Matthew 11-15

संत मत्तय ह्याचे शुभवर्तमान

—–मत्तय ११—–

आणि असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा देणे समाप्त केले, तेव्हा तो त्यांच्या नगरात शिकवायला व घोषणा करायला तेथून निघाला.

आता योहानाने तुरुंगात, ख्रिस्ताच्या कामाविषयी ऐकले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांतील दोघांना धाडले; आणि त्याला विचारले,
“आपण जो येणार आहे तो आहात की, आम्ही दुसर्‍याची वाट पहावी?”
येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“जा, आणि तुम्ही ज्या गोष्टी ऐकत आहा आणि पहात आहा त्या योहानाला सांगा, अंधळे पाहतात आणि पांगळे चालतात, मेलेले उठवले जातात आणि दीनांना सुवार्ता सांगण्यात येते. आणि ज्या कोणाला माझ्यात अडथळा होणार नाही तो धन्य.”
आणि ते गेल्यावर येशू लोकांना योहानाविषयी सांगू लागला,
“तुम्ही काय बघायला रानात गेलात? वार्‍यानं हलणारा बोरू काय? तर काय बघायला बाहेर गेलात? तलम पेहराव घालणार्‍या मनुष्याला काय? बघा, जे तलम पेहराव घालतात ते राजवाड्यात असतात. तर कशाला  बाहेर गेलात? संदेष्ट्याला बघायला काय? मी तुम्हाला सांगतो, हो, आणि संदेष्ट्याहून जो श्रेष्ठ त्याला; १०ज्याच्याविषयी हे लिहिलं आहे तो हा आहे,
  ‘पहा, मी माझ्या निरोप्याला
  तुझ्या तोंडापुढे पाठवीन
  आणि तो तुझ्यापुढे
  तुझा मार्ग तयार करील.’
११मी तुम्हाला सत्य सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणार्‍या योहानापेक्षा कोणी मोठा उद्भवला नाही, तरी स्वर्गाच्या राज्यात जो सर्वांत लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. १२बाप्तिस्मा करणार्‍या योहानाच्या दिवसांपासून आतापर्यंत, स्वर्गाच्या राज्यावर लगट लागली आहे आणि लगट लावणारे ते बळानं घेत आहेत. १३कारण सर्व संदेष्ट्यांनी आणि नियमशास्त्रानं योहानापर्यंत संदेश दिले. १४आणि तुमची हे स्वीकारायची इच्छा असेल तर येणारा एलिया हाच आहे. १५ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
१६“पण मी ह्या पिढीला कोणाची उपमा देऊ? ती बाजारांत बसणार्‍या मुलांसारखी आहे. ते आपल्या सोबत्यांना हाक मारून १७म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी सनई वाजवली, आणि तुम्ही नाचला नाही, आम्ही  तुमच्यासाठी आक्रोश केला, आणि तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत’, १८कारण योहान खात पीत आला नाही, आणि ते म्हणतात, ‘त्याच्यात भूत आहे’. १९मनुष्याचा पुत्र खात पीत आला आणि ते म्हणतात, ‘बघा, हा खादाड आणि दारुबाज मनुष्य! जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र!’ पण सुज्ञता तिच्या कृतींकडून न्यायी ठरते.”
२०मग जेथे त्याचे बहुतेक चमत्कार झाले होते त्या नगरांना तो दोष देऊ लागला; कारण त्यांनी पश्चात्ताप केला नव्हता.
२१“हे खोराजिना, तुला हळहळ! हे बेथसैदा, तुला हळहळ! कारण तुमच्यात जे चमत्कार झाले ते सोर आणि सिदोन इथं घडले असते तर त्यांनी, मागील काळात, तरट आणि राख अंगावर घालून पश्चात्ताप केला असता. २२पण मी तुम्हाला सांगतो, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सोर आणि सिदोन ह्यांना अधिक सोपं होईल.
२३“आणि हे कपर्णहुमा, तुला स्वर्गापर्यंत चढवण्यात येईल काय? तुला अधोलोकापर्यंत खाली आणण्यात येईल! कारण तुझ्यात जे चमत्कार झाले ते सदोमात घडले असते तर ते ह्या दिवसापर्यंत राहिलं असतं. २४पण मी तुम्हाला  सांगतो, न्यायाच्या दिवशी तुझ्यापेक्षा सदोम नगराला अघिक सोपं होईल.”
२५त्यावेळी येशूने उत्तर देऊन म्हटले,
“हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी तुझी स्तुती करतो, कारण तू ह्या गोष्टी ज्ञान्यांपासून आणि बुद्धिवानांपासून गुप्त ठेवल्यास आणि बालकांना त्या प्रकट केल्यास. २६हो, पित्या, कारण ते तुझ्या दृष्टीला बरं दिसलं. २७माझ्या पित्यानं सर्व गोष्टी माझ्या हाती दिल्या आहेत, आणि पुत्राला पित्याशिवाय कोणी जाणत नाही, आणि पित्याला पुत्राशिवाय,  आणि पुत्र ज्या कोणाला प्रकट करू इच्छील त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. २८अहो तुम्ही कष्ट करणारे आणि ओझ्याखाली दडपलेले, तुम्ही सर्व माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विसावा देईन. २९माझं जू आपल्यावर घ्या आणि माझ्याकडून शिका. कारण मी मनाचा सौम्य आणि लीन आहे; आणि तुम्ही आपल्या जिवासाठी विसावा मिळवाल. ३०कारण माझं जू सोयीचं आहे आणि माझं ओझं हलकं आहे.” 

—–मत्तय १२—–

त्यावेळी येशू शब्बाथ दिवशी शेतांमधून जात होता. आणि त्याचे शिष्य भुकेले होते; आणि ते कणसे तोडून घेऊन खाऊ लागले. पण हे जेव्हा परोश्यांनी बघितले तेव्हा ते त्याला म्हणाले,
“बघा, आपले शिष्य शब्बाथ दिवशी जे करणं योग्य नाही ते करीत आहेत.”
पण तो त्यांना म्हणाला,
“जेव्हा दाविदाला आणि त्याच्याबरोबर होते त्यांना भूक लागली होती तेव्हा त्यानं काय केलं हे तुम्ही वाचलं नाही काय? तो देवाच्या मंडपात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी, केवळ याजकाशिवाय, त्यानं किवा त्याच्याबरोबर जे होते त्यांनी खाणं योग्य नव्हतं त्या त्यानं कशा खाल्ल्या? किंवा शब्बाथ दिवशी याजक मंदिरात शब्बाथ मोडून निर्दोष राहतात हे तुम्ही नियमशास्त्रात वाचलं नाही काय? पण मी तुम्हाला सांगतो, मंदिरापेक्षा इथं काही अधिक आहे. ‘पण मला ’दया पाहिजे,  बलिदान नको’ ह्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही निर्दोष्यांना दोषी ठरवलं नसतं. कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.”

आणि तो तेथून निघाला व त्यांच्या सभास्थानात गेला. १०आणि बघा, तेथे एक, वाळलेल्या हाताचा मनुष्य होता. आणि त्याच्यावर आरोप करता यावा म्हणून त्यांनी त्याला प्रश्न करून म्हटले,
“शब्बाथ दिवशी कोणाला बरं करणं योग्य आहे काय?”
११आणि तो त्यांना म्हणाला,
“तुमच्यात कोण असा मनुष्य असेल की, त्याच्याजवळ एक मेंढरू आहे, आणि शब्बाथ दिवशी ते खाचेत पडलं तर तो त्याला धरून वर उचलणार नाही? १२मग मेंढरापेक्षा मनुष्य किती अधिक आहे? म्हणून शब्बाथ दिवशी चांगलं करणं योग्य आहे.”
१३मग तो त्या मनुष्याला म्हणतो,
“तुझा हात पुढं कर.”
त्याने तो पुढे केला, आणि तो हात दुसर्‍या हातासारखा नीट बरा झाला.

१४तेव्हा परोशी बाहेर गेले, आणि त्यांनी, आपण त्याला कसे नष्ट करावे म्हणून त्याच्याविरुद्ध मसलत घेतली. १५पण हे येशूला कळले तेव्हा तो तेथून गेला; आणि पुष्कळ त्याच्या मागोमाग गेले व त्याने त्या सर्वांना बरे केले; १६आणि त्यांनी त्याला प्रगट करू नये म्हणून त्याने त्यांना आज्ञा दिली. १७म्हणजे यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; त्याने असे म्हटले आहे की,
  १८‘बघा, माझा सेवक,
  मी ह्याला निवडले आहे,
  मला हा प्रिय आहे,
  माझा जीव ह्याच्यावर संतुष्ट आहे;
  मी त्याच्यावर माझा आत्मा घालीन,
  तो परजनांत न्यायाची घोषणा करील.
  १९तो वाद घालणार नाही
  किंवा ओरडणार नाही
किंवा रस्त्यांत कोणी त्याचा
आवाज ऐकणार नाही.
  २०तो न्यायाला विजयात नेईपर्यंत,
  तो पिचलेला बोरू तोडणार नाही,
  आणि मिणमिणती वात विझवणार नाही.
२१आणि परजन त्याच्या नावावर भाव ठेवतील.’

२२मग त्यांनी त्याच्याकडे एका अंधळ्या व मुक्या भूतग्रस्ताला आणले;  आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू लागला आणि पाहू लागला. २३तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले,
“हा दाविदाचा पुत्र असेल काय?”
२४पण परोश्यांनी हे ऐकून म्हटले,
“हा मनुष्य भुतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साह्याशिवाय भुतं काढीत नाही.”
२५पण त्याने त्यांचे विचार जाणून त्यांना म्हटले,
“स्वतःविरुद्ध फुटलेलं कोणतंही राज्य ओसाड पडतं;
“आणि स्वतःविरुद्ध फुटलेलं नगर किवा घर टिकणार नाही.
२६“आणि सैतान जर सैतानाला बाहेर काढतो तर तो स्वतःविरुद्ध फुटला आहे. मग त्याचं राज्य कसं टिकेल? २७आणि मी जर बालजबूलच्या साह्यानं भुतं काढतो तर तुमचे पुत्र कुणाच्या साह्यानं काढतात? म्हणून ते तुमचे न्यायाधीश होतील. २८पण मी देवाच्या आत्म्याच्या साह्यानं भुतं काढीत असेन तर देवाचं राज्य तुमच्यावर आलंच आहे.
२९“किंवा कोणी बलवान मनुष्याला आधी बांधल्याशिवाय त्या बलवान मनुष्याच्या घरात जाऊन त्याची सामग्री लुटू शकेल काय? आणि नंतर त्याचं घर लुटील.
३०“जो माझ्या बाजूचा नाही तो माझ्या विरुद्ध आहे; जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखरतो. ३१म्हणून मी तुम्हाला सांगतो, मनुष्यांना प्रत्येक प्रकारच्या पापाची आणि दुर्भाषणाची क्षमा केली जाईल, पण आत्म्याविरुद्धच्या दुर्भाषणाची क्षमा केली जाणार नाही. ३२आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही एखादा शब्द बोलेल त्याची त्याला क्षमा केली जाईल, पण जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा केली जाणार नाही; ह्या युगात नाही, आणि येणार्‍या युगातही नाही.
३३“एकतर झाड चांगलं ठरवा आणि त्याचं फळ चांगलं; नाहीतर झाड कुजकं ठरवा आणि त्याचं फळ कुजकं; कारण झाड त्याच्या फळावरून ओळखलं जातं. ३४अहो सर्पिणीच्या पिलांनो, तुम्ही वाईट असताना चांगल्या गोष्टी कशा बोलू शकाल? कारण मनात भरलेल्या गोष्टींतून तोंड बोलतं. ३५चांगला मनुष्य चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो आणि वाईट मनुष्य वाईट भांडारातून वाईट गोष्टी बाहेर काढतो. ३६पण मी तुम्हाला हे सांगतो की, जो कोणताही निकामी शब्द माणसं बोलतील त्याचा ते न्यायाच्या दिवशी हिशोब देतील. ३७कारण तू आपल्या शब्दांवरून निर्दोषी ठरशील, आणि आपल्या शब्दांवरून दोषी ठरशील.”
३८तेव्हा शास्त्र्यांपैकी आणि परोश्यांपैकी काहींनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
“गुरू, आपल्याकडून काही चिन्ह बघावं अशी आमची इच्छा आहे.”
३९तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“ही दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते; पण योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय तिला कोणतंच चिन्ह दिलं जाणार नाही. ४०कारण जसा योना तीन दिवस आणि तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटात असेल. ४१निनवेचे लोक न्यायाच्या वेळी, ह्या पिढीबरोबर उठतील आणि हिला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला; आणि बघा, योनापेक्षा इथं काही अधिक आहे. ४२दक्षिणेची राणी न्यायाच्या वेळी, ह्या पिढीबरोबर उठेल आणि हिला दोषी ठरवील; कारण ती पृथ्वीच्या सीमेपासून शलमोनाचं ज्ञानीपण ऐकायला आली; आणि बघा, शलमोनापेक्षा इथं काही अधिक आहे.
४३“जेव्हा एखाद्या मनुष्यामधून अशुद्ध आत्मा बाहेर निघतो तेव्हा तो विसावा शोधीत निर्जल ठिकाणांमधून फिरतो; पण तो त्याला मिळत नाही. ४४तेव्हा तो म्हणतो, ‘मी जिथून बाहेर आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन’. आणि तो येतो तेव्हा ते त्याला रिकामं, झाडलेलं आणि सजवलेलं आढळतं. ४५मग तो जातो आणि आपल्यापेक्षा दुष्ट असलेले आणखी सात आत्मे आपल्याबरोबर घेतो, आणि ते आत जाऊन तिथं राहतात. आणि त्या मनुष्याची शेवटची स्थिती पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते. तसं त्या दुष्ट पिढीचं होईल.”

४६आणि तो लोकांशी बोलत असतानाच, त्याची आई व त्याचे भाऊ बाहेर उभे होते आणि त्याच्याशी बोलायची त्यांची इच्छा होती. ४७तेव्हा एक जण त्याला म्हणाला,
“बघा, आपली आई आणि आपले भाऊ बाहेर उभे आहेत, आणि आपल्याशी बोलायची त्यांची इच्छा आहे.”
४८पण ज्याने हे सांगितले त्याला त्याने उत्तर देऊन म्हटले,
“माझी आई कोण आहे? आणि माझे भाऊ कोण आहेत?”
४९आणि आपल्या शिष्यांकडे आपला हात पुढे करून त्याने म्हटले,
“बघा, माझी आई आणि माझे भाऊ! ५०कारण, जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करील तोच माझा भाऊ, माझी बहीण आणि माझी आई.” 

—–मत्तय १३—–

त्याच दिवशी येशू घरातून बाहेर जाऊन समुद्राजवळ बसला. तेव्हा लोकांच मोठाले घोळके त्याच्याजवळ एकत्र जमले, म्हणून तो एका मचव्यात जाऊन बसला; आणि सगळा जमाव किनार्‍यावर उभा राहिला.
आणि त्याने त्यांना दाखल्यांद्वारे पुष्कळ गोष्टी सांगितल्या आणि तो म्हणाला,
“बघा, एक पेरणारा पेरायला गेला, आणि तो पेरीत असता काही दाणे वाटेच्या कडेला पडले. तेव्हा पक्षी आले आणि त्यांनी ते खाऊन टाकले. काही खडकाळ ठिकाणी पडले; तिथं त्यांना फार माती नव्हती. आणि ते लगेच उगवले, कारण त्यांना जमिनीची खोली नव्हती. पण सूर्य वर चढला तेव्हा ते करपले, आणि त्यांना मूळ नव्हतं म्हणून त वाळून गेले. आणि काही काटेर्‍यांत पडले; आणि काटेरे वाढले, आणि त्यांनी त्यांची वाढ खुंटवली. पण दुसरे चांगल्या जमिनीत पडले, आणि त्यांनी कुठं शंभरपट, कुठं साठपट, कुठं तीसपट पीक दिलं. ज्याला कान आहेत तो ऐको.”
१०मग शिष्य आले आणि त्याला म्हणाले,
“आपण त्यांच्याशी दाखल्यांत का बोलता?”
११त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“स्वर्गाच्या राज्याची रहस्यं जाणणं तुम्हाला दिलेलं आहे, पण ते त्यांना दिलेलं नाही. १२कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल आणि त्याच्याजवळ विपुल होईल. पण ज्या कोणाजवळ नाही, त्याच्याजवळ जे आहे तेपण त्याच्याकडून काढून घेतलं जाईल.
१३“म्हणून मी त्यांच्याशी दाखल्यांत बोलतो; कारण ते पाहताना पहात नाहीत, ऐकताना ऐकत नाहीत आणि विचारही करीत नाहीत. १४आणि यशयाचा संदेश त्यांच्या बाबतीत पूर्ण होत आहे; तो म्हणतो,
‘तुम्ही ऐकून ऐकाल आणि विचार करणार नाही,
  तुम्ही पाहून पहाल आणि ओळखणार नाही.
  १५कारण ह्या लोकांची मनं जड झाली आहेत,
  कान ऐकण्यात मंद आहेत,
  आणि त्यांनी आपले डोळे मिटले आहेत;
  म्हणजे त्यांनी डोळ्यांनी बघू नये,
कानांनी ऐकू नये,
मनाने विचार करू नये आणि वळू नये,
  आणि मी त्यांना बरे करू नये.’
१६पण धन्य तुमचे डोळे कारण ते पहात आहेत आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत.
१७“कारण मी तुम्हाला सत्य सांगतो, कितीतरी संदेष्ट्यांनी आणि नीतिमान माणसांनी तुम्ही ज्या गोष्टी पहात आहा त्या बघायची इच्छा धरली आणि त्यांनी त्या बघितल्या नाहीत, आणि तुम्ही ज्या गोष्टी ऐकत आहा त्या ऐकायची इच्छा धरली आणि त्यांनी त्या ऐकल्या नाहीत.
१८“आता तुम्ही पेरणार्‍याचा दाखला ऐका; १९जेव्हा कोणीही राज्याविषयीचं वचन ऐकतो, आणि ते त्याला समजत नाही तेव्हा तो दुष्ट येतो, आणि त्याच्या मनात पेरलेलं उचलून नेतो; जो वाटेच्या कडेला पेरला गेला तो हा आहे.२०आणि खडकाळ ठिकाणी पेरला गेला तो हा आहे; तो वचन ऐकतो, आणि, लगेच, ते आनंदानं स्वीकारतो. २१तरी त्याच्यात मूळ नसतं; पण तो अल्पकाळ टिकतो आणि वचनामुळं संकट किवा छळ उद्भवताच त्याला अडथळा होतो. २२तसाच काटेर्‍यांत पेरला गेला तो हा आहे; तो वचन ऐकतो; आणि ह्या युगाची काळजी आणि धनाची भूल वचनाची वाढ खुंटवतात, आणि तो निष्फळ होतो २३आणि चांगल्या जमिनीत पेरला गेला तो हा आहे; तो वचन ऐकतो आणि त्याला ते समजतं, तो फळ देतो, आणि कोणी शंभरपट, कोणी साठपट आणि कोणी तीसपट देतो.”
२४त्याने दुसरा एक दाखला त्यांच्यापुढे मांडला. तो म्हणाला,
“स्वर्गाचं राज्य असं एका मनुष्यासारखं आहे; त्यानं आपल्या शेतात चांगलं बी पेरलं; २५पण लोक झोपले असता त्याचा वैरी आला, त्यानं गव्हात निदणही पेरलं, आणि तो निघून गेला. २६पण जेव्हा पाला फुटला आणि बोंड आलं तेव्हा निदणही दिसलं. २७तेव्हा घरधन्याचे दास येऊन त्याला म्हणाले, ‘धनी, आपण आपल्या शेतात चांगलं बी पेरलं ना? मग निदण कुठून आलं?’ २८तो त्यांना म्हणाला, ‘हे कोणी वैर्‍यानं केलं.’ तेव्हा दास त्याला म्हणतात,’ आम्ही जाऊन ते गोळा करावं अशी आपली इच्छा आहे काय?’ २९पण तो म्हणतो, ‘नाही; कदाचित् निदण गोळा करताना तुम्ही त्याबरोबर गहू पण उपटाल. ३०दोन्हीही कापणीपर्यंत बरोबर वाढू द्या; आणि मी, कापणीच्या वेळी, कापणी करणार्‍यांना म्हणेन, तुम्ही आधी निदण गोळा करा, आणि ते जाळायला त्याचे भारे बांधा; पण गहू माझ्या कोठारात साठवा.’ ”
३१त्याने दुसरा एक दाखला त्यांच्यापुढे मांडला. तो म्हणाला,
“स्वर्गाचं राज्य हे एका मोहरीच्या बीप्रमाणं आहे; ते एका मनुष्यानं घेतलं आणि आपल्या शेतात पेरलं. ३२ते, खरोखर, सर्व बियाण्यांहून लहान असतं; पण ते वाढतं तेव्हा सर्व भाज्यांहून मोठं होतं; आणि त्याचं झाड होतं तेव्हा आकाशातले पक्षी येऊन त्याच्या फांद्यांत राहतात.”
३३त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला,
“स्वर्गाचं राज्य हे खमिराप्रमाणं आहे; ते एका स्त्रीनं घेऊन तीन मापं पिठात दडपलं, तेव्हा ते सगळं फुगलं.”
३४येशूने लोकांना ह्या सर्व गोष्टी दाखल्यांत सांगितल्या; आणि दाखल्याशिवाय तो त्यांच्याशी काही बोलला नाही. ३५म्हणजे संदेष्ट्याकडून जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याने असे म्हटले आहे की,
 ‘मी दाखल्यांद्वारे आपले तोंड उघडीन,
मी जगाच्या स्थापनेपासून गुप्त ठेवलेल्या
गोष्टी उच्चारीन.’
३६मग त्याने लोकांना सोडले आणि तो घरात गेला आणि शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले.
“आम्हाला शेतातल्या निदणाचा दाखला शिकवा.”
३७आणि त्याने उत्तर देऊन म्हटले,
“चांगलं बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; ३८शेत हे जग आहे आणि चांगलं बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र होत. ३९आणि ते पेरणारा वैरी सैतान आहे. कापणी युगाची समाप्ती आहे आणि कापणी करणारे देवदूत आहेत. ४०निदण गोळा करून अग्नीत टाकतात तसं ह्या युगाच्या समाप्तीस होईल. ४१मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते सर्व अडथळे, आणि अनाचार करणारे असतील त्यांना त्याच्या राज्यामधून गोळा करतील, ४२आणि अग्नीच्या भट्टीत टाकतील. तिथं रडणं आणि दात खाणं होईल. ४३मग नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
४४“आणि स्वर्गाचं राज्य एका शेतात लपवलेल्या धनाप्रमाणं असं आहे; ते एका मनुष्याला सापडलं आणि त्यानं ते लपवलं; आणि तो आपल्या आनंदात जातो, आपल्याजवळचं सर्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.
४५“पुन्हा स्वर्गाचं राज्य एका व्यापारी मनुष्यासारखं आहे; तो चांगल्या मोत्यांचा शोध करीत असतो. ४६आणि त्याला एक बहुमोल मोती आढळला; तेव्हा तो गेला, आणि त्यानं आपल्याजवळचं सर्व विकलं आणि तो विकत घेतला.
४७“पुन्हा स्वर्गाचं राज्य एका जाळ्याप्रमाणं आहे. ते समुद्रात टाकलं जाऊन त्यात सर्व प्रकारचे मासे जमले ४८आणि त्यांनी ते भरल्यावर किनार्‍यावर ओढून आणलं आणि ते बसले. आणि त्यांनी चांगले भांड्यात गोळा केले, पण वाईट दूर फेकून दिले. ४९तसं ह्या युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येतील आणि दुष्टांना नीतिमानांतून वेगळे करतील. ५०आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तिथं रडणं आणि दात खाणं होईल.
५१“तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या का?”
ते त्याला म्हणतात,
“हो.”
५२तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“म्हणून स्वर्गाच्या राज्याचं शिक्षण मिळालेला प्रत्येक शास्त्री हा आपल्या भांडारातून नवं आणि जुनं काढणार्‍या घरधनी मनुष्यासारखा आहे.”
५३आणि असे झाले की, येशूने हे दाखले समाप्त केले तेव्हा तो तेथून निघाला.

५४आणि तो आपल्या स्वतःच्या देशात जाऊन त्यांना त्यांच्या सभास्थानात शिकवू लागला; आणि ते थक्क होऊन म्हणू लागले,
“ह्याच्यात हे ज्ञानीपण कुठून? आणि हे चमत्कार? ५५हा सुताराचा मुलगा ना? ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना? आणि याकोब, योसे, शिमोन आणि यहुदा ह्याचे भाऊ आहेत ना? ५६आणि ह्याच्या बहिणी सगळ्या आपल्यात आहेत ना? मग ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी कुठून?”
५७आणि त्यांना त्याच्याविषयी अडथळा आला. पण येशू त्यांना म्हणाला,
“कोणीही संदेष्टा आपल्या स्वतःच्या देशात आणि आपल्या घरी असल्याशिवाय त्याचा अवमान होत नाही.”
५८आणि त्याने तेथे, त्यांच्या अविश्वासामुळे पुष्कळ चमत्कार केले नाहीत.

—–मत्तय १४—–

त्या सुमारास मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली, आणि तो आपल्या सेवकांना म्हणाला,
“हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यांमधून उठला आहे; आणि म्हणून ह्या शक्ती त्याच्यात कार्य करीत आहेत.”
कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरले होते व बेड्या घालून तुरुंगात टाकले होते. कारण योहान त्याला बोलला होता की, ‘आपण ती घ्यावी हे आपल्याला योग्य नाही’. आणि त्याची त्याला ठार मारायची इच्छा असताना तो लोकांना भीत होता. कारण ते त्याला संदेष्टा मानीत. पण हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियेच्या मुलीने समोर नाच करून हेरोदाला संतुष्ट केले तेव्हा त्याने शपथ घेऊन, ती जे मागेल ते तिला द्यायचे वचन दिले. तेव्हा तिला तिच्या आईने पढविले असल्यामुळे ती म्हणते,
“मला, इथं, एका तबकात बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचं शिर द्या.‘
तेव्हा राजा दुःखी झाला; पण त्याच्या शपथांमुळे व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याने ते द्यायची आज्ञा दिली; १०आणि त्याने एकाला तुरुंगात पाठवून योहानाचा शिरच्छेद करविला. ११आणि त्याचे शिर एका तबकात घालून त्या मुलीला देण्यात आले; आणि तिने ते आपल्या आईकडे नेले. १२तेव्हा त्याचे शिष्य आले, त्यांनी त्याचे शव घेतले आणि त्याला पुरले. मग ते गेले आणि त्यांनी येशूला सांगितले.

१३आणि येशूने हे ऐकले तेव्हा तो तेथून मचव्याने, एकीकडे, एका रानातल्या जागी गेला. आणि लोकांनी त्याविषयी ऐकले तेव्हा ते त्या नगरांतून त्याच्या मागोमाग पायी गेले. १४आणि तो बाहेर आला व त्याने लोकांचा एक मोठा घोळका बघितला. तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला व त्याने त्यांच्या आजार्‍यांना बरे केले. १५आणि संध्याकाळ झाली तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले,
“ही रानातली जागा आहे, आणि घटका निघून गेली आहे; लोकांना लावून द्या, म्हणजे ते खेड्यांत जाऊन आपल्या स्वतःसाठी अन्न विकत घेतील.”
१६पण येशू त्यांना म्हणाला,
“त्यांना जायची गरज नाही; तुम्ही त्यांना खायला द्या.”
१७तेव्हा ते त्याला म्हणतात,
“इथं आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
१८तेव्हा तो म्हणाला,
“इकडे माझ्याकडे आणा.”
१९आणि त्याने लोकांना खाली गवतावर बसवायची आज्ञा केली; मग त्याने पाच भाकरी व दोन मासे घेऊन आकाशाकडे वर पाहिले, आणि आशीर्वाद मागून त्यांचे तुकडे केले; आणि भाकरी शिष्यांजवळ दिल्या व शिष्यांनी लोकांना दिल्या. २०आणि ते सर्व जण जेवले व तृप्त झाले. मग त्यांनी बारा करंड्या भरून त्यांतले राहिलेले तुकडे उचलेले. २१आणि ते सुमारे पाच हजार पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होती.
२२आणि, लगेच, येशूने आपल्या शिष्यांना मचव्यात जाऊन आपल्यापुढे दुसर्‍या बाजूस जायला लावले; आणि तितक्यात तो लोकांना लावून देणार होता. २३आणि त्याने लोकांना लावून दिल्यावर तो प्रार्थना करायला, एकीकडे, डोंगरावर गेला; आणि संध्याकाळ झाली त्यावेळी तो तेथे एकटा होता.

२४पण मचवा आता समुद्राच्या मध्यभागी होता व लाटांवर हेलकावत होता; कारण वारा उलट होता. २५आणि रात्रीच्या चौथ्या प्रहरी, तो त्यांच्याकडे समुद्रावरून चालत आला. २६आणि शिष्यांनी त्याला समुद्रावर चालताना बघितले तेव्हा ते अस्वस्थ झाले, आणि म्हणाले, 
“हे भूत आहे!”
आणि ते भीतीने ओरडले. २७पण लगेच येशू त्यांच्याशी बोलला आणि म्हणाला,
“धीर धरा; मी आहे, भिऊ नका.”
२८आणि पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“प्रभू, तो तू असलास तर मला तुझ्याकडे पाण्यावरून यायची आज्ञा दे.”
२९तो म्हणाला,
“ये.”
तेव्हा पेत्र मचव्यातून उतरला आणि येशूकडे जायला तो पाण्यावर चालला. ३०पण त्याने वारा पाहिला तेव्हा तो भ्याला; आणि बुडू लागला तेव्हा ओरडून म्हणाला,
“प्रभू, मला वाचव.”
३१तेव्हा, लगेच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले; आणि तो त्याला म्हणतो,
“अरे तू अल्पविश्वासी, तुला संशय का वाटला?”
३२आणि ते मचव्यात वर आले तेव्हा वारा थांबला. ३३मग जे मचव्यात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले,
“तू खरोखर देवाचा पुत्र आहेस.”
३४आणि ते दुसर्‍या बाजूस आले तेव्हा ते गनेसरेतच्या किनार्‍यावर आले ३५आणि त्या ठिकाणच्या लोकांनी त्याला ओळखले तेव्हा त्यांनी आसपासच्या सर्व प्रांतांत माणसे पाठवली आणि जे आजारी होते अशा सर्वांना त्याच्याकडे आणले. ३६आणि त्याने त्यांना आपल्या वस्त्राच्या काठाला केवळ शिवू द्यावे अशी त्यांनी त्याला विनंती केली, आणि जितके शिवले तितके जण पूर्ण बरे झाले.

—–मत्तय १५—–

तेव्हा यरुशलेमचे परोशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले,
“आपले शिष्य पूर्वजांची प्रथा का मोडतात? कारण ते भाकरी खातात तेव्हा ते हात धूत नाहीत.”
आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“तुम्हीसुद्धा तुमच्या प्रथेनं देवाची आज्ञा का मोडता? कारण देवानं म्हटलं आहे की, ‘तू आपल्या बापाला आणि आईला मान दे’. पण ‘जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याने मरणाच्या शिक्षेने मरावे’. पण तुम्ही म्हणता, जो कोणी आपल्या बापाला किंवा आईला म्हणेल की, ‘तुम्हाला माझ्याकडून जे लाभले असते ते दान झाले आहे’, तर त्याने आपल्या बापाला किंवा आईला मान देऊ नये. आणि तुम्ही तुमच्या प्रथेनं देवाचं वचन रद्द केलंत.
“अहो ढोंगी, यशयानं तुमच्याविषयी बरोबर संदेश दिला आहे. त्यानं असं म्हटलं आहे की,
  ‘हे लोक मला ओठांनी मान देतील,
  पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
  पण ते व्यर्थ मला भजतात,
  आणि ते शिकवण म्हणून
  मनुष्यांच्या आज्ञा शिकवतात.’ ”
१०मग त्याने लोकांना आपल्याकडे बोलावले आणि तो त्यांना म्हणाला,
“ऐका आणि विचार करा. ११जे तोंडात जातं ते माणसाला विटाळवीत नाही, पण जे तोंडातून बाहेर येतं ते माणसाला विटाळवितं.”
१२तेव्हा शिष्य येऊन त्याला म्हणाले,
“परोश्यांनी हे बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना अडथळा झाला हे आपण जाणता काय?”
१३पण त्याने उत्तर देऊन म्हटले,  
“माझ्या स्वर्गीय पित्यानं न लावलेलं प्रत्येक रोप उपटून टाकलं जाईल. १४त्यांना राहू द्या; ते अंधळे वाटाड्ये आहेत आणि अंधळा अंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाड्यात पडतील.”
१५पण पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“हा दाखला आम्हाला समजावून सांग.”
१६आणि तो म्हणाला,
“तुम्हीही अजून अज्ञानी आहा काय? १७जे काही तोंडातून आत जातं ते पोटात जातं आणि शौचकूपात बाहेर टाकलं जातं, हे अजून तुम्हाला समजत नाही काय? १८पण तोंडातून निघणार्‍या गोष्टी अंतःकरणातून बाहेर येतात, आणि त्या माणसाला विटाळवतात. १९कारण अंतःकरणातून दुष्ट विचार, खून, व्यभिचार, जारकर्म, चोर्‍या, खोट्या साक्षी आणि दुर्भाषणं निघतात. २०ह्या गोष्टी माणसाला विटाळवतात, पण न धुतलेल्या हातांनी खाणं माणसाला विटाळवीत नाही.”

२१मग येशू तिकडून निघाला आणि सोर-सिदोनच्या भागात गेला. २२आणि बघा, त्याच प्रांतातून एक कनानी बाई येऊन ओरडत म्हणाली,
“अहो प्रभू, दावीदपुत्र, माझ्यावर दया करा. माझ्या मुलीला एक भूत भयंकर त्रास देत आहे.”
२३पण त्याने तिला एका शब्दानेही काही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याला विनंती करून म्हटले,
“तिला लावून द्या, कारण ती आमच्यामागं ओरडत आहे.”
२४पण त्याने उत्तर देऊन म्हटले,
“इस्राएलाच्या घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांशिवाय मला कुणाकडेच पाठवलेलं नाही.”
२५पण ती आली व त्याच्या पाया पडून म्हणाली,
“प्रभू, मला मदत करा.”
२६आणि त्याने तिला उत्तर देऊन म्हटले,
“मुलांची भाकर घेऊन पिलांना टाकणं बरोबर नाही.”
२७आणि ती म्हणते,
“हो, प्रभू, कारण पिलंसुद्धा आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेल्या तुकड्यांमधून खातात.”
२८तेव्हा येशूने तिला उत्तर देऊन म्हटले,
“बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुला पाहिजे आहे ते तुला प्राप्त होवो.”
आणि त्याच घटकेपासून तिची मुलगी बरी झाली.

२९मग येशू तिकडून निघाला व गालील समुद्राजवळ आला आणि तो एका डोंगरावर जाऊन तेथे बसला. ३०आणि लोकांचे मोठाले घोळके त्याच्याकडे  आले. त्यांच्याबरोबर पांगळे, अधू, अंधळे, मुके आणि तसेच दुसरे पुष्कळ जण होते. त्यांनी त्यांना त्याच्या पायांपाशी टाकले आणि त्याने त्यांना बरे केले. ३१आणि तेव्हा लोकांनी पाहिले की, मुके बोलतात, अधू बरे होतात, पांगळे चालतात आणि अंधळे पाहतात, तेव्हा त्यांनी आश्चर्य केले आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.

३२मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याकडे बोलवून म्हटले,
“मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज तीन दिवस माझ्या जवळ आहेत; आणि त्यांच्याजवळ खायला काही नाही. त्यांना उपाशी पाठवू नये अशी माझी इच्छा आहे; नाहीतर, ते वाटेत कासावीस होतील.”
३३तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणतात,
“एवढ्या मोठ्या जमावाला खाऊ घालायला, रानात आम्हाला एवढ्या भाकरी कुठून मिळणार?”
३४तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”
आणि ते म्हणाले,
“सात, आणि थोडे लहान मासे.”
३५तेव्हा त्याने लोकांना खाली जमिनीवर बसायला सांगितले. ३६मग त्याने सात भाकरी आणि मासे घेऊन, उपकार मानून, त्यांचे तुकडे केले आणि आपल्या शिष्यांजवळ दिले, आणि शिष्यांनी लोकांना दिले. ३७तेव्हा ते सर्व जण जेवले व तृप्त झाले. मग त्यांनी राहिलेल्या तुकड्यांचे सात करंडे भरून उचलले. ३८आणि जेवणारे चार हजार पुरुष होते; शिवाय स्त्रिया आणि मुले होती.
३९मग त्याने लोकांना लावून दिले; मग तो मचव्यात गेला व मगदान प्रांतात आला.

Advertisements

4 responses to “Matthew 11-15

 1. Hemant Muley

  Dear Dr. Kelkar: The story of Rev. William Cary is profoundly moving and inspiring. I cannot fathom how a common man from England comes to our shores and dedicates his life to the task of translating the Bible into several Indian languages-what zeal, what tenacity, what faith! Reading the story warmed my heart and rejuvenated my spirit. We salute you for acquainting us with Rev. Cary’s life and works. With best regards, Hemant Muley

  • Prof R R Kelkar

   Dear Mr Muley,
   Thank you for posting your comment about Dr William Carey. In fact, a few years back I had gone all the way from Pune to Serampore with the sole purpose of standing on hallowed ground and paying a personal tribute to this great servant of God. What inspired me most was not his faith as such, but his using that faith to overcome every physical limitation. Carey not only translated the Word of God, but he set up a printing press to print his translations, a foundry to make the language type faces, a mill to make quality paper! That was Carey’s zeal!
   Thanks again for your kind words,
   Sincerely,
   Ranjan Kelkar

 2. Dear Professor Kelkar: I love the look and feel of your new, spiffy, Nava Karar website; how wonderful to have the entire scripture literally at one’s fingertips! I commend you and thank you for making the New Testament available online in our Maay Boli. When you read the Gospels in Marathi, the words come alive and speak directly to you. We are forever indebted to your late father, honorable H Kelkar for having endured the herculean task of translating the Gospels from Greek into pristine, flowing Marathi.

  • Prof R R Kelkar

   Dear Hemant,
   Thank you so much for your kind words. I was sorry that I could not reply sooner.
   Comments like yours motivate me to keep upgrading my web sites and making them lively and user-friendly. They have together registered 350,000 hits so far and they are growing in popularity. Praise the Lord!
   I invite you to also visit my site “Khristi Jeevan” where I write short articles in Marathi about Christian living in today’s world. (There is a link to it on this page)
   Thanks once again and regards,
   Ranjan Kelkar

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s