Revelation 16-22

संत योहानाला झालेले प्रकटीकरण

—–प्रकटी १६—–

आणि मी मंदिरामधून एक मोठा आवाज ऐकला; तो त्या सात देवदूतांना म्हणाला, ‘जा, आणि देवाच्या क्षोभाच्या ह्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.’
आणि पहिला गेला आणि त्याने आपली वाटी भूतलावर ओतली. आणि, ज्या लोकांवर त्या पशूची खूण होती व जे त्याच्या मूर्तीला नमन करीत असत त्यांना वाईट आणि त्रासदायक फोड आले.
आणि, दुसर्‍याने आपली वाटी समुद्रावर ओतली आणि त्याचे मेलेल्या माणसाच्या रक्तासारखे रक्त झाले, आणि समुद्रात जगणारे सर्व जीव मेले.
तिसर्‍याने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झर्‍यांवर ओतली, आणि त्यांचे रक्त झाले. आणि माझ्या कानी आले की, जलाशयांचा देवदूत म्हणाला, ‘हे पवित्रा, तू जो आहेस आणि होतास तो तू नीतिमान आहेस, कारण तू असा न्याय केलास. कारण त्यांनी पवित्र जनांचं आणि संदेष्ट्यांचं रक्त पाडलं, आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलंस; कारण ते पात्र आहेत.’ आणि मी ऐकले की, वेदी म्हणाली, ‘हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत.’
चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली, आणि त्याला लोकांना अग्नीने होरपळवायची मुभा देण्यात आली. लोक कडक उष्णतेने होरपळले व त्यांनी ह्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निदा केली,आणि त्याला गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही.
१०पाचव्याने आपली वाटी त्या पशूच्या राजासनावर ओतली आणि त्याचे राज्य अंधकारमय झाले; आणि त्या क्लेशांत लोकांनी आपल्या जिभा चावल्या. ११त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे स्वर्गीच्या देवाची निदा केली, आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नव्हता.
१२सहाव्याने आपली वाटी महान फरात नदीवर ओतली, आणि पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार व्हावा म्हणून तिचे पाणी आटवले गेले. १३आणि मी बघितले की, त्या अजगराच्या मुखातून, त्या पशूच्या मुखातून आणि त्या खोट्या संदेष्ट्यांच्या मुखातून बेडकांसारखे तीन अशुद्ध आत्मे बाहेर आले. १४कारण ते चिन्हे करणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या, त्या महान दिवसाच्या लढाईसाठी सर्व जगातल्या राजांना एकत्र जमवायला त्यांच्याकडे जात आहेत. (१५‘पहा, मी चोरासारखा येतो; जो जागृत राहतो, आणि आपली वस्त्रे संभाळतो तो धन्य होय! नाहीतर, तो उघडा फिरेल आणि ते त्याची लज्जा पाहतील.’) १६आणि त्यांनी त्यांना हर-मगिद्दोन असे इब्री भाषेत नाव असलेल्या एका ठिकाणी एकत्र जमवले.
१७सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली व मंदिरामधून, राजासनाकडून एक मोठा आवाज आला; तो म्हणाला, ‘झाले.’ १८आणि विजांचे लखलखाट, आवाज व गडगडाट होऊन मोठा भूकंप झाला. पृथ्वीवर लोक झाल्यापासून कधी झाला नव्हता इतका मोठा भूकंप झाला. १९त्या महान नगरीचे तीन भाग झाले, राष्ट्रांची नगरे पडली, आणि ती महान बाबेल देवासमोर, तिला त्याच्या कोपाच्या क्षोभाच्या द्राक्षारसाचा प्याला द्यावा म्हणून आठवणीत आणली गेली. २०आणि प्रत्येक बेट पळून गेले व डोंगर कोठेच आढळले नाहीत. २१आणि मण मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून खाली लोकांवर पडल्या आणि त्या गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निदा केली; कारण त्यांची पीडा फार मोठी होती.

—–प्रकटी १७—–

मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला,
“इकडे ये, त्या अनेक जलौघांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो. पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर जगरकर्म केलं आणि पृथ्वीवर राहणारे तिच्या जारकर्माच्या द्राक्षारसानं मस्त झाले.”
तेव्हा त्याने मला आत्म्याने अरण्यात नेले आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो दुर्भाषणांच्या नावांनी भरला होता आणि त्याला सात डोकी व दहा शिगे होती. त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे पेहरून सोन्याचा व हिर्‍यामोत्यांचा साज घातला होता. तिच्या हातात, अमंगळ गोष्टींनी व तिच्या जारकर्मांच्या घाणीने भरलेला एक सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची आई.’
आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्र जनांचे रक्त पिऊन व येशूच्या साक्षींचे रक्त पिऊन मस्त झाली होती. आणि तिला बघताच मी मोठ्या विस्मयाने आश्चर्य केले. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला,
“तू का आश्चर्य करतोस? मी तुला ह्या स्त्रीचं, आणि जो पशू तिला पाठीवर वाहतो, ज्याला सात डोकी आणि दहा शिगं आहेत त्या पशूचं रहस्य सांगतो. आणि तू जो पशू बघितलास, जो होता, आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल. आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील. कारण तो होता, नाही, आणि येणार आहे.
“इथं ज्ञानी मन हवं आहे. ती सात डोकी, ही ती स्त्री ज्यांवर बसली आहे ते सात डोंगर आहेत. १०आणि सात राजे आहेत. पाच पडले आहेत, एक आहे, आणि दुसरा अजून आलेला नाही. आणि तो आल्यावर त्याला अल्पकाळ राहणं जरूर आहे. ११आणि तो जो पशू होता, आणि नाही, तो आठवा आहे. तो सातांपासून झालेला आहे, आणि नाशात जात आहे. १२आणि तू बघितलीस ती दहा शिगं दहा राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळालं नाही;पण त्यांना त्या पशूबरोबर, एक घटका राजांसारखा अधिकार मिळतो.
१३“ते एकमताचे आहेत, ते आपली सत्ता आणि आपला अधिकार पशूला देतात. १४ते कोकर्‍याशी युद्ध करतील आणि कोकरा त्यांना जिकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत.”
१५आणि तो मला म्हणतो,
“तू जे जलौघ बघत आहेस, ज्यांवर ती वेश्या बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रं, आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. १६आणि तू बघितलीस ती दहा शिगं आणि तो पशू त्या वेश्येचा द्वेष करतील. तिला उजाड आणि उघडी करतील, तिचं मास खातील, आणि तिला अग्नीत जाळतील. १७कारण त्यांनी एकमनाचे होऊन देवाची वचनं पूर्ण होईपर्यंत, त्याची इच्छा पूर्ण करायला आपलं राज्य पशूला द्यावं हे देवानं त्यांच्या मनात घातलं आहे. १८आणि तुला जी स्त्री दिसली ती पृथ्वीच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे.”

—–प्रकटी १८—–

ह्यानंतर मी बघितले की, आणखी एक देवदूत आकाशामधून खाली आला. त्याला मोठा अधिकार होता; आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार आवाजात ओरडून म्हणाला, ‘ती महान बाबेल पडली आहे,पडली आहे! ती भुतांना घर झाली आहे, सर्व अशुद्ध आत्म्यांना आसरा, सर्व अशुद्ध आणि ओंगळ पक्ष्यांना आसरा झाली आहे. कारण तिच्या जारकर्माच्या क्षोभाचा द्राक्षारस सर्व राष्ट्रांनी प्राशन केला आहे; आणि पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केलं आहे; तिच्या विलासाच्या बळावर पृथ्वीचे व्यापारी सधन झाले.’
आणि मी स्वर्गातून आणखी एक आवाज ऐकला; तो म्हणाला,
“अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या. म्हणजे तुम्ही तिच्या पापांत भागीदार होऊ नये आणि तिच्या पीडांत वाटेकरी होऊ नये. कारण तिची पापं स्वर्गापर्यंत पोहोचलीत आणि तिचे अपराध देवानं आठवलेत. तिनं तुम्हाला दिलं तसं तिला द्या. तिला तिच्या कृतींप्रमाणं दुप्पट द्या; आणि तिनं भरलेल्या प्याल्यात तिच्यासाठी दुप्पट भरा. तिनं स्वतःला जेवढं गौरवलं, ती जेवढ्या विलासात राहिली तेवढ्या प्रमाणात तिला पीडा आणि दुःख द्या. कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, ‘मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.’ ह्या कारणांमुळं, तिच्या पीडा तिच्यावर एकाच दिवसात येतील – मरी, शोक आणि दुष्काळ – आणि ती अग्नीनं पुरी जळून जाईल; कारण तिचा न्याय करणारा, परमेश्वर देव बलवान आहे.
“आणि ज्यांनी तिच्याबरोबर जारकर्म केले, जे तिच्याबरोबर विलासात राहिले, ते पृथ्वीचे राजे तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा तिच्याकरता रडतील आणि ऊर बडवतील. १०ते तिच्या पीडांच्या भयामुळे दूर उभे राहून म्हणतील, ‘हाय हाय! ही मोठी नगरी, ही पराक्रमी नगरी बाबेल; कारण एका घटकेत तुझा न्याय ओढवला!’
११“आणि पृथ्वीचे व्यापारी तिच्याकरता रडतील आणि शोक करतील, कारण आता त्यांचा माल कोणी विकत घेत नाही. १२सोन्याचा, रुप्याचा, हिर्‍यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड,रेशमी कापड आणि किरमिजी कापड, आणि सर्व प्रकारचे सुवासिक लाकूड, आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे,तशीच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, पितळी, लोखंडी व संगमरवरी पात्रे, १३दालचिनी व उटण्याचे मसाले,धूप, सुवासिक तेले व ऊद, द्राक्षारस, तेल, सपीठ आणि गहू, आणि जनावरे, मेंढरे, घोडे व रथ, आणि दास व माणसांचे जीव कोणी विकत घेत नाही. १४आणि ज्या फळांची तुझ्या जिवाला वासना होती ती तुझ्यापुढून गेली आहेत, सर्व स्वादिष्ट आणि सुंदर गोष्टी तुझ्यापुढून गेल्या आहेत; कोठेच त्या पुन्हा दिसणार नाहीत.
१५“आणि तिच्यामुळे सधन झालेले त्यांचे व्यापारी हे तिच्या पीडेच्या भयामुळे दूरवर उभे राहून रडतील, शोक करतील १६आणि म्हणतील, ‘हाय हाय! ही मोठी नगरी! ही जांभळी आणि किरमिजी वस्त्रं पेहरून सोन्याचा आणि हिर्‍यामोत्यांचा साज घालीत असे. १७कारण एवढं धन एका घटकेत नष्ट झालं.’
“आणि सगळे तांडेल, गलबतांवरचे सगळे लोक आणि खलाशी आणि जितके समुद्रावर व्यापार करीत होते तितके दूरवर उभे राहिले, १८आणि त्यांनी तिच्या जळण्याचा धूर पाहिला, तेव्हा ते ओरडून म्हणाले, ‘कोणती नगरी ह्या मोठ्या नगरीसारखी आहे?’ १९आणि त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली व ते रडत आणि शोक करीत ओरडून म्हणाले, ‘हाय हाय! ही महान नगरी! समुद्रावर ज्यांची गलबतं होती ते सर्व हिच्या संपत्तीवर सधन झालेत! कारण ही एका घटकेत उजाड झाली.’
२०“हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो, तिच्यावरून आनंद करा; कारण तिच्या न्यायनिवाड्यात तुमचा न्याय केला आहे.”
२१मग एका बलवान देवदूताने मोठ्या जात्याच्या तळीसारखा एक दगड घेतला, तो समुद्रात फेकला, आणि तो म्हणाला,
‘“अशीच ती मोठी नगरी बाबेल जोरात खाली टाकण्यात येईल, आणि पुन्हा मुळीच सापडणार नाही. २२तुझ्यात वीणा वाजविणार्‍यांचा आवाज, गाणार्‍यांचा, वाजंत्र्यांचा आणि कर्णे वाजविणार्‍यांचा आवाज ह्यापुढं कधी ऐकू येणार नाही. तुझ्यात कोणत्याही धंद्याचा कारागीर ह्यापुढं कधी आढळणार नाही; आणि तुझ्यात जात्याचा आवाज ह्यापुढं कधी ऐकू येणार नाही. २३आणि तुझ्यात दिव्याचा उजेड ह्यापुढं कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढं ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रं फसवली गेली. २४आणि तिच्यात संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे आणि पृथ्वीवर जे मारले गेले त्या सर्वांचे रक्त सापडले.”

—–प्रकटी १९—–

आणि ह्या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाचा मोठा आवाज स्वर्गात ऐकला; त्याचे शब्द असे होतेः
‘हालेलूया!
तारण, गौरव आणि सत्ता
आमच्या देवाची आहेत,
कारण त्याचे निर्णय खरे
आणि नीतीचे आहेत;
कारण ज्या महावेश्येने आपल्या
जारकर्मानं पृथ्वी भ्रष्ट केली
तिचा त्यानं न्यायनिवाडा केला आहे.
आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल
तिचा सूड घेतला आहे.’
आणि ते पुन्हा एकदा म्हणाले,
‘हालेलूया!
आणि तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.’
तेव्हा ते चोवीस वडील व चार प्राणी पालथे पडले, त्यांनी राजासनावर बसलेल्या देवाला नमन केले आणि ते म्हणाले,
‘आमेन, हालेलूया.’
आणि राजासनाकडून एक आवाज आला; तो म्हणाला,
‘तुम्ही सर्व त्याचे दास,
तुम्ही त्याला भिणारे लहानमोठे,
आपल्या देवाचं स्तवन करा.’
आणि, मी जणू एका, विशाल समुदायाचा आवाज ऐकला; तो पुष्कळ जलौघांच्या आवाजासारखा आणि मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखा होता. त्याचे शब्द असे होतेः
‘हालेलूया!
कारण, सर्वसमर्थ देव परमेश्वर
राज्य करीत आहे.
या, आपण आनंद करू, हर्ष करू,
आणि त्याला मान देऊ;
कारण कोकर्‍याचं लग्न निघालं आहे,
आणि त्याच्या नवरीनं
स्वतःला सजवलं आहे.
आणि तिला पेहरायला,
स्वच्छ, शुभ्र, तलम तागाचं वस्त्र
दिलं गेलं आहे.’
(हे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांच्या नीतिमत्वाच्या कृती होत.)
आणि तो मला म्हणाला,
“लिहीः ‘कोकर्‍याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.’ ”
आणि तो मला म्हणाला,
“ही देवाची खरी वचनं आहेत.”
१०आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायांशी पालथा पडलो, तेव्हा तो मला म्हणाला,
“पहा, नको; मी तुझा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंचा जोडीदार-दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूची साक्ष हा संदेशाचा आत्मा आहे.”

११तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला, आणि बघा, एक पांढरा घोडा, आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव ’विश्वासू आणि खरा’ आहे. तो नीतीने न्याय करतो, आणि युद्ध करतो. १२त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुगुट होते. आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते. ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. १३त्याने एक, रक्तात बुचकळलेला झगा परिधान केला होता, आणि त्याचे नाव ’देवाचा शब्द’ आहे. १४आणि स्वर्गातल्या सेना पांढर्‍या घोड्यांवर त्याच्या मागोमाग जात होत्या. त्यांनी शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान केली होती. १५आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तरवार निघते. तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील. तो सर्वसमर्थ देवाच्या क्षोभाचे व कोपाचे द्राक्षकुंड तुडवील. १६त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ असे नाव लिहिलेले आहे.

१७आणि मी बघितले की, एक देवदूत सूर्यावर उभा होता; तो अंतराळात उडणार्‍या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, ‘या, आणि देवाच्या मोठ्या भोजनासाठी एकवट व्हा. १८म्हणजे तुम्ही राजांचं मास खाल, सेनापतींचं मास आणि बलवान पुरुषांचं मास खाल; घोड्यांचं आणि त्यांवर बसणार्‍यांचं मास खाल,  स्वतंत्र आणि दास, लहान आणि मोठे अशा सर्वांचं मास खाल.’ १९आणि मी बघितले की, तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशू व पृथ्वीचे राजे आणि त्यांच्या सेना एकत्र आल्या होत्या. २०मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले. त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूची खूण घेणार्‍यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍यांस फसविले होते. ह्या दोघांनाही गंधकाने जळणार्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले. २१आणि जो घोड्यावर बसला होता त्याच्याकडून त्याच्या तोंडातून बाहेर येणार्‍या तरवारीने बाकी राहिलेले मारले गेले. आणि त्यांच्या मासाने सगळे पक्षी तृप्त झाले.

—–प्रकटी २०—–

आणि मी बघितले की, एक देवदूत आकाशामधून खाली आला; त्याच्या हातात अगाधकूपाची किल्ली व एक मोठी साखळी होती. आणि ज्याला दियाबल आणि सैतान म्हणतात त्या पुरातन सर्पाला म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्याला बांधले, आणि अगाधकूपात टाकले; आणि त्यात बंद करून वर शिक्का लावला; म्हणजे ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी फसवू नये. त्यानंतर त्याला अल्पकाळ सोडणे जरूर आहे.

तेव्हा मी राजासने बघितली व त्यांवर जे कोणी बसले होते त्यांच्याकडे न्यायनिवाडा देण्यात आला; आणि येशूच्या साक्षीसाठी व देवाच्या वचनासाठी ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि त्या पशूला किवा त्याच्या मूर्तीला ज्यांनी नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किवा हातांवर त्याची खूण घेतली नव्हती, त्यांचे आत्मे मला दिसले. ते जिवंत झाले व त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. पण ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत बाकीचे मेलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत. हे पहिले पनरुत्थान होय. ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे, तो धन्य आणि पवित्र होय. अशांवर दुसर्‍या मरणाची सत्ता नाही, पण ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील, आणि ते त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.

ती हजार वर्षे पूर्ण झाल्यावर सैतान त्याच्या अटकेमधून सोडला जाईल. आणि तो पृथ्वीच्या चारी कोपर्‍यांतील गोग व मागोग ह्या राष्ट्रांना भुरळ घालून, लढाईसाठी एकत्र आणायला बाहेर जाईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी आहे. ते पृथ्वीच्या विस्तारावर गेले आणि त्यांनी पवित्र जनांची छावणी व प्रिय नगरी वेढली. तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना गिळून घेतले. १०आणि त्यांना फसवणार्‍या सैतानाला अग्नीच्या व गंघकाच्या सरोवरात टाकण्यात आले. तो पशू व तो खोटा संदेष्टा हे तेथेच असून ते सर्वकाळ अग्नीने पीडले जातात.

११तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्याला बघितले. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळून गेली, आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही. १२मग मी राजासनासमोर उभ्या राहिलेल्या लहानमोठ्या मृतांना बघितले; तेव्हा पुस्तके उघडली गेली व आणखी एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्याच्या त्याच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला. १३समुद्राने आपल्यामधील मेलेले दिले, आणि मृत्यू व अधोलोक ह्यंानीही आपल्यामधील मेलेले दिले. आणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. १४आणि मृत्यू व अधोलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय.
१५आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.

—–प्रकटी २१—–

आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली, कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही नष्ट झाली होती, आणि समुद्रही राहिला नव्हता. आणि मी ती पवित्र नगरी नवी यरुशलेम देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती पतीसाठी साज चढवून तयार केलेल्या वधूप्रमाणे होती. आणि मी राजासनाकडून एक मोठा आवाज ऐकला; तो म्हणालाः
‘पहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे,
तो त्यांच्याबरोबर वसती करील.
ते त्याची प्रजा होतील,
आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील.
तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल,
आणि ह्यापुढं मरण राहणार नाही,
दुःख नाही, आक्रोश नाही,
किवा क्लेशही नाहीत.
कारण पहिल्या गोष्टी निघून गेल्या आहेत.’
तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला,
“पहा, मी सर्व गोष्टी नव्या करतो.”
आणि तो मला म्हणाला,
“लिही, कारण ही वचनं विश्वसनीय आणि खरी आहेत.”
आणि तो मला म्हणाला,
“त्या झाल्या आहेत. मी आल्फा आणि ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. मी जो तान्हेला असेल त्याला जीवनाच्या पाण्याच्या झर्‍यातून फुकट देईन. जो विजय मिळवतो तो ह्या सर्व गोष्टी वारशानं मिळवील; मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी,मूर्तीपूजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीनं आणि गंधकानं जळणार्‍या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरं मरण होय.”

मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला, आणि मला म्हणाला,
“इकडे ये, मी तुला वधू दाखवतो; ही कोकर्‍याची नवरी आहे.”
१०तेव्हा त्याने मला आत्म्याने एका मोठ्या उंच डोंगरावर नेले, आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरुशलेम देवाकडून, स्वर्गातून खाली येत असलेली दाखवली. ११तिच्या ठायी देवाचे तेज होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे, स्फटिकाप्रमाणे चमकणार्‍या हिर्‍याच्या खड्यासारखे होते. १२तिला मोठा आणि उंच तट होता; त्याला बारा वेशी होत्या, आणि वेशींपुढे बारा देवदूत होते आणि त्यांवर नावे लिहिलेली होती, ती इस्राएलाच्या वंशजांच्या बारा कुळांची नावे आहेत. १३पूर्वेकडे तीन वेशी, उत्तरेकडे तीन वेशी, दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या. १४आणि नगरीच्या तटाला बारा पाये होते; त्यांवर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची नावे होती. १५आणि जो माझ्याशी बोलत होता त्याच्याजवळ त्या नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे माप घ्यायला एक सोन्याचा बोरू होता. १६ती नगरी चौकोनी बांधलेली होती; आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती. आणि त्याने बोरूने माप घेतले ते साडेसातशे कोस भरले. तिची लांबी, रुंदी आणि उंची ह्या समसमान होत्या. १७आणि त्याने तटाचे माप घेतले, ते देवदूताच्या म्हणजे माणसाच्या मापाप्रमाणे एकशे चौवेचाळीस हात भरले.
१८तिच्या तटाचे बांधकाम हिर्‍यांचे होते; आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे, खरोखर, शुद्ध सुवर्ण होती.
१९आणि नगरीच्या तटाचे पाये अनेक प्रकारचे मोलवान खडे लावून शृंगारले होते.
पहिला पायाः हिरा, दुसराः नीलमणी, तिसराः गोदंतमणी, चवथाः पाचू, २०पाचवाः पुष्कराज, सहावाः लाल,सातवाः गोमेद, आठवाः बिरोजा, नववाः पीतमणी, दहावाः पन्ना, अकरावाः धूम्रकांत, आणि बारावाः याकूत. २१आणि बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; प्रत्येक वेगळी वेस एका मोत्याची केली होती. आणि नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा, जणू पारदर्शक काचेचा होता.
२२आणि मी तेथे मंदिर बघितले नाही. कारण सर्वसमर्थ देव परमेश्वर आणि कोकरा हेच तिचे मंदिर आहेत. २३आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किवा चंद्राची गरज नव्हती; कारण देवाचे तेज तिला प्रकाश देते,आणि कोकरा तिचा दिवा आहे. २४राष्ट्रे तिच्या प्रकाशात चालतील; आणि पृथ्वीचे राजे आपले वैभव तिच्यात आणतील. २५तिच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत, आणि तेथे रात्र होणार नाही. २६त्या राष्ट्रांकडून गौरव आणि मान तिच्यात आणतील.
२७तेथे कोणतीही निषिद्ध गोष्ट, किवा अमंगळपणाची कृती करणारा किवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य,कोणत्याही प्रकारे, प्रवेश करणार नाही. पण कोकर्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच प्रवेश करता येईल.

—–प्रकटी २२—–

१-२आणि त्याने मला देवाच्या आणि कोकर्‍याच्या राजासनापासून तिच्या रस्त्याच्या मध्यभागातून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी निर्मळ नदी दाखवली. त्या नदीच्या दोन्ही कडांना जीवनाचे झाड होते;ते बारा जातीची फळे देते व प्रत्येक महिन्यात आपले फळ देते. आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी आहेत. तेथे पुढे काही शापित राहणार नाही; पण तिच्या ठायी देवाचे व त्याच्या कोकर्‍याचे राजासन राहील; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे तोंड पाहतील आणि त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर राहील. तेथे रात्र होणार नाही; आणि त्यांना दिवसाच्या किवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही;कारण परमेश्वर देव त्यांना प्रकाश देतो आणि ते युगानुयुग राज्य करतील.
आणि तो मला म्हणाला,
“ही वचनं विश्वसनीय आणि खरी आहेत, आणि, ज्या गोष्टी लवकर झाल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दाखवाव्यात म्हणून, संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्यानं आपल्या दूताला पाठवलं आहे.”

“पहा, मी लवकर येतो. ह्या ग्रंथातील संदेश-वचने वाचणारा धन्य!”
मी, योहान, हे ऐकत होतो आणि पहात होतो आणि मी ऐकलेल्या व पाहिलेल्या गोष्टी ज्या देवदूताने मला दाखवल्या त्याला नमन करायला मी त्याच्या पायांशी पालथा पडलो. तेव्हा तो मला म्हणतो,
“पहा, नको; कारण मी तुझा, तुझ्या संदेष्टे-बंधूंचा आणि जे ह्या ग्रंथातील वचने वाचतात त्यांचा जोडीदार-दास आहे; देवाला नमन कर.”
१०आणि तो मला म्हणतो,
“तू ह्या ग्रंथातील संदेश-वचनांवर शिक्का लावू नको; कारण काळ जवळ आला आहे. ११जो अनीतिमान आहे तो अनीतिमान राहो, जो अमंगळ आहे तो अमंगळ राहो; नीतिमान आहे तो नीतिमान राहो, पवित्र आहे तो पवित्र राहो.”

१२“पहा, मी लवकर येतो. आणि प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणं द्यायला माझ्याजवळ वेतन आहे. १३मी आल्फा आणि ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, पहिला आणि शेवटला आहे.
१४“आपल्याला जीवनाच्या झाडावर हक्क मिळावा, आणि आपण त्या वेशींतून नगरीत जावे म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य होत. १५कारण कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खुनी, मूर्तीपूजक, आणि असत्याची आवड धरणारे व कृती करणारे बाहेर राहतील.
१६“मी, येशूनं, तुमच्याकडे ह्या गोष्टींची मंडळ्यांना साक्ष द्यायला माझ्या दूताला धाडलं आहे. मी दाविदाचा अंकुर आणि वंश आहे. मी पहाटेचा प्रकाशमान तारा आहे.”
१७आणि आत्मा आणि वधू म्हणतात, ‘ये’, आणि ऐकणारा म्हणो, ‘ये’. आणि तान्हेला आहे तो येवो, आणि ज्या कोणाची इच्छा असेल तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.
१८कारण, ह्या ग्रंथातील संदेश-वचने श्रवण करणार्‍या प्रत्येकाला मी निक्षून सांगतो की, कोणी मनुष्य ह्यांत भर घालील तर देव त्याच्यावर ह्या ग्रंथात लिहिलेल्या पीडा आणील. १९त्याचप्रमाणे ह्या संदेश-ग्रंथातील वचनांमधून जर कोणी काही काढून टाकील, तर देव ह्या ग्रंथात उल्लेखलेल्या जीवनाच्या झाडामधून व पवित्र नगरीमधून त्याचा वाटा काढून टाकील.
२०ह्या गोष्टींची साक्ष देणारा म्हणतो,
“मी खरोखर लवकर येतो.”
आमेन, प्रभू येशू, ये.
२१आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s