी तुला हा अधिकार दिला?”
२९आणि येशू त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, मला उत्तर द्या, आणि मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकारानं करतो हे मी तुम्हाला सांगेन. ३०योहानाचा बाप्तिस्मा हा स्वर्गाकडून होता की मनुष्यांकडून? मला उत्तर द्या.”
३१तेव्हा ते आपआपल्यात वाद करू लागले व म्हणाले,
“आपण म्हटलं, ‘स्वर्गाकडून’, तर तो म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ ३२पण आपण म्हणावं, ‘मनुष्यांकडून’ तर – ते लोकांना भीत होते; कारण सर्व जण मानीत की, योहान खरोखर संदेष्टा होता. ३३आणि ते येशूला उत्तर देऊन म्हणतात,
“आम्हाला माहीत नाही.”
येशू त्यांना म्हणतो,
“आणि मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकारानं करतो ते मीपण तुम्हाला सांगत नाही.”    

—–मार्क १२—–

आणि तो त्यांच्याशी दाखल्यांद्वारे बोलू लागला,

“एका मनुष्यानं एक द्राक्षमळा लावला. त्याच्या भोवताली कुंपण घातलं, द्राक्षमळ्यासाठी कुंड खोदलं, माळा बांघला, आणि माळ्यांकडे सोपवून दिला; आणि तो दूरदेशी गेला. आणि हंगामात माळ्यांकडून आपल्याला द्राक्षमळ्याच्या फळातून मिळावं म्हणून त्यानं त्या माळ्यांकडे एका दासाला पाठवलं. आणि त्यांनी त्याला धरलं आणि पिटलं आणि रिकामं पाठवलं. तेव्हा त्यानं त्यांच्याकडे पुन्हा दुसर्‍या दासाला पाठवलं; आणि त्यांनी त्याला डोक्यावर जखमी केलं आणि त्याची हेटाळणी केली. तेव्हा त्याने आणखी एकाला पाठवलं; आणि त्यांनी त्याला ठार मारलं; आणि दुसर्‍या पुष्कळना तसंच केलं; काहींना पिटलं, काहींना ठार मारलं. अजून त्याच्याजवळ त्याचा प्रिय पुत्र हा एक होता; आणि ‘ते माझ्या पुत्राला मान देतील’ असं म्हणून त्यानं शेवटी त्याला त्यांच्याकडे पाठवलं. पण ते माळी एकमेकांत म्हणाले, ‘हा वारीस आहे; या, आपण ह्याला ठार मारू आणि हे वतन आपलं होईल.’ आणि त्यांनी त्याला धरलं, ठार मारलं आणि द्राक्षमळ्यातून बाहेर काढलं. तर द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येईल आणि त्या माळ्यांना नष्ट करील, आणि द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल. १०तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय?
 ‘बांधणार्‍यांनी जो दगड नाकारला
  तोच कोपर्‍याचा मुख्य चिरा झाला.
  ११हे परमेश्वराकडून झाले,
आणि हे आमच्या डोळ्यांना
आश्चर्यकारक आहे.’ ”
१२आणि ते त्याला धरायला पहात असता ते लोकांना भ्याले; कारण त्याने आपल्याविरुद्ध हा दाखला सांगितला हे त्यांनी ओळखले; आणि त्यांनी त्याला सोडले व ते गेले.

१३आणि त्याला त्याच्या बोलण्यात धरावे म्हणून ते परोश्यांतील व हेरोद्यांतील काही जणांना त्याच्याकडे पाठवतात. १४आणि ते आल्यावर त्याला म्हणतात,
“गुरू, आम्हाला माहीत आहे की, आपण खरे आहा आणि कोणाची पर्वा करीत नाही. कारण आपण माणसांचं बाह्यरूप पाहात नाही, पण देवाचा मार्ग खरेपणानं शिकवता; कैसराला कर देणं योग्य आहे की नाही?  १५आम्ही द्यावा की देऊ नये?”
पण त्याने त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हटले,
“माझी परीक्षा का करता? माझ्याकडे एक दिनार आणा; म्हणजे मला तो बघता येईल.”
१६आणि त्यांनी आणला, तेव्हा तो त्यांना म्हणतो,
“हा मुखवटा आणि वरचा लेख कोणाचा आहे?”
ते त्याला म्हणाले,
“कैसराचा.”
१७तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“कैसराचं आहे ते कैसराला द्या, आणि देवाचं आहे ते देवाला द्या.”
आणि त्यांनी त्याचे फार आश्चर्य केले.

१८त्यानंतर, जे पुनरुत्थान नाही असे म्हणतात, ते सदोकी त्याच्याकडे येतात; आणि त्यांनी त्याला प्रश्न करून म्हटले,
१९“गुरू, मोशेनं आमच्यासाठी लिहिलं आहे की, जर एखाद्या मनुष्याचा भाऊ मेला आणि त्यानं बायको मागे ठेवली, आणि मूलबाळ ठेवलं नाही, तर त्याच्या भावानं त्याची बायको घ्यावी, आणि आपल्या भावासाठी संतान उभं करावं. २०आणि सात भाऊ होते; पहिल्यानं बायको आणली, आणि मरतेवेळी संतान मागं ठेवलं नाही. २१आणि दुसर्‍यानं तिला घेतलं आणि तो मेला; त्यानंदेखील काही संतान मागं ठेवलं नाही. आणि तसंच तिसर्‍यानं, २२आणि सातांनी संतान मागं ठेवलं नाही. आणि सर्वांत शेवटी ती बाईपण मेली. २३ती पुनरुत्थानात त्यांच्यातल्या कोणाची बायको होईल? कारण, ती त्या सातांची बायको होती.”
२४येशू त्यांना म्हणाला,
“तुम्ही शास्त्रलेख आणि देवाचं सामर्थ्य जाणत नाही, म्हणून तर तुम्ही चुकत नाही ना? २५कारण ते मेलेल्यांमधून उठतात तेव्हा लग्न करीत नाहीत, किंवा लग्न करून देत नाहीत, पण स्वर्गातील देवदूतांसारखे होतात. २६पण मेलेल्यांविषयी, म्हणजे ते उठतात हे मोशेच्या पुस्तकातील झुडपाच्या प्रकरणात तुम्ही वाचलेलं नाही काय? देव त्याला कसा म्हणाला, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे’? २७तो मेलेल्यांचा देव नाही, पण जिवंतांचा देव आहे, म्हणून तुम्ही फार चुकत आहा.”

२८आणि शास्त्र्यांतील एक जण पुढे आला; ते वादविवाद करीत असताना तो त्यांचे ऐकत होता; आणि त्याने त्यांना बरोबर उत्तर दिले, हे बघून त्याने त्याला विचारले,
“सर्वांत पहिली आज्ञा कोणती?”
२९येशूने उत्तर दिले, 
“पहिली ही आहे, ‘हे इस्राएला, ऐक, परमेश्वर, आपला देव परमेश्वर एक आहे. ३०आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर तू आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर.’ ३१दुसरी ही आहे, ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर.’ ह्यांपेक्षा आणखी कोणतीच मोठी आज्ञा नाही.”
३२आणि तो शास्त्री त्याला म्हणाला,
“बरोबर, गुरू, आपण हे खरं म्हटलं की, तो एक आहे, आणि त्याच्याशिवाय कोणी दुसरा नाही. ३३आणि त्याच्यावर पूर्ण मनानं, पूर्ण बुद्धीनं आणि पूर्ण शक्तीने प्रीती करणं, आणि जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती करणं हे सर्व होमार्पणांपेक्षा आणि बलिदानांपेक्षा अधिक आहे.”
३४आणि त्याने समंजसपणाने उत्तर दिले, हे बघून येशूने त्याला म्हटले,
“तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.”
आणि तेव्हापासून कोणी त्याला प्रश्न करायला धजला नाही.

३५आणि येशू मंदिरात शिकवीत असताना त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असं शास्त्री कसं म्हणतात? ३६दावीद स्वतः पवित्र आत्म्यानं प्रेरित होऊन म्हणाला,
  ’परमेश्वर माझ्या प्रभूला म्हणाला,
  मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत
  तू माझ्या उजवीकडे बस.’
३७दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, आणि तो त्याचा पुत्र कुठून?”
आणि विशाल समुदाय त्याचे आनंदाने ऐकत होता.
३८आणि तो आपल्या शिक्षणात त्यांना म्हणाला,
“तुम्ही शास्त्र्यांपासून जपा. त्यांना पायघोळ झग्यांत मिरवणं आवडतं. बाजारात मुजरे घेणं, ३९सभास्थानांत पुढच्या जागा आणि जेवणावळींत वरच्या जागा घेणं आवडतं. ४०ते विधवांची घरं खाऊन टाकतात आणि बहाण्यासाठी लांब प्रार्थना करतात. त्यांना अधिक दोष मिळेल.”
४१मग तो भांडारासमोर बसून, लोक भांडारात पैसे कसे टाकीत होते ते पहात होता. पुष्कळ धनवान लोक पुष्कळ टाकीत होते, ४२तेव्हा एक दीन विधवा आली आणि तिने दोन टोल्या टाकल्या; त्यांची एक दमडी होते. ४३आणि त्याने आपल्या शिष्यांना आपल्याकडे बोलावले आणि तो त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, ह्या भांडारात पैसे टाकणार्‍या सर्वांपेक्षा ह्या दीन विधवेनं अधिक टाकलं. ४४कारण त्या सगळ्यांनी त्यांना अधिक असलेल्यातून टाकलं, पण हिनं तिला कमी असलेल्यातून तिच्याजवळ असलेलं सगळं टाकलं; तिची सगळी उपजीविका टाकली.”     

—–मार्क १३—–

मग तो मंदिरातून बाहेर जात असता त्याच्या शिष्यांतला एक जण त्याला म्हणतो,
“गुरू, बघा, कसले हे दगड, आणि कसल्या ह्या इमारती?”
आणि येशू त्याला म्हणाला,
“तू ह्या मोठ्या इमारती पाहतोस ना? इथं पाडला जाणार नाही असा दगडावर दगड राहू दिला जाणार नाही.”
मग तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला एकान्ती विचारले,
“आम्हाला सांगा ह्या गोष्टी केव्हा होतील? आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होणार असतील तेव्हा चिन्ह काय होईल?”
तेव्हा येशूने आरंभ करून त्यांना म्हटले,
“तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून जपा. कारण माझ्या नावानं पुष्कळ येतील, आणि म्हणतील, ‘मी तो आहे’; आणि पुष्कळांना फसवतील.
“आणि तुम्ही लढायांविषयी, आणि लढायांच्या अफवा ऐकाल, तेव्हा तुम्ही घाबरू नका; ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, पण अजून शेवट नाही. कारण राष्ट्र राष्ट्रावर उठेल आणि राज्य राज्यावर उठेल; आणि जागजागी भूकंप होतील, आणि दुष्काळ उद्भवतील. ह्या गोष्टी यातनांचा प्रारंभ आहेत.
“पण तुम्ही सावध रहा. कारण तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील; तुम्हाला सभास्थानांत फटके लगावले जातील; आणि तुम्ही माझ्याकरता, अधिकार्‍यांपुढं आणि राजांपुढं, त्यांना साक्ष व्हायला उभे रहाल. १०आणि प्रथम, सर्व राष्ट्रांत सुवार्ता गाजवली गेली पाहिजे. ११पण ते तुम्हाला घेऊन जातील, आणि धरून देतील, तेव्हा आपण काय बोलावं ह्याची अगोदर काळजी करू नका. पण तुम्हाला त्या घटकेस जे दिलं जाईल ते बोला; कारण बोलणारे तुम्ही नाही; पण पवित्र आत्मा बोलणारा आहे.
१२“ह्यावेळी भाऊ भावाला आणि बाप लेकराला ठार मारायला धरून देईल; आणि लेकरं आपल्या आईबापांवर उठतील, आणि त्यांचा वध करवतील. १३आणि सगळे माझ्या नावाकरता तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तारला जाईल.
१४“पण तुम्ही ज्यावेळी ओसाड करणारी अमंगळ गोष्ट नसावी तिथं ठेवलेली बघाल, (वाचणार्‍याला हे समजावे) त्यावेळी जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावं. १५जो धाब्यावर असेल त्यानं घरातून काही घ्यायला खाली येऊ नये किवा आत जाऊ नये. १६आणि जो शेतात असेल त्यानं आपला अंगरखा घ्यायला माघारी परत जाऊ नये. १७पण त्या दिवसांत ज्या गरोदर असतील आणि ज्या अंगावर पाजीत असतील त्यांना हळहळ!
१८“आणि हिवाळ्यात हे होऊ नये म्हणून प्रार्थना करा. १९कारण देवानं घडविलेल्या सृष्टीच्या प्रारंभापासून अजूनपर्यंत आलं नाही, किवा येणार नाही, असं संकट त्या दिवसांत येईल. २०आणि ते दिवस प्रभूनं कमी केले नसते, तर कोणीही देही वाचला नसता. पण, त्यानं ज्यांना निवडलं आहे त्या निवडलेल्यांसाठी त्यानं ते दिवस कमी केले आहेत.
२१“आणि, तेव्हा जर कोणी तुम्हाला म्हणेल, ‘बघा, ख्रिस्त इथं आहे’ किंवा  ‘बघा, ख्रिस्त तिथं आहे’, तर तुम्ही विश्वास ठेवू नका. २२कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उपस्थित होतील, आणि, शक्य तर, निवडलेल्यांसदेखील भुलवावं, म्हणून ते चिन्हं आणि अद्भुतं करतील. २३पण तुम्ही सावध रहा. बघा, मी तुम्हाला सर्व अगोदर सांगितलं आहे.
२४“पण त्या दिवसांत त्या संकटानंतर, सूर्य अंधकारमय होईल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही; २५आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील शक्ती थरथरतील. २६आणि, मग ते मनुष्याच्या पुत्राला ढगांत मोठ्या पराक्रमानं आणि गौरवानं येताना पाहतील. २७आणि मग तो देवदूतांना पाठवील,  आणि आपल्या निवडलेल्यांना पृथ्वीच्या टोकापासून आकाशाच्या टोकापर्यंत चारी दिशांतून गोळा करील.
२८“आता अंजिराच्या झाडावरून त्याचा दाखला शिका. आता त्याची फांदी टवटवीत होते आणि तिला पानं फुटतात तेव्हा तुम्ही जाणता की, उन्हाळा आहे. २९त्याचप्रमाणं, ह्या गोष्टी होत आहेत हे तुम्ही बघाल तेव्हा हेही जाणा की, ते जवळ दाराशी आहे. ३०मी तुम्हाला सत्य सांगतो, ह्या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. ३१आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचनं नाहीशी होणार नाहीत.
३२“पण त्या दिवसाविषयी किवा त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणीही जाणत नाही; स्वर्गातले देवदूतही जाणत नाहीत किवा पुत्रही जाणत नाहीत; ३३सावध रहा, जागृत रहा; कारण तो काळ कधी आहे हे तुम्ही जाणत नाही.
३४“हे दूरदेशी जाणार असलेल्या एक मनुष्यासारखं आहे; त्यानं आपलं घर सोडलं तेव्हा आपल्या दासांना अधिकार आणि प्रत्येकाला त्याचं काम देऊन रखवालदाराला जागृत राहायची आज्ञा दिली. ३५म्हणून जागृत रहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी किंवा सकाळी, हे तुम्ही जाणत नाही. ३६नाहीतर, तो अचानक येईल, आणि त्याला तुम्ही झोपलेले आढळाल; ३७आणि मी जे तुम्हाला सांगतो ते सर्वांना सांगतो, जागृत रहा.”    

—–मार्क १४—–

आणि दोन दिवसांनी वल्हांडण, आणि बेखमीर भाकरींचा सण होता; तेव्हा वरिष्ठ याजक व शास्त्री हे त्याला युक्तीने कसे धरावे आणि ठार मारावे हे पहात होते. कारण ते म्हणाले, “सणात नको; नाहीतर लोकांचा गलबला होईल.”

आणि तो बेथानीत, कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरात असता, तेथे भोजनास बसला होता. तेव्हा तेथे एक स्त्री आली; तिच्याजवळ एक, शुद्ध जटामांसीच्या, अतिमोलवान सुवासिक तेलाची अलाबास्त्र कुपी होती. तिने ती फोडली आणि ते त्याच्या मस्तकावर ओतले. तेव्हा तेथे काहींना राग येऊन ते एकमेकांत म्हणाले,
“ह्या सुवासिक तेलाचा असा नाश का करण्यात आला? कारण हे सुवासिक तेल तीनशेवर दिनारांना विकून गरिबांना देता आलं असतं.”
आणि त्यांनी तिच्याविरुद्ध कुरकुर केली. तेव्हा येशू म्हणाला,
“तिला राहू द्या. तुम्ही तिला त्रास का देता? तिनं माझ्यावर एक उचित क्रिया केली आहे. कारण, गरीब तुमच्याबरोबर नेहमी आहेत; आणि तुम्हाला वाटेल तेव्हा त्यांना साह्य करता येईल; पण मी तुमच्याबरोबर नेहमी नसणार. तिला जे काही करता आलं ते तिनं केलं. तिनं माझं शरीर थडग्यात ठेवता यावं म्हणून अगोदर घेऊन, त्याला सुवासिक तेल लावलं. आणि मी तुम्हाला सत्य सांगतो, सार्‍या जगात, जिथं कुठं, ही सुवार्ता गाजवली जाईल तिथं हेही, जे तिनं केलं आहे ते तिच्या स्मरणार्थ सांगितलं जाईल.”

१०आता, बारा जणांतला यहुदा इस्कार्योत हा आपण त्याला वरिष्ठ याजकांच्या हाती द्यावे म्हणून त्यांच्याकडे गेला. ११आणि त्यांनी त्याला पैसे द्यायचे वचन दिले. मग आपण त्याला सोयिस्कर वेळी कसे धरून द्यावे हे तो पाहू लागला.

१२मग, ते जेव्हा वल्हांडणाचा बळी मारीत त्या बेखमीर भाकरींच्या सणाच्या पहिल्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणतात,
“आपण वल्हांडणाचं भोजन करावं म्हणून आम्ही जाऊन कुठं तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”
१३तेव्हा तो आपल्या शिष्यांतून दोघांना पाठवतो आणि त्यांना म्हणतो,
“नगरात जा, तिथं तुम्हाला एक पाण्याचा घडा घेतलेला मनुष्य भेटेल; त्याच्या मागोमाग जा. १४आणि जिथं तो आत जाईल तिथल्या घरधन्याला म्हणा, ‘गुरू विचारतात की, मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचं भोजन करायला माझी उतरायची खोली कुठं आहे?’ १५तो स्वतः तुम्हाला एक मोठी, सजवून तयार केलेली, माडीवरची खोली दाखवील. तिथं आपल्यासाठी तयारी करा.”
१६मग त्याचे शिष्य बाहेर गेले व नगरात आले; आणि त्याने सांगितले होते तसे त्यांना आढळले. आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
१७मग संध्याकाळ झाली तेव्हा तो बारा जणांबरोबर येतो. १८आणि ते भोजनास बसले असता व जेवत असता येशू म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, माझ्याबरोबर जेवणारा, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.”
१९तेव्हा ते दुःखित होऊ लागले व एकामागून एक ते त्याला विचारू लागले,
“तो मी आहे काय?”
२०आणि तो त्यांना म्हणाला,
“बारांतला एक जण; तो माझ्याबरोबर थाळीत भिजवीत आहे. २१कारण मनुष्याचा पुत्र, खरोखर, त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणं जात आहे; पण ज्या कोणाकडून मनुष्याचा पुत्र धरला जाईल त्याला हळहळ! तो मनुष्य जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरं झालं असतं.”
२२मग ते जेवत असता त्याने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागून ती मोडली, आणि त्यांना देऊन म्हटले,
“घ्या, खा, हे माझं शरीर आहे.”
२३आणि त्याने प्याला घेतला, आणि उपकार मानल्यावर तो त्यांना दिला आणि ते सर्व जण त्यातून प्याले.२४आणि तो त्यांना म्हणाला,
“हे माझं कराराचं रक्त आहे. हे पुष्कळांसाठी ओतलेलं आहे. २५मी तुम्हाला सत्य सांगतो, मी देवाच्या राज्यात नवा पिईन त्या दिवसापर्यंत मी ह्यापुढं द्राक्षीचा उपज पिणार नाही.”
२६आणि त्यांनी एक गीत गाइल्यावर ते जैतुनांच्या डोंगराकडे निघाले.

२७आणि येशू त्यांना म्हणतो,
“तुम्ही सगळे जण अडखळणार आहा, कारण असं लिहिलं आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन, आणि मेंढरं पांगतील.’ २८पण मी उठवला जाईन, तेव्हा तुमच्या पुढं गालिलात जाईन.”
२९मग पेत्र त्याला म्हणाला,
“सगळे जण जरी अडखळले तरी मी अडखळणार नाही.”
३०तेव्हा येशू त्याला म्हणतो,
“मी तुला सत्य सांगतो, आज, ह्या रात्री, कोंबडा दोनदा आरवायच्या आधी तू मला तीनदा नाकारशील.”
३१पण तो आणखी भर देऊन म्हणाला,
“मला तुझ्याबरोबर मरावं लागलं तरी मी तुला नाकारणार नाही.”
तसेच ते सगळेही म्हणाले.

३२ते गेथशेमाने नावाच्या वाडीत येतात; तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणतो,
“मी प्रार्थना करतो, तोपर्यंत तुम्ही इथं बसा.”
३३मग तो पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपल्याबरोबर घेतो, आणि तो कावरा बावरा व कासावीस होऊ लागला; ३४तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“माझा जीव फार दुःखित, मरणोन्मुख झाला आहे. इथं थांबा, आणि जागे रहा.”
३५आणि तो थोडा पुढे गेला व जमिनीवर पडला आणि शक्य असल्यास,  आपल्यापुढून ही घटका निघून जावी म्हणून त्याने प्रार्थना केली. ३६आणि तो म्हणाला,
“अब्बा, बापा, तुला सर्व शक्य आहे. हा प्याला माझ्यापुढून काढ; पण माझी इच्छा आहे ते नको, तर तुझी इच्छा आहे ते होवो.”
३७आणि तो येतो, आणि त्याला ते झोपलेले आढळतात. आणि तो पेत्राला म्हणतो,
“शिमोना, झोपतोस काय? तुला घटकाभर जागता आलं नाही? ३८तुम्ही परीक्षेत येऊ नये म्हणून जागे रहा आणि प्रार्थना करा. आत्मा खरोखर उत्सुक आहे, पण देह अशक्त आहे.”
३९आणि तो पुन्हा गेला, आणि त्याने तेच शब्द बोलून पुन्हा प्रार्थना केली. ४०मग तो परत आला आणि त्याला ते झोपलेले आढळले; कारण, त्यांचे डोळे जड झाले होते व आपण त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचले नाही.
४१मग तिसर्‍या वेळी तो येतो व त्यांना म्हणतो,
“आता झोपा आणि विसावा घ्या. झालं, घटका आली आहे. बघा,  मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे. ४२उठा, चला;  बघा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”

४३आणि, लगेच, तो बोलत असताच बारा जणांतला यहुदा येतो, आणि वरिष्ठ याजक, शास्त्री आणि वडील ह्यांच्याकडून एक लोकांचा घोळका तरवारी व काठ्या घेऊन त्याच्याबरोबर आला. ४४आणि त्याला धरून देणार्‍याने त्यांना खूण देऊन म्हटले होते की, ‘मी ज्याचं चुंबन घेईन तोच तो आहे. त्याला धरा आणि संभाळून न्या.’ ४५आणि तो आल्याबरोबर, लगेच त्याच्याकडे आला आणि म्हणतो,
“रब्बी.”
आणि त्याने त्याचे मुके घेतले. ४६तेव्हा त्यांनी त्याच्यावर हात टाकले व त्याला धरले. ४७पण जे लोक जवळ उभे होते त्यांच्यातल्या एकाने आपली तरवार उपसली आणि श्रेष्ठ याजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला. ४८येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“तुम्ही मला धरायला, जणू एखाद्या चोरावर, तरवारी आणि काठ्या घेऊन आलात काय? ४९मी दररोज मंदिरात शिकवीत असता तुमच्याबरोबर होतो आणि तुम्ही मला धरलं नाही; पण शास्त्रलेख पूर्ण झाले पाहिजेत.”
५०मग त्या सगळ्यांनी त्याला सोडले आणि ते पळाले.
५१तेव्हा एक तरुण त्याच्या मागोमाग गेला. त्याने आपल्या उघड्या अंगावर एक तागाचे वस्त्र पांघरले होते. आणि त्यांनी त्याला धरले. ५२पण त्याने ते तागाचे कापड सोडले व तो त्यांच्यापासून उघडा पळाला.

५३आणि त्यांनी येशूला श्रेष्ठ याजकाकडे नेले आणि सर्व वरिष्ठ याजक, वडील व शास्त्री त्याच्याबरोबर तेथे येतात. ५४आणि पेत्र दुरून त्याच्या मागोमाग श्रेष्ठ याजकाच्या वाड्यात येऊन, कामदारांबरोबर बसला होता व आगीजवळ शेकत होता.
५५मग वरिष्ठ याजकांनी व संपूर्ण न्यायसभेने येशूला मरणाची शिक्षा द्यायला त्याच्याविरुद्ध साक्ष मिळवू पाहिली, पण काही मिळेना. ५६कारण पुष्कळ जण त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देत होते पण त्यांची साक्ष जुळणारी नव्हती. ५७मग कोणी उभे राहिले व त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले,
५८“आम्ही ह्याला असं बोलताना ऐकलं आहे की, ‘मी हे, हातांनी बांधलेलं मंदिर मोडीन, आणि हातांनी न बांधलेलं दुसरं मी तीन दिवसांत  उभारीन.’ ”
५९तरी त्यांची ही पण साक्ष जुळणारी नव्हती. ६०तेव्हा श्रेष्ठ याजक मध्यभागी उभा राहिला व त्याने येशूला प्रश्न करून म्हटले,
“तू काहीच उत्तर देत नाहीस? हे काय तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत?”
६१पण तो उगा राहिला व त्याने काहीच उत्तर दिले नाही. पुन्हा श्रेष्ठ याजकाने त्याला प्रश्न करून म्हटले,
“तू काय ख्रिस्त, धन्यवादित एकाचा पुत्र आहेस?”
६२आणि येशू म्हणाला,
“मी आहे, आणि तुम्ही पहाल की, मनुष्याचा पुत्र सामर्थ्याच्या उजवीकडे बसला आहे, आणि आकाशातल्या ढगांबरोबर येत आहे.”
६३तेव्हा श्रेष्ठ याजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो म्हणतो,
“आपल्याला आणखी साक्षींची काय गरज? ६४तुम्ही हे दुर्भाषण ऐकलंत. तुम्हाला काय वाटतं?”
आणि त्या सर्वांनी त्याला मरणाच्या शिक्षेसाठी पात्र म्हणून दोषी ठरवले. ६५कित्येक त्याच्यावर थुंकू लागले, आणि त्याचे तोंड झाकून, त्याला बुक्क्या लगावून म्हणू लागले,
“आता भाकीत कर.”
आणि कामदारांनी त्याचे चापट्यांनी स्वागत केले.
६६आणि, पेत्र खाली वाड्यात असता, श्रेष्ठ याजकाच्या दासींपैकी एक तेथे येते ६७आणि तिने पेत्राला शेकताना बघून त्याच्याकडे न्याहाळून पाहिले आणि ती त्याला म्हणते,
“तूपण नासरेथकर येशूबरोबर होतास.”
६८पण त्याने ते नाकारले व म्हटले,
“तू काय म्हणतेस ते मी जाणत नाही आणि मला समजत नाही.”
मग तो बाहेर देवडीत गेला आणि कोंबडा आरवला. ६९आणि त्या दासीने त्याला बघितले तेव्हा जे जवळ उभे होते त्यांना पुन्हा ती म्हणाली,
“हा त्यांच्यातला आहे.”
७०आणि त्याने ते पुन्हा नाकारले आणि जे जवळ उभे होते ते पुन्हा, थोड्या वेळाने, पेत्राला म्हणाले,
“तू खरोखर त्यांच्यातला आहेस; कारण तू गालिली आहेस.”
७१पण त्याने स्वतःवर शाप उच्चारीत शपथ घेऊन म्हटले,
“तुम्ही ज्या माणसाविषयी बोलता त्याला मी ओळखीत नाही.”
७२आणि दुसर्‍यांदा कोंबडा आरवला. आणि येशू त्याला बोलला होता की, ‘कोंबडा दोनदा आरवायच्या आधी तू मला तीनदा नाकारशील’, हे त्याचे वचन पेत्राला आठवले; त्याने ते लावून घेतले आणि तो रडला.  

—–मार्क १५—–

आणि, लगेच, सकाळी वरिष्ठ याजकांनी वडील व शास्त्री ह्यांच्याबरोबर व संपूर्ण न्यायसभेत मसलत केल्यावर येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले.
तेव्हा पिलाताने त्याला विचारले,
“तू यहुद्यांचा राजा आहेस काय?”
आणि तो उत्तर देऊन त्याला म्हणतो,
“आपण म्हणता.”
पण वरिष्ठ याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप करू लागले. तेव्हा, पुन्हा, पिलाताने त्याला प्रश्न करून म्हटले,
“तू काहीच उत्तर देत नाहीस. बघ, हे तुझ्यावर किती आरोप करीत आहेत?”
पण येशूने आणखी काही उत्तर दिले नाही; त्यामुळे पिलाताने आश्चर्य केले.
आता, ह्या सणात त्यांच्यासाठी तो ते मागतील त्या बंदिवानाला सोडीत असे. आणि त्यांनी बरब्बा नाव दिलेला एक जण, ज्यांनी दंगल केली होती व ज्यांनी खून केला होता त्या लोकांबरोबर बेड्या घालून ठेवलेला होता. तेव्हा लोक पुढे गेले आणि त्यांच्यासाठी तो करीत असे ते त्याने करावे म्हणून मागू लागले. पिलाताने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मी तुमच्यासाठी यहुद्यांच्या राजाला सोडावं अशी तुमची इच्छा आहे काय?”
१०कारण त्याला कळले होते की, वरिष्ठ याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते. ११पण त्याने त्यांच्यासाठी उलट बरब्बाला सोडावे म्हणून वरिष्ठ याजकांनी लोकांना चिथावले. १२पण पिलाताने पुन्हा उत्तर देऊन त्यांना म्हटले,
“तर मग तुम्ही ज्याला यहुद्यांचा राजा म्हणता त्याचं मी काय करू?”
१३तेव्हा ते पुन्हा ओरडले,
“त्याला वधस्तंभावर खिळा.”
१४पिलात त्यांना म्हणाला,
“का? त्यानं काय वाईट केलं आहे?”
पण ते आणखीच ओरडले,
“त्याला वधस्तंभावर खिळा.”
१५तेव्हा लोकांना संतुष्ट करावे अशी इच्छा धरून पिलाताने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले, आणि येशूला फटके मारल्यावर वधस्तंभावर खिळायला सोपवून दिले.

१६तेव्हा शिपाई त्याला वाड्यात म्हणजे प्रोतोर्यमात घेऊन गेले; आणि ते सगळी तुकडी एकत्र बोलावतात. १७तेव्हा ते त्याला एक जांभळा झगा पेहरवतात आणि एक काट्यांचा मुगुट गुंफून तो त्याला घालतात. १८आणि ते त्याला सलामी देऊ लागलेः
“जयजय! यहुद्यांचे राजे!”
१९त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारले. ते त्याच्या तोंडावर थुंकले; आणि त्यांनी गुडघे टेकून त्याला नमन केले.

२०आणि त्याला चिडवल्यावर त्यांनी त्याच्यावरून जांभळा झगा काढला व त्याला त्याचे कपडे पेहरवले; आणि त्याला वधस्तंभावर खिळायला नेले.
२१तेव्हा शिमोन म्हणून एक कुरेनेकर मनुष्य (अलेक्झांदर व रूफस ह्यांचा बाप) शिवारातून येऊन जवळून जात असता ते त्याला आपल्याबरोबर त्याचा वधस्तंभ घेऊन जायला वेठीस धरतात. २२ते त्याला गुलगुथा ह्या ठिकाणी आणतात. ह्याचा अर्थ ’कवटीचे ठिकाण’ असा आहे. २३आणि त्यांनी त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला; पण त्याने तो घेतला नाही.
२४आणि ते त्याला वधस्तंभावर खिळतात; आणि ते त्याचे कपडे, प्रत्येकाने काय घ्यावे म्हणून चिठ्या टाकून, वाटून घेतात. २५तेव्हा तिसरा तास होता आणि त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. २६आणि ’यहुद्यांचा राजा’ असा, त्याच्यावर केलेला आरोप दाखविणारा, वरचा लेख त्यावर लिहिलेला होता.
२७आणि ते दोन चोरांना त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळतात – एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला त्याच्या डावीकडे. २८-२९आणि जे जवळून जात होते ते आपली डोकी हलवून त्याची निंदा करून म्हणत,
“अहा! तू मंदिर मोडणार्‍या, आणि तीन दिवसांत उभारणार्‍या! ३०स्वतःला वाचव, वधस्तंभावरून खाली ये.”
३१त्याचप्रमाणे वरिष्ठ याजकही आपआपल्यात शास्त्र्यांबरोबर त्याची चेष्टा करीत म्हणाले,
“ह्यानं दुसर्‍यांना वाचवलं, हा स्वतःला वाचवू शकत नाही. ३२हा इस्राएलाचा राजा, ख्रिस्त, ह्यानं वधस्तंभावरून आता उतरावं, म्हणजे आम्ही बघून विश्वास ठेवू.‘
आणि ज्यांना त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी त्याची निंदा केली.

३३आणि सहावा तास झाला तेव्हा सर्व देशावर अंधार आला; तो नवव्या तासापर्यंत होता ३४आणि नवव्या ताशी येशू मोठ्या आवाजात ओरडला,
“एलोई, एलोई, लमा सबख्थनी?”
(म्हणजे माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?) ३५तेव्हा जे जवळ उभे होते त्यांच्यातल्या काहींनी हे ऐकून म्हटले,
“बघा, तो एलियाला बोलवीत आहे.”
३६आणि एक जण धावत गेला. त्याने एक बोळा आंबेने भरला आणि एका वेतावर लावून तो त्याला चोखायला दिला; आणि म्हटले,
“राहू द्या. एलिया त्याला उतरायला येतो काय ते आपण बघू.”
३७तेव्हा येशू मोठ्या आवाजात ओरडला आणि त्याने प्राण सोडला.
३८आणि पवित्र स्थानातला पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभंगला.
३९आणि त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे बघून त्याच्यापुढे उभ्या असलेल्या शतपतीने म्हटले,
“हा खरोखर देवाचा पुत्र होता.”
४०आणि स्त्रियाही दुरून पहात होत्या; त्यांच्यात मग्दाली मरिया, आणि धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरिया, आणि सलोमे ह्या होत्या. ४१(तो गालिलात असतानाही त्या त्याच्या मागोमाग जात व त्याची सेवा करीत.) आणि त्याच्याबरोबर यरुशलेमला वर आलेल्या दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया होत्या.

४२आणि आता संध्याकाळ झाली तेव्हा, तो तयारीचा दिवस, म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस असल्यामुळे ४३न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सभासद तेथे आला; तोही स्वतः देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. त्याने धैर्य केले, तो पिलाताकडे गेला व त्याने येशूचे शरीर मागितले. ४४तेव्हा तो ह्याअगोदर मेला असेल ह्याचे पिलाताने आश्चर्य केले; आणि त्याने शतपतीला बोलवून विचारले की, त्याला मरून आता काही वेळ झाला आहे काय? ४५आणि त्याला ते शतपतीकडून समजल्यावर त्याने योसेफाला शव दिले. ४६त्याने एक तागाचे वस्त्र विकत घेतले; आणि त्याने त्याला खाली काढून त्या तागाच्या वस्त्रात गुंडाळले व त्याला एका खडकात खोदलेल्या थडग्यात ठेवले; आणि थडग्याच्या दारावर एक शिळा लोटली. ४७आणि त्याला कोठे ठेवले हे मग्दाली मरिया व योसेची आई मरिया ह्यांनी पाहिले.

—–मार्क १६—–

आणि, शब्बाथ पूर्ण झाल्यावर, मग्दाली मरिया, योसेची आई मरिया आणि सलोमे ह्यांनी त्याला तिकडे जाऊन लावायला सुगंधी द्रव्ये विकत घेतली; आणि त्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी सकाळी, सूर्य उगवतेवेळी थडग्याकडे येतात. त्या आपआपल्यात म्हणत होत्या,
“आपल्यासाठी थडग्याच्या दारावरून शिळा कोण लोटील?”
आणि त्या वर पाहतात तो त्यांना दिसले की, शिळा मागे लोटलेली आहे. कारण ती फार मोठी होती. आणि त्या थडग्यात गेल्या तेव्हा त्यांनी उजव्या बाजूस, एक शुभ्र पायघोळ झगा घातलेला तरुण मनुष्य बसलेला बघितला आणि त्या घाबरल्या.
तेव्हा तो त्यांना म्हणतो,
“घाबरू नका. ज्या नासरेथकर येशूला वधस्तंभावर खिळलं होतं त्याला तुम्ही शोधता! तो उठला आहे. तो इथं नाही. त्याला जिथं ठेवलं होतं ती जागा बघा. पण जा, त्याच्या शिष्यांना आणि पेत्राला सांगा की, तो तुमच्या पुढं गालिलात जात आहे. त्यानं तुम्हाला सांगितल्याप्रमाणं तुम्ही त्याला तिथं पहाल.”
तेव्हा त्या बाहेर आल्या आणि थडग्यापुढून पळाल्या; कारण भयाने व आश्चर्याने त्यांना ग्रासले होते कारण त्या भ्याल्या होत्या.

परिशिष्ट [तो आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सकाळी, जेव्हा पुन्हा उठला तेव्हा प्रथम मग्दाली मरियेला प्रगट झाला. त्याने हिच्यामधून सात भुते काढली होती. १०ती गेली आणि तिने जे त्याच्याबरोबर आले होते ते शोक करीत व रडत असता त्यांना सांगितले. ११आणि तो जिवंत आहे व तिला दिसला होता, हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. १२आणि ह्यानंतर त्यांच्यातले दोघे जण शिवारात जात असता, तो त्यांना ते चालले असता, वेगळ्या स्वरूपात प्रगट झाला. १३ते गेले आणि त्यांनी इतरांना सांगितले,  त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. १४आणि त्यानंतर तो अकरा जणांना, ते भोजनास बसले असता प्रगट झाला. आणि त्याने त्यांच्या अविश्वासावरून व त्यांच्या मनाच्या कठिणपणावरून त्यांना दोष दिला. कारण ज्यांनी त्याला, तो उठल्यानंतर, पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नव्हता. १५आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्ता सांगा. १६जो विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो तो तारला जाईल. पण जो विश्वास ठेवणार नाही तो दोषी ठरेल. १७आणि, विश्वास ठेवणार्‍यांबरोबर ही चिन्हं मागोमाग जातील. ते माझ्या नावानं भुतं काढतील; ते नव्या भाषांत बोलतील. १८ते साप उचलतील; आणि ते जर काही प्राणनाशक प्याले तर ते त्यांना बाधणार नाही. ते आजार्‍यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.”
१९मग अशा प्रकारे, प्रभू येशू त्यांच्याबरोबर  बोलल्यानंतर वर आकाशात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला. २०आणि ते बाहेर गेले व त्यांनी सर्वत्र घोषणा केली; आणि प्रभू येशू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता आणि मागोमाग होणार्‍या चिन्हांद्वारे वचन प्रस्थापित करीत होता.]


Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s