Matthew 16-20

संत मत्तय ह्याचे शुभवर्तमान

—–मत्तय १६—–

आणि परोशी व सदोकी आले आणि त्यांनी त्याची परीक्षा करायला त्याला आकाशातून चिन्ह दाखवायची विनंती केली. पण त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“तुम्ही जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा म्हणता, ‘उघाड होईल; कारण आकाश लाल आहे.’ आणि सकाळी म्हणता, ‘आज झड लागेल, कारण आकाश लाल आणि गडद आहे.’ आकाशाचं रूप कसं ओळखावं हे तुम्ही जाणता पण काळाची चिन्हं तुम्ही ओळखू शकत नाही. ही दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, पण योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय तिला कोणतंही चिन्ह दिलं जाणार नाही.”
मग त्याने त्यांना सोडले आणि तो गेला.
आणि त्याचे शिष्य दुसर्‍या बाजूला आले तेव्हा ते भाकरी घ्यायला विसरले होते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“पहा, परोश्यांच्या आणि सदोक्यांच्या खमिराविषयी जपा.”
तेव्हा त्यांनी आपसात वाद करीत म्हटले,
“आपण भाकरी आणल्या नाहीत.”
पण येशूने हे ओळखले आणि तो त्यांना म्हणाला,
“अहो तुम्ही अल्पविश्वासी, तुमच्याजवळ भाकरी नाहीत, म्हणून तुम्ही आपसात वाद का करता? ९-१०तुम्हाला अजून समजत नाही काय? पाच हजारांच्या पाच भाकरी आणि किती करंड्या तुम्ही उचलल्यात, किंवा चार हजारांच्या सात भाकरी आणि किती करंडे तुम्ही उचललेत हे तुम्हाला आठवत नाही काय? ११मी तुम्हाला भाकरीविषयी बोललो नाही, हे तुम्हाला कसं समजलं नाही? पण परोश्यांच्या आणि सदोक्यांच्या खमिराविषयी जपा.”
१२तेव्हा, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी काही नाही, पण परोश्यांच्या व सदोक्यांच्या शिक्षणाविषयी जपायला सांगितले होते हे त्यांना समजले.

१३मग येशू जेव्हा कैसरिया फिलिपैच्या भागात आला तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना प्रश्न करून म्हटले,
“मनुष्याचा पुत्र कोण आहे म्हणून लोक म्हणतात?”
१४आणि ते म्हणाले,
“कित्येक म्हणतात, बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, आणि कित्येक यिर्मया किवा संदेष्ट्यांतला कोणी आहे असं म्हणतात.”
१५तो त्यांना म्हणतो,
“पण मी कोण आहे म्हणून तुम्ही म्हणता?”
१६आणि शिमोन पेत्राने उत्तर देऊन म्हटले,
“तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
१७आणि येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“शिमोना, बर्योना, तू धन्य आहेस. कारण देहानं आणि रक्तानं तुला हे प्रकट केलं नाही पण माझ्या स्वर्गातील पित्यानं केलं आहे. १८आणि मी तुला आणखी सांगतो, तू पेत्र आहेस; मी ह्या खडकावर माझी मंडळी उभारीन, आणि अधोलोकाच्या वेशी तिच्यावर जय मिळवणार नाहीत. १९मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन; तू जे पृथ्वीवर बंधनात बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल आणि तू जे पृथ्वीवर सोडशील ते स्वर्गात सोडलं जाईल.”
२०मग तो ख्रिस्त आहे हे त्यांनी कोणाला सांगू नये म्हणून त्याने त्याच्या शिष्यांना निक्षून सांगितले.

२१तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना हे प्रगट करू लागला की, त्याने यरुशलेमला जावे आणि वडील, वरिष्ठ याजक आणि शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ सोसावे, आणि मारले जावे, आणि तिसर्‍या दिवशी उठवले जावे हे अगत्य आहे. २२तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेतले व तो त्याला दटावू लागला आणि म्हणाला,
“प्रभू, स्वतःवर दया कर, तुला असं व्हायचं नाही.”
२३पण तो वळला आणि पेत्राला म्हणाला,
“अरे सैताना, माझ्या मागं हो; तू मला अडथळा आहेस. कारण, तू देवाच्या गोष्टींचा विचार करीत नाहीस, पण मनुष्यांच्या गोष्टींचा करतोस.”
२४मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला,
“जर कोणी माझ्यामागं येऊ इच्छीत असेल तर त्यानं आपल्या स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागं यावं. २५कारण जो आपला जीव वाचवू पाहील, तो आपल्या जिवाला मुकेल, पण जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. २६कारण मनुष्यानं सारं जग मिळवून जर आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ झाला? किंवा मनुष्य आपल्या जिवाऐवजी काय देईल? २७कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवात, आपल्या दूतांबरोबर येईल आणि तो तेव्हा प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणं प्रतिफळ देईल. २८मी तुम्हाला सत्य सांगतो, इथं उभे राहिले आहेत त्यांच्यात कित्येक असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना बघतील तोपर्यंत मरणाचा अनुभव घेणार नाहीत.”

—–मत्तय १७—–

मग येशू सहा दिवसांनी पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना बरोबर घेऊन एका उंच डोंगरावर एकीकडे आणतो. आणि त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले; त्याची मुद्रा सूर्यासारखी प्रकाशू लागली आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. आणि बघा, त्यांना मोशे आणि एलिया हे त्याच्याशी बोलताना दिसले. तेव्हा पेत्र बोलला आणि येशूला म्हणाला,
“प्रभू, आम्ही इथं आहोत हे चांगलं आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी इथं तीन मंडप करतो, एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी.”
आणि बघा, तो हे बोलत होता तेवढ्यात, एका तेजस्वी ढगाने त्यांच्यावर छाया केली; आणि बघा, ढगातून एक वाणी म्हणाली,
‘हा माझा प्रिय पुत्र आहे,
ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.
ह्याचं ऐका.’
आणि शिष्यांनी हे ऐकले, तेव्हा ते आपल्या तोंडावर पडले, आणि ते फार भ्याले होते. तेव्हा येशू आला आणि त्याने त्यांना हात लावून म्हटले,
“उठा, आणि भिऊ नका.”
आणि त्यांनी डोळे वर केले तेव्हा त्यांनी एकट्या येशूशिवाय कोणालाही बघितले नाही.
मग ते डोंगरावरून खाली येत असता येशूने त्यांना आज्ञा देऊन म्हटले,
“तुम्ही हा दृष्टान्त मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठेपर्यंत कोणाला सांगू नका.”
१०तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला प्रश्न करून म्हटले,
“मग शास्त्री असं का म्हणतात की, एलिया प्रथम आला पाहिजे?”
११आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“एलिया खरोखर येणार आणि सर्व गोष्टी नीट करणार. १२पण मी तुम्हाला सांगतो, एलिया आधीच आला असून त्यांनी त्याला ओळखलं नाही, पण त्यांना वाटलं तसं त्यांनी त्याला केलं. त्याचप्रमाणं मनुष्याचा पुत्रपण त्यांचं सोशील.”
१३तेव्हा शिष्यांना समजले की, तो आपल्याशी बाप्तिस्मा करणार्‍या योहानाविषयी बोलला होता.

१४मग ते लोकांकडे आल्यावर एक जण त्याच्याकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला म्हणाला,
१५“प्रभू, माझ्या मुलावर दया करा; कारण, तो फेफरेकरी आहे, आणि त्याला भयंकर त्रास होतो. तो पुष्कळदा विस्तवात पडतो आणि पुष्कळदा पाण्यात पडतो. १६मी आपल्या शिष्यांकडे त्याला आणलं, आणि, ते त्याला बरा करू शकले नाहीत.”
१७तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले,
“अहो, विश्वासहीन आणि विपरीत पिढी, मी कुठवर तुमच्याबरोबर राहू? कुठवर तुमचं सहन करू? त्याला माझ्याजवळ इकडे आण.”
१८आणि येशूने त्याला दटावले तेव्हा ते भूत त्याच्यामधून निघाले आणि मुलगा त्याच घटकेपासून बरा झाला.
१९मग शिष्य येशूकडे एकान्ती येऊन म्हणाले,
“आम्ही का ते काढू शकलो नाही?”
२०आणि येशू त्यांना म्हणाला,
“तुमच्या अल्पविश्वासामुळं! मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर तुम्ही ह्या डोंगराला म्हणाल, ‘इथून पुढच्या जागेवर सरक’ आणि तो सरकेल; तुम्हाला काही अशक्य होणार नाही.”

२१-२२मग ते गालिलात एकत्र जमले तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाईल. २३ते त्याला मारतील आणि तिसर्‍या दिवशी तो उठवला जाईल.”
आणि ते सर्व दुःखित झाले.

२४आणि ते कपर्णहूमला आले तेव्हा मंदिराचा कर घेणारे पेत्राकडे येऊन म्हणाले,
“तुमचे गुरू मंदिराचा कर भरीत नाहीत काय?”
२५तो म्हणाला,
“हो.”
मग ते घरी आल्यावर येशू प्रथम त्याच्याशी बोलला आणि म्हणाला,
“शिमोना, तुला काय वाटतं? पृथ्वीवरचे राजे कोणाकडून कर किवा जकात घेतात? स्वतःच्या पुत्रांकडून किवा परक्यांकडून?”
२६आणि तो म्हणाला,
“परक्यांकडून.”
तेव्हा येशू त्याला म्हणतो,
“तर मग पुत्र मोकळे आहेत. २७पण आपण त्यांना अडथळा करू नये म्हणून तू समुद्रावर जा, आणि गळ टाक, आणि जो मासा प्रथम वर येईल तो घे; आणि तू त्याचं तोंड उघडलंस की, तुला एक शेकेल मिळेल; तो घेऊन तू त्यांना तुझ्या आणि माझ्या वतीनं दे.”

—–मत्तय १८—–

त्याच घटकेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले,
“स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?”
आणि त्याने एका बालकाला आपल्याकडे बोलावले व त्याला त्यांच्या मध्यभागी बसवले, आणि म्हटले,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्ही प्रवेश करणार नाही. कारण जो कोणी स्वतःला ह्या बालकांप्रमाणे लीन करील तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा आहे.
“आणि जो कोणी अशा एका बालकाचा माझ्या नावानं स्वीकार करील तो माझा स्वीकार करतो. पण जो माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या ह्या लहानांतील एकाला अडथळा करील त्याच्या गळ्यात एक मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला खोल समुद्रात बुडवलं तर त्याच्यासाठी ते हिताचं होईल.
“अडथळ्यांमुळं जगाला हळहळ! कारण अडथळे येणं अगत्य आहे. पण ज्याच्यामुळं अडथळा येतो त्याला हळहळ! आणि जर तुझा हात किंवा पाय तुला अडथळा करीत असेल तर तो कापून टाक आणि आपल्याजवळून फेकून दे, कारण, थोटा किंवा लंगडा होऊन जीवनात जाणं हे दोन हात किंवा दोन पाय घेऊन सार्वकालिक अग्नीत पडण्यापेक्षा तुझ्यासाठी अधिक बरं आहे. आणि जर तुझा डोळा तुला अडथळा करीत असेल तर उपटून टाक आणि आपल्याजवळून फेकून दे. कारण,  एकडोळ्या होऊन जीवनात जाणं हे दोन डोळे घेऊन नरकाग्नीत पडण्यापेक्षा तुझ्यासाठी अधिक बरं आहे.
१०“पहा, ह्या लहानांतल्या एखाद्याला तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात असलेले त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याच्या तोंडाकडे सतत पहात असतात.
११-१२“तुम्हाला काय वाटतं? एखाद्या मनुष्याजवळ जर शंभर मेंढरं आहेत आणि त्यांच्यांतलं एक भटकलं, तर तो ती नव्याण्णव डोंगरावर ठेवून, जे भटकलं आहे त्याला शोधीत जात नाही काय? १३आणि जर असं झालं की, ते त्याला सापडलं, तर, मी तुम्हाला सांगतो, तो न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा त्या एकामुळं अधिक आनंद करील. १४त्याचप्रमाणं, ह्या लहानांतील एखाद्याचा नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.
१५“आणि तुझ्या भावानं जर तुझा अपराध केला, तर जा, आणि तू त्याच्याबरोबर एकटा असताना त्याला त्याचा दोष दाखव. आणि त्यानं जर तुझं ऐकलं तर तू आपला भाऊ मिळवलास. १६पण त्यानं तुझं ऐकलं नाही, तर तू आणखी एकदोघांना आपल्याबरोबर घे; म्हणजे दोन किंवा तीन साक्षींच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध व्हावा. १७आणि त्यानं त्यांचं ऐकलं नाही, तर मंडळीला सांग; आणि त्यानं मंडळीचं ऐकलं नाही, तर तो तुला परका आणि जकातदार असा होवो. १८मी तुम्हाला सत्य सांगतो, तुम्ही पृथ्वीवर बंधनात बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, आणि तुम्ही जे पृथ्वीवर सोडाल ते स्वर्गात सोडलं जाईल. १९मी तुम्हाला पुन्हा सांगतो की, जर पृथ्वीवर तुमच्यातील दोघे जे मागणार असतील त्याविषयी सहमत होतील, तर माझ्या स्वर्गातील पित्याकडून ते त्यांच्याकरता केलं जाईल. २०कारण दोघे किंवा तिघे जिथं माझ्या नावानं जमले आहेत तिथं त्यच्यात मी आहे.”
२१तेव्हा पेत्र येऊन त्याला म्हणाला,
“प्रभू, माझ्या भावानं किती वेळा माझ्याविरुद्ध पाप करावं, आणि मी त्याला क्षमा करावी? सात वेळा?”
२२आणि येशू त्याला म्हणतो,
“मी तुला म्हणत नाही की, सात वेळा; पण सातांच्या सत्तर वेळा.
२३“म्हणून स्वर्गाचं राज्य असं एका राजासारखं आहे. त्याची आपल्या दासांकडून हिशोब घ्यायची इच्छा होती. २४त्यानं हिशोब घ्यायला आरंभ केल्यावर त्याला दहा हजार तालान्त देणं लागणार्‍या एकाला त्याच्यापुढं आणलं. २५पण त्याच्याजवळ द्यायला काही नव्हतं, म्हणून त्याच्या धन्यानं आज्ञा केली की, ह्याची तशीच, ह्याच्या बायकोची, ह्याच्या मुलांची, आणि ह्याचं जे काही आहे त्याची विक्री करून फेड करून घ्यावी. २६तेव्हा तो दास पालथा पडला आणि त्याला नमन करून म्हणाला, ‘धनी, मला वागवून घ्या, आणि मी आपल्याला सर्व देईन.’ २७तेव्हा त्या दासाच्या धन्याला कळवळा येऊन त्यानं त्याला मोकळं केलं, आणि त्याला ते देणं सोडलं. २८पण तो दास बाहेर गेल्यावर त्याला शंभर दिनार देणं लागणारा त्याचा एक जोडीदार-दास त्याला आढळला; तेव्हा त्यानं त्याला धरून त्याची नरडी आवळली आणि त्याला म्हटलं, ‘तू माझं देणं लागतोस ते परत कर.’२९तेव्हा त्याचा जोडीदार-दास पालथा पडला आणि त्यानं त्याला विनंती करून म्हटलं, ‘मला वागवून घे, आणि मी तुझं सर्व देईन.’ ३०आणि त्याची इच्छा नव्हती; पण तो गेला आणि तो जे देणं लागत होता ते फेडीपर्यंत त्यानं त्याला तुरुंगात टाकलं.३१म्हणून, हे जे झालं ते त्याच्या जोडीदार-दासांनी बघितलं तेव्हा ते फार दुःखित होऊन आले, आणि त्यांनी आपल्या धन्याला हे जे झालं ते सगळं सांगितलं. ३२तेव्हा त्याच्या धन्यानं त्याला आपल्याकडे बोलावलं, आणि तो त्याला म्हणतो, ‘अरे दुष्ट दासा, तू मला विनंती केलीस म्हणून मी तुला ते देणं सोडलं. ३३मीतुझ्यावर दया केली तशीच तूपण आपल्या जोडीदार-दासावर दया करायची नव्हती काय?’३४आणि त्याचा धनी रागावला आणि ते जो देणं लागत होता ते फेडीपर्यंत त्यानं त्याला जाचणार्‍यांच्या हाती दिलं. ३५तसे तुम्ही, प्रत्येक जण, आपल्या भावाला, आपल्या मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिता तुम्हालाही तसंच करील.”

—–मत्तय १९—–

आणि असे झाले की, येशूने ही वचने समाप्त केल्यावर तो गालिलातून निघाला, आणि यार्देनेच्या दुसर्‍या बाजूला यहुदियाच्या प्रांतात आला. तेव्हा लोकांचे मोठाले घोळके त्याच्या मागोमाग गेले आणि त्याने त्यांना तेथे बरे केले.

मग परोशी त्याच्याकडे आले, आणि त्यांनी त्याची परीक्षा करायला त्याला म्हटले,
“कोणी कोणत्याही कारणावरून आपल्या बायकोला सोडणं योग्य आहे काय?”
आणि त्याने उत्तर देऊन म्हटले,
“तुम्ही हे वाचलं नाही काय की, ज्यानं प्रारंभापासून त्यांना उत्पन्न केलं त्यानं त्यांना नर आणि नारी असं केलं. आणि म्हटलं की, ‘ह्या कारणामुळे पुरुष आपल्या बापाला आणि आईला सोडील आणि आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील’? तर मग ती दोन नाहीत, पण एकदेह आहेत; म्हणून देवानं जे जोडलं आहे ते मनुष्यानं तोडू नये.”
ते त्याला म्हणतात,
“मग सोडचिठ्ठी देऊन तिला सोडायला मोशेनं आज्ञा का दिली?”
तो त्यांना म्हणतो,
“तुमच्या मनाच्या कठिणपणामुळं, मोशेनं तुम्हाला तुमच्या बायका सोडायला परवानगी दिली; पण प्रारंभापासून तसं झालं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय सोडील, आणि दुसरीशी लग्न करील तो व्यभिचार करतो.”
१०तेव्हा शिष्य त्याला म्हणतात,
“पुरुषाचा बायकोशी असा संबंध असेल तर लग्न करणं बरं नाही.”
११पण तो त्यांना म्हणाला,
“हे ज्यांना दिलं असेल त्यांच्याशिवाय ते कोणीही स्वीकारू शकणार नाहीत. १२कारण आईच्या उदरापासून जे तसेच जन्मलेत असे काही षंढ आहेत; माणसांनी ज्यांना षंढ केलं आहे, असे काही षंढ आहेत; आणि ज्यांनी स्वतःला स्वर्गाच्या राज्यासाठी षंढ केलं आहे असेही आहेत. हे ज्याला स्वीकारवेल तो स्वीकारो.”

१३तेव्हा बालकांना त्याच्याकडे, त्याने त्यांच्यावर आपले हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून आणले होते आणि शिष्यांनी त्यांना दटावले. १४पण येशू म्हणाला,
“बालकांना माझ्याकडे येऊ द्या; त्यांना मना करू नका; कारण स्वर्गाचं राज्य अशांचं आहे.”
१५आणि त्याने त्यांच्यावर हात ठेवले व तो तेथून गेला.
१६तेव्हा बघा, एक जण त्याच्याकडे आला आणि म्हणाला,
“गुरू, मला सनातन जीवन मिळावं म्हणून मी उत्तम काय करू?”
१७आणि तो त्याला म्हणाला,
“तू मला उत्तम काय त्याविषयी का विचारतोस? उत्तम एक आहे. पण जीवनात जाऊ इच्छीत असशील तर आज्ञा पाळ.”
१८तो त्याला म्हणतो,
“कोणत्या?”
तेव्हा येशू म्हणाला,
“ ‘खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, १९तू आपल्या बापाला आणि आईला मान दे’, आणि ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर.’ ”
२०तो तरुण मनुष्य त्याला म्हणतो,
“मी ह्या सगळ्या पाळल्या आहेत. अजून माझ्यात काय कमी आहे?”
२१येशू त्याला म्हणाला,
“तू जर पूर्ण होऊ इच्छीत असशील तर जा, तुझ्याजवळ जे असेल ते वीक, आणि गरिबांना दे; आणि तुला स्वर्गात धन मिळेल; चल, माझ्यामागं ये.”
२२आणि त्या तरुणाने ते बोलणे ऐकले तेव्हा तो फार दुःखित होऊन गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती.
२३तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, धनवान मनुष्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं कठिण आहे. २४आणि, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, धनवान मनुष्याला देवाच्या राज्यात प्रवेश करण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे.”
२५आणि शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित होऊन म्हणाले,
‘मग कोण तारला जाऊ शकेल?”
२६पण येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पहात त्यांना म्हटले,
“मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत.”
२७तेव्हा पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“मग, आम्ही सर्व सोडून तुझ्यामागं आलो आहोत त्या आम्हाला काय मिळेल?”
२८तेव्हा येशू त्याला म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, नव्या उत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवी राजासनावर बसेल, तेव्हा, माझ्यामागं आलेले तुम्हीसुद्धा बारा राजासनांवर बसाल आणि इस्राएलाच्या बारा कुळांचा न्याय कराल. २९आणि माझ्या नावाकरता, घरं किंवा भाऊ किंवा बहिणी, किंवा बाप किंवा आई किंवा मुलं, किंवा शेतं सोडणार्‍या प्रत्येक मनुष्याला अनेकपट अधिक मिळेल आणि सनातन जीवन हे वतन मिळेल. ३०पण पुष्कळ पहिले शेवटले होतील आणि शेवटले पहिले होतील.  

—–मत्तय २०—–

“कारण स्वर्गाचं राज्य असं एका घरधनी मनुष्यासारखं आहे; तो आपल्या द्राक्षमळ्यात कामकरी लावावेत म्हणून अगदी सकाळीच बाहेर गेला. आणि त्याने कामकर्‍यांना दिवसाला एक दिनार ठरवल्यावर त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवलं. आणि तो सुमारे तिसर्‍या ताशी बाहेर गेला, तेव्हा त्याला बाजारपेठेत दुसरे रिकामे उभे राहिलेले दिसले. आणि तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीपण द्राक्षमळ्यात जा, आणि मी तुम्हाला योग्य ते देईन.’ आणि ते गेले. तो पुन्हा सहाव्या ताशी आणि नवव्या ताशी बाहेर गेला आणि त्यानं तसंच केलं. आणि सुमारे अकराव्या ताशी तो बाहेर गेला आणि त्याला दुसरे काही रिकामे उभे राहिलेले आढळले, तेव्हा तो त्यांना म्हणतो, ‘तुम्ही दिवसभर रिकामे उभे का राहिलात?’ ते त्याला म्हणतात, ‘कारण कोणी आम्हाला कामावर घेतलं नाही.’ तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीपण द्राक्षमळ्यात जा.’ मग संध्याकाळ झाली तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभार्‍याला म्हणतो, ‘कामकर्‍यांना बोलाव आणि शेवटल्यापासून सुरुवात करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे.’ आणि अकराव्या ताशी ज्यांना लावलं होतं ते आले, तेव्हा त्यांना प्रत्येकी एक दिनार मिळाला. १०आणि जेव्हा पहिले आले, तेव्हा त्यांना वाटलं की, आपल्याला अधिक मिळेल; पण त्यांना तसाच प्रत्येकी एक दिनार मिळाला. ११आणि त्यांना तो मिळाला तेव्हा त्यांनी घरधन्याविरुद्ध कुरकुर केली; १२आणि म्हटलं, ‘ह्या शेवटल्यांनी केवळ एक तास काम केलं आणि आपण त्यांना, ज्या आम्ही दिवसभर ओझं आणि ऊन सहन केलं त्या आमच्या बरोबरीचं केलं आहे.’ १३पण त्यानं त्यांच्यातल्या एकाला उत्तर देऊन म्हटलं, ‘मित्रा, मी तुझा काही अपराध करीत नाही; तू माझ्याशी एक दिनार ठरवलास ना? १४तुझं तू घे आणि जा. तुला तसंच ह्या शेवटल्यांना द्यावं अशी माझी इच्छा आहे. १५मला माझ्या स्वतःच्या गोष्टींत बरं वाटेल ते करायची मला मोकळीक नाही काय? किंवा मी दयाळू आहे, म्हणून तुझी दृष्टी दूषित का?’  म्हणून शेवटले पहिले होतील आणि पहिले शेवटले होतील.”

१७आणि येशू यरुशलेमला वर जात असता त्याने बारा शिष्यांना एकीकडे घेतले आणि तो वाटेत त्यांना म्हणाला,
१८“बघा, आपण यरुशलेमला वर जात आहो, आणि मनुष्याचा पुत्र वरिष्ठ याजकांच्या आणि शास्त्र्यांच्या हाती दिला जाईल. ते त्याला मरणाच्या शिक्षेसाठी दोषी ठरवतील; १९आणि त्याला चिडवायला, फटके मारायला आणि वधस्तंभावर खिळायला परजनांच्या हाती देतील; आणि तिसर्‍या दिवशी तो उठवला जाईल.”

२०त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई आपल्या मुलांबरोबर आली, आणि तिने त्याला नमन करून त्याच्याजवळ काही याचना केली. २१तेव्हा तो तिला म्हणाला,
“तुला काय पाहिजे?”
आणि ती त्याला म्हणते,
“तुझ्या राज्यात माझ्या ह्या दोन मुलांनी, एकानं तुझ्या उजवीकडे आणि एकानं डावीकडे बसावं अशी आज्ञा दे.”
२२पण येशूने उत्तर देऊन म्हटले,
“तुम्ही काय मागता हे तुम्ही जाणत नाही. मी जो प्याला पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल?”
ते त्याला म्हणतात,
“हो, येईल.”
२३तो त्यांना म्हणतो,
“तुम्ही खरोखर माझा प्याला प्याल, पण माझ्या उजवीकडे आणि डावीकडे बसायला द्यायचं माझ्या हाती नाही. पण पित्यानं ज्यांच्यासाठी हे सिद्ध केलं आहे, त्यांच्यासाठी ते आहे.”
२४आणि दहांनी हे ऐकले तेव्हा त्यांना त्या दोन भावांचा राग आला. २५पण येशूने त्यांना आपल्याकडे बोलवून म्हटले,
“तुम्ही जाणता की, परजनांचे अधिकारी त्यांच्यावर धनीपण चालवतात,  आणि त्यांचे मोठे त्यांच्यावर सत्ता चालवतात; २६तरी तुमच्यात तसं होणार नाही; पण तुमच्यात जो कोणी मोठा होऊ इच्छील, त्यानं तुमचा सेवक व्हावं २७आणि तुमच्यात जो काणी पहिला होऊ इच्छील त्यानं सर्वांचा दास व्हावं. २८तसाच मनुष्याचा पुत्रदेखील सेवा करून घ्यायला नाही, पण सेवा करायला, आणि पुष्कळांसाठी खंडणी म्हणून आपला जीव द्यायला आला.”

२९आणि ते यरिहोतून बाहेर जात असता लोकांचा एक मोठा घोळका त्यांच्या मागोमाग जात होता. ३०आणि बघा, दोन अंधळे बाहेरच्या रस्त्याच्या कडेला बसले होते; आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू जवळून जात आहे, तेव्हा ते ओरडून म्हणाले,
“अहो दावीदपुत्र, प्रभू, आमच्यावर दया करा.”
३१तेव्हा त्यांनी गप्प रहावे म्हणून लोकांनी त्यांना दटावले. पण ते अधिक ओरडून म्हणाले,
“अहो दावीदपुत्र, प्रभू, आमच्यावर दया करा.”
३२तेव्हा येशू उभा राहिला आणि त्याने त्यांना बोलवून म्हटले,
“तुमच्यासाठी मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?”
३३ते त्याला म्हणतात,
“प्रभू, आमचे डोळे उघडावेत.”
३४तेव्हा येशूला कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना हात लावला. आणि, लगेच, त्यांना दृष्टी आली व ते त्याच्या मागोमाग गेले.

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s