Hebrews 1-5

इब्रीयांस पत्र

—–इब्री १—–

जो देव मागील काळात, अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांद्वारे पूर्वजांशी बोलला, तो ह्या शेवटच्या दिवसांत, पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याला त्याने सर्व गोष्टींत वारीस म्हणून नेमले आहे; त्याच्या द्वारे त्याने युगे निर्माण केली. तो त्याच्या तेजाचे प्रतिबिंब व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून, आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने सर्व काही चालवीत आहे; त्याने पापांची शुद्धी केल्यावर तो वरील वैभवाच्या उजवीकडे बसला. कारण त्याला वारशाने, देवदूतांहून अधिक श्रेष्ठ नाव मिळाल्यामुळे तो तितका त्यांच्याहून अधिक श्रेष्ठ केला गेला आहे.
कारण, त्याने कोणत्या देवदूताला कधी म्हटले की, तू माझा पुत्र आहेस, मी आज तुला जन्म दिला आहे; आणि पुन्हा, मी त्याला पिता होईन आणि तो मला पुत्र होईल. आणि शिवाय, तो ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा असे म्हणतो की, देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत. आणि देवदूतांविषयी तो म्हणतो की, तो आपल्या दूतांना वायू करतो आणि सेवकांना अग्नीच्या ज्वाला करतो.
पण पुत्राविषयी तो म्हणतो की,
 हे देवा, तुझे राजासन युगानुयुग आहे,
तुझ्या राज्याचा राजदंड
हा नीतीचा राजदंड आहे.
तू नीतीवर प्रीती केलीस
व अनाचाराचा द्वेष केलास,
म्हणून देवाने, तुझ्या देवाने,
तुला तुझ्या सोबत्यांवर नेमून
हर्षाच्या तेलाचा अभिषेक केला आहे.
१०आणि,
हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाशे तुझ्या हातची कामे आहेत.
  ११ती नष्ट होतील, पण तू निरंतर आहेस.
  ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील;
१२तू ती एखाद्या वस्त्रासारखी, अंगरख्यासारखी, गुंडाळून ठेवशील, आणि ती बदलतील;
पण तू तोच आहेस,
आणि तुझी वर्षे लोपणार नाहीत.
१३पण, मी तुझे वैरी हे तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस, असे त्याने कधी कोणत्या देवदूताला म्हटले आहे? १४ते सगळे तर, जे तारणाचे वारीस होणार आहेत त्यांची सेवा करण्यास पाठविलेले, सेवक आत्मे नाही काय?  

—–इब्री २—–

ह्याकरता, आपण ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे; नाहीतर आपण वाहवत जाऊ. कारण असे की, देवदूतांद्वारे जे सांगितले होते ते वचन जर अढळ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाला व आज्ञाभंगाला त्याचे यथान्याय प्रतिफळ मिळाले, तर इतक्या मोठ्या तारणाकडे आपण दुर्लक्ष केल्यास कसे सुटू? प्रभूकडून प्रथम त्याची घोषणा सुरू होऊन ऐकणार्‍यांनी आम्हाला त्याची खातरी पटवली; देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे चमत्कार घडवून, तसेच आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याच्या देणग्यांद्वारे त्यांच्या जोडीला साक्ष दिली. कारण, आपण ज्याविषयी बोलतो ते येणारे जग त्याने देवदूतांच्या स्वाधीन ठेवले नाही. पण एकाने एके ठिकाणी निक्षून साक्ष देऊन म्हटले आहे की,
मानव तो काय की,
तू त्याची आठवण करतोस?
किवा मानवपुत्र तो काय की,
तू त्याची भेट घेतोस?
तू त्याला देवदूतांहून लवभर कमी केले आहे,
तू त्याला गौरव व मान
ह्यांनी मुकुटमंडित केले आहे;
तू सर्व काही त्याच्या अधीन
 त्याच्या पायाखाली ठेवले आहे.
त्याने सर्व काही त्याच्या अधीन त्याच्याखाली ठेवले आहे म्हणजे त्याने त्याच्याखाली ठेवले नाही असे काही राहू दिले नाही; पण आता सर्व काही त्याच्याखाली ठेवले आहे असे आपण अजून पहात नाही.
पण प्रत्येक मनुष्याकरता मरणाचा अनुभव घेण्यासाठी देवाच्या कृपेने ज्याला देवदूतांहून लवभर कमी केले होते, तो येशू मरणाच्या दुःखाद्वारे गौरव आणि मान ह्यांनी मुकुटमंडित केलेला आपण पाहतो. १०कारण ज्याच्यासाठी सर्व आहे, आणि ज्याच्या द्वारे सर्व झाले तो पुष्कळ पुत्रांना गौरवाकडे आणीत असता, त्यांच्या तारणाचा मार्ग काढणार्‍यांस दुःखातून नेऊन पूर्ण करावे हे त्याला उचित होते, ११कारण जो पवित्र करतो व जे पवित्र केले जातात ते सर्व एकापासून आहेत; आणि ह्या कारणामुळे तो त्यांना बांधव म्हणायला लाजत नाही. १२कारण असे म्हटले आहे की,
 बांधवांत मी तुझे नाव गाजवीन,
  मंडळीत मी तुझे स्तोत्र गाईन.
१३पुन्हा तो म्हणतो, मी तुझ्यावर भाव ठेवीन; आणि, पुन्हा असे की, बघा, मी आणि मला देवाने दिलेली मुले.
१४म्हणून मुले जशी रक्तात व देहात भागीदार होतात तसा तोही वाटेकरी झाला; म्हणजे त्याने मरणाचे बळ ज्याच्यात आहे त्या सैतानाला मरणाद्वारे हतबल करावे. १५आणि जे मरणाच्या भयामुळे सर्व आयुष्यभर स्वतः दास्याच्या अधिकाराखाली राहिले त्यांना त्याने मुक्त करावे.
१६कारण, त्याने, खरोखर देवदूतांना आवरले नाही, पण अब्राहामाच्या संतानाला त्याने आवरले. १७म्हणून त्याने सर्व बाबतींत, आपल्या बांधवांसारखे व्हावे हे त्याला आवश्यक होते; म्हणजे लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करता येण्यास त्याला देवाविषयीच्या गोष्टींत दयाळू आणि विश्वासू श्रेष्ठ याजक होता यावे. १८कारण त्याची परीक्षा होऊन त्याने स्वतः सोसल्यामुळे तो ज्यांची परीक्षा होते त्यांना साह्य करण्यास समर्थ आहे.

—–इब्री ३—–

म्हणून अहो पवित्र बंधू, स्वर्गीय पाचारणाचे वाटेकरी, तुम्ही आपल्या विश्वासाचा प्रेषित व श्रेष्ठ याजक जो ख्रिस्त येशू त्याच्याकडे लक्ष द्या. जसा मोशे त्याला ज्याने नेमले होते त्याच्या सगळ्या घरात विश्वासू होता, तसा हाही ज्याने त्याला नेमले त्याच्याशी विश्वासू होता. कारण घर बांधणार्‍याला घरापेक्षा अधिक मान असतो, तसा हा मोशेपेक्षा अधिक मोठ्या गौरवास पात्र गणलेला होता. कारण प्रत्येक घर कोणी तरी बांधलेले असते, पण सर्व बांधणारा देव आहे. आणि, ज्या गोष्टी पुढे सांगण्यात येणार होत्या त्या गोष्टींच्या साक्षीसाठी, मोशे खरोखर, त्याच्या सगळ्या घरात सेवक म्हणून विश्वासू होता; पण ख्रिस्त हा तर, त्याच्या घरावर पुत्र म्हणून विश्वासू होता. आपण जर आपले धैर्य, आणि आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत बळकट धरू तर आपण त्याचे घर आहो.

म्हणून पवित्र आत्मा असे म्हणतो की,
 आज तुम्ही त्याचा आवाज ऐकाल,
  तर त्यांनी रानातल्या उठावणीत,
  परीक्षेच्या दिवशी केल्याप्रमाणे,
  तुम्ही आपली मने कठिण करू नका.
  तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा केली,
  आणि माझी पारख केली,
आणि चाळीस वर्षे माझी कामे बघितली.
  १०मग मी त्या पिढीवर चिडून म्हणालो,
  हे मनाने नेहमी बहकतात
  आणि हे माझे मार्ग ओळखीत नाहीत.
  ११मी रागात शपथ घेऊन म्हटल्याप्रमाणे
  ते माझ्या विसाव्यात येणार नाहीत.
१२म्हणून बंधूंनो, तुम्ही अशी काळजी घ्या की, जिवंत देवाला सोडण्याइतके अविश्वासाचे दुष्ट अंतःकरण तुमच्यातील एखाद्यात असू नये. १३पण ज्याला आज म्हणण्यात आले तो आहे तोवर एकमेकांना बोध करा; म्हणजे पापाच्या फसवेपणामुळे तुमच्यातील कोणी कठिण होऊ नये. १४कारण, आपण आपला प्रारंभीचा भाव शेवटपर्यंत बळकट धरला तर आपण ख्रिस्ताचे वाटेकरी झालो आहोत. १५आपल्यासाठी हे म्हटले आहे की, आज तुम्ही त्याचा आवाज ऐकाल, तर त्यांनी उठावणीत केल्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठिण करू नका.
१६कारण, कोणी ऐकूनही चिरडीस आणले? मोशेमुळे जे मिसरातून निघाले त्या सर्वांनीच नव्हे काय? १७चाळीस वर्षे तो कोणावर चिडला होता? ज्यांनी पाप केले होते व ज्यांची प्रेते अरण्यात पडली त्यांच्यावर नव्हे काय? १८आणि ते माझ्या विसाव्यात येणार नाहीत, हे त्याने कोणाला शपथ घेऊन म्हटले? ज्यांनी अवमान केला होता त्यांना नव्हे काय?
१९ह्यावरून आपण हे पाहतो की, ते त्यांच्या अविश्वासामुळे प्रवेश करू शकले नाहीत.

—–इब्री ४—–

आणि ह्यावरून, त्याच्या विसाव्यात जाण्याचे वचन आपल्यासाठी राहिले असता, तुमच्यामधला कोणी त्याला दुरावलेला दिसू नये म्हणून आपण भय धरले पाहिजे. कारण, त्यांना सुवार्ता सांगण्यात आली तशीच आपल्याला सांगण्यात आली, पण, त्यांनी ऐकलेले वचन त्यांच्या विश्वासात न मुरल्यामुळे त्यांना त्याचा लाभ झाला नाही. कारण जगाच्या स्थापनेपासून कामे पूर्ण झाली होती तरी तो म्हणतो, मी रागात शपथ घेऊन म्हटल्याप्रमाणे ते माझ्या विसाव्यात येणार नाहीत. म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी विश्वास ठेवला आहे ते आपण त्या विसाव्यात जाणार आहोत. कारण सातव्या दिवसाविषयी तो एके ठिकाणी असे म्हणतो, आणि देवाने सातव्या दिवशी आपल्या सर्व कामांपासून विसावा घेतला. आणि येथे पुन्हा म्हणतो, ते माझ्या विसाव्यात येणार नाहीत.
म्हणजे कित्येक त्यात जाणार आहेत हे राहिले आहे व ज्यांना प्रथम त्याची सुवार्ता सांगण्यात आली ते अवज्ञेमुळे आत गेले नाहीत; म्हणून, तो एक दिवस ठरवतो व दाविदाच्या मुखावाटे इतक्या दीर्घ काळानंतर तो आज म्हणतो. कारण असे म्हटले आहे की, आज तुम्ही त्याचा आवाज ऐकाल तर तुम्ही आपली मने कठिण करू नका, कारण यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर देव त्यानंतर दुसर्‍या दिवसाविषयी बोलला नसता.
म्हणजे देवाच्या लोकांकरता शब्बाथाचा विसावा अजून राहिला आहे. १०कारण, देवाने आपल्या कामांपासून ज्याप्रमाणे विसावा घेतला, त्याप्रमाणे त्याच्या विसाव्यात जाणाराही आपल्या कामांपासून विसावा घेतो.
११म्हणून त्या विसाव्यात जाण्यास आपण झटू या; म्हणजे कोणी त्या आज्ञाभंगाच्या उदाहरणाप्रमाणे पडू नये.

१२कारण देवाचे वचन जिवंत व परिणामकारक आहे; कोणत्याही दुधारी तरवारीहून ते धारदार असून जीव व आत्मा, संधी व मज्जा हे अलग करून ते पार जाते; आणि मनातील विचार व हेतू ते पारखते. १३आणि कोणतीही निर्मिती त्याच्या दृष्टीला अदृश्य नाही; तर ज्याच्यापुढे आपला हिशोब आहे त्याच्या डोळ्यांपुढे सर्व गोष्टी उघड्या व उघड केलेल्या आहेत.

१४म्हणून देवाचा पुत्र येशू हा आकाशांतून पार गेलेला, असा महान, श्रेष्ठ याजक आपल्याला आहे, तर आपण केलेला पतकर आपण बळकट धरू या. १५कारण आपल्या अशक्तपणात जो सहानुभवी होऊ शकत नाही असा श्रेष्ठ याजक आपल्याला नाही, पण ज्याची आपल्याप्रमाणे सर्व बाबतींत परीक्षा झाली, आणि तरी जो निष्पाप राहिला, असा श्रेष्ठ याजक आपल्याला आहे. १६तर आपल्याला दया मिळावी आणि आपल्या गरजेच्या वेळी साह्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण कृपेच्या राजासनापुढे धैर्याने जाऊ या.     

—–इब्री ५—–

कारण लोकांतून निवडलेला, प्रत्येक श्रेष्ठ याजक लोकांकरता देवाच्या गोष्टींवर नेमलेला असतो; म्हणजे त्याने पापांबद्दल अर्पणे व बलिदाने अर्पण करावीत. आणि स्वतः तोही अशक्तपणाच्या वेढ्यात असल्यामुळे, जे लोक अज्ञानी व चुकणारे आहेत त्यांच्याविषयी त्याला सहानुभूती दाखविता येईल. म्हणून त्याला लोकांसाठी, तसेच आपल्या स्वतःसाठी पापांबद्दल अर्पण करणे आवश्यक होते.

आणि हा मान कोणी स्वतःला घेत नाही, पण तो अहरोनाप्रमाणे देवाने बोलावलेला असतो. त्याप्रमाणे ख्रिस्तानेही श्रेष्ठ याजक होण्यासाठी स्वतःचे गौरव केले नाही; पण तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, असे ज्याने त्याला म्हटले त्याने त्याला गौरवले आहे. कारण दुसरीकडे तो म्हणतो की, मलकीसेदेकाच्या प्रकारचा तू सनातन याजक आहेस.
तो देही झाला त्या दिवसांत, जो त्याला मरणातून वाचवायला समर्थ होता, त्याला त्याने मोठ्याने आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना आणि विनवण्या सादर केल्या, आणि त्याने सद्भय धरल्यामुळे त्याचे ऐकले गेले; आणि पुत्र होता तरी, त्याने सोसलेल्या गोष्टींकडून तो आज्ञापालन करणे शिकला, आणि पूर्ण केला गेल्यामुळे जे कोणी त्याच्या आज्ञा पाळतात त्या सर्वांसाठी तो सार्वकालिक तारणाचा कर्ता झाला आहे; १०तो देवाच्या वचनाप्रमाणे मलकीसेदेकाच्या प्रकारचा श्रेष्ठ याजक झाला आहे. 

११ह्या बाबतीत सांगण्यासाठी पुष्कळ गोष्टी आमच्याजवळ आहेत पण त्या समजावण्यास कठिण  आहेत; कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहा. १२कारण, तुम्ही एव्हाना शिक्षक व्हावे असा काळ आला असता देवाच्या वचनांची प्राथमिक मूलतत्त्वे तुम्हाला कोणी पुन्हा शिकवावीत अशी तुमची गरज आहे व तुम्ही असे झाला आहात की, तुम्हाला दुधाची गरज आहे; आणि जड अन्नाची गरज नाही. १३कारण, जो दुधाचा वाटेकरी असतो तो नीतीच्या वचनात अज्ञान असतो; कारण तो बाळ आहे. १४पण ज्यांनी आपल्या ज्ञानेंद्रियांना, तशा सवयीने, बरेवाईट ओळखण्याचे शिक्षण दिले आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.  

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s