Matthew 21-25

संत मत्तय ह्याचे शुभवर्तमान

—–मत्तय २१—–

आणि जेव्हा ते यरुशलेमकडे, जैतुनांच्या डोंगराजवळील बेथफगेच्या जवळ आले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना पाठवले, आणि त्यांना म्हटले,
“तुमच्या समोरच्या खेड्यात जा, आणि, लगेच, तुम्हाला एक बांधलेली गाढवी आणि तिच्याबरोबर शिंगरू आढळेल; त्यांना सोडून माझ्याकडे घेऊन या. आणि कोणी तुम्हाला काही म्हणेल तर तुम्ही म्हणा, ‘प्रभूला त्यांची गरज आहे’ आणि तो ती लगेच पाठवील.”
आणि हे ह्यासाठी झाले की, संदेष्ट्याकडून जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; त्याने असे म्हटले आहे की,
  ‘तुम्ही सियोनकन्येला सांगा,
  बघ, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; 
  तो सौम्य आहे,
  तो गाढवावर, आणि हो, शिंगरावर,
  गाढवीच्या बच्चावर बसून येत आहे.’
तेव्हा ते शिष्य गेले, आणि येशूने त्यांना सांगितले होते तसे त्यांनी केले, आणि ते गाढवी व शिंगरू घेऊन आले. मग त्यांनी त्यांवर आपली वस्त्रे घातली आणि तो त्यावर बसला. तेव्हा लोकांतील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली आणि इतरांनी झाडांच्या डहाळ्या कापल्या आणि वाटेवर पसरल्या. आणि जे लोक त्याच्या पुढे जात होते आणि जे मागोमाग येत होते ते ओरडून म्हणत होते,
“दाविदाच्या पुत्राला होसान्ना! प्रभूच्या नावानं येणारा धन्य! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”
१०आणि तो यरुशलेमला आला तेव्हा सर्व नगर हालवले गेले आणि म्हणू लागले की,
“हा कोण आहे?”
११आणि लोक म्हणाले,
“हा गालिलातल्या नासरेथचा संदेष्टा येशू आहे.”

१२आणि येशू मंदिरात गेला, आणि मंदिरात जे कोणी विकीत होते आणि विकत घेत होते त्या सर्वांना त्याने बाहेर काढले; त्याने सराफांचे मेज, आणि कबुतरे विकणार्‍यांचे चौरंग उलथले. १३आणि तो त्यांना म्हणतो,
“ ‘माझ्या घराला प्रार्थनेचं घर म्हणतील’, असं लिहिलं आहे; पण तुम्ही त्याची लुटारूंची गुहा करता.”
१४आणि अंधळे व पांगळे त्याच्याकडे मंदिरात आले, आणि त्याने त्यांना बरे केले. १५पण वरिष्ठ याजक व शास्त्री ह्यांनी मंदिरात त्याने केलेली अद्भुते, आणि ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ असे म्हणत ओरडणारी मुले बघितली, तेव्हा त्यांना राग आला; १६आणि ते त्याला म्हणाले,
“ही काय बोलतात ते तू ऐकतोस काय?”
आणि येशू त्यांना म्हणतो,
“हो, आणि ‘बालकांच्या आणि तान्ह्यांच्या तोंडून तू स्तुती पूर्ण केलीस’ हे तुम्ही कधीच वाचलं नाही काय?”
१७मग तो त्यांना सोडून नगराबाहेर बेथानीस गेला; आणि तेथे वसतीस राहिला.

१८आणि तो सकाळी नगराकडे मागे जात होता, तेव्हा भुकेला होता. १९आणि त्याने वाटेवर एक अंजिराचे झाड बघितले; तेव्हा तो त्या झाडाजवळ आला आणि त्याला त्यावर केवळ पानांशिवाय काही आढळले नाही. तेव्हा तो त्याला म्हणाला,
“आतापासून पुढील काळात तुझ्यावर फळ न येवो.”
आणि, लगेच, ते अंजिराचे झाड वाळून गेले.
२०आणि शिष्यांनी हे बघितले तेव्हा त्यांनी आश्चर्य केले आणि ते म्हणाले,
“हे अंजिराचं झाड लगेच कसं वाळल?”
२१तेव्हा येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्यात जर विश्वास असेल, आणि तुम्ही संशय धरणार नाही, तर तुम्ही हे अंजिराच्या झाडाला कराल एवढंच नाही, पण, तुम्ही जर ह्या डोंगराला म्हणाल, ‘तू इथून काढला जाऊन समुद्रात टाकला जा’ तर तसं होईल. २२आणि तुम्ही ज्या काही गोष्टी प्रार्थनेत, विश्वास ठेवून मागाल, त्या सर्व तुम्हाला मिळतील.”

२३आणि तो मंदिरात येऊन शिकवीत असता वरिष्ठ याजक व लोकांचे वडील त्याच्याकडे येऊन म्हणाले,
“तू कोणत्या अधिकारानं ह्या गोष्टी करतोस? आणि, कोणी तुला हा अधिकार दिला?”
२४आणि येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मीपण तुम्हाला एक गोष्ट विचारतो; तुम्ही मला ती सांगाल, तर मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकारानं करतो ते मी तुम्हाला सागेन. २५योहानाचा बाप्तिस्मा हा कुठून होता? स्वर्गाकडून की, मनुष्यांकडून?”
तेव्हा ते आपआपल्यात वाद करू लागले व म्हणाले,
“आपण म्हटलं, ‘स्वर्गाकडून’, तर तो आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ २६पण आपण जर म्हटलं, ‘मनुष्यांकडून’, तर आपण लोकांना भितो. कारण सर्व जण योहानाला संदेष्टा मानतात.”
२७आणि त्यांनी येशूला उत्तर देऊन म्हटले,
“आम्हाला माहीत नाही.”
तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“आणि मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकारानं करतो ते मीपण तुम्हाला सांगत नाही.
२८“पण तुम्हाला काय वाटतं? एका मनुष्याला दोन मुलगे होते; आणि तो पहिल्याकडे आला, आणि म्हणाला, ‘बाळ, तू आज द्राक्षमळ्यात जा आणि काम कर.’ २९आणि त्यानं उत्तर देऊन म्हटलं, ‘मी जाईन, महाराज’; पण तो गेला नाही. ३०मग तो दुसर्‍याकडे आला आणि तसंच म्हणाला; आणि त्यानं उत्तर देऊन म्हटलं, ‘माझी इच्छा नाही’, पण त्याला मागाहून पश्चात्ताप झाला आणि तो गेला. ३१ह्या दोघांतून कोणी आपल्या बापाच्या इच्छेप्रमाणं केलं?”
ते म्हणतात,
“दुसर्‍यानं.”
येशू त्यांना उत्तर देऊन म्हणतो,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, जकातदार आणि वेश्या तुमच्या पुढं देवाच्या राज्यात जात आहेत. ३२कारण योहान तुमच्याकडे नीतिमत्वाच्या मार्गे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण जकातदारांनी आणि वेश्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; आणि तुम्ही बघितलंत तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तुम्हाला मागाहून पश्चात्ताप झाला नाही.
३३“आणखी एक दाखला ऐका; एक घरधनी मनुष्य होता; त्यानं एक द्राक्षमळा लावला, त्याच्या भोवताली कुंपण घातलं, त्यानं द्राक्षकुंड खोदलं, माळा बांधला आणि माळ्यांकडे सोपवून दिला; आणि तो दूरदेशी गेला. ३४आणि फळांचा हंगाम जवळ आला तेव्हा माळ्यांकडून आपल्याला आपली फळं मिळावीत म्हणून त्यानं त्यांच्याकडे आपल्या दासांना पाठवलं. ३५तेव्हा त्या माळ्यांनी त्याच्या दासांना धरलं, एकाला पिटलं, दुसर्‍याला ठार मारलं आणि आणखी एकाला दगडमार केला. ३६पुन्हा त्यानं दुसर्‍या दासांना पाठवलं. ते पहिल्यापेक्षा अधिक होते. आणि त्यांनी त्यांना तसंच केलं. ३७पण ‘ते माझ्या पुत्राला मान देतील’, असं म्हणून त्यानं त्यांच्याकडे आपल्या पुत्राला पाठवलं. ३८पण त्या माळ्यांनी पुत्राला बघितलं तेव्हा ते एकमेकांस म्हणाले, ‘हा वारीस आहे. या, आपण ह्याला ठार मारू आणि त्याचं वतन घेऊ’. ३९आणि त्यांनी त्याला धरलं, द्राक्षमळ्यातून बाहेर काढलं आणि ठार मारलं. ४०तर द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या दासांना काय करील?”
४१ते त्याला म्हणतात,
“तो त्या निर्दय लोकांना निर्दयपणे नष्ट करील आणि जे त्याला हंगामात फळ देतील अशा दुसर्‍या माळ्यांकडे द्राक्षमळा सोपून देईल.”
४२येशू त्यांना म्हणतो,
“तुम्ही हा शास्त्रलेख कधीच वाचला नाही काय?
 ‘बांधणार्‍यांनी जो दगड नाकारला
  तोच कोपर्‍याचा मुख्य चिरा झाला;
  हे परमेश्वराकडून झाले
आणि हे आमच्या डोळ्यांना
आश्चर्यकारक आहे.’
४३म्हणून मी तुम्हाला सांगतो, देवाचं राज्य तुमच्याकडून काढलं जाईल आणि त्याची फळं देणार्‍या दुसर्‍या राष्ट्राला दिलं जाईल. ४४जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे होतील पण तो ज्या कोणावर पडेल त्याचा भुगा उडवील.‘
४५आणि वरिष्ठ याजक व शास्त्री ह्यांनी त्याचे दाखले ऐकले तेव्हा तो हे आपल्याविषयी बोलला हे त्यांनी ओळखले; ४६आणि ते त्याला धरायला पहात असता ते लोकांना भ्याले, कारण तो संदेष्टा आहे असे ते मानीत.

—–मत्तय २२—–

तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिले, आणि पुन्हा तो त्यांच्याशी दाखल्यांत बोलून त्यांना म्हणाला,
“स्वर्गाचं राज्य असं एका राजासारखं आहे; त्यानं आपल्या पुत्राच्या लग्नाची जेवणावळ केली, आणि लग्नाच्या जेवणावळीला ज्यांना आमंत्रण केलं होतं त्यांना बोलवायला आपल्या दासांना पाठवलं; पण त्यांची यायची इच्छा नव्हती. त्यानं पुन्हा दुसर्‍या दासांना पाठवलं आणि त्यांना म्हटलं, ‘ज्यांना आमंत्रण केलं आहे त्यांना सांगा, बघा, मी भोजन तयार केलं आहे; माझे बैल आणि पुष्ट पशू मारलेत; सर्व काही तयार आहे; आपण लग्नाच्या जेवणावळीला या.’ पण त्यांनी दुर्लक्ष केलं, आणि ते आपआपल्या मार्गाने गेले; एक आपल्या शेतावर तर दुसरा आपल्या दुकानदारीवर. आणि दुसर्‍यांनी त्याच्या दासांना धरलं, आणि त्यांची हेलना करून त्यांना ठार मारलं. पण राजा संतापला आणि त्यानं आपल्या पलटणी धाडल्या; आणि त्या खुन्यांना नष्ट केलं; आणि त्यांचं नगर जाळलं. मग तो आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाचं भोजन तयार आहे, पण ज्यांना बोलावलं होतं ते लायक नव्हते. म्हणून बाहेरच्या रस्त्यावरील चौकात जा, आणि तुम्हाला भेटतील तितक्यांना लग्नाच्या जेवणावळीला आमंत्रण करा.’ १०ते दास बाहेरच्या रस्त्यावर गेले, आणि त्यांना वाईट आणि चांगले जितके भेटले तितक्या सगळ्यांना त्यांनी जमवलं, आणि लग्नाची जेवणावळ पाहुण्यांनी भरली. ११पण राजा पाहुण्यांना बघायला आत आला तेव्हा लग्नाचा झगा ज्यानं पेहरला नव्हता असा एक जण त्याला दिसला. १२तेव्हा तो त्याला म्हणतो, ‘मित्रा, तू लग्नाचा झगा घातल्याशिवाय इथं आत कसा आलास?’ आणि तो उगा राहिला. १३तेव्हा राजा आपल्या सेवकांना म्हणाला, ‘ह्याचे हातपाय बांधा आणि ह्याला बाहेरच्या अंधारात टाका; तिथं रडणं आणि दात खाणं होईल.’ १४कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत.”

१५तेव्हा परोशी गेले व त्यांनी त्याला बोलण्यात कसे पकडावे म्हणून मसलत घेतली. १६मग ते आपल्या शिष्यांना हेरोद्यांबरोबर त्याच्याकडे धाडतात, आणि ते त्याला म्हणतात,
“गुरू, आम्ही जाणतो की, आपण खरे आहा आणि देवाचा मार्ग खरेपणानं शिकवता, आणि कोणाची पर्वा   करीत नाही; कारण आपण माणसांचं बाह्यरूप पहात नाही; १७म्हणून आम्हाला सांगा, आपल्याला काय वाटतं? कैसराला कर देणं योग्य आहे की नाही?”
१८पण येशूने त्यांचा दुष्टपणा ओळखून त्यांना म्हटले,
“अहो, ढोंग्यांनो, माझी परीक्षा का करता? १९मला एक कराचं नाणं दाखवा.”
आणि त्यांनी त्याला एक दिनार आणून दिला. २०तेव्हा तो त्यांना म्हणतो,
“हा मुखवटा आणि वरचा लेख कोणाचा आहे?”
२१ते त्याला म्हणतात,
“कैसराचा.”
तेव्हा तो त्यांना म्हणतो,
“तर कैसराचं आहे ते कैसराला द्या आणि देवाचं आहे ते देवाला द्या.”
२२लोकांनी हे ऐकून आश्चर्य केले, आणि त्यांनी त्याला सोडले व ते गेले.
२३त्याच दिवशी, जे पुनरुत्थान नाही असे म्हणतात ते सदोकी त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला प्रश्न करून २४म्हटले,
“गुरू, मोशेनं म्हटलं आहे की, जर कोणी मनुष्य त्याला मुलं नसताना मेला तर त्याच्या भावानं त्याच्या बायकोशी लग्न करून आपल्या भावासाठी संतान उभं करावं. २५आता, आमच्यात असे सात भाऊ होते; पहिल्यानं लग्न केलं आणि तो मेला; आणि त्याला संतान नसल्यामुळं त्यानं आपली बायको आपल्या भावाला ठेवली. २६त्याप्रमाणंच दुसरा, आणि तिसरा आणि सातव्यापर्यंत सगळे मेले; २७आणि त्या सगळ्यांच्या मागून ती बाईपण मेली. २८तर ती पुनरुत्थानात त्या सातांतून कोणाची बायको होईल? कारण ती त्या सर्वांची झाली होती.”
२९येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“तुम्ही शास्त्रलेख आणि देवाचं सामर्थ्य जाणत नाही, म्हणून चुकत आहा. ३०कारण ते पुनरुत्थानात लग्न करीत नाहीत किंवा लग्न करून देत नाहीत. पण स्वर्गातील देवदूतांसारखे होतात. ३१पण मेलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी देवानं तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही वाचलेलं नाही काय? त्यानं म्हटलं आहे की, ३२‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, आणि याकोबाचा देव आहे.’ देव हा मृतांचा देव नाही, पण जिवंतांचा आहे.”
३३लोकांनी हे ऐकले तेव्हा ते त्याच्या शिक्षणाने थक्क झाले.
३४पण त्याने सदोक्यांना गप्प केले हे परोश्यांनी ऐकले तेव्हा ते एकत्र जमले, ३५आणि त्यांच्यातल्या एका शास्त्र्याने आपण त्याची परीक्षा करावी म्हणून त्याला विचारले,
३६“गुरू, नियमशास्त्रात कोणती आज्ञा मोठी आहे?”
३७आणि तो त्याला म्हणाला,
“ ‘तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर’; ३८ही मोठी आणि पहिली आज्ञा आहे, ३९आणि हिच्यासारखी दुसरी ही की, ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर’. ४०ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टे अवलंबून आहेत.”

४१आता, परोशी एकत्र जमले असता येशूने त्यांना प्रश्न करून ४२म्हटले,
“तुम्हाला ख्रिस्ताविषयी काय वाटतं? तो कोणाचा पुत्र आहे?”
ते त्याला म्हणतात,
“दाविदाचा.”
४३तो त्यांना म्हणतो,
“मग दावीद आत्म्याने प्रेरित होऊन त्याला प्रभू म्हणून हे कसं म्हणतो,
  ४४‘परमेश्वर माझ्या प्रभूला म्हणाला,
  मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत
  तू माझ्या उजवीकडे बस.’
४५जर दावीद त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा पुत्र कसा?”
४६आणि कोणी त्याला एका शब्दानेही उत्तर देऊ शकला नाही; आणि त्या दिवसापासून कोणी त्याला आणखी प्रश्न करायला धजला नाही.   

—–मत्तय २३—–

मग येशू लोकांशी व आपल्या शिष्यांशी बोलू लागला, आणि म्हणाला,
“शास्त्री आणि परोशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत; म्हणून ते तुम्हाला जे काही सांगतील ते तुम्ही करा आणि पाळा, पण, तुम्ही त्यांच्या कामांप्रमाणं करू नका; कारण ते बोलतात आणि करीत नाहीत. कारण ते जड ओझी बांधतात आणि माणसांच्या खांद्यांवर लादतात; पण ते स्वतः ती आपल्या बोटानंही हलवू इच्छीत नाहीत. पण ते आपली सगळी कामं लोकांना दिसावीत म्हणून करतात. ते आपली संरक्षणचिन्हं रुंद करतात आणि ते आपल्या झग्यांचे काठ अधिक मोठे करतात; त्यांना जेवणावळींत वरच्या जागा आणि सभास्थानांत पुढच्या जागा घेणं आवडतं; त्यांना बाजारत मुजरे घेणं, आणि लोकांकडून रब्बी, रब्बी, म्हणवून घेणं आवडतं. पण तुम्ही रब्बी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एक आहे; आणि तुम्ही सगळे भाऊ आहा. आणि पृथ्वीवर कोणाला तुमचा पिता म्हणू नका; कारण तुमचा पिता एक आहे; तो स्वर्गात आहे. १०तसेच तुम्ही नेते म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा नेता एक आहे, तो ख्रिस्त आहे. ११पण जो तुमच्यात सर्वांत मोठा आहे त्यानं तुमचा सेवक व्हावं. १२जो कोणी स्वतःला मोठा करील तो लहान केला जाईल, आणि जो काणी स्वतःला लहान करील तो मोठा केला जाईल.
१३“पण अहो ढोंगी, शास्त्री आणि परोशी, तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचं राज्य बंद करता; कारण तुम्ही स्वतः आत जात नाही, आणि जे आत जात आहेत त्यांनाही तुम्ही आत जाऊ देत नाही.
१४-१५“अहो ढोंगी, शास्त्री आणि परोशी, तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही एक अनुयायी करायला, समुद्रावरून आणि जमिनीवरून, इकडे तिकडे जाता आणि तो झाल्यावर तुम्ही त्याला आपल्याहून दुप्पट असा नरकपुत्र करता.
१६“अहो तुम्ही अंधळे वाटाड्ये, तुम्हाला हळहळ! तुम्ही म्हणता की, कोणी मंदिराची शपथ घेईल तर काही नाही; पण कोणी मंदिरातल्या सोन्याची शपथ घेईल तर तो बांधलेला आहे. १७अहो तुम्ही मूर्ख आणि अंधळे, कारण श्रेष्ठ काय आहे? ते सोनं की, सोन्याला पवित्र करणारं मंदिर? १८आणि कोणी वेदीची शपथ घेईल तर काही नाही; पण कोणी तीवरील दानाची शपथ घेईल तर तो बांधलेला आहे. १९अहो तुम्ही अंधळे, कारण श्रेष्ठ काय आहे? ते दान की, दानाला पवित्र करणारी वेदी? २०म्हणून जो वेदीची शपथ घेईल तो तिची आणि तीवरील सर्व वस्तूंची शपथ घेतो, २१आणि जो मंदिराची शपथ घेईल तो त्याची, आणि त्यात जो राहतो त्याची शपथ घेतो. २२आणि जो स्वर्गाची शपथ घेईल तो देवाच्या राजासनाची आणि त्यावर जो बसतो त्याची शपथ घेतो.
२३“अहो ढोंगी, शास्त्री आणि परोशी, तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही पुदिना, बडीशेप आणि जिरं ह्यांचा दशमांश देता आणि तुम्ही नियमशास्त्रातील न्याय, दया आणि विश्वास ह्या अधिक मोठ्या गोष्टी वगळल्या आहेत; पण,तुम्ही त्या करायच्या होत्या आणि दुसर्‍या सोडायच्या नव्हत्या. २४अहो तुम्ही अंधळे वाटाड्ये, तुम्ही मुरकूट गाळून काढता आणि उंट गिळून घेता.
२५“अहो ढोंगी, शास्त्री आणि परोशी, तुम्हाला हळहळ! तुम्ही आपले प्याले आणि थाळे बाहेरून स्वच्छ करता पण ते आतून अपहार आणि असंयम ह्यांनी भरलेत. २६अरे, अंध परोश्या, तुझ्या प्याल्याची आतली बाजू प्रथम स्वच्छ कर म्हणजे त्याची बाहेरची बाजूही स्वच्छ होईल.
२७“अहो ढोंगी, शास्त्री आणि परोशी, तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही चुना लावलेल्या थडग्यांसारखे आहा. ती बाहेरून सुंदर दिसतात, पण ती आतून मृतांच्या हाडांनी, आणि सगळ्या घाणीनं भरलेली असतात. २८तुम्ही सर्व लोकांना तसेच बाहेरून नीतिमान दिसता पण आतून ढोंगानं आणि अनाचारानं भरलेले आहात.
२९“अहो ढोंगी, शास्त्री आणि परोशी, तुम्हाला हळहळ! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमानांची थडगी सजवता; ३०आणि म्हणता, ’आम्ही आमच्या पूर्वजांच्या दिवसांत असतो तर संदेष्ट्यांच्या रक्तात त्यांचे भागीदार झालो नसतो’. ३१तर तुम्ही संदेष्ट्यांना मारणार्‍यांचे वंशज आहा, अशी स्वतःविषयी साक्ष देता. ३२तर तुम्ही आपल्या पूर्वजांचं माप भरा. ३३अहो सर्पांनो, सर्पिणींच्या पिलांनो, तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? ३४म्हणून, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी आणि शास्त्री पाठवीत आहे. तुम्ही त्यांच्यातल्या काहींना ठार माराल, आणि वधस्तंभावर खिळाल, आणि काहींना तुमच्या सभास्थानांत फटके माराल आणि एका नगरातून दुसर्‍या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल. ३५म्हणजे नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्र स्थान ह्यांच्या मध्यंतरी ठार मारलंत तो बरख्याचा पुत्र जखर्या ह्याच्या रक्तापर्यंत पृथ्वीवर पाडलेलं सर्व नीतिमान रक्त तुमच्यावर यावं. ३६मी तुम्हाला सत्य सांगतो, ह्या सर्व गोष्टी ह्या पिढीवर येतील.
३७“अरे यरुशलेमा, यरुशलेमा, संदेष्ट्यांना ठार मारणार्‍या, तुझ्याकडे पाठविलेल्यांना दगडमार करणार्‍या, कोंबडी जशी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली एकवट करते, तसं मी तुम्हाला एकवट करावं अशी किती वेळा माझी इच्छा होती; आणि तुमची इच्छा नव्हती. ३८बघा, तुमचं घर तुमच्यासाठी सोडलेलं आहे. ३९कारण मी तुम्हाला सांगतो, आतापुढं, ‘प्रभूच्या नावानं येणारा धन्य’ असं तुम्ही म्हणाल तोपर्यंत तुम्ही मला बघणार नाही.” 

—–मत्तय २४—–

आणि येशू मंदिरातून बाहेर येऊन पुढे जात होता; आणि त्याचे शिष्य त्याच्याकडे त्याला मंदिराच्या इमारती दाखवायला आले. तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहता ना? मी तुम्हाला सत्य सांगतो, इथं पाडला जाणार नाही, असा दगडावर दगड राहू दिला जाणार नाही.”

मग तो जैतुनांच्या डोंगरावर बसला असता त्याचे शिष्य त्याच्याकडे एकान्ती येऊन म्हणाले,
“आम्हाला सांगा, ह्या गोष्टी केव्हा होतील? आणि आपल्या येण्याचं आणि युगाच्या समाप्तीचं चिन्ह काय?”
आणि येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून जपा. कारण माझ्या नावानं पुष्कळ जण येतील, आणि म्हणतील, ‘मी ख्रिस्त आहे’, आणि तुम्हाला फसवतील. आणि तुम्ही लढायांविषयी आणि लढायांच्या अफवा ऐकाल पण तुम्ही घाबरू नका. कारण ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण अजून शेवट नाही; कारण राष्ट्र राष्ट्रावर उठेल आणि राज्य राज्यावर उठेल; आणि जागजागी दुष्काळ उद्भवतील आणि भूकंप होतील. पण ह्या सर्व गोष्टी यातनांचा प्रारंभ होत.
“आणि ते तुम्हाला छळणुकीसाठी घरून देतील, आणि तुम्हाला ठार मारतील. आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रं तुमचा द्वेष करतील. १०आणि मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांना धरून देतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. ११पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील आणि पुष्कळांना फसवतील. १२आणि अनाचाराची वाढ होऊन पुष्कळांची प्रीती थंडावेल. १३पण जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तारला जाईल. १४आणि सर्व जगात सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून ही राज्याची सुवार्ता गाजवली जाईल आणि मग शेवट येईल.
१५“तर दानिएल संदष्ट्यानं उल्लेखलेली ओसाड करणारी अमंगळ गोष्ट पवित्र जागी ठेवलेली बघाल, (वाचणार्‍याला हे समजावे) १६त्यावेळी जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरांत पळावं, १७जो धाब्यावर असेल त्यानं आपल्या घरातील वस्तू घ्यायला खाली येऊ नये. १८आणि जो शेतात असेल त्यानं आपला अंगरखा घ्यायला माघारी परत जाऊ नये. १९पण त्या दिवसांत ज्या गरोदर असतील किंवा अंगावर पाजीत असतील त्यांना हळहळ! २०आणि हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी तुमची पळापळ होऊ नये म्हणून प्रार्थना करा. २१कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आलं नाही किंवा कधी येणार नाही असं मोठं संकट त्यावेळी येईल. २२आणि ते दिवस जर कमी केले गेले नसते तर कोणीही देही वाचला नसता. पण ते दिवस निवडलेल्यांसाठी कमी केले जातील. २३तेव्हा जर कोणी तुम्हाला म्हणेल, ‘बघा, ख्रिस्त इथं आहे’ किंवा ‘तिथं आहे’ तर तुम्ही विश्वास ठेवू नका. २४कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उपस्थित होतील, आणि अशी महान चिन्हं आणि अद्भुतं दाखवतील की, निवडलेल्यांनापण, शक्य तर फसवतील. २५बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे. २६म्हणून ते जर तुम्हाला म्हणतील, ‘बघा, तो अरण्यात आहे’, तर बाहेर जाऊ नका; ‘बघा, आतल्या खोल्यांत आहे’ तर विश्वास ठेवू नका. २७कारण जशी वीज पूर्वेकडून बाहेर येते आणि पश्चिमेपर्यंत प्रकाशते, तसंच मनुष्याच्या पुत्राचं येणं होईल. २८कारण मढं तिथं गिधाडं जमतील.
२९“त्या दिवसांतल्या संकटानंतर, लगेच, सूर्य अंधकारमय होईल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही, आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील शक्ती थरथरतील. ३०आणि मग आकाशात मनुष्याच्या पुत्राचं चिन्ह प्रगट होईल, आणि पृथ्वीवरील सर्व वंश आपले ऊर बडवतील. आणि मग ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या ढगांत पराक्रमानं आणि मोठ्या गौरवानं येताना पाहतील. ३१मग तो कर्ण्याच्या मोठ्या आवाजात आपल्या देवदूतांना पाठवील, आणि ते त्याच्या निवडलेल्यांना आकाशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत चारी दिशांकडून गोळा करतील.
३२“आता, अंजिराच्या झाडावरून त्याचा दाखला शिका. त्याची फांदी टवटवीत होते आणि तिला पानं फुटतात तेव्हा तुम्ही जाणता की, उन्हाळा जवळ आहे. ३३त्याचप्रमाणं तुम्ही ह्या सर्व गोष्टी बघाल तेव्हा हेही जाणा की, तो जवळ, दाराशी आहे. ३४मी तुम्हाला सत्य सांगतो, ह्या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. ३५आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचनं नाहीशी होणार नाहीत.
३६“पण त्या दिवसाविषयी आणि घटकेविषयी केवळ पित्याशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातले देवदूतही जाणत नाहीत, किंवा पुत्रही जाणत नाही. ३७कारण नोहाच्या दिवसांप्रमाणं मनुष्याच्या पुत्राचं येणं होईल. ३८कारण महापुराच्या आधीच्या दिवसांत, नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत, ते खात होते, पीत होते, लग्न करीत होते आणि लग्न करून देत होते; ३९आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना कळलं नाही. तसंच मनुष्याच्या पुत्राचं येणं होईल. ४०तेव्हा दोघे शेतात असतील, एक घेतला जाईल आणि एक ठेवला जाईल. ४१दोघी जात्यावर दळीत असतील, एक घेतली जाईल आणि एक ठेवली जाईल. ४२म्हणून जागृत रहा; कारण तुमचा धनी कोणत्या दिवशी येईल हे तुम्ही जाणत नाही. ४३पण हे जाणा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे जर घरधनी जाणत असता तर तो जागृत राहिला असता, आणि त्यानं आपलं घर फोडू दिलं नसतं. ४४म्हणून तुम्ही तयार व्हा. कारण तुम्हाला वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.
४५“तर ज्याला त्याच्या धन्यानं आपल्या परिवाराला, त्यांना त्यांचं अन्न वेळेवर द्यावं म्हणून नेमलं आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे? ४६जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसं करताना आढळेल तो धन्य! ४७मी तुम्हाला सत्य सांगतो, तो आपल्या सर्व मालमत्तेवर त्याला नेमील. ४८पण, जर तो दुष्ट दास आपल्या मनात असं म्हणेल की, ‘माझा धनी विलंब लावीत आहे’, ४९आणि आपल्या जोडीदार-दासांना मारू लागेल आणि झिगलेल्यांबरोबर खाऊ पिऊ लागेल, ५०तर त्या दासाचा धनी तो वाट पहात नाही अशा दिवशी आणि जाणत नाही अशा घटकेस येईल. ५१तेव्हा तो त्याला कापून काढील आणि ढोंग्यांबरोबर त्याचा वाटा नेमील. तिथं रडणं आणि दात खाणं होईल.  

—–मत्तय २५—–

“तेव्हा स्वर्गाचं राज्य असं, दहा कुमारिकांसारखं होईल. त्यांनी आपले दिवे घेतले आणि त्या वराला भेटायला निघाल्या. त्यांच्यातल्या पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. कारण ज्या मूर्ख होत्या त्यांनी आपले दिवे घेतले आणि आपल्याबरोबर तेल घेतलं नाही. पण ज्या शहाण्या होत्या त्यांनी आपल्या दिव्यांबरोबर आपल्या भांड्यांत तेल घेतलं. आता वराला विलंब लागला तेव्हा त्या सगळ्या डुलक्या घेऊन झोपल्या. मग मध्यरात्रीला हाक येते, ‘बघा, वर! त्याला भेटायला बाहेर या.’ आणि त्या सगळ्या कुमारिका उठल्या, आणि त्यांनी आपले दिवे नीट केले. तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलातून आम्हाला द्या; कारण आमचे दिवे विझत आहेत.’ पण शहाण्यांनी उत्तर देऊन म्हटले, ‘ते तुम्हाला आणि आम्हाला कदाचित् पुरणार नाही; त्यापेक्षा तुम्ही विकणार्‍यांकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या.’ १०आणि त्या विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला; आणि ज्या तयार होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नाच्या जेवणावळीला आत गेल्या, आणि दार बंद केलं गेलं. ११नंतर दुसर्‍या कुमारिकाही आल्या आणि म्हणाल्या, ‘प्रभू, प्रभू,  आमच्यासाठी उघडा’, १२पण त्यानं उत्तर देऊन म्हटलं, ‘मी तुम्हाला सत्य सांगतो, मी तुम्हाला ओळखीत नाही.’ १३म्हणून जागृत रहा; कारण तुम्ही तो दिवस किंवा ती घटका जाणत नाही.
१४“कारण हे दूरदेशी जाणार असलेल्या एका मनुष्याप्रमाणं आहे. त्यानं आपल्या दासांना बोलावून त्यांच्या हाती आपली मालमत्ता दिली. १५आणि त्यानं एकाला पाच तालान्त दिले, एकाला दोन, आणि एकाला एक दिला. प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या योग्यतेप्रमाणं दिलं, आणि तो दूरदेशी गेला. १६ज्याला पाच तालान्त मिळाले होते तो लगेच गेला, आणि, त्यानं त्यांवर व्यापार करून आणखी पाच तालान्त केले. १७ज्याला दोन मिळाले होते त्यानं त्याचप्रमाणं आणखी दोन मिळवले. १८पण ज्याला एक मिळाला तो गेला, आणि त्यानं जमीन खणून आपल्या धन्याचा पैसा लपवला. १९आता, पुष्कळ काळानंतर त्या दासांचा धनी येतो, आणि त्यांचा एकत्र हिशोब घेतो. २०जेव्हा ज्याला पाच तालान्त मिळाले होते तो आला, त्यानं आणखी पाच तालान्त आणले, आणि तो म्हणाला, ‘धनी, आपण माझ्या हाती पाच तालान्त दिलेत; बघा, मी आणखी पाच तालान्त मिळवलेत.’ २१त्याचा धनी त्याला म्हणाला, ‘छान, भल्या आणि विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींवर विश्वासू राहिलास, मी तुला पुष्कळ गोष्टींवर नेमीन; तुझ्या धन्याच्या आनंदात ये.’ २२ज्याला दोन तालान्त मिळाले होते तोपण येऊन म्हणाला, ‘धनी, आपण माझ्या हाती दोन तालान्त दिलेत; बघा, मी आणखी दोन तालान्त मिळवलेत.’ २३त्याचा धनी त्याला म्हणाला, ‘छान, भल्या आणि विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींवर विश्वासू राहिलास; मी तुला पुष्कळ गोष्टींवर नेमीन. तुझ्या धन्याच्या आनंदात ये.’ २४मग ज्याला एक तालान्त मिळाला होता तो येऊन म्हणाला, ‘धनी, मी आपल्याला ओळखीत होतो की, आपण कठिण मनुष्य आहा; आपण पेरलं नाही तिथून कापता आणि पसरलं नाही तिथून गोळा करता. २५म्हणून मी भ्यालो; आणि मी गेलो, आणि मी आपला तालान्त जमिनीत लपवला. बघा, हा आपला आपल्याला आहे.’ २६त्याच्या धन्यानं त्याला उत्तर देऊन म्हटलं, ‘अरे, दुष्ट आणि आळशी दासा! मी पेरलं नाही तिथून कापतो आणि पसरलं नाही तिथून गोळा करतो हे तू जाणत होतास; २७म्हणून तू माझा पैसा सावकाराकडे द्यायला पाहिजे होता, म्हणजे मी आल्यावर मला माझा तो व्याजासकट मिळाला असता.’ २८‘तर तुम्ही त्याच्याजवळून तो तालान्त घ्या आणि ज्याच्याजवळ दहा तालान्त आहेत त्याला द्या. २९कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल आणि त्याच्याजवळ विपुल होईल. पण ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे तेपण त्याच्याकडून काढून घेतलं जाईल. ३०आणि ह्या निरुपयोगी दासाला तुम्ही बाहेरच्या अंधारात टाका. तिथं रडणं आणि दात खाणं होईल.’
३१“पण मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवात येईल आणि त्याच्याबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हा तो आपल्या गौरवी राजासनावर बसेल; आणि सर्व राष्ट्रं त्याच्यापुढं जमवली जातील. ३२आणि मेंढपाळ जसा शेरडांतून मेंढरं वेगळी करतो तसा तो त्यांना एकमेकांतून वेगळे करील; ३३आणि मेंढरांना आपल्या उजवीकडे पण शेरडांना डावीकडे ठेवील. ३४मग राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, ‘या, माझ्या पित्याचे आशीर्वादित! तुमच्यासाठी जगाच्या स्थापनेपासून तयार केलेलं राज्य वतन घ्या. ३५कारण मी भुकेला होतो आणि तुम्ही मला खायला दिलंत, मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यायला दिलंत; मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतलंत, ३६उघडा होतो आणि तुम्ही मला वस्त्र पेहरवलंत, आजारी होतो आणि माझी भेट घेतलीत, अटकेत होतो आणि माझ्याकडे आलात.’  ३७तेव्हा नीतिमान त्याला उत्तर देऊन म्हणतील, ‘प्रभू, आम्ही कधी तुला भुकेला बघितलं आणि खायला दिलं, किंवा तान्हेला बघितलं आणि प्यायला दिलं? ३८कधी तुला परका बघितलं आणि आत घेतलं, किंवा उघडा बघितलं आणि वस्त्र पेहरवलं? ३९आणि कधी तुला आजारी किंवा अटकेत असता बघितलं, आणि तुझ्याकडे आलो?’ ४०तेव्हा राजा त्यांना उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला सत्य सांगतो, तुम्ही ते माझ्या भावांतल्या, ह्या लहानांतल्या एकाला, ज्याअर्थी केलंत, त्याअर्थी ते मला केलंत.’ ४१मग तो डावीकडच्यांना म्हणेल, ‘अहो तुम्ही शापित झालेले; सैतानासाठी आणि त्याच्या दूतांसाठी तयार केलेल्या सार्वकालिक अग्नीत माझ्यापुढून जा. ४२कारण मी भुकेला होतो आणि तुम्ही मला खायला दिलं नाही, मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यायला दिलं नाही. ४३मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतलं नाही, उघडा होतो आणि मला वस्त्र पेहरवलं नाही, आजारी आणि अटकेत होतो आणि माझी भेट घेतली नाही.’ ४४मग तेपण त्याला उत्तर देऊन म्हणतील, ‘प्रभू, आम्ही कधी तुला भुकेला किंवा तान्हेला, किंवा परका, किंवा उघडा किंवा आजारी किंवा अटकेत असताना बघितलं आणि तुझी सेवा केली नाही?’ ४५तेव्हा तो त्यांना उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला सत्य सांगतो, तुम्ही ते ह्या लहानांतल्या एकाला,  ज्याअर्थी केलं नाही, त्याअर्थी ते मला केलं नाही.’
४६“आणि ते सार्वकालिक बंधनात जातील पण नीतिमान सार्वकालिक जीवनात जातील.”

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s