Revelation 1-5

संत योहानाला झालेले प्रकटीकरण

—–प्रकटी १—–

येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरणः देवाने हे त्याला ज्या गोष्टी लवकरच झाल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दाखविण्यासाठी दिले, आणि त्याने आपल्या दूताला पाठवून, त्याच्या द्वारे, ते आपला दास योहान ह्याला प्रकट केले. त्याने देवाच्या वचनाविषयी, आणि येशूच्या साक्षीविषयी, म्हणजे स्वतः बघितलेल्या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली आहे. ह्या संदेशाची वचने वाचणारा, ती ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी करणारे धन्य होत, कारण काळ जवळ आला आहे.

योहानाकडून;
आसियात असलेल्या सात मंडळ्यांसः
जो आहे, होता आणि येणार आहे त्याच्याकडून, त्याच्या राजासनापुढील सात आत्म्यांकडून, आणि, जो विश्वासू साक्षी, मेलेल्यांतून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीच्या राजांचा अधिपती आहे त्या येशू ख्रिस्ताकडून कृपा व शांती.
जो आपल्यावर प्रीती करतो व ज्याने त्याच्या स्वतःच्या रक्ताने आपल्याला आपल्या पापांतून सोडवले, आणि आपल्याला त्याच्या देवपित्यासाठी एक राज्य आणि याजक केले, त्याला गौरव आणि सत्ता युगानुयुग असोत. आमेन.
बघा, तो ढगांबरोबर येत आहे! प्रत्येक डोळा त्याला पाहील, आणि ज्यांनी त्याला विंधले होते तेही पाहतील;आणि पृथ्वीवर सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. हो, हे होईल. आमेन.
परमेश्वर देव, जो आहे, होता व येणार आहे, जो सर्वसमर्थ आहे, तो म्हणतो,
मी आल्फा आणि ओमेगा आहे.

मी तुमचा बंधू व येशूच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी योहान, देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे पात्म नावाच्या बेटावर आलो. १०प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचरलो, आणि, मी माझ्या मागे कर्ण्याच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला. ११आणि तो म्हणाला,
तू जे पहात आहेस ते एका पुस्तकात लिही; आणि ते आसियातील इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतिरा, सार्दिस,फिलदेलफिया आणि लावदिकिया येथील सात मंडळ्यांना धाड.
१२आणि माझ्याशी बोलणार्‍या आवाजाकडे पहायला मी मागे फिरलो, आणि मागे फिरताच बघितले की, माझ्यासमोर सात सोन्याच्या समया १३व त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ झगा परिधान केलेला व छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला कोणीएक होता. १४त्याचे मस्तक व त्याचे केस बर्फाप्रमाणे पांढर्‍या असलेल्या लोकरीसारखे पांढरे होते, आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. १५त्याचे पाय सोनपितळेसारखे असून भट्टीत असल्यासारखे धगधगत होते; आणि त्याचा आवाज पुष्कळ प्रवाहांच्या आवाजासारखा होता. १६त्याच्या उजव्या हातात सात तारे होते व त्याच्या तोंडामधून एक धारदार दुधारी तरवार निघाली. सूर्य आपल्या बळाने तळपतो तशी त्याची मुद्रा होती.
१७आणि मी त्याला बघितले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांपुढे पडलो तेव्हा त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवला व मला म्हटले,
भिऊ नको, मी पहिला आणि शेवटला आहे. १८मी जिवंत राहणारा आहे; मी मृत झालो होतो, आणि बघा, मी युगानुयुग जिवंत आहे. आणि माझ्याजवळ मृत्यूच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या दिल्या आहेत. १९तू ह्या ज्या गोष्टी बघितल्यास, ज्या आहेत, आणि ज्या पुढे होणार आहेत त्या लिही.
२०तू माझ्या उजव्या हातात जे सात तारे बघितलेस आणि ज्या सात सोन्याच्या समया बघितल्यास त्यांचं रहस्य हे आहेः ते सात तारे त्या सात मंडळ्यांचे देवदूत आहेत, आणि तू बघितलेल्या सात समया ह्या त्या सात मंडळ्या आहेत.  

—–प्रकटी २—–

इफिसमधील मंडळीच्या देवदूताला लिहीः
ज्याने आपल्या हातात सात तारे घेतले आहेत, आणि सात सोन्याच्या समयांमधून जो फिरत आहे तो हे म्हणतोः
तुझी कामे, तुझे श्रम आणि धीर, मी जाणतो; आणि मला माहीत आहे की, दुष्ट लोक तुला सोसवत नाहीत; आणि जे स्वतःला प्रेषित म्हणवतात, पण जे नाहीत, त्यांची तू परीक्षा केली असून ते लबाड आहेत हे तुला दिसले आहे. तुझ्यात धीर आहे. तू माझ्या नावाकरता सोसलेस आणि तू खचली नाहीस.
तरी माझ्याजवळ तुझ्याविरुद्ध काही आहे. कारण, तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. म्हणून, तू कोठून पडलीस ह्याची आठवण कर, पश्चात्ताप कर आणि तुझी पहिली कामे कर. नाहीतर, मी लवकर येईन, आणि तू पश्चात्ताप केला नाहीस, तर तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढीन.
पण तुझ्याजवळ हे आहेः तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतेस, आणि मीही त्यांचा द्वेष करतो.
आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको.
जो विजय मिळवतो त्याला मी देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडावरून खायला देईन.  

आणि स्मुर्णामधील मंडळीच्या देवदूताला लिहीः
जो पहिला आणि शेवटला आहे, मृत झाला होता आणि जिवंत आहे तो हे म्हणतोः
मी तुझे दुःख आणि दारिद्य्र जाणतो, पण तू सधन आहेस. आणि जे म्हणतात आम्ही यहुदी आहोत, आणि जे नाहीत, पण सैतानाचे सभास्थान आहेत अशा लोकांचे दुर्भाषण मी जाणतो. १०तू जे जे सोसशील त्यांतल्या कशालाच भिऊ नको; पण तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यामधील कित्येकांना तुरुंगातील टाकील; आणि तुमचा दहा दिवस छळ होईल. तू मरणापर्यंत विश्वासू रहा, आणि मी तुला जीवनाचा मुगुट देईन.
११आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको.
जो विजय मिळवतो त्याला दुसरे मरण अपाय करणार नाही.

१२आणि पर्गममधील मंडळीच्या देवदूताला लिहीः
ज्याच्याजवळ धारदार दुधारी तरवार आहे तो हे म्हणतोः
१३तू कोठे रहात आहेस हे मी जाणतो; जेथे सैतानाचे आसन आहे तेथे; आणि माझे नाव तू बळकट धरले आहेस; आणि जेथे सैतान राहतो तेथे तुमच्यात माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिपा हा ज्या दिवसांत मारला गेला,तेव्हादेखील तू माझा विश्वास नाकारला नाहीस.
१४पण तुझ्याविरुद्ध माझ्याजवळ काही गोष्टी आहेत. कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व जारकर्म करणे, हा अडथळा इस्राएलाच्या वंशजांपुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकवले, त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.
१५आणि तशीच निकलाइतांची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असेही लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. १६पश्चात्ताप कर; नाहीतर, मी तुझ्याकडे लवकर येईन आणि माझ्या तोंडातील तरवारीने मी त्यांच्याशी लढाई करीन.
१७आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको.
जो विजय मिळवतो त्याला मी गुप्त ठेवलेल्या मान्*यातून खायला देईन, आणि एक पांढरा खडा देईन; त्या खड्यावर एक नवे नाव लिहिलेले असेल, आणि ते तो घेणार्‍याशिवाय दुसर्‍या कोणाला कळणार नाही.

१८आणि थुवतिरामधील मंडळीच्या देवदूताला लिहीः
ज्याचे डोळे अग्नीसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोनपितळेसारखे आहेत तो देवाचा पुत्र हे म्हणतोः
१९मी तुझी कामे, तुझी प्रीती आणि विश्वास, सेवा आणि धीर जाणतो, आणि तुझी शेवटली कामे पहिल्यांपेक्षा अधिक आहेत हेही जाणतो.
२०पण माझ्याजवळ तुझ्याविरुद्ध हे आहेः इजबेल ही जी स्त्री आपल्या स्वतःला संदेष्ट्री म्हणवते तिला तू माझ्या दासांना जारकर्म करायला आणि मूर्तींना वाहिलेली अर्पणे खायला शिकवू देतेस आणि भुलवू देतेस. २१मी तिला पश्चात्ताप करायला काळ दिला आहे, पण ती आपल्या जारकर्माचा पश्चात्ताप करू इच्छीत नाही. २२पण मी तिला खाटल्यावर पाडीन आणि जे तिच्याशी व्यभिचार करतात ते तिची कृत्ये सोडून पश्चात्ताप करणार नाहीत, तर मी त्यांना मोठ्या संकटात पाडीन. २३मी तिच्या मुलांना मरीने ठार मारीन, आणि सर्व मंडळ्यांना हे कळेल की, मने व अंतःकरणे जाणणारा मी आहे. आणि मी तुमच्या कामांप्रमाणे तुमच्यामधील प्रत्येकाला देईन.
२४पण ज्या तुम्ही ते शिक्षण घेतले नाही व ज्यांना सैतानाची गुजे म्हणतात ती ज्या तुम्हाला कळलेली नाहीत, असे थुवतिरामधील तुम्ही जे इतर आहा, त्या तुम्हाला मी सांगतो की, मी तुमच्यावर दुसरा भार घालणार नाही. २५पण तुमच्याजवळ जे आता आहे ते मी येईपर्यंत बळकट धरा.
२६जो विजय मिळवतो आणि शेवटपर्यंत काम करतो त्याला माझ्या पित्याकडून मला मिळाल्याप्रमाणे मी राष्ट्रांवर अधिकार देईन. २७तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार चालवील आणि कुंभाराच्या मडक्याप्रमाणे त्यांच्या ठिकर्‍या पडतील. २८मी त्याला प्रभाततारा देईन.
२९आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको.    

—–प्रकटी ३—–

आणि सार्दिसमधील मंडळीच्या देवदूताला लिहीः
ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे, आणि सात तारे आहेत तो हे म्हणतोः   
मी तुझी कामे जाणतो; तू जिवंत आहेस असे नाव तुला मिळाले आहे, पण तू मृत आहेस; म्हणून जागृत रहा, आणि ज्या राहिलेल्या गोष्टी मरायला टेकल्यात त्या सावरून धर, कारण मला तुझी कामे माझ्या देवासमोर पूर्ण झालेली आढळली नाहीत. ह्यासाठी तू कसे स्वीकारलेस आणि कसे ऐकलेस ह्याची आठवण कर; ते बळकट धर आणि पश्चात्ताप कर. जर तू जागृत राहिली नाहीस, तर मी चोरासारखा तुझ्यावर येईन, आणि कोणत्या घटकेस मी तुझ्यावर येईन हे तुला समजणार नाही.
तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळवली नाहीत अशी थोडी नावे सार्दिसमध्ये तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्रांत माझ्याबरोबर चालतील, कारण ते लायक आहेत.
जो विजय मिळवतो त्याला अशा प्रकारे शुभ्र वस्त्रे पेहरवली जातील; त्याचे नाव मी जीवनाच्या पुस्तकातून खोडणार नाही; पण पित्यासमोर आणि देवदूतांसमोर मी त्याचे नाव पतकरीन.
आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको.

आणि फिलदेलफियामधील मंडळीच्या देवदूताला लिहीः
जो पवित्र आहे, जो खरा आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी मनुष्य बंद करीत नाही, आणि जो बंद करतो आणि कोणी मनुष्य उघडीत नाही तो हे म्हणतोः
मी तुझी कामे जाणतो; पण, मी तुझ्यापुढे एक उघडलेले दार ठेवले आहे. कोणीही मनुष्य ते बंद करू शकणार नाही. कारण तुझी शक्ती थोडी आहे, तू माझे वचन पाळले आहेस आणि माझे नाव नाकारले नाहीस. बघ,सैतानाच्या सभास्थानातील जे लोक आपण यहुदी आहोत असे म्हणतात, जे नाहीत पण लबाडी करतात,त्यांच्यातले काही मी तुला देतो. बघ, मी त्यांना तुझ्याकडे यायला आणि तुझ्या पायांपुढे नमन करायला लावीन, आणि मी तुझ्यावर प्रीती केली हे ओळखायला लावीन. १०तू माझ्या धीराचे वचन राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍यांची परीक्षा करायला जो परीक्षेचा प्रसंग सार्‍या जगावर येणार आहे त्यापासून मीही तुला राखीन. ११मी लवकर येतो. तुझा मुगुट कोणी तुझ्याकडून घेऊ नये म्हणून तुझ्याजवळ आहे ते बळकट धर.
१२जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरात स्तंभ करीन; आणि तो कधीही बाहेर जाणार नाही. मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, आणि माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणार्‍या नव्या यरुशलेमचे, माझ्या देवाच्या नगरीचे नाव, आणि माझे नवे नाव लिहीन.
१३आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको.

१४आणि लावदिकियाच्या मंडळीच्या देवदूताला लिहीः
जो आमेन, जो विश्वासू आणि खरा साक्षी, जो देवाच्या उत्पत्तीचा उगम आहे तो हे म्हणतोः
१५मी तुझी कामे जाणतो; तू थंड नाहीस किवा गरम नाहीस; तू थंड किवा गरम असतीस तर बरे झाले असते. १६पण तू कोमट आहेस, थंड किवा गरम नाहीस म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकीन. १७कारण तू म्हणतेस, मी सधन आहे, आणि संपन्न झाले आहे; आणि मला कशाची गरज नाही. पण तू कष्टी, लाचार आणि दरिद्री, अंधळी आणि उघडी आहेस हे तू जाणत नाहीस. १८म्हणून मी तुला मसलत देतो की, तुला संपन्न होता यावे म्हणून तू माझ्याकडून अग्नीत शुद्ध केलेले सोने विकत घे. तुझ्या नग्नतेची लज्जा दिसू नये म्हणून तुला पेहरायला शुभ्र वस्त्रे घे, आणि तुला दिसावे म्हणून तुझ्या डोळ्यांत घालायला अंजन घे.
१९मी जितक्यांवर प्रीती करतो तितक्यांना मी दोष लावतो आणि शासन करतो; म्हणून ईर्ष्या धर आणि पश्चात्ताप कर.
२०बघ, मी दाराशी उभा आहे आणि ठोकीत आहे. कोणी मनुष्य जर माझा आवाज ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याकडे आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.
२१जसा मी स्वतः विजय मिळवला, आणि मला माझ्या पित्याच्या राजासनावर त्याच्याबरोबर बसविले आहे,तसा जो विजय मिळवील त्याला मी माझ्या राजानसावर माझ्याबरोबर बसू देईन.
२२आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको.  

—–प्रकटी ४—–

मग मी बघितले आणि बघा, स्वर्गात एक उघडलेले दार होते, आणि माझ्याशी बोलणारा जो कर्ण्यासारखा आवाज मी प्रथम ऐकला होता तो म्हणाला,

 इकडे वर ये, आणि ज्या गोष्टी ह्यापुढं झाल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन.
मी लगेच आत्म्यात संचरलो, आणि बघा, स्वर्गात एक राजासन ठेवलेले होते व राजासनावर एक बसला होता. आणि जो बसला होता तो हिर्‍यासारखा व माणकाच्या खड्यासारखा दिसत होता; त्या राजासनाच्या सभोवताली एक मेघधनुष्य होते; ते दिसण्यात पाचूसारखे होते. आणि राजासनाच्या सभोवताली चोवीस आसने व आसनांवर चोवीस वडील बसले होते हे मी बघितले. त्यांनी शुभ्र वस्त्रे पेहरली होती आणि त्यांच्या डोक्यांवर सोन्याचे मुगुट होते आणि त्या राजासनातून विजांचे लखलखाट, आवाज व गडगडाट निघत होते. आणि राजासनासमोर अग्नीचे सात दिवे जळत होते; ते देवाचे सात आत्मे आहेत. आणि राजासनासमोर जणू काचेचा, स्फटिकासारखा समुद्र होता. राजासनाच्या मध्यभागी आणि राजासनाच्या सभोवताली चार प्राणी होते; ते मागून पुढून डोळ्यांनी पूर्ण भरलेले होते. पहिला प्राणी सिहासारखा आणि दुसरा प्राणी गोर्‍ह्यासारखा होता; तिसर्‍या प्राण्याला मनुष्यासारखे तोंड होते, आणि चौथा प्राणी उडणार्‍या गरुडासारखा होता. त्या चार प्राण्यांना प्रत्येकी सहा पंख होते; ते सभोवताली आणि आतून डोळ्यांनी पूर्ण भरलेले होते. ते अहर्निश, विसावा न घेता, म्हणतात की,
 पवित्र, पवित्र, पवित्र,  
  जो होता, आहे आणि येणार आहे,
तो सर्वसमर्थ परमेश्वर देव.
आणि राजासनावर जो बसला असून युगानुयुग जिवंत आहे त्याला जेव्हा ते चार प्राणी गौरव, मान आणि धन्यवाद देतात, १०तेव्हा तेव्हा, ते चोवीस वडील राजासनावर जो बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात, आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्याला नमन करतात, आणि आपले मुगुट राजासनापुढे ठेवून म्हणतात,
  ११हे परमेश्वरा, आमच्या देवा,
  तू गौरव, मान आणि सत्ता घेण्यास  योग्य आहेस;
  कारण तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास,
  त्या तुझ्या इच्छेने अस्तित्वात आल्या
  आणि उत्पन्न केल्या गेल्या आहेत.  

—–प्रकटी ५—–

आणि जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी बघितली. ती आतून बाहेरून लिहिलेली होती व सात शिक्के लावून बंद केलेली होती. आणि मला एक बलवान देवदूत दिसला. तो मोठ्या आवाजात पुकारीत होताः ही गुंडाळी उघडायला आणि हिचे शिक्के फोडायला कोण लायक आहे?’
आणि ती गुंडाळी उघडू शकेल किवा तिच्याकडे पाहू शकेल असा कोणी स्वर्गात किवा पृथ्वीवर, किवा पृथ्वीच्या खालीही नव्हता. आणि ती गुंडाळी उघडायला किवा तिच्याकडे पाहायला योग्य असलेला कोणी सापडला नाही तेव्हा मी फार रडलो. तेव्हा वडिलांतला कोणीएक मला म्हणतो,
रडू नकोस; बघ, यहुदाच्या वंशातला सिह आणि दाविदाचा अंकुर हा ती गुंडाळी आणि तिचे सात शिक्के उघडायला विजयी झाला आहे.
आणि राजासनाच्या व चार प्राण्यांच्या मध्यभागी आणि वडिलांच्या मध्यभागी उभा असलेला, एक जणू वधलेला कोकरा मी बघितला. त्याला सात शिंगे व सात डोकी होती. ते संपूर्ण पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे आहेत. तो गेला, आणि त्याने जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
आणि त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील कोकर्‍यापुढे पालथे पडले. त्यांच्यातील प्रत्येकाजवळ वीणा होत्या व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या पवित्र जनांच्या प्रार्थना होत्या. ते एक नवे गीत गात होते आणि म्हणत होतेः
 तू ही गुंडाळी घ्यायला
  आणि तिचे शिक्के उघडायला योग्य आहेस;
  कारण तू वधला गेला होतास,
  आणि तू आपल्या रक्ताने प्रत्येक वंशामधून,
  प्रत्येक भाषा बोलणार्‍यांमधून,
समाजामधून आणि राष्ट्रामधून
  देवासाठी लोक विकत घेतले आहेस.
  १०त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य
  आणि याजक केले आहेस,
  आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.
११आणि मी बघितले, आणि राजासनाच्या व त्या प्राण्यांच्या, आणि वडिलांच्या सभोवताली मी पुष्कळ देवदूतांचा आवाज ऐकला. त्यांची संख्या अयुतायुत आणि सहस्रांच्या सहस्रपट होती. १२ते मोठ्या आवाजात म्हणत होतेः
वधलेला कोकरा हा सत्ता, धन,
  सुज्ञता आणि बळ,
  मान, गौरव आणि धन्यवाद
  घ्यायला योग्य आहे.
१३आणि मी ऐकले की, स्वर्गातील व पृथ्वीवरील, पृथ्वीखालील व समुद्रातील सर्व सृष्ट जीव आणि त्यातील सर्व म्हणत होतेः
 राजासनावर बसणार्‍याला आणि कोकर्‍याला
  धन्यवाद, मान, गौरव आणि सत्ता
  युगानुयुग आहेत.
१४तेव्हा ते चार प्राणी आमेन म्हणाले, आणि वडील पालथे पडले व त्यांनी नमन केले. 

4 responses to “Revelation 1-5

  1. Rakesh Raghunath Wagh

    Please pray for my family.

  2. sainath rajguru

    Please will you send Navi Mumbai churches’ addresses?

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s