John 1-5

संत योहान ह्याचे शुभवर्तमान

—–योहान १—–

प्रारंभी शब्द होता, शब्द देवाबरोबर होता, आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवाबरोबर होता. त्याच्या द्वारे सर्व झाले; आणि झाले असे काहीदेखील त्याच्याशिवाय झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; पण अंधाराने त्याला ग्रासले नाही.
देवाकडून पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला; त्याचे नाव योहान. तो स्वतः साक्षीसाठी, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; म्हणजे सर्वांनी त्याच्या द्वारे विश्वास ठेवावा. तो स्वतः तो प्रकाश नव्हता, पण, तो त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला.
जो प्रत्येक मनुष्याला प्रकाश देतो तो खरा प्रकाश जगात येणार होता. १०तो जगात होता, त्याच्या द्वारे जग झाले; पण जगाने त्याला ओळखले नाही. ११तो जे त्याचे स्वतःचे होते तेथे आला, पण जे त्याचे स्वतःचे होते त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. १२पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला. १३त्यांचा जन्म रक्ताकडून किवा देहाच्या इच्छेकडून, किवा मनुष्याच्या इच्छेकडून नाही, पण देवाकडून झाला आहे.
१४आणि शब्द देही झाला व त्याने आमच्यात वसती केली; तो कृपा व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. आम्ही त्याचे गौरव, ते पित्याच्या एकुलत्याचे असे गौरव आम्ही पाहिले. १५योहान त्याच्याविषयी साक्ष देतो आणि ओरडून म्हणतो,
“ज्याच्याविषयी मी म्हणालो की, ‘माझ्या मागून जो येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता’, तो हा आहे.”
१६आपल्या सर्वांना त्याच्या पूर्णतेतून कृपेवर कृपा प्राप्त झाली. १७कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे दिले गेले; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. १८कोणीही देवाला कधी पाहिले नाही. पण जो देवाचा एकुलता आपल्या पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे.

१९आणि योहानाची साक्ष ही आहेः जेव्हा यहुद्यांनी यरुशलेमहून याजक व लेवी ह्यांना त्याला विचारायला धाडले की,
“आपण कोण आहा?”
२०तेव्हा त्याने उघड सांगितले, नाकारले नाही, पण उघड सांगितले,
“मी ख्रिस्त नाही.”
२१आणि त्यांनी त्याला विचारले,
“मग कोण? आपण एलिया आहा काय?”
आणि तो म्हणतो,
“मी नाही.”
“आपण तो संदेष्टा आहा काय?”
आणि त्याने उत्तर दिले, 
“मी नाही.”

२२तेव्हा ते त्याला म्हणाले,
“आपण कोण आहा? म्हणजे ज्यांनी आम्हाला धाडलं त्यांना आम्ही उत्तर देऊ. आपण स्वतःविषयी काय सांगता?”
२३तो म्हणाला,
“यशया संदेष्ट्यानं म्हटल्याप्रमाणं ‘मी तो रानात ओरडणार्‍याचा आवाज, प्रभूचा मार्ग नीट करा.’ ” २४आणि ज्यांना पाठविले होते ते परोश्यांकडचे होते. २५आणि त्यांनी त्याला प्रश्न करून म्हटले,
“आपण जर ख्रिस्त नाही, किंवा एलिया नाही, किंवा तो संदेष्टा नाही, तर आपण बाप्तिस्मा का करता?”
२६योहान त्यांना उत्तर देऊन म्हणाला,
“मी पाण्यानं बाप्तिस्मा करतो, पण तुम्ही ज्याला ओळखीत नाही असा एक जण तुमच्यात उभा आहे. २७तो माझ्या मागून येणारा आहे. आणि त्याच्या वहाणांची वादी सोडायला मी लायक नाही.”
२८योहान जेथे बाप्तिस्मा करी त्या यार्देनेच्या पलीकडील बेथानीत ह्या गोष्टी झाल्या.
२९दुसर्‍या दिवशी तो येशूला आपल्याकडे येताना पाहतो आणि म्हणतो,
“बघा, जगाचं पाप वाहणारा देवाचा कोकरा! ३०ज्याच्याविषयी मी म्हणालो की, ‘माझ्या मागून एक जण येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता’ तो हा आहे. ३१मी त्याला ओळखीत नव्हतो; पण तो इस्राएलात प्रगट व्हावा म्हणून मी पाण्यानं बाप्तिस्मा करीत आहे.”
३२आणि योहान साक्ष देऊन म्हणाला,
“मी पाहिलं की, आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरला आणि त्याच्यावर राहिला. ३३मी त्याला ओळखीत नव्हतो, पण मी पाण्यानं बाप्तिस्मा करावा म्हणून ज्यानं मला धाडलं त्यानं मला सांगितलं की, ‘तू ज्याच्यावर आत्मा उतरला आणि राहिला हे बघशील तोच पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा करणारा आहे.’ ३४आणि मी पाहिलं आहे, आणि साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”

३५पुन्हा दुसर्‍या दिवशी योहान व त्याच्या शिष्यांतले दोघे उभे होते;  ३६आणि येशू चालला असता त्याने त्याच्याकडे न्याहाळून पाहिले, आणि तो म्हणतो,
“बघा, देवाचा कोकरा!”
३७त्या दोन शिष्यांनी तो बोलला ते ऐकले. आणि ते येशूच्या मागोमाग गेले. ३८तेव्हा येशू वळला, आणि त्यांना मागोमाग येताना पाहून, तो त्यांना म्हणतो,
“तुम्ही काय शोधता?”
ते त्याला म्हणाले,
“रब्बी, (म्हणजे गुरू) आपण कुठं राहता?”
३९तो त्यांना म्हणतो,
“या आणि पहा.”
ते गेले आणि त्यांनी तो कोठे राहतो ते बघितले आणि ते त्या दिवशी त्याच्याबरोबर राहिले; कारण, तो दहाव्या तासाचा सुमार होता.
४०योहानाचे बोलणे ऐकून त्याच्यामागे जाणार्‍या दोन शिष्यांत शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा एक होता. ४१तो आपला भाऊ शिमोन ह्याला प्रथम भेटतो व त्याला म्हणतो,
“आम्हाला मशिहा (म्हणजे ख्रिस्त) सापडला आहे.”
४२आणि त्याने त्याला येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पहात म्हटले,
“तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे खडक) म्हणतील.”
४३दुसर्‍या दिवशी तो गालिलात जायचे ठरवतो; आणि त्याला फिलिप आढळतो; तेव्हा येशू त्याला म्हणतो,
“माझ्यामागं ये.”
४४आता, फिलिप बेथसैदाचा, म्हणजे अंद्रिया व पेत्र ह्यांच्या गावचा होता. ४५फिलिपाला नथनेल आढळतो आणि तो त्याला म्हणतो,
“मोशेनं नियमशास्त्रात, आणि तसंच संदेष्ट्यांनी ज्याच्याविषयी लिहिलं आहे तो योसेफाचा पुत्र नासरेथकर येशू आम्हाला सापडला आहे.”
४६आणि नथनेल त्याला म्हणतो,
“नासरेथमधून काही चांगली गोष्ट निघू शकेल काय?”
फिलिप त्याला म्हणतो,
“ये आणि बघ.”
४७नथनेल आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले, आणि तो म्हणतो,
“बघा, खरोखर इस्राएली, ह्याच्यात कपट नाही.”
४८नथनेल त्याला म्हणतो,
“आपण मला कुठून ओळखता?”
येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“तुला फिलिपानं बोलावलं त्याआधी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हा मी तुला बघितलं.”
४९नथनेलाने त्याला उत्तर दिले,
“रब्बी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहा.”
५०येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“मी तुला म्हटलं की, मी तुला अंजिराच्या झाडाखाली बघितलं म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? तू ह्याहून मोठ्या गोष्टी पाहशील.”
५१आणि तो त्यांना म्हणतो,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, तुम्ही ह्यापुढं आकाश उघडलेलं आणि देवाचे दूत मनुष्याच्या पुत्रावरून चढत उतरत असलेले पहाल.”  

—–योहान २—–

आणि तिसर्‍या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते, आणि येशूची आई तेथे होती. आणि येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाला बोलावण्यात आले होते. आणि त्यांचा द्राक्षारस कमी पडला; तेव्हा येशूची आई त्याला म्हणते,
“त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”
येशू तिला म्हणतो,
“बाई, तुला माझ्याशी काय करायचं आहे? माझी घटका अजून आलेली नाही.”
त्याची आई सेवकांना म्हणते,
“हा तुम्हाला सांगतो ते करा.”
आता यहुद्यांच्या शुद्धिकरणाच्या नियमाप्रमाणे तेथे पाण्याच्या, सहा, दगडी कुंड्या ठेवलेल्या होत्या, त्यात प्रत्येकी दोन किंवा तीन घागरी मावत असत. येशू त्यांना म्हणतो,
“ह्या कुंड्या पाण्यानं भरा.”
आणि त्यांनी त्या काठोकाठ भरल्या. तेव्हा तो त्यांना म्हणतो,
“आता काढून भोजनकारभार्‍याकडे घेऊन जा.”
आणि ते घेऊन गेले.
आता ज्या पाण्याचा द्राक्षारस झाला त्याची जेव्हा भोजनकारभार्‍याने चव घेतली, आणि तो कोठला होता हे त्याला माहीत नव्हते, (पण ज्या सेवकांनी पाणी काढले त्यांना समजले होते) तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावतो, १०आणि त्याला म्हणतो,
“कोणीही मनुष्य अगोदर चांगला द्राक्षारस देतो, आणि लोक सुस्त झाल्यावर हलका देतो; पण आपण आतापर्यंत चांगला द्राक्षारस राखला आहे.”
११गालिलातील काना येथे येशूने हा आपल्या चिन्हांचा प्रारंभ केला व आपले गौरव प्रगट केले; आणि, त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

१२ह्यानंतर, तो व त्याची आई, आणि त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कपर्णहूमला गेले; पण ते तेथे फार दिवस राहिले नाहीत.

१३आता यहुद्यांचा वल्हांडण सण आला होता आणि येशू यरुशलेमला वर गेला. १४आणि त्याला मंदिरात गुरे,मेंढरे आणि कबुतरे विकणारे,  त्याचप्रमाणे सराफ बसलेले आढळले. १५तेव्हा त्याने एक, लहान दोर्‍यांचा कोरडा करून सगळ्यांना त्यांच्या मेंढरांगुरांसकट मंदिरामधून बाहेर घालवले; त्याने सराफांचे पैसे ओतले आणि मेज उलथले १६व त्याने कबुतरे विकणार्‍यांना म्हटले,
“ह्यांना इथून काढा. तुम्ही माझ्या बापाचं घर हे व्यापाराचं घर करू नका.”
१७आणि त्याच्या शिष्यांना आठवले की, ‘मला तुझ्या मंदिराची ईर्ष्या गिळील’ असे लिहिले आहे.
१८तेव्हा यहुद्यांनी उत्तर दिले आणि ते त्याला म्हणाले,
“तू हे करतोस तर आम्हाला चिन्ह काय दाखवतोस?”
१९येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले.
“तुम्ही हे मंदिर मोडा, आणि मी ते तीन दिवसांत उभं करीन.”
२०तेव्हा यहुदी म्हणाले,
“शेहेचाळीस वर्षं हे मंदिर बांधलं जात होतं; आणि तू ते तीन दिवसांत उभं करशील काय?”
२१पण तो आपल्या शरिराच्या मंदिराविषयी बोलला. २२म्हणून तो हे बोलला होता ह्याची त्याच्या शिष्यांना तो मेलेल्यांतून पुन्हा उठल्यावर आठवण झाली; आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.

२३आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरुशलेमात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. २४पण येशूने त्यांच्यावर भिस्त ठेवली नाही; कारण तो सगळ्यांना ओळखीत होता. २५आणि कोणी कोणा मनुष्याविषयी साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती; कारण मनुष्यात काय आहे हे तो ओळखीत होता.   

—–योहान ३—–

आता तेथे निकदेम नावाचा एक परोश्यांपैकी मनुष्य होता; तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे आला व त्याला म्हणाला,
“रब्बी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहा हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हं करीत आहा ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”
येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, कोणीही मनुष्य पुन्हा जन्मल्याशिवाय देवाचं राज्य बघू शकणार नाही.”
निकदेम त्याला म्हणतो,
“मनुष्य मोठा झाल्यानंतर कसा जन्मू शकेल? त्याला आपल्या आईच्या उदरात पुन्हा जाववेल काय? आणि जन्म घेववेल काय?”

येशूने उत्तर दिले,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, कोणीही मनुष्य पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्याशिवाय तो देवाच्या राज्यात येऊ शकत नाही. देहापासून जन्मलेला देह आहे, आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. तुम्हाला पुन्हा जन्मलं पाहिजे, असं मी तुम्हाला म्हटलं ह्याचं आश्चर्य करू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि तुम्ही त्याचा आवाज ऐकता, पण तो कोठून येतो आणि कुठं जातो हे तुम्हाला कळत नाही. आत्म्यापासून जन्मलेल्या, प्रत्येक मनुष्याचं असंच आहे.”
निकदेमाने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?”
१०येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले,
“तुम्ही इस्राएलाचे गुरू आहा, आणि ह्या गोष्टी जाणत नाही? मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, आम्ही जे जाणतो ते आम्ही बोलतो, आणि आम्ही जे पाहिलं आहे त्याची साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष स्वीकारीत नाही. १२मी पृथ्वीवरच्या गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही विश्वास ठेवीत नाही; मग, मी स्वर्गातल्या गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही विश्वास कसा ठेवाल? १३जो मनुष्याचा पुत्र स्वर्गातून आला त्याच्याशिवाय कोणीही मनुष्य स्वर्गात चढलेला नाही. १४आणि मोशेनं रानात जसा साप वर चढवला तसाच मनुष्याचा पुत्र वर चढवला गेला पाहिजे, १५ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सनातन जीवन मिळावं.”
१६कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सनातन जीवन मिळावे. १७कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
१८जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. १९आणि न्याय हा आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांना प्रकाशापेक्षा अंधार आवडला, कारण त्यांची कामे वाईट होती; २०कारण वाईट करणारा प्रत्येक मनुष्य प्रकाशाचा द्वेष करतो, आणि आपल्या कृतींचा दोष दाखवला जाऊ नये म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही. २१पण जो सत्य आचरतो तो आपली कामे देवाच्या ठायी केली गेली आहेत हे प्रगट व्हावे म्हणून प्रकाशाकडे येतो.

२२ह्यानंतर येशू व त्याचे शिष्य यहुदियाच्या प्रांतात आले; तो तेथे त्यांच्याबरोबर राहिला आणि बाप्तिस्मा करू लागला.
२३आणि योहानदेखील शालिमाजवळ, एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता; कारण तेथे पाणी पुष्कळ होते आणि लोक तेथे येऊन बाप्तिस्मा घेत. २४(कारण तोपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.)
२५तेव्हा योहानाच्या शिष्यांचा तेथे एका यहुद्याबरोबर शुद्धिकरणाविषयी वाद झाला. २६आणि, ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले,
“रब्बी, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता आणि आपण ज्याच्याविषयी साक्ष दिली तो, बघा, बाप्तिस्मा करीत आहे आणि त्याच्याकडे सगळे जात आहेत.”
२७योहानाने उत्तर देऊन म्हटले,
“मनुष्याला कोणतीही गोष्ट स्वर्गातून देण्यात आल्याशिवाय ती मिळू शकत नाही. २८मी ख्रिस्त नाही, पण मी त्याच्या पुढं पाठविलेला आहे, असं मी म्हणालो, ह्याची तुम्हीच माझ्याविषयी साक्ष द्याल. २९ज्याला वधू आहे तो वर; पण जो उभा राहतो आणि त्याचं ऐकतो तो वराचा मित्र होय. तो वराचा आवाज ऐकून आनंदित होतो; म्हणून माझा हा आनंद पूर्ण झाला आहे. ३०त्यानं वाढत गेलं पाहिजे आणि मी कमी होत गेलं पाहिजे.”
३१जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. ३२त्याने जे पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो, आणि, कोणीही त्याची साक्ष स्वीकारीत नाही. ३३ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने ‘देव खरा आहे’ ह्यावर आपला शिक्का लावला आहे. ३४कारण ज्याला देवाने पाठविले आहे तो देवाचे शब्द बोलतो. कारण तो मापाने आत्मा देत नाही. ३५पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व गोष्टी त्याच्या हातांत दिल्या आहेत. ३६जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सनातन जीवन आहे; पण जो पुत्राचा अवमान करतो तो जीवन पाहणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.    

—–योहान ४—–

तेव्हा, येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करीत होता व त्यांचा बाप्तिस्मा करीत होता हे परोश्यांनी ऐकले होते, हे जेव्हा प्रभूला समजले, (तरी, येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नव्हता पण त्याचे शिष्य करीत होते) तेव्हा त्याने यहुदिया सोडला आणि तो पुन्हा गालिलात जायला निघाला.

आणि त्याला शोमरोनामधून प्रवास करणे जरूर होते. आणि तो शोमरोनातल्या सुखार नावाच्या गावी येतो. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबाची विहीर होती. म्हणून प्रवासाने दमलेला येशू तसाच त्या विहिरीजवळ बसला, तेव्हा सुमारे सहावा तास होता.
तेथे एक शोमरोनी बाई पाणी शेंदायला येते. येशू तिला म्हणतो,
“मला प्यायला दे.”
(कारण त्याचे शिष्य गावात अन्न विकत घ्यायला गेले होते.) आणि ती शोमरोनी बाई त्याला म्हणते,
“आपण यहुदी असून माझ्याजवळ, एका शोमरोनी बाईजवळ प्यायला मागता, हे असं कसं?”
(कारण यहुदी शोमरोन्यांचे काही समाईक वापरीत नव्हते.)
१०येशूने तिला उत्तर देऊन म्हटले,
“देवाचं दान काय आहे, आणि मला प्यायला दे असं तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजलं असतं तर तू त्याच्याजवळ मागितलं असतंस आणि त्यानं तुला जिवंत पाणी दिलं असतं.”
११ती बाई त्याला म्हणते,
“महाराज, आपल्याजवळ शेंदायला काही नाही, आणि विहीर खोल आहे, मग आपल्याजवळ ते जिवंत पाणी कुठून? १२आपले पूर्वज याकोब ह्यांच्याहून आपण मोठे आहा काय? त्यांनी ही विहीर आम्हाला दिली; आणि ते स्वतः, त्यांचे पुत्र, आणि त्यांची जनावरं हिचं पाणी पीत असत.” 
१३येशूने तिला उत्तर देऊन म्हटले,
“जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, १४पण जो मनुष्य मी त्याला देईन ते पाणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. तर मी जे पाणी त्याला देईन ते त्याच्या ठायी जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”
१५ती बाई त्याला म्हणते,
“महाराज, मला ते पाणी द्या, म्हणजे मला तहान लागणार नाही, आणि मी इथं शेदायला येणार नाही.”
१६तेव्हा तो तिला म्हणतो,
“जा, तुझ्या नवर्‍याला बोलव, आणि इकडे ये.”
१७त्या बाईने उत्तर देऊन त्याला म्हटले,
“मला नवरा नाही.”
येशू तिला म्हणतो,
“तू ठीक बोललीस की, ‘मला नवरा नाही’; १८कारण तुला पाच नवरे होते, आणि तुझ्याजवळ आता आहे तो तुझा नवरा नाही – हे तू खरं बोललीस.”
१९ती बाई त्याला म्हणते,
“महाराज, मी समजते की, आपण कोणी संदेष्टे आहा. २०आमचे पूर्वज ह्या डोंगरावर उपासना करीत आणि, तुम्ही म्हणता की, जिथं उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमात आहे.”
२१येशू तिला म्हणतो,
“बाई, माझ्यावर विश्वास ठेव. तुम्ही ह्या डोंगरावर आणि यरुशलेमात पण पित्याची उपासना करणार नाही,अशी घटका येत आहे. २२तुम्ही ज्याला ओळखीत नाही त्याची उपासना करता; आम्ही ज्याला ओळखतो त्याची उपासना करतो. कारण यहुद्यांतून तारण आहे. २३पण जेव्हा खरे उपासक आत्म्यानं आणि खरेपणानं पित्याची उपासना करतील अशी घटका येत आहे, आणि आता आलीच आहे; कारण अशांनी आपली उपासना करावी अशी पित्याची इच्छा आहे. २४देव आत्मा आहे; आणि जे त्याची उपासना करतात त्यांनी आत्म्यानं आणि खरेपणानं त्याची उपासना केली पाहिजे.”
२५ती बाई त्याला म्हणते,
“मी जाणते की, मशिहा (म्हणजे ख्रिस्त) येणार आहे; तो येईल तेव्हा तो सर्व गोष्टी आम्हाला सांगेल.”
२६येशू तिला म्हणतो,
“तुझ्याशी बोलणारा मी तो आहे.”

२७त्यावर त्याचे शिष्य आले, आणि तो एका बाईशी बोलत होता ह्याचे त्यांनी आश्चर्य केले पण, कोणी असे म्हटले नाही की, ‘तू काय विचारतेस?’ किंवा ‘आपण तिच्याशी काय बोलता?’ २८त्या बाईने तेव्हा आपला पाण्याचा घडा सोडला आणि ती नगरात गेली, आणि लोकांना म्हणते, 
२९“या, एका मनुष्याला भेटा; त्यानं मला मी जे काही केलं ते सगळं सांगितलं. हा ख्रिस्त असेल काय?”
३०तेव्हा ते नगरातून बाहेर निघाले व त्याच्याकडे येऊ लागले.
३१मध्यंतरी त्याचे शिष्य त्याला विनंती करून म्हणाले,
“रब्बी, खाऊन घ्या.”
३२पण तो त्यांना म्हणाला,
“तुम्हाला माहीत नाही असं, मला खायला, माझ्याजवळ अन्न आहे.”
३३तेव्हा शिष्य एकमेकांस म्हणाले,
“ह्याला कोणी खायला आणून दिलं काय?”
३४येशू त्यांना म्हणतो,
“ज्यानं मला धाडलं आहे, त्याच्या इच्छेप्रमाणं करणं, आणि त्याचं काम पूर्ण करणं हे माझं अन्न आहे. ३५‘अजून चार महिने आहेत आणि कापणी येईल’, असं तुम्ही म्हणता ना? बघा, मी तुम्हाला सांगतो, तुमचे डोळे वर करून ही शेतं पहा; कारण ती, आधीच, कापणीसाठी पांढरी झाली आहेत. ३६कापणी करणारा वेतन मिळवतो आणि सनातन जीवनासाठी पीक गोळा करतो; म्हणजे जो पेरतो आणि जो कापतो त्यांनी बरोबर आनंद करावा. ३७आणि ह्या बाबतीत, ‘एक पेरतो आणि दुसरा कापतो’, ही म्हण खरी आहे. ३८तुम्ही ज्यावर कष्ट केले नाहीत ते कापायला मी तुम्हाला पाठवलं. दुसर्‍यांनी कष्ट केले आणि त्यांच्या कामात तुम्ही गेला आहा.”
३९तेव्हा जिने साक्ष दिली की, ‘त्यानं मला मी जे काही केलं ते सगळं सांगितलं’, त्या बाईच्या बोलण्यावरून नगरातल्या पुष्कळ शोमरोन्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ४०म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आले, तेव्हा त्यांनी त्याला आपल्याबरोबर राहायची विनंती केली; आणि तो तेथे दोन दिवस राहिला. ४१आणि, आणखी पुष्कळ जणांनी त्याच्या शब्दांवरून विश्वास ठेवला. ४२आणि ते त्या बाईला म्हणाले,
“आता आम्ही तुझ्या बोलण्यावरून विश्वास ठेवतो असं नाही; कारण आम्ही त्याचं ऐकलं आहे, आणि हा, खरोखर, जगाचा तारणारा आहे, हे आम्हाला समजलं आहे.”

४३मग, त्या दोन दिवसांनंतर, तो तेथून गालिलात गेला. ४४कारण येशूने स्वतः साक्ष दिली की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान नसतो. ४५आता, तो गालिलात आला, तेव्हा गालीलकरांनी त्याचे स्वागत केले;  कारण त्याने सणात यरुशलेमात केलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या; कारण ते वर सणाला गेले होते.

४६तेव्हा, तो गालिलातील काना येथे पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. तेव्हा एक अंमलदार होता, आणि त्याचा मुलगा कपर्णहूमला आजारी होता. ४७त्याने ऐकले की, येशू यहुदियातून गालिलात आला आहे; तेव्हा तो त्याच्याकडे आला, आणि त्याने खाली येऊन आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली. कारण तो मरायला टेकला होता. ४८तेव्हा येशू त्याला म्हणाला,
“तुम्ही लोक चिन्हं आणि अद्भुतं बघितल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही.”
४९तो अंमलदार त्याला म्हणतो,
“महाराज, माझा बाळ मरायच्या आधी आपण खाली या.”
५०येशू त्याला म्हणतो,
“जा, आपला मुलगा वाचला आहे.”
तेव्हा तो मनुष्य, त्याला येशूने म्हटलेल्या शब्दांवर विश्वास ठेवून, आपल्या मार्गाने गेला. ५१आणि तो खाली जात असता त्याला त्याचे दास भेटले, आणि त्याला म्हणाले की, आपला मुलगा वाचला आहे. ५२तेव्हा कोणत्या तासापासून त्याच्यात सुधारणा होऊ लागली म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला. आणि ते त्याला म्हणाले,
“काल, सातव्या ताशी त्याचा ताप निघाला.”
५३तेव्हा बापाला समजले की, ‘आपला मुलगा वाचला आहे’ असे येशू त्याला म्हणाला होता त्या ताशी होय. आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.
५४येशू यहुदियातून गालिलात आल्यावर त्याने पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे होय.    

—–योहान ५—–

त्यानंतर यहुद्यांचा एक सण होता आणि येशू यरुशलेमला वर गेला.
आता, यरुशलेमात, ‘मेंढरे’ तळ्याजवळ, ज्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात ते ठिकाण आहे. त्याला पाच पडव्या आहेत. त्यांत आजार्‍यांचा, अंधळ्यांचा, पांगळ्यांचा आणि लुळ्यांचा एक घोळका पडलेला होता. ४-५आणि तेथे एक मनुष्य होता; त्याला अडतीस वर्षे एक व्याधी होती. तो पडला होता हे येशूने बघितले व तो आता बराच काळ तसा होता हे त्याने ओळखले, तेव्हा तो त्याला म्हणतो,
“तुला बरं व्हायची इच्छा आहे काय?”
त्या आजारी मनुष्याने त्याला उत्तर दिले,
“महाराज, पाणी हालवलं जातं तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी नाही; आणि मी स्वतः जातो तेव्हा दुसरा माझ्या आधी जातो.”
येशू त्याला म्हणतो,
“ऊठ, तुझं बाजलं उचल आणि चाल.”
आणि, लगेच, तो मनुष्य बरा झाला व आपले बाजले उचलून चालला; आणि त्या दिवशी शब्बाथ होता.
१०तेव्हा जो बरा झाला होता त्याला यहुदी म्हणाले,
“हा शब्बाथ आहे, आणि तू हे बाजलं उचलणं योग्य नाही.”
११पण त्याने त्यांना उत्तर दिले,
“ज्यानं मला बरं केलं तोच मला म्हणाला, ‘तुझं बाजलं उचल आणि चाल’.”
१२त्यांनी त्याला विचारले,
“तुला जो ‘उचल आणि चाल’ म्हणाला तो मनुष्य कोण आहे?”
१३पण तो कोण होता हे जो बरा झाला होता त्याला कळले नव्हते; कारण त्या ठिकाणी घोळका असल्यामुळे येशू निघून गेला होता. १४त्यानंतर येशूला तो मंदिरात आढळतो आणि तो त्याला म्हणाला,
“बघ, तू बरा झाला आहेस; तुला काही अधिक वाईट होऊ नये म्हणून ह्यापुढं पाप करू नकोस.”
१५तो मनुष्य निघून गेला, आणि ज्याने त्याला बरे केले होते, तो येशू होता, हे त्याने यहुद्यांना सांगितले. १६आणि ह्या कारणावरून यहुद्यांनी येशूचा पाठलाग केला, कारण त्याने हे शब्बाथ दिवशी केले होते. १७पण येशूने त्यांना उत्तर दिले,
“माझा पिता अजूनपर्यंत काम करीत आहे, आणि मी काम करीत आहे.”
१८म्हणून ह्या कारणावरून यहुद्यांनी त्याला ठार मारायचा अधिक प्रयत्न केला; कारण त्याने शब्बाथ मोडला एवढेच नाही, पण देवाला स्वतःचा पिता म्हणून त्याने स्वतःला देवासमान केले होते.

१९म्हणून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले,
“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, पुत्र पित्याला जे करताना पाहतो त्याशिवाय तो स्वतः काही करू शकत नाही; कारण तो जे काही करतो ते त्याचा पुत्रही करतो. २०कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि तो स्वतः जे काही करतो ते त्याला दाखवतो. आणि तुम्ही आश्चर्य करावं म्हणून तो ह्याहून मोठी कामं तुम्हांला दाखवील. २१कारण पिता जसा मेलेल्यांना उठवतो आणि जिवंत करतो तसा पुत्रही त्याला जे पाहिजेत त्यांना जिवंत करतो. २२कारण पिता कोणाचा न्याय करीत नाही, पण त्यानं पुत्रावर सर्व न्याय सोपवला आहे. २३म्हणजे सर्वांनी, जसा ते पित्याला मान देतात तसा पुत्राला मान द्यावा. जो पुत्राला मान देत नाही तो ज्यानं त्याला धाडलं त्या पित्याला मान देत नाही. २४मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, जो माझं वचन ऐकतो आणि ज्यानं मला धाडलं त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सनातन जीवन आहे, आणि तो न्यायात येणार नाही; पण मरणातून जीवनात गेला आहे.
२५“मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, जेव्हा मेलेले देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे, आणि आता आलीच आहे, आणि जे ऐकतील ते जिवंत होतील. २६कारण जसं पित्याला स्वतःच्या ठायी जीवन आहे तसं पुत्राला स्वतःच्या ठायी जीवन असावं म्हणून त्यानं त्याला दिलं. २७आणि त्यानं त्याला न्याय करायचाही अधिकार दिला आहे, कारण तो मनुष्याचा पुत्र आहे. २८त्याचं आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरांत असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे. २९आणि चांगल्या गोष्टी करणारे जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आणि वाईट गोष्टी करणारे न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.

३०“मी स्वतः आपल्याकडून काही करू शकत नाही. मी जसं ऐकतो तसा न्याय करतो, आणि माझा न्याय उचित आहे. कारण मी स्वतःची इच्छा पहात नाही, पण ज्यानं मला धाडलं त्याची इच्छा पाहतो. ३१मी जर स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही; ३२माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे; आणि मला माहीत आहे की, माझ्याविषयी तो साक्ष देतो ती साक्ष खरी आहे. ३३तुम्ही लोकांना योहानाकडे पाठवलंत आणि त्यानं सत्याविषयी साक्ष दिली. ३४पण मी मनुष्याची साक्ष घेत नाही, तरी तुमचं तारण व्हावं म्हणून मी हे सांगत आहे. ३५तो एक जळणारा आणि प्रकाशणारा दिवा होता; आणि तुम्ही, काही काळ, त्याच्या प्रकाशात,हर्ष करायला तयार होता. ३६पण माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण मी जी कामं पूर्ण करावीत म्हणून पित्यानं माझ्यावर सोपविली आहेत, ती जी कामं मी करीत आहे ती माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्यानं मला पाठवलं आहे. ३७आणि ज्या पित्यानं मला धाडलं आहे त्यानंच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही कधी त्याचा आवाज ऐकलेला नाही, आणि त्याचं रूप पाहिलेलं नाही; ३८आणि त्याचं वचन तुमच्यात रहात नाही, कारण त्यानं ज्याला पाठवलं आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही. ३९तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही मानता की, त्यायोगे आपल्याला सनातन जीवन मिळेल. आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. ४०पण तुम्ही आपल्याला जीवन मिळावं म्हणून माझ्याकडे येऊ इच्छीत नाही. ४१मी मनुष्याकडून मान मिळवीत नाही. ४२पण मी तुम्हाला ओळखतो की, तुमच्यात देवाविषयी प्रीती नाही. ४३मी माझ्या पित्याच्या नावानं आलो आहे, आणि तुम्ही माझा स्वीकार करीत नाही; दुसरा स्वतःच्या नावानं आला तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल. ४४जे तुम्ही एकमेकांकडून मान मिळवता, आणि जो एकच देव आहे त्याच्याकडचा मान मिळवू पहात नाही ते तुम्ही कसा विश्वास ठेवू शकाल? ४५मी पित्यासमोर तुमच्यावर आरोप करीन, असं मानू नका. तुम्ही ज्याच्यावर भाव ठेवता तो मोशेच तुमच्यावर आरोप करीत आहे; ४६कारण तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता,कारण त्यानं माझ्याविषयी लिहिलं आहे. ४७पण तुम्ही त्याच्या लेखांवर विश्वास ठेवीत नाही, तर माझ्या शब्दांवर कसा विश्वास ठेवाल?”   

Write Your Comment