Romans 11-16

रोमकरांस पत्र

—–रोम ११—–

तर मी म्हणतो की, देवाने आपल्या प्रजेला सोडले आहे काय? तसे न होवो. कारण मीही इस्राएली आहे, अब्राहामाच्या संतानातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने सोडले नाही. शास्त्रलेख एलियाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की, ‘प्रभू,  त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना मारले आहे, आणि तुझ्या वेद्या खणून पाडल्या आहेत; आणि मी एकटा राहिलो आहे, आणि ते माझ्या जिवावर टपले आहेत.’
पण देवाचे उत्तर त्याला काय मिळाले? ‘ज्यांनी बालापुढे गुडघा टेकला नाही, असे एकंदर सात हजार लोक मी माझ्यासाठी राखले आहेत.’ मग त्याचप्रमाणे ह्या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे. आणि जर कृपेने आहे, तर कृतीवरून नाही; तसे असेल तर कृपा ही कृपा होत नाही.
मग काय? इस्राएल जे मिळवू पहात आहे ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्यांना ते मिळाले आणि बाकी अंधळे केले गेले. कारण असे लिहिले आहे की,
 ‘देवाने त्यांना ह्या दिवसापर्यंत
  सुस्तीचा आत्मा दिला आहे;
  त्यांनी पाहू नये असे डोळे
  आणि त्यांनी ऐकू नये असे कान
दिले आहेत.’
त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की,  
 ‘त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे व सापळा,
  आणि अडथळा व प्रतिफळ होवो.
  १०त्यांनी पाहू नये म्हणून
  त्यांचे डोळे अंधकारमय होवोत,
  आणि तू त्यांची पाठ सतत वाकव.’
११मग मी म्हणतो की, त्यांनी पडावे म्हणून त्यांना अडखळण आहे काय? तसे न होवो. पण त्यांच्या पडण्यामुळे त्यांना ईर्ष्येस चढवण्यास तारण परजनांकडे आले आहे. १२आता, त्यांचे पडणे हे जर जगाचे धन झाले, आणि त्यांचे कमी होणे हे जर परजनांचे धन झाले, तर त्यांचा भरणा होणे हे त्याहून किती अधिक होईल?

१३पण, तुम्ही जे परजन आहात, त्या तुमच्याशी मी बोलत आहे. ज्याअर्थी, मी परजनांचा प्रेषित आहे त्याअर्थी, मी माझ्या सेवेचे गौरव करतो. १४म्हणजे माझ्या देहाचे आहेत त्यांना मी शक्य त्यायोगे ईर्ष्येस चढवून त्यांच्यामधील काहींचे तारण करावे. १५कारण त्यांचा त्याग म्हणजे जगाशी समेट आहे तर त्यांचा स्वीकार म्हणजे मृतांतून जीवन नाही काय? १६कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसाच सगळा गोळा आहे, आणि मूळ जर पवित्र आहे तर तसेच फाटे आहेत.
१७आणि काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता, त्यांत कलम करून जोडला गेलास, आणि तू त्या जैतुनाच्या स्निग्धतेच्या मुळात जर सहभागी झालास १८तर त्या फाट्यांविरुद्ध अभिमान मिरवू नकोस. आणि जरी अभिमान मिरवलास तरी तू मुळाला उचलले नसून मुळाने तुला उचलले आहे. १९मग तू म्हणशील की, मला कलम करून जोडण्यासाठी ते फाटे तोडले गेले. २०बरे, ते अविश्वासामुळे तोडले गेले, आणि तू विश्वासामुळे स्थिर आहेस, ह्यात मोठेपणा मानू नकोस. पण भी; २१कारण, जर देवाने मूळच्या फाट्यांची गय केली नाही तर तो तुझीही गय करणार नाही.
२२तर तू देवाची दया आणि छाटणी बघ. जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण, तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया; नाहीतर, तूही छाटला जाशील. २३आणि ते जर अविश्वासात राहिले नाहीत तर तेही कलम करून जोडले जातील; कारण देव त्यांना पुन्हा कलम करून जोडण्यास समर्थ आहे. २४कारण तुला मूळच्या रानटी जैतुनांतून कापून, जर निसर्गाविरुद्ध, चांगल्या जैतुनाला कलम करून जोडले आहे, तर जे नैसर्गिक फाटे आहेत ते, किती विशेषेकरून, आपल्या मूळच्या जैतुनाला कलम करून जोडले जातील?

२५बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही ह्या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे. २६आणि सर्व इस्राएल अशा प्रकारे तारले जाईल. कारण असे लिहिले आहे की,
 ‘सियोनापासून उद्धारक येईल,
  आणि याकोबातून अभक्ती घालवील.
  २७आणि मी त्यांची पापे दूर करीन
  तेव्हा माझा त्यांच्याबरोबर हा करार होईल.’
२८ते सुवार्तेच्या बाबतीत तुमच्यामुळे वैरी आहेत, पण, ते निवडीच्या बाबतीत पूर्वजांमुळे प्रिय आहेत. २९कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात.
३०कारण ज्याप्रमाणे, पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता, पण आता त्यांच्या आज्ञाभांगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे, ३१त्याचप्रमाणे,  आता तेही अवमान करीत आहेत; म्हणजे, तुमच्यावरील दयेच्या द्वारे त्यांच्यावर दया केली जावी. ३२कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे.
३३अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे निर्णय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत?
  ३४‘कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे?
  किंवा, त्याचा मंत्री कोण होता?
  ३५किंवा कोणी त्याला आधी दिले,
  आणि ते त्याला परत दिले जाईल?’
३६कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.       

—–रोम १२—–

म्हणून, देवाचे उपकार स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, बंधूंनो,  तुम्ही आपली शरिरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत बलिदान’ म्हणून सादर करावीत; ही तुमची स्वसंमत उपासना आहे. आणि ह्या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची, उत्तम व त्याला संतोष देणारी, परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.

कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे. कारण आपल्याला एका शरिरात जसे पुष्कळ अवयव आहेत, आणि सर्व अवयवांचे काम एक नाही, तसे आपण पुष्कळ असून, ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण, एक एक, एकमेकांचे अवयव आहोत. पण, आपल्याला पुरविलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत; जर ते संदेश देणे असेल तर विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावेत; सेवा असेल, तर सेवा करण्यात तत्पर रहावे; जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात, किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी.

प्रीती निष्कपट असावी. वाइटापासून दूर रहा; चांगल्याला बिलगून रहा. १०बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे,  ११कामात आळशी न होता, आत्म्यात उत्तेजित होऊन, प्रभूची सेवा करणारे व्हा. १२आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे, १३पवित्र जनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा. १४जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. १५आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि रडणार्‍यांबरोबर रडा.
१६एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका. १७वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा. १८शक्य असल्यास, सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा. १९प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या. कारण असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’ २०पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्याला खायला दे; तो तान्हेला असेल तर त्याला प्यायला दे; कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील.
२१वाइटाने जिकला जाऊ नकोस; पण चांगल्याने वाइटाला जिक.    

—–रोम १३—–

प्रत्येक जिवाने आपल्यावर असलेल्या सत्तेच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही अशी सत्ता नाही; आणि आहेत त्या देवाकडून नेमलेल्या आहेत. म्हणून, जो सत्तेला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो; आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणतील.

कारण चांगल्या कामात अधिकार्‍यांची भीती नाही, पण वाईट कामात असते; मग, तुला सत्तेची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर, आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल. कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे; पण, तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तरवार धरीत नाही. कारण, तो वाईट करणार्‍यांवर क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे. म्हणून तुम्ही केवळ क्रोधासाठी नाही, पण तसेच विवेकासाठी अधीन राहणे अगत्य आहे.

ह्या कारणास्तव तुम्ही करही देता. कारण ह्याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत. म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्याला कर, ज्याला जकात त्याला जकात, ज्याला आदर त्याला आदर, ज्याला मान त्याला मान.

तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका. कारण जो दुसर्‍यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे. कारण, ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको,’ आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर’, ह्या एका वचनात ती समावलेली आहे. १०प्रीती आपल्या शेजार्‍याचे काही वाईट करीत नाही; म्हणून प्रीती ही नियमशास्त्राची परिपूर्ती आहे.

११आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे. १२रात्र सरत आली असून दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधारातली कामे टाकून प्रकाशातली शस्त्रसामग्री परिधान करू या. १३दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत, किंवा अमंगळपणात व कामातुरपणात, किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये. १४तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहाकरता वासनांसाठी काही योजना करू नका.                        

—–रोम १४—–

जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही. कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्व काही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाज्या खातो. जो खातो त्याने न खाणार्‍यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्‍यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. दुसर्‍याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्याला स्थिर करण्यास समर्थ आहे.
आणि, कोणी एखादा दिवस दुसर्‍या दिवसाहून अधिक मानतो; दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खातरी होऊ द्यावी. जो दिवस पाळतो तो प्रभूसाठी पाळतो, आणि जो खातो तोही प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही, आणि देवाचे उपकार मानतो. कारण, आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही. कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो, आणि आपण मेलो तरी प्रभूकरता मरतो. म्हणून आपण जगलो किवा मेलो तरी प्रभूचे आहोत. कारण ख्रिस्त मेला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
१०मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनापुढे उभे राहणार आहोत. ११कारण असे लिहिले आहे की,
 ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून,
  प्रत्येक गुडघा मला नमन करील,
  आणि प्रत्येक जीभ देवाला मानील.’
१२तर मग आपल्यातला प्रत्येक जण देवाला आपआपला हिशोब देईल.
१३तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये. १४मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची निषिद्ध नाही, पण, जो कोणी कोणतीही गोष्ट निषिद्ध मानतो त्याला ती निषिद्ध आहे. १५पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता, प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मेला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस. १६म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका. १७कारण, खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्व, प्रीती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यांत आहे. १८कारण, जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला संतोष देणारा व माणसांनी पारखलेला होतो.
१९तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्या मागे लागू या. २०अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर शुद्ध आहेत; पण जो मनुष्य दुसर्‍याला अडखळण करून खातो त्याला ते वाईट आहे. २१मांस न खाणे किंवा द्राक्षारस न पिणे किंवा तुझा बंधू ज्यामुळे अडखळतो असे काहीही न करणे चांगले आहे. २२तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय. २३पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही. कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.

—–रोम १५—–

म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वहावा, आणि स्वतःला संतुष्ट करू नये. आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्‍याला जे चांगले असेल त्यात त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे. कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण, ‘तुझी निंदा करणार्‍यांची सर्व निंदा माझ्यावर आली’, हे लिहिले आहे तसे होऊ दिले. कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखांकडून मिळणार्‍या उत्तेजनाने आशा धरावी.
आता, जो धीर व उत्तेजन देतो, तो देव तुम्हाला असे देवो की, तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकांशी एकमनाचे व्हावे; म्हणजे, जो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एकमनाने व एकमुखाने गौरव करावे. म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा.

कारण मी म्हणतो की, ख्रिस्त देवाच्या सत्याकरता, सुनत झालेल्यांचा सेवक झाला; म्हणजे, पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनांचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे, आणि देवाच्या दयेकरता परजनांनी त्याचे गौरव करावे. कारण असे लिहिले आहे की,
 ‘म्हणून, मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन,
  आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’
१०आणि पुन्हा तो म्हणतो की,
 ‘अहो राष्ट्रांनो,
  त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा.’
११आणि पुन्हा,
 ‘सर्व राष्ट्रांनो,
  परमेश्वराचे स्तवन करा,
  सर्व लोक त्याची स्तुती करोत.’
१२आणि पुन्हा, यशया म्हणतो की,
 ‘इशायाचा अंकुर फुटेल,
  आणि, जो राष्ट्रांवर राज्य करण्यास उठेल
  त्याच्यावर राष्ट्रे आशा ठेवतील.’
१३आणि आता आशेचा देव तुम्हाला तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.

१४आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मीही स्वतः मानतो की, तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण, सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले व एकमेकांस बोध करण्यास समर्थही आहा. १५पण मी तुम्हाला आठवण द्यावी म्हणून, तुम्हाला काही ठिकाणी, अधिक धैर्याने लिहिले आहे; कारण मला देवाने पुरविलेल्या कृपेमुळे मी तुम्हाला लिहिले आहे. १६ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परजनांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे, परजन हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे. १७म्हणून मला, देवाविषयीच्या गोष्टींत, ख्रिस्त येशूच्या द्वारे अभिमानाला कारण आहे. १८-१९कारण परजनांस आज्ञांकित करावे म्हणून, ख्रिस्ताने माझ्याकडून, शब्दाने व कृतीने – चिन्हांच्या व अद्भुतांच्या सामर्थ्याने – पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घडविलेल्या गोष्टींशिवाय मी कोणत्याच गोष्टींविषयी सांगण्यास धजणार नाही. मी ह्यामुळे यरुशलेमपासून सभोवताली इल्लूरिकमपर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे. 
२०पण दुसर्‍याच्या पायावर बांधणारा होऊ नये म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते, अशा ठिकाणी, मी सुवार्ता सांगण्यास झटलो. २१म्हणजे, शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे,
 ‘ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते
  ते लोक पाहतील,
  आणि ज्यांनी ऐकले नव्हते
  त्यांना समजेल.’

२२आणि म्हणून, तुमच्याकडे येण्यात मला पुष्कळ अडथळा आला. २३पण आता, ह्या भागात काही वाव न राहिल्यामुळे व तुमच्याकडे यावे अशी इतक्या पुष्कळ वर्षांपासून माझी उत्कंठा असल्यामुळे, २४मी स्पेनकडे प्रवास करीन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी अशी आशा करतो की, मी तिकडे जाताना तुम्हाला भेटेन आणि तुमच्यात आधी, थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिकडे पोहचते करावे.
२५पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरुशलेमला जात आहे. २६कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरुशलेमात रहात असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी. २७हे खरोखर त्यांना बरे वाटले; आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण त्यांच्या आत्मिक गोष्टींत जर परजन भागीदार झाले आहेत, तर दैहिक गोष्टींत त्यांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. २८म्हणून मी हे पुरे केल्यावर हे पीक त्यांना शिक्का करून देऊन, तुमच्या बाजूकडून स्पेनला जाईन. २९आणि माझी खातरी आहे की, मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन.

३०पण, मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकरता व आत्म्याच्या प्रीतीकरता, बंधूंनो, तुम्हाला विनंती करतो की, माझ्या लढ्यात, तुम्ही माझ्याकरता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथी व्हा; ३१म्हणजे,  यहुदियात जे अवमान करणारे लोक आहेत त्यांच्या हातून माझी सुटका व्हावी, आणि यरुशलेमसाठी जी माझी सेवा आहे ती तेथील पवित्र जनांस मान्य व्हावी; ३२म्हणजे, देवाच्या इच्छेने मी आनंदाने तुमच्याकडे यावे व तुमच्या सहवासात पुन्हा उत्तेजित व्हावे. ३३आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.         

—–रोम १६—–

आता, किख्रियात असलेल्या मंडळीची सेविका, आपली भगिनी फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करतो की, तुम्ही पवित्र जनांस शोभेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा, आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यात तिचे साहाय्यक व्हा; कारण ती स्वतः पुष्कळांना व मलाही साहाय्यक झाली आहे.
ख्रिस्त येशूत माझे जोडीदार-कामकरी प्रिस्का व अक्विला ह्यांना सलाम द्या. त्यांनी माझ्या जिवासाठी आपल्या स्वतःच्या माना दिल्या, आणि मीच एकटा त्यांचे उपकार मानतो असे नाही, पण परजनांतील सर्व मंडळ्या त्यांचे उपकार मानतात. त्याचप्रमाणे, त्यांच्या घरात जमणार्‍या मंडळीलाही सलाम द्या. आणि माझ्या प्रिय अपैनतला सलाम द्या; तो ख्रिस्तासाठी अखयाचे प्रथमफळ आहे. मरियेला सलाम द्या; तिने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत; माझे आप्त व जोडीदार-बंदिवान अंद्रोनिकस व युनिया ह्यांना सलाम द्या; प्रेषितांत त्यांचे नाव आहे व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्ताचे झाले होते. प्रभूमध्ये माझा प्रिय अंप्लियात ह्याला सलाम द्या. ख्रिस्तात आमचा जोडीदार-कामकरी उर्बान, आणि माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम द्या. १०ख्रिस्तात पारखलेला अपिल्लेस ह्याला सलाम द्या. अरिस्तबूलच्या घरातल्यांना सलाम द्या.
११माझा आप्त हेरोदियोन ह्याला सलाम द्या. नार्कीसच्या घरचे जे प्रभूत आहेत त्यांना सलाम द्या. १२प्रभूमध्ये श्रम करणार्‍या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत. १३प्रभूमध्ये निवडलेला रुफस व त्याची आई ह्यांनाही सलाम द्या. ती माझीही आई आहे. १४असुंक्रितस, फ्लगोन, हरमेस, पत्रबास आणि हरमास ह्यांना व त्यांच्याबरोबर राहणार्‍या बांधवांना सलाम द्या. १५फिललोगस आणि युलिया, निरीयस व त्याची बहीण, आणि ओलुंपास ह्यांना सलाम द्या, आणि त्यांच्याबरोबर राहणार्‍या सर्व पवित्र जनांस सलाम द्या. १६पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम पाठवीत आहेत.

१७आता, बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा. १८कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात, आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या माणसांची मने बहकवतात; १९कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाइटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे. २०आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.

२१माझा जोडीदार-कामकरी तिमथ्य आणि माझे आप्त लुकियस, यासोन व सोसिपेतर हे तुम्हाला सलाम पाठवतात. २२हे पत्र ज्याने लिहिले आहे तो तर्तियस तुम्हाला प्रभूमध्ये सलाम पाठवीत आहे. २३माझा आणि ह्या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हाला सलाम पाठवीत आहे. नगरकारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हाला सलाम पाठवतात.

२४-२६आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे जे रहस्य मागील युगात गुप्त ठेवण्यात आले,पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळविले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ आहे, २७त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s