2 Corinthians 6-10

करिंथकरांस दुसरे पत्र

—–२ करिंथ ६—–

म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की, देवाची कृपा व्यर्थ घेऊ नका. कारण तो म्हणतो, मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले. पहा,आता अनुकूल समय आहे, पहा, आता तारणाचा दिवस आहे.
ह्या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला,  अडखळण्यास कारण देत नाही. पण प्रत्येक स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयी खातरी पटवतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटांत, आपत्तींत व दुःखांत; फटक्यांत, बंदिवासांत व दंगलींत; कष्टांत, जागरणांत व उपासांत; शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने; सत्याच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे बाळगून, मान होत असता आणि अपमान होत असता, निंदा होत असता आणि स्तुती होत असता आम्ही आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्य, आणि तरी खरे आहोत, अपरिचित आहोत आणि सुपरिचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जगत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो, आणि तरी मेलो नाही. १०आम्ही दुःखित, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले, आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
११अहो करिंथकर, तुमच्यासाठी आम्ही तोंड उघडले आहे आणि आमचे अंतःकरण मोठे झाले आहे. १२आमच्यात तुम्ही आकसला नाही, पण स्वतःच्या कळवळ्यात आकसला आहा. १३आता त्याचा मोबदला म्हणून तुमचेही अंतःकरण मोठे करा. हे मी तुम्हाला मुले म्हणून सांगतो.

१४विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर विजोड जोडलेले होऊ नका; कारण नीतीचा अनाचाराशी वाटा काय? आणि प्रकाशाची अंधकाराशी भागी काय? १५ख्रिस्ताचा बलियाराशी संबंध काय? किवा विश्वासूचा अविश्वासूजवळ भाग कसला? १६आणि देवाच्या मंदिराचा मूर्तीशी संबंध काय? कारण तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहा. कारण देवाने म्हटले आहे की, मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.
१७आणि म्हणून प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्धाला शिवू नका; आणि मी तुम्हाला आत घेईन. १८आणि मी तुम्हाला पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतो.   

—–२ करिंथ ७—–

प्रियांनो, आपल्याला ही वचने आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक विटाळापासून स्वतःला शुद्ध करून, आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्रतेची पूर्णतेप्रत वाढ करू.

आमचा स्वीकार करा; आम्ही कोणाचा अन्याय केला नाही, कोणाला बिघडवले नाही, कोणाचा फायदा घेतला नाही. कारण मी अगोदर सांगितले आहे की, तुमच्याबरोबर आम्ही जगावे आणि मरावे असे तुम्ही आमच्या अंतःकरणात आहात. माझे तुमच्याशी धैर्य मोठे आहे; माझा तुमच्याविषयी अभिमान मोठा आहे; मी आनंदाने भरलो आहे, आणि आपल्या सर्व दुःखांत मी अतिशय आनंदात आहे.
कारण आम्ही मासेदोनियास आल्यावर आमच्या देहाला स्वास्थ्य नव्हते; आम्ही सगळीकडून नाडले गेलो, बाहेरून भांडणे व आतून भीती, तरीही, जो देव लीन अवस्थेत असलेल्यांचे सांत्वन करतो त्याने आमचे तीताच्या येण्याकडून सांत्वन केले. आणि केवळ त्याच्या येण्यामुळे नाही, पण तो जेव्हा तुमची उत्कंठा, तुमचा शोक व तुमची माझ्याविषयीची ईर्ष्या ह्यांविषयी आम्हाला सांगत होता तेव्हा त्याचे तुमच्यात ज्या सांत्वनाने सांत्वन झाले त्यामुळे मी अधिक आनंदित झालो.
कारण मी एका पत्राने तुम्हाला दुःखी केले होते, तरी मला वाईट वाटत नाही; मला वाईट वाटले होते, कारण मला दिसले होते की, त्या पत्राने, जणू घटकाभर, तुम्हाला दुःखी केले होते; आणि, तुम्हाला दुःख झाले म्हणून मी आनंद करीत नाही; पण तुम्हाला दुःख होऊन पश्चात्ताप झाला म्हणून करतो. कारण तुम्ही दैविक प्रकारे दुःखी झाला, आणि आमच्याकडून तुमची हानी होऊ नये म्हणून असे झाले.
१०कारण दैविक दुःख हे पश्चात्तापकारक न होणार्‍या तारणासाठी पश्चात्ताप हा परिणाम घडविते. पण जगाचे दुःख मरण हा परिणाम घडविते. ११कारण बघा, तुम्हाला अशा दैविक प्रकारे दुःख झाले, ह्या एकाच गोष्टीने तुमच्यात काय आस्था उत्पन्न केली! हो, काय तुमचे प्रत्युत्तर, हो, काय संताप, हो, काय भय, हो, काय उत्कंठा, हो, काय ईर्ष्या, हो, काय न्यायबुद्धी! सर्व प्रकारे, स्वतःच्या  बाबतीत निर्दोष असल्याची तुम्ही स्वतःविषयी खातरी दिली आहे.
१२म्हणून मी तुम्हाला लिहिले, तरी जो अपराध करीत होता त्याच्या बाबीकरता नाही, किंवा ज्याचा अपराध केला गेला त्याच्या बाबीकरताही नाही, पण देवाच्या दृष्टीपुढे, तुमच्याविषयीची आमची काळजी तुम्हाला प्रगट केली जावी म्हणून ते लिहिले. १३ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे; आणि शिवाय आमच्या सांत्वनात आम्ही तीताच्या आनंदामुळे अधिक आनंदित झालो; कारण तुम्ही सर्वांनीही त्याच्या आत्म्याला स्वास्थ्य दिले होते.
१४आणि तुमच्याविषयी त्याच्यापुढे मी जर अभिमान मिरवला असेल तर मला काही लाज वाटत नाही. पण आम्ही ज्याप्रमाणे तुमच्याबरोबर सर्व काही खरेपणाने बोलतो, त्याचप्रमाणे तीतापुढील आमचा अभिमान खरेपणाचा आढळला आहे. १५तुमच्या सर्वांच्या आज्ञांकितपणाची म्हणजे तुम्ही भय धरून, कापत कापत, त्याचे कसे स्वागत केले ह्याची त्याला आठवण होत असता तुमच्यासाठी त्याचा जीव फार उत्कंठित होतो. १६सर्व गोष्टींत तुमच्याविषयी तो धैर्य धरतो, आणि म्हणून मी आनंद करीत आहे.  

—–२ करिंथ ८—–

शिवाय, बंधूंनो, माझी अशी इच्छा आहे की, मासेदोनियातील मंडळ्यांना देवाची जी कृपा पुरवली गेली तिच्याविषयी आम्ही तुम्हाला लिहावे. ती अशी की, त्यांच्या संकटाच्या मोठ्या कसोटीत, त्यांच्या आनंदाच्या विपुलतेने व त्यांच्या सखोल दारिद्य्राने, त्यांच्या औदार्याचे धन वाढविले.
कारण मी त्यांच्या शक्तीविषयी साक्ष देतो, आणि ते त्यांच्या शक्तीपलीकडेही स्वतः तयार होते. आणि पवित्र जनांच्या सेवेत आपण आम्हाला भाग घेऊ द्या, अशी त्यांनी फार आग्रहाने आमच्या कृपेची याचना केली; आणि आम्ही आशा केल्याप्रमाणे नाही, पण प्रथम त्यांनी आपल्या स्वतःला प्रभूला दिले, आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला दिले. आणि म्हणून आम्ही तीताला विनंती केली की, ज्याप्रमाणे त्याने तुमच्यात ह्या कृपेच्या कार्याचा आधी आरंभ केला, त्याप्रमाणे त्याने तुमच्यात ते पूर्णही करावे. तर ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत, विश्वासात,  बोलण्यात व ज्ञानात, सर्व आस्थेने, आणि आमच्यावरील तुमच्या प्रीतीत तुमची वाढ झालेली आहे त्याप्रमाणे ह्याही कृपेत तुमची वाढ होऊ द्या.

मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, पण दुसर्‍यांच्या आस्थेचे कारण झाल्यामुळे, मी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची पारख करावी, म्हणून हे सांगतो. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हाला समजली आहे, ती अशी की, तो संपन्न असता तुमच्याकरता दरिद्री झाला, म्हणजे त्याच्या दारिद्य्राने तुम्ही संपन्न व्हावे.
१०आणि ह्या बाबतीत मी मत देतो; कारण ज्या तुम्ही, एक वर्षापूर्वी केवळ हे करण्याचा आधी आरंभ केला नाही, पण हे करण्याची इच्छा धरण्यास आधी आरंभ केला आहे, त्या तुमच्यासाठी हे हिताचे आहे. ११तर आता, तुम्ही हे करणे पूर्ण करा, म्हणजे इच्छा धरण्याच्या उत्सुकतेप्रमाणे तुमच्याजवळ असेल त्यातून तिची पूर्णता व्हावी. १२कारण प्रथम उत्सुकता असेल तर माणसाजवळ जे असेल त्यावरून ती मान्य होते, नसेल त्यावरून नाही.
१३कारण दुसर्‍यांना स्वास्थ्य व तुमच्यावर भार असे नाही. १४पण सारख्या भागीने, आताच्या काळात, तुमच्या विपुलतेने त्यांच्या गरजेत पुरवठा व्हावा, म्हणजे तुमच्या गरजेत त्यांच्या विपुलतेने पुरवठा व्हावा;आणि सारखी भागी व्हावी. १५कारण असे लिहिले आहे की, पुष्कळ घेणार्‍यांजवळ अधिक नव्हते आणि थोडे घेणार्‍यांजवळ कमी नव्हते.

१६पण तुमच्याविषयी तीच उत्कंठा तीताच्या मनात ज्याने घातली त्या देवाला धन्यवाद! १७कारण त्याने खरोखर तो आग्रह मानला, पण तो अधिक उत्सुक असल्यामुळे तो स्वतः होऊन तुमच्याकडे येत आहे; १८आणि आम्ही ज्या बंधूला त्याच्याबरोबर पाठवीत आहोत तो असा आहे की, सर्व मंडळ्यांत त्याची सुवार्तेकरता प्रशंसा होत आहे. १९आणि इतकेच नाही, तर आम्ही प्रभूच्या गौरवासाठी व तुमच्या उत्सुकतेसाठी, ज्या देणगीचा कारभार चालवीत आहोत, त्या देणगीसोबत आमच्याबरोबर जाण्यास त्याला मंडळ्यांनी नेमले आहे; २०म्हणजे आम्ही ज्या देणगीचा कारभार चालवीत आहोत, त्या देणगीबाबत कोणी आम्हाला दोष लावावा, हे आम्ही टाळीत आहोत. २१कारण आम्ही प्रभूच्या दृष्टीपुढे नाही, पण माणसांच्या दृष्टीपुढेही प्रामाणिक गोष्टींवर लक्ष ठेवतो.
२२आणि आम्ही आमच्या ज्या बंधूला त्याच्याबरोबर पाठवीत आहोत, तो आवेशी आहे, हे आम्ही पुष्कळ वेळा, पुष्कळ गोष्टींत पारखले आहे, आणि तुमच्यावर मोठी भिस्त असल्यामुळे तो आता अधिक आवेशी आहे. २३तीताविषयी कोणी विचारील, तर तो माझा भागीदार आहे व तुमच्या बाबतीत माझा जोडीदार-कामकरी आहे, किंवा आमच्या बंधूंविषयी विचारील, तर ते मंडळ्यांचे जासूद व ख्रिस्ताचे गौरव आहेत. २४म्हणून त्यांना तुमच्या प्रीतीचे व तुमच्याविषयीच्या आमच्या अभिमानाचे तुम्ही मंडळ्यांपुढे प्रमाण दाखवा.  

—–२ करिंथ ९—–

आता पवित्र जनांच्या सेवेविषयी मी हे तुम्हाला लिहिणे अधिक होईल. कारण मी तुमची उत्सुकता जाणतो आणि म्हणून मी मासेदोनियातील मंडळ्यांपुढे तुमच्याविषयी असा अभिमान मिरवतो की, अखयाने गेल्या वर्षी आपली तयारी केली, आणि तुमच्या ईर्ष्येमुळे इकडील बहुतेक जण उत्तेजित झाले. तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बंधूंना धाडीत आहे; आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली तयारी केलेली असावी. आणि कदाचित्, मासेदोनियाचे लोक जर माझ्याबरोबर आले, आणि तुम्ही तयारीत नसलेले आढळला, तर ह्या खातरीमुळे आमची (आम्ही म्हणत नाही की, तुमची) फजिती होईल. म्हणून मला हे आवश्यक वाटते की, ह्यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी ह्या बंधूंना विनंती करावी, आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी; म्हणजे लोभाने घेऊन नाही, पण देणगी म्हणून ती तयार राहील.

पण असे आहे की, थोडे पेरणारा थोडेच पीक गोळा करील, आणि पुष्कळ पेरणारा पुष्कळ पीक गोळा करील. प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरविले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखाने किवा निरुपायाने देऊ नये. कारण जो खुशीने देतो त्याच्यावर देव प्रीती करतो. तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हाला सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे. कारण असे लिहिले आहे की,
तो चहूकडे वाटतो,
तो गरिबांना देतो,
त्याचे नीतिमत्व सर्वकाळ राहते.
१०आता जो पेरणार्‍याला बी व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बी पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्वाचे पीक वाढवील. ११तुम्ही सर्व औदार्यासाठी प्रत्येक गोष्टीत सधन केले जाल व देवाचे उपकारस्मरण होण्यास ते आमच्या द्वारे कारणीभूत होईल.
१२कारण ह्या सेवेचे काम केवळ पवित्र जनांच्या गरजा पुरविणे एवढेच नाही, पण देवाच्या पुष्कळ उपकारस्मरणात ते बहुगुणित होते. १३ज्या सेवेच्या परीक्षेखाली, ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या अंगिकारातील तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी तुम्ही केलेल्या उदार भागीमुळे ते देवाचे गौरव करतात; १४आणि देवाच्या तुमच्यावरील अपार कृपेमुळे ते स्वतः तुमच्यासाठी प्रार्थना करून उत्कंठित असतात.
१५देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याला धन्यवाद!

—–२ करिंथ १०—–

पण जो मी, पौल, तुमच्यात असताना लीन असतो, पण दूर असताना तुमच्याबरोबर धीट होतो, तो मी तुम्हाला ख्रिस्ताच्या सौम्यतेने व सहनशीलतेने विनंती करतो. पण मी तुम्हाला विनवणी करतो की, आम्ही देहाला अनुसरून चालतो असा आमच्याविषयी जे विचार करतात त्यांच्याबरोबर धीट होण्यास मी ज्या विश्वासाने विचार करीत आहे त्याप्रमाणे मी समोर आल्यावर मला धीट व्हावे लागू नये. कारण, आम्ही देहात चाललो, तरी देहाला अनुसरून लढत नाही. कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, पण देवासाठी  किल्लेकोट पाडण्यास ती समर्थ आहेत. तर्कवितर्क, आणि देवाच्या ज्ञानाविरुद्ध स्वतःस उंचावणारी प्रत्येक उंच गोष्ट पाडून टाकून, ख्रिस्ताच्या आज्ञापालनासाठी आम्ही प्रत्येक विचाराला कह्यात आणतो. आणि तुमचे आज्ञापालन पूर्ण झाल्यावर आम्ही प्रत्येक आज्ञाभंगाला शासन करण्यास तयार आहोत. 
तुमच्यासमोर जे आहे ते पहा; जर कोणी मानीत असेल की, मी स्वतः ख्रिस्ताचा आहे तर त्याने स्वतः पुन्हा विचार करावा की, तो जसा ख्रिस्ताचा आहे तसेच आम्हीही ख्रिस्ताचे आहोत. कारण, प्रभूने आम्हाला जो आमचा अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे, तुमचा नाश करण्यास दिलेला नाही, त्याचा मी अधिक अभिमान मिरवल्यास मला लाज वाटणार नाही; म्हणजे मी पत्रांद्वारे दटावू पाहतो असे माझ्याविषयी कोणास वाटू नये. १०कारण ते म्हणतात की, त्याची पत्रे वजनदार व जोरदार असतात, पण त्याच्या उपस्थितीत शरीर अशक्त आणि बोलणे उपेक्षणीय असते. ११अशा लोकांनी हा विचार करावा की, आम्ही जसे दूर असताना आमच्या पत्रांतील बोलण्यात असतो, तसे आम्ही जवळ असताना कृतीत असतो.
१२कारण, जे कित्येक जण आपण आपलीच प्रशंसा करतात त्यांच्यात आमची गणना करण्यास, किवा त्यांच्याशी आमची तुलना करण्यास आम्ही धजणार नाही, पण स्वतःला स्वतःचे प्रमाण लावून आणि स्वतःशी स्वतःची तुलना करून ते शहाणे होत नाहीत. १३आम्ही आमच्या हद्दीबाहेर अभिमान मिरवणार नाही; पण देवाने आम्हाला लावून दिलेल्या, आमच्या मर्यादेच्या हद्दीत, थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार्‍या हद्दीत आम्ही अभिमान मिरवू. १४कारण जणू, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो, अशा प्रकारे, आम्ही हद्दीबाहेर सरकत नाही. कारण, आम्ही ख्रिस्ताची सुवार्ता गाजवीत तुमच्यापर्यंत प्रथम आलो. १५हद्दीबाहेर दुसर्‍यांच्या कामात अभिमान मिरवीत आलो नाही; पण आम्हाला आशा आहे की, तुमचा विश्वास वाढेल तेव्हा, आमच्या हद्दीत, तुम्ही आमचे स्थान अधिक मोठे कराल. १६म्हणजे, दुसर्‍यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या गोष्टींचा अभिमान न मिरवता, आम्ही तुमच्या पलीकडील प्रांतांत सुवार्ता सांगू.
१७पण जो कोणी अभिमान मिरवतो त्याने प्रभूविषयी अभिमान मिरवावा; १८कारण स्वतःची प्रशंसा करतो तो नाही, पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तो लायक आहे.

Write Your Comment