Romans 1-5

रोमकरांस पत्र

—–रोम १—–

प्रेषित होण्यास बोलावलेला व देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, येशू ख्रिस्ताचा दास पौल ह्याजकडून;
त्याने त्या सुवार्तेविषयी पवित्र शास्त्रलेखात, आपल्या संदेष्ट्यांद्वारे, अगोदर वचन दिले होते; ती त्याच्या पुत्राविषयी आहे. तो देहाप्रमाणे दाविदाच्या संतानात आला, पण पवित्रतेच्या आत्म्याप्रमाणे, मेलेल्यांतून पुन्हा उठण्याने, तो पराक्रमाने, देवाचा पुत्र ठरविला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे. त्याच्या द्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपद ही मिळाली आहेत, ह्यासाठी की, सर्व राष्ट्रांत, त्याच्या नावाकरता, विश्वासाचे आज्ञापालन केले जावे. त्यांतले तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहा.
रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्र जन होण्यास बोलावलेल्यांसः
देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.

मी तुमच्यातल्या सर्वांसाठी, प्रथम, येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो. कारण तुमच्या विश्वासाविषयी सर्व जगभर बोलले जात आहे. मी ज्याच्या पुत्राच्या सुवार्तेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे, तो देव माझा साक्षी आहे की, मी निरंतर माझ्या प्रार्थनांत तुमची आठवण करतो; १०आणि अशी विनवणी करतो की, आता शेवटी शक्य त्यायोगे, तुमच्याकडे येण्यास, देवाच्या इच्छेने माझा तुमच्याकडील प्रवास सुरळीत व्हावा. ११कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हाला काही आत्मिक कृपादानात वाटेकरी करण्यास मी तुम्हाला भेटण्यास उत्कंठित आहे; १२म्हणजे आपल्या एकमेकांच्या, तुमच्या व माझ्या, विश्वासाने, मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे.
१३बंधूंनो, मला जसे इतर परजनांत फळ मिळाले, तसेच तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून, मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजिले होते, पण आतापर्यंत अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. १४मी हेल्लेणी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्या दोहोंचा देणेकरी आहे.
१५म्हणून मी माझ्याकडून रोममधील तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास उत्सुक आहे.

१६कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहुद्याला आणि हेल्लेण्यालाही. १७कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते. कारण असे लिहिले आहे की, तरी विश्वासाने नीतिमान जगेल.

१८कारण जे अनीतीने सत्य दाबतात अशा लोकांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. १९कारण देवाविषयी जे कळले पाहिजे ते त्यांच्यात उघड आहे; कारण देवाने त्यांना ते प्रकट केले आहे.
२०कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ह्या त्याच्या अदृष्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही. २१कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही, किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले. २२स्वतःला ज्ञानी म्हणत असता ते मूर्ख झाले. २३आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशवंत मनुष्य,  तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या स्वरूपाची प्रतिमा घेतली. २४म्हणून त्यांना आपल्या शरिरांचा आपल्याआपल्यात दुरुपयोग करण्यास देवानेदेखील त्यांना त्यांच्या अंतःकरणातील वासनांद्वारे अमंगळपणाच्या स्वाधीन केले. २५त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले, आणि, निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. २६ह्या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले; २७आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनांत एकमेकांविषयी जळत राहिले, पुरुष पुरुषांशी लाजेच्या गोष्टी करीत राहिले, आणि त्यांना आपल्यात, आपल्या संभ्रमाचे मिळावे ते प्रतिफळ मिळाले.
२८आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. २९ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे, ३०निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर,गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आईबापांचा अवमान करणारे, ३१निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन व निर्दय झाले. ३२आणि ह्या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणार्‍यांना ते संमती देतात.

—–रोम २—–

म्हणून दुसर्‍याला दोष लावणार्‍या, अरे मनुष्या, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्‍याला दोष लावतोस त्यांत तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तू स्वतः त्याच गोष्टी करतोस. पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध,  देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे. तर अशा गोष्टी करणार्‍यांना दोष लावणार्‍या, आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्‍या, अरे मनुष्या, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यात सुटशील असे मानतोस काय? किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे नेत आहे हे न ओळखून तू त्याच्या दयेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?
पण तू आपल्या कठिणपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवीत आहेस. आणि, तो प्रत्येकाला त्याच्या कामांप्रमाणे प्रतिफळ देईल. जे चांगल्या कामात राहून सोशिकपणाने गौरव, मान व अमरपण मिळवू पाहतात त्यांना सनातन जीवन; पण जे विरोध करणारे सत्याचा अवमान करून अनीतीचे ऐकतात त्यांना क्षोभ व कोप. वाईट करणार्‍या प्रत्येक मनुष्याच्या जिवावर संकट आणि दुःख, प्रथम यहुद्याच्या, आणि हेल्लेण्याच्याही. १०पण चांगले करणार्‍या प्रत्येक मनुष्याला गौरव, मान आणि शांती, प्रथम यहुद्याला आणि हेल्लेण्यालाही. ११कारण देवाजवळ पक्षपात नाही.
१२कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील, आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्रानुसार दोषी ठरतील. १३कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील. १४कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परजन, जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नसताना ते स्वतः स्वतःसाठी नियमशास्त्र होतात; १५आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकांवर आरोप करतात, किवा एकमेकांचे समर्थन करतात, आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या मनांवर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात. १६देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे, जेव्हा माणसांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल.
१७पण जर, तू स्वतःला यहुदी म्हणवतोस, नियमशास्त्रावर अवलंबून राहतोस, आणि देवाचा अभिमान मिरवतोस; १८तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस, कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे; १९आणि तुझी खातरी आहे की, तूच अंधळ्यांचा वाटाड्या आहेस, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, २०अज्ञानांचा गुरू आणि लहान बाळांचा शिक्षक आहेस; कारण तुझ्याजवळ, नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे; २१तर मग जो तू दुसर्‍याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू गाजवतोस तो तू चोरी करतोस काय? २२व्यभिचार करू नये, असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय? २३जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय? २४कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, देवाच्या नावाची परजनांत, तुझ्यामुळे, निंदा होत आहे.
२५कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस  तर सुनत खरोखर उपयोगी आहे; पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुनत ही सुनत नाही असे झाले. २६म्हणून कोणी जर बेसुनत असून नियमशास्त्राचे निर्बंध पाळील तर त्याची बेसुनत स्थिती ही सुनत गणली जाणार नाही काय? २७आणि, देहाने बेसुनत असलेल्या कोणी जर नियमशास्त्राचे पालन केले, तर ज्या तुला लेख व सुनतविधी मिळाले असून तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय?
२८कारण बाहेरून यहुदी आहे तो यहुदी नाही; किंवा बाहेरून देहात सुनत आहे ती सुनत नाही. २९कारण जो अंतरी यहुदी आहे तो यहुदी होय; आणि जी आत्म्याला अनुसरून आहे, लेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुनत आहे ती सुनत होय. आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही पण देवाकडून होईल.    

—–रोम ३—–

मग यहुदी असणार्‍यास अधिक काय मिळाले? किंवा सुनतविधीकडून काय लाभ? प्रत्येक कारणामुळे पुष्कळ; पहिले हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपविली होती.
पण काहींनी विश्वास ठेवला नाही, तर काय? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय? तसे न होवो; देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा होवो. कारण असे लिहिले आहे की,
तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस,
आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.
पण आमची अनीती जर देवाचे नीतिमत्व प्रस्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? (मी मनुष्य म्हणून बोलतो.) तसे न होवो; नाहीतर, देव जगाचा न्याय कसा करील? कारण जर माझ्या लबाडीने देवाचे सत्य अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले, तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा? आणि, आपण चांगले यावे म्हणून वाईट करू या, असे का म्हणून नये? आम्ही असे सांगत असतो, अशी आमची निंदा होत आहे, आणि कोणी असे निक्षून म्हणतात; त्यांना यथान्याय शिक्षा आहे.

मग काय? आपण अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही. कारण सगळे, यहुदी व हेल्लेणी, पापाखाली आहेत, असा आधी, आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे. १०कारण असे लिहिले आहे की,
 नीतिमान कोणी नाही, एकही नाही.
  ११ज्याला समजते असा कोणी नाही,
  जो झटून देवाचा शोध करतो
असा कोणी नाही,
  १२ते सगळे बहकले आहेत,
  सगळे निरुपयोगी झाले आहेत;
  दया करणारा कोणी नाही, एकही नाही.
१३त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे.
  ते आपल्या जिभांनी कपट योजतात,
  त्यांच्या ओठांखाली नागिणीचे विष असते.
१४त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे.
  १५त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत.
  १६विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गांवर आहेत.
१७शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही.
१८त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.
१९आता आपण हे जाणतो की, नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते; म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे. २०कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान झाले.

२१पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे,  नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्व,आता, प्रकट झाले आहे. २२पण हे देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे. कारण तेथे कसलाही फरक नाही. २३कारण सर्वांनी पाप केले असून ते देवाच्या गौरवाला कमी पडतात; २४आणि त्याच्या कृपेने, दान केल्याप्रमाणे, ख्रिस्त येशूत मिळणार्‍या मुक्तीच्या द्वारे ते नीतिमान ठरतात. २५त्याला देवाने ह्यासाठी पुढे ठेवले की, विश्वासाद्वारे,  त्याच्या रक्ताकडून प्रायश्चित्त व्हावे, आणि त्याने आपले नीतिमत्व प्रगट करावे; कारण देवाच्या सहनशीलपणात, मागे झालेल्या पापांच्या उपेक्षेमुळे २६त्याने ह्या आताच्या काळात आपले नीतिमत्व प्रगट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला नीतिमान ठरविणारा व्हावे.
२७मग आपला अभिमान कुठे आहे? तो बाहेर ठेवला गेला. कोणत्या नियमामुळे? कृतींच्या काय? नाही, पण विश्वासाच्या नियमामुळे. २८म्हणून, मनुष्य नियमशास्त्राच्या कृतींवाचून विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो.
२९किंवा देव केवळ यहुद्यांचा देव आहे काय? परजनांचा नाही काय? हो, परजनांचाही आहे. ३०जर सुनत झालेल्यांस विश्वासाने, आणि सुनत न झालेल्यांस विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरवील तो तोच एक देव आहे, ३१तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न होवो. उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.      
 

—–रोम ४—–

मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणावे? कारण अब्राहाम कृतींनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान मिरवण्यास कारण होते; पण देवापुढे नाही. कारण शास्त्रलेख काय म्हणतो? अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणले गेले.
आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन उपकार म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते. पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार्‍यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो,त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणला जातो, देव ज्याच्या बाजूकडे कृतींशिवाय नीतिमत्व गणतो अशा माणसाचा आशीर्वाद दावीददेखील वर्णन करतो. तो असे म्हणतो की,
  ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे,
  ज्यांची पापे झाकली गेली आहेत
  ते धन्य होत.  
ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही
तो मनुष्य धन्य होय. 
मग हा आशीर्वाद सुनत झालेल्यांकरता आहे की, सुनत न झालेल्यांकरताही आहे? कारण आपण असे मानतो की, विश्वास अब्राहामाच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणला गेला. १०मग तो कसा गणला गेला? त्याची सुनत झाल्यानंतर किवा सुनत होण्याअगोदर? सुनत झाल्यानंतर नाही, पण सुनत होण्याअगोदर. ११आणि, तो सुनत न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्याला मिळालेल्या नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुनत ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुनत न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्व गणले जावे. १२आणि जे सुनत झालेले आहेत ते केवळ सुनत झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राहाम हा सुनत न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासाच्या पावलांवरून जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे.
१३कारण त्याने जगाचा वारीस व्हावे, हे वचन अब्राहामाला किवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्वाच्या द्वारे होते. १४कारण नियमशास्त्रामुळे जे आहेत ते वारीस झाले तर विश्वास निरर्थक आणि वचन निरुपयोगी केले गेले. १५कारण नियमशास्त्र क्रोध हा परिणाम घडविते. पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही.
१६आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे; ते ह्यासाठी की, नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही. पण अब्राहामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खातरीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे. १७(कारण असे लिहिले आहे की, मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.) ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मेलेल्यांना जिवंत करतो आणि नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलावतो त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे. १८तसे तुझे संतान होईल ह्या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्रांचा पिता व्हावे अशी आशा नसता, त्याने आशेने विश्वास ठेवला. १९आणि विश्वासात दुर्बळ नसल्यामुळे, तो सुमारे शंभर वर्षांचा असता त्याने आपल्या निर्जीव शरिराकडे व सारेच्या उदराच्या वांझपणाकडे लक्ष दिले नाही. २०त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही; तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता. २१आणि त्याची पूर्ण खातरी झाली की, त्याने ज्याचे वचन दिले ते पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे. २२आणि म्हणून ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणले गेले.
२३आता, ते त्याच्या हिशोबी गणले गेले, हे केवळ त्याच्याकरता लिहिले गेले नाही. २४पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ज्याने मेलेल्यांतून उठवले, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला, तर तो ते आपल्याही हिशोबी गणील. २५तो आपल्या अपराधांसाठी धरून दिला गेला आणि आपल्या निर्दोषीकरणासाठी तो उठवला गेला.

—–रोम ५—– 

आता, आपण विश्वासाने नीतिमान ठरविले गेलो आहोत, म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपला देवाशी समेट झाला आहे. आपण उभे आहोत त्या कृपेतही, त्याच्या द्वारे विश्वासाने, आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो. आणि इतकेच नाही, तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की, संकट धीर उत्पन्न करते, आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते. आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात, आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, देवाची प्रीती ओतली  जात आहे.

कारण, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मेला. कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित् कोणी मनुष्य मरेल, कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचित् कोणी मरण्याचेही धाडस करील, पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मेला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो. मग, आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की, त्याच्या द्वारे आपण क्रोधापासून तारले जाऊ. १०कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण तारले जाऊ. ११इतकेच नाही, पण आता ज्याच्या द्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान मिरवतो.

१२म्हणून एका मनुष्याद्वारे जसे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे तसेच सर्व मनुष्यांवर मरण आले. १३कारण नियमशास्त्र नसतेवेळी जगात पाप होते, पण नियमशास्त्र नसतेवेळी पाप हिशोबात येत नाही. १४तरी मरणाने आदामापासून मोशेपर्यंत राज्य केले; आदामाच्या उल्लंघनाच्या रूपाप्रमाणे ज्यांनी पाप केले नव्हते त्यांच्यावरही राज्य केले; आणि, तो तर, जो पुढे येणार होता त्याचा नमुना होता. १५पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही; कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्कळ मेले, तर त्याहून अधिक हे आहे की, देवाची कृपा व येशू ख्रिस्त ह्या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कळांसाठी विपुल झाली. १६आणि पाप करणार्‍या एकामुळे जसा परिणाम झाला, तशी देणगीची गोष्ट नाही; कारण एका अपराधामुळे दंडाज्ञेसाठी न्याय आला, पण अनेक अपराधांमुळे निर्दोषीकरणासाठी कृपादान आले. १७कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. १८म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले. १९कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरविले गेले, तसे एकाच्या आज्ञापालनामुळे अनेक जण नीतिमान ठरविले जातील.
२०शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली. २१म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे प्राप्त होणार्‍या सार्वकालिक जीवनासाठी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे राज्य चालवावे.   

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s