Matthew 6-10

संत मत्तय ह्याचे शुभवर्तमान

 —–मत्तय ६—–

“तुम्ही आपलं धर्माचरण मनुष्यांना दिसावं म्हणून त्यांच्यापुढं न करण्याची काळजी घ्या. नाहीतर, तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला काही प्रतिफळ मिळणार नाही. म्हणून तू जेव्हा दान करतोस तेव्हा ढोंगी जसे सभास्थानांत आणि रस्त्यांत, त्यांना मनुष्यांकडून गौरव मिळावं म्हणून आपल्यापुढं शिग वाजवतात तसं तू करू नको. मी तुम्हाला सत्य सांगतो, ते आपलं प्रतिफळ भरून पावले आहेत. पण तू जेव्हा दान करतोस तेव्हा तुझा उजवा हात करतो ते डाव्या हाताला कळू देऊ नको. म्हणजे तुझं दान गुप्तात व्हावं, आणि गुप्तात पाहणारा तुझा पिता तुला प्रतिफळ देईल.
“आणि तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा ढोंग्यांसारखा होऊ नको. कारण त्यांना आपण मनुष्यांना दिसावं म्हणून सभास्थानांत आणि रस्त्यांच्या चौकांत उभं राहून प्रार्थना करायला आवडतं; मी तुम्हाला सत्य सांगतो,ते आपलं प्रतिफळ भरून पावले आहेत. पण तू प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या खोलीत जा, दार लावून घे, आणि गुप्तात राहणार्‍या तुझ्या पित्याची प्रार्थना कर, आणि गुप्तात पाहणारा तुझा पिता तुला प्रतिफळ देईल. पण तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परजनांसारखे निरर्थक बोलू नका, कारण त्यांना वाटतं की, त्यांच्या पुष्कळ बोलण्यामुळं त्यांचं ऐकलं जाईल. पण तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका; कारण तुमचा पिता तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे तुम्ही त्याच्याजवळ मागण्याअगोदर जाणतो.
“म्हणून तुम्ही अशी प्रार्थना करा,
‘हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानिले जावो.
१०तुझे राज्य येवो;
जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर
तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
११आमची रोजची भाकर आज आम्हाला दे
१२आणि आम्ही आमच्या ऋण्यांना सोडले आहे
तशीच तू आमची ऋणे आम्हाला सोड
१३आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस,
पण आम्हाला वाइटापासून सोडीव.’
१४“कारण तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केलीत तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करील १५पण तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
१६“शिवाय तुम्ही उपास करता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका. कारण ते आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावं म्हणून आपली तोंडं विद्रूप करतात. मी तुम्हाला सांगतो, ते आपलं प्रतिफळ भरून पावले आहेत. १७पण तू उपास करतोस तेव्हा तू आपल्या डोक्याला तेल लाव आणि तोंड धू; १८म्हणजे तू उपास करीत आहेस हे मनुष्यांना नाही पण गुप्तात राहणार्‍या तुझ्या पित्याला दिसावं; आणि गुप्तात पाहणारा तुझा पिता तुला प्रतिफळ देईल.
१९“तुम्ही पृथ्वीवर आपल्यासाठी ठेवी साठवू नका; तिथं कसर आणि जंग नाश करतात आणि चोर घर फोडून चोरतात. २०पण स्वर्गात आपल्यासाठी ठेवी साठवा; तिथं कसर आणि जंग नाश करीत नाहीत आणि चोर घर फोडून चोरीत नाहीत. २१कारण जिथं तुमचं धन तिथं तुमचं मनही राहील.
२२“डोळा शरिराचा दिवा आहे; म्हणून तुझा डोळा नीट असेल तर तुझं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. २३पण तुझा डोळा वाईट असेल तर तुझं संपूर्ण शरीर अंधकारमय होईल; म्हणून तुझ्यातला प्रकाश जर अंधार असेल तर तो अंधार किती मोठा!
२४“कोणीही मनुष्य दोन धन्यांची सेवा करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसर्‍यावर प्रीती करील; किंवा एकाला बिलगून राहील आणि दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.
२५“म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या जिवाविषयी, आपण काय खावं किंवा काय प्यावं अशी, किंवा आपल्या शरिराविषयी, आपण काय पेहरावं अशी, काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव अधिक, आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक नाही काय? २६आकाशातल्या पक्ष्यांकडे न्याहाळून पहा की, ते पेरीत नाहीत, किंवा कापणीही करीत नाहीत, किंवा कोठारांत साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांचं पोषण करतो. त्यांच्यापेक्षा तुम्ही अधिक मोलाचे आहात. २७आणि तुमच्यातला कोण काळजी करून आपलं आयुष्य हातभर वाढवू शकेल? २८आणि वस्त्रांची काळजी का करता? तुम्ही रानातल्या तेरड्यांकडे पहा, ते कसे वाढतात? ते कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत; २९तरी मी तुम्हाला सांगतो की, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात ह्यांतल्या एकासारखा सजला नव्हता. ३०तर रानातलं जे गवत आज आहे आणि उद्या भट्टीत टाकलं जाईल त्याला देव असा पेहराव घालतो तर अहो, तुम्ही अल्पविश्वासी, तो तुम्हाला विशेषेकरून घालणार नाही काय? ३१म्हणून ‘आपण काय खावं?’, ‘आपण काय प्यावं?’ किंवा  ‘आपण काय पेहरावं?’ असं म्हणून काळजी करू नका. ३२कारण परजन ह्या सर्व गोष्टींच्या मागं लागतात. कारण तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणतो. ३३पण प्रथम तुम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवू पहा; आणि तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पुरवल्या जातील.
३४“म्हणून उद्याची काळजी करू नका; कारण उद्या स्वतः आपली काळजी करील. प्रत्येक दिवसाला त्याचं वाईट पुरेसं आहे.

 —–मत्तय ७—–

“तुमचा न्याय केला जाऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका. कारण तुम्ही ज्या न्यायानं न्याय कराल त्यानंच तुमचा न्याय केला जाईल; आणि तुम्ही ज्या मापानं मोजून द्याल त्यानंच तुम्हाला मोजून दिल जाईल. तुझ्या भावाच्या डोळ्यात कुसळ आहे ते तू का पाहतोस? पण तुझ्या स्वतःच्या डोळ्यात मुसळ आहे तिकडे तू लक्ष देत नाहीस? किंवा तू आपल्या भावाला कसं म्हणशील की, मला तुझ्या डोळ्यातलं कुसळ काढू दे; आणि बघ, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात मुसळ आहे. अरे ढोंग्या, तू आधी आपल्या स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ काढ; आणि मग तुला आपल्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ काढायला नीट दिसेल.
“जे काही पवित्र आहे ते कुत्र्यांना देऊ नका, आणि आपले मोती डुकरांपुढं टाकू नका. नाहीतर, कदाचित् ती ते पायांखाली तुडवतील आणि उलटून तुम्हाला फाडतील.
“मागा, आणि ते तुम्हाला दिलं जाईल; शोधा, आणि तुम्हाला सापडेल; ठोका, आणि तुमच्यासाठी उघडलं जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला सापडतं, आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जाईल. किंवा तुमच्यात कोण मनुष्य असा आहे की, त्याचा मुलगा त्याच्याजवळ भाकर मागेल तर तो त्याला दगड देईल? १०किंवा मासा मागेल तर तो त्याला साप देईल? ११मग, तुम्ही वाईट असून, जर आपल्या मुलांना चांगल्या देणग्या कशा द्याव्यात हे तुम्ही जाणता, तर तुमचा स्वर्गातील पिता त्याच्याजवळ जे मागतात त्यांना किती विशेषेकरून चांगल्या गोष्टी देईल. १२म्हणून, लोकांनी तुमच्याशी सर्व गोष्टींत कसं वागावं अशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही त्यांच्याशी वागा. कारण नियमशास्त्र आणि संदेष्टे हेच शिकवतात.
१३“अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद, आणि मार्ग पसरट आहे, आणि त्यानं आत जाणारे पुष्कळ आहेत. १४कारण जीवनाकडे नेणारा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे, आणि तो ज्यांना सापडतो ते थोडे आहेत.
१५“खोट्या संदेष्ट्यांविषयी जपा; ते मेंढरांच्या वेशात तुमच्याकडे येतात, पण आतून ते धरणारे लांडगे आहेत. १६तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. काटेर्‍यांवरून द्राक्ष किवा केंकरीवरून अंजीर गोळा करतात काय? १७तसंच प्रत्येक चांगलं झाड चांगलं फळ देतं, पण कुजकं झाड वाईट फळ देतं. १८चांगलं झाड वाईट फळ देऊ शकत नाही; आणि कुजकं झाड चांगलं फळ देऊ शकत नाही. १९जे चांगलं फळ देत नाही असं प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकलं जातं. २०म्हणून तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.
२१“जो कोणीही मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणतो तो स्वर्गाच्या राज्यात येईल असं नाही. पण जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तो येईल. २२त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभू, प्रभू, आम्ही नाही का तुझ्या नावानं संदेश दिले? तुझ्या नावानं भुतं काढली? आणि तुझ्या नावानं पुष्कळ चमत्कार केले?’ २३आणि मग मी त्यांना उघड सांगेन, ‘मी तुम्हाला कधीच ओळखीत नव्हतो; अहो, अनाचार करणारे तुम्ही, माझ्यापुढून निघून जा.’
२४“म्हणून जो काणी माझी ही वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणं करतो त्याला एका विचारी माणसाची उपमा देता येईल. २५त्यानं आपलं घर खडकावर बांधलं. मग पाऊस पडला, पूर आले, वारे सुटले आणि त्या घरावर आदळले आणि ते पडलं नाही, कारण त्याचा खडकावर पाया घातला होता; २६आणि जो कोणी माझी ही वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणं करीत नाही त्याला एका मूर्ख माणसाची उपमा देता येईल; त्यानं आपलं घर वाळूवर बांधलं; २७मग पाऊस पडला, पूर आले, वारे सुटले आणि त्या घरावर आदळले आणि ते पडलं. आणि त्याचं पडणं मोठं होतं.”
२८आणि असे झाले की, येशूने ही वचने समाप्त केली तेव्हा लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाले. २९कारण त्याने त्यांच्या शास्त्र्यांप्रमाणे नाही पण स्वतःला अधिकार असल्याप्रमाणे त्यांना शिकवले.

 —–मत्तय ८—–

आणि तो डोंगरावरून खाली आला तेव्हा लोकांचे मोठाले घोळके त्याच्या मागोमाग जाऊ लागले.  
आणि बघा, त्याच्याकडे एक कुष्ठरोगी आला व त्याच्या पाया पडला,  आणि म्हणाला,
“प्रभू, जर आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करू शकाल.”
तेव्हा त्याने आपला हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले,
“माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”
आणि, लगेच, त्याचे कुष्ठ शुद्ध केले गेले. आणि येशू त्याला म्हणतो,
“पहा, कोणाला सांगू नकोस; पण जा, आणि स्वतःला याजकाला दाखव. आणि त्यांना साक्ष म्हणून मोशेनं सांगितलेलं दान अर्पण कर.”

 आणि येशू कपर्णहूमला आला तेव्हा त्याच्याकडे एक शतपती आला आणि त्याने त्याला विनंती करून म्हटले,
“प्रभू, माझा नोकर पक्षघाताने आजारी असून घरात पडला आहे, आणि त्याला फार क्लेश होत आहेत.”
तेव्हा येशू त्याला म्हणतो,
“मी येऊन त्याला बरा करीन.”
पण शतपतीने उत्तर देऊन म्हटले,
“प्रभू, मी असा लायक नाही की, आपण माझ्या छपराखाली यावं. पण आपण शब्द मात्र बोला, आणि माझा नोकर बरा होईल. कारण मी पण अधिकाराखालचा मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई आहेत. आणि, मी ह्याला म्हणतो, ‘जा’, आणि तो जातो आणि दुसर्‍याला म्हणतो, ‘ये’, आणि तो येतो आणि माझ्या दासाला म्हणतो, ‘हे कर’, आणि तो करतो.”
१०आणि हे ऐकून येशूने आश्चर्य केले, आणि त्याच्या मागोमाग जे आले होते त्यांना तो म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, मला एवढा मोठा विश्वास इस्राएलातही आढळला नाही. ११आणि मी तुम्हाला सांगतो, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून  पुष्कळ येतील, आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्याबरोबर बसतील. १२पण राज्याचे पुत्र बाहेरच्या अंधारात टाकले जातील; तिथं रडणं आणि दात खाणं होईल.”
१३मग येशू त्या शतपतीला म्हणाला,
“जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणं तुला प्राप्त होईल.”
आणि त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.

१४आणि येशू पेत्राच्या घरात आला तेव्हा त्याने बघितले की, त्याची सासू ताप येऊन पडली होती. १५आणि त्याने तिच्या हाताला धरले तेव्हा तिच्यातून ताप निघाला आणि ती उठली व तिने त्यांची सेवा केली. १६पण संध्याकाळ झाली त्यावेळी, त्यांनी ज्यांना भुते लागली होती अशा पुष्कळ जणांना त्याच्याकडे आणले. आणि त्याने आपल्या शब्दाने भुते काढली व जे आजारी होते त्या सर्वांना बरे केले. १७म्हणजे यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; त्याने असे म्हटले आहे की,
 ‘त्याने स्वतः आमचे व्याधी घेतले,
  आणि आमचे रोग उचलले.’
१८आता येशूने आपल्या सभोवती लोकांचे मोठाले घोळके बघितले तेव्हा त्याने दुसर्‍या बाजूकडे जायची आज्ञा दिली.
१९तेव्हा एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला,
“गुरू, आपण जाल तिकडे मी आपल्यामागं येईन.”
२०आणि येशू त्याला म्हणतो,
“खोकडांना बिळं, आणि आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला कुठंच काही नाही.”
२१तेव्हा शिष्यांतला दुसरा एक जण त्याला म्हणाला,
“प्रभू, मला प्रथम जाऊ द्या, आणि माझ्या बापाला पुरू द्या.”
२२पण येशू त्याला म्हणाला,
“माझ्यामागं ये. मृतांना त्यांच्या मृतांना पुरू दे.”

२३आणि ते मचव्यात गेल्यावर त्याचे शिष्य त्याच्या मागोमाग गेले.
२४आणि बघा, समुद्रात मोठे वादळ उद्भवले; त्यामुळे लाटांनी मचवा झाकला आणि तो झोपलेला होता. तेव्हा ते त्याच्याजवळ गेले आणि त्याला उठवून म्हणाले,
२५“प्रभू, वाचवा; आपण बुडतोत.”
२६आणि तो त्यांना म्हणतो,
“अहो तुम्ही अल्पविश्वासी, तुम्ही असे भितरे कसे?”
आणि तो उठला व त्याने वार्‍यांना आणि समुद्राला दटावले; तेव्हा मोठी स्तब्धता आली. २७पण त्यांनी आश्चर्य केले व म्हटले,
“हा कसा मनुष्य आहे की, वारे आणि समुद्रदेखील ह्याचं ऐकतात.”

 २८आणि तो दुसर्‍या बाजूस गरसेकरांच्या प्रांतात आला तेव्हा ज्यांना भुते लागली होती असे दोघे जण थडग्यांतून येताना त्याला भेटले. ते इतके अतिभयंकर होते की, त्या वाटेने कोणी जाऊ शकत नसे. २९आणि बघा, ते ओरडून म्हणाले,
“देवाच्या पुत्रा, तुला आमच्याशी काय करायचं आहे? तू आम्हाला वेळेपूर्वी पिडायला इथं आलास काय?”
३०आता एक, डुकरांचा कळप तेथे त्यांच्यापासून दूरवर चरत होता. ३१आणि भुतांनी त्याला विनंती करून म्हटले,
“तू आम्हाला बाहेर काढलंस तर आम्हाला त्या डुकरांच्या कळपात जाऊ दे.”
३२आणि तो त्यांना म्हणाला,
“जा.”
तेव्हा भुते निघून त्या डुकरांत शिरली, आणि बघा, तो सर्व कळप एका कड्यावरून जोरात पळत, खाली समुद्रात गेला आणि पाण्यात नष्ट झाला.
३३तेव्हा जे त्यांची राखण करीत होते ते तेथून पळाले व नगरात गेले; आणि त्यांनी सर्व काही व ज्यांना भुते लागली होती त्यांना काय झाले ते सांगितले. ३४आणि बघा, ते सर्व नगर येशूला भेटायला बाहेर आले; आणि त्याला बघितल्यावर त्यांनी त्याला आपल्या प्रांतातून निघून जायची विनंती केली. 

—–मत्तय ९—–

तेव्हा तो मचव्यात गेला आणि दुसर्‍या बाजूला येऊन आपल्या स्वतःच्या नगरात आला.
आणि बघा, ते एका खाटल्यावर पडलेल्या, पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे घेऊन आले. तेव्हा येशूने त्यांचा विश्वास बघून त्या पक्षघात झालेल्या मनुष्याला म्हटले,
“मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा केली आहे.”
आणि बघा, काही शास्त्री आपल्या मनात म्हणाले,
“हा दुर्भाषण करतो.”
आणि येशूने त्यांचे विचार जाणून म्हटले,
“तुम्ही आपल्या मनात वाईट विचार का करता? कारण ‘तुझ्या पापांची क्षमा केली आहे’ असं म्हणणं, किंवा ‘ऊठ आणि चाल’ असं म्हणणं अधिक सोपं आहे? पण मनुष्याच्या पुत्राला, पृथ्वीवर, पापांची क्षमा करायचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावं म्हणून,”
(तो मग त्या पक्षघाती मनुष्याला म्हणतो,)
“ऊठ, तुझं बाजलं उचल आणि तुझ्या घरी जा.”
तेव्हा तो उठला आणि आपल्या घरी गेला. पण लोकांनी हे बघितले तेव्हा ते भ्याले, आणि ज्या देवाने मनुष्यांना एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले.

आणि येशू तेथून पुढे जात असता त्याने जकातनाक्यावर बसलेल्या,  मत्तय नावाच्या मनुष्याला बघितले. आणि तो त्याला म्हणतो,
“माझ्यामागं ये.”
तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे गेला. १०आणि असे झाले की, येशू घरात भोजनास बसला असता, बघा,पुष्कळ जकातदार व पापी आले, आणि येशूच्या व त्याच्या शिष्यांच्या पंगतीला भोजनास बसले. ११आणि हे परोश्यांनी बघितले तेव्हा ते त्याच्या शिष्यांना म्हणाले,
“तुमचे गुरू जकातदारांच्या आणि पाप्यांच्या पंगतीला का जेवतात?”
१२पण हे येशूने ऐकले तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“निरोग्यांना वैद्याची गरज नाही पण रोग्यांना आहे. १३तर जा, आणि, ‘मला दया पाहिजे, बलिदान नको’, म्हणजे काय आहे ते तुम्ही शिका. कारण मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही पण पाप्यांना बोलवायला आलो.”

 १४तेव्हा योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले,
“आम्ही आणि परोशी उपास करतो पण आपले शिष्य उपास का करीत नाहीत?”
१५आणि येशू त्यांना म्हणाला,
“वर्‍हाड्यांबरोबर वर असताना त्यांना शोक करवेल काय? पण वर त्यांच्यामधून काढला जाईल असे दिवस येतील. आणि मग ते उपास करतील.
१६“कोणी कोर्‍या कापडाचं ठिगळ जुन्या कपड्यावर लावीत नाहीत; कारण भरीचा तुकडा त्या कपड्यामधून उसकटतो आणि फाटकं अधिक वाईट होतं.
१७“किंवा कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत भरीत नाहीत; नाहीतर बुधले फुटतात; द्राक्षारस सांडतो आणि बुधल्यांचा नाश होतो. म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत भरतात आणि दोन्ही टिकतात.”

१८तो हे त्यांच्याशी बोलत असता, बघा, तेथे एक अधिकारी आला व त्याच्या पाया पडून म्हणाला,
“माझी मुलगी आताच मेली आहे; पण या, आणि आपला हात तिच्यावर ठेवा, म्हणजे ती जिवंत होईल.”
१९आणि येशू उठून त्याच्या मागोमाग गेला आणि त्याचे शिष्यही गेले.
२०आणि बघा, बारा वर्षे रक्तस्राव लागलेली एक स्त्री मागे आली व त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली. २१कारण ती आपल्या मनात म्हणाली,
“मी केवळ ह्याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईन.”
२२पण येशू मागे वळला व त्याने तिला बघून म्हटले,
“मुली, धीर धर, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे.”
आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली.
२३आणि येशू त्या अधिकार्‍याच्या घरात आला, आणि त्याने तेथे वाजंत्री व गलबला करणारे लोक बघितले; २४तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“उठा, कारण मुलगी मेली नाही पण झोपली आहे.”
आणि ते त्याला हसले. २५पण लोकांना बाहेर काढल्याबरोबर तो आत गेला व त्याने तिच्या हाताला धरले आणि मुलगी उठली. २६आणि त्या सर्व प्रांतात ह्या गोष्टींची कीर्ती पसरली.

२७आणि येशू तेथून जात असता दोन अंधळे त्याच्या मागोमाग गेले व ओरडत म्हणाले,
“अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.”
२८आणि तो घरात आल्यावर ते अंधळे त्याच्याकडे आले; आणि येशू त्यांना म्हणाला,
“मी हे करू शकतो असा तुम्ही विश्वास ठेवता काय?”
ते त्याला म्हणतात,
“हो, प्रभू.”
२९तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांवर हात लावून म्हटले,
“तुम्हाला तुमच्या विश्वासाप्रमाणे प्राप्त होवो.”
३०आणि त्यांचे डोळे उघडले. मग येशूने त्यांना निक्षून सूचना देऊन म्हटले,
“पहा, हे कोणाला कळू नये.”
३१पण ते गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रांतात त्याची कीर्ती पसरवली.
३२आणि ते बाहेर निघाले, तेव्हा, बघा, ते एका, भूत लागलेल्या मुक्या मनुष्याला त्याच्याकडे घेऊन आले; ३३आणि भूत बाहेर काढले गेले तेव्हा तो मुका मनुष्य बोलला. आणि लोकांनी आश्चर्य केले व म्हटले,
“असं इस्राएलात कधीच दिसलं नव्हतं.”
३४पण परोशी म्हणाले,
“हा मृतांच्या अधिपतीच्या साह्यानं भुतं काढतो.”

३५आणि येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे रोग बरे करीत सर्व नगरांत व खेड्यांत फिरला.
३६पण त्याने लोकांचे घोळके बघितले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला, कारण ते कासावीस होत होते व ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे विखरले होते. ३७तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणतो,
“खरोखर, पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. ३८तर पिकाच्या धन्यानं आपल्या पिकात कामकरी पाठवावेत म्हणून तुम्ही त्याला विनवणी करा.”  

 —–मत्तय १०—–

आणि त्याने आपल्या बारा शिष्यांना आपल्याकडे बोलावले; आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर म्हणजे त्यांना बाहेर काढायचा, आणि सर्व प्रकारचे आजार व सर्व प्रकारचे रोग बरे करायचा अधिकार दिला.

आणि त्याच्या बारा प्रेषितांची नावे अशीः पहिला पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया; जब्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान,  फिलिप, बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार; अल्फीचा याकोब आणि तद्दय; शिमोन कनानी, आणि ज्याने त्याला धरून दिले तो यहुदा इस्कार्योत.
येशूने ह्या बारा शिष्यांना पाठवले आणि त्यांना आज्ञा देऊन म्हटले,
“परजनांच्या रस्त्यांवर जाऊ नका; आणि शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात शिरू नका; तर इस्राएलाच्या घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. आणि जात असताना तुम्ही घोषणा करून म्हणा, ‘स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.’ आजार्‍यांना बरं करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा; तुम्हाला फुकट मिळालं आहे, फुकट द्या. तुमच्या कंबरकशात सोनं, रुपं किवा तांबं घेऊ नका. १०वाटेसाठी झोळी किवा दोन झगे,वहाणा किवा काहीही घेऊ नका, कारण कामकरी पोषणास पात्र आहे. ११आणि, ज्या कोणत्या नगरात किवा गावात जाल तिथं कोण योग्य आहे हे शोधून काढा; आणि तुम्ही पुढं जाईपर्यंत तिथं रहा. १२आणि तुम्ही कोणत्याही घरात जाल तेव्हा त्याला अभिवादन करा. १३जर ते घर लायक असेल तर तुमची शांती त्यावर येईल पण जर ते लायक नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. १४आणि जो कोणी तुमचा स्वीकार करणार नाही किवा तुमची वचनं ऐकणार नाही त्या घरातून किवा त्या नगरातून बाहेर निघताना तुम्ही आपल्या पायांची धूळ झटकून टाका. १५मी तुम्हाला सत्य सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा ह्या नगरांना अधिक सोपं होईल.
१६“बघा, मी तुम्हाला लांडग्यांत मेंढरांसारखे पाठवीत आहे. म्हणून तुम्ही सापांसारखे दूरदर्शी आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. १७पण लोकांपासून सावध रहा; कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आणि ते तुम्हाला त्यांच्या सभास्थानांत फटके मारतील; १८आणि तुम्ही माझ्याकरता अधिकार्‍यांपुढं आणि राजांपुढं, त्यांना आणि परजनांना साक्ष व्हायला आणले जाल. १९पण ते तुम्हाला धरून देतील तेव्हा आपण कसं किंवा काय बोलावं ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावं हे तुम्हाला त्याच घटकेस दिलं जाईल. २०कारण बोलणारे तुम्ही नाही, पण तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्या द्वारे बोलणारा आहे. २१आणि भाऊ भावाला आणि बाप लेकराला ठार मारायला धरून देईल; आणि लेकरं आईबापांवर उठतील आणि त्यांचा वध करवतील २२आणि सगळे माझ्या नावाकरता तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकून राहील तो तारला जाईल. २३पण ते तुमचा ह्या नगरात पाठलाग करतील तेव्हा दुसर्‍या नगरात पळून जा. कारण मी तुम्हाला सत्य सांगतो, मनुष्याचा पुत्र येईल तोपर्यंत इस्राएलाच्या सर्व नगरांतून तुमचं जाणं झालेलं नसेल.
२४“शिष्य आपल्या गुरूहून मोठा नाही आणि दास आपल्या धन्याहून मोठा नाही. २५शिष्याला त्याच्या गुरूसारखं आणि दासाला त्याच्या धन्यासारखं होता यावं एवढं पुरे. जर त्यांनी घरधन्याला बालजबूल म्हटलं तर जे त्याच्या घरातले आहेत त्यांना किती अधिक म्हणतील.
२६“म्हणून त्यांना भिऊ नका, कारण प्रकट होणार नाही असं काहीही झाकलेलं नाही, आणि कळणार नाही असं गुप्त ठेवलेलं नाही. २७मी तुम्हाला अंधारात सांगतो ते तुम्ही उजेडात बोला, आणि तुम्ही जे कानांत ऐकाल ते धाब्यांवर गाजवा. २८जे कोणी शरीर नष्ट करतात पण आत्मा नष्ट करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका; पण जो दोन्ही, आत्मा आणि शरीर नरकात नष्ट करू शकतो त्याला विशेषेकरून भ्या. २९दमडीला दोन चिमण्या विकतात की नाही? पण तुमच्या पित्याशिवाय त्यातली एकपण जमिनीवर पडणार नाही. ३०पण तुमच्या डोक्याचे सगळे केसही मोजलेले आहेत. ३१म्हणून भिऊ नका; तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अघिक मोलाचे आहा. ३२म्हणून जो कोणी मला मनुष्यांसमोर पतकरील त्याला मीपण माझ्या स्वर्गातील पित्यासमोर पतकरीन, ३३पण जो कोणी मला मनुष्यांसमोर नाकारील त्याला मीपण माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
३४“मी पृथ्वीवर शांती ठेवायला आलो असं समजू नका; मी शांती ठेवायला आलो नाही, पण तरवार. ३५कारण मी मनुष्याला त्याच्या बापाविरुद्ध, मुलीला तिच्या आईविरुद्ध, आणि सुनेला तिच्या सासूविरुद्ध उठवायला आलो आहे. ३६आणि मनुष्याच्या घरचेच त्याचे वैरी होतील. ३७जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करील तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करील तो मला योग्य नाही. ३८आणि जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागं येत नाही तो मला योग्य नाही. ३९जो आपला जीव मिळवील तो त्याला मुकेल आणि जो माझ्याकरता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल.
४०‘जो तुमचा स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो तो ज्यानं मला पाठवलं  त्याचा स्वीकार करतो. ४१जो संदेष्ट्याचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो त्याला संदेष्ट्याचं प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाचा नीतिमान म्हणून स्वीकार करतो त्याला नीतिमानाचं प्रतिफळ मिळेल. ४२आणि मी तुम्हाला सत्य सांगतो, जो कोणी ह्या लहानांतील एकाला, शिष्य म्हणून, केवळ गार पाण्याचा प्याला प्यायला देईल तो आपलं प्रतिफळ गमावणार नाही.”

7 responses to “Matthew 6-10

 1. सर, धन्यवाद आता Evil/evil च्या अर्थाच्या छटा अधिक स्पष्ट झाल्या व आम्ही विचार करत असलेल्या वचनात, evil/Evil चा अर्थ अरिष्ट/संकट घ्यावा हे पण आता सांगता येईल. परत एकदा धन्यवाद !.

 2. सर,
  “१. John, in English it is possible to write evil as Evil, as if it is a proper noun. २. I feel that Evil embodies all that is bad in this world, a power which we have to fight relentlessly. ”
  विशेष नाम (Proper Noun) व शक्ती (Power ) या आपण दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर “अरिष्ट” व्यतिरिक्त अजून अचूक शब्द सापडला तर पोस्ट करावा ही विनंती.
  मी पण धर्मशास्त्राचा विद्यार्थी वा अभ्यासु नाही, किंबहुना मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे . “संकटाला(अरिष्टाला) भिऊ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे त्या जिज्ञासू सभासदाला अर्थ घ्यावा असे सुचवायचा मी विचार करत आहे.

  • Prof R R Kelkar

   Dear Suneel,
   In the Bible, Satan is mentioned by name in many places. He is called Satan/Devil/Tempter/Evil One. In Marathi he is सैतान/परीक्षक/वाईट/दुष्ट.
   But “evil” may not always mean Satan and it is translated into Marathi differently as per the context. For example, in “overcome evil with good”, we have “वाईट” and “चांगले”. In Psalm 23, when walking through the valley of the shadow of death, there is danger, so “अरिष्ट” or “संकट” is appropriate. An evil spirit in Marathi would be अशूद्ध आत्मा.
   To summarize, there is no Bible verse that reads “Do not fear Satan.” But we should be clear in our minds about what is evil, and we should know what to do when we see evil around us.
   May God guide you in your quest, Suneel.
   Ranjan Kelkar

 3. Sir,
  Thanks for a quick response. I am a Hindu (you are right I’m suneel ). The query under reference came while discussing a thought in literature based discussion meeting of “12 Step Fellowship” at Badlapur(Mumbai). The thought was under title ” More Than Comfort ” ( From As Bill Sees It : p. 148) was as follows :
  ” When I am feeling depressed, I repeat to myself statements such as these: “Pain is the touchstone of progress.” . . . “Fear no evil.” . . . “This, too, will pass.” . . . “This experience can be turned to benefit.”
  These fragments of prayer bring far more than mere comfort. They keep me on the track of right acceptance; they break up my compulsive themes of guilt, depression, rebellion, and pride; and sometimes they endow me with the courage to change the things I can, and the wisdom to know the difference.” http://www.essentialsofrecovery.com/2015/05/as-bill-sees-it-essentialsofrec_29.html
  The line (quotation/saying) in the 1st Para i.e “Fear no Evil ” was translated as : ” सैतानाला घाबरू नका ” (saitanala ghabaru naka )
  So we got confused whether it means saitaan(सैतान ) or dusht shakti (दुष्ट शक्ती ) .
  i had a hunch that this quotation might be from Bible, but, the two members from christen denomination present during the discussion were also not clear about the right word.
  Now your explanation that it means अरिष्ट (arisht) makes sense.
  Thanks a lot once again.

  • Prof R R Kelkar

   Dear Suneel,
   Thanks. I am happy that my clarification was of some help. In fact in theological matters, I am as much a layman as you may be. I have a blog where I write simple and short meditations in Marathi. The link is https://chintan365.wordpress.com/
   If you feel like it, visit the site.
   Ranjan Kelkar

 4. (Psalm 23:4) : Even though I walk through the valley of the shadow of death, I fear no evil, for You are with me; Your rod and Your staff, they comfort me. what is marathee translation of this Psalm, particularly the Marathee word used for evil. Is is it अरिष्ट, संकट, घोर संकट , दुष्ट शक्ती .

  • Prof R R Kelkar

   Dear John (or Suneel?)
   Thanks for visiting my blog. There are many Marathi translations of Psalm 23. The one I like and which was taught to me by my parents is as follows:
   १ परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे होणार नाही.
   २ तो मला हिरव्या कुरणात बसू देतो. तो मला संथ पाण्यावर नेतो.
   ३ तो माझा जीव ताजातवाना करतो. तो आपल्या नामाकरता मला न्यायमार्गाने नेतो.
   ४ मृत्युच्छायेच्या दरीतून मी जात असलो तरी काही अरिष्टास भिणार नाही.
   कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.
   ५ माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्यापुढे भोजन वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेल लावतोस.
   माझे पात्र काठोकाठ भरले आहे.
   ६ खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला हित व कृपा ही अनुसरतील,
   आणि परमेश्वराच्या घरात माझी चिरकाल वसती होईल.
   John, in English it is possible to write evil as Evil, as if it is a proper noun. In Marathi this cannot be done. I feel that Evil embodies all that is bad in this world, a power which we have to fight relentlessly. But like David, it is our experience that God is always there to help us out.
   What a beautiful scripture! God bless you for commenting on this psalm.
   Ranjan Kelkar

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s