Mark 6-10

संत मार्क ह्याचे शुभवर्तमान

—–मार्क ६—–

आणि तो तेथून निघाला, आणि तो आपल्या स्वतःच्या देशात येतो; आणि त्याचे शिष्य त्याच्या मागोमाग येतात. आणि शब्बाथ दिवस आला तेव्हा तो सभास्थानात शिकवू लागला; तेव्हा ऐकणारे पुष्कळ जण थक्क होऊन म्हणू लागले,
“ह्याच्यात ह्या गोष्टी कुठून आल्या? ह्याला दिलेलं ज्ञानीपण काय आहे? आणि ह्याच्या हातून असे चमत्कार होतात? हा सुतार ना? मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा आणि शिमोन ह्यांचा भाऊ? आणि ह्याच्या बहिणी इथं आपल्यात आहेत ना?”
आणि त्यांना त्याच्याविषयी अडथळा झाला. पण येशू त्यांना म्हणाला,
“कोणी संदेष्टा आपल्या स्वतःच्या देशात, स्वतःच्या नातलगात आणि स्वतःच्या घरी असल्याशिवाय त्याचा अवमान होत नाही.”
त्याने थोड्या आजार्‍यांवर आपले हात ठेवून त्यांना बरे केले; पण त्याला ह्याशिवाय काही चमत्कार करता आले नाहीत. आणि त्याने त्यांचा अविश्वास बघून आश्चर्य केले.
आणि तो सभोवताली खेड्यांमधून शिकवीत फिरला.

आणि त्याने बारा जणांना आपल्याकडे बोलावले; आणि तो त्यांना,  दोघादोघांना, पाठवू लागला. आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला. आणि त्याने त्यांना आज्ञा दिली की, त्यांनी आपल्या वाटेसाठी केवळ काठीशिवाय काही घेऊ नयेः भाकर नाही, झोळी नाही, किंवा कंबरकशात पैसा नाही. पण वहाणा घालून जावे, आणि दोन झगे पेहरू नयेत.
१०आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही कुठंही एखाद्या घरात जाल, तिथून तुम्ही पुढं जाईपर्यंत तिथं रहा. ११आणि जे गाव तुमचं स्वागत करणार नाही, आणि लोक तुमचं ऐकणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून तिथून पुढं जाताना तुम्ही आपल्या पायांखालची धूळ झटकून टाका.”
१२तेव्हा ते गेले, आणि लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. १३त्यांनी पुष्कळ भुते काढली, आणि आजारी असलेल्या पुष्कळ जणांना तेल लावून बरे केले.

१४आणि हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले. (कारण त्याचे नाव प्रसिद्ध झाले होते.) आणि तो म्हणाला,
“बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांमधून उठला आहे आणि म्हणून ह्या शक्ती त्याच्यात कार्य करीत आहेत.”
१५दुसरे म्हणाले,
“तो एलिया आहे.”
आणि दुसरे काही म्हणाले,
“तो संदेष्ट्यांसारखा संदेष्टा आहे.”
१६पण हेरोदाने त्याच्याविषयी ऐकले तेव्हा तो म्हणाला,
“मी ज्याचा शिरच्छेद केला तोच योहान उठला आहे.”
१७कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी स्वतः माणसे पाठवून योहानाला धरले होते व बेड्या घालून तुरुंगात ठेवले होते; कारण हेरोदाने तिच्याशी लग्न केले होते. १८कारण योहान हेरादाला म्हणे, “आपण आपल्या भावाची बायको घ्यावी हे आपल्याला योग्य नाही.” १९म्हणून हेरोदियेने त्याच्यावर राग धरला होता आणि त्याला मारावे अशी तिची इच्छा होती; पण ती ते करू शकली नाही. २०कारण योहान हा एक नीतिमान व पवित्र माणूस होता, हे हेरोद जाणत असल्यामुळे तो त्याला भीत होता व त्याचे संरक्षण करीत होता. तो त्याचे ऐकत असे तेव्हा गोंधळत असे, आणि तरी तो त्याचे आनंदाने ऐकत असे.
२१आणि एक सोयीचा दिवस आला; म्हणजे जेव्हा हेरोदाने आपल्या सरदारांना, सेनापतींना व गालिलातील प्रमुख लोकांना आपल्या वाढदिवशी रात्रीचे भोजन दिले; २२आणि हेरोदियेच्या मुलीने स्वतः आत येऊन नाच केला, आणि हेरोदाला व त्याच्याबरोबर बसलेल्यांना संतुष्ट केले. तेव्हा राजा मुलीला म्हणाला,
“माझ्याजवळ तुला पाहिजे असेल ते माग, आणि ते मी तुला देईन.”
२३आणि शपथ घेऊन तो तिला म्हणाला,
“माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत तू जे काही मागशील ते मी तुला देईन.”
२४तेव्हा ती बाहेर गेली आणि आपल्या आईला म्हणाली,
“मी काय मागू?”
आणि ती म्हणाली,
“बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचं शिर.”
२५तेव्हा तिने लगेच, घाईने, आत राजाकडे येऊन मागितले. ती म्हणाली,
“माझी इच्छा आहे की, आपण मला, आताच, एका तबकात बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचं शिर द्यावं.”
२६तेव्हा राजा फार दुःखित झाला. पण त्याच्या शपथांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याची तिला ‘नाही’ म्हणायची इच्छा नव्हती. २७आणि, लगेच, त्याने एका शिपायाला पाठवून त्याचे शिर आणायची आज्ञा केली. तेव्हा तो गेला, त्याने तुरुंगात त्याचा शिरच्छेद केला २८आणि त्याचे शिर एका तबकात आणून त्या मुलीला दिले. आणि मुलीने ते आपल्या आईला दिले. २९आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविषयी ऐकले तेव्हा ते आले आणि त्यांनी त्याचे शव घेऊन एका थडग्यात ठेवले.

३०आता प्रेषित येशूकडे एकत्र येतात. आणि त्यांनी जे काही केले होते व जे काही शिकवले होते ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. ३१तेव्हा तो त्यांना म्हणतो,
“तुम्ही वेगळे, एका रानातल्या जागी येऊन, थोडा विसावा घ्या.”
कारण पुष्कळ जण येत जात होते आणि त्यांना जेवायलाही फुरसत होईना. ३२मग ते एकटेच, एका मचव्याने एका रानातल्या जागी जायला निघाले.
३३तेव्हा पुष्कळांनी त्यांना निघताना बघितले व ओळखले, आणि सगळ्या नगरातून पायी निघून घोळक्यांनी धावत ते तिकडे त्यांच्या अगोदर गेले. ३४आणि तो बाहेर आला तेव्हा त्याने पुष्कळ लोक बघितले व त्याला त्यांचा कळवळा आला; कारण, ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे झाले होते; आणि तो त्यांना पुष्कळ गोष्टी शिकवू लागला.

३५आता दिवस पुष्कळ सरलेला असता त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले,
“ही रानातली जागा आहे, आणि आता दिवस पुष्कळ सरलेला आहे. ३६ह्यांना लावून द्या; म्हणजे ते सभोवताली, शिवारांत आणि खेड्यांत जाऊन आपल्या स्वतःसाठी खायला विकत घेतील.”
३७त्याने उत्तर देऊन त्यांना म्हटले,
“तुम्ही त्यांना खायला द्या.”
तेव्हा ते त्याला म्हणतात,
“आम्ही जाऊन, दोनशे दिनारांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला देऊ काय?”
३८आणि तो त्यांना म्हणतो,
“तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि बघा.”
आणि त्यांना समजले तेव्हा ते म्हणतात,
“पाच, आणि दोन मासे.”
३९मग त्याने त्यांना आज्ञा केली की, त्यांनी सर्वांनी, गटागटांनी, खाली हिरव्या गवतावर बसावे. ४०तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे ओळीओळींनी खाली बसले. ४१मग त्याने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन आकाशाकडे वर पाहिले, आणि आशीर्वाद मागून भाकरींचे तुकडे केले, आणि वाढायला आपल्या शिष्यांजवळ दिले. आणि त्याने दोन मासे त्या सर्वांना वाटून दिले. ४२आणि ते सर्व जण जेवले व तृप्त झाले.
४३मग त्यांनी बारा करंड्या भरून तुकडे उचलले, तसेच माशांचे तुकडे उचलले. ४४आणि ह्या भाकरी खाणारे पाच हजार पुरुष होते.

४५मग, लगेच, त्याने आपल्या शिष्यांना मचव्यात जाऊन आपल्या पुढे दुसर्‍या बाजूस बेथसैदाकडे जायला लावले; आणि तेवढ्यात तो लोकांना लावून देतो. ४६आणि त्याने त्यांची रजा घेतल्यावर तो एका डोंगरावर प्रार्थना करायला गेला.
४७आणि संध्याकाळ झाली तेव्हा मचवा समुद्राच्या मध्यभागी होता. ४८आणि वारा उलट असल्यामुळे त्यांना वल्हवताना कष्ट होत होते हे त्याने बघितले तेव्हा रात्रीच्या, चौथ्या प्रहराच्या सुमारास तो त्यांच्याकडे समुद्रावरून चालत येतो, आणि त्यांच्याजवळून पुढे गेला असता. ४९पण त्यांनी त्याला समुद्रावरून चालताना बघितले तेव्हा त्यांना वाटले की, भूत आहे आणि ते ओरडले; ५०कारण त्यांनी सगळ्यांनी त्याला बघितले,आणि ते अस्वस्थ झाले होते. पण तो लगेच त्यांच्याशी बोलला, आणि त्यांना म्हणतो,
“धीर धरा, मी आहे, भिऊ नका.”
५१मग तो त्यांच्याकडे मचव्यात वर गेला आणि वारा थांबला. तेव्हा ते मनात फार आश्चर्यचकित झाले, ५२कारण त्यांची मने कठिण झाली होती.

५३आणि जेव्हा ते दुसर्‍या बाजूस आले तेव्हा गनेसरेतच्या किनार्‍यावर आले व तेथे त्यांनी नांगर टाकला. ५४आणि ते मचव्यातून बाहेर आले तेव्हा, लगेच, लोकांनी त्याला ओळखले; ५५आणि ते आसपासच्या सर्व भागांत इकडे तिकडे पळत गेले, आणि तो कोठे आहे हे त्यांनी ऐकले तेथे तेथे ते आजार्‍यांना बाजल्यांवर घेऊन जाऊ लागले ५६आणि, तो जेथे कोठे, खेड्यांत, नगरांत किवा शिवारांत असे तेथे जे आजारी होते त्यांना त्यांनी बाजार भरण्याच्या जागी ठेवले, आणि त्यांना त्याच्या वस्त्राच्या काठाला तरी शिवता यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली; आणि जितके जण त्याला शिवले तितके बरे झाले.

—–मार्क ७—–

तेव्हा परोशी व यरुशलेमहून आलेल्या शास्त्र्यांतले कित्येक जण त्याच्याकडे बरोबर येतात; आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना विटाळलेल्या (म्हणजे न धुतलेल्या) हातांनी भाकरी खाताना बघितले होते. कारण,परोशी व सर्व यहुदी हे पूर्वजांची प्रथा पाळून आपले हात, आपल्या मुठींनी चोळून धुतल्याशिवाय, खात नाहीत आणि स्वतः पाणी शिपडल्याशिवाय ते बाजारातले खात नाहीत; आणि प्याले, घागरी आणि पितळी भांडी धुण्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी त्यांनी पाळायला उचलल्या आहेत.
म्हणून परोशी व शास्त्री त्याला विचारतात,
“आपले शिष्य पूर्वजांच्या प्रथेप्रमाणे का चालत नाहीत? उलट विटाळलेल्या हातांनी भाकरी खातात.”
त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“यशयानं तुम्हा ढोंग्यांविषयी बरोबर संदेश दिला आहे. कारण असं लिहिलं आहे की,
 ‘हे लोक मला ओठांनी मान देतात,
  पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे;
  पण ते व्यर्थ मला भजतात,
  आणि, ते शिकवण म्हणून
  मनुष्यांच्या आज्ञा शिकवतात.’
तुम्ही देवाची आज्ञा मोडता आणि मनुष्यांची प्रथा पाळता.”
आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही स्वतःची प्रथा पाळायला देवाची आज्ञा का नाकारता? १०कारण मोशे म्हणाला, ‘तू आपल्या बापाला आणि आईला मान दे’ आणि ‘जो कोणी बापाची किवा आईची निंदा करतो त्याने मरणाच्या शिक्षेने मरावे’.११पण तुम्ही म्हणता, जर कोणी मनुष्य आपल्या बापाला किवा आईला म्हणेल की, ‘तुम्हाला माझ्याकडून जे लाभलं असतं ते कुर्बान (म्हणजे दान) आहे’, १२तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. १३तुम्ही स्वतः नेमून दिलेल्या प्रथेकडून देवाचं वचन रद्द करता; आणि तुम्ही अशा पुष्कळ गोष्टी करता.”

१४मग त्याने लोकांना पुन्हा आपल्याकडे बोलावले आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही सर्व जण माझं ऐका आणि विचार करा. १५कोणतीही गोष्ट माणसाच्या बाहेरून त्याच्या आत जाऊन त्याला विटाळवू शकेल अशी नाही; पण ज्या गोष्टी माणसाच्या आतून निघतात त्या त्याला विटाळवितात.”
१६-१७आणि तो त्या लोकांकडून घरी आल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला तो दाखला विचारला १८आणि तो त्यांना म्हणतो,
“तुम्हीही इतके अज्ञानी आहात काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जातं ते त्याला विटाळवू शकत नाही, हे तुम्हाला समजत नाही काय? १९कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही; पण पोटात जातं आणि शौचकूपात बाहेर जातं.” (ह्यावरून त्याने सर्व अन्ने शुद्ध ठरवली.)
२०आणि तो म्हणाला,   
“जे काही माणसाच्या आतून निघतं ते माणसाला विटाळवितं; २१कारण आतून, माणसाच्या अंतःकरणातून, दुष्ट विचार निघतात; व्यभिचार,  जारकर्म, खून, २२चोर्‍या, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, दोषित दृष्टी, दुर्भाषण, गर्व, आणि मूर्खपण २३ह्या सगळ्या वाईट गोष्टी आतून निघतात आणि माणसाला विटाळवितात.

२४आता तो तेथून निघून सोर प्रांतात आला, आणि एका घरात गेला; हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती, आणि त्याला लपवणे शक्य नव्हते. २५पण लगेच एका बाईने त्याच्याविषयी ऐकले आणि ती आली; आणि त्याच्या पायाशी पालथी पडली; त्या बाईच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता. २६ती हेल्लेणी बोलणारी, सुरफुनिकी वंशाची बाई होती, आणि आपल्या मुलीमधून त्याने भूत काढावे म्हणून तिने त्याला विनंती केली. २७आणि तो तिला म्हणाला,
“मुलांना आधी तृप्त होऊ दे; कारण मुलांची भाकर घेऊन पिलांना टाकणं बरोबर नाही.”
२८पण ती त्याला उत्तर देऊन म्हणते,
“हो प्रभू, पण मेजाखालची पिलंसुद्धा मुलांच्या तुकड्यांमधून खातात.”
२९तेव्हा तो तिला म्हणाला,
“ह्या म्हणण्यामुळं तू जा. तुझ्या मुलीतून भूत निघून गेलं आहे.”
३०मग ती आपल्या घरी गेली, आणि तिला आढळले की, मुलगी खाटल्यावर पडली होती आणि भूत निघून गेले होते.

३१नंतर तो पुन्हा सोर प्रांतातून निघाला, आणि सिदोनामधून, तो दकापलीस प्रांतामधून गालील समुद्राकडे आला. ३२आणि, ते त्याच्याकडे एका मनुष्याला आणतात. तो बहिरा होता आणि बोलण्यात अडखळत असे आणि त्याने त्याच्यावर हात ठेवावा म्हणून ते त्याला विनंती करतात. ३३त्याने त्याला गर्दीमधून एकीकडे घेतले आणि त्याच्या कानांत आपली बोटे घातली; आणि त्याने थुंकी टाकली व त्याच्या जिभेला हात लावला ३४आणि आकाशाकडे वर पाहून उसासा टाकला; आणि तो त्याला म्हणतो,
“इप्फाथा.” (म्हणजे उघडून जा.)
३५तेव्हा लगेच त्याचे कान उघडले, आणि त्याच्या जिभेचे बंधन सुटले व तो बोलू लागला.
३६आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, हे कोणाला सांगू नका; पण त्याने जितके निक्षून सांगितले त्याहून त्यांनी ते अधिक गाजवले. ३७ते फार थक्क होऊन म्हणू लागले,
“त्यानं सगळ्या गोष्टी चांगल्या केल्यात. तो बहिर्‍यांस ऐकणारे आणि मुक्यांस बोलणारे करतो.”  

—–मार्क ८—–

त्या दिवसांत पुन्हा मोठा जमाव होता आणि त्यांच्याजवळ काही खायला नव्हते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना आपल्याकडे बोलावले आणि तो त्यांना म्हणतो,
“मला लोकांचा कळवळा येतो; कारण एवढे तीन दिवस ते माझ्या जवळ राहिलेत आणि त्यांच्याजवळ काही खायला नाही. मी त्यांना त्यांच्या घरी उपाशी लावलं तर ते वाटेत कासावीस होतील आणि त्यांच्यातले पुष्कळ जण दुरून आलेत.”
त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले,
“ह्यांना ह्या रानात कोण, कुठून भाकरी खाऊ घालू शकेल?”
तेव्हा त्याने त्यांना विचारले,
“तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”
आणि ते म्हणाले,
“सात.”
तेव्हा तो लोकांना खाली जमिनीवर बसायला सांगतो. मग त्याने सात भाकरी घेऊन, आणि उपकार मानून त्यांचे तुकडे केले; आणि त्यांना वाढायला आपल्या शिष्यांजवळ दिले, आणि त्यांनी लोकांना वाढले. त्यांच्याजवळ थोडे लहान मासेही होते; आणि त्याने त्यांवर आशीर्वाद मागून तेपण त्यांना वाढायला दिले.
आणि ते जेवले व तृप्त झाले. मग त्यांनी राहिलेल्या तुकड्यांचे सात करंडे उचलले. ते सुमारे चार हजार होते, आणि त्याने त्यांना लावून दिले.

१०आणि, लगेच, तो आपल्या शिष्यांबरोबर मचव्यात चढला आणि दाल्मनूथाच्या भागात आला. ११तेव्हा परोशी पुढे आले व त्याला प्रश्न करू लागले, आणि त्यांनी आपण त्याची परीक्षा करावी म्हणून त्याच्याकडून आकाशातून चिन्ह मागितले. १२तेव्हा तो आत्म्यात कण्हून म्हणतो,
“ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हाला सत्य सांगतो, ह्या पिढीला काहीच चिन्ह दिलं जाणार नाही.”
१३मग त्याने त्यांना सोडले आणि पुन्हा मचव्यात चढून तो दुसर्‍या बाजूस जायला निघाला.
१४ते आता भाकरी घ्यायला विसरले होते, आणि मचव्यात त्यांच्याजवळ एका भाकरीशिवाय काही नव्हते. १५आणि तो त्यांना निक्षून बोलून म्हणाला,
“पहा, परोश्यांच्या खमिराविषयी आणि हेरोद्यांच्या खमिराविषयी जपा.”
१६आणि त्यांनी आपसात वाद करीत म्हटले,
“आपल्याजवळ भाकरी नाहीत.”
१७आणि तो हे ओळखून त्यांना म्हणतो,
“तुमच्याजवळ भाकरी नाहीत म्हणून वाद का करता? तुम्हाला अजून समजत नाही, आणि तुम्ही विचार करीत नाही काय? तुमचं मन कठिण झालं आहे काय? १८डोळे असून तुम्ही पहात नाही काय? कान असून तुम्ही ऐकत नाही काय? तुम्हाला समजत नाही काय? १९मी पाच हजारात पाच भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही तुकडे भरलेल्या किती करंड्या उचलल्यात?”
ते त्याला म्हणाले,
“बारा.”
२०“आणि चार हजारात सात मोडल्या तेव्हा तुम्ही तुकडे भरलेले किती करंडे उचललेत?”
आणि ते म्हणाले,
“सात.”
२१आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्हाला समजत नाही हे कसं?”

२२मग तो बेथसैदाला येतो; तेव्हा ते त्याच्याकडे एका अंधळ्याला घेऊन येतात. आणि त्याने त्याला हात लावावा म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. २३तो त्या अंधळ्याला हाताने धरून गावाबाहेर घेऊन आला. आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकी टाकून व त्याच्यावर आपले हात ठेवून त्याने त्याला विचारले,
“तुला काही दिसतं काय?”
२४तेव्हा त्याने वर पाहून म्हटले,
“मला माणसं दिसतात; कारण ती झाडासारखी चालताना दिसतात.”
२५मग पुन्हा त्याने त्याच्या डोळ्यांवर हात ठेवले, तेव्हा त्याने निरखून पाहिले, आणि पूर्ववत् होऊन तो प्रत्येक गोष्ट न्याहाळून पाहू लागला. २६मग त्याने त्याला घरी पाठवून म्हटले,
“तू ह्या गावातही जाऊ नकोस.”

२७आणि येशू व त्याचे शिष्य कैसरिया फिलिपैच्या खेड्यांकडे निघाले,  आणि त्याने वाटेत आपल्या शिष्यांना प्रश्न करून त्यांना म्हटले,
“मी कोण आहे म्हणून लोक म्हणतात?”
२८आणि त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक एलिया, आणि दुसरे कित्येक संदेष्ट्यांतला कोणी आहे असे म्हणतात.”
२९तेव्हा त्याने त्यांना विचारले,
“पण, मी कोण आहे म्हणून तुम्ही म्हणता?”
पेत्र त्याला उत्तर देऊन म्हणतो,
“तू ख्रिस्त आहेस.”
३०आणि त्यांनी आपल्याविषयी कोणाला सांगू नये म्हणून त्याने त्यांना आज्ञा दिली.
३१आणि तो त्यांना हे शिकवू लागला की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ सोसावे, आणि वडील, वरिष्ठ याजक आणि शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे आणि मारले जावे, आणि तीन दिवसांनी पुन्हा उठावे हे अगत्य आहे. ३२आणि तो हे बोलणे उघडपणे बोलला तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेतले आणि तो त्याला दटावू लागला. ३३पण तो मागे फिरला, त्याने आपल्या शिष्यांकडे बघितले व तो पेत्राला दटावून म्हणतो,
“अरे सैताना, माझ्या मागं हो; कारण तू देवाच्या गोष्टींचा विचार करीत नाहीस पण मनुष्यांच्या गोष्टींचा करतोस.”
३४मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांना आपल्याकडे बोलावले, आणि तो त्यांना म्हणाला,
“जर कोणी माझ्यामागं येऊ इच्छीत असेल तर त्यानं स्वतःला नाकारावं, आणि आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागं यावं; ३५कारण, जो आपला जीव वाचवू पाहील तो आपल्या जिवाला मुकेल, पण जो माझ्याकरता आणि सुवार्तेकरता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. ३६कारण मनुष्यानं सारं जग मिळवून आपला जीव गमावण्यात त्याला काय लाभ होईल? ३७कारण मनुष्य आपल्या जिवाऐवजी काय देईल? ३८कारण ज्याला ह्या व्यभिचारी आणि पापी पिढीत माझी आणि माझ्या वचनांची लाज वाटेल त्याची मनुष्याच्या पुत्रालाही, तो जेव्हा आपल्या पित्याच्या गौरवात, पवित्र दूतांबरोबर  येईल तेव्हा लाज वाटेल.”

—–मार्क ९—–

आणि तो त्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, इथं उभे राहिलेत त्यांच्यात कित्येक असे आहेत की, ते देवाचं राज्य पराक्रमानं आलेलं बघतील तोपर्यंत मरणाचा अनुभव घेणार नाहीत.”

मग येशू सहा दिवसांनी पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेऊन, एका उंच डोंगरावर एकीकडे आणतो; आणि त्यांच्या समवेत त्याचे रूपांतर झाले. आणि त्याची वस्त्रे इतकी चकचकीत, इतकी अतिशय शुभ्र झाली की, पृथ्वीवरील कोणीही परीट ती तितकी शुभ्र करू शकणार नाही. आणि तेथे त्यांना मोशेबरोबर एलिया दिसला, आणि ते येशूशी बोलत होते. तेव्हा पेत्र बोलतो आणि येशूला म्हणतो,
“रब्बी, आम्ही इथं आहोत हे चांगलं आहे. आम्ही तीन मंडप करू, एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी.”
कारण आपण काय बोलावे हे त्याला सुचले नव्हते; कारण ते भयभीत झाले होते.
तेव्हा त्यांच्यावर छाया करीत एक ढग आला, आणि त्या ढगातून वाणी झाली,
‘हा माझा प्रिय पुत्र आहे; ह्याचं ऐका.’
आणि त्यांनी अकस्मात् सभोवार पाहिल्यावर त्यांनी पुन्हा आपल्या जवळ एकट्या येशूशिवाय कोणालाही बघितले नाही.
आणि ते डोंगरावरून खाली येत असता त्याने त्यांना आज्ञा दिली की, त्यांनी जे काही बघितले होते मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठेपर्यंत कोणाला सांगू नये. १०त्यांनी हे बोलणे मनात ठेवले व आपसात एकमेकांना प्रश्न केला की, मेलेल्यांतून उठणे काय आहे?
११मग त्यांनी त्याला प्रश्न करून म्हटले,
“शास्त्री असं का म्हणतात की, एलिया प्रथम आला पाहिजे?”
१२तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“एलिया खरोखर प्रथम येईल आणि सर्व गोष्टी पुन्हा प्रस्थापित करील. आणि मनुष्याच्या पुत्राविषयी हे कसं लिहिलं आहे की, त्यानं पुष्कळ सोसावं आणि अपमानलं जावं? १३पण मी तुम्हाला सांगतो, एलिया खरोखर आला, आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणं त्यांना वाटलं तसं त्यांनी त्याला केलं.”

१४मग ते शिष्यांकडे आले, तेव्हा त्यांनी बघितले की, त्यांच्या भोवती मोठा जमाव होता आणि शास्त्री त्यांच्याशी वादविवाद करीत होते. १५आणि सर्व लोकांनी त्याला बघितले तेव्हा ते लगेच फार थरारले, ते त्याच्याकडे धावत गेले आणि त्यांनी त्याला नमन केले. १६आणि त्याने त्यांना विचारले,
“तुम्ही ह्यांच्याशी काय वाद करता?”
१७तेव्हा जमावातल्या एकाने त्याला उत्तर दिले,
“गुरू, मी माझ्या मुलाला आपल्याकडे आणलं; कारण त्याच्यात एक मुका आत्मा आहे. १८जिथं कुठं तो ह्याला धरतो तिथं त्याला लोळवतो; आणि हा तोंडातून फेस काढतो, दात खातो आणि ताठ होतो. आणि ह्यांनी त्याला बाहेर काढावं म्हणून मी आपल्या शिष्यांशी बोलत होतो पण ते ते करू शकले नाहीत.”
१९आणि तो त्याला उत्तर देऊन म्हणतो,
“अहो, तुम्ही विश्वासहीन पिढी, मी कुठवर तुमच्या बरोबर राहू? कुठवर तुमचं सहन करू? त्याला माझ्या जवळ इकडे आणा.”
२०आणि त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले; आणि त्याला बघून, लगेच,  आम्याने त्याला पिळवटले; तेव्हा तो जमिनीवर पडला व फेस काढून लोळू लागला. २१आता त्याने त्याच्या बापाला विचारले,
“ह्याला केव्हापासून हे होत आहे?”
आणि तो म्हणाला,
“बालपणापासून. २२आणि त्यानं ह्याला नष्ट करावं म्हणून पुष्कळदा विस्तवात आणि पाण्यात पाडलं आहे. पण आपल्याला काही करणं शक्य असल्यास आमचा कळवळा येऊ द्या.”
२३आणि येशू त्याला म्हणाला,
“शक्य असल्यास? जो विश्वास धरतो त्याला सर्व काही शक्य आहे.”
२४आणि लगेच मुलाचा बाप ओरडून म्हणाला,
“प्रभू, मी विश्वास ठेवतो; आपण माझ्या अविश्वासाला मदत करा.”
२५आणि येशूने बघितले की, लोक सभोवती धावत येत आहेत, तेव्हा त्याने त्या अशुद्ध आत्म्याला दटावून म्हटले,
“अरे मुक्या आणि बहिर्‍या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यामधून बाहेर नीघ, आणि पुन्हा ह्याच्यात शिरू नको.”
२६तेव्हा तो ओरडला, त्याने त्याला फार पिळवटले व तो त्याच्यामधून बाहेर आला, आणि मुलगा मेल्यासारखा झाला. त्यामुळे ‘हा मेला’ असे बहुतेक जण म्हणू लागले, २७पण येशूने त्याला हाताला धरून उठवले; आणि तो उठला.
२८मग तो घरी आला तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला एकान्ती विचारले,
“आम्ही का त्याला काढू शकलो नाही?”
२९आणि तो त्यांना म्हणाला,
“ही जात प्रार्थनेशिवाय कशानंच निघणं शक्य नाही.”

३०मग ते तेथून निघाले व त्यांनी गालिलातून प्रवास केला; आणि हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. ३१कारण, तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता; आणि तो त्यांना म्हणाला,
“मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती दिला जात आहे; ते त्याला ठार मारतील, आणि, त्याला ठार मारल्यावर तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”
३२पण त्यांना हे बोलणे समजले नाही आणि ते त्याला विचारायला भ्याले.

३३मग ते कपर्णहूमला आले, आणि ते घरी असताना त्याने त्यांना विचारले,
“तुम्ही वाटेत कसला वाद करीत होता?”
३४आणि ते गप्प राहिले; कारण त्यांनी सर्वांत मोठा कोण असा वाटेत आपआपल्यात वाद केला होता. ३५मग तो बसला व त्याने बारा जणांना बोलावले, आणि तो त्यांना म्हणतो,
“जर कोणी मनुष्य पहिला होऊ इच्छीत असेल तर त्यानं शेवटला आणि सर्वांचा सेवक व्हावं.”
३६आणि त्याने एका बालकाला घेतले व त्याला त्यांच्या मध्यभागी बसविले आणि त्याला आपल्या बाहूंत घेऊन त्याला म्हटले,
३७“जो कोणी अशा बालकांतील एकाचा माझ्या नावानं स्वीकार करील तो माझा स्वीकार करतो; आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो माझा नाही, पण ज्यानं मला पाठवलं त्याचा स्वीकार करतो.”

३८मग योहान त्याला म्हणाला,
“गुरू, आम्ही एकाला तुझ्या नावानं भुतं काढताना बघितलं; तो आपल्यामागं येत नाही; आम्ही त्याला मना करायचा प्रयत्न केला कारण तो आपल्यामागं येत नाही.”
३९पण येशू म्हणाला,
“त्याला मना करू नका. कारण माझ्या नावानं चमत्कार करणारा कोणी मनुष्य, लगेच, माझ्याविषयी वाईट बोलणार नाही. ४०कारण जो आपल्या विरुद्ध नाही तो आपल्या बाजूला आहे.
४१“मी तुम्हाला सत्य सांगतो, जो कोणी तुम्हाला, तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून एक पाण्याचा प्याला प्यायला देईल तो आपलं प्रतिफळ गमावणार नाही.
४२“आणि जो माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या ह्या लहानांतील एकाला अडथळा करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकलं तर त्याच्यासाठी ते अधिक बरं होईल.
४३“आणि जर तुझा हात तुला अडथळा करीत असेल तर तो कापून टाक; थोटा होऊन जीवनात जाणं हे दोन हात घेऊन तू नरकात, न विझणार्‍या अग्नीत जाण्यापेक्षा तुझ्यासाठी अधिक बरं आहे. ४४-४५आणि जर तुझा पाय तुला अडथळा करीत असेल तर तो कापून टाक; अपंग होऊन जीवनात जाणं हे दोन पाय घेऊन तू नरकात जाण्यापेक्षा तुझ्यासाठी अधिक बरं आहे. ४६-४७आणि जर तुझा डोळा तुला अडथळा करीत असेल तर तो उपटून टाक; एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जाणं हे दोन डोळे घेऊन तू नरकात पडण्यापेक्षा तुझ्यासाठी अधिक बरं आहे. ४८तिथं त्यांचा किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही. ४९कारण, प्रत्येक जण अग्नीनं खारटवला जाईल.
५०“मीठ हे उपयोगी आहे, पण मीठ अळणी झालं तर त्याला कशानं चव आणणार? तुम्ही आपल्यात मीठ राखा आणि एकमेकांशी शांतीनं रहा.”   

—–मार्क १०—–

आणि तो तेथून निघून यहुदियाच्या व यार्देनेच्या दुसर्‍या बाजूच्या प्रांतात येतो; आणि लोक पुन्हा त्याच्याकडे येतात. मग तो आपल्या परिपाठास अनुसरून त्यांना शिकवू लागला.

तेव्हा परोशी त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याची परीक्षा करायला त्याला विचारले,
“नवर्‍यानं बायकोला सोडणं योग्य आहे काय?”
आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मोशेनं तुम्हाला काय आज्ञा केलेली आहे?”
आणि ते म्हणाले,
“सोडचिठ्ठी लिहून तिला सोडायला मोशेनं परवानगी दिली आहे.”
पण येशू त्यांना म्हणाला,
“तुमच्या मनाच्या कठिणपणामुळं त्यानं तुमच्यासाठी ही आज्ञा लिहिली. पण सृष्टीच्या प्रारंभापासून ‘त्याने त्यांना नर आणि नारी असे केले. ह्या कारणामुळे पुरुष आपल्या बापाला आणि आईला सोडील, आणि ती दोघे एकदेह होतील’; तर मग ती दोन नाहीत पण एकदेह आहेत म्हणून देवानं जे जोडलं आहे ते मनुष्यानं तोडू नये.”
१०मग घरात त्याच्या शिष्यांनी त्याला पुन्हा त्याविषयी विचारले, ११तेव्हा तो त्यांना म्हणतो,
“जो कोणी आपल्या बायकोला सोडील आणि दुसरीशी लग्न करील तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो १२आणि ती जर स्वतः आपल्या नवर्‍याला सोडील आणि दुसर्‍याशी लग्न करील तर ती व्यभिचार करते.”

१३आणि लोक बालकांना त्याच्याकडे, त्याने त्यांना हात लावावा म्हणून घेऊन आले. तेव्हा शिष्यांनी त्यांना दटावले. १४पण येशूने ते बघितले तेव्हा त्याला राग आला आणि तो त्यांना म्हणाला,
“बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका कारण स्वर्गाचं राज्य अशांचंच आहे. १५मी तुम्हाला सत्य सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाचं राज्य स्वीकारणार नाही तो त्यात प्रवेश करणार नाही.”
१६आणि त्याने त्यांना बाहूंत घेतले, त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला.

१७आणि तो रस्त्यावर पुढे गेल्यावर तेथे एक जण धावत आला, आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने त्याला विचारले,
“उत्तम गुरू, मी सनातन जीवन हे वतन मिळावं म्हणून मी काय करू?”
१८तेव्हा येशू त्याला म्हणाला,
“मला उत्तम का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणी उत्तम नाही. १९तू आज्ञा जाणतोस, ‘खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको आणि तू आपल्या बापाला आणि आईला मान दे.’ ”
२०तो त्याला म्हणाला,
“गुरू, मी ह्या सगळ्या लहानपणापासून पाळल्या आहेत.”
२१आणि येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहिले, त्याच्यावर प्रीती केली व त्याला म्हटले,
“तुझ्यात एक गोष्ट कमी आहे. जा, तुझ्याजवळ जे आहे ते वीक, आणि गरिबांना दे; आणि स्वर्गात तुला धन मिळेल. चल, माझ्यामागं ये.”
२२पण तो ह्या बोलण्याने काळवंडला व दुःखी होऊन गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती.

२३तेव्हा येशूने सभोवार पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणतो,
“ज्यांच्याजवळ संपत्ती आहे त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश करणं किती कठिण आहे!”
२४आणि शिष्य त्याच्या शब्दांनी आश्चर्यचकित झाले. तेव्हा येशू पुन्हा त्यांना उत्तर देऊन म्हणतो,
“मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश करणं किती कठिण आहे! २५धनवान मनुष्याला देवाच्या राज्यात प्रवेश करण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून शिरणं सोपं आहे.”
२६तेव्हा ते फार थक्क होऊन त्याला म्हणाले,
“मग कोण तारला जाऊ शकेल?”
२७येशू त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हणतो,
“मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवाला नाही; कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत.”
२८पेत्र त्याला म्हणू लागला,
“पहा, आम्ही सर्व सोडून तुझ्यामागं आलो आहो.”
२९आणि येशू म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, कोणी माझ्याकरता आणि सुवार्तेकरता घर, किंवा भाऊ, किंवा बहिणी, किंवा बाप, किंवा आई, किंवा मुलं, किंवा शेतं सोडणारा असा नाही, ३०की, त्याला आता, ह्या काळात, छळाबरोबर शंभरपट घरं, आणि भाऊ, आणि बहिणी, आणि आया, आणि मुलं, आणि शेतं, आणि येणार्‍या युगात सनातन जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. ३१पण पुष्कळ पहिले शेवटले होतील, आणि शेवटले पहिले होतील.”

३२आता ते वर यरुशलेमकडे जात असता वाटेवर होते आणि येशू त्यांच्या पुढे गेला, तेव्हा ते चकित झाले, व त्याच्या मागोमाग जाणारे भयभीत झाले. आणि त्याने पुन्हा, बारा जणांना बरोबर घेतले व आपल्याला काय काय होणार आहे हे तो त्यांना सांगू लागला,
३३“बघा, आपण यरुशलेमला वर जात आहो आणि मनुष्याचा पुत्र वरिष्ठ याजकांच्या व शास्त्र्यांच्या हाती दिला जाईल. ते त्याला मरणाच्या शिक्षेसाठी दोषी ठरवतील आणि परजनांच्या हाती देतील. ३४आणि ते त्याला चिडवतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि ठार मारतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”

३५आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान त्याच्याकडे जवळ येऊन म्हणतात,
“गुरू, आमची इच्छा आहे की, आम्ही मागू ते तू आमच्यासाठी करावंस.”
३६आणि तो त्यांना म्हणाला,
“तुमच्यासाठी मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?”
३७ते त्याला म्हणाले,
“तू आम्हाला तुझ्या गौरवात, एकाला तुझ्या उजवीकडे आणि एकाला तुझ्या डावीकडे बसायला दे.”
३८पण येशू त्यांना म्हणाला,
“तुम्ही काय मागता ते तुम्ही जाणत नाही. मी जो प्याला पीत आहे तो तुम्हाला पिता येईल? किंवा ज्या बाप्तिस्म्यानं बाप्तिस्मा घेत आहे त्यानं बाप्तिस्मा घेता येईल?”
३९आणि ते म्हणाले,
“येईल.”
तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“मी जो प्याला पीत आहे तो तुम्ही प्याल, आणि मी ज्या बाप्तिस्म्यानं बाप्तिस्मा घेत आहे त्यानं तुम्ही बाप्तिस्मा घ्याल. ४०पण माझ्या उजवीकडे किवा डावीकडे बसायला द्यायचं माझ्याकडे नाही. पण ज्यांच्यासाठी ते सिद्ध केलं आहे त्यांच्यासाठी ते आहे.”
४१आणि दहांनी हे ऐकले तेव्हा त्यांना याकोब व योहान ह्यांचा राग आला. ४२तेव्हा येशूने त्यांना आपल्याकडे बोलावले आणि तो त्यांना म्हणतो,
“तुम्ही जाणता की, ज्यांना परजनांत अधिकारी व्हायला लायक समजतात ते त्यांच्यावर धनीपण चालवतात, आणि, त्यांचे मोठे त्यांच्यावर सत्ता चालवतात. ४३तरी तुमच्यात तसं होणार नाही, पण तुमच्यात जो कोणी मोठा होऊ इच्छील त्यानं तुमचा सेवक व्हावं, ४४आणि तुमच्यात जो कोणी पहिला होऊ इच्छील त्यानं सर्वांचा दास व्हावं. ४५कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नाही, पण सेवा करायला आणि पुष्कळांसाठी खंडणी म्हणून, आपला जीव द्यायला आला.”
४६मग ते यरिहोला येतात; तेव्हा तो आपल्या शिष्यांबरोबर, आणि पुष्कळ लोकांबरोबर यरिहोतून बाहेर जात असता, तिमयाचा मुलगा बर्तिमय हा अंधळा भिकारी बाहेरच्या रस्त्याच्या कडेला बसला होता. ४७आणि जेव्हा त्याने ऐकले की, तो नासरेथकर येशू आहे तेव्हा तो ओरडून म्हणू लागला,
“अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”
४८तेव्हा त्याने गप्प रहावे म्हणून पुष्कळांनी त्याला दटावले. पण तो आणखी ओरडून म्हणाला,
“अहो दावीदपुत्र, माझ्यावर दया करा.”
४९तेव्हा येशू उभा राहिला आणि म्हणाला,
“त्याला बोलवा.”
आणि ते अंधळ्याला हाक मारून म्हणतात,
“धीर धर, ऊठ, ते तुला बोलवीत आहेत.”
५०आणि तो आपले वस्त्र टाकून उठला, आणि येशूकडे आला. ५१येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“तुझ्यासाठी मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?”
आणि अंधळा त्याला म्हणाला,
“रब्बूनी, मला दृष्टी यावी.”
५२तेव्हा येशू त्याला म्हणाला,
“जा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे.”
आणि, लगेच, त्याला दृष्टी आली व तो त्या रस्त्याने त्याच्या मागोमाग गेला.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s