Mark 1-5

संत मार्क ह्याचे शुभवर्तमान

—–मार्क १—–

येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रारंभः
        २-३‘पहा, मी माझ्या निरोप्याला
तुझ्या तोंडापुढे पाठवीन
आणि तो तुझा मार्ग तयार करील.’
 ‘रानात ओरडणार्‍याचा आवाजः
  प्रभूचा मार्ग तयार करा,
  त्याच्या वाटा नीट करा’,
हे यशया संदेष्ट्याने लिहिल्याप्रमाणे, रानात बाप्तिस्मा करणारा योहान हा पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत आला. तेव्हा सर्व यहुदिया प्रांत व यरुशलेमचे रहिवासी त्याच्याकडे आले; आणि त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
आणि योहान उंटाच्या केसांचा झगा वापरी व त्याच्या कमरेभोवती कातड्याचा कमरबंद असे; आणि तो टोळ व रानमध खात असे. तो घोषणा करून म्हणे,
“माझ्यापेक्षा एक समर्थ माझ्या मागून येत आहे; मी वाकून त्याच्या वहाणा काढायला लायक नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं केला, पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं करील.”

आणि त्या दिवसांत असे झाले की, येशू गालिलात नासरेथहून आला आणि त्याने योहानाकडून यार्देनेत बाप्तिस्मा घेतला. १०आणि, लगेच, तो पाण्यातून वर आला तेव्हा त्याने बघितले की, आकाश विदारले असून आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत होता. ११आणि आकाशातून वाणी झाली,
‘तू माझा प्रिय पुत्र आहेस,
तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.’
१२आणि, लगेच, आत्मा त्याला रानात घालवतो. १३तो चाळीस दिवस रानात होता आणि सैतानाकडून त्याची परीक्षा झाली. तो रानातील पशूंत होता, आणि देवदूत त्याची सेवा करीत होते.

१४आता, योहान अटकेत ठेवला गेल्यावर, येशू गालिलात आला व देवाच्या सुवार्तेची घोषणा करून, १५म्हणू लागला,
“काळ पूर्ण झाला आहे, आणि देवाचं राज्य जवळ आलं आहे. पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”

१६तो गालील समुद्राच्या कडेने जात असता त्याने शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया ह्यांना समुद्रात जाळे टाकताना बघितले; कारण ते कोळी होते. १७तेव्हा येशू त्यांना म्हणाला,
“तुम्ही माझ्यामागं या; आणि मी तुम्हाला माणसं धरणारे कोळी व्हायला तयार करीन.”
१८तेव्हा, लगेच, त्यांनी आपली जाळी ठेवली आणि ते त्याच्यामागे गेले. १९तो तेथून थोडा पुढे गेल्यावर त्याने जब्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना बघितले; ते पण मचव्यात जाळी नीट करीत होते. २०आणि,लगेच, त्याने त्यांना बोलावले, तेव्हा त्यांनी आपला बाप जब्दी ह्याला नोकरांबरोबर मचव्यात सोडले आणि ते त्याच्यामागे गेले.

२१आणि ते कपर्णहूमला जातात. तेव्हा, लगेच, शब्बाथ दिवशी तो सभास्थानात जाऊन त्यांना शिकवू लागला. २२आणि ते त्याच्या शिक्षणाने थक्क झाले; कारण तो स्वतःला अधिकार असल्याप्रमाणे त्यांना शिकवीत होता, शास्त्र्यांप्रमाणे नाही.
२३आणि त्याच वेळी, त्यांच्या सभास्थानात एक अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य होता, आणि तो ओरडून २४म्हणाला,
“अरे नासरेथकर येशू, तुला आमच्याशी काय करायचं आहे? तू आम्हाला नष्ट करायला आलास काय? तू कोण आहेस हे मी जाणतो. देवाचा पवित्र तू आहेस.”
२५पण येशूने त्याला दटावून म्हटले,
“तोंड बंद कर आणि ह्याच्यामधून बाहेर नीघ.”
२६तेव्हा अशुद्ध आत्म्याने त्याला पिळवटले आणि तो मोठ्या आवाजात ओरडून त्याच्यामधून बाहेर निघाला. २७आणि सगळे जण इतके थक्क झाले की, ते एकमेकांना विचारू लागले व म्हणू लागले,
“हे काय आहे? हे नवं शिक्षण काय आहे? हा तर अशुद्ध आत्म्यांना पण अधिकारानं आज्ञा करतो आणि ते त्याचं ऐकतात.”
२८आणि गालिलाच्या आसपासच्या सर्व प्रांतात लगेच त्याची कीर्ती पसरली.

२९आणि, लगेच, ते सभास्थानातून बाहेर आल्यावर याकोब व योहान ह्यांना बरोबर घेऊन शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी आले. ३०तेव्हा शिमोनाची सासू ताप येऊन पडली होती; आणि, लगेच, ते त्याला तिच्याविषयी सांगतात. ३१तेव्हा तो तिच्याकडे आला व त्याने तिला हाताला धरून उठवले; आणि, लगेच, तिच्यातून ताप निघाला व तिने त्यांची सेवा केली.
३२मग संध्याकाळ झाली तेव्हा, सूर्य मावळल्यावर, त्यांनी जे सर्व आजारी होते व ज्यांना भुते लागली होती त्यांना त्याच्याकडे आणले. ३३आणि सर्व नगर दारापुढे एकत्र जमले. ३४तेव्हा त्याने नाना रोगांनी आजारी असलेल्या पुष्कळ जणांना बरे केले आणि पुष्कळ भुते काढली. आणि त्याने भुतांना बोलू दिले नाही, कारण त्यांनी त्याला ओळखले होते.

३५मग सकाळी, अजून अंधार असताना, तो उठला व निघाला व रानातल्या एका जागी गेला; आणि त्याने तेथे प्रार्थना केली. ३६तेव्हा शिमोन व जे त्याच्याबरोबर होते ते त्याचा माग काढीत गेले. ३७आणि तो त्यांना सापडला तेव्हा ते त्याला म्हणतात,
“सगळे आपल्याला शोधीत आहेत.”
३८आणि तो त्यांना म्हणतो,
“जवळच्या गावात दुसरीकडे चला, म्हणजे तिकडेही घोषणा करता येईल; कारण मी ह्यासाठीच आलो आहे.”
३९आणि तो त्यांच्या सभास्थानांत घोषणा करीत व भुते काढीत सर्व गालिलात फिरला.

४०आणि त्याच्याकडे एक कुष्ठरोगी येतो; तो त्याला म्हणतो,
“जर आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करू शकाल.”
४१तेव्हा त्याला कळवळा येऊन त्याने आपला हात पुढे करून त्याला धरले;  आणि तो त्याला म्हणतो,
“माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”
४२आणि, लगेच, त्याच्यावरून कुष्ठ निघाले आणि तो शुद्ध केला गेला. ४३मग त्याने त्याला निक्षून सूचना देऊन लगेच पाठवून दिले. ४४आणि तो त्याला म्हणतो,
“पहा, कोणाला काही सांगू नकोस; पण जा, तू स्वतःला याजकाला दाखव, आणि त्यांना साक्ष म्हणून तुझ्या शुद्धिकरणासाठी मोशेनं नेमलेली अर्पणं ने.”
४५पण तो तेथून गेला आणि ही गोष्ट फार गाजवू लागला आणि पसरवू लागला; त्यामुळे येशू पुढे कोणत्याही नगरात उघडपणे जाऊ शकला नाही, पण बाहेर रानातल्या ठिकाणी असे, आणि सगळीकडून ते त्याच्याकडे येत.  

—–मार्क २—–

आणि पुन्हा काही दिवसांनी तो कपर्णहूमला आला. तेव्हा तो घरात होता हे ऐकण्यात आल्यामुळे पुष्कळ जण जमले. त्यामुळे त्यांना दारापुढे जागा होईना. आणि तो त्यांना वचनाची घोषणा करीत होता. तेव्हा चौघांनी उचलून आणलेल्या एका पक्षघाती मनुष्याला घेऊन ते त्याच्याकडे येतात. आणि जेव्हा गर्दीमुळे ते त्याच्याजवळ जाऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी तो होता तिथले धाबे उस्तरले, आणि ते फोडल्यावर, तो पक्षघाती मनुष्य ज्या बाजल्यावर पडून होता ते त्यांनी खाली सोडले.
आणि येशूने त्यांचा विश्वास बघून त्या पक्षघात झालेल्या मनुष्याला म्हटले,
“मुला, तुझ्या पापांची क्षमा केली आहे.”
पण शास्त्र्यांतले कित्येक तेथे बसले होते, आणि मनात विचार करीत होते की,
“हा असं का बोलतो? हा दुर्भाषण करतो! कोण एका देवाशिवाय पापांची क्षमा करू शकतो?”
आणि ते अशा प्रकारे स्वतःशी विचार करीत आहेत हे, लगेच, येशूने आत्म्याने जाणले, तेव्हा तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही का आपल्या मनात असल्या गोष्टीचा विचार करता? ह्या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा केली आह’ असं म्हणणं, किंवा ‘ऊठ, तुझं बाजलं उचल आणि चाल’, असं म्हणणं अधिक सोपं आहे? १०पण मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावं म्हणून,”
(तो त्या पक्षघाती मनुष्याला म्हणतो,)
११“मी तुला सांगतो, ऊठ, तुझं बाजलं उचल आणि तुझ्या घरी जा.”
१२आणि, तो उठला, त्याने लगेच आपले बाजले उचलले, आणि तो त्या सर्वांसमोर बाहेर निघाला. त्यामुळे ते सगळे आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करून म्हणाले,
“आम्ही असं कधीच बघितलं नव्हतं.”

१३आणि, पुन्हा तो समुद्राच्या किनार्‍याकडे निघाला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले, आणि तो त्यांना शिकवू लागला. १४आणि तो पुढे जात असता त्याने अल्फीचा लेवी ह्याला तो जकात नाक्यावर बसला असताना बघितले; आणि तो त्याला म्हणतो,
“माझ्यामागं ये.”
आणि तो उठला व त्याच्यामागे गेला.

१५आणि असे झाले की, तो त्याच्या घरी भोजनास बसला होता; आणि पुष्कळ जकातदार व पापीही येशूबरोबर व त्याच्या शिष्यांबरोबर भोजनास बसले; कारण ते पुष्कळ होते व त्याच्यामागे आले होते.
१६तो पाप्यांच्या व जकातदारांच्या पंगतीला जेवत होता, हे जेव्हा परोश्यांतील शास्त्र्यांनी बघितले तेव्हा ते त्याच्या शिष्यांना म्हणाले,
“हा जकातदारांच्या आणि पाप्यांच्या पंगतीला जेवतो.”
१७आणि येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणतो,
“निरोग्यांना वैद्याची गरज नाही, पण रोग्यांना आहे. मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही पण पाप्यांना बोलवायला आलो.”

१८आता योहानाचे शिष्य, आणि परोशी हे उपास करीत असत; आणि ते त्याच्याकडे येऊन त्याला म्हणतात,
“योहानाचे शिष्य आणि परोश्यांचे शिष्य का उपास करतात? आणि आपले शिष्य का करीत नाहीत?”
१९आणि येशू त्यांना म्हणाला,
“वर्‍हाड्यांबरोबर वर असताना ते उपास करू शकतील काय? त्यांच्याबरोबर वर असताना ते उपास करू शकणार नाहीत २०पण वर त्यांच्यामधून काढला जाईल तेव्हा ते दिवस येतील, आणि मग त्या दिवशी ते उपास करतील.
२१“कोणी कोर्‍या कापडाचं ठिगळ जुन्या कपड्यावर लावीत नाहीत;  नाहीतर, भरीचा तुकडा त्यातून उसकटतो, नवा जुन्यातून, आणि फाटकं अधिक वाईट होतं.
२२“आणि कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत भरीत नाहीत; नाहीतर, तो द्राक्षारस ते बुधले फोडील. मग द्राक्षारस आणि बुधले नष्ट होतात. पण नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात भरतात.”

२३आणि असे झाले की, तो शब्बाथ दिवशी शेतांवरून जात होता, आणि त्याचे शिष्य वाट काढीत असता कणसे तोडून घेऊ लागले. २४तेव्हा परोशी त्याला म्हणाले,
“बघा, शब्बाथ दिवशी जे करणं योग्य नाही ते हे का करीत आहेत?”
२५आणि तो त्यांना म्हणाला,
“जेव्हा दाविदाला गरज होती, त्याला आणि त्याच्याबरोबर जे होते त्यांना भूक लागली होती तेव्हा त्यानं काय केलं हे तुम्ही कधीच वाचलं नाही काय? २६अब्याथर श्रेष्ठ याजक असताना तो देवाच्या मंडपात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणी खाणं योग्य नाही, त्या त्यानं कशा खाल्ल्या आणि जे त्याच्याबरोबर होते त्यांनादेखील कशा दिल्या?”
२७आणि तो त्यांना म्हणाला,
“शब्बाथ मनुष्यासाठी झाला, मनुष्य शब्बाथासाठी नाही.”  

—–मार्क ३—–

आणि पुन्हा तो सभास्थानात गेला; तेथे एक मनुष्य होता आणि त्याचा एक हात वाळलेला होता. आणि तो ह्याला शब्बाथ दिवशी बरे करतो काय, म्हणजे आपल्याला त्याच्यावर आरोप करता येईल, म्हणून ते त्याच्या पाळतीवर राहिले.
आणि तो त्या हात वाळलेल्या मनुष्याला म्हणतो,
“मध्यभागी उभा रहा.”
आणि तो त्यांना म्हणतो, 
“शब्बाथ दिवशी चांगलं करणं योग्य आहे की, वाईट करणं? जीव वाचवणं किवा मारणं?”
पण ते गप्प राहिले. तेव्हा तो त्यांच्या मनाच्या  कठिणपणामुळे खिन्न झाला, त्याने रागाने त्यांच्याकडे सभोवार पाहिले व तो त्या मनुष्याला म्हणतो,
“तुझा हात पुढं कर.”
त्याने तो पुढे केला आणि त्याचा हात नीट झाला. तेव्हा परोशी बाहेर गेले आणि, लगेच, हेरोद्यांबरोबर आपण त्याला कसे नष्ट करावे म्हणून त्याच्याविरुद्ध मसलत घेतली.

आणि येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे गेला. तेव्हा गालिलातून एक मोठा समुदाय त्याच्या मागोमाग गेला; आणि यहुदियातून,  यरुशलेमातून, इदोमातून आणि यार्देनेच्या पलीकडून, आणि सोर व सिदोन ह्यांच्या सभोवतालून एक मोठा समुदाय, त्याने केलेल्या सर्व गोष्टींविषयी त्यांनी ऐकल्यामुळे, त्याच्याकडे आला. तेव्हा त्यांनी आपल्याला चेंगरू नये, म्हणून त्याने गर्दीमुळे, आपल्या शिष्यांना आपल्यासाठी एक लहान मचवा ठाम राहू द्यावा असे सांगितले. १०कारण त्याने पुष्कळांना बरे केले होते; त्यामुळे जितक्यांना पीडा होत्या ते आपण त्याला शिवावे म्हणून त्याच्यावर दाटी करीत होते. ११आणि अशुद्ध आत्मे त्याला पाहून त्याच्या पुढे पालथे पडत आणि ओरडून म्हणत,
“तू देवाचा पुत्र आहेस.”
१२आणि त्यांनी आपल्याला प्रगट करू नये म्हणून तो त्यांना पुष्कळ निक्षून सांगे.

१३आणि तो डोंगरावर जातो; आणि त्याला जे पाहिजे होते त्यांना तो आपल्याकडे बोलावतो, आणि ते त्याच्याकडे आले. १४आणि त्याने बारा जणांना नेमले. त्याचा हेतू हा होता की, त्यांनी आपल्याबरोबर असावे,आणि आपण त्यांना घोषणा करायला बाहेर पाठवावे. १५आणि त्यांना भुते काढायचा अधिकार असावा. १६आणि, त्याने हे बारा जण नेमलेः शिमोन, ह्याला त्याने पेत्र हे दुसरे नाव दिले; १७आणि जब्दीचा पुत्र याकोब व याकोबाचा भाऊ योहान, ह्यांना त्याने बोआनेर्गेस  (म्हणजे गर्जनेचे पुत्र) हे दुसरे नाव दिले; १८आणि अंद्रिया, फिलिप, बर्थलमय, मत्तय व थोमा, आणि अल्फीचा याकोब, तद्दय आणि शिमोन कनानी आणि १९ज्याने त्याला धरून दिले तो यहूदा इस्कार्योत.

२०मग तो घरी येतो. तेव्हा पुन्हा लोक जमतात; त्यामुळे त्यांना भाकरही खाता येईना. २१आणि हे त्याच्या नातलगांनी ऐकले, तेव्हा ते त्याला धरायला गेले; कारण ते म्हणाले,
“तो वेडा झाला आहे.”
२२आणि यरुशलेमहून खाली आलेले शास्त्री म्हणाले,
“ह्याच्यात बालजबूल आहे. हा भुतांच्या अधिपतीच्या साह्यानं भुतं काढतो.”
२३तेव्हा त्याने त्यांना आपल्याकडे बोलावले व तो त्यांच्याशी दाखल्यात बोलू लागला.
“सैतान सैतानाला कसा काढू शकेल?
२४“एखादं राज्य स्वतःविरुद्ध फुटलं तर ते टिकू शकणार नाही.
२५“एखादं घर स्वतःविरुद्ध फुटलं तर ते टिकू शकणार नाही.
२६“आणि सैतान स्वतःविरुद्ध उठला आणि फुटला तर तो टिकू शकणार नाही. त्याचा शेवट होईल.
२७“पण कोणी बलवान मनुष्याला आधी बांधल्याशिवाय त्या बलवान मनुष्याच्या घरात जाऊन त्याची सामग्री लुटू शकणार नाही; आणि नंतर त्याचं घर लुटील.
२८“मी तुम्हाला सत्य सांगतो, मानवपुत्रांना सर्व पापांची, आणि ते ज्यायोगे दुर्भाषण करतील त्या दुर्भाषणांची क्षमा केली जाईल, २९पण, जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करील त्याला सर्वकाळ क्षमा नाही, पण तो सर्वकाळच्या पापाचा दोषी आहे.”
३०कारण ते म्हणाले होते, त्याच्यात अशुद्ध आत्मा आहे.

३१तेव्हा तेथे त्याची आई व त्याचे भाऊ येतात आणि बाहेर उभे राहून त्यांनी त्याला बोलवायला निरोप पाठवला. ३२त्याच्या सभोवती लोक बसले होते आणि ते त्याला म्हणाले,
“बघा, आपली आई आणि आपले भाऊ बाहेर आपल्याविषयी विचारीत आहेत.”
३३आणि तो त्यांना उत्तर देऊन म्हणतो,
“माझी आई कोण, आणि माझे भाऊ कोण?”
३४आणि त्याच्या सभोवताली जे बसले होते त्यांच्याकडे त्याने सभोवार पाहून म्हटले,
“बघा, माझी आई, आणि माझे भाऊ! ३५कारण जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणं करील तोच माझा भाऊ, माझी बहीण आणि माझी आई.” 

—–मार्क ४—–

मग तो समुद्राजवळ शिकवू लागला, तेव्हा एक फार मोठा समुदाय त्याच्याजवळ जमला; म्हणून तो समुद्रावर एका मचव्यात जाऊन बसला, आणि सगळा समुदाय समुद्राजवळ जमिनीवर होता. आणि त्याने त्यांना दाखल्यांद्वारे पुष्कळ गोष्टी शिकवल्या आणि तो आपल्या शिक्षणात त्यांना म्हणाला,
“ऐका; बघा, एक पेरणारा पेरायला गेला. आणि असं झालं की, तो पेरीत असता काही बी वाटेच्या कडेला पडलं; तेव्हा पक्षी आले आणि त्यांनी ते खाऊन टाकलं. काही खडकाळ ठिकाणी पडलं; तिथं त्याला फार माती नव्हती. आणि, ते, लगेच, उगवलं कारण त्याला जमिनीची खोली नव्हती. ६पण सूर्य वर चढला तेव्हा ते करपलं, आणि त्याला मूळ नव्हतं म्हणून ते वाळून गेलं. आणि काही काटेर्‍यांत पडलं; आणि काटेरे वाढले; आणि त्यांनी त्याची वाढ खुंटवली, आणि त्यानं काही पीक दिलं नाही. दुसरे दाणे चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले आणि वाढले, आणि त्यांनी पीक दिलं; काहींनी तीसपट दिलं, काहींनी साठपट आणि काहींनी शंभरपट.”
आणि तो म्हणाला,
“ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
१०मग तो एकीकडे आल्यावर जे बारांसहित त्याच्याजवळ असत त्यांनी त्याला दाखल्याविषयी विचारले ११आणि तो त्यांना म्हणाला,
“देवाच्या राज्याचं रहस्य तुम्हाला दिलेलं आहे; पण बाहेरच्यांसाठी सर्व गोष्टी दाखल्यांत येतात १२म्हणजे,
 ‘त्यांनी पाहून पहावे आणि ओळखू नये,
  आणि ऐकून ऐकावे आणि विचार करू नये;
  नाहीतर, ते कदाचित वळतील,
  आणि त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल.’ ”
१३आणि तो त्यांना म्हणतो,
“तुम्हाला हा दाखला समजत नाही? आणि मग तुम्हाला सगळे दाखले कसे समजतील?
१४“पेरणारा वचन पेरतो. १५आणि वचन पेरलं तेथील वाटेच्या कडेचे हे आहेत; त्यांनी ऐकल्यावर, लगेच, सैतान येतो, आणि त्यांच्यात पेरलेलं वचन काढून घेतो. १६आणि त्याचप्रमाणं खडकाळ ठिकाणी पेरलेले हे आहेत; ते वचन ऐकल्यावर, लगेच, ते आनंदानं स्वीकारतात १७आणि त्यांच्यात मूळ नसतं, पण ते अल्पकाळ टिकतात. मग वचनामुळं संकट किवा छळ उद्भवताच त्यांना अडथळा होतो, १८आणि काटेर्‍यांत पेरलेले दुसरे हे आहेत; ज्यांनी वचन ऐकलं आहे असे हे आहेत; १९आणि ह्या युगाच्या काळज्या आणि धनाची भूल, आणि इतर गोष्टींविषयीच्या वासना आत शिरतात आणि वचनाची वाढ खुंटवतात; आणि ते निष्फळ होतं. २०आणि चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत; ते वचन ऐकतात आणि ते स्वीकारतात; आणि तीसपट आणि साठपट आणि शंभरपट पीक देतात.”

२१आणि तो त्यांना म्हणाला,
“दिवा काय मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवायला आणतात? आणि दिवठणीवर ठेवायला नाही?
२२“कारण काही प्रगट होऊ नये म्हणून लपवलेलं नाही. किंवा प्रकाशात येऊ नये म्हणून गुप्त ठेवलेलं नाही.
२३“कोणाला ऐकायला कान असतील तर तो ऐको.”
२४आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही काय ऐकता तिकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या मापानं मोजून द्याल त्यानंच तुम्हाला मोजून दिलं जाईल आणि त्याहून अधिक दिलं जाईल. २५कारण ज्याच्याजवळ आहे त्याला दिलं जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे तेपण त्याच्याकडून काढून घेतलं जाईल.”
२६आणि तो म्हणाला,
“देवाचं राज्य असं आहे की, जणू कोणी जमिनीत बी टाकावं, २७रात्री आणि दिवसा त्यानं निजावं आणि उठावं, आणि बी उगवून वाढावं; हे कसं होतं हे त्याला कळत नसतं, २८कारण जमीन आपल्या आपण पीक देते; आधी अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेले दाणे. २९पण पीक तयार झाल्यानंतर, लगेच, तो विळा घालतो, कारण कापणी आलेली असते.”
३०आणि तो म्हणाला,
“आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा द्यावी? किंवा कोणता दाखला लावावा? ३१ते एका मोहरीच्या बीप्रमाणं आहे. ते जमिनीत पेरलं जातं तेव्हा ते जमिनीतल्या सर्व बियाण्यांहून लहान असतं. ३२पण पेरलं जातं तेव्हा ते वाढतं आणि सर्व भाज्यांहून मोठं होतं; आणि इतक्या मोठ्या फांद्या पसरवतं की, आकाशातले पक्षी त्याच्या छायेत राहू शकतात.”
३३आणि अशा पुष्कळ दाखल्यांद्वारे तो त्यांना ऐकवेल त्याप्रमाणे वचन सांगत असे ३४आणि दाखल्यांशिवाय तो त्यांच्याशी बोलला नाही, आणि तो आपल्या शिष्यांना ते एकटे असताना सर्व समजावून सांगत असे.

३५आणि त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणतो,
“आपण दुसर्‍या बाजूकडे जाऊ.”
३६तेव्हा त्यांनी लोकांना लावून दिले, आणि तो मचव्यात असल्यामुळे त्यांनी त्याला तसेच नेले; तेव्हा दुसरे लहान मचवे त्यांच्याजवळ होते. ३७आणि मोठे, वावटळीचे वादळ उद्भवले, त्यामुळे मचव्यावर लाटा आदळून तो भरत होता ३८आणि तो बरामावर, उशीवर झोपला होता. तेव्हा ते त्याला उठवतात आणि म्हणतात,
“गुरू, आपण बुडतोत, ह्याची आपल्याला काळजी नाही काय?”
३९आणि तो उठला व त्याने वार्‍याला दटावले, आणि समुद्राला म्हटले,
“उगा रहा, शांत हो.”
आणि वारा थांबला व मोठी स्तब्धता आली ४०आणि तो त्यांना म्हणाला,
“तुम्ही असे भितरे कसे? तुमच्यात विश्वास नाही हे कसं?”
४१तेव्हा ते फार भ्याले व एकमेकांस म्हणाले,
“मग हा कोण आहे की, वारा आणि समुद्रदेखील ह्याचे ऐकतात?”

—–मार्क ५—–

आणि ते समुद्राच्या दुसर्‍या बाजूस गरसेकरांच्या प्रांतात आले. आणि तो मचव्यातून बाहेर आला तेव्हा त्याला, लगेच, थडग्यांमधून बाहेर आलेला एक मनुष्य भेटला. त्याच्यात एक अशुद्ध आत्मा होता. थडग्यांत त्याचे राहण्याचे ठिकाण होते. कोणीही मनुष्य आता त्याला साखळ्यांनी बांधू शकत नव्हता; कारण, त्याला पुष्कळदा पायबेड्यांत व साखळ्यांत जखडले होते, आणि त्याने साखळ्या तोडल्या होत्या व पायबेड्यांचे तुकडे केले होते; आणि कोणी मनुष्य त्याला कह्यात आणू शकत नव्हता. आणि तो सतत, रात्रंदिवस, डोंगरांत व थडग्यांत राहून ओरडत असे व स्वतःला दगडांनी ठेचीत असे. आणि त्याने येशूला बघितले तेव्हा तो धावत आला आणि त्याच्या पाया पडला. आणि मोठ्या आवाजात ओरडून तो म्हणतो,
“येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय करायचं आहे? मी तुला देवापुढं शपथ घालतो, तू मला पिडू नकोस.”
कारण तो त्याला म्हणत होता,
“अरे अशुद्ध आत्म्या, ह्या मनुष्यातून बाहेर नीघ.”
आणि त्याने त्याला विचारले,
“तुझं नाव काय?”
आणि त्याने उत्तर देऊन म्हटले,
“माझं नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत.”
१०आणि, त्याने त्यांना त्या प्रांतातून बाहेर पाठवू नये अशी त्यांनी त्याला फार विनंती केली. ११आता एक,डुकरांचा मोठा कळप तेथे डोंगराजवळ चरत होता; १२आणि त्यांनी त्याला विनंती करून म्हटले,
“आम्हाला त्या डुकरांत धाड, म्हणजे आम्ही त्यांच्यात शिरू.”
१३आणि त्याने त्यांना परवानगी दिली तेव्हा ते अशुद्ध आत्मे बाहेर आले आणि त्या डुकरांत शिरले. आणि तो कळप एका कड्यावरून जोरात पळत खाली समुद्रात गेला. ती सुमारे दोन हजार होती आणि समुद्रात गुदमरली.
१४तेव्हा जे त्यांची राखण करीत होते ते तेथून पळाले आणि ते त्यांनी नगरात व शिवारात सांगितले; तेव्हा ते येशूकडे येतात, १५आणि ज्याला भुते लागली होती, म्हणजे ज्याच्यात सैन्य होते, त्याने कपडे घातले आहेत व तो शुद्धीवर आलेला आहे, आणि बसला आहे हे ते पाहतात. आणि ते भ्याले. १६आणि ज्यांनी ते बघितले होते त्यांनी ज्याला भुते लागली होती त्याला हे कसे झाले हे त्यांना सविस्तर सांगितले, आणि डुकरांविषयीही सांगितले. १७तेव्हा ते त्याला आपल्या प्रांतातून निघून जायची विनंती करू लागले. १८आणि तो मचव्यात चढत होता तेव्हा ज्याला भुते लागली होती त्याने आपण त्याच्याबरोबर असावे म्हणून त्याला तशी विनंती केली. १९त्याने त्याला मुभा दिली नाही; पण तो त्याला म्हणतो,
“तू आपल्या घरी, आपल्या लोकांकडे जा, आणि प्रभूनं तुझ्यासाठी किती मोठ्या गोष्टी करून तुझ्यावर दया केली आहे ते त्यांना सांग.”
२०तेव्हा तो गेला आणि येशूने त्याच्यासाठी ज्या मोठ्या गोष्टी केल्या होत्या त्या दकापलीस प्रांतात गाजवू लागला. आणि सर्वांनी आश्चर्य केले.

२१आणि येशू मचव्याने पुन्हा दुसर्‍या बाजूस आला, तेव्हा पुष्कळ लोक त्याच्याजवळ जमले आणि तो समुद्राजवळ होता २२आणि याईर नावाचा एक सभास्थानाचा अधिकारी येतो आणि त्याला बघून तो त्याच्या पायाशी पालथा पडतो; २३आणि त्याला फार विनंती करून म्हणतो,
“माझी लहान मुलगी अंत्यावस्थेस पोहचली आहे, ती बरी व्हावी आणि जगावी म्हणून आपण या, आणि तिच्यावर आपले हात ठेवा.”
२४तेव्हा तो त्याच्याबरोबर गेला; आणि पुष्कळ लोक त्याच्या मागोमाग गेले व त्याला चेंगरू लागले.
२५आणि तेथे, बारा वर्षे रक्तस्राव लागलेली एक स्त्री होती; २६तिने पुष्कळ वैद्यांकडून पुष्कळ सोसले होते,आपल्याजवळचे सगळे खर्चले होते, आणि तिला उपयोग न होता उलट अधिक वाईट स्थिती आली होती. २७तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि ती मागच्या गर्दीत आली व त्याच्या वस्त्राला शिवली. २८कारण ती म्हणत होती,
“मी केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.”
२९आणि, लगेच, तिच्या रक्ताचा झरा सुकला, आणि, ती त्या पीडेतून बरी झाली होती, हे तिला शरिरात जाणवले.
३०आणि आपल्यामधून गुण बाहेर गेला हे अंतरी जाणून, येशू त्या गर्दीत मागे फिरला, आणि म्हणाला,
“माझ्या वस्त्रांना कोण शिवलं?”
३१तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणाले,
“लोक आपल्याला चेंगरीत आहेत हे आपण पाहता आणि म्हणता, ‘मला कोण शिवलं?’ 
३२आणि जिने हे केले होते तिला बघायला त्याने सभोवार पाहिले. ३३पण ती स्त्री आपल्यास काय झाले हे जाणून भीत भीत व कापत कापत येऊन, त्याच्या पुढे पालथी पडली व तिने त्याला सर्व खरे सांगितले. ३४तेव्हा तो तिला म्हणाला,
“मुली, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे; शांतीत जा आणि तुझ्या पीडेपासून बरी हो.”
३५तो बोलत होता तेवढ्यात, सभास्थानाच्या अधिकार्‍याकडचे कोणी आले, आणि म्हणाले,
“आपली मुलगी मरण पावली; गुरूंना आणखी त्रास का देता?”
३६पण त्यांनी सांगितलेला निरोप येशूला ऐकू आल्यामुळे तो त्या सभास्थानाच्या अधिकार्‍याला म्हणतो,
“भिऊ नको, मात्र विश्वास ठेव.”
३७मग त्याने पेत्र आणि याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही आपल्या मागोमाग येऊ दिले नाही ३८आणि ते सभास्थानाच्या अधिकार्‍याच्या घराकडे येतात. तो तेथील गलबला, आणि रडणारे लोक व मोठ्याने आक्रोश करणारे लोक पाहतो ३९आणि तो आत आल्यावर त्यांना म्हणतो,
“तुम्ही का गलबला करता आणि रडता? मुलगी मेली नाही, पण झोपली आहे.”
४०तेव्हा ते त्याला हसले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवल्यावर तो मुलीच्या बापाला व आईला, आणि त्याच्याबरोबर जे आले होते त्यांना बरोबर घेतो, आणि मुलगी होती तेथे आत जातो ४१आणि मुलीच्या हाताला धरून तो तिला म्हणतो,
“तलीथा कुमी.” (म्हणजे मुली, मी तुला सांगतो, ऊठ.) ४२आणि, लगेच, ती मुलगी उठून चालली, कारण ती बारा वर्षांची होती; आणि त्यांना मोठे आश्चर्य वाटून ते चकित झाले. ४३मग त्याने त्यांना फार निक्षून सांगितले की, हे कोणाला कळू नये; आणि तिला खायला द्यावे म्हणून आज्ञा केली.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s