Revelation 6-10

संत योहानाला झालेले प्रकटीकरण

—–प्रकटी ६—–

आणि मी बघितले की, कोकर्‍याने सात शिक्क्यांतला एक शिक्का उघडला, आणि मी ऐकले की, गडगडाट व्हावा अशा आवाजात त्या चार प्राण्यांतील एकाने म्हटले, ये. तेव्हा मी बघितले, आणि बघा, एक पांढरा घोडा, आणि त्यावर जो बसला होता त्याच्याजवळ एक धनुष्य होते;  त्याला एक मुगुट देण्यात आला, आणि तो विजय मिळवीत विजय मिळवायला पुढे गेला.
आणि त्याने दुसरा शिक्का उघडला तेव्हा मी ऐकले की, दुसर्‍या प्राण्याने म्हटले, ये. आणि दुसरा एक लाल घोडा बाहेर निघाला, आणि त्यावर जो बसला होता त्याने पृथ्वीवरून शांती काढावी आणि त्यांनी एकमेकांस ठार मारावे, हे त्याच्याकडे देण्यात आले. त्याला एक मोठी तरवार देण्यात आली.
आणि त्याने तिसरा शिक्का उघडला तेव्हा मी ऐकले की, तिसर्‍या प्राण्याने म्हटले, ये, आणि मी बघितले आणि बघा, एक काळा घोडा; आणि त्यावर जो बसला होता त्याच्या हातात एक तराजू होता. आणि जणू त्या चार प्राण्यांच्या मध्यभागी मी एक वाणी ऐकली, आणि ती म्हणाली, एका दिनारास एक माप गहू, आणि एका दिनारास तीन मापं जव; पण तेल आणि द्राक्षारस नासू नको.
आणि त्याने चौथा शिक्का उघडला तेव्हा चौथ्या प्राण्याने ये म्हटल्याचा आवाज मी ऐकला. तेव्हा मी बघितले, आणि बघा, एक फिक्कट घोडा, आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव मृत्यू होते; आणि त्याच्या मागोमाग अधोलोक आला. आणि, त्यांना पृथ्वीच्या चौथ्या भागावर तरवारीने व भुकेने आणि मरी पाठवून व पृथ्वीवरील पशूंकडून ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला.
आणि, त्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा जे देवाच्या वचनाकरता व त्यांनी दिलेल्या साक्षीकरता मारले गेले होते त्यांचे आत्मे मी वेदीखाली बघितले. १०ते मोठ्या आवाजात ओरडत म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र आणि खरा आहेस; तू कुठवर न्याय करणार नाहीस, आणि पृथ्वीवर राहणार्‍यांवर तू आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस?’ ११तेव्हा त्यांच्यातील प्रत्येकाला पांढरे झगे देण्यात आले व त्यांना असे सांगण्यात आले की, जे त्यांचे जोडीदार-दास आणि त्यांचे बंधू त्यांच्याप्रमाणेच मारले जाणार आहेत त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत अजून आणखी त्यांनी विसावा घ्यावा.
१२आणि त्याने सहावा शिक्का उघडला तेव्हा मी बघितले आणि मोठा भूकंप झाला; आणि सूर्य केसांच्या तरटासारखा काळा झाला व चंद्र रक्तासारखा झाला. १३आणि जसे अंजिराचे झाड मोठ्या वार्‍याने हलवले जाते तेव्हा आपली फळे गाळते तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. १४आणि जशी गुंडाळी गुंडाळली जाते तसे आकाश निघून गेले, आणि सर्व डोंगर व बेटे आपल्या ठिकाणांवरून ढळली. १५आणि पृथ्वीचे राजे, सरदार व सेनापती, धनवान व बलवान लोक, दास आणि स्वतंत्र, असे सर्व जण गुहांत व डोंगरांतील खडकांत लपले. १६आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, आमच्यावर पडा, आणि राजासनावर बसलेल्याच्या तोंडापुढून व कोकर्‍याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा. कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि कोण उभा राहू शकेल?  

—–प्रकटी ७—–

मग मला चार देवदूत पृथ्वीच्या चार कोपर्‍यांवर उभे राहिलेले दिसले. त्यांनी पृथ्वीचे चार वारे अडवले होते. म्हणजे पृथ्वीवर किवा समुद्रावर किवा कोणत्याच झाडावर वारा वाहू नये. आणि मला आणखी एक देवदूत सूर्याच्या उगवतीकडून निघताना दिसला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. आणि त्या ज्या चार दूतांकडे पृथ्वीला व समुद्राला अपाय करण्याचे सोपविले होते त्यांना तो मोठ्या आवाजात ओरडत म्हणाला, आपल्या देवाच्या दासांच्या कपाळांवर आमचे शिक्के करणे पुरे होईपर्यंत तुम्ही पृथ्वीला किवा समुद्राला किवा झाडांना अपाय करू नका. आणि ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्राएलाच्या वंशजांच्या सगळ्या कुळांतील, एक लक्ष चौवेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.
यहुदा वंशातील बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला.
रुबेन वंशातील बारा हजारांवर, आणि गाद वंशातील बारा हजारांवर,
आशेर वंशातील बारा हजारांवर, नफताली वंशातील बारा हजारांवर, मनश्शे वंशातील बारा हजारांवर,
शिमोन वंशातील बारा हजारांवर, लेवी वंशातील बारा हजारांवर, इस्साखार वंशातील बारा हजारांवर,
जबलून वंशातील बारा हजारांवर, योसेफ वंशातील बारा हजारांवर आणि बन्यामीन वंशातील बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला.
त्यानंतर मी बघितले, आणि बघा, सर्व राष्ट्रांतील, वंशांतील, समाजांतील व सर्व भाषा बोलणार्‍यांतील पुष्कळ लोकांचा, कोणी मोजू शकला नाही एवढा समुदाय पांढरे झगे परिधान करून आणि आपल्या हातात झावळ्या घेऊन राजासनापुढे व कोकर्‍यापुढे उभा होता; १०ते मोठ्या आवाजात ओरडून म्हणाले,
 राजासनावर बसलेल्या
आमच्या देवाकडून
आणि कोकर्‍याकडून तारण आहे.
११तेव्हा सर्व देवदूत राजासनाच्या, आणि वडिलांच्या व त्या चार प्राण्यांच्या सभोवताली उभे होते; ते राजासनापुढे आपल्या तोंडावर पालथे पडले आणि त्यांनी देवाला नमन करून १२म्हटले,
 आमेन. धन्यवाद,
आणि गौरव आणि सुज्ञता,
  उपकारस्मरण आणि मान,
सत्ता आणि बळ
  ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत.
  आमेन.
१३तेव्हा वडिलांतील एकाने उत्तर देऊन मला म्हटले,
हे पांढरे झगे घातलेले कोण आहेत आणि हे कुठून आले?”
१४आणि मी त्याला म्हटले,
महाराज, आपण जाणता.
तेव्हा तो मला म्हणाला,
हे मोठ्या संकटातून आले आहेत; आणि ह्यांनी आपले झगे, कोकर्‍याच्या रक्तात धुऊन, पांढरे केले आहेत. १५म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि त्याच्या मंदिरात, अहर्निश, त्याची सेवा करतात. आणि जो राजासनावर बसतो तो त्यांच्याबरोबर वसती करील. १६त्यांना ह्यापुढं भूक लागणार नाही किवा तहानही लागणार नाही. सूर्य किवा कोणतीही उष्णता त्यांना बाधणार नाही. १७कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल, आणि त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍यावर नेईल, आणि देव त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल. 

—–प्रकटी ८—–

आणि त्याने सातवा शिक्का उघडला तेव्हा स्वर्गात सुमारे अर्धा तास स्तब्धता झाली. आणि जे सात देवदूत देवासमोर उभे राहतात ते मला दिसले; त्यांना सात कर्णे दिले गेले. तेव्हा आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला; त्याच्याजवळ एक सोन्याचे धुपाटणे होते. आणि त्याने राजासनापुढच्या सुवर्णवेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांबरोबर, धूप अर्पण करावा म्हणून त्याला पुष्कळ धूप देण्यात आला. आणि त्या धुपाचा धूर त्या देवदूताच्या हातामधून, पवित्र जनांच्या प्रार्थनांबरोबर देवासमोर वर चढला. मग त्या देवदूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा विस्तव भरला व तो पृथ्वीवर टाकला; तेव्हा गडगडाट, आवाज आणि विजांचे लखलखाट होऊन भूकंप झाला. मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते त्यांनी आपले कर्णे वाजवायला आपल्या स्वतःला तयार ठेवले.
मग पहिल्याने कर्णा वाजवला तेव्हा रक्तमिश्रित हिम व अग्नी उद्धवले आणि पृथ्वीवर टाकले गेले; तेव्हा पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला, एकतृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.
मग दुसर्‍या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काही समुद्रात टाकले गेले; तेव्हा एकतृतीयांश समुद्राचे रक्त झाले, समुद्रात असलेल्या ज्या प्राण्यांत जीव होता त्यांतले एकतृतीयांश प्राणी मेले; आणि एकतृतीयांश तारवे नष्ट झाली.
१०मग तिसर्‍या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा आकाशामधून एक मोठा तारा जळत्या मशालीसारखा खाली पडला. तो एकतृतीयांश नद्यांवर व पाण्याच्या झर्‍यांवर पडला. ११आणि, त्या तार्‍याचे नाव कडू दवणा आहे;आणि एकतृतीयांश पाण्याचा कडू दवणा झाला आणि त्या पाण्यामुळे पुष्कळ लोक मेले, कारण ते कडू झाले होते.
१२मग चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याच्या तिसर्‍या भागावर, चंद्राच्या तिसर्‍या भागावर आणि तार्‍यांच्या तिसर्‍या भागावर प्रहार झाला. त्यामुळे त्यांचा एकतृतीयांश भाग अंघकारमय झाला, आणि त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशमान झाला नाही, आणि रात्रीचाही नाही. १३तेव्हा मी बघितले आणि ऐकले की, एक गरूड अंतराळाच्या मध्यभागी उडत होता आणि मोठ्या आवाजात म्हणत होता की, अजून तीन देवदूत कर्णे वाजवतील तेव्हा आणखी होणार्‍या कर्ण्यांच्या आवाजामुळं पृथ्वीवर राहणार्‍यांवर आपत्ती येईल, आपत्ती येईल, आपत्ती येईल.  

—–प्रकटी ९—–

मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला आणि मी बघितले की, आकाशामधून पृथ्वीवर एक तारा पडला; आणि अगाधकूपाच्या डोहाची किल्ली त्याच्याजवळ देण्यात आली. तेव्हा त्याने अगाधकूपाचा डोह उघडला, आणि मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर त्या डोहातून वर आला. त्या डोहाच्या धुरामुळे सूर्य व अंतराळ अंघकारमय झाले. आणि त्या धुरातून पृथ्वीवर टोळ आले. आणि पृथ्वीवरील विचवांना जेवढे स्वातंत्र्य आहे तेवढे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले; आणि त्यांना आज्ञा दिली गेली की, त्यांनी पृथ्वीवरील गवताला, हिरवळीला किवा कोणत्याच झाडाला अपाय करू नये, पण ज्यांच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही अशा माणसांना अपाय करावा. त्यांनी त्यांना ठार मारू नये, पण त्यांना पाच महिने पीडण्यात यावे अशी मुभा त्यांना दिली गेली. आणि विचू माणसाला नांगी मारतो तेव्हा होणार्‍या पीडेसारखी त्यांची पीडा होणार होती.
त्या दिवसांत लोक मरण मिळवू पाहतील पण त्यांना ते मिळणार नाही. ते मरणाची इच्छा धरतील, आणि मरण त्यांच्यापासून दूर पळेल. आणि लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे त्या टोळांचे रूप होते. त्यांच्या डोक्यांवर सोन्यासारख जणू मुगुट होते व त्यांची तोंडे माणसांच्या तोंडासारखी होती. त्यांना स्त्रियांच्या केसांसारखे केस होते; आणि सिंहासारखे त्यांचे दात होते. त्यांना त्यांची उरस्त्राणे होती; ती जणू लोखंडी उरस्त्राणे होती. आणि त्यांच्या पंखांचा आवाज लढाईसाठी धावत जाणार्‍या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. १०त्यांना विचवासारख्या शेपट्या आणि नांग्या आहेत. आणि लोकांना पाच महिने अपाय करण्यास त्यांच्या शेपट्यात त्यांची शक्ती आहे. ११त्यांना अगाधकूपाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. इब्री भाषेत त्याचे नाव अबद्दोन आहे. आणि हेल्लेणी भाषेत त्याचे नाव अपुल्लोन आहे.
१२पहिली आपत्ती येऊन गेली; बघा, आणखी दोन आपत्ती येणार आहेत.
१३मग सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला आणि देवासमोरील सुवर्णवेदीच्या चार शिगांमधून मला एक वाणी ऐकू आली. १४ती वाणी कर्णा घेतलेल्या सहाव्या देवदूताला म्हणाली, महान फरात नदीवर बांधलेल्या चौघा देवदूतांना सोड. १५आणि, एकतृतीयांश माणसांना ठार मारायला ज्यांना त्या घटकेसाठी, दिवसासाठी, महिन्यासाठी आणि वर्षासाठी तयार ठेवले होते ते चार देवदूत सोडले गेले. १६आणि घोडदलाच्या सैन्यांची संख्या वीस कोटी होती. मी त्यांची संख्या ऐकली. १७ते घोडे आणि त्यांवर जे बसले होते ते मला दृष्टान्तात असे दिसलेः त्यांची उरस्त्राणे जणू विस्तवासारखी, धूम्रकांत मण्यासारखी आणि गंधकासारखी होती आणि घोड्यांची डोकी सिहांच्या डोक्यांसारखी होती व त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक बाहेर निघत, १८ह्या तीन पीडांमुळे, त्यांच्या तोंडांतून बाहेर निघणार्‍या अग्नीमुळे, धुरामुळे आणि गंधकामुळे एकतृतीयांश माणसे मारली गेली. १९कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडांत व शेपटांत होती. कारण त्यांची शेपटे सापांसारखी असून त्यांना डोकी आहेत आणि ते त्यांनी अपाय करतात.
२०आणि जे ह्या पीडांमुळे मारले गेले नाहीत त्या राहिलेल्या माणसांनी तरीही आपल्या हातच्या कामांचा पश्चात्ताप केला नाही, आणि त्यांनी भुतांची, किवा ज्यांना पाहता येत नाही, ऐकता येत नाही आणि चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या किवा लाकडाच्या मूर्तींची उपासना करणे सोडले नाही, २१किवा त्यांनी आपल्या खुनांचा, आपल्या जादुटोण्याचा, आपल्या जारकर्माचा किवा आपल्या चोर्‍यांचा पश्चात्ताप केला नाही.    
 
—–प्रकटी १०—–

मग मला आणखी एक देवदूत स्वर्गातून खाली येताना दिसला. त्याने एक ढग परिधान केला होता; त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे आणि त्याचे पाय अग्नीच्या स्तंभासारखे होते आणि त्याच्या हातात एक लहान उघडलेले पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर आणि डावा जमिनीवर खाली टेकला. आणि तो मोठ्या आवाजात, सिह गुरगुरतो तसा ओरडला; आणि तो ओरडला तेव्हा विजांच्या सात गडगडाटांनी आपले आपले शब्द उच्चारले. आणि त्या सात गडगडाटांनी जेव्हा आपले शब्द उच्चारले तेव्हा मी लिहिणार होत; पण मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली,
हे सात गडगडाट जे काही बोलले ते गुप्त ठेव; ते लिहू नकोस.
आणि मला जो देवदूत समुद्रावर आणि जमिनीवर उभा राहिलेला दिसला त्याने आपला उजवा हात आकाशाकडे वर उचलला; आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश आणि त्यात जे आहे, पृथ्वी आणि तीवर जे आहे, आणि समुद्र आणि त्यात जे आहे ते उत्पन्न केले आहे त्याची शपथ वाहून तो म्हणाला, आणखी काळ लागणार नाही, पण सातवा देवदूत कर्णा वाजवील तेव्हा त्याच्या आवाजाच्या दिवसांत, देवाने आपले दास-संदेष्टे ह्यांना ज्याची सुवार्ता कळविली आहे ते त्याचे रहस्य पूर्ण होईल.
आणि मी स्वर्गातून ऐकलेली वाणी मी पुन्हा माझ्याशी बोलताना ऐकली आणि ती मला म्हणाली,
जा, समुद्रावर आणि जमिनीवर जो देवदूत उभा आहे त्याच्या हातातले ते उघडलेले पुस्तक घे.
तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन त्याला म्हणालो,
मला ते लहान पुस्तक दे.
आणि तो मला म्हणाला,
हे घे आणि खाऊन टाक. ते तुझं पोट कडू करील, पण ते तुझ्या तोंडात मधासारखं गोड लागेल.
१०आणि मी ते लहान पुस्तक त्या देवदूताच्या हातातून घेतले आणि खाऊन टाकले. ते माझ्या तोंडात मधासारखे गोड लागले पण मी ते खाल्ले तेव्हा माझे पोट कडू झाले.
११आणि तो मला म्हणाला,
तुला पुष्कळ समाजांविषयी, राष्ट्रांविषयी, निरनिराळ्या भाषा बोलणार्‍यांविषयी आणि राजांविषयी पुन्हा साक्ष दिली पाहिजे. 

Write Your Comment