Philippians

फिलिपैकरांस पत्र

—–फिलिपै १—–

येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य ह्यांजकडून;
फिलिपै येथील ख्रिस्त येशूतील पवित्र जन तसेच रक्षक व सेवक ह्यांसः
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.

तुमच्या प्रत्येक आठवणीसाठी मी माझ्या देवाचे उपकार मानतो व सदोदित माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो; कारण, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची सुवार्तेत भागी आहे. आणि माझी ही खातरी आहे की, ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत ते पूर्णतेस नेईल.
तुमच्यामधील सर्वांविषयी मी अशा प्रकारे विचार करणे मला योग्य आहे, कारण माझ्याबरोबर कृपेतील सहभागी म्हणून तुम्ही असल्यामुळे, माझ्या ह्या बंधनात, तसेच सुवार्तेविषयीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व जण माझ्या मनात आहा. देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे, आणि मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी, १०-११म्हणजे तुम्ही चांगल्या गोष्टी पसंत कराव्यात आणि ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत, तुम्ही देवाच्या गौरवासाठी व स्तुतीसाठी येशू ख्रिस्ताच्या योगे मिळणार्‍या नीतिमत्वाच्या फळांनी भरून, शुद्ध व कोणाला अडखळण न करणारे असे रहावे.

१२बंधूंनो, माझी इच्छा आहे की, आता माझ्यावर आलेल्या गोष्टी, खरोखर, सुवार्तेच्या प्रगतीसाठी आल्यात हे तुम्हाला विदित व्हावे. १३त्यामुळे ख्रिस्तामुळे माझ्या बेड्या आहेत हे सर्व वाड्यात आणि इतर सर्व ठिकाणी उघड झाले आहे; १४आणि माझ्या बेड्यांमुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत. १५काही, खरोखर, मत्सराने व कलहानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही सदिच्छेने करीत आहेत. १६दुसरे प्रीतीने करीत आहेत, कारण त्यांना माहीत आहे की,सुवार्तेविषयीच्या प्रत्युत्तरासाठी मी येथे नेमलेला आहे. १७पहिले मला माझ्या बेड्यांत दुःख द्यावे असे इच्छून,विरोधाने ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; शुद्ध मनाने करीत नाहीत.

१८मग काय झाले? काही नाही; पण एवढेच की, प्रत्येक प्रकारे, बहाण्याने किवा खरेपणाने ख्रिस्ताची घोषणा केली जात आहे; आणि ह्यात मी आनंद करतो; हो, आणि आनंद करीन. १९कारण मी जाणतो की, हे तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या साह्याने माझ्या सुटकेस कारणीभूत होईल. २०कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशातही लज्जित होऊ नये; पण नित्याप्रमाणे आतादेखील पूर्ण धैर्याने, माझ्या शरिरात, जीवनाद्वारे किवा मरणाद्वारे ख्रिस्ताला थोरवी दिली जावी. २१कारण मला जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. २२पण, मी देहात जिवंत राहिलो तर हे माझ्या कामाचे फळ आहे; तरीपण, मी काय निवडावे ह्याचे ज्ञान मला दिलेले नाही.
२३कारण मी दोहोंतल्या पेचात आहे; कारण मी जावे आणि ख्रिस्ताबरोबर रहावे ही माझी उत्कंठा आहे आणि ते अधिक चांगले आहे; २४तरीपण, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. २५ही माझी खातरी असल्यामुळे मी हे जाणतो की, मी राहणार आहे. हो, तुमच्या प्रगतीसाठी आणि विश्वासातल्या आनंदासाठी, मी तुमच्यातल्या सर्वांबरोबर राहणार आहे; २६म्हणजे ख्रिस्त येशूमधील माझ्याविषयीचा तुमचा अभिमान, माझे तुमच्याकडे पुन्हा येणे होऊन अधिक वाढावा.

२७मात्र तुम्ही तुमचे आचरण ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हाला भेटलो किवा मी दूर असलो, तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एका आत्म्यात स्थिर राहून सुवार्तेच्या विश्वासाकरता, एकजिवाने, एकजुटीने लढत आहा २८व तुम्हाला विरोध करणार्‍यांना तुम्ही कशातही भीत नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवाकडून आहे. २९कारण ख्रिस्ताकरता तुम्हाला हे दिले आहे की, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा एवढेच नाही, तर त्याच्याकरता तुम्ही सोसावे हेही आहे. ३०कारण तुम्ही माझ्या बाबतीत जे बघितले आहे व माझ्या बाबतीत आता ज्याविषयी ऐकत आहा तेच युद्ध तुमचेही आहे.

—–फिलिपै २—–

म्हणून ख्रिस्तात जर काही सांत्वन, काही प्रीतीचे उत्तेजन, काही आत्म्याची सहभागिता, काही कळवळा आणि दया ही आहेत, तर तीच प्रीती तुमच्यात असलेले तुम्ही त्या गोष्टींवर मन ठेवून एकजिवाचे व एकमनाचे होऊन माझा आनंद पूर्ण करा.

विरोधाने किवा खोट्या प्रौढीने तुम्ही काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे माना. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या गोष्टीच पाहू नयेत, पण प्रत्येकाने तशाच दुसर्‍यांच्या गोष्टी पहाव्यात.

ख्रिस्त येशूतही होते त्याप्रमाणे तुम्ही आपल्यात हे मन ठेवाः
तो दैवी स्वरूपात असता,
त्याने आपण देवासमान आहोत
हा लाभ मानला नाही,
पण स्वतः लीन होऊन
त्याने दासाचे स्वरूप स्वीकारले,
तो मानवी रूपात आणला गेला,
आणि मानव रूपात प्रगट होऊन
त्याने स्वतःला लीन केले,
आणि तो मरणापर्यंत –
वधस्तंभाच्या मरणापर्यंत –
आज्ञांकित झाला.
म्हणून त्याला देवानेदेखील
सर्वांहून उंच केले आहे.
आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव दिले आहे.  
१०म्हणजे स्वर्गातील, पृथ्वीवरील व पृथ्वीखालील
प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा,
११आणि येशू ख्रिस्त प्रभू आहे,
हे देव जो पिता त्याच्या गौरवासाठी
प्रत्येक जिभेने कबूल करावे.

१२तर माझ्या प्रियांनो, तुम्ही जसे केवळ माझ्या सहवासात नाही, पण निरंतर आज्ञापालन केले आहे, तसेच, पण आता माझ्या पश्चात्, अधिक भय धरून कापत कापत तुम्ही आपले तारण साधा. १३कारण तुम्ही इच्छा धरावी आणि कार्य करावे म्हणून देव स्वतःच्या सुयोजनेसाठी तुमच्यात कार्य करीत आहे.
१४तुम्ही कोणत्याही कुरकुरींशिवाय आणि वादांशिवाय सर्व करा; १५म्हणजे तुम्ही ह्या कुटिल आणि विपरीत पिढीत जीवनाचे वचन पुढे करून जगात ज्योतींसारखे प्रकाशताना, त्याच्यात देवाची निष्कलंक मुले म्हणून तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी व्हावे; १६म्हणजे मी व्यर्थ धावलो नाही किवा व्यर्थ श्रम केले नाहीत असे ख्रिस्ताच्या दिवशी मला अभिमानाला कारण मिळावे. १७हो, आणि म्हणून तुमच्या यज्ञात, म्हणजे ख्रिस्ताच्या सेवेत, माझे अर्पण होत असले, तरीही मी आनंदित होऊन तुमच्यामधील सर्वांबरोबर आनंद करतो; १८म्हणूनतुम्ही आनंदित व्हा आणि माझ्याबरोबर आनंद करा.

१९पण प्रभू येशूत मी आशा करतो की, लवकरच मला तिमथ्याला तुमच्याकडे धाडता येईल, म्हणजे, तुमची स्थिती मला कळेल तेव्हा माझे समाधान होईल. २०कारण तुमच्या स्थितीची स्वाभाविकपणे काळजी करील असा, त्याच्यासारख्या मनाचा दुसरा मनुष्य माझ्याजवळ नाही; २१कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात,ख्रिस्त येशूच्या पहात नाहीत. २२पण तुम्ही त्याचे प्रमाण हे जाणता की, मुलगा बापाबरोबर सेवा करतो, तशी त्याने माझ्याबरोबर सुवार्तेसाठी सेवा केली. २३मी आशा करतो की, माझे काय होईल ते दिसून येताच, मला त्याला लगेच तुमच्याकडे धाडता येईल.
२४पण मीही स्वतः लवकरच येईन अशी प्रभूमध्ये मला खातरी आहे.

२५तरी मला माझा बंधू, आणि जोडीदार-कामकरी व जोडीदार-सैनिक, पण तुमचा जासूद, आणि माझ्या गरजांत माझी सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे धाडणे आवश्यक वाटले. २६कारण तुमची उत्कंठा लागून तो अस्वस्थ झाला होता; कारण तो आजारी झाला होता हे तुम्ही ऐकले होते. २७तो खरोखर, मरणास पोहोचल्याप्रमाणे आजारी होता पण देवाने त्याच्यावर दया केली, आणि केवळ त्याच्यावर नाही, पण माझ्यावरही केली; नाहीतर, मला दुःखावर दुःख झाले असते. २८म्हणून, अधिक घाई करून, मी त्याला धाडीत आहे; म्हणजे त्याला पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा, आणि मी कमी दुःखी व्हावे. २९म्हणून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा. अशा माणसांना आदरणीय माना. ३०कारण माझ्या सेवेत तुमच्याकडून जे कमी झाले ते पुरे करण्यास, तो ख्रिस्ताच्या कामासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून मरणापर्यंत पोहोचला होता.   

—————————
२:६-११ मूळ ग्रीक भाषेत हे एक गीत असावे

 

—–फिलिपै ३—–

आणि शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हाला पुन्हा त्याच गोष्टी लिहिणे हे मला कंटाळवाणे नाही, पण तुमच्या स्थैर्यासाठी आहे.
कुत्र्यांपासून सावध रहा. दुष्ट कामकर्‍यांपासून सावध रहा. देहविच्छेदन करणार्‍यांपासून सावध रहा. कारण आपण जे आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूत अभिमान मिरवतो, आणि देहावर भाव ठेवीत नाही ते आपण सुनत झालेले आहोत.
तरी मलाही देहावर भाव ठेवता येईल. देहावर भाव ठेवता येण्यास आपल्याजवळ काही आहे असे कोणाला वाटत असेल तर मला त्यापेक्षा अधिक वाटावे. मी आठव्या दिवशी सुनत झालेला, इस्राएलाच्या संतानातला,बन्यामिनाच्या वंशातला, इब्र्यांतला इब्री आहे; नियमशास्त्राच्या बाबतीत परोशी; ईर्ष्येच्या बाबतीत मी मंडळीचा छळ करणारा; आणि नियमशास्त्रातील नीतिमत्वाच्या बाबतीत निर्दोष.

पण मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्ताकरता हानीच्या मानल्या. हो, निःसंशय, आणि ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानामुळे मी सर्व गोष्टी हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली. आणि मी त्या केरकचरा लेखतो, ते ह्यासाठी की, मी ख्रिस्त येशू हा लाभ मिळवावा. आणि नियमशास्त्राच्या योगे मिळणारे स्वतःचे नीतिमत्व माझ्यात असावे असे नाही, पण ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्व माझ्यात असून मी त्याच्यात आहे असे आढळून यावे. १०म्हणजे त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मला त्याचे आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांत सहभागी होण्याचे ज्ञान व्हावे. ११म्हणजे शक्य त्यायोगे मेलेल्यांतून पुन्हा उठणे माझे व्हावे.
१२मी आताच जणू मिळवले आहे किवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठीच ख्रिस्त येशूकडून हस्तगत झालो ते मला मिळवता आल्यास मी मिळवावे म्हणून मी मागे लागलो आहे. १३बंधूंनो, मी ते मिळवलेच आहे असे मानीत नाही, पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून, १४ख्रिस्त येशूच्या द्वारे झालेल्या, देवाच्या वरच्या पाचारणाच्या बक्षिसासाठी मी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे धावतो.
१५म्हणून आपण जे प्रौढ आहोत ते अशा मनाचे होऊ या, आणि तुम्ही कदाचित्, कशात निराळ्या मनाचे झालात तर देव तुम्हाला तेही प्रकट करील. १६म्हणून आपण येथवर आलो तसेच पुढे नीट चालू या.

१७बंधूंनो, तुम्ही एकजुटीने माझे अनुकरण करणारे व्हा, आणि आम्ही तुम्हाला उदाहरण झालो तसे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष लावून पहा; (१८कारण मी तुम्हाला, पुष्कळ वेळा, ज्यांच्याविषयी सांगत आलो,आणि आता अश्रू गाळूनही, ज्यांच्याविषयी सांगत आहे, असे कित्येक असे चालत आहेत की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. १९त्यांचा शेवट नाश आहे, त्यांचा देव पोट आहे, त्यांच्या लज्जेत त्यांचे गौरव आहे, ते पार्थिव गोष्टींचा विचार करतात.)

२०कारण आपले नागरिकत्व स्वर्गात आहे; तेथून आपण तारणार्‍याची,  म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची प्रतीक्षाही करीत आहो. २१तो ज्या कृतीने सर्व गोष्टी स्वतःला आज्ञांकित करण्यास समर्थ आहे, त्याच कृतीने तो आपले, दीन अवस्थेतील शरीर त्याच्या गौरवी शरिरासारखे व्हावे म्हणून ते पालटून टाकील.

—–फिलिपै ४—–

म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुगुट आहा; म्हणून माझ्या प्रियांनो, प्रभूमध्ये स्थिर राहा.
मी युवदियेला विनंती करतो, आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही एकमनाच्या व्हा. आणि माझ्या खर्‍या जोडीतल्या साथी, तुला पण मी विनंती करतो की, तू ह्या स्त्रियांचे साह्य कर. कारण त्यांनी माझ्या बाजूने क्लेमेंतबरोबर आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत अशा माझ्या जोडीदार-कामकर्‍यांबरोबर सुवार्तेत सहकार्य केले आहे.
तुम्ही सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा. सर्व लोकांना तुमची सहनशीलता कळू द्या; प्रभू हाताजवळ आहे.
कशाचीही काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनवणी करून, सर्व गोष्टींत उपकारस्मरण करून, आपल्या मागण्या देवाला कळवा. आणि सर्व बुद्धीच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमची मने ख्रिस्त येशूच्या द्वारे राखील.
शेवटी बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जर काही गुण असेल, जर काही प्रशंसा असेल तर ह्या गोष्टींवर विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही शिकला, तुम्ही स्वीकारल्या आणि ऐकल्या व माझ्यात बघितल्या त्या तुम्ही करीत रहा, आणि शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.

१०पण तुमची माझ्याविषयीची काळजी आता पुन्हा प्रगट झाल्यामुळे मी प्रभूमध्ये फार आनंदित झालो. तुम्ही ह्यात काळजी करीतही होता, पण तुम्हाला संधी नव्हती. ११मी माझ्या गरजेविषयी हे बोलत आहे असे नाही,कारण, मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. १२दीन अवस्थेत कसे रहावे हे मी जाणतो, आणि विपुलतेत कसे रहावे हेही मी जाणतो; कसेही व कोणत्याही परिस्थितीत, तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे. १३आणि जो मला बळ देतो त्या ख्रिस्तामुळे मी सर्व गोष्टी करू शकतो.
१४पण माझ्या दुःखांत तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत. १५आता, फिलिपैकर, तुम्ही जाणता की, सुवार्तेच्या प्रथमारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्या देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही. १६कारण थेसलनिकेतसुद्धा तुम्ही एकदा व दुसर्‍यांदाही माझ्या गरजेसाठी धाडले. १७मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही, पण तुमच्या हिशोबात जमा होईल अशा फळाची अपेक्षा करतो.
१८पण माझ्याजवळ सर्व आहे आणि विपुल आहे, आणि तुम्ही पाठविलेत ते एपफ्रदीतकडून मला मिळाल्याने माझा पुरवठा झाला आहे. ते जणू सुवासिक सुगंध असे देवाला मान्य व संतोष देणारे अर्पण आहे. १९पण माझा देव ख्रिस्त येशूत असलेल्या, त्याच्या धनाच्या परिमाणानुसार,  तुमची सगळी गरज गौरवाने पुरवील. २०आता देव जो आपला पिता त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.

२१ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम द्या, माझ्याबरोबर असलेले बंधू तुम्हाला सलाम पाठवीत आहेत. २२इकडील सर्व पवित्र जन, आणि विशेषतः कैसराच्या परिवारात आहेत ते, तुम्हाला सलाम पाठवीत आहेत.
२३आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s