Revelation 11-15

संत योहानाला झालेले प्रकटीकरण

 —–प्रकटी ११—–

मग मला कोणीतरी एक काठीसारखा बोरू दिला, आणि मला म्हटले,
ऊठ, आणि देवाच्या मंदिराचं आणि वेदीचं, आणि त्यात जे उपासना करतात त्यांचं मोजमाप घे; पण मंदिराबाहेरचं अंगण सोड, त्याचं मोजमाप घेऊ नकोस; कारण ते परजनांना देण्यात आलं आहे आणि ते हे पवित्र नगर, बेचाळीस महिने आपल्या पायांखाली तुडवतील. आणि मी माझ्या दोन साक्षींना अधिकार देईन; आणि ते तरट पेहरून, एक हजार दोनशे साठ दिवस संदेश देतील.
पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारे दोन जैतून आणि दोन दीपवृक्ष हेच आहेत. आणि त्यांना कोणी अपाय करू इच्छीत असल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघतो आणि त्यांच्या वैर्‍यांना गिळून घेतो आणि जर कोणी मनुष्य त्यांना अपाय करू इच्छील तर तो अशा प्रकारे मारला जाणे आवश्यक आहे. त्यांच्या संदेशाच्या दिवसांत पाऊस पडू नये म्हणून त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार आहे. त्यांना सर्व जलाशयांवर त्यांचे रक्त करायचा अधिकार, आणि पृथ्वीवर, त्यांना वाटेल तितक्या वेळा, सर्व प्रकारच्या पीडा आणून प्रहार करायचा अधिकार आहे.
त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील. आणि ज्याला, आत्मिक दृष्ट्या, सदोम आणि मिसर म्हटले आहे व जेथे त्याच्या प्रभूलाही वधस्तंभावर खिळले होते त्या मोठ्या नगराच्या रस्त्यात त्यांची प्रेते पडतील. आणि निरनिराळ्या समाजांतले, निरनिराळ्या वंशांतले, निरनिराळ्या भाषा बोलणार्‍यांतले व निरनिराळ्या राष्ट्रांतले लोक साडेतीन दिवस त्यांची प्रेते पाहतील, आणि ते त्यांची प्रेते थडग्यांत ठेवू देणार नाहीत. १०आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद करतील, उत्सव करतील आणि एकमेकांना देणग्या देतील. कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणार्‍यांस पीडले होते.
११आणि साडेतीन दिवसांनंतर त्यांच्या देवाकडून जीवनाचा आत्मा आला, आणि ते आपल्या पायांवर उभे राहिले; आणि त्यांना पाहणार्‍यांवर मोठी दहशत पडली. १२आणि त्यांनी स्वर्गातून एक मोठा आवाज ऐकला, तो त्यांना म्हणाला, इकडे वर या. आणि ते एका ढगातून स्वर्गात वर गेले आणि त्यांच्या वैर्‍यांनी त्यांना पाहिले.
१३आणि त्याच घटकेस मोठा भूकंप झाला; तेव्हा नगराचा दहावा भाग पडला, आणि भूकंपात सात हजार लोक ठार झाले तेव्हा बाकीचे भयभीत झाले व त्यांनी स्वर्गीच्या देवाला गौरव दिले.
१४दुसरी आपत्ती येऊन गेली; बघा, तिसरी आपत्ती लवकरच येत आहे.
१५मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठे आवाज उमटले; त्यांचे शब्द असे होतेः
 जगाचं राज्य हे आपल्या प्रभूचं,
  आणि त्याच्या ख्रिस्ताचं झालं आहे;
  तो युगानुयुग राज्य करील.
१६तेव्हा देवासमोर आपआपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील आपल्या तोंडावर पडले आणि त्यांनी देवाला नमन करून १७म्हटले,
 सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा,
तू जो आहेस आणि होतास
  त्या तुझे आम्ही उपकार मानतो,
  कारण तुझी महान सत्ता
तू आपल्याकडे घेतली आहेस
  आणि तू राज्य चालवीत आहेस;
  १८राष्ट्रं खवळली आहेत
आणि तुझा कोप प्रगट झाला आहे
  आणि असा काळ आला आहे की,
  मृतांचा न्याय केला जावा,
  आणि तू आपल्या दासांना,
तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्र जनांना
  आणि जे तुझ्या नावाचं भय धरतात
  अशा लहानथोरांना प्रतिफळ द्यावंस,
  आणि जे पृथ्वीचा नाश करतात
त्यांना नष्ट करावंस.
१९तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडले आणि त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दिसला; आणि विजांचे लखलखाट, आवाज आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांची मोठी वृष्टी झाली.  

—–प्रकटी १२—–

आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायांखाली चंद्र होता, आणि तिच्या डोक्यावर बारा तार्‍यांचा मुगुट होता. ती गरोदर असल्यामुळे तिला वेणा येत असता आणि प्रसवायला क्लेश होत असता ती ओरडत होती.
आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. बघा, एक मोठा, लाल अजगर; त्याला सात डोकी व दहा शिगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुगुट होते. आणि त्याच्या शेपटाने आकाशातील एकतृतीयांश तारे खाली ओढले आणि पृथ्वीवर पाडले; आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला. आणि सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला. त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले. आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिच एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.
आणि स्वर्गात युद्ध झाले. मिखाएल व त्याचे दूत हे अजगराविरुद्ध लढले, आणि अजगर व त्याचे दूत लढले. पण ते प्रबळ झाले नाहीत, आणि त्यापुढे स्वर्गात त्यांचे स्थान आढळले नाही. ९आणि तो मोठा अजगर, तो पुरातन सर्प, म्हणजे ज्याला दियाबल म्हणतात, तो सगळ्या जगाला फसविणारा सैतान बाहेर टाकला गेला.तो पृथ्वीवर टाकला गेला आणि त्याच्याबरोबर त्याचे दूतही टाकले गेले.
१०आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला; त्याचे शब्द असे होतेः
 आता आमच्या देवाचं तारण,
  आणि सामर्थ्य आणि राज्य आलं आहे.  
  आणि त्याच्या ख्रिस्ताची सत्ता आली आहे.
  कारण आमच्या बांधवांवर आरोप करणारा,
  जो आमच्या देवापुढं स्वर्गात
  त्यांच्यावर आरोप करीत असे,
  तो खाली लोटला गेला आहे.
  ११त्यांनी कोकर्‍याच्या रक्ताद्वारे,
  आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे,
  त्याच्यावर विजय मिळवला आहे.
आणि त्यांनी मरणापर्यंत
  आपल्या जिवावर प्रीती केली नाही.
१२म्हणून स्वर्गांनो,
  आणि त्यांत वसती करणार्‍यांनो,
  आनंद करा.
  पृथ्वीवर आणि समुद्रात राहणार्‍यांस हळहळ!
  कारण सैतान खाली तुमच्याकडे
  मोठ्या रागानं आला आहे.
  कारण त्याला केवळ अल्पकाळ राहिला आहे,
  हे तो जाणतो.
१३आणि अजगराने बघितले की, त्याला पृथ्वीवर टाकण्यात आले आहे, तेव्हा जिने एक पुरुष जन्मास आणला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला. १४आणि स्त्रीने तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले. आणि तेथे, तिचे सर्पाच्या तोंडापुढून एकीकडे, एक काळ, दोन काळ,आणि अर्धा काळ पोषण केले जाईल. १५आणि ती स्त्री पाण्यात वाहून जाईल असे करावे म्हणून, त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. १६पण पृथ्वीने स्त्रीला साह्य केले; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी पृथ्वीने तोंड उघडून गिळून घेतली.
१७तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून अवशेष राहिलेले देवाच्या आज्ञा पाळीत होते आणि येशूची साक्ष देत होते त्यांच्याशी लढाई करायला गेला; आणि समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.  

—–प्रकटी १३—–

आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुगुट होते व त्याच्या डोक्यांवर देवनिदात्मक नावे होती.
आणि मी पाहिलेला पशू जणू चित्त्यासारखा होता, त्याचे पाय अस्वलासारखे व तोंड सिंहासारखे होते. त्याला अजगराने आपली सत्ता दिली, आणि आसन दिले आणि मोठा अधिकार दिला.
आणि त्याला मरण यावे, अशा प्रकारे, त्याचे एक डोके घायाळ झाले होते, पण त्याचा प्राणांतिक घाव बरा झाला, आणि सर्व पृथ्वी वाहवा करीत त्याच्यामागे गेली.
आणि त्यांनी अजगराला नमन केल, कारण त्याने आपली सत्ता त्या पशूला दिली; आणि त्यांनी त्या पशूलाही नमन करून म्हटले, ह्या पशूसारखा कोण आहे? ह्याच्याशी कोण लढू शकेल?’ आणि, त्याला मोठ्या गोष्टी व दुर्भाषणे बोलणारे तोंड दिले होते; आणि त्याला हे करायला बेचाळीस महिने अधिकार दिलेला होता.
त्याने देवाविरुद्ध दुर्भाषण करायला त्याच्या नावाविषयी, त्याच्या मंडपाविषयी, आणि स्वर्गात राहणार्‍यांविषयी दुर्भाषणे करायला आपले तोंड उघडले.
आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास, आणि त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्याला मुभा देण्यात आली आणि त्याला प्रत्येक वंशावर, प्रत्येक समाजावर, प्रत्येक भाषा बोलणार्‍यांवर आणि प्रत्येक राष्ट्रावर अधिकार दिलेला होता.
आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकर्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या पशूला नमन करतील.
जर कोणाला कान असेल तर तो ऐको. १०जर कोणी अटकेसाठी असेल तर त्याने अटकेसाठी जावे; जर कोणी तरवारीने मारील तर त्याला तरवारीने मरावे लागेल. ह्यात पवित्र जनांचा धीर आणि विश्वास आहे.

११आणि मी बघितले की, आणखी एक पशू जमिनीमधून वर येत आहे. त्याला कोकर्‍यासारखी दोन शिंगे होतीआणि तो अजगरासारखा बोलत होता. १२तो पहिल्या पशूची सर्व सत्ता त्याच्यासमक्ष स्वतः चालवतो; आणि ज्या पहिल्या पशूचा प्राणांतिक घाव बरा झाला होता त्याला पृथ्वीने व तीवर राहणार्‍यांनी नमन करावे असे तो करतो. १३तो मोठी चिन्हे करतो; आणि लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो, १४आणि त्याला त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणार्‍यांना फसवतो आणि ज्या पशूला तरवारीचा घाव असून जो जिवंत होता त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणार्‍यांस सांगतो.
१५आणि, त्याला त्या पशूच्या मूर्तीत प्राण घालायची मुभा होती. म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे, आणि असे करावे की, जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांचा वध केला जावा. १६आणि तो असे करतो की, लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास, अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किवा कपाळांवर एक खूण घ्यावी, १७आणि ती खूण, म्हणजे त्या पशूचे नाव किवा त्याच्या नावाची संख्या धारण करणार्‍या लोकांशिवाय इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किवा विकता येऊ नये. १८येथे ज्ञानीपण हेच आहे; ज्याला बुद्धी असेल त्याने पशूच्या संख्येचा हिशोब करावा. कारण, ती एका मनुष्याची संख्या आहे, आणि त्याची संख्या सहाशे सहासष्ठ आहे.  

—–प्रकटी १४—–

आणि मी बघितले, आणि बघा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता; आणि ज्यांच्या कपाळांवर त्याचे व त्याच्या पित्याचे नाव लिहिले होते, असे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे त्याच्याबरोबर होते. आणि मी स्वर्गातून एक आवाज ऐकला; तो जणू अनेक प्रवाहांचा आवाज आणि मोठ्या गडगडाटाचा आवाज होता. आणि जणू वीणावादक आपल्या वीणा वाजवीत आहेत असा आवाज मी ऐकला. आणि ते राजासनासमोर, त्या चार प्राण्यांसमोर आणि वडिलांसमोर जणू एक नवे गीत गात होते; आणि पृथ्वीवरून विकत घेतलेले जे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही. स्त्रियांकडून ज्यांना विटाळ झालेला नाही असे हे आहेत; कारण हे कुमार आहेत. हे जिकडे कोकरा जातो तिकडे त्याच्यामागे जातात; हे देवासाठी व कोकर्‍यासाठी मानवजातीतून विकत घेतलेले प्रथमफळ आहेत. आणि त्यांच्या मुखात काही कपट आढळले नाही; ते निष्कलंक आहेत.

आणि मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ, पृथ्वीवर राहणार्‍या प्रत्येक राष्ट्राला, प्रत्येक वंशाला, प्रत्येक भाषा बोलणार्‍यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला, सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाला भ्या, आणि त्याला गौरव द्या; कारण न्यायाची घटका आली आहे. आणि ज्यानं आकाश, पृथ्वी आणि समुद्र, आणि पाण्याचे झरे हे सर्व उत्पन्न केले त्याला नमन करा. मग आणखी एक देवदूत मागोमाग आला आणि म्हणाला, बाबेल पडली, ती मोठी नगरी पडली! कारण तिनं सर्व राष्ट्रांना तिच्या जारकर्माच्या क्षोभाचा द्राक्षारस पाजला आहे.
आणि तिसरा देवदूत त्यांच्या मागोमाग आला आणि म्हणाला, जर कोणी त्या पशूला किवा त्याच्या मूर्तीला नमन करील आणि आपल्या कपाळावर किवा हातावर त्याची खूण घेईल १०तर तो देवाच्या क्षोभाचा द्राक्षारस पिईल. तो त्याच्या कोपाच्या प्याल्यात निर्भेळ ओतण्यात आला आहे. तो पवित्र दूतांसमोर आणि कोकर्‍यासमोर अग्नीनं आणि गंधकानं पीडला जाईल. ११त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येतो; त्या पशूला आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍यांना, आणि त्याच्या नावाची खूण घेणार्‍या कोणालाही अहोरात्र विसावा नाही.
१२येथे जे पवित्र जन देवाच्या आज्ञांचे व येशूच्या विश्वासाचे पालन करतात त्यांचा धीर आहे.
१३आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली,
लिहीः आतापासून, जे प्रभूत मरतील ते मेलेले धन्य होत. आत्मा म्हणतो, हो, म्हणजे त्यांनी आपल्या कष्टांपासून विसावा घ्यावा. कारण त्यांची कामे त्यांच्या मागोमाग जात आहेत.’ ”

१४तेव्हा मी बघितले, आणि बघा, एक पांढरा ढग, आणि मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी त्या ढगावर बसला होता. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुगुट आणि त्याच्या हातात एक धारदार विळा होता. १५मग मंदिरातून आणखी एक देवदूत बाहेर आला आणि जो ढगावर बसला होता त्याला त्याने मोठ्या आवाजात म्हटले, विळा चालव आणि कापणी कर, कारण तुझा कापणीचा काळ आला आहे; कारण पृथ्वीचं पीक पिकलं आहे. १६मग जो ढगावर बसला होता त्याने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीची कापणी केली गेली.
१७मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरामधून बाहेर आला;  त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. १८मग आणखी एक देवदूत वेदीमधून बाहेर आला; त्याला अग्नीवर अधिकार होता; आणि ज्याच्याजवळ धारदार विळा होता त्याला त्याने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, तुझा धारदार विळा चालव आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे घड गोळा कर; कारण तिची द्राक्षं पुरी पिकली आहेत. १९तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर विळा घातला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे पीक गोळा करून ते देवाच्या क्षोभाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. २०आणि ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले; ते घोड्याच्या लगामींपर्यंत चढले आणि शंभर कोसांच्या परिसरात पसरले.    

—–प्रकटी १५—–

आणि मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह बघितले; सात देवदूत, त्यांच्याजवळ सात पीडा होत्या, त्या शेवटल्या होत्या, कारण देवाचा क्षोभ त्यात पूर्ण झाला होता.

आणि मी बघितले की, जणू एक अग्निमिश्रित काचेचा समुद्र आहे, आणि ज्यांनी त्या पशूवर व त्याच्या मूर्तीवर, आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय प्राप्त केला होता ते त्या काचेच्या समुद्राजवळ, देवाच्या वीणा घेऊन उभे राहून देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकर्‍याचे गीत गात होते. त्यांचे शब्द असे होतेः
 सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा,
  तुझ्या कृती महान आणि
  आश्चर्यकारक आहेत.
  हे राष्ट्रांच्या राजा,
  तुझे मार्ग नीतीचे आणि खरे आहेत.
  हे परमेश्वरा,
  कोण तुला भिणार नाही
  किवा तुझ्या नावाचे गौरव करणार नाही?
  कारण तू एकच पवित्र आहेस.
  कारण सगळी राष्ट्रे येऊन
  तुझ्यापुढे नमन करतील.
  कारण तुझे न्याय प्रगट झाले आहेत.
त्यानंतर मी बघितले, आणि साक्षीच्या मंडपाचे स्वर्गातील मंदिर उघडले गेले. आणि त्या मंदिरातून सात देवदूत बाहेर आले; त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. त्यांनी स्वच्छ, शुभ्र तागाची वस्त्रे परिधान केली होती आणि आपल्या छातीभोवती सोन्याचे पट्टे बांधले होते. तेव्हा त्या चार प्राण्यांतील एकाने त्या सात देवदूतांना, जो युगानुयुग जिवंत आहे त्या देवाच्या क्षोभाने भरलेल्या, सात सोन्याच्या वाट्या दिल्या. आणिदेवाच्या गौरवातील व तेजातील धुराने मंदिर भरले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा पूर्ण होईपर्यंत कोणीही मंदिरात जाऊ शकला नाही. 

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s