Romans 6-10

रोमकरांस पत्र

—–रोम ६—–

मग आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात रहावे काय? तसे न होवो. आपण जे पापाला मेलोत, ते त्यात ह्यापुढे, कसे जिवंत राहू? किंवा, आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूत बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की, जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मेलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे. कारण, जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत, तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले होऊ. आपण जाणतो की, आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो मेला आहे तो पापापासून मुक्त केला गेला आहे.
पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मेलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो. कारण आपण हे जाणतो की, मेलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता राहिली नाही. १०कारण तो मेला तो पापासाठी एकदाच मेला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. ११तसेच, आपण ख्रिस्त येशूत खरोखर पापाला मेलेले, पण देवाला जिवंत आहोत, असे तुम्ही स्वतःला गणा.
१२म्हणून, तुम्ही आपल्या मर्त्य शरिरात, त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका. १३आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मेलेल्यांतून जिवंत झालेले असे देवाला समर्पण करा, आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा. १४कारण तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही. कारण तुम्ही नियमशास्त्राखाली आणले गेला नाही, पण कृपेखाली आणले गेला आहा.

१५मग काय? मग आपण नियमशास्त्राखाली आणले गेलो नसून कृपेखाली आणले गेलो आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? तसे न होवो. १६तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहा. ते मरणासाठी पापाचे किवा नीतिमत्वासाठी आज्ञापालनाचे, हे तुम्ही जाणत नाही काय? १७पण देवाला धन्यवाद, कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला, त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्यात, १८आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्वाचे दास झाला. १९मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो. कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा. २०कारण तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा तुम्ही नीतिमत्वाच्या बाबतीत स्वतंत्र होता. २१आता तुम्हाला ज्यांची लाज वाटते त्या गोष्टींपासून तेव्हा तुम्हाला काय फळ मिळत होते? कारण त्या गोष्टींचा शेवट मरण आहे.
२२पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हाला पवित्रीकरण हे फळ आहे, आणि शेवट सार्वकालिक जीवन आहे. २३कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.

—–रोम ७—–

बंधूंनो, (मी नियम जाणणार्‍यांशी बोलत आहे,) मनुष्य जोवर जिवंत आहे तोवर त्याच्यावर नियमाची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय? कारण ज्या स्त्रीला पती आहे, ती पती जिवंत आहे तोवर त्याला नियमाने बांधलेली असते; पण तिचा पती मेला, तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते. म्हणून पती जिवंत असताना, जर ती दुसर्‍या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मेला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसर्‍या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
आणि म्हणून, माझ्या बंधूंनो, तुम्हीपण ख्रिस्ताच्या शरिराद्वारे नियमशास्त्राला मेलेले झाला आहात; म्हणजे तुम्ही दुसर्‍याचे, जो मेलेल्यांतून उठवला गेला त्याचे व्हावे; म्हणजे आपण देवाला फळ द्यावे. कारण आपण देहाधीन असतेवेळी, नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या. ६पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्याला आपण मेलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहो, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, लेखाच्या जुनेपणाने नाही.

मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? तसे न होवो. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते. कारण ‘लोभ धरू नको’ असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता. पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते. कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मेलो. १०आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली, हे मला दिसले. ११पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले.
१२म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे. १३मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय? तसे न होवो. पण जी चांगली आहे, तिच्या योगे, पाप हे पाप असे प्रगट व्हावे, म्हणून माझ्यात, ती मरण हा परिणाम घडविते; म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले.

१४कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र आत्मिक आहे, पण मी दैहिक आहे; पापाला विकलेला आहे. १५कारण मी काय करीत आहे, ते मला कळत नाही; कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो. १६मग मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो. १७मग आता, मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. १८कारण मी जाणतो की, माझ्यात (म्हणजे माझ्या देहात) काहीच चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही. १९कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो. २०मग आता, मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.

२१मग मला, मी चांगले करू इच्छीत असता, वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो. २२कारण मी माझ्या आतील मनुष्यपणात देवाच्या नियमाने आनंदित होतो; २३पण मला माझ्या अवयवांत दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवांत असलेल्या पापाच्या नियमाच्या कह्यात आणतो.
२४मी किती कष्टी मनुष्य! मला ह्या मरणाच्या शरिरातून कोण सोडवील?
२५मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे देवाचे उपकार मानतो.
२६म्हणजे मग, मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.

—–रोम ८—–

म्हणून जे ख्रिस्त येशूत आहेत त्यांना आता दंडाज्ञा नाही. कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले.
कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन धाडले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली. म्हणजे, आपण जे देहाला अनुसरून नाही, पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत, त्या आपल्यात, नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी. कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात. कारण दैहिक मनाचे होणे म्हणजे मरण; पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती. कारण दैहिक मन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही, आणि,त्याला खरोखर, होता येत नाही. म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत.
पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहा. कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही. १०पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मेलेले आहे, पण नीतिमत्वामुळे आत्मा जीवन आहे. ११पण ज्याने येशूला मेलेल्यांतून उठविले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठविले तो तुमच्यात राहणार्‍या, आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमचीही मर्त्य शरिरे जिवंत करील.
१२म्हणून, बंधूंनो, आपण देणेकरी आहोत; पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही. १३कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरिराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल.

१४कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवितो ते देवाचे पुत्र आहेत. १५कारण तुम्हाला, पुन्हा भय धरण्यास, दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे, ‘अब्बा, बापा,’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. १६तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो. १७आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहो. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण सोसले तर.

१८कारण मी गणतो की, ह्या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत. १९कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे. २०कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली; २१कारण सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल.
२२कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत  कण्हत व यातना सोशीत आहे. २३आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची,म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहो. २४कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशा ही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का? २५पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो.

२६त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात आत्माही आपल्याला साह्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो. २७आणि, जो अंतःकरणे शोधून पाहतो तो आत्म्याचे मन जाणतो,कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो.
२८कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात. २९कारण त्याला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रगट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधूंत ज्येष्ठ व्हावे. ३०आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले, आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरविले, आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवही केले.

३१मग ह्या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे?
जर देव आपल्या बाजूला आहे,
तर मग आपल्या विरुद्ध कोण?
३२आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्याला दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही?
३३देवाच्या निवडलेल्यांवर आरोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे. ३४दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मेला, हो, जो मेलेल्यांतून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.
३५ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय? ३६कारण असे लिहिले आहे की,
‘तुझ्याकरता आम्ही
दिवसभर मारले जात आहोत,
आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’
३७पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्या द्वारे ह्या सर्व गोष्टींत आपण विजयापेक्षा अधिक मिळवतो.
३८कारण माझी खातरी आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्‍या गोष्टी, किंवा बले, ३९किंवा उंची किंवा खोली, किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्या ठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.

—–रोम ९—–

मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही, आणि माझा विवेक, पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे की, मला मोठे दुःख होत आहे, आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे. कारण दैहिक दृष्ट्या जे माझे आप्त आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन. ते इस्राएली आहेत;  त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव आणि करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत. पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन.

पण देवाचे वचन, जणू, व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत, आणि अब्राहामाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले नाहीत. पण ‘इसहाकाद्वारे तुझे संतान गणले जाईल’; म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत.
कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी ह्या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’ १०आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबका गरोदर असतेवेळी, (११आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे, काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून, कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्‍याच्या इच्छेप्रमाणे,) १२तिला सांगण्यात आले होते की, ‘मोठा धाकट्याची सेवा करील.’ १३कारण असे लिहिले आहे की, ‘याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला.’

१४मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो. १५कारण तो मोशेला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन, आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन.’ १६तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही, किवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे. १७म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, ‘मी तुला ह्यासाठी मोठे केले की, तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रगट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजविले जावे.’ १८म्हणजे, त्याची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो, आणि त्याची इच्छा असेल त्याला तो कठिण करतो.
१९तू ह्यावर म्हणशील की, तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे? २०पण उलट, अरे मनुष्या, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्‍याला म्हणू शकेल? २१कुंभाराला एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय? २२मग, आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रगट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले,  २३आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रगट करावे म्हणून त्याने असे केले तर काय? २४त्याने ज्यांना केवळ यहुद्यांमधून नाही, पण परजनांमधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत. २५कारण तो होशेयाच्या ग्रंथात म्हणतो की,
‘जे माझी प्रजा नव्हते
त्यांना मी माझी प्रजा म्हणेन,
आणि जी माझी आवडती नव्हती,
तिला मी माझी आवडती म्हणेन.
२६आणि असे होईल की, त्यांना ज्या ठिकाणी,
तुम्ही माझी प्रजा नाही, असे म्हटले होते,
तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हटले जाईल.’
२७यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की,
‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या
जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली,
तरी एक अवशेष वाचविला जाईल.
२८कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे
प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’
२९आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे,
‘सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी
बीज ठेवले नसते
तर आम्ही सदोमासारखे असतो,
आणि गमोरासारखे झालो असतो.’

३०मग आपण काय म्हणावे? तर जे परजन नीतित्मत्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्व मिळविले आहे. ३१पण जे इस्राएल नीतिमत्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत. ३२आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले. कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले. ३३कारण असे लिहिले आहे की,
‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड,
एक अडथळ्याचा खडक ठेवतो.
आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो
तो लज्जित होणार नाही.’

—–रोम १०—–

बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरता देवाजवळ प्रार्थना आहे. कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही. कारण ते देवाच्या नीतिमत्वाविषयी अज्ञानी असता, आणि स्वतःचे नीतिमत्व प्रस्थापित करू पहात असता ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.

कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्‍या  नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्यायोगे जगेल.’ पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे म्हणते की, तू आपल्या मनात म्हणून नकोस की, स्वर्गात कोण चढेल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास) किंवा अधोलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मेलेल्यांमधून वर आणण्यास)
पण ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ, ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. म्हणजे, आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे. कारण, येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखाने पतकरशील आणि, देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. १०कारण, मनुष्य नीतिमत्वासाठी अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी मुखाने पतकर केला जातो.
११म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’ १२यहुदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे. १३‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’
१४मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्‍याशिवाय ते कसे ऐकतील?  १५आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण असे लिहिले आहे की,
‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात,
त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’
१६पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की,
‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर
कोणी विश्वास ठेवला आहे?’
१७तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
१८पण मी म्हणतो की, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, निःसंशय,
‘सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज
आणि जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द
पोहोचले आहेत.’
१९पण मी म्हणतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो,
‘जे राष्ट्र नाहीत त्यांच्याकडून
मी तुम्हाला ईर्ष्येस चढवीन,
एका निर्बुद्ध राष्ट्राकडून
मी तुम्हाला चेतवीन.’
२०पण यशया फार धीट होऊन म्हणतो की,
‘ज्यांनी माझा शोध केला नाही
त्यांना मी सापडलो आहे,
ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही
त्यांना प्राप्त झालो आहे.’
२१पण इस्राएलाविषयी तो म्हणतो,
‘मी एका, अवमान करणार्‍या,
आणि उलटून बोलणार्‍या प्रजेपुढे
दिवसभर माझे हात पसरले.’

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s